मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १६ – भाग २ – नाईलकाठची नवलाई ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी क्रमांक- १६ – भाग २  ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ नाईलकाठची नवलाई ✈️

 कैरोहून रात्रीच्या ट्रेनने सकाळी आस्वान इथे आलो. अबुसिंबल इथे जाण्यासाठी बरोबर अकरा वाजता सर्व गाड्या निघाल्या. त्याला Convoy असे म्हणतात. म्हणजे सशस्त्र सैनिकांची एक गाडी पुढे, मध्ये सर्व टुरिस्ट गाड्या, शेवटी परत सशस्त्र सैनिकांची गाडी. वाटेत कुठेही न थांबता हा प्रवास होतो व परतीचा प्रवासही याच पद्धतीने बरोबर चार वाजता सुरू होतो. तीन तासांच्या या प्रवासात दोन्ही बाजूला दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत प्रचंड वाळवंट आहे. इथे रानटी टोळ्यांच्या आपापसात मारामाऱ्या चालतात आणि एकेकट्या प्रवासी गाडीवर हल्ला करून लुटीची शक्यताही असते. म्हणून ही काळजी घेतली जाते. अबूसिंबल हे सुदानच्या सीमेवरील ठिकाण आहे. रामसेस (द्वितीय) या राजाचे ६५ फूट उंचीचे सॅ॑डस्टोनमधील चार भव्य पुतळे सूर्याकडे तोंड करून या सीमेवर उभे आहेत. शेजारच्या डोंगरावर त्याची पत्नी नेफरतरी हिचे असेच दोन भव्य पुतळे आहेत. डोंगराच्या आतील भाग कोरून तिथे पन्नास- पन्नास फूट उंच भिंतीवर असंख्य चित्रे, मिरवणुका कोरलेल्या आहेत. सूर्याची प्रार्थना करणारी बबून माकडे,गाई, कोल्हे, पक्षी असे तरतऱ्हेचे कोरीव काम आहे. तसेच नुबिया या शेजारच्या राज्यातील सोन्याच्या खाणीतून आणलेले सोने साठविण्याची मोठी जागा आहे. चार हजार वर्षांपूर्वीचे हे सारे पुतळे, कोरीवकाम वाळूखाली गाडले गेले होते. बर्कहार्ड नावाच्या स्विस प्रवाशाने १८१३ मध्ये ते शोधून काढले. १९६४ मध्ये नाईलवर आस्वान धरण बांधण्याच्या वेळी हे सर्व पुन्हा पाण्याखाली बुडणार होते, पण मानवी प्रयत्नाला विज्ञानाची जोड दिली गेली. सर्व कोरीवकाम तुकड्या-तुकड्यानी कापून जवळ जवळ सातशे फूट मागे या प्रचंड शिळा वाहून आणल्या. त्या दोनशे फूट वर चढविल्या आणि जसे पूर्वीचे बांधकाम होते तसेच ते परत कोरड्या उंच जागेवर डोंगर तयार करून त्यात उभे केले. या कामासाठी चार वर्षे आणि १०० मिलियन डॉलर खर्च आला. धरणाच्या बॅकवॉटरचे ‘लेक नासेर’ हे जगातले सर्वात मोठे कृत्रिम सरोवर बांधण्यात आले. या सरोवराचा काही भाग सुदान मध्ये गेला आहे.

नाईल क्रूझमधून केलेला प्रवास खूप सुंदर होता. या क्रूझ म्हणजे पंचतारांकित तरंगती हॉटेल्सच आहेत. जवळजवळ दीडदोनशे लहान-मोठ्या क्रूझ, प्रवाशांची सतत वाहतूक करीत असतात. नदीचे पात्र इथे खूप रुंद नाही. स्वच्छ आकाश, प्रखर सूर्यप्रकाश आणि नाईलचा अविरत जीवनप्रवाह यावर वर्षातून तीन पिके घेतली जातात. नदीच्या दोन्ही तीरांवर केळी, ऊस, कापूस,भात, संत्री अशा हिरव्यागार बागायतीचा दोन-तीन मैल रुंदीचा पट्टा दिसतो. त्या पलिकडे नजर पोहोचेल तिथपर्यंत वाळवंट! नदीकाठी अधून मधून पॅपिरस नावाची कमळासारखे लांब देठ असलेली फुले होती. त्याची देठे बारीक कापून पाण्यात भिजवून त्याचा पेपर बनविला जातो.पूर्वी तो लिहिण्यासाठी वापरत असत. आता त्यावर सुंदर पेंटिंग्स काढली जातात. ३६४ फूट उंचीच्या आणि दोन मैल लांबीच्या आस्वानच्या प्रचंड धरणाच्या भिंतीवरून मोठा हायवे काढला आहे.सोव्हिएत युनियनच्या मदतीने हे सारे काम झाले आहे. तिथून छोट्या लॉ॑चने फिले आयलंडला गेलो. इथले देवालयही आस्वान धरणामध्ये बुडण्याचा धोका होता. आधुनिक तंत्रज्ञानाने व युनेस्कोच्या मदतीने हे देवालयही पाण्याच्या वर नवीन बेटावर उचलून ठेवले आहे. या देवळात इजिप्तशियन संस्कृती चिन्हांपासून ग्रीक, रोमन, ख्रिश्चन सारी शिल्पे आढळतात. इसिस म्हणजे दयेची देवता सर्वत्र कोरलेली दिसते. तिच्या हातात आयुष्याची किल्ली कोरलेली असते.

कोमओम्बो इथे क्रोकोडाइल गॉड व गॉड ऑफ फर्टिलिटीच्या मूर्ती आहेत. क्रोकोडाइलची ममीसुद्धा आहे. पन्नास-साठ फूट उंचीचे आणि दोन्ही कवेत न मावणारे ग्रॅनाईटचे प्रचंड खांब व त्यावरील संपूर्ण कोरीवकाम बघण्यासारखे आहे. एडफू इथे होरस गॉडचे देवालय आहे. आधीच्या देवालयाचे दगड वापरून, शंभर वर्षे बांधकाम करून हे देवालय उभारले आहे. त्याच्या वार्षिक उत्सवाची मिरवणूक भिंतीवर कोरलेली आहे.तसेच हॅथर देवता व ससाण्याचे तोंड असलेला होरस गॉड यांचे दरवर्षी लग्न करण्यात येत असे. त्याची मिरवणूक चित्रे भिंतीवर कोरली आहेत.

लक्झरला पोहोचण्यापूर्वी एसना(Esna) इथे बोटीला लॉकमधून जावे लागते. ती गंमत बघायला मिळाली. बोट धरणातून जाताना धरणाच्या खूप उंच भिंतीमुळे अडविलेले पाणी वरच्या पातळीवर असते. तिथून येताना बोट सहाजिकच त्या पातळीवर असते. नंतर धरणाच्या भिंतीवरून पाणी खूप खोल पडते. बोट एकदम खालच्या पातळीवर कशी जाणार? त्यासाठी दोन बोटी एकापाठोपाठ उभ्या राहतील एवढ्या जागेत पाणी अडविले आहे. दोन्ही बाजूचे दरवाजे बंद करून त्या लॉकमधले पाणी पंपांनी कमी करत करत धरणाच्या खालच्या पातळीवर आणतात. आपली बोट हळूहळू खाली जाताना समजते. नंतर पुढचे लॉक उघडले जाऊन दोन्ही बोटी अलगद एकापाठोपाठ एक धरणाच्या खालच्या पातळीवर प्रवेश करतात व पुढचा प्रवास सुरु होतो. त्याचवेळी समोरून आलेल्या बोटींनाही या लॉकमध्ये घेऊन लॉकमधले पाणी वाढवून बोटींना धरणाच्या पातळीवर सोडले जाते.

भाग- समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १६ – भाग १ – नाईलकाठची नवलाई ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी क्रमांक- १६ – भाग १  ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️नाईलकाठची नवलाई ✈️

मुंबईहून निघालेले विमान बहारीनला बदलून आम्ही कैरोला जाणाऱ्या विमानात चढलो. शालेय वयात ‘इजिप्त ही…… देणगी आहे’ यात ‘नाईल’ हा शब्द भरून मिळविलेला  एक मार्क आठवू लागला. जगप्रसिद्ध पिरॅमिड्स, वाळवंटी प्रदेश ही वैशिष्ट्ये डोळ्यापुढे आली.नाईलच्या साक्षीने बहरलेल्या तिथल्या प्राचीन, प्रगत संस्कृतीची स्मृतिचिन्हे बघण्यासाठी आम्ही कैरोच्या विमानतळावर उतरलो.

मानवी इतिहासाला ज्ञात असलेली ही सर्वात प्राचीन संस्कृती सुमारे सहा हजार वर्षांची जुनी. किंग मिनॅसपासून जवळजवळ तीन हजार वर्षे एकाच राजघराण्याची इजिप्तवर सत्ता होती. सूर्यदेव ‘रे’ याला महत्त्वाचे स्थान होते. कालगणनेसाठी शास्त्रशुद्ध कॅलेंडर होते. लिहिण्यासाठी चित्रलिपी होती. पिरॅमिडच्या आकृतीत एखादी वस्तू ठेवल्यास ती जास्त दिवस चांगली राहते, हे आता विज्ञानानेसुद्धा सिद्ध झाले आहे. आश्चर्य वाटते ते चार हजार वर्षांपूर्वी लक्षावधी मजुरांच्या साहाय्याने एकावर एक  सारख्या आकाराचे अडीच टन वजनाचे दगड ठेवून जवळजवळ चाळीस मजले उंच असा तंतोतंत पिरॅमिडचा आकृतीबंध त्यांनी कसा बांधला असेल? यावरून लक्षात येतं की गणित, भूमिती, इंजीनियरिंग, आर्किटेक्चर, विज्ञान,कला शास्त्र या साऱ्या विषयात ते पारंगत होते. राज्यात सुबत्ता आणि स्थैर्य होते आणि ही सर्व शतकानुशतके भरभरुन वाहणाऱ्या नाईलची देणगी आहे याबद्दल ते कृतज्ञ होते.

मृत्यूनंतर मानवाचे काय होते? या आदिम प्रश्नाचा वेध प्रत्येक संस्कृतीत घेतला गेला व आपापल्या परीने त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही झाला. इजिप्तशियन कल्पनेप्रमाणे माणूस मृत्यूनंतर पक्षीरूप धारण करून आकाशात हिंडत राहतो व जेव्हा दयेची देवता( God of love) इसिस(ISIS) त्याला नवीन आयुष्याची किल्ली देईल( key of life) त्या वेळी तो जिवंत होतो. तो जिवंत झाल्यावर त्याला सर्व गोष्टी आठवाव्यात म्हणून त्यांच्या चित्रलिपीमध्ये पिरॅमिडच्या भिंतीवर सारी माहिती लिहीत असत. शिवाय तोपर्यंत त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू खाणे, पाणी, खेळ सर्व भिंतीवर कोरून ठेवलेले असे. तीन हजार वर्षे राज्य करून हे  राजघराणे लयाला गेले. नंतर ग्रीक राजा अलेक्झांडर(Alexander the Great) याने इजिप्तवर ताबा मिळवून तिथे ग्रीक संस्कृती आणली. थोडा काळ रोमन संस्कृती होती. त्यानंतर मुस्लिम धर्माचे आक्रमण झाले. आज इजिप्त संपूर्ण अरबस्तानमध्ये  महत्त्वाचे स्थान टिकवून आहे. साधारण एक कोटी लोकसंख्येपैकी ९०टक्के लोकवस्ती नाईलच्या काठाने  राहते.

पिरॅमिड किंवा टूम्बसृ्( Tombs ) सहाजिकच राजघराण्यातील व्यक्तींसाठी असत. मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या शरीरातील सर्व अवयव काढून वेगवेगळ्या जारमध्ये भरत. नंतर शरीर स्वच्छ करून त्याला सिडार वृक्षाचे तेल चोपडले जाई.मग बॅ॑डेजसारख्या पट्ट्या पट्ट्या शरीरभर गुंडाळून ते शरीर नीट  एकाच्या आत एका पेटीमध्ये ठेवले जात असे. कैरो म्युझियममध्ये अशा काही माणसांच्या, पक्षांच्या, प्राण्यांच्या ममीज आम्ही पाहिल्या. पिरॅमिड्समध्ये भरपूर सोनेनाणे सापडते असे लक्षात आल्याने मध्यंतरीच्या निर्नायकी काळात चोर- दरोडेखोरांनी, रानटी टोळ्यांनी भरपूर लुटालूट केली. सुदैवाने १९२२ साली ब्रिटिश आर्किऑलॉजीस्ट कार्टर यांना एकोणिसाव्या वर्षी मृत्यू पावलेल्या ‘तुतानखामेन’ या राजाची कबर(Tomb) जशीच्या तशी मिळाली. वाळूच्या डोंगराखाली संपूर्ण झाकली गेल्यामुळे ती लुटालूटीतून वाचली होती.कैरो म्युझियममध्ये ठेवलेल्या त्या कबरीतील अमूल्य वस्तूंचा खजिना पाहून डोळे दिपतात. ११५ किलो सोन्याचा त्या राजाचा मुखवटा अजूनही झळझळीत आहे. देखणी मुद्रा, तेजस्वी डोळे, सोन्याची खोटी दाढी, दोन- दोन राजमुकुट, सोन्याच्या चपला, सोन्याचे पलंग, सिंहासने,रथ, त्याचा खेळ, त्याचे दागिने, त्याच्या ममीवर असलेले संपूर्ण सोन्याचे, शरीराच्या आकाराचे आवरण, ती ममी ज्या पेट्यांमध्ये ठेवली होती त्या सोन्याच्या तीन प्रचंड पेट्या सारेच अद्भुत आहे. मिडास राजाची गोष्ट समोर साकार झाल्यासारखी भासत होती.

भाग-१ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १५ – भाग ३ – देखणा दुर्ग ग्वाल्हेर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १५ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ देखणा दुर्ग ग्वाल्हेर ✈️

दरबार हॉलच्या भोजनकक्षात एकाच वेळी २०० माणसे टेबल खुर्च्यांवर बसून जेऊ शकतील अशी चांदीच्या ताटांसह सुसज्ज व्यवस्था आहे. या भल्यामोठ्या टेबलावर शाही पाहुण्यांसाठी  चांदीची छोटी रेल्वेगाडी आहे. या रेल्वेचे चार छोटे, उघडे डबे कटग्लासचे बनविले आहेत.  त्यात खानपानाचे पदार्थ भरून ती गाडी जेवणाच्या टेबलावर रुळांवरून फिरत असे. पूर्वी विशिष्ट प्रकारच्या इंधनावर चालणारी ही गाडी आता इलेक्ट्रिकवर चालते.

बिलीअर्डरूममधील भव्य टेबलावरील छतात आणि समोरासमोर बिलोरी आरसे आहेत. एका रूममध्ये १८८० सालचा इटालियन पियानो आहे . पियानोच्या स्टॅण्डवरील लंबकाचे मोठे घड्याळ अगदी आजही बरोबर वेळ दाखविते. गालिच्यावर ठेवलेल्या बिलोरी आरशात वरच्या सुंदर झुंबराचे प्रतिबिंब पाहताना स्वतःचेही प्रतिबिंब दिसते. आरशाच्या दोन्ही बाजूंना कारंज्यासारखी काचेची दोन झाडे आहेत.

इतर दिवाणखान्यात असंख्य अमूल्य वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यामध्ये इटलीहून बनवून आणलेला काचेचा सुंदर पाळणा आहे. हा पाळणा दरवर्षी कृष्णजन्माष्टमीला वापरण्यात येत असे. औरंगजेब व शहाजहानने वापरलेल्या रत्नजडीत तलवारी, देशी-परदेशी राजांनी भेटीदाखल दिलेल्या मौल्यवान वस्तू,उंची फर्निचर,चिंकु राणीच्या रत्नजडित चपला, दागिने, गालिचे, तैलचित्रे सारे बघावे तेवढे थोडेच! परतंत्र भारतातील संस्थानिकांच्या  ऐश्वर्यसंपन्नतेची ही झलक पाहून डोळे दिपून जातात.

अफगाण राजपुत्र मोहमद गौस  हे सम्राट अकबराचे गुरु. यांची भव्य  कबर  एका बागेत आहे. षटकोनी आकारातील ही कबर लाल दगडात असून त्याला सहा मिनार आहेत. त्याच्या दगडी जाळीची कलाकुसर नाजूक लेससारखी दिसते. त्याच्याजवळच गानसम्राट तानसेनची साधीशी समाधी आहे. मध्यप्रदेश सरकारतर्फे तिथे हल्ली तानसेन समारोह साजरा होतो. तिथल्या चिंचेच्या झाडाची पाने खाल्ली असता आवाज सुधारतो अशी अख्यायिका आहे. आम्ही आजूबाजूला चिंचेचा वृक्ष कुठे दिसतो का ते पाहत होतो. शेवटी चिंचेचे एक खुरटलेले  झाड दिसले. त्यावरील उरलीसुरली पानेही लोक झोडपून काढीत होते. ही पाने खाऊन किती लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी तयार झाले  कुणास ठाऊक! झाड मात्र खुरटे, बोडके झाले होते.

पुढे एका फुलबागेजवळ राणी लक्ष्मीबाईंचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. तात्या टोपे यांचाही पुतळा आहे. उस्ताद हाफिज अली खॉ॑ यांच्या पुरातन वास्तूमध्ये, सुप्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी गतकालातील बुजुर्ग कलावंतांची वाद्ये जतन केली आहेत. बिर्लांनी बांधलेले सूर्यमंदिर एका सुंदर बागेत आहे.

नवव्या शतकात बांधलेले ‘तेली का मंदिर’ शंभर फूट उंच व भव्य आहे. दक्षिणेतील राष्ट्रकूट राजांनी ग्वाल्हेरवर राज्य केले होते. त्या वेळचे हे बांधकाम म्हणजे उत्तर- दक्षिणेचा संगम आहे. षटकोनी आकारातील या मंदिराचा कळस गोपुरासारखी रचना असलेला आहे  आणि बाकी बांधकाम गुप्त शैलीतील आहे. सर्व बाजूंनी वरपर्यंत पिवळसर दगडांवर अप्रतिम कोरीव काम केलेले आहे. ‘सास- बहू’ मंदिराचे शिल्पद्वय ( कदाचित या मंदिराचे पूर्वीचे नाव सहस्त्रबाहु असावे) १६९३ मध्ये ग्वाल्हेरचा रजपूत राजा महिपाल याने उभारले . अप्रतिम कलाकुसरीने नटलेले पिवळसर दगडातील कोरीवकाम दिलवाडा मंदिराची आठवण करून देते. दरवाजावर ब्रह्मा-विष्णु-महेश यांची शिल्पे कोरली आहेत. आतील सर्व उंच, भव्य खांब सुंदर नक्षीने नटलेले आहेत. चतुर्भुज विष्णूची मूर्ती आता तिथे नाही.

असंख्य, अज्ञात कलाकारांच्या अथक परिश्रमाने साकारलेली अशी शिल्पकाव्ये भारतभर विखुरलेली आहेत. कालौघात काही नष्ट झाली, काही असंस्कृत लोकांनी विशोभित केली तर कोणी पैशाच्या लोभाने त्यांची तस्करी केली. सोन्याहिऱ्यांच्या सुंदर कलाकृती गझनीच्या महंमदापासून इंग्रजांपर्यंत सर्वांनी मनसोक्त लुटल्या. तरीही जे शिल्लक आहे ते भारताच्या प्राचीन वैभवशाली परंपरेची साक्ष आहे. आपल्या पुढील पिढ्यांसाठी आणि देश-विदेशातील प्रवाशांसाठी हा समृद्ध वारसा डोळ्यात तेल घालून जपला पाहिजे.

भाग ३ व ग्वाल्हेर यात्रा समाप्त.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १५ – भाग २ – देखणा दुर्ग ग्वाल्हेर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १५ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ देखणा दुर्ग ग्वाल्हेर ✈️

ग्वाल्हेर दुर्गाच्या हत्ती दरवाजासमोर ब्रिटिशांनी हॉस्पिटल व तुरुंग म्हणून उभारलेल्या बिल्डिंगमध्ये आता पुरातत्व खात्याने सुंदर म्युझियम उभारले आहे. ग्वाल्हेर आणि आजूबाजूच्या भिंड, मोरेना, शिवपुरी वगैरे परिसरात सापडलेल्या पुरातन मूर्ती येथे जतन केल्या आहेत. सप्तमातृका, पार्वती, ब्रम्हा, विष्णू, गंगा- यमुना, आदिनाथ, पार्श्वनाथ, अष्टदिक्पाल, नरसिंह, एक मुखी शिवलींग अशा  असंख्य मूर्ती तिथे आहेत. एवढेच नव्हे तर इसवी सन पूर्व काळातील टेराकोटाची अश्वारूढ मूर्ती, मातीचे दागिने आहेत. मूर्तींची कमनीयता, उभे राहण्याची, बसण्याची, नेसण्याची ढब, वस्त्रे ,अलंकार, वराह, सिंह ,अश्व, पानाफुलांची नक्षी यातून त्या त्या कालखंडातील संपन्न सांस्कृतिक दर्शन घडते. दुर्दैवाने यातील बऱ्याच मूर्तींचे चेहरे मोगल काळात विद्रूप केले गेले आहेत. यातल्या काही चांगल्या मूर्ती देश-विदेशात प्रदर्शनासाठी नेल्या जातात.

राजा मानसिंग याने ‘मृगनयनी’साठी बांधलेला ‘गुजरी महाल’ किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. किल्ल्याच्या तटावरुन त्याचा रेखीवपणा नजरेत भरतो. तिथेही आता पुरातत्व खात्यातर्फे भग्न शिल्पांचे म्युझियम उभारले आहे.  प्रवेशद्वारी शार्दुलांची जोडी आहे .हत्ती ,मोर ,गंधर्वांच्या मिरवणुका,ताड स्तंभ, बाळाला पुढ्यात घेऊन झोपलेली माता, कुबेर, इंद्राणी, सर्वांगावर कोरीव काम केलेली वराह मूर्ती अशी असंख्य शिल्पे आहेत ,ऐतिहासिक दस्ताऐवेजांमध्ये तात्या टोपे यांचा १८५७ चा हुकूमनामाआहे . नानासाहेब पेशवे यांची तसबीर आहे. पुरातन दगडी नाणी ,नृत्यशिल्पे ,लोककला यांचेही दर्शन त्यात होते .याशिवाय किल्ल्यावर कर्ण मंदिर, विक्रम मंदिर, जहांगिर महाल, शहाजहाॅ॑ महल अशा अनेक वास्तू आहेत. इंग्रजांकडून त्यांचा वापर सैन्याच्या बराकी, दारूगोळा साठविण्याच्या जागा असा केला गेला.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सिंधिया म्हणजे शिंदे राजघराण्याचा जय विलास पॅलेस पहिला. त्यात प्रवेश करण्याआधीच त्याची भव्यता जाणवते. दुतर्फा डेरेदार वृक्षांनी, हिरवळीनी, फळाफुलांनी डवरलेल्या बागा, स्वच्छ रस्ते, त्यातील पुष्करणी, पूर्वजांचे पुतळे, तोफा, स्टेट रेल्वेगाडीचे छोटे ,सुंदर डबे व इंजिन, त्या काळातली मोटार गाडी असे सारे बघत आपण राजवाड्यापाशी पोहोचतो. या राजवाड्यातील ३५ दिवाणखान्यांचे  ‘जिवाजीराव म्युझियम’ बनविण्यात आले आहे. उर्वरित भाग शिंदे यांच्या वारसदारांकडून वापरला जातो. साडे सहा- सात फूट लांबीचे, पेंढा भरलेले वाघ, इंग्रज अधिकाऱ्यांसह शिकारीची छायाचित्रे, शस्त्रास्त्रे, पालख्या मेणे, डोल्या, पोहोण्याचा तलाव, जुन्या हस्तलिखित पोथ्या, पंचांगे, हस्तिदंती कोरीव कामाच्या असंख्य लहान-मोठ्या वस्तू ,इंग्लंड, बेल्जियम,इटली अशा देशोदेशींच्या अगणित वस्तू, कलाकुसरीच्या चिनी सुरया ड्रॅगनचे दिवे, काचपात्रे, धूपदाण्या, पर्शियन गालिचे, बिलोरी आरसे, चांदीच्या समया, गणेश, लक्ष्मी व इतर अनेक मूर्ती गतवैभवाची झलक दाखवितात.

दरबार हॉलला जाताना मधल्या चौकात संपूर्ण काचेचे असलेले भव्य कारंजे आहे. दरबार हॉलला जाण्यासाठी डावी- उजवीकडे वर जाणारे दोन जिने आहेत. त्या जिन्यांचे एका बाजूचे सर्व खांब बेल्जियम काचेचे आहेत. जवळजवळ  ६० फूट रुंद व १०० फूट लांब असलेल्या दरबार हॉलच्या छताला मध्ये आधार देणारा एकही खांब नाही. कडेच्या भिंतींवर सारे छप्पर तोलले आहे. कडेचे स्तंभ, भिंती सारे रंगविण्यासाठी १४ मण म्हणजे ५६० किलो सोने वापरले आहे. सर्वात आश्चर्य म्हणजे दरबार हॉलच्या छताला टांगलेली दोन अप्रतिम झुंबरं! प्रत्येकी साडेतीन टन वजन असलेली, २५० इलेक्ट्रिक दिव्यांनी सजलेली ही झुंबरं बेल्जियमहून तुकड्या- तुकड्यांनी आणून इथे जोडली आहेत. झुंबरं लावण्याआधी सात हजार किलो वजन पेलण्याएवढे छत मजबूत आहे ना ही परीक्षा कशी केली असेल? आठ पुष्ट हत्ती खास मार्ग उभारून एकाचवेळी छतावर उभे करण्यात आले. या कसोटीला ते छत उतरले तेव्हा बाकीचे बांधकाम केले गेले. अशी झुंबरे जगात कुठेही नाहीत. जमिनीवर घातलेला अखंड ,अप्रतिम रंगसंगती व डिझाईनचा गालीचा, ग्वाल्हेर तुरुंगातील कैद्यांनी तिथेच बसून विणलेला आहे. या कामासाठी बारा वर्षे लागली.  एका कलंदर कलावंताने हे काम त्यांच्याकडून करवून घेतले आहे.

भाग-२ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १५ – भाग १ – देखणा दुर्ग ग्वाल्हेर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १५ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ देखणा दुर्ग ग्वाल्हेर ✈️

कार्तिकातल्या स्वच्छ निळ्या आकाशाच्या तळ्यात, अष्टमीच्या शुभ्र चंद्राची होडी विसावली होती. हवीहवीशी वाटणारी सुखद थंडी अंगावर शिरशिरी आणत होती. लांबरुंद, उतरत्या दगडी पायर्‍यांवर बसून आम्ही समोरचा, पाचशे वर्षांपूर्वीचा ग्वाल्हेरचा किल्ला निरखत होतो. तेवढ्यात दिवे मालवले गेले. त्या नीरव शांततेत सभोवतालच्या झाडीतून घोड्यांच्या टापा ऐकू येऊ लागल्या. धीर-गंभीर आवाजात, किल्ल्यावर आणि सभोवती टाकलेल्या प्रकाशझोतात इतिहासाची पाने आमच्यापुढे उलगडली जाऊ लागली.

राजा मानसिंह याने इसवीसन १४८६ ते १५१६ या काळात तांबूस घडीव दगडात या किल्ल्याचं बांधकाम केलं.( हा राजा मानसिंह, तोमर वंशातील आहे. रजपूत राजा मानसिंह, ज्याची बहीण अकबर बादशहाला दिली होती तो हा नव्हे). गुप्तकाळातील म्हणजे इसवी सन ५३० मधील शिलालेख येथे सापडला आहे. गुप्त, परमार, बुंदेले, तोमर, चौहान, लोधी, मोगल, मराठे, इंग्रज अशा अनेक राजवटी येथे होऊन गेल्या. तलवारींचे खणखणाट, सैन्याचे, हत्ती- घोड्यांचे  आवाज, राजांचे आदेश, जखमींचे विव्हळणे, शत्रूपासून शीलरक्षणासाठी राण्यांनी केलेला जोहार असा सारा इतिहास ध्वनीप्रकाशाच्या सहाय्याने जिवंत होऊन आमच्यापुढे उभा राहिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी हा किल्ला पाहताना काल पाहिलेला इतिहास आठवत होता. रुंद, चढणीचा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातो. जवळ- जवळ तीन किलोमीटर लांब पसरलेल्या या किल्ल्याला ३५ फूट उंचीची मजबूत तटबंदी आहे. त्यात सहा अर्धगोलाकार बुरुज बांधलेले आहेत. बुलंद प्रवेशद्वारावर केळीची झाडे, बदकांची रांग, सुसरींची तोंडे, घोडे ,हत्ती अशा शिल्पाकृती आहेत. काही ठिकाणी निळ्या, पिवळ्या, हिरव्या रंगातील मीनायुक्त रंगकाम अजून टिकून आहे. किल्ल्याच्या आतील ‘मान मंदिर’ हा राजवाडा हिंदू स्थापत्यशैलीचा अजोड नमुना आहे. राजा मानसिंह याच्या कारकिर्दीमध्ये राजाश्रयामुळे गायन, वादन, नर्तन अशा सार्‍या कलांची भरभराट झाली. अशी कथा सांगतात, की राजा एकदा शिकारीला गेलेला असताना त्याने, दोन दांडग्या म्हशींची झुंज, नुसत्या हाताने सोडविणाऱ्या देखण्या गुजरीला पाहिले.  राजा गुजरीच्या प्रेमात पडला. तिलाही राजा आवडला होता. गुजरीने विवाहासाठी तीन अटी  घातल्या. एक म्हणजे ती पडदा पाळणार नाही. सदैव म्हणजे रणांगणावरसुद्धा राजाबरोबरच राहील  आणि  तिच्या माहेरच्या राई गावातील नदीचे पाणी ग्वाल्हेरमध्ये आणण्याची व्यवस्था केली पाहिजे. राजाने गुजरीच्या या तीनही अटी मान्य करून तिच्याशी विवाह केला व तिचे नाव मृगनयनी ठेवले. मृगनयनीला संगीतात उत्तम गती होती. राजाही संगीताचा मर्मज्ञ होता. शास्त्रीय संगीतात सुप्रसिद्ध असलेलं ‘ग्वाल्हेर घराणं’ या राजाच्या काळात उदयाला आलं. गानसम्राट तानसेनही इथलाच! मानसिंहाने त्याला अकबराकडे भेट म्हणून पाठविले. तानसेनचे गुरू, स्वामी हरिदास यांच्या स्मरणार्थ अजूनही इथे दरवर्षी संगीत महोत्सव साजरा होतो .

‘मान मंदिर’ या राजवाड्यात गतवैभवाची साक्ष मिरविणारे चाळीस लांबरुंद दिवाणखाने आहेत. गायन कक्षातील गाणे शिकण्यासाठी, ऐकण्यासाठी भोवतालच्या माडीमध्ये राणी वंशाची सोय केली आहे. दरबार हॉल, शयनकक्ष,मसलतखाना, पाहुण्यांची जागा अशा निरनिराळ्या कामांसाठी हे हॉल वापरले जात. भिंतीवर काही ठिकाणी हिरव्या, निळ्या रंगातील लाद्या अजून दिसतात.मीना रंगातील नाजूक कलाकुसरीची जाळी दगडातून कोरली आहे हे सांगितल्यावरच समजते. महालातील भुलभुलैया या ठिकाणच्या दगडी, अंधाऱ्या पायऱ्या गाईडच्या मदतीने उतरून तळघरात गेलो. इथे पूर्वी राण्यांच्या शाही स्नानासाठी, केशराने सुगंधित केलेल्या पाण्याचा लांबरुंद हौद होता. वरच्या दगडी छतात राण्यांच्या झुल्यांसाठी लोखंडी कड्या टांगलेल्या आहेत. झरोक्यातून वायूवीजनाची सोय तसेच ताज्या, वाहत्या पाण्याचा प्रवाह येण्याची व्यवस्था आहे. तिथे असलेले दोन पोकळ पाईप दाखवून हा पूर्वीचा टेलिफोन (संदेशवहनाचा मार्ग) आहे असे गाईडने सांगितले. आता त्या स्नानाच्या हौदाचा  बराचसा भाग लाद्यांनी आच्छादलेला आहे व फारच थोडा भाग जाळीच्या आवरणाखाली आहे.

कालचक्राची गती कशी फिरेल याचा नेम नाही. इसवीसन १५१६ मध्ये इब्राहीम लोदीने ग्वाल्हेरवर ताबा मिळविला. नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला आणि या स्नानगृहाचा म्हणजे तळघराचा वापर चक्क अंधारकोठडी म्हणून करण्यात आला. झोपाळ्यांसाठी बसविलेल्या लोखंडी कड्यात राजकैद्यांसाठी बेड्या अडकविण्यात आल्या. औरंगजेबाचा भाऊ मुराद व मुलगा मोहम्मद, दाराचा मुलगा शिको अशा अनेकांसाठी हे मृत्युस्थान बनले. जहांगीर बादशहाने शिखांचे सहावे गुरू हरगोविंद यांनाही इथे कैदेत ठेवले होते. नंतर दोन वर्षांनी त्यांची सुटका केली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी स्वतःबरोबर कैदेत असलेल्या ५२ हिंदू राजांचीही सुटका करविली. गुरु हरगोविंद यांच्या स्मरणार्थ बांधलेला ‘दाता बंदी छोड’ या नावाचा एक भव्य गुरुद्वारा किल्ल्याजवळच आपल्याला बघायला मिळतो.

भाग-१ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भूतान – सौंदर्याची सुरेल तान-भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १४ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग ४ ✈️

भूतानच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे भूतानमध्ये अनोखे जैववैविध्य आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती, बेंगाल टायगर, रेड पांडा, सुसरी- मगरी, रानटी म्हशी, अनेक प्रकारचे दुर्मिळ पक्षी इथे आढळतात. रक्तवर्णी पिजंट, हिमालयीन कावळा म्हणजे रॅवन अशा अनेकांचे दर्शन आम्हाला म्युझियममधील शोकेसमध्ये झाले. या छोट्याशा देशाचा ६० टक्के भाग संरक्षित जंगलांनी व्यापलेला आहे. इथल्या निसर्ग आणि प्राणी संपदेचा अभ्यास करण्यासाठी जगभरचे पर्यावरणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ भूतानला आवर्जून भेट देतात.

बौद्ध हा प्रमुख धर्म असलेल्या भूतानमध्ये लोकशाही पद्धतीचे राज्य असले तरी अजूनही लोकांच्या मनात राजा व राजघराणे यांच्याविषयी कमालीचा आदर व श्रद्धा आहे. मातृसत्ताक पद्धती असल्यामुळे सर्वत्र स्त्री राज्य आहे. प्रत्येक दुकानाच्या काउंटरवर, रेस्टॉरन्टच्या काउंटरवर स्त्रिया असतात. विणकाम, रंगकाम, साफ-सफाई सारी कामे स्त्रिया करतात. पारंपारिक पद्धतीनुसार जमिनीची मालकी कुटुंबातल्या स्त्रीकडे असते. लग्नानंतर पती, पत्नीच्या घरी राहायला येतो व तिला घरकामात मदत करतो. लग्नानंतर पटले नाही तर स्त्री सहजतेने नवऱ्याला घटस्फोट देऊ शकते. त्यामुळे अनेक लग्न, अनेक मुले अशी परिस्थिती असते. पण कुटुंब ,समाज म्हणून त्यांचे जीवन सुखी समाधानी असते. शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींपासून ऑफिसला जाणाऱ्या स्त्री पुरुषांपर्यंत सर्वजण पारंपरिक पेहराव करतात. कमरेपासून पायापर्यंत येणारे, सुंदर उठावदार डिझाइन्स व उजळ रंग असणारे लुंगी सारखे वस्त्र व त्यावर लांब हाताचे जाकीट अशा स्त्रियांच्या पोशाखाला किरा असे म्हणतात. पुरुषांचा ‘घो’ हा पोशाख गुडघ्यापर्यंत असतो .ते कातडी तळव्यांचे गुडघ्याइतके उंच बूट वापरतात.

भूतानी लोक बिनदुधाचा, मीठ घातलेला चहा पितात. त्याला सुजा म्हणतात. एकूणच भूतानी लोकांचे सपक जेवण आपल्या पसंतीस उतरत नाही. लाल, जाडसर तांदुळाचा भात आणि याकचे चीज गुंडाळून तळलेल्या मिरच्या आमच्या फारशा पचनी पडल्या नाहीत. डेझर्ट या जेवणानंतरच्या प्रकाराला भूतानमध्ये स्थान नाही. इथे सर्वत्र धूम्रपान बंदी आहे. सार्वजनिक स्वच्छता काटेकोरपणे जपली जाते. सगळे रस्ते चकाचक असतात. परंपरा, कला आणि धर्म यांची जोपासना कटाक्षाने केली जाते. भारतीय प्रवाशांना वेगळा व्हिसा घ्यावा लागत नाही. आपले निवडणूक ओळखपत्र पुरेसे होते. नूलटूम हे त्यांचे चलन भारतीय रुपयाशी जोडलेले आहे. त्यामुळे आपले रुपये सहज स्वीकारले जातात. धनुर्विद्या इथला राष्ट्रीय खेळ आहे. फुटबाल लोकप्रिय आहे आणि आता हळूहळू क्रिकेटचे वेडही आले आहे. हिमालयीन नद्यांच्या सुपीक खोऱ्यात भात, सफरचंद, अननस, संत्री यांचे उत्पादन होते. ॲल्युमिनियम, सिलिकॉन, जिप्सम, वीज यांची निर्यात होते. पर्यटन व्यवसाय वाढत आहे. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा विनामूल्य आहे.

भूतान हा आनंदी, समाधानी लोकांचा देश समजला जातो. देशाची प्रगती ग्रास डोमेस्टिक प्रॉडक्टवर न मोजता ती ग्रास  नॅशनल हॅपिनेसवर मोजायची असा निर्णय भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांनी घेतला. भौतिक सुविधा व आत्मिक समाधान यांची योग्य सांगड घातली तर लोक सुखी होतील, आधुनिक सुधारणा अमलात आणायच्या पण देशाचे पाश्र्चात्यीकरण करायचे नाही असे हे धोरण आहे. उच्चशिक्षणासाठी परदेशी गेलेले तरुण मातृभूमीच्या ओढीने परत येतात. पण आता भूतान संथगतीने बदलत आहे. बाहेरच्या जगाची चव चाखलेली तरुणाई अनेक प्रश्न आणि मागण्या घेऊन उभी आहे. रात्री इथल्या डिस्कोथेकमध्ये, पबमध्ये तरुणाईचा आवाज घुमतो.कानठळ्या बसविणारे संगीत व पाश्चात्य वेशात नाचणारी तरुणाई असते. सिगारेटच्या धुराने ,मदिरेने डिस्कोथेक भरून जातात. ज्याप्रमाणे आपल्या तरुणाईला आता जुन्या काळात जगायला आवडणार नाही तसंच भुतानच्या तरुणाईला आचार, विचार, पोशाख यांचे आधुनिकीकरण हवे आहे. विकासाची गती अधिक हवी आहे. सर्वांचे ड्रेस सारखे असले तरी गरीब-श्रीमंत ही दरी तिथे आहेच! सारे जग प्रचंड गतीने बदलत असताना, फार काळ भूतान सुधारणांचे वारे पर्वतरांगाआड थोपवून धरू शकेल असं वाटत नाही.

 भूतान समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भूतान – सौंदर्याची सुरेल तान-भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १४ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग ३ ✈️

एअरपोर्ट व्ह्यू पॉइंटवरून आमच्या गाड्या वळणावळणाच्या सुरेख गुळगुळीत रस्त्यावरून चेले-ला पास या १३ हजार फूट उंचीवरील खिंडीकडे निघाल्या. या ठिकाणाहून पूर्व हिमालयीन पर्वतरांगा व भूतानमधील झोमोलहरी हे नंबर दोनचे उंच शिखर यांचे दर्शन घ्यायचे होते.रस्त्यापलीकडील सफरचंदाच्या बागा पांढऱ्या स्वच्छ फुलांनी बहरलेल्या होत्या. देवदार, पाईन, स्प्रुस ,फर,ओक  अशी घनदाट वृक्षराजी होती.होडोडेंड्रान वृक्षांवर गडद लाल, पिवळी, पांढरी फुले फुलली होती. भूतानचे वैशिष्ट्य असलेल्या रंगीबेरंगी आणि पांढऱ्या पताका इतक्या उंचीवरही लहरत होत्या. रानटी गुलाबाची रक्तवर्णी फुले झुपक्यांनी होती. जमिनीसरशी व्हायोलेट, पिवळे, पांढरे जांभळे फुलांचे ताटवे माना उंचावून बघत होते. खालच्या दरीत पोपटी- हिरवी भातशेती डोलत होती. अकस्मात दोन्ही बाजूंना बर्फाचा सडा पडलेला दिसला. आम्ही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तिथे गेलो होतो. ड्रायव्हर म्हणाला,’ हा कालच्या पावसाचा परिणाम! खरं म्हणजे इथे ऑगस्ट सप्टेंबर पासून डिसेंबर जानेवारीपर्यंत  बर्फ पडते. त्यावेळी हा रस्ता बंदच असतो.’

आम्ही जसजसे उंचावर जात होतो तसतसे बर्फाचे प्रमाण वाढत गेले. दुतर्फा झाडांच्या फांद्या, रस्त्याकडेचे उंची दर्शविणारे खुणेचे बांध सारे बर्फाने माखुन गेले. इतका ताजा, शुभ्र हलका बर्फ पहिल्यांदाच पाहिला. काश्मीर, स्वित्झर्लंड, अमेरिका सगळीकडला अनुभव जमेस होता. पण ही पांढऱ्या पिसांसारखी बर्फवृष्टी न्यारीच होती. दोन्ही बाजूच्या हिरव्या वृक्षांच्या फांद्यांचे हात गोऱ्या- गोऱ्या बर्फाने झाकले जात होते. जणू  पांढरे फ्रीलचे फ्रॉक घालून हिमपऱ्या  अवतरल्या होत्या. त्यांच्या टोप्यांवर लाल- गुलाबी, निळे- जांभळे फुलांचे तुरे होते. आणि पायात रंगीबेरंगी फुलांचे बूट होते. फांद्यांच्या हातांवरून ओघळणारी बर्फफुले आम्हाला दोन्ही हातांनी बोलावीत होती. त्यांचे आमंत्रण सहर्ष स्वीकारून बर्फात खेळायला उतरलो. इतके हलके, स्वच्छ पांढरे बर्फ होते की त्यावर रंगीत सरबत न घालताच बर्फाचा छोटा गोळा तोंडात सरकवला.१३००० फुटांवरील चेलेला पास पर्यंत पोहोचलो पण दरीतून वर येणारे धुक्याचे पांढरे ढग आणि बर्फवृष्टी यामुळे समोरील पर्वतरांगा अस्पष्ट झाल्या होत्या. एकमेकांवर बर्फ उडविण्यात, बर्फाशी खेळण्यात वेळेचे भान राहिले नव्हते पण ड्रायव्हर्सनी परतण्याची सूचना केली .त्यांची सूचना किती योग्य होती ते परतीच्या वाटेवर लक्षात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे बर्फ भराभर वाढत चालले होते. येताना  दिसलेले उतरत्या छपराचे घर  अर्धेअधिक बर्फात बुडाले होते. बर्फाच्या रांगोळीमुळे रस्ता झाकून गेला होता. थोड्यावेळाने बर्फ कडक होऊन गाडीचे टायर फसण्याची शक्यता होती. पण अगदी ‘जी भरके जीवनभरका बर्फीला माहोल लूट लिया.’

आनंदाने ओंजळी भरून गेल्या होत्या. सकाळी निसर्ग आणि मानव यांच्यातील चित्तथरारक जुगलबंदी अनुभवली. आता निसर्गाच्या हिमकांती सौंदर्याचा साक्षात्कार अनुभवला. आणि रात्री जेवणानंतर रसिल्या संगीताने मन तृप्त झाले. आमच्या ग्रुपमध्ये पुण्याच्या ‘छंद’ संस्थेचे कलाकार होते. त्यांनी जेवणानंतर शांताबाई शेळके आणि मंगेश पडगावकर यांच्या सकस काव्याची मैफल जमवली. गझला सादर केल्या. साथीला डायनिंग टेबलाच्या तबल्याचा ठेका होता. त्याला तोंडी पार्श्वसंगीताची, उत्कृष्ट निवेदनाची जोड होती. भू-तानमधील  रात्र सुरेल तानांनी नादमयी झाली.

टकसंग मॉनेस्ट्रीला ‘टायगर्स नेस्ट’ असे म्हटले जाते. पारो व्हॅलीतली ही मॉनेस्ट्री साधारण तीन हजार फूट उंचीवर एका अवघड कड्यावर बांधलेली आहे. भूतानमधील एका दैत्याचा नाश करण्यासाठी आठव्या शतकात गुरू रिंपोचे वाघाच्या पाठीवर बसून उड्डाण करून इथे आले. दैत्य विनाशानंतर त्यांनी इथल्या गुहेत तीन महिने ध्यानधारणा केली अशी दंतकथा आहे. इसवी सन १६९२ मध्ये इथे मॉनेस्ट्री बांधण्यात आली. बुद्धाची विविध भावदर्शी शिल्पे येथे आहेत. आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाचे दर्शन घेण्याची प्रत्येक भूतानी व्यक्तीची आकांक्षा असते. अनेक परदेशी प्रवासीही काठीच्या सहाय्याने हा अवघड ट्रेक पूर्ण करतात. टायगर नेस्टच्या पायथ्याशी उभे राहून, जाऊन- येऊन  सहा तासांचा असलेला हा प्रवास आम्ही माना उंचावून पाहिला.

पारोच्या नॅशनल म्युझियममध्ये भूतानी संस्कृती, परंपरा, रीतीरिवाज, समूहनृत्यासाठीचे विविध   वेश यांचे जतन केले आहे. रेशमी कापडावरील थांका चित्रकला, वेगळ्या प्रकारच्या कागदावरील पेंटिंग्जचे  स्क्रोल पहिले. धनुष्यबाण, शिरस्त्राण, पतंग याचबरोबर घोड्याचे शिंग व घोड्याचे अंडे अशा कधीही न ऐकलेल्या वस्तूही  तिथे आहेत.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भूतान – सौंदर्याची सुरेल तान-भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १४ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग २ ✈️

पुनाखा व्हॅली इथे जाताना दहा हजार फूट उंचीवरील दो_चुला पास (खिंड ) इथे उतरलो. इथले चार्टेन मेमोरियल म्हणजे छोटे गोलाकार १०८ स्तूप सैनिकांचे स्मारक म्हणून उभारलेले आहेत. इथून हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचे नयनमनोहर दर्शन होते. पुढे घाटातून उतरत जाणारा वळणावळणांचा रस्ता लागला. छोट्या छोट्या घरांचे पुंजके दरीभर विखुरलेले आहेत. पुनाखा ही १६३७ पासून १९३७ पर्यंत म्हणजे अडीचशे वर्षाहून अधिक काळ भूतानची राजधानी होती.फोचू आणि मोचू या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे सुरम्य स्थान आहे. इथे मोनेस्ट्री व त्याला जोडून लाकडी बांधणीचा कलाकुसरीने सजलेला देखणा राजवाडा आहे. अजूनही राजघराण्यातील विवाह इथे संपन्न होतात. इथली थांका म्हणजे रेशमी कापडावर धार्मिक रीतिरिवाजांचे चित्रण करणारी चित्रे अजूनही आपले रंग टिकवून आहेत.  जपान,  कोरिया,  बँकॉक अशा अनेक देशातील प्रवासी बुद्ध दर्शनासाठी आले होते. छोटी  मुले भिक्षू वेष परिधान करून बौद्ध धर्माचे शिक्षण घेत होती. नद्यांच्या संगमावर कलापूर्ण लाकडी पूल उभारला आहे.

पुनाखाहून पारो व्हॅलीला जाताना वाटेत अनेक ठिकाणी संत्री,  लाल सोनेरी सफरचंद आणि याकचे चीज विक्रीला होते. या पारो व्हॅलीमध्ये  भाताचे उत्तम पीक येते. जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. उंचावरील हॉटेलच्या पायऱ्या चढून गेलो. गरम- गरम जेवण मिळाले. सकाळी एका पक्ष्याच्या मधुर आवाजाने जाग आली. हिरवागार कोट आणि बर्फाची हॅट घातलेली पर्वत शिखरे कोवळ्या उन्हात चमकत होती. आवरून पारो एअरपोर्ट पॉईंटवर पोचलो. आम्ही उभे होतो त्या उंच कड्यावरून संपूर्ण एअरपोर्ट दिसत होता. कड्याखाली पारो-चू नदी खळाळत वाहत होती. नदीकाठाला समांतर  सिमेंट कॉंक्रिटचा दहा फूट रुंद रस्ता होता. त्याला लागून असलेल्या हिरवळीच्या लांबट पट्ट्यावर एअरपोर्ट ऑफिसच्या दोन लहान इमारती होत्या. त्यांच्या पुढ्यात छोटासा रनवे. पलीकडील हिरव्या लांबट पट्ट्यावर असलेल्या दोन- तीन छोट्या इमारती,  त्यांच्यामागच्या डोंगर उतरणीला टेकून उभ्या होत्या.

‘वो देखो,  आ गया,  आऽऽगया’ ड्रायव्हरने दाखविलेल्या दिशेने आमच्या नजरा वळल्या. उजवीकडील दोन डोंगरांच्या  फटीतून प्रखर प्रकाशझोत टाकीत एक विमान एखाद्या पंख पसरलेल्या परीसारखे अवतीर्ण झाले आणि एका मिनिटात डावीकडील दोन डोंगरांच्या फटीत अदृश्य झाले. आश्चर्याने डोळे विस्फारलेले असतानाच,  यू टर्न घेऊन ते विमान माघारी आले आणि पारो एअरपोर्टच्या छोट्याशा धावपट्टीवर अलगद टेकले. घरंगळत थोडेसे पुढे जाऊन विसावले. उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून आम्ही वैमानिकाच्या कौशल्याला दाद दिली.  चारी बाजूंच्या हिरव्या- निळ्या डोंगररांगांच्या तळाशी विमान उतरले तेव्हा एखाद्या हिरव्या कमळावर पांढरेशुभ्र फुलपाखरू पंखावरील,  पोटावरील लाल काळे ठिपके मिरवत डौलदारपणे बसल्यासारखे वाटले.

पारोच्या खोल दरीतील हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आशियातील सर्वात लहान विमानतळ आहे. प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने हा विमानतळ सर्व जगात आव्हानात्मक समजला जातो. एकच छोटा रनवे असलेल्या या विमानतळावर ‘ड्रक एअर’ या भूतानच्या मालकीच्या विमानकंपनीची दिवसभरात फक्त तीन ते चार विमाने बँकॉक,  नेपाळ, कलकत्ता, मुंबई इथून येतात. सर्व उड्डाणे दिवसाउजेडीच करण्याचा नियम आहे. एअरपोर्ट ऑफिस दुपारी तीनला बंद होते. या विमानांचे पायलट विशेष प्रशिक्षित असतात. जवळजवळ आठ हजार फूट उंचीवर हा विमानतळ आहे. अठरा हजार फूट उंच पर्वतरांगातून विमान अलगद बाहेर काढून ते डोंगरांच्या तळाशी १९८० मीटर्स एवढ्याच लांबीच्या रनवेवर उतरविणे आणि तिथून उड्डाण करणे हे निःसंशय बुद्धीकौशल्याचं,   धाडसाचं काम आहे.जगभरातील फक्त आठ-दहा पायलट्सना इथे विमान चालविण्याचा परवाना आहे. वर्षभरात साधारण तीस हजार प्रवाशांची वाहतूक होते आणि अर्थातच या सेक्टरचे विमान तिकिटही या साऱ्याला साजेसे महाग असते.

एक चित्तथरारक घटना चक्षूर्वैसत्यम अनुभवून आम्ही गाडीत बसण्यासाठी वळलो. विमान उतरत असतानाच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. तसा तो काल संध्याकाळपासून थांबून थांबून पडतच होता. पावसामुळे बोचरी थंडी वाढली होती. डोळे भरून समोरचे दृश्य मनात,  कॅमेऱ्यात साठवून आम्ही गाडीत बसणार तो काय आश्चर्य,  लागोपाठ दुसरे विमान आले.  त्याचे स्वर्गावतरण होऊन ते हँगरला जाईपर्यंत तिसरे विमानसुद्धा आले. आनंदाश्चर्यात आम्ही बुडून गेलो.

भाग- समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भूतान – सौंदर्याची सुरेल तान-भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १४ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग १ ✈️

पूर्व हिमालयाच्या दक्षिण उतारावर तिबेट आणि भारत यांच्यामधील  छोट्याशा जागेत वसलेला भूतान हा एक चिमुकला देश! चिमुकला म्हणजे किती? जेमतेम आठ लाख लोकवस्ती असलेल्या, लांबट- चौकोनी आकाराच्या भूतानचा विस्तार ४७००० चौरस किलोमीटर म्हणजे आपल्या केरळ राज्याएवढा आहे.

मुंबईहून बागडोगरा इथे विमानाने पोहोचलो. पश्चिम बंगालमधील बागडोगरा हे भारतीय लष्कराचे मोठे ठाणे आहे. बागडोगरापासून जयगावपर्यंतचा बसचा प्रवास सुरम्य होता. सुंदर गुळगुळीत रस्ते, दोन्ही बाजुला दाट झाडी, लांबवर पसरलेले काळपट- हिरवे चहाचे मळे, भातशेती, शेलाट्या, उंच सुपार्‍या असा हिरवागार देखणा परिसर आहे. जयगाव हे भारताच्या सीमेवरील शेवटचे गाव संपले की एका स्वागत कमानीतून फुन्तशोलींग या भूतानच्या सरहद्दीवरील गावात आपण प्रवेश करतो. या प्रवेशद्वारातून वाहनांची सतत ये-जा असते. भूतानी वेशातील गोऱ्या, गोल चेहऱ्याच्या, शांत, हसतमुख ललनांनी हॉटेलमध्ये स्वागत केलं. लिफ्ट बंद असल्याने त्या सडपातळ, सिंहकटी पण काटक ललनांनी  आमच्या सर्वांच्या अवजड बॅगा तिसऱ्या मजल्यावर पटापट वाहून नेल्या.

भूतानची राजधानी ‘थिम्पू’ इथे निघालो होतो. स्क्रूसारखा वळणावळणांचा, संपूर्ण घाटरस्ता आहे. दुतर्फा साल, महोगनी, शिरीष अशी घनदाट वृक्षराजी आहे. मध्येमध्ये लाल, पिवळी ,पांढरी रानफुलं आणि खळाळणारे झरे आपले स्वागत करतात. घाटरस्त्यावरील वाहतूक अगदी शिस्तीत चालली होती. उंचावरच्या चुखा या गावात चहापाण्याला थांबलो. हॉटेलमधून स्वच्छ पाण्याची चुखाचाखू  ही नदी दिसत होती. इथे हैड्रॉलिक पॉवर प्रोजेक्ट आहे. भूतानमध्ये  हैड्रोइलेक्ट्रिक पॉवरची मोठ्या प्रमाणावर निर्मिती व निर्यात होते. ही वीज विकत घेण्यात भारताचा पहिला नंबर आहे.

दिव्यांनी उजळलेल्या राजधानीच्या शहरातील दुमजली उंचीएवढ्या बिल्डिंग्जवर लाकडी महिरपी उठावदार रंगाचे रंगविल्या आहेत. सरकारी नियमांप्रमाणे सर्व इमारती, राजवाडे, मॉनेस्ट्री यांचे बांधकाम पारंपरिक डिझाईन व स्थापत्यशास्त्रानुसार करावे लागते. भूतानमधील बहुतेक लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. सातव्या शतकात तिबेटमधून आलेल्या लामाने इथे बौद्ध धर्माचा प्रसार केला. किंग जिगमे दोरजी वांगचुक यांच्या स्मरणार्थ १९७४ साली उभारलेले मेमोरिअल चार्टेन हा भुतानी स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. या राजाने परंपरा आणि आधुनिकता यांची योग्य सांगड घातली. इतर देशांशी मैत्री जोडली. भूतानला जगाची दारे उघडी करून दिली. म्हणून या राजाबद्दल लोकांमध्ये खूप आदर आहे. स्मारकाच्या ठिकाणी बुद्धाचा खूप मोठा पुतळा आहे. त्याच्या पुढ्यात वाटीसारख्या आकाराची  तुपाची निरांजने तेवत होती. भाविक लांबट- गोल तांब्याची धर्मचक्रे फिरवत होते. त्यावर काही अक्षरे लिहिलेली होती.

चीन ने भेट दिलेली १७० फूट उंचीची ब्राँझची बुद्धमूर्ती(चंचुप्रवेश?) थिम्पू  मधील कुठल्याही ठिकाणांहून दिसते. एका उंच डोंगरावरील या मूर्तीभोवतालचे बांधकाम सुरू होते. तिथून दूरवरच्या हिमालयीन पर्वत रांगा दिसत होत्या.टकीन हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी आहे. बकरीचे तोंड आणि गायीसारखे अंग असलेला हा प्राणी टकीन रिझर्वमध्ये जाऊन पाहिला. तिथेच हातमागावर विशिष्ट प्रकारे कापड विणण्याचे प्रात्यक्षिक पाहिले.या हँडीक्राफ्ट आवारात एक सुंदर शिल्प आहे. एका झाडाखाली उभ्या असलेल्या हत्तीच्या पाठीवर एक माकड बसलेले आहे. माकडाच्या पाठीवर ससा आणि त्याच्या पाठीवर एक पक्षी बसलेला आहे. जमिनीवरील बलाढ्य प्राणी, झाडांवरील प्राणी, बिळात राहणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी ही एकमेकांवर अवलंबून असलेली एक निसर्गसाखळी आहे. या सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने रहाणे, झाडावरील फळे मिळविणे असे जगण्याचे साधे ,सोपे, सरळ तत्वज्ञान यात दडलेले आहे. ही चित्राकृती पुढे अनेक शिल्प, भरतकाम, चित्रकला यात वारंवार दिसत होती. आणखी एक वेगळेपण म्हणजे पुरुष लिंगाचे(Phallus–फेलस) चित्र बिल्डींगच्या, हॉटेलच्या दर्शनी खांबांवर, मॉनेस्ट्रीच्या बाह्य भिंतींवर रेखाटलेले असते व ते शुभ मानले जाते. दुकानात अशी चित्रे,की-चेन्स विकायला असतात. निसर्गातील  सृजनत्वाचे  ते प्रतीक मानले जाते.

हँडीक्राफ्ट स्कूलमध्ये बुद्ध धर्माशी संबंधित अनेक वस्तू, पेंटिंग, १२ तोंडे आणि २४ हात असलेली देवीची मूर्ती होती. विद्यार्थी मूर्तीकाम शिकत होते. हातमागावर विणकाम चालू होते.थिम्पू हेरिटेज म्युझियम व मिनिस्ट्री हाऊस पाहून व्हयू पॉईंटवर गेलो. तिथून दरीतली छोटी घरं आणि छोटासा पिवळसर  रंगाचा राजवाडा चित्रातल्यासारखा दिसत होता. थिम्पूचे एक आगळे वैशिष्ट्य म्हणजे या सबंध शहरात कुठेही ट्रॅफिक लाईट्स ( सिग्नल्स) नाहीत. वाहतूक कमी असली तरी ती अतिशय शिस्तबद्ध असते. एकाच मध्यवर्ती जंक्शनवर थोड्या उंच ठिकाणी बसून, एक पोलीस हातवारे करून वाहतुकीचे नियंत्रण करताना दिसला. आमच्या ड्रायव्हरने सांगितले की सगळीकडे सेन्सर्स बसविलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची वाहतुकीतील बेशिस्त, चुका ड्रायव्हर करीत नाहीत.

भाग-१ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १३ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १३ – भाग ७ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ लक्षद्वीपचा रंगोत्सव – भाग ३ ✈️

या तीनही बेटांवर आम्हाला कावळे सोडून पक्षी दिसले नाहीत. फार थोड्या गाई व कोंबडे दिसले. समुद्रपक्ष्यांच्या एक-दोन जाती मनुष्य वस्ती नसलेल्या पिट्टी बेटावर आहेत असं कळलं. लक्षद्वीप बेटांपैकी बंगाराम,तिनकारा,अगत्ती अशी बेटे परकीय प्रवाशांसाठी राखीव आहेत. तिथे हेलिपॅडची सुविधा आहे. इथल्या गडद निळ्या, स्वच्छ जलाशयातील क्रीडांसाठी,कोरल्स व मासे पाहण्यासाठी परदेशी प्रवाशांचा वाढता ओघ भारताला परकीय चलन मिळवून देतो.

कोरल्स म्हणजे छोटे- छोटे आकारविहीन  समुद्र जीव असतात. समुद्राच्या उथळ, समशीतोष्ण पाण्यात त्यांची निर्मिती होते. हजारो वर्षांपासूनचे असे जीव त्यांच्यातील कॅल्शिअम व एक प्रकारचा चिकट पदार्थ यामुळे कोरल रीफ तयार होतात. ही वाढ फारच मंद असते. या रिफस् मुळेच किनाऱ्यांचं संरक्षण होतं. संशोधकांच्या म्हण़़ण्याप्रमाणे जागतिक तापमानवाढीमुळे आर्टिक्ट व अंटार्टिक यावरील बर्फ वितळत असून त्यामुळे जगभरच्या समुद्रपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. लक्षद्वीप द्वीपसमूहातील बेटं समुद्रसपाटीपासून केवळ एक ते दोन मीटर उंच आहेत. त्यावर डोंगर /पर्वत नाहीत तर पुळणीची वाळू आहे. या द्वीपसमूहातील बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटाचा एक मनुष्य वस्ती नसलेला भाग २०१७ मध्ये समुद्राने गिळंकृत केला. आपल्यासाठी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटविणारा हा  धोक्याचा इशारा आहे.

प्रवासाच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजता आमची बोट कोचीन बंदराला लागणार होती. थोडा निवांतपणा होता. रोजच्यासारखे लवकर आवरून छोट्या बोटीत जाण्याची घाई नव्हती. म्हणून सूर्योदयाची वेळ साधून डेकवर गेलो. राखाडी आकाशाला शेंदरी रंग चढत होता. सृष्टी देवीने हिरव्यागार नारळांचे काठ असलेलं गडद निळं वस्त्र परिधान केलं होतं . उसळणाऱ्या पाण्याच्या लांब निर्‍या करून त्याला पांढऱ्या फेसाची किनार त्या समद्रवसने देवीने  लावली होती.पांढऱ्याशुभ्र वाळूतील  शंख, खेकडे, समुद्रकिडे त्यांच्या छोट्या- छोट्या पायांनी सुबक, रेखीव रांगोळी काढत होते. छोट्या-छोट्या बेटांवर नारळीच्या झाडांचे फ्लाॅवरपॉट सजले होते .अनादि सृष्टीचक्रातील एका नव्या दिवसाची सुरुवात झाली. आभाळाच्या भाळावर सूर्याच्या केशरी गंधाचा टिळा लागला. या अनादिअनंत शाश्वत दृश्याला आम्ही अशाश्वतांनी नतमस्तक होऊन नमस्कार केला.

लक्षद्वीप समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print