सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्पेशल रविवार…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नुकताच येऊन गेलेला रविवार माझ्यासाठी खूप स्पेशल ठरला. काय माहित कसा काय पण एखादा दिवसच उगवतो मुळी मस्त. खरतरं कामवालीने पण रविवारी सुट्टी घेतली होती त्यामुळे सगळी कामे आपला हात जगन्नाथ. पण तरीही अजिबात चिडचिड झाली नाही. उलट कामे वाढली तरी पटापट यंत्रवत झपाट्याने उरकली. महाशिवरात्रीचं पारणं असल्याने स्वयंपाक आपोआपच जरा साग्रसंगीत आणि गोड पदार्थांचा होता.त्यात रविवारी तारखेने “अहों” च्या गोंदवलेकर महाराजांची जयंती असल्याने गव्हल्याची खीर होती स्पेशल नैवेद्याला. माझी आत्या खूप सुंदर निगुतीने गव्हले करते आणि प्रेमाने माझ्यासाठी गव्हले राखून ठेवते. खरंच ही जवळची, प्रेमाची आणि आपल्यावर जीवतोडून मनापासून प्रेम करणारी मंडळी ही पण एक प्रकारची श्रीमंतीच बरं का.

सुट्टी चा रविवार एका कारणासाठी खास ठरला कारण ह्या दिवशी एक खूप छान मराठी चित्रपट मला सलग बघता आला. विनाव्यत्यय सलग चित्रपट बघण्याचा योग कितीतरी दिवसां नंतर आला होता.रविवारी दुपारी एक वाजता “गोष्ट एका पैठणीची” हा मराठी चित्रपट बघितला. काल परवा ह्या चित्रपटाचे समीक्षण पण वाचण्यात आलं. डोक्याला ताण न देणारा, डोक्यावरून न जाणारा उलटपक्षी नवीन चांगले विचार डोक्यात भरविणारा हा चित्रपट. ह्याचे परीक्षण नुकतेच सगळ्यांनी वाचल्यामुळे त्यावर न लिहीता ह्या चित्रपटाने आपल्याला काय दिलयं ह्याकडे आज बघूया.

चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सामान्य, निम्न मध्यमवर्गीय कुटुंब हे चित्रपटा च्या शेवटापर्यंत अगदी मध्यमवर्गीय कुटुंबा सारखे दाखवलेयं. त्यांच राहणीमान, घर, ह्यात कुठेही अगदी स्वप्नरंजन म्हणून सुद्धा केंद्रबिंदू असलेल्या जोडप्याकडे आवश्यक नसलेली श्रीमंती घुसडण्यात आली नाही. नायिका असलेली सायली संजीव परत एकदा  मराठी धारावाहिक “काहे जिया परदेस” मधील गौरी इतकीच प्रेक्षकांना आवडतेयं.नायक सुव्रत पण एकदम भुमिकेला न्याय देणारा अभिनेता.

ह्या चित्रपटाचा” पैठणी शोध मोहीम” हा गाभा असला तरी एका पैठणीमागोमाग  चार पैठण्यांचा मागोवा ह्या चित्रपटभर आहे. ह्या सिनेमाचे कथानक चित्रपट छान असल्याने. आपणच बघावा,मी फक्त ह्यातून ठळकपणे जाणवलेल्या गोष्टींचा उल्लेख करते.

सर्वप्रथम शोधमोहीमेची सुरवात ही येवल्यातून होते.तेथील पैठणीच्या दुकानातील माई सायलीला जी मदत करतात त्यावरून जगात अजूनही चांगुलपणा टिकून आहे ह्याचा परत एकदा अनुभव घेतला. मग शोधमोहीमे मधील पहिली पैठणी मिळते एका अमेरिकेत स्थायी असलेल्या मुलाच्या वडीलांकडे, मोहन जोशी ह्यांच्या कडे.त्या अनुभवातून वयाच्या एका स्टेजला तरी पैशाअडक्यापेक्षा हाडामासांची मुलं सानिध्यात हवीतच अशी प्रकर्षाने माणसाची ईच्छा असतेच हे कळलं. दुसरी पैठणी सापडते सांगलीच्या राजेसरकारां कडे .तेथे एकसोडून दोन पैठण्या मिळतात. मिलिंद गुणाजी ह्यांचा अभिनय बघून “मेन वील बी मेन” ह्याची जाणीव होते. तिसरी पैठणी सांगून जाते वेळ निघून गेल्यावर हाती शुन्य उरतं. त्यामुळे जवळच्या  माणसांना वेळीच वेळ द्यावा.

सिनेमाचा क्लायमॅक्स मात्र स्वतः प्रत्येकाने बघावा. एक छान तणावरहित सिनेमा एवढचं मी म्हणेन.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments