सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १४ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग ४ ✈️

भूतानच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे भूतानमध्ये अनोखे जैववैविध्य आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती, बेंगाल टायगर, रेड पांडा, सुसरी- मगरी, रानटी म्हशी, अनेक प्रकारचे दुर्मिळ पक्षी इथे आढळतात. रक्तवर्णी पिजंट, हिमालयीन कावळा म्हणजे रॅवन अशा अनेकांचे दर्शन आम्हाला म्युझियममधील शोकेसमध्ये झाले. या छोट्याशा देशाचा ६० टक्के भाग संरक्षित जंगलांनी व्यापलेला आहे. इथल्या निसर्ग आणि प्राणी संपदेचा अभ्यास करण्यासाठी जगभरचे पर्यावरणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ भूतानला आवर्जून भेट देतात.

बौद्ध हा प्रमुख धर्म असलेल्या भूतानमध्ये लोकशाही पद्धतीचे राज्य असले तरी अजूनही लोकांच्या मनात राजा व राजघराणे यांच्याविषयी कमालीचा आदर व श्रद्धा आहे. मातृसत्ताक पद्धती असल्यामुळे सर्वत्र स्त्री राज्य आहे. प्रत्येक दुकानाच्या काउंटरवर, रेस्टॉरन्टच्या काउंटरवर स्त्रिया असतात. विणकाम, रंगकाम, साफ-सफाई सारी कामे स्त्रिया करतात. पारंपारिक पद्धतीनुसार जमिनीची मालकी कुटुंबातल्या स्त्रीकडे असते. लग्नानंतर पती, पत्नीच्या घरी राहायला येतो व तिला घरकामात मदत करतो. लग्नानंतर पटले नाही तर स्त्री सहजतेने नवऱ्याला घटस्फोट देऊ शकते. त्यामुळे अनेक लग्न, अनेक मुले अशी परिस्थिती असते. पण कुटुंब ,समाज म्हणून त्यांचे जीवन सुखी समाधानी असते. शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींपासून ऑफिसला जाणाऱ्या स्त्री पुरुषांपर्यंत सर्वजण पारंपरिक पेहराव करतात. कमरेपासून पायापर्यंत येणारे, सुंदर उठावदार डिझाइन्स व उजळ रंग असणारे लुंगी सारखे वस्त्र व त्यावर लांब हाताचे जाकीट अशा स्त्रियांच्या पोशाखाला किरा असे म्हणतात. पुरुषांचा ‘घो’ हा पोशाख गुडघ्यापर्यंत असतो .ते कातडी तळव्यांचे गुडघ्याइतके उंच बूट वापरतात.

भूतानी लोक बिनदुधाचा, मीठ घातलेला चहा पितात. त्याला सुजा म्हणतात. एकूणच भूतानी लोकांचे सपक जेवण आपल्या पसंतीस उतरत नाही. लाल, जाडसर तांदुळाचा भात आणि याकचे चीज गुंडाळून तळलेल्या मिरच्या आमच्या फारशा पचनी पडल्या नाहीत. डेझर्ट या जेवणानंतरच्या प्रकाराला भूतानमध्ये स्थान नाही. इथे सर्वत्र धूम्रपान बंदी आहे. सार्वजनिक स्वच्छता काटेकोरपणे जपली जाते. सगळे रस्ते चकाचक असतात. परंपरा, कला आणि धर्म यांची जोपासना कटाक्षाने केली जाते. भारतीय प्रवाशांना वेगळा व्हिसा घ्यावा लागत नाही. आपले निवडणूक ओळखपत्र पुरेसे होते. नूलटूम हे त्यांचे चलन भारतीय रुपयाशी जोडलेले आहे. त्यामुळे आपले रुपये सहज स्वीकारले जातात. धनुर्विद्या इथला राष्ट्रीय खेळ आहे. फुटबाल लोकप्रिय आहे आणि आता हळूहळू क्रिकेटचे वेडही आले आहे. हिमालयीन नद्यांच्या सुपीक खोऱ्यात भात, सफरचंद, अननस, संत्री यांचे उत्पादन होते. ॲल्युमिनियम, सिलिकॉन, जिप्सम, वीज यांची निर्यात होते. पर्यटन व्यवसाय वाढत आहे. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा विनामूल्य आहे.

भूतान हा आनंदी, समाधानी लोकांचा देश समजला जातो. देशाची प्रगती ग्रास डोमेस्टिक प्रॉडक्टवर न मोजता ती ग्रास  नॅशनल हॅपिनेसवर मोजायची असा निर्णय भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांनी घेतला. भौतिक सुविधा व आत्मिक समाधान यांची योग्य सांगड घातली तर लोक सुखी होतील, आधुनिक सुधारणा अमलात आणायच्या पण देशाचे पाश्र्चात्यीकरण करायचे नाही असे हे धोरण आहे. उच्चशिक्षणासाठी परदेशी गेलेले तरुण मातृभूमीच्या ओढीने परत येतात. पण आता भूतान संथगतीने बदलत आहे. बाहेरच्या जगाची चव चाखलेली तरुणाई अनेक प्रश्न आणि मागण्या घेऊन उभी आहे. रात्री इथल्या डिस्कोथेकमध्ये, पबमध्ये तरुणाईचा आवाज घुमतो.कानठळ्या बसविणारे संगीत व पाश्चात्य वेशात नाचणारी तरुणाई असते. सिगारेटच्या धुराने ,मदिरेने डिस्कोथेक भरून जातात. ज्याप्रमाणे आपल्या तरुणाईला आता जुन्या काळात जगायला आवडणार नाही तसंच भुतानच्या तरुणाईला आचार, विचार, पोशाख यांचे आधुनिकीकरण हवे आहे. विकासाची गती अधिक हवी आहे. सर्वांचे ड्रेस सारखे असले तरी गरीब-श्रीमंत ही दरी तिथे आहेच! सारे जग प्रचंड गतीने बदलत असताना, फार काळ भूतान सुधारणांचे वारे पर्वतरांगाआड थोपवून धरू शकेल असं वाटत नाही.

 भूतान समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments