मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सापेक्ष दृष्टीकोन… ☆ डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

अल्प परिचय 

शालेय शिक्षण: मराठी माध्यमातून हुजूरपागा, पुणे

M.Sc. आणि  Ph.D. (Physics), पुणे विद्यापीठ

LLM (Intellectual Property Rights -IPR), Turin University, Italy

इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालयात भौतिकशास्त्र प्राध्यापिका

छंद: निसर्ग निरीक्षण, शास्त्रीय संगीत श्रवण, मराठी-इंग्रजी ललित वाचन, फोटोग्राफी, Facebook blogger

? मनमंजुषेतून ?

☆ सापेक्ष दृष्टीकोन… ☆ डाॅ. शुभा गोखले ☆ 

एखादी मुलगी आणि मुलगा यांना टाळ्या देत हसतखेळत भेळ खाताना पाहून बहुतेक कपाळांवर ‘ काय हा थिल्लरपणा ‘ – असं म्हणणाऱ्या आठ्या उमटतात. पण त्याचवेळेला एका कोपऱ्यात उभे असलेले त्यांचे आई-बाबा, नुकतीच दृष्टी मिळालेल्या आपल्या धाकट्या बहिणीला भेळ खायला घालत, समोरच्या समुद्रात वेगाने जाणाऱ्या मोटर-बोटी दाखवणाऱ्या आणि एकमेकांना टाळ्या देऊन एन्जॉय करणाऱ्या दादाचं कौतुकच करत असतात….  म्हणजेच पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर सगळं अवलंबून असतं!

तसंच काहीसं  गेले काही आठवडे WA/FB व इतर माध्यमांतून आपल्यावर भडिमार होणाऱ्या गुरू-शुक्र युतीचं ! ……. सूर्यापासून ७८ कोटी किलोमीटर वरचा गुरू हा आकारानी सगळ्यात मोठा असलेला भाऊ, तर ११ कोटी किलोमीटर वर असणारा शुक्र …  हे दोघेही आपापल्या कक्षांमधून आपापल्या वेगाने सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतात ! गुरूला एका परिक्रमेला साधारण ११. ८ वर्षं,  तर शुक्राला केवळ २२५ दिवस लागतात…. असे परस्परांशी फारसा संबंध नसलेले ग्रह आपला क्रम आक्रमित असताना, त्या  दोघांनाही कल्पनाही नाहीये, की सूर्यापासून १५ कोटी किलोमीटर वर असलेल्या आपल्या पृथ्वी नावाच्या बहिणीवर वास्तव्य करणारे माणूस नावाचे प्राणीमात्र त्यांच्याकडे दुर्बिणी रोखून बसले आहेत ! 

कारण काय …  

… तर पृथ्वीवरून या दोघांच्या आपापल्या कक्षांमधल्या  आजच्या स्थिती अशा रीतीने एका सरळ रेषेत आल्यात की वाटतंय, ते एकमेकांच्या खूप जवळ आलेत. यालाच विज्ञानात ‘ युती  असे म्हणतात. ही स्थिती फक्त पृथ्वीच्या आजच्या सापेक्ष स्थानामुळे दिसतेय. अवकाशातल्या इतर कुठल्याही बिंदूवरून ते दोघे अगदी सुट्टे-सुट्टे दिसतील.

म्हणूनच म्हटलं दृष्टीचा-कोन महत्वाचा ! …. पटतंय का?

(फोटो सौजन्य : डॉ. गौरी दळवी, फ्लोरिडा. )  

© डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिवरात्र आणि ऊसाचा रस – सुश्री विनीता क्षीरसागर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ शिवरात्र आणि ऊसाचा रस – सुश्री विनीता क्षीरसागर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

पूर्वी शिवरात्र आणि उसाचा रस हे जणू समीकरणच ठरलेले होते. म्हणून लहानपणी आम्ही अगदी वाट बघत बसायचो, शिवरात्रीची….!                     

पूर्वी उपवासाचे पदार्थ अगदी पोटभर असे मोठी एकादशी, शिवरात्र, अशा मोठ्या उपवासालाच मिळायचे………….! नाहीतर एरवी मोठ्या माणसांना फराळासाठी केले की एकेक घास हातावर मिळायचा…….! आता कसे आपण एरवी सुध्दा साबुदाणा खिचडी करतो..! किंवा बाहेर हॉटेलमध्येसुध्दा खिचडी, साबुदाणा वडे इ… सगळे काही मिळते……! पूर्वी अगदी आई, आजी राजगिऱ्याच्या लाह्या सुध्दा घरी फोडायच्या……!                                                                        

शिवरात्रीला आजीबरोबर  सगळ्यांनी रामेश्वर मंदिरात जायचे….. आल्यावर साबुदाण्याची खिचडी, बटाटा भाजी, कवठाची पाट्यावर वाटलेली चटणी, घरी केलेल्या तळलेल्या पापड्या, खाडिलकरांकडून विकत आणलेले ताक, रताळयाचे गुळाच्या पाकातले काप ह्यावर अगदी पंगत मांडून यथेच्छ ताव मारायचा एवढेच होते…!

नंतर दुपारी सगळी मोठी मंडळी डाराडूर पंढरपूर म्हणून झोपून जायची………..! घरातली लहान मुले मात्र केव्हांच एकदाचे साडे चार  वाजून जातायत  ह्याची वाट बघत घड्याळ बघत बसायची……! कारण  दुपारी पाच वाजून गेले की घरी उसाचा रस आणायचाच हे शिवरात्रीला ठरले असायचे…..! तोही एक कार्यक्रम च असायचा….! स्टीलची एखादी मोठी लोटी घेऊन गुऱ्हाळात जायचे, जाताना बर्फासाठी एखादा मोठा कापडी रूमाल किंवा पिशवी घेऊन जायची……!  त्या वेळी आमच्या घराच्या जवळ म्हणजे धर्म चैतन्याच्या कोपर्‍यावर एक गुऱ्हाळ सुरू झालेले असायचे. तट्टे ठोकून केलेल्या भिंतभर रंगीबेरंगी कॅलेंडर्स, देवांची चित्रे लावलेल्या त्या गुऱ्हाळात जायला खूप छान वाटायचे……..! आई त्याला गेल्या बरोबर “ताजा काढून देरे बाबा रस” म्हणून बजावायची….. तसेच न विसरता त्यात आले लिंबू टाकायला सांगायची……….! त्याचा रस चक्रातून काढणे……., भुश्श्यातला तरटात गुंडाळलेला बर्फ फोडणे हे जवळून बघायला खूप मजा वाटायची…..!  त्या वेळी फ्रीज नव्हते म्हणून बर्फ बाहेरून च विकत घ्यावा लागे……………! गुऱ्हाळात सुध्दा बर्फाचे वेगळे पैसे द्यावे लागत……! … असे सगळे करून एकदाचा रस घरी यायचा……….!                                 घरातले चहाचे कप रसासाठी सज्ज असायचे….! बर्फ पाण्याने स्वच्छ धुवून फोडून झाला की रसाचे कप भरून सगळयांना रसाचा वाटप व्हायचा……!..

….. रस पिऊन मन तृप्त व्हायचे व आता खरी शिवरात्र साजरी झाली असे वाटायचे………! दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर “काल आमच्या कडे उसाचा रस आणला होता.” हे न चुकता सांगण्यात एक धन्यता वाटायची…………! कारण पूर्वी उसाचा रस पिणे ही सुध्दा एक चैनच वाटायची……..! बैलाच्या चरकावरचा रस पिण्यासाठी आम्ही सगळे… घरातले लोक  लक्ष्मी रोड जवळच्या इलेक्ट्रिक आॉफीसजवळच्या गुऱ्हाळात जायचो…….! ते सुध्दा सगळ्यांच्या वार्षिक परीक्षा झाल्यावर बरं का………!

लेखिका : सुश्री विनीता क्षीरसागर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मला भावलेलं इंग्लंड” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “मला भावलेलं इंग्लंड” ☆ श्री मोहन निमोणकर ☆

मागच्या वर्षी मी आणि बायको संजीवनीची इंग्लंडला जायची तिसरी वेळ होती. मुलगा आशिष फिजिओथेरपीमध्ये एम.एस. करून तिथं नोकरी करतोय, तर सून निवेदिताही तिथंच वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करते. दोघांनी तिथं नवीन संसार सुरु केल्यानं त्यांचं कौतुक करायला आणि चिरंजीव अभिनवला भेटायला आम्ही इंग्लंड गाठलं.

इंग्लंडमध्ये भौगोलिकदृष्ट्या पाहण्यासाठी ब-याच गोष्टी आहेत. पण यंदा आम्हाला तिथल्या सामाजिक आणि सार्वजनिक गोष्टी खूपच भावल्या. किंबहुना याच तिथलं वेगळेपण सिध्द करायला पुरेशा ठरल्या. एखाद्या देशाची ठरलेली जीवनशैली आणि स्वभाव असतो, यामध्ये इंग्लंड खरंच चारचौघांपेक्षा भिन्न ठरतो.

इंग्लंडमध्ये ढोबळमानानं चार ऋतू आहेत. समर, ऑटम, विंटर आणि स्प्रिंग. समरमध्ये पहाटे पाच वाजताच उजाडतं आणि रात्री १० वाजता अंधार पडतो. ऑटम, विंटर आणि स्प्रिंगमध्ये उशीरा उजाडतं आणि अंधारही लवकर म्हणजे दुपारी चार वाजताच पडतो. विंटरमध्ये तापमान सर्वात जास्त म्हणजे पाच ते सहा अंश तसंच कमी म्हणजे उणे असतं. इंग्लंड उत्तरध्रुवाजवळ असल्यानं तिथं खूप थंडी असते. समरमध्ये मात्र तापमान १८ अंश झालं, तरी लोकांना उष्णतेची लाट आल्यासारखं वाटतं. आम्हाला इथं एक गोष्ट नवीन वाटली. ती म्हणजे, दिवस लवकर वा उशीरा उजाडण्याचा, मावळण्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून वर्षातून दोनदा घड्याळ ऍडजस्ट केलं जातं. मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारी घड्याळ एक तास मागं करतात. सार्वजनिक बागांमध्येही बागा उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा उजेडानुसार बदलतात. तशा प्रत्येक महिन्याच्या वेळांचा बोर्ड आगाऊच लावलेला असतो. वर्षभरात पाऊस कधीही येतो; परंतु वेगळा असा पावसाळा हा ऋतू इथं नाही.

इंग्लंडची वाहतूक व्यवस्था जगातील उत्तम व्यवस्था म्हणावी लागेल. महाग आहे; पण अतिशय उत्तम. रेल्वेचं नेटवर्क हे खाजगी कंपन्यांकडे सोपवलंय. त्या कंपन्या म्हणजे सदर्न रेल, साउथ इस्टर्न रेल्वे, नॉर्दन रेल, ग्रेट वेस्टर्न रेल्वे आणि व्हर्जिन रेल्वे. या पाच खाजगी कंपन्या सर्व युकेचा रेल्वेचा प्रवास सांभाळतात. रेल्वे डब्यांची स्थिती अतिशय उत्तम. दारं आपोआप उघड-बंद होतात. त्यामुळे पळत येऊन गाडीला लटकत गाडी पकडणं हा प्रकार नवीन नाही. याव्यतिरिक्त लंडन ट्यूब रेल्वेही म्हणजे ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ इतर कंपन्यांचा भार हलका करते. ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ ही खाजगी कंपनी इंग्लंडमधील बसवाहतूक सांभाळते. बसमध्ये लहान मुलांच्या बाबा गाड्यांनाही प्रवेश प्राधान्यानं असतो. चढण्या-उतरण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, शिवाय उतरण्याचा आपला स्टॉप येण्यापूर्वी आपल्या सीटजवळील बटण दाबलं, की ड्रायव्हरला मेसेज जातो आणि तो बस स्टॉपवर थांबवतो. ड्रायव्हरच तिकिटं पाहतो आणि काढतोही.

रेल्वे आणि बसच्या तिकिटांचे दर हे वेळेनुसार (गर्दीच्या) कमी-जास्त असतात. तसंच, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी कमी असतात. एखादी ट्रेन रद्द झाली आणि रात्रीनंतर ट्रेन नसेल, तर पर्यायी व्यवस्था स्टेशनबाहेर केलेली असते. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत वा-यावर सोडलं जात नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये पादचा-यांना फार महत्त्व दिलं आहे. रस्ता क्रॉस करण्यासाठी ‘सेल्फ ऑपरेटेड सिग्नल्स’ आहेत. या गोष्टी आम्हाला खूपच भावल्या. एखाद्याला कार रिव्हर्स घ्यायची असेल आणि तो रस्ता कितीही वाहता असेल, तरी त्याचं रिव्हर्स घेणं पूर्ण होईपर्यंत सर्व गाड्या थांबतात आणि कुणीही हॉर्न वाजवत नाहीत, हे विशेष. रस्ते आपल्याएवढेच, तरीही लहान-मोठी वाहनं बिनबोभाट जा-ये करत होती. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कठीण अशा परीक्षेला सामोरं जावं लागतं. पहिल्या फटक्यात लायसन्स मिळणारा अगदी विरळाच.

आपल्या घराबाहेर रस्त्यावर गाडी पार्क करायलाही वर्षाला ४० पौंड द्यावे लागतात. ठिकठिकाणी पार्किंगच्या सोयी केल्या आहेत. गर्दीच्या वेळी पैसे आणि एरवी फुकट! वीज आणि गॅस वापरण्यासाठी बिलिंगची पध्दत नाही, तर एक प्रीपेड कार्ड असतं आणि त्यात जेवढा टॉप अप तुम्ही केला असेल तेवढीच वीज आणि गॅस तुम्हाला वापरता येतो. केंटमधल्या ग्रेव्हज् एंड इथं आमचं वास्तव्य होतं. लंडनपासून रेल्वेनं एक ते दीड तासाच्या अंतरावर दक्षिणेला हे ठिकाण आहे. त्या शहरात कचरा संकलनाची अतिशय उत्तम सोय आहे. प्रत्येक भागासाठी आठवड्यातून एक ठराविक वार कचरा संकलनासाठी ठरवलेला असतो. दोन मोठ्या पेट्या त्यासाठी कौन्सिलतर्फे पुरवल्या जातात. एकात रिसायकल होणारा आणि दुस-यात रिसायकल न होणारा असं एकआड एक दर आठवड्यानं असं कचरा संकलन केलं जातं. रिसायकल होणा-या गोष्टींची आणि न होणा-या गोष्टींची यादी कौन्सिलतर्फे वेळोवेळी प्रसिध्द केली जाते.

इथं दैनंदिन जीवनातल्या ब-याच गोष्टी स्वत:च्या स्वत:ला कराव्या लागतात. नोकर-चाकर, मोलकरीण कुणी ठेवत नाहीत. कुणी ठेवलीच, तर त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्यामुळे भांडी घासणं, घराला रंग देणं, सायकलचं पंक्चर काढणं, सायकल आणि कारमध्ये हवा भरणं इत्यादी गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. एवढंच काय, तर पेट्रोल पंपावर पेट्रोलही आपल्यालाच भरायला लागतं. नंतर बिल दुकानात नेऊन द्यायचं. आशिषनं कार खरेदी केल्यावर दुस-याच दिवशी तो आणि निवेदिता पंपावर जाऊन पेट्रोल कसं भरायचं हे शिकून आले होते. घरात पाहुणे आल्यावर, आपल्याला जेवणानंतर भांडी घासताना पाहून तेही पहिल्या दिवसानंतर आपल्याला आपोआप मदत करू  लागतात.

इंग्लंडमधील अशा ब-याच गोष्टी आपल्याला भावतात. त्यांचं अप्रुप आपल्याला वाटतं. तरीही अखेर आपलं आपल्या मातीशी असलेलं घट्ट नातंच वरचढ ठरतं. तीन महिन्यातच आपल्याला मायदेशातील घराची आठवण येते आणि सहा महिने काढायचे असले, तरी काऊंटडाऊन तेव्हाच सुरु होतं, परतण्यासाठी ..…

         

 ©️ श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “केसरीया” ☆ प्रस्तुती – कौस्तुभ केळकर नगरवाला

? मनमंजुषेतून ?

☆ केसरीया☆ प्रस्तुती – कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

नेने आजी आणि नेने आजोबा… अख्खी गल्ली त्यांना याच नावाने ओळखते.

दोघंच दोघं. एक दुजे के लिये…

 

मी… मी कोण ? मी शामलाल मिठाईवाला. गेली चाळीस वर्ष मी या दोघांना ओळखतो..

बिल्डींगच्या खाली माझं दुकान. वरच्या मजल्यावर नेन्यांचा फ्लॅट. बिल्डींगच्या जन्मापासूनचे आम्ही सोबती.

कुणी विचारलं तर मी बिनदिक्कत सांगतो… नेने माझे नातेवाईक आहेत म्हणून. आमचं नातं अगदी जवळचंय.

 

काय सांगत होतो ?—- आमच्याकडची जिलेबी पुण्यात नं.1. चाखून बघाच एकदा.

नेन्यांकडचा प्रत्येक ‘आनंद’ आमच्याकडच्या जिलेबीच्या साथीनं सेलीब्रेट झालाय.

नेन्यांच्या शर्वरीचा जन्म… शर्वरीचा दहावीचा रिझल्ट… ती सी. ए. झाल्याचं सेलीब्रेशन… तिला लागलेली पहिली नोकरी… तिचं लग्न… नेने ‘आजोबा’ झाल्याची गोड बातमी.

आमच्याकडच्या जिलबीनंच गोड झालाय .. प्रत्येक आनंदसोहळा.

 

गंमत सांगू ?

मला मुलगा झाला तेव्हाची गोष्ट. माझ्याकडचीच जिलबी विकत घेऊन, नेन्यांनी माझंच तोंड गोड केलंय.

आता बोला ?—- शरूचं सासर तिकडे इंदूरला.. ती इथं आली की ती घरी जायच्या आधी इथली गरमागरम जिलेबी घरी पोचायची.

 

मागच्या वर्षीची गोष्ट. नेने घाईघाईने आले… ” शामलाल, सुटलास तू लेका. जिलेबीचे दोन घाणे कमी काढ उद्यापासून… हा काय ताजा ताजा रिपोर्ट घेऊन आलोय. तो डाॅक्टर गोडबोल्या बोंबलतोय. मधुमेह झालाय या नेन्याला….. पोरकी झाली रे जिलेबी तुझी…”

 

काय सांगू ? खरंच पोरकी झालीय जिलेबी आमच्याकडची. नेन्यांनी गोड बंद केलंय… बंद म्हणजे बंद…

एक कण सुद्धा नाही… नेन्या पक्का गोडखाशी. आमच्याकडची जिलेबी त्याचा जीव की प्राण.

खरं सांगू ? आमचा जीव नेन्यात अडकलेला. किलोकिलोने जिलेबी खपते रोज….. तरीही…गोड नाही लागत आम्हाला. नेन्यानं कसं काय कंट्रोल केलं कुणास ठाऊक ?

 

सांगतो…… 

सोप्पय एकदम. नेन्याला डायबेटिस निघाला आणि… त्या दिवसापासनं वहिनींनी गोड खाणं बंद केलं.

नेन्याचा जीव वहिनींमधे अडकलेला. आपोआप गोड बंद झाला. आता शरू आली तरी…इंदूरचा गजक आमच्याघरी पोचतो. आमच्याकडची जिलबी मात्र….खरंच आमच्याकडच्या जिलबीला वाली राहिला नाहीये…

 

मागच्या फेब्रुवारीतली गोष्ट… नेनेवहिनी कितीतरी दिवसांनी दुकानी आलेल्या. फरसाण, ढोकळा वगैरे ‘अगोड’ खरेदी… इतक्यात डाॅ. गोडबोले आले तिथं… डाॅ. गोडबोल्यांचं क्लिनिक पलिकडच्या गल्लीत.

तेही आमचं घरचं गिराईक.. .डाॅ.मोतीचूराचे लाडू घ्यायला आलेले….. 

“डाॅ., वर्ष झालंय. यांनी गोडाला हात नाही लावलाय. आज एखादी जिलबी खाल्ली तर चालेल काय ?

शरूचा वाढदिवस आहे हो आज”

“चालतंय की. फक्त एकच अलाऊडंय.” डाॅक्टर ऊवाच.

‘वहिनी, तुम्ही डाॅक्टरांना घेऊन वर जा. मी गरमागरम जिलबी घेऊन आलोच.’.. भारी मजा आली.

वहिनींनी नेन्यांना जिलबीचा घास भरवला. आणि नेन्यांनी वहिनींना… अगदी लग्नात भरवतात तसा.

डोळे भरून मी हा सोहळा बघितला. राम जाने कैसे…माझ्याच डोळ्यांचा नळ सुरू झाला.

शरू तिकडे इंदूरला…. .मी, डाॅक्टर, नेने आणि वहिनी. आम्ही तिचा वाढदिवस इथे सेलीब्रेटला.

सच्ची बात कहता हूँ.. आमच्याकडची जिलबी…. आजच्या इतकी गोड कधी लागलीच नव्हती.

तोच गोडवा जिभेवर घोळवत, मी आणि डाॅक्टर खाली आलो.

‘श्यामलाल तुझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे ?”

“हो.. आहे तर..”

‘मग सांग बरं , प्रेमाचा रंग कुठला असतो ?’

…. पागल झालाय हा डाॅक्टर साला. काहीही बोलतोय.

” प्रेमाचा खरा रंग केसरीया… तुझ्याकडच्या जिलेबीसारखा..’

.. मला काही कळेना.

“तुला या नेन्याचं सिक्रेट सांगतो. डायबेटीस नेन्याला नाही, वहिनींना झालाय. वहिनींना ठाऊक नाहीये हे.

दोघांनी गोड सोडलंय, तरीही संसार ‘गोडाचा’ झालाय…. “

डाॅक्टर ओल्या डोळ्यांनी हसत हसत निघून गेला.

 

पटलं….

प्यार का रंग कौनसा ?

केसरीया….

या व्हॅलेन्टाईनला याच तुम्ही….. वहिनींसाठी आमच्याकडची केसरीया जिलेबी न्यायला. वाट बघतोय…

 

प्रस्तुती –  कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सावरकरांची आठवण… — लेखक – श्री शरद पोंक्षे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ सावरकरांची आठवण… — लेखक – श्री शरद पोंक्षे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

बरोबर १९६६ च्या १ फेब्रूवारीला सावरकरांनी प्रायोपवेशन करायचे ठरवले. आपले ह्या जन्मीचे कार्य पूर्ण झाले आहे ही तात्यांची भावना होती. आपल्या दीर्घायुष्याचे महत्व काय,अशा प्रश्नावर ऊत्तर देताना ते एकदा म्हणाले होते की, ” जगण्याची चिंता मी कधीच केली नाही, म्हणूनच बहुधा इतका दीर्घकाळ जगलो 

असेन. “ तात्यांनी वांच्छिलेले स्वातंत्र्य, भाषाशुध्दी, सामाजिक सुधारणा, सैनिकीकरण, आदी विषयात पुष्कळ यश मिळाले होते.. म्हणून तात्या म्हणत की त्यांचे जीवन कृतार्थ झाले आहे. त्यांनी पूर्वी जेजे पेरलंय ते आता उगवत आहे. त्याला आता फळे येत आहेत. हा आपल्या आयुष्याचा फलऋतु आहे. यावर आपण त्यांना म्हटले की, “ हे ठीक आहे.. पण अद्याप पाकिस्तान नष्ट व्हायचे आहे, आपल्याला मानणारे असे राज्यकर्ते राज्यावर बसायचे आहेत, त्यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे.” त्यावर ते म्हणत ”अरे जगात कोणाचीही सर्व स्वप्ने कधीच साकार होत नाहीत. जे झाले हे अपेक्षेपेक्षा, कल्पनेपेक्षा पूर्ण झाले आहे. उरले ते काम पुढच्या पिढीचे आहे. तिला मार्गदर्शन हवे तर मी ते ग्रंथरूपाने लिहून ठेवले आहे. ते वाचणे आणि त्याला अनुसरून वागणे किंवा न वागणे हे त्यांचे काम आहे.” तेव्हा तात्यांचा जीवन संपवण्याचा विचार पक्का ठरला. ज्ञानेश्वरांप्रमाणे गुहाप्रवेश शक्य नव्हता.जलसमाधी घ्यावी असा विचार केला, पण तो सोडून दिला व शेवटी समर्थ रामदासस्वामींप्रमाणे प्रायोपवेशन करायचे ठरवले. आणि १ फेब्रू १९६६ ला अन्न पाणी त्याग केला. सर्वांच्या भेटीगाठी बंद केल्या. ५,६ दिवस गेले. तात्यांचा रक्तदाब खूप खाली गेला. डॉ.पुरंदरेना घाम फुटला. औषध दिले पण ते औषधही घेत नव्हते. पण दुसऱ्या दिवशी रक्तदाब स्थिरावला. डॉ. ना  आश्चर्य वाटले. हे कसे झाले? कारण तात्यांचा योगाभ्यास दांडगा होता. काही सिध्दी त्यांना प्राप्त होत्या. हिंदू धर्मातील न पटणाऱ्या आचार विचारांवर कडक टीका करणाऱ्या सावरकरांनी त्यांच्या ध्वजावर अभ्यूदयनिदर्शक कृपाणासमवेत निःश्रेयस निदर्शन कुंडलिनीही अंकित केली होती. शास्त्रीय दृष्टीचे सावरकर, त्यांना पटल्यावाचून, स्वतः अनुभवल्यावाचून ही गोष्ट मानणे शक्य नाही. त्यांना योगशास्त्र अवगत होते. म्हणूनच सर्व भयंकर हालअपेष्टा सोसूनही ते इतकी वर्ष जगले. त्यांच्या लिखाणात, भाषणात लोकांना मोहून टाकणारी शक्ती आली. त्यांचे नाक, कान, डोळे आदी ज्ञानेंद्रीये शेवटपर्यंत उत्तम कार्यक्षम राहिली.

८३ व्या वर्षीसुध्दा त्यांचे केस काळे होते. प्रायोपवेशन चालू होते.. दिवस चालले होते. आयुष्यभर ज्या मृत्यूला त्यांनी पळवून लावले त्याला आता निमंत्रण देऊनही तो जवळ यायला घाबरत होता .त्याही परिस्थितीत ते सहाय्यकाला बोलावून पत्रे वाचून घेत होते. उत्तरे देत होते. एका मोठ्या नेत्याची तार आली.  एकाने लिहीले होते, ” तात्यांची प्रकृती कशी आहे? कळवा “.तर दूसऱ्याची होती, ”तात्यांची प्रकृती सुधारो, अशी मी प्रार्थना करीत आहे ”.  हे वाचून तात्या म्हणाले, “ नीट वाच..अर्थ समजून घे.” सहाय्यक म्हणाले “भावना एकच आहेत तात्या.’ त्यावर ते म्हणाले,” नाही.. मनातल्या भावना तारेत उतरतात. पहिला मी जायची वाट बघतोय व दूसरा मी बरा व्हावा असे म्हणतोय.”  अनेक लोक भेटायला येत होते. आचार्य अत्रेही आले. ते कोणालाच भेटत नव्हते.  १७ व्या दिवशी सहाय्यकाचा हात हातात घेऊन म्हणाले,

”आम्ही जातो अमुच्या गावा।आमुचा राम राम घ्यावा।

आता कैचे देणे घेणे। आता संपले बोलणे।”

सहाय्यकाशी बोललेले हे ते शेवटचे शब्द. त्यानंतर तात्यांनी  हे जीर्ण शरीर टाकून त्यांचा आत्मा पुढच्या प्रवासावर निघाला. जन्माची सांगता त्यांनी पूर्ण केली .

लक्षावधी लोकांना स्फूर्ती देणारे वक्ते, ग्रंथकार, नाटककार, महाकवी, परकीय साम्राज्याला आव्हान देणारे स्वातंत्र्यवीर, विचारवंत, समाजसुधारक, स्वाभिमानी, हिंदूंचे  ‘हिंदूहृदयसम्राट‘ —  श्री विनायक दामोदर सावरकर— अखेर त्यांनी मृत्यूला २६ दिवसांनी कवटाळले व २६ फेब्रू १९६६ ला सकाळी ह्या जन्माची सांगता करून अनादी अनंत अवध्य आत्मा स्वर्गाकडे गेला.

त्यांचे महान स्फूर्ती कार्य, त्यांचे विचार, हिंदू युवक युवती कार्यप्रवण करून त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करतील हीच अपेक्षा. हा दृढ विश्वास.

लेखक : श्री शरद पोंक्षे

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रवास, माय-लेकीचा… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ प्रवास, माय-लेकीचा… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

हानपणी मराठी परिक्षेत नेहमी निबंध असे ‘माझी आई’. तेव्हा वाक्ये ठरलेली असत. “माझी आई खूप सुंदर आहे, माझी आई छान गाणं म्हणते, माझी आई स्वयंपाक खूप छान करते, माझी आई मला खूप आवडते”. झाला निबंध. भाषा बदलली तरी वाक्य तीच.. फक्त अनुवादित. ह्या पलिकडे लिहायचं तर आई समजलेलीच कुठे असते आपल्याला त्या वयात. बस आई आई असते. गरज असते (जी अनंत काळाची असते), श्वास असते म्हणा ना.

‘आई’ म्हणजे काय हे समजेपर्यंत निबंध लिहिण्याचं वय निघून गेलेलं असतं किंवा आई ह्या विषयावर निबंध लिहिणं बालिशपणाचं वाटतं. कारण तोपर्यंत आपल्यावर बाहेरच्या जगाचा प्रभाव असतो आणि आपले idols बदललेले असतात. अपरिपक्व विचारांमुळे हे idols पण बदलत असतात, प्रगल्भतेने त्यांना स्थैर्य येतं. आईला मात्र backseat दिलं जातं आणि ते ती अगदी सहज स्वीकारते.

आईच्या पदरापासून सुरु झालेला माझा आणि आईचा हा प्रवास…

माझ्या जन्माच्या वेळी खूप दिव्यातून आईला जावे लागले, माझा जन्म झाला आणि आईचा पुनर्जन्म. पुढे पूर्ण वर्ष माझी खूप काळजी घ्यावी लागणार होती जी तिने लीलया पार पाडली, कशी ते मात्र मला मी आई झाल्यावर कळले. 

“तू कुणाची” असा प्रश्न विचारताच माझं चटदिशी उत्तर येई , ‘मी बाबांची’. नकळत आईच्या मनावर एक ओरखडा . पण हसतमुखाने लटक्या रागात तिची एखादी चापट, एवढीच प्रतिक्रिया. आज कळतं की नकळत किती आघात करत असतो आपण आईच्या मनावर.

तेव्हा आई ही माझी प्रतिस्पर्धी, स्त्री म्हणून बाबांच्या प्रेमाची वाटेकरी, बालबुद्धीला एवढंच कळत असे. आमच्यात fine tuning होऊ लागलं आणि मी आईची कधी झाले कळलंच नाही.

लहानपणी प्रत्येकाला वाटत असतं की आपली आई एक परी आहे आणि तिच्याकडे जादुची छडी आहे. मला पण असंच वाटे, खास करुन दिवाळीत. कारण रात्री झोपताना सामसूम दिसणाऱ्या स्वयंपाकघरात सकाळी उठले की स्वादिष्ट फराळाचा घमघमाट असे, तेव्हा कळायचंच नाही ही झोपते कधी, ऊठते कधी आणि सगळं करते कधी. फक्त खायचं तेवढं कळत असे. दिवाळीची आणखी एक आठवण म्हणजे तिची वसुबारसेची रांगोळी. पाटावर अत्यंत सराईतपणे ती गाय आणि वासरू काढत असे, ते ही रांगोळीने. मी दिवसभर त्या रांगोळीची वाट बघत बसे. आज त्याच थरथरत्या हातांना रांगोळीची दोन बोटं ओढणं किती जड जातं हे बघून गलबलून येतं.

पण “मी बाबांची” म्हणणारी मी , वाढले मात्र आईच्या शिस्तीत. नुसतं बाबांच्या रागे भरण्याने ताप काढणारी (आणि नंतर त्यांच्याशी कट्टी घेणारी) मी आणि हवालदील बाबा, हे चित्र बघताच त्या माऊलीला लगेच समजले, इकडे शिस्त लावण्याचे काम तिलाच करावे लागणार आणि ते पण मोठ्या खुबीने!

मग काय सुरु झाला आमचा क्लास. तिच्या ह्या क्लासमधे ‘To Do ‘ ची लिस्ट कमी , ‘Not to Do’ ची 

लिस्टच मोठी होती.,असं वागायचं नाही, असं बोलायचं नाही. मी कधी रागाने तिला म्हणे, “काय गं सारखी नकार देत असतेस? ” तर शांतपणे मला समजावी, ” कारण तुला नकार पचवता आला पाहिजे आणि नकार देता पण आला पाहिजे”. त्या वयात तिचं बोलणं किती कळलं कुणास ठाऊक, पण पुढच्या आयुष्यात नक्कीच उपयोग झाला. 

शालेय जीवनातून कॉलेजमध्ये पाऊल ठेवले आणि तिच्या नजरेला आणिकच धार आली. बुरसटलेल्या विचारांची नाही ती, पण मैत्री कुणाशी असावी आणि कशी असावी ह्याचे मात्र नियम होते. तिच्यात आता एक मुलीची आई जरा जास्तच डोकावू लागली. आता शिस्तीची जागा माझ्या बद्दल वाटणाऱ्या काळजीने घेतली. आणि त्या काळजीपोटी माझ्यावर वेळेत घरी येण्याचं बंधन घातलं गेलं. कधी चुकून उशीर झाला तर तिचा काळजीने चेहरा काळवंडलेला असे, मग मलाच अपराधी वाटे. इतक्या वर्षांनी आज ही तीच अवस्था असते तिची.

तिच्याकडून शिकले.. तडजोड कधी, कुठे आणि किती करायची, तेही आत्मसन्मान सांभाळून. तिच्या प्रत्येक कृतीत माझ्यासाठी शिकवण असे. कणिक भिजवताना परात स्वच्छ दिसली पाहिजे, उष्टी खरकटी भांडी इतकी स्वच्छ पाहिजेत की कामवालीला आज स्वयंपाक काय होता ते कळता कामा नये. करंजी करताना एक मोदक ,आणि मोदक करताना एक करंजी करायचीच असते, का विचारलं की म्हणे बहिणीला भाऊ आणि भावाला बहिण ही पहिजेच. ह्या आणि अशा अनेक गोष्टी शिकले ज्या मला पुढे कामी आल्या. बाकी बऱ्याच गोष्टी तर तिला बघून बघूनच शिकले. असेच तर घडत असतात संस्कार. 

तर ही माझी आई, माझं लग्न ठरल्यावर मात्र थोडी चिडचिडी झाली. कदाचित धास्तावली. कदाचित मला पुढे जड जाऊ नये म्हणून मुद्दाम मायेचे पाश सैल करू बघत होती. कदाचित स्वतःलाच जड जाऊ नये म्हणून? सासरी मी पटकन रुळावी म्हणून? असेल कदचित !!

मुलगी म्हणून अती स्तुती कधीच केली नाही. एखादा पदार्थ मी केला की छान झालाय असं म्हणायची.. की मी समजून जायचे अजून सुधारणा करण्यास वाव आहे. “तुला माझं कौतुकच नाही ” हे माझं पेटंट वाक्यं आणि, “मुळूमुळू रडायचं नाही, येत नाही म्हणायचं नाही, करुन बघ, शिकून घे”.. ही तिची पेटंट वाक्यं. पुढे मला मुलं झाल्यावर ह्या वाक्यांत आणिक भर पडली . ” सारखं ओरडू नाही गं मुलांना ! किती बोलतेस ! अशाने कोडगी होतील ती! ” …. बघा, आहे का आता? आईची आजी झाल्यावर नियम आणि शिस्त दोन्ही शिथिल होतात, किंबहुना पूर्णच बदलतात. नातवंडांना सगळं माफ !

तर अशी मी तिच्या तालमीत घडत गेले, नुसतीच घडले नाही तर सक्षम झाले.. मानसिक दृष्ट्या.

आज लिहिता लिहिता तिची अनेक रुपं माझ्या डोळ्यासमोर सरसर सरकली. रात्री जागून माझ्यासाठी परकर पोलकं शिवणारी, तेही हाताने. माझ्यासाठी मेहनत घेणारी , मला सगळं आलच पाहिजे असा अट्टाहास करणारी, आपली मुलगी आयुष्याच्या कुठल्याही शर्यतीत मागे पडू नये म्हणून धडपडणारी.

मला आराम मिळावा म्हणून माझ्या तान्हुल्यांना सांभाळणारी, आणखी किती रुपात दिसली ती मला काय आणि किती लिहू? 

खरं तर लिहूच काय?

… ‘आई’ हाच एक अखंड ग्रंथ असतो, ज्याची कितीही वाचलं तरी पानं संपतच नाहीत, असं वाटतं. अजून कितीतरी वाचायचे बाकी आहे.

हा प्रवास फक्त माझा आणि आईचा नसून सगळ्या माय-लेकींचा प्रवास आहे. काळानुरूप त्यात मैत्रीची भर पडली आणि तो आणिकच सुंदर, सुखकर आणि समृद्ध झाला. आपला हा प्रवास असाच चालू राहो….सर्व मायलेकींसाठी.

लेखिका : अज्ञात. 

प्रस्तुती : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फुंकर… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ फुंकर… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

फुंकर.. किती सुंदर अर्थवाही शब्द. नुसता शब्द वाचला तरी डोळ्यापुढे तरळतो तो ओठांचा चंबू, ते अर्धोन्मीलित प्रेमव्याकूळ नेत्र, ती माया, ती ममता, तो स्नेह, ती सहवेदना, ती संवेदनशीलता. आणि अस्फुट ऐकूही येतो,  फू ऽऽऽ, तो अलगद सोडलेला हवेचा विसर्ग, एक लाघवी उच्छ्वास.

… फुंकर.. एक सहजसुंदर, स्वाभाविक, हळूवार भावनाविष्कार.

☆ फुंकर … ☆

धनी निघाले शेतावरती

बांधून देण्या भाजी भाकर

चुलीत सारून चार लाकडे

निखार्‍यावरी घाली फुंकर।

माय जाणते दमले खेळून

बाळ भुकेले स्नानानंतर

बशी धरूनी दोन्ही हातानी

दुधावरती हळूच फुंकर।

कुसुम कोमल तान्हे बालक

चळवळ भारी करी निरंतर

ओठ मुडपुनी हसे, घालता

चेहर्‍यावरती हळूच फुंकर।

खेळ खेळता सहज अंगणी

डोळ्यात उडे धूळ कंकर

नाजूक हाते उघडून डोळा

सखी घालते हळूच फुंकर।

राधारमण मुरलीधर

धरूनी वेणु अधरावर

काढीतसे मधु मधूर सूर

अलगुजात मारून फुंकर।

किती दिसांचा वियोग साहे

रागेजली ती प्रिया नवथर

कशी लाजते पहा खरोखर

तिच्या बटांवर घालून फुंकर।

सीमेवरूनी घरधनी येता

अल्प मिळाला संग खरोखर

रात जाहली पुरेत गप्पा

दिवा मालवा मारून फुंकर।

संसारातील जखमा, चटके

सोसायाचे जगणे खडतर

सुसह्य होते कुणी घालता

सहानुभूतीची हळूच फुंकर।

अटल आहे भोग भोगणे

कुणी गेल्याचे दु:ख भयंकर

पाठीवरती हात फिरवूनi

दु:खावरती घाला फुंकर।

कितीक महिने गेले उलटून

मित्र भेटही नाही लवकर

मैत्रीवरची धूळ झटकुया

पुनर्भेटीची घालून फुंकर।

लेखिका — अज्ञात 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्द देवते… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

☆ शब्द देवते… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

जीवन हा प्रचंड रंगमंच आहे. या मंचावर मनुष्य अनेक अनुभूती घेत असतो, अनुभव घेत असतो. 

शास्त्रीय ज्ञानानुसार एकदा अनुभवलेले मनुष्याच्या स्मरणात कायम राहते. तथापि मानवी स्वभावानुसार मात्र काही प्रसंग त्याला कधीच विसरू नये असे वाटते तर काहींची आठवण कधीच येऊ नये असे वाटत असते. त्यातही काही घटना तर अकल्पित असतात, अविश्वनीय असतात, अद्वितीय असतात. 

माझ्याही आयुष्यात अशीच एक अभूतपूर्व घटना ६ जानेवारी २०२३ रोजी घडली. काय घडले ते कथन करण्यापूर्वी, तिचे गांभीर्य लक्षात यावे यासाठी आधी मी थोडी पूर्वपीठिका सांगतो. 

अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी मला खेळतांना एक अपघात झाला होता. दुर्घटनेत माझा उजवा डोळा अधू झाला होता. तरीही मी जवळजवळ पंचवीस वर्षे व्यवस्थित शस्त्रक्रिया करू शकत होतो, प्रसूति करू शकत होतो. नंतर मात्र त्या डोळ्याला मोतीबिंदू, काचबिंदू वगैरे त्रास सुरु झाले. त्यावर तीन-चार शस्त्रक्रिया करायला लागल्या आणि अखेरीस त्याचे नेत्रपटल आतून फाटले. लगेच केलेल्या शस्त्रक्रियेमुळे डोळा आणि दृष्टी वाचली, पण ते नावापुरतेच ! मला उजव्या डोळ्याने समोरची माणसे देखील ओळखता येत नाहीत. 

तथापि माझा डावा डोळा मात्र विलक्षण कार्यक्षम होता. उजवा डोळा इतकी वर्षे अधू असून देखील मी पन्नासपेक्षा अधिक पुस्तके लिहू शकलो…. अन् अचानक गेले महिना-दीड महिना मला साधे वर्तमानपत्र देखील वाचता येईना झाले, पानात आलेली मिरची देखील ओळखता येईना. 

नेत्रपटल विशारद नेत्रतज्ज्ञाला दाखवायला गेलेलो असतांना तपासणीच्या आधी माझ्या डोळ्यात वरचेवर औषध टाकून मला डोळे बंद  करून बसविले होते. माझ्या या डोळ्याचे काय होणार या विचाराने मी विलक्षण अस्वस्थ झालो होतो. आता हाही डोळा गेला तर मी करायचे काय – कसे वाचायचे, कसे लिहायचे आणि कसे जगायचे? माझ्या मस्तकात विचारांचे प्रचंड मोहोळ उठले होते.  सूरदास व्हायची भीती मला भेडसावत होती. सूरदासांनी उदंड काव्य केले खरे; पण कुठे त्यांच्यासारखे प्रासादिक व्यक्तिमत्व आणि कुठे माझ्यासारखा सामान्य माणूस ! ज्या शब्दांची आणि अक्षरांची मी आयुष्यभर सेवा केली तेच आता मला पारखे होणार की काय या विचाराने माझे डोके फुटायची वेळ आली; मस्तकात गरगरायला लागले. अखेरीस मी तेथील एका डॉक्टरांकडे एक कागद मागितला. तिला वाटले मला डोळे पुसायला कागद हवा आहे. तिने मला एक टिश्यू पेपर आणून दिल्यावर मी तिला सांगितले, ‘मला लिहायला कागद हवा आहे.’ 

आणि माझ्या आयुष्यातील ती अद्वितीय अनुभूती मला आली. बंद डोळ्यांनी मी शब्ददेवतेची आळवणी करणारी कविता लिहिली.   

शेजारीच बसलेल्या माझ्या मुलाच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘आम्हाला उघड्या डोळ्यांनी देखील इतके सरळ रेषेत लिहिता येणार नाही, तितके  सुबक तुम्ही बंद डोळ्यांनी लिहिलेत !’

… ही अनुभूती आणि ती कविता आज मी माझ्या समस्त वाचकांसाठी घेऊन आलो आहे : 

☆ शब्ददेवते…

शब्ददेवते रुसू नको गे अपुल्या भक्तावरी

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी  ||ध्रु||

कुवत जशी मी सजवीत आलो अलंकार चढवुनी 

कथा कविता कादंबरीना नटविले  रूपांनी

अगतिक झालो वयोपरत्वे दृष्टी झाली अधुरी

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी     ||१||

सादाविले तुम्हाला येता ओथंबुन भाव मना

निराश कधी ना केले माझ्या भावभावनांना

असे कसे मी सांडू माझ्या कवीकल्पनांना तरी 

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी   ||२||

देवी शारदे कृपा करावी जागृत ठेवी कविता 

अमर करी मम साहित्याला देऊनिया शाश्वता

सारे सोडून गेले तरीही ते पावो अक्षरी

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी   ||३||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

संपर्क – एम.डी., डी. जी. ओ., श्रोत्री निवास, ४०/१-अ, कर्वे रस्ता, पुणे ४११ ००४

मो – ९८९०११७७५४ ईमेल – [email protected].

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ न सांगितले गेलेले छत्रपती… लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ न सांगितले गेलेले छत्रपती… लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

न सांगितले गेलेले छत्रपती…!!!

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रमुख्याने फक्त या तीनच गोष्टी सांगितल्या जातात….!

1.अफजलखानाचा कोथळा 

2.शाहीस्तेखानाची बोटे आणि

3.आग्र्याहून सुटका

पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतील….!

१. आपल्या आईला, जिजाऊ माँसाहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज “सामाजिक क्रांती” करणारे होते…!

२. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे”लोकपालक” राजे होते…!

३. सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे”उत्तम प्रशासक” होते…!

४. विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे “पर्यावरण रक्षक” होते…!

५. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती. तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मापेक्षा देश मोठा हा संदेश देणारे “स्व-धर्मचिकित्सक” होते …!

६. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून  “अंधश्रध्दा निर्मूलनाचा संदेश देणारे  चिकित्सक राजे होते. !

७. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे ! “जलतज्ञ” राजे छत्रपती शिवराय !!

८. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे  १०० हून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, “उत्तम अभियंते राजे” !

९. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे !!

१०. परस्त्री मातेसमान मानत महिलांना  सन्मानाने वागवणारे ” मातृभक्त, नारीरक्षक ” छत्रपती शिवराय ! 

११. संपूर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या दरबारातच मनोरंजनासाठी कोणतीही स्री नर्तिका नाचवली गेली नाही, की मद्याचे प्यालेही रिचवले गेले नाहीत. !

— खऱ्या अर्थाने ते “लोकराजे” होते.  कारण ते धर्म-जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते, आणि  हीच खरी शिवशाही होती…..!

जय जिजाऊ जय शिवराय 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आदरणीय छ.शिवाजी महाराज… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ आदरणीय छ.शिवाजी महाराज… ☆ सौ राधिका भांडारकर 

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज,

यांना सविनय दंडवत..

राजा कसा असावा? हा प्रश्न जगात कुणालाही विचारला तर त्याचे उत्तर एकच,” राजा असावा तर शिवाजी सारखा”.

महाराज ! नुसत्या आपल्या नामोच्चाराने आम्ही रोमांचित होतो!  शिवरायासारखा एक जाणता राजा या देशात, महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला, आणि त्याने कधीही विसर न पडणाऱ्या पराक्रमाचा, संस्काराचा, नैतिकतेचा, महान इतिहास घडवला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहेच.

व्हिएतनाम आणि अमेरिकेत वीस वर्षे युद्ध चालले. अमेरिकेला वाटत होते की या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल.  पण युद्ध लांबले.  अमेरिकेस माघार घ्यावी लागली.  व्हिएतनामचा  विजय झाला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या राष्ट्रपतींना त्यांच्या विजयाचे रहस्य विचारले असता, ते उत्तरले,

“युद्धकाळात हिंदुस्थानातील एका शूर राजाचे चरित्र माझ्या हाती आले.  त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आम्ही युद्धनीती ठरवली.  आणि ती ठामपणे राबवली.  आणि आम्ही विजयी झालो.”

पत्रकारांनी विचारले,” तो हिंदुस्थानी राजा कोण?”

राष्ट्रपती उत्तरले, “ छत्रपती शिवाजी महाराज.  हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केले असते.”

याच राष्ट्रपतींनी स्वतःच्या मृत्यूपूर्वी आपली अंतिम इच्छा लिहून ठेवली होती की, 

“माझ्या समाधीवर खालील वाक्य लिहिले जावे”

 “छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्थ झाला!”

 आणि आजही त्यांच्या कबरीवर हे वाक्य वाचायला मिळते.

महाराज असे तुम्ही!  जगाचे आदर्श राजे. आपल्याबद्दल म्या पामराने काय आणि किती बोलावे?

शिव म्हणजे पावित्र्य, मांगल्य, सौंदर्य आणि शक्तीही. आपल्या नावानेच आमचे हृदय उचंबळते. 

पण महाराज आज या पत्राच्या निमित्ताने, एक खेदही व्यक्त करावसा वाटतोय् . आज कुठेतरी आपल्या ऐतिहासिक नावाचा, आदर्शाचा, पराक्रमाचा केवळ दुरुपयोग केला जातोय.  स्वार्थी माणसे निमित्त साधून भांडणे, दंगली माजवतात.  झुरळ मारायचीही शक्ती नसलेली ही माणसे, केवळ मतांसाठी छाती फुगवून, “आम्ही शिवरायांचे वंशज आहोत!” अशा आरोळ्या ठोकतात.  याचे प्रचंड दुःख होते.  मान खाली जाते. लाज वाटते.

महाराज ! या अशा रणछोडदासांसाठी मी आपली नम्रपणे क्षमा मागते. आणि यांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थनाही करते. शिवाजीचे वंशज म्हणून त्यांना खरोखरच अभिमान असेल तर त्यांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास करावा. लोकनेता कसा असावा याचे ज्ञान मिळवावे.

आपली,

 प्रयत्नपूर्वक आपले आदर्श जपणारी कुणी एक…

 

राधिका भांडारकर

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print