मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बदल व्हावा सर्वार्थ ☆ श्री शुभम अनंत पत्की

श्री शुभम अनंत पत्की

? कवितेचा उत्सव ?

☆ बदल व्हावा सर्वार्थ ☆ श्री शुभम अनंत पत्की 

पुन्हा लागले निर्बंध,

अवघड वर्ष सरताना

पुन्हा घ्यावी काळजी,

घराबाहेर पडताना

 

शत्रु इतका विक्राळ,

अदृश्य आहे असा

पाळावे किती नियम,

जीव झाला नकोसा

 

निरोप सरत्या वर्षाला,

देता, न उरले श्वास

सर्वांनी भोगले दुःख,

झाले आयुष्य भकास

 

बदल व्हावा यथार्थ,

नको कॅलेंडरपुरता

बदल व्हावा सर्वार्थ,

अनुभवी हे वर्ष सरता

© श्री शुभम अनंत पत्की

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 94 – मी, मोबाईल व्हायला हवं होतं.. ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #94  ?

☆ मी, मोबाईल व्हायला हवं होतं.. 

खरंच माणसा ऐवजी मी,

मोबाईल व्हायला हवं होतं..

काळजामध्ये माझ्याही,

सिमकार्ड असायला हवं होतं…!

 

स्वतः पेक्षा जास्त कुणीतरी,

माझी काळजी घेतली असती..

मोबाईलच्या गॅलरीत का होईना,

आपली माणसं भेटली असती…!

 

माझं रिकामं पोट सुध्दा,

दिसलं असतं स्क्रिन वर..

इलेक्ट्रिसिटी खाऊन मी,

जेवलो असतो पोटभर…!

 

कुणालाही माझी कधी,

अडचण झाली नसती..

खिसा किंवा पर्समध्ये ,

हक्काची जागा असती..!

 

माझ्यामधल्या सिमकार्डचंही,

रिचार्ज करावं लागलं असतं..

वय झाल्यावर मला कुणी ,

वृध्दाश्रमात सोडलं नसतं…!

 

आपलेपणाने कुणीतरी मला,

जवळ घेऊन झोपलं असतं..

रात्री जाग आल्यावरही,

काळजीने मला पाहिलं असतं..!

 

माझ्यासोबत लहान मुलं,

आनंदाने हसली असती..

कधी कधी माझ्यासाठी,

रूसूनही बसली असती..!

 

कधी कधी माझं सुद्धा,

नेटवर्क डाऊन झालं असतं..

स्विच ऑफ करुन मला पुन्हा ,

रेंज मध्येही आणलं असतं..!

 

प्रत्येकाने मला अगदी,

सुखात ठेवलं असतं..!

प्रत्येक वेळी स्वतः बरोबर,

सोबतही नेलं असतं..!

 

आत्ता सारखं एकटं एकटं,

तेव्हा मला वाटलं नसतं..!

तळहातावरच्या फोडासारखं,

प्रत्येकाने मला जपलं असतं…!

 

© सुजित कदम

संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्ष ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ नववर्ष ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

प्रेमळ नाते आपुले

शुभशकुनी हसावे

मैत्र गीत हे नव्याने

काळजात रुजवावे

 

नित्य नवी नवलाई

भेटीसाठी ओढ हवी

सोहळ्याच्या निमित्ताने

नाविन्याची जोड हवी

 

सदिच्छा आजच्या नव्या

योजलेले पूर्ण व्हावे

सुख संकल्पात सदा

मन गुंतून रहावे

 

निरागस, आनंदी ते

पवित्र क्षण भेटावे

नव्या जाणिवांचे ज्ञान

भरभरून मिळावे.

 

अनुभव सिद्ध व्हावे

सत्कार्यात पुढाकार

घेतले ते दान देता

जीवनी येवो आकार.

 

क्षण ऐसेच भेटावे

पूर्ण होवो सार्‍या इच्छा

तुम्हाला नववर्षाच्या

खूप साऱ्या हो “शुभेच्छा.”

?????

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

१/१/२०२२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 115 ☆ हेमंत ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 115 ?

☆ हेमंत ☆

 हेमंत ऋतूच तर सुरू आहे,

 हवेतला गारवा..

सारं कसं मस्त…

 सुखासीन!!

मार्गशीर्ष ,पौष व्रतवैकल्यात  रमलेला..

संक्रांतीची गोड चाहूल…

 

ती ही हेमंतातलीच संध्याकाळ,

तू दिलास तिळगुळ,

काहीही न बोलता…..

रात्री मैत्रीणींबरोबर सिनेमाला गेले,

तिथल्या गर्दीत दिसलास अचानक,

तो “आम्रपाली”होता वैजयंतीमालाचा!

लक्षात राहिला,

संक्रातीच्या दिवशी पाहिला म्हणून!

तू कोण कुठला काहीच माहित नाही,

मैत्रीण म्हणाली एकदा,

कोण गं हा देव मुखर्जी ??

आणि हसलो खूप!!

एकदा शाळेत जाताना–‐-

कुठूनसे सूर येत होते,

जाने वो कैसे लोग थे…..

आणि तू दिसलास….

आज ऋतूंचा हिशेब मांडताना,

तू आठवलास, त्याच बरोबर,

तिळगुळ..आम्रपाली….आणि हेमंतकुमार चे सूरही आठवले!

 हेमंत असतोच ना वर्षानुवर्षे,

आठवणीत, सिनेमात, गाण्यात,

आणि तिळगुळातही…….

 

© प्रभा सोनवणे

(१७ डिसेंबर  २०२१)

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वाळूचं घड्याळ ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

?  कवितेचा उत्सव ? 

☆ वाळूचं घड्याळ ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

अनादिअनंत वाळूचं

घड्याळ अथक चालू असतं

खाली टपकत एकेक वर्ष

कालगणना करत असतं

 

काही कण भरभर  पडतात

काही मात्र संथगती

माणसागणिक वेगळा वेग

माणसागणिक वेगळी मिती

 

मास्क लावून धावतानाही

बरंच दिलंय ‘एकवीस’नं

निर्माल्य पाचोळा यासोबत

फुलं फळं कोवळी पानं

 

वास्तव सांगतं मनाला

सगळंच थोडं बदललंय

एका वर्षाची भर पडून

प्रत्येकाचं वय वाढलंय

 

बरं-वाईट ठरवायचा

दृष्टिकोन आपल्या हातात

‘थकलो आता ‘ म्हणावं

की ‘वाढ अनुभव ज्ञानात’

 

वाळूच्या घड्याळातून

एक एक वर्ष पडत राहील

अशी वर्षं सरता सरता

नवी पिढी घडत राहील.

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 119 ☆ भरारी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 119 ?

☆ भरारी ☆

पंख होते लाभलेले पाखराचे

मेघ हे मी पेललेले अंबराचे

 

संकटांनी बाप माझा ग्रासलेला

शिक्षणाने देह तरिही पोसलेला

गोडवे गाऊ किती मी दप्तराचे

 

घेतलेली मी भरारी खूप मोठी

झोपडीची आज झाली छान कोठी

आरतीला दीप जळती कापराचे

 

पाय वाटेने निघालो त्यात काटे

टोचले पायास काही दगड गोटे

लाभले मज आज रस्ते डांबराचे

 

मी परीक्षा जीवणाची पास झालो

संकटांना मी कुठे त्या शरण गेलो

दावणे सोडून द्यावे वासराचे

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साऊचा शिक्षणवसा ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ साऊचा शिक्षणवसा ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

चूल मूल या पलीकडचे

विश्वचि नव्हे कधी स्त्रियांचे.. १

 

शिक्षण म्हणजे आहे काय

अजाणती माझी ताई माय..२

 

अज्ञानाच्या अंधारी बुजल्या

ज्योती तेवण्याआधी विझल्या.३

 

ज्योतीरूपी सूर्योदय झाला

ज्ञान किरणांनी झळकला..४

 

शिक्षण गंगा अवतरली

साऊ-ज्योती रूपे प्रकटली..५

 

शिक्षणास्तव झिजली काया

सावित्रीची मुलींवर माया..६

 

झेलूनी शेणगोळ्याचे वार

मानली नाही कधीच हार..७

 

उध्दार स्त्रीचा एकच ध्यास

रचला अद्वैत इतिहास…८

 

इतिहासाच्या पानांपानांत

नाव कोरले गेले मनात..९

 

भरारी घेण्याचे बळ दिले

पिलाला आस्मान खुले केले..१०

 

ज्ञान ज्योत घेवूनिया हाती

लख्ख चमकेल ही पणती..११

 

घेवू साऊचा शिक्षणवसा

अखंडित चालवू वारसा..१२

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 63 ☆ आपुली जागा आपण शोधावी … ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 63 ? 

☆ आपुली जागा आपण शोधावी …

सहज द्यावे, जेवणाचे ताट

परी न द्यावा, बैसावयाचा पाट…!!

 

आपुली जागा आपण शोधावी

स्व-जागा, स्वतः निर्माण करावी…!!

 

एक परमेश्वर, सहाय्यक होई

तोच मग, दाय पसाय देई…!!

 

नाते गोते सर्व, मायेचा बाजार

“राज” हे उक्त, करितो उजागर…!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – २८– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – २८– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[१२९]

संपूर्ण

काळोखात असलेलं

अश्राप मूल आहे मी

अंधकाराच्या

या गर्द विळख्यातून

माझे हात पसरतोय मी

लांब  करतोय

आई तुझ्यासाठी

 

[१३०]

सत्तेनं एकदा

मांडलं प्रदर्शन

आपण केलेल्या  

उर्मट अनर्थांचं

तेव्हा

खदखदा हसली

गळून पडणारी

पिवळी पानं

आणि संथ सरकणारे

गर्द मेघ —–

 

[१३१]

फूल अन् फूल

गोळा करून

जपून ठेवण्यासाठी

नको असा रेंगाळूस

चालत रहा सतत

कारण

उमलतच रहातील फुलं

आपोआप

तुझ्या वाटेवर  

 

[१३२]

घरामधून… अंगणामधून

कामे आवरत

लवलवणारी ही गृहिणी

चुणचुणित… चपळ…

हिच्या अंगोपांगातून

झुळझुळते गाणे

चिमुकल्या झर्‍याचे

टेकडीवरच्या खडयाखड्यांमधून

खळखळत येणार्‍या

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सूर्यप्रभा ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सूर्यप्रभा☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

(अष्टाक्षरी)

प्राचीवर उगवला

दिनमणी पहाटेला

प्रभा फाकली गगनी

टवटवी धरणीला

 

उषा हासरी लाजली

पाहुनिया भास्कराला

स्पर्षी किरण कोवळे

लाली आली कपोलाला

 

तृणपुष्पे कोनफळी

भिजलेली दवातुनी

गंध सडा प्राजक्ताचा

दरवळे वायूतुनी

 

तिमिराचा नाश करी

उगवतो दिनकर

चेतनता जागवितो

व्योमराज प्रभाकर

 

खेळ ऊन पावसाचा

प्रकाशाचा काळोखाचा

आशा जागवित फुले

पथ सार्‍या आयुष्याचा

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares