मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 33 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 33 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

५१.

रात्र गडद काळी झाली.

आमची दिवसभराची कामं झाली होती.

आम्हांला वाटलं. . .

रात्रीसाठी येणारा शेवटचा प्रवासी आला.

आम्ही गावाचा दरवाजा लावून घेतला.

कोणीतरी म्हणालं. . .

‘ राजा अजून यायचाय.’

आम्ही हसलो.’ ते! कसं शक्य आहे?’

 

दारावर टकटक झाली.

आम्ही म्हणालो,’ ते काही नाही.

फक्त वाऱ्याचा आवाज आहे.’

दिवे मालवून आम्ही झोपायला गेलो.

कोणीतरी म्हणाले,’ तो दूत दिसतोय.’

आम्ही हसून म्हणालो,

‘ नाही! ते वारंच असलं पाहिजे.’

 

रात्रीच्या निरवतेत एक आवाज उमटला.

दूरवर विजेचा गडगडाट झाला

असं आम्हाला वाटलं. आम्हांला वाटलं. . .

धरणी थरथरली, भिंती हादरल्या.

आमची झोप चाळवली.

एकजण म्हणाला, ‘चाकांचा आवाज येतोय.’

आम्ही झोपेतच बरळलो,

‘ छे!हा तर ढगांचा गडगडाट!’

 

ढोल वाजला. रात्र काळोखी होती-

आवाज आला,’ उठा! उशीर करू नका!’

भीतीनं आम्ही आमचे हात छातीवर दाबून धरले.

आमचा थरकाप उडाला.

‘ तो पहा राजाचा ध्वज!’ कुणीतरी म्हणाले.

आम्ही खाडकन जागे झालो.

‘ आता उशीर नको.’

 

कुणीतरी म्हणालं,” आता ओरडून काय उपयोग?”

त्याला रिकाम्या हातांनी सामोरे जा आणि

ओक्याबोक्या महालात आणा.”

” दार उघडा! शिंग फुंका!

मध्यरात्री आमच्या अंधाऱ्या,ओसाड घरांचा

राजा आला आहे.”

 

आकाशात विजांचा गडगडाट होतो आहे.

त्यांच्या चमचमाटात अंधाराचा थरकाप होतो.

 

” तुमची फाटकी सतरंजी आणा.महालात पसरा.

वादळवाऱ्यात एकाएकी अचानकपणे

भयाण रात्रीचा राजा आला आहे.”

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पालक स्वतःचीच… लेखिका :उषा फाटक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पालक स्वतःचीच… लेखिका :उषा फाटक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

मी. वय ७४ ….पालक स्वतःचीच !!

पंचवीस वर्षापूर्वी माझी दोन्ही मुलं घर सोडून बाहेर गेली.

प्रथम शिक्षणासाठी, मग नोकरी साठी.

आधी देशात, नंतर परदेशात.

त्याच वेळी मनाशी खूणगाठ बांधली की आता यापुढे आपणच आपल्या साठी. (खरंतर ही खूणगाठ मुलं जन्माला आली तेव्हाच बांधली होती, की वीस पंचवीस वर्षांनी पाखरं घरटं सोडून उडून जाणार).

एकदा मनाची तशी धारणा झाल्यावर पुढचं फार सोपं होतं. आपली सर्व कामे आपणच करायची.

शक्यतो कुणावर अवलंबून रहायचं नाही. एकदा करायला लागलं की सगळं जमतंच !!

त्या काळात हा शब्द नव्हता पण ‘आत्मनिर्भर’ झाले.

घरात कंप्यूटर असून कधी हात न लावणारी मी, पन्नासाव्या वर्षी क्लासला जाऊन कंप्यूटर शिकले. मुलांना मेल करु लागले. पुढे फेसबुक, व्हाट्सअँप, स्काईप, व्हिडिओ कॉल …टेक्नॉलॉजी बदलत गेली तसं मीही सगळं वापरायला शिकले. मुलं पुढे पुढे धावताहेत… आपण थोडं चालायला तरी हवं. नाहीतर आपल्यातलं अंतर वाढतच जाईल.

केल्याने होत आहे रे….. आधी केलेची पाहिजे !!

आत्मविश्वास वाढत गेला. आता कोविडच्या काळात ऑनलाईन व्यवहार सोपे झाले. खरेदी, बँकेचे व्यवहार ऑनलाईन करायला शिकले. काही अडले, तर विनासंकोच कुणाला विचारते.

आता मी एकटी रहाते. मुलांशी संपर्क असतोच. आपली आई चांगली खंबीर आहे, हा विश्वास मुलांनाही आहे.

सुदैवाने प्रकृती चांगली आहे. लहानपणापासून केलेला व्यायाम आणि संतुलित आहार-विहार यामुळे हे साध्य झाले आहे.

नातेवाईक, शेजारी यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. मित्रमंडळी आहेत, स्वतःचे छंद आहेत. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच कधी पडत नाही.

एक गोष्ट नक्की…. आपण दुसऱ्यासाठी होईल तेव्हढे करत रहावे… आपल्यावर वेळ आली तर कोणीतरी नक्की धावून येतील. आधी प्रेम द्यावे आणि मग प्रेम घ्यावे…

“एकमेका करू सहाय्य” हा आजच्या जगण्याचा मूलमंत्र आहे.

आज तरुण असलेल्या पिढीलाही मी हेच सांगेन…  म्हातारपणासाठी जशी आर्थिक तरतूद करता, तशी शारीरिक आणि मानसिक तरतूदही करा. शारीरिक फिटनेससाठी व्यायाम  आणि मानसिक फिटनेससाठी आवडीचा छंद जोपासा… स्वतःचे विश्व निर्माण करा….आणि मुख्य म्हणजे झाल्यागेल्याची खंत करणे सोडून द्या. वृत्ती समाधानी ठेवा.

आणि हो, हे सर्व एका दिवसात निर्माण होत नाही. तरुण वयातच याची सुरुवात करावी लागते. तरच म्हातारपण सुखाचे होईल !

लेखिका :उषा फाटक

संग्राहिका: मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ होतं असं कधीकधी…! ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ होतं असं कधीकधी…!  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

खूप महत्वाच्या मीटिंगमध्ये असतो आपण…

बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली….

इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण…

संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते…

परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे…

टाळतो आपण कॉल करायचा….

त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो…

‘तुझ्या ऑफिस बाहेर होतो…

भेटलो असतो…’

जुन्या आठवणी काढत बसतो आणि  मन रमवतो त्यातच..

स्वतःला खोटं खोटं समजावत…!

होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁

कडक उन्हात सिग्नलला बाईक उभी असते आपली…

रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना…

माया,कणव दाटून येते मनात आपल्या…

‘कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत?’

पाकिटात हात जातो…

शंभराची नोट लागते हाती…

व्यवहार जागा घेतो ममतेची…

समोरचा म्हातारा ओळखतो… बदलतो…

“दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा…”

तो सुटका करतो आपली पेचातून…

आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून…

होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁

दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले…

आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते…

तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा  वेळी…

दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात…

ती येते…

काम आटोपते…

तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना, कामवाली एक डबा देते हातात आपल्या…

चिवडा लाडू असतो त्यात…

“तुम्ही दर वेळा देता… आज माझ्याकडून तुम्हाला…”

‘कोण श्रीमंत कोण गरीब’, हा विचार सोडत नाही पिच्छा आपला…

होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁

ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर…

आई उठवते उन्हं अंगावर  आल्यावर…

अंगात ताप असतो तिच्या…

आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती…

मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत…

दिवस उलटतात…

वडिलांचा एके रात्री फोन येतो…

“काम झालं असेल तर आईला एक फोन कर… आज तिचा वाढदिवस होता…”

कोडगेपणा म्हणजे हाच तो काय…!

चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले  birthday विश आठवतात…..

लाजत तिला फोन करतो…

“आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा…”

ती बोलते…

कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो…

अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून…

काहीतरी खूप खूप दूर जातंय आपल्या पासून असं जाणवत राहतं…!!

खरंच, होतं असं कधी कधी…!!

लेखक :अज्ञात

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गृहिणीची कमाई… सुश्री सुमन नासागवकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ गृहिणीची कमाई… सुश्री सुमन नासागवकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

एक दिवस एक उच्चशिक्षित नवरा आपल्या बायकोला  भाषण देत होता, “पैसे कमव आणि मग तुला कळेल  की पैसा कसा खर्च करावा.मी तुला आज एक दिवस देतो. घराच्या बाहेर पड आणि बघ किती स्पर्धा चालू आहे. काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी”…..आणि तीही एक शिक्षित बायको, एक आई आणि एक सून होती.

ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली.. इकडे जा, तिकडे जा आणि मग तिच्या लक्षात आले, ‘अरे हो. खरंच की. आपण ही पैसा कमावू शकतो. मग का आपण शिक्षित असूनही इतके दिवस घालवले?’

घरी आली. नेहमीप्रमाणे सासू सासऱ्यांना वेळेवर नाश्ता, जेवण, मुलांचा डबा, वेळेवर शाळेत पाठवणे , नवऱ्याला डबा, त्याचा आवडीचा नाश्ता, जेवण बनवले आणि खोलीत गेली.

नवरा आला आणि म्हणाला, ” काय मग? कळाले असेल आज, मार्केटमध्ये किती स्पर्धा चालू आहे आणि तू फक्त घरात बसलीयस.”

तिने काही न बोलता त्याला एक लिस्ट दिली. त्यात तिने घरात  घालवलेली अनेक व्यर्थ वर्षे व मार्केट मध्ये त्या कामांसाठी मोजावी लागणारी किंमत यांची यादी होती.

तिने सुरुवात  त्याच्याच आई-वडिलांपासून केली होती. ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली, त्याला एकदम घाम फुटला.

  • सासू-सासऱ्यांची सेवा, ज्याला मार्केटमध्ये केअरटेकर म्हणतात. पगार – ₹20,000
  • मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे ज्याला मार्केटमध्ये बेबीसीटिंग म्हणतात. पगार ₹15000
  • घरातील पसारा जागेवर ठेवणे  आणि घर काम करणे ज्याला मार्केटमध्ये मेड म्हणतात.पगार ₹5000
  • आणि त्याच बरोबर सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक,ज्याला मार्केटमध्ये कूक म्हणतात.पगार ₹10000
  • घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार ज्याला मार्केटमध्ये पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारा होस्ट म्हणतात. पगार ₹5000 अशा प्रकारे तिने नवऱ्याकडे महिन्याच्या ₹55000 पगाराची मागणी केलेली होती.

मग त्याच्या डोळ्यातून हळू हळू अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या व्यक्तीने स्वतःचा  कणभरही विचार न करता  माझ्या घराला वेळ दिला, तिची  किंमत मार्केटमध्ये शोधूनही न मिळणारी होती.

तात्पर्य एवढेच की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खूप विचार करुन सगळं काही करत असते. एक आईच मुलांवर चांगले संस्कार करू शकते. त्यांच्याकडे चांगले लक्ष देऊ शकते.

गृहीत धरलेली प्रत्येक बायको ही एक जबाबदार सून, आई आणि बायको ह्यांचं कर्तव्य निस्वार्थपणे निभावत असते. त्यांना कमी लेखू नका.

लेखिका: सुमन नासागवकर, अमळनेर.

संग्राहिका :मंजुषा सुनीत मुळे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘गोष्ट खूप छोटी असते….’ – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘गोष्ट खूप छोटी असते….’ – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

* तुम्ही गाडीतून जाताना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला, तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, “दादा, पत्ता सांगता का?” असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे. कधी स्किनचं मलम देऊन टाकायचं…

गोष्ट खूप छोटी असते हो,पण करायची.

 

*कमी जागेत बाईक पार्क करताना तिरक्या स्टॅंडवर न लावता, सरळ स्टॅंडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं “थँक यू” ऐकायला मस्त वाटतं….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणाऱ्याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली, तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.

माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

– अज्ञात 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महाश्वेता… सुश्री सुधा मुर्ती ☆ प्रस्तुती – सुश्री भावना राजेंद्र मेथा ☆

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ महाश्वेता… सुश्री सुधा मुर्ती ☆ प्रस्तुती – सुश्री भावना राजेंद्र मेथा ☆

इन्फोसिस फौंडेशनची विश्वस्त या नात्याने मला रोज ढिगाने पत्रे येतात. येथे आम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी लोकांना आर्थिक मदत देत असतो. स्वाभाविकच गरजू आणि मदतीची फारशी गरज नसलेले, असे दोन्ही प्रकारचे लोक आम्हांला पत्रे लिहितात. या दोन्ही प्रकारच्या लोकांमधून नेमके खरे गरजवंत ओळखून काढणं, हे खरं तर फार कठीण काम आहे.

अशीच एक सोमवारची सकाळ. त्या दिवशी पत्रांचा नुसता पाऊस पडला होता. मी एकेक पत्र वाचत होते. माझ्या सेक्रेटरीने मला सांगितलं, “मॅडम एक लग्नपत्रिका आली आहे व त्यासोबत एक हस्तलिखित खाजगी चिठ्ठी पण जोडली आहे. तुम्ही त्या लग्नाला जाणार आहात ?”

मी कॉलेजात अध्यापनाचं काम करत असल्याने मला माझ्या विद्यार्थ्यांकडून नेहमीच लग्नाची बोलावणी येत असतात. त्यामुळे ही पत्रिका माझ्या एखाद्या विद्यार्थ्यांचीच असेल असं मला वाटलं. पण पत्रिका उघडून वाचल्यावर मात्र वधू-वरांच्या नावांवरूनही काहीच बोध होईना.

सोबतच्या चिठ्ठीत हस्ताक्षरात लिहिलं होतं, “मॅडम, तुम्ही जर लग्नाला आला नाहीत, तर ते आम्ही आमचं दुर्भाग्य समजू.”

मुलाचं वा मुलीचं नाव काही केल्या मला आठवत नव्हतं. पण उत्सुकतेपोटी मी त्या लग्नाला जायचं ठरवलं.

पावसाळ्याचे दिवस होते. लग्नस्थळ शहराच्या पार दुसऱ्या टोकाला होतं. एकदा क्षणभर तर असंही वाटलं, “कुठल्यातरी अनोळखी व्यक्तीच्या लग्नाला इतक्या दूर जाण्यात काही अर्थ आहे का ?”

लग्नसमारंभाच्या जागी पोचले, तर ते अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील लग्न दिसत होतं. स्टेजवर फुलांची भरगच्च आरास केली होती. सिनेसंगीत मोठ्यांदा वाजत होतं. त्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. पावसामुळे मुलांना बाहेर अंगणात खेळता येत नव्हतं. त्यामुळे बरीच मुलं हॉलच्या आतच लपंडाव खेळून धुमाकूळ घालत होती. स्त्रियांच्या अंगावर बंगलोर सिल्क, म्हैसूर क्रेप सिल्क अशा साड्या होत्या.

व्यासपीठावर उभ्या असलेल्या वधू-वरांकडे मी निरखून पाहिलं. कदाचित त्यांच्यातील कोणी माझा विद्यार्थी असेल, नाही तर एखादे वेळी दोघेसुद्धा असतील. तिथे त्या गर्दीत मी उभी होते. कुणाची ओळख नाही, पाळख नाही. काय करावं ते मला समजेना.

इतक्यात एक वयोवृद्ध गृहस्थ माझ्यापाशी आले आणि म्हणाले, “तुम्हाला वधू-वरांना भेटायचंय का ?”

मग मी त्यांच्यापाठोपाठ स्टेजवर गेले, स्वत:ची ओळख करून दिली आणि त्यांना ‘वैवाहिक जीवन सुखाचे जावो’, अशा शुभेच्छा दिल्या. ते दोघे खूप आनंदात होते. ‘यांची नीट विचारपूस करा’, असं नवऱ्यामुलाने त्या वृद्ध गृहस्थांना सांगितलं. तरीही माझ्या मनात तो प्रश्न वारंवार डोके काढतच होता. ‘हे लोक कोण आहेत ? त्यांनी ही अशी चिठ्ठी मला का पाठवली असेल ?’

ते गृहस्थ मला जेवणाच्या हॉलमधे घेऊन गेले व त्यांनी मला खाण्यासाठी फराळाचे आणले. आता मात्र फार झालं. हे लोक नक्की कोण, हे जाणून घेतल्याशिवाय मी काहीही खाणार नाही, असं मी ठरवलं.

माझ्या मनाची चलबिचल पाहून ते गृहस्थ हसले आणि म्हणाले, “मॅडम,मी नवऱ्यामुलाचा पिता. ही जी मुलगी आहे ना मालती, हिच्या प्रेमात माझा मुलगा पडला. आम्ही दोघांचं लग्न ठरवलं. साखरपुडा झाल्यानंतर मालतीच्या अंगावर कोड उठलं. माझ्या मुलानं लग्न करण्यास नकार दिला. आम्हांला सर्वांनाच खूप वाईट वाटलं. तिच्या घरच्या लोकांना तिच्या भविष्याची चिंता वाटू लागली. कुटुंबातील वातावरणच सगळं बिघडून गेलं. घरातील ताणतणाव सहन होईना, म्हणून माझा मुलगा वारंवार लायब्ररीत जाऊन बसे. एक महिन्याने तो माझ्यापाशी आला, आणि म्हणाला, मी मालतीशी लग्न करण्यास तयार आहे. आम्हांला सर्वांनाच आश्चर्य वाटलं व आनंदही झाला. आज आता लग्न आहे.”

पण तरीही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच नव्हतं. या सगळ्यात माझा संबंध कुठे आला ? पण त्या प्रश्नाचं उत्तर वरपित्याने लगेच दिलं.

“मॅडम, या काळात त्यानं तुमची ‘महाश्वेता’ ही कादंबरी वाचली होती, असं आम्हांला मागाहून समजलं.” ते म्हणाले,  “माझ्या मुलाची परिस्थिती पण अगदी त्या पुस्तकातल्या गोष्टीसारखीच होती. त्याने ती कादंबरी किमान दहा वेळा वाचली व त्यातील मुलीचं दुःख त्याला जाणवलं. त्याने एक महिनाभर विचार केला आणि ठरवलं- आपण त्या कादंबरीतल्या माणसाप्रमाणे आता आपली जबाबदारी झटकून टाकून नंतर त्याबद्दल पश्चात्ताप करत बसायचं नाही. तुमच्या कादंबरीनं त्याच्या विचारांमधे परिवर्तन घडवून आणलं. “

आता काय घडलं ते माझ्या लक्षात आलं.

त्यानंतर मुलाच्या वडिलांनी एक पार्सल आणलं व अत्यंत आग्रहाने मला या भेटीचा स्वीकार करायला लावला. मी जरा घुटमळले. पण त्यांनी ते जबरदस्तीने माझ्या हातात ठेवलं आणि म्हणाले, “ही साडी मालतीने खास तुमच्यासाठी आणली आहे. ती तुमच्याशी नंतर बोलणार आहे.”

पाऊस जोराने कोसळू लागला. हॉलमधे पाणीच पाणी झालं. माझी सिल्कची साडी भिजत होती. पण मला त्याचं काही वाटलं नाही. मला खूप खूप आनंद झाला होता. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यक्तीच्या योगाने कोणाचं आयुष्यच बदलून जाईल, असं मला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं.

मी जेव्हा कधी ती साडी नेसते, तेव्हा मला मालतीचा आनंदाने उत्फुल्लित झालेला चेहरा आणि महाश्वेता पुस्तकाचं मुखपृष्ठ डोळ्यासमोर तरळतं. माझ्याकडे असलेली ती सर्वात मौल्यवान साडी आहे.

लेखिका :सुधा मूर्ती.

अनुवाद :लीना सोहनी

संग्राहिका :भावना राजेंद्र मेथा, महाड, रायगड.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘बसणे’ शब्दाचे विविध अर्थ ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ बसणे’ शब्दाचे विविध अर्थ ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

वसंत सबनीस मुलाखत घेत होते.

त्यांनी पु लं ना विचारले –

“तुम्ही प्रत्यक्षात लिहिलेले नाटक रंगभूमीवर उभं करता – असं असताना आम्ही ते ‘बसवले’ असे का म्हणता?”

पु ल :- “त्याचं असं आहे, लिहिलेले नाटक नीट ‘बसवलं’ नाही, तर प्रेक्षक उभे राहून चालायला लागतात आणि नीट ‘बसवलं’ तर नाटक उभं राहून चालतं आणि प्रेक्षक शेवटपर्यंत ‘बसून’ राहतात.

त्यातून मला प्रेक्षकांसाठी नाटक लिहायची खोड आहे. त्यामुळे चालणारे नाटक आणि ‘बसणारे’ प्रेक्षक असे गणित जमवायचे असेल, तर त्या नाटकाला आधी नीट ‘बसवावं’ लागतं.

बाकी मराठीतील, ‘बसणे’ हे क्रियापद जरा अवखळच आहे. धंदा चालेनासा झाला, तरी धंदा ‘बसला,’ असं आपण म्हणतो आणि चालला तर जमदेखील ‘बसतोच’.

