? वाचताना वेचलेले ?

☆ पालक स्वतःचीच… लेखिका :उषा फाटक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

मी. वय ७४ ….पालक स्वतःचीच !!

पंचवीस वर्षापूर्वी माझी दोन्ही मुलं घर सोडून बाहेर गेली.

प्रथम शिक्षणासाठी, मग नोकरी साठी.

आधी देशात, नंतर परदेशात.

त्याच वेळी मनाशी खूणगाठ बांधली की आता यापुढे आपणच आपल्या साठी. (खरंतर ही खूणगाठ मुलं जन्माला आली तेव्हाच बांधली होती, की वीस पंचवीस वर्षांनी पाखरं घरटं सोडून उडून जाणार).

एकदा मनाची तशी धारणा झाल्यावर पुढचं फार सोपं होतं. आपली सर्व कामे आपणच करायची.

शक्यतो कुणावर अवलंबून रहायचं नाही. एकदा करायला लागलं की सगळं जमतंच !!

त्या काळात हा शब्द नव्हता पण ‘आत्मनिर्भर’ झाले.

घरात कंप्यूटर असून कधी हात न लावणारी मी, पन्नासाव्या वर्षी क्लासला जाऊन कंप्यूटर शिकले. मुलांना मेल करु लागले. पुढे फेसबुक, व्हाट्सअँप, स्काईप, व्हिडिओ कॉल …टेक्नॉलॉजी बदलत गेली तसं मीही सगळं वापरायला शिकले. मुलं पुढे पुढे धावताहेत… आपण थोडं चालायला तरी हवं. नाहीतर आपल्यातलं अंतर वाढतच जाईल.

केल्याने होत आहे रे….. आधी केलेची पाहिजे !!

आत्मविश्वास वाढत गेला. आता कोविडच्या काळात ऑनलाईन व्यवहार सोपे झाले. खरेदी, बँकेचे व्यवहार ऑनलाईन करायला शिकले. काही अडले, तर विनासंकोच कुणाला विचारते.

आता मी एकटी रहाते. मुलांशी संपर्क असतोच. आपली आई चांगली खंबीर आहे, हा विश्वास मुलांनाही आहे.

सुदैवाने प्रकृती चांगली आहे. लहानपणापासून केलेला व्यायाम आणि संतुलित आहार-विहार यामुळे हे साध्य झाले आहे.

नातेवाईक, शेजारी यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. मित्रमंडळी आहेत, स्वतःचे छंद आहेत. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच कधी पडत नाही.

एक गोष्ट नक्की…. आपण दुसऱ्यासाठी होईल तेव्हढे करत रहावे… आपल्यावर वेळ आली तर कोणीतरी नक्की धावून येतील. आधी प्रेम द्यावे आणि मग प्रेम घ्यावे…

“एकमेका करू सहाय्य” हा आजच्या जगण्याचा मूलमंत्र आहे.

आज तरुण असलेल्या पिढीलाही मी हेच सांगेन…  म्हातारपणासाठी जशी आर्थिक तरतूद करता, तशी शारीरिक आणि मानसिक तरतूदही करा. शारीरिक फिटनेससाठी व्यायाम  आणि मानसिक फिटनेससाठी आवडीचा छंद जोपासा… स्वतःचे विश्व निर्माण करा….आणि मुख्य म्हणजे झाल्यागेल्याची खंत करणे सोडून द्या. वृत्ती समाधानी ठेवा.

आणि हो, हे सर्व एका दिवसात निर्माण होत नाही. तरुण वयातच याची सुरुवात करावी लागते. तरच म्हातारपण सुखाचे होईल !

लेखिका :उषा फाटक

संग्राहिका: मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments