सौ. स्वाती रामचंद्र कोरे
कवितेचा उत्सव
☆ साऊचा शिक्षणवसा ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
चूल मूल या पलीकडचे
विश्वचि नव्हे कधी स्त्रियांचे.. १
शिक्षण म्हणजे आहे काय
अजाणती माझी ताई माय..२
अज्ञानाच्या अंधारी बुजल्या
ज्योती तेवण्याआधी विझल्या.३
ज्योतीरूपी सूर्योदय झाला
ज्ञान किरणांनी झळकला..४
शिक्षण गंगा अवतरली
साऊ-ज्योती रूपे प्रकटली..५
शिक्षणास्तव झिजली काया
सावित्रीची मुलींवर माया..६
झेलूनी शेणगोळ्याचे वार
मानली नाही कधीच हार..७
उध्दार स्त्रीचा एकच ध्यास
रचला अद्वैत इतिहास…८
इतिहासाच्या पानांपानांत
नाव कोरले गेले मनात..९
भरारी घेण्याचे बळ दिले
पिलाला आस्मान खुले केले..१०
ज्ञान ज्योत घेवूनिया हाती
लख्ख चमकेल ही पणती..११
घेवू साऊचा शिक्षणवसा
अखंडित चालवू वारसा..१२
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