धंदा जमला तर धंदा ‘बसला’ असं म्हणत नाही. पण प्रेम जमलं तर प्रेम ‘बसलं’ असं म्हणतो, आणि नाटक चाललं की चांगलं ‘बसलं’ आहे म्हणतो आणि नाही चाललं तरी नाटक ‘बसलं’ म्हणतो.

मला वाटतं ‘बसण्या’ विषयी इतकं ‘बस’ झालं!”

— ह्याला म्हणतात भाषेवरील प्रभुत्व.

लेखक :अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 32 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 32 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

४९.

तुझ्या सिंहासनावरून उतरून

तू माझ्या झोपडीच्या दाराशी येऊन उभा राहिलास

 

एका कोपऱ्यात मी गात होतो

ती धून तुझ्या कानी पडली

तू खाली आलास आणि

माझ्या झोपडीच्या दाराशी उभा राहिलास

 

अनेक महान गायक

तुझ्या महालात सतत गात असतात

पण या नवख्या गायकाचं

भक्तिगीत तुझ्या कानी पडलं

 

हा साधा छोटा स्वर

विश्वाच्या अफाट संगीतात मिसळला

आणि फुलाची भेट घेऊन

तू खाली माझ्या झोपडीच्या दाराशी आलास.

 

५०.

गावाच्या गल्लीतून दारोदारी

मी भीक मागत जात होतो

दूरवरून भव्य स्वप्नासारखा

सोनेरी रथ माझ्या दृष्टीस पडला

तो तुझा रथ होता. वाटलं. . . .

कोण हा राजाधिराज येतो आहे!

 

माझ्या आशा उंचावल्या.

वाटलं. . . आपले दरिद्री दिवस आता संपले.

न मागता,न विनविता सर्व बाजूंनी

विखुरलेली धुळीतली संपत्ती

माझ्या पदरी भिक्षा म्हणून पडेल

असं मनात धरून मी थांबलो होतो.

 

तुझा रथ माझ्याजवळ येऊन थांबला

आणि तुझी नजर माझ्यावर पडली.

हसतमुखाने तू माझ्याकडं आलास.

शेवटी आयुष्यातलं नशीब उजाडलं

असं मला वाटलं.

 

तू आपला उजवा हात माझ्यापुढं पसरलास

म्हणालास. . . काय देणार मला?

 

एका भिकाऱ्याकडं भिक्षा मागायची

ही कसली राजयोगी चेष्टा?

काय करावं हे न समजून, गोंधळून

मी स्तब्ध राहिलो.

नंतर माझ्या पिशवीतून

अगदी बारीक कण काढून तुझ्या हातावर ठेवला

काय आश्चर्य!

सायंकाळी मी माझी पिशवी

जमिनीवर रिकामी केली

तेव्हा माझ्या दरिद्री ढिगात सोन्याचा

एक बारीक कण मला आढळला.

मी रडलो. वाटलं. . . माझ्याकडं असलेलं सारं

द्यायची इच्छा मला का नाही झाली?

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कलियुगातील राम सीता… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ कलियुगातील राम सीता… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

आज करंजाड येथून जात असताना रस्त्याच्या  कडेनं एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं. माझी नेहमीची सवय असल्यामुळं, मी त्या भिकार्‍यासारख्या दिसणाऱ्या जोडप्याला, दुपार असल्यामुळं सहजच जेवणाचं विचारलं, तर ते ‘नको’ म्हणाले. मग मी त्यांना 100 रुपये देऊ केले, तर ते सुद्धा ‘नको’ म्हणाले. मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय ? मग उलगडत गेला  त्यांचा जीवनपट  : 

ते 6000 कि.मी.चा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी चालले होते. त्यांनी सांगितले, ” माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही ; मग माझ्या आईने डॉक्टरला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडलं व तिने द्वारकेच्या श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की, डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूरला जाऊन परत द्वारकेला पायी येईल. म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय.” मग  मी त्यांच्या बायको विषयी विचारलं तर ” ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती ;  रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करुन द्यायला येते   म्हणून निघाली “.  

मग मी ते 25%हिन्दी, 75%इंग्रजी बोलत असल्यामुळे शिक्षणाबद्दल विचारलं तर ऐकून माझी बुद्धी सुन्न झाली. त्यांनी लंडन येथे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 7 वर्षे खगोलशास्त्र यावर पी एच डी केलीय, तर त्यांच्या बायकोने मनोविकार  शास्त्र या विषयावर लंडन येथेच पी एच डी केलीय. एवढं शिकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता.   नाहीतर आपल्याकडे 10वी नापासवाला छाती ताणून   हिंडतो. एवढंच नाहीतर  सी. रंगराजन (रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर) यांच्याबरोबर ,तसेच अंतराळवीर कल्पना चावला  ह्यांच्याबरोबर काम  व मैत्रीचे संबंध होते.   तसेच त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एका अंधांच्या ट्रस्टला  देऊन टाकतात.त्यांना दोन मुलगे व एक मुलगी असून ते लंडन येथे उच्च पदावर कार्यरत आहेत.

दोघे पती पत्नी आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटी व डाॅनबाॅस्कोचे गोल्ड मेडॅलिस्ट आहेत.असे असूनही ते गुजरात येथील द्वारका येथे कुठलीही फी न घेता गरजू विद्यार्थ्यांसाठी केमिस्टी आणि मॅथेमॅटीक्सचे क्लास घेतात.. सध्या ते सोशल मिडियापासून लांब राहतात.  रोडच्या कडेनं जाणारं प्रत्येक  जोडपं भिकारी असतंच असं काही नाही. एखादी व्यक्ती आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होते आणि आपल्या पतीसोबत कोणी पत्नी सीता सुद्धा होते; म्हणूनच  भेटलेली अशी माणसे आपण कलीयुगातील राम-सीताच समजायला पाहिजेत.

आम्ही जवळ जवळ 1 तास त्यांच्याशी गप्पा मारल्या. रस्त्यावर उभे राहूनच. त्यांचे प्रगल्भ विचार ऐकून मन सुन्न झाले. अहंकार गळून गेला आणि वाटलं, की आपण  उगाचच खोट्या फुशारकीवर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत. हा  पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून तीन महिने झाले आणि अजून घरी पोचायला एक महिना लागेल.

त्यांचं नांव : डाॅ. देव उपाध्याय व डाॅ.सरोज उपाध्याय.

लेखका : अज्ञात

संग्राहिका : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कवी मंगेश पाडगावकरांच्या घरात चोरी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कवी मंगेश पाडगावकरांच्या घरात चोरी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

कवी मंगेश पाडगावकरांच्या घरात चोरी

पाडगावकर त्या चोराचेच कौतुक करत होते ही हकीगत सांगताना.

इतक्या भर पावसात तो पाईपवरून चढला कसा असेल? दुसऱ्या मजल्यावरच्या आमच्या खोलीत शिरला कसा असेल? खरंच काही कल्पना करवत नाही !

तरी एकाने थट्टेने विचारले ,”कवितांचे हस्तलिखित त्याने नेले नाही ना?”

तेव्हा पाडगावकर म्हणाले, ” माझे दुःख त्यापेक्षा जास्त आहे. मी पोलिस स्टेशनवर गेलो .तक्रार केली. काही दागिने, वस्तू गेल्या होत्या, त्याची माहिती दिली व नंतर उत्सुकतेने त्या पोलिस अधिकाऱ्यास म्हटले,’मला साहित्य अकादमीने दिलेले एक मेडल त्यात होते, तेही चोराने नेले आहे’.

पोलिस अधिकाऱ्याने मान वर करून विचारले ,’ते कशाचे होते?’ ”

पाडगावकर म्हणाले ,”साधेच असते.काही खास मेटल त्यासाठी वापरले जाते असे नाही .”

“मग चिंता कशाला करता? घराजवळच शोधा.चोराने ते निश्चितच रस्त्यावर टाकले असेल”.

पाडगावकर घरी आले.आपल्या घराच्या जवळच्या रस्त्यावर पाहिलं मग गटारात पाहिलं .

साहित्य अकादमीने ‘सलाम’ कवितासंग्रहाला दिलेले ते पदक चोराने खरोखरच गटारात टाकले होते.त्याच्या लेखी त्या पदकाची किंमत शून्य होती.पाडगावकरांनी ते आनंदाने उचलले.

साहित्य अकादमीचे पदक फक्त मिळाले, बाकीचे सर्व गेले, कारण ते मौल्यवान होते!!!!

पाडगावकर म्हणाले, माझा चोराला सलाम

—तेच ते.

लेखक : अज्ञात.

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर.

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print