श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “माझा (शालेय) इतिहास…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

माझा (शालेय) इतिहास…

माझा इतिहास असायचे कारण नाही. तो भूतकाळ आहे. पण इतिहास म्हटले की वजन येते. त्यामुळे हा कालखंड म्हणजे माझा इतिहास.

(माझ्या मतानुसार चांगल्या परिस्थितीत चांगले काम करणाऱ्यांचे नांव होते, तर विपरीत परिस्थितीत चांगले करणारा इतिहास घडवतो. माझे नांव पण नाही, मी इतिहास देखील घडवला नाही. पण फक्त इतिहास म्हटले की वजन येते म्हणून शालेय इतिहास इतकेच.)

इतिहास म्हटले की व्यक्ती, लढाई, संघर्ष, हुकूमशाही, बंड, अन्याय, अत्याचार असेच आणि बरेच डोळ्यासमोर येते.

माझ्या शालेय इतिहासात असे खूप काही नाही. माझ्यावर अन्याय झाला नाही. मी बंड देखील केले नाही. किंवा मशाली आणि पलित्याखाली (रस्त्यावरच्या दिव्याखाली) अभ्यास देखील केला नाही.

पण लढाई, संघर्ष, आणि पालक व शिक्षकांची संयुक्त  हुकूमशाही काही प्रमाणात होती. माझ्या लोकशाहीची काहीप्रमाणात मुस्कटदाबी झाली होती. मुस्कटदाबी यासाठी की मी काय शिकावे यांचे स्वातंत्र्य मला नव्हते. युती, आघाडी असे शब्द मला तेव्हा माहीत नव्हते. किंवा समजले नव्हते. नाही तर पालक, शिक्षक, संस्थाचालक यांची आघाडी असे म्हटले असते किंवा माझी आणि इंग्रजीची युती भल्या पहाटे Good morning बरोबर (शपथ घेऊन) सुरू झाली, आणि Good night बरोबरच (राजीनामा देत) अवघ्या काही दिवसांत किंवा तासांतच तुटली, संपुष्टात असे सांगितले असते. ही युती तुटण्यासाठी कुठलीही (घड्याळाची) वेळ कारणीभूत नव्हती, किंवा कोणाचाही हात त्यात नव्हता. पण शपथ घेतांना आणि राजीनामा देतांना धनुष्यातून बाण सुटला,  अथवा सोडला होता हे नक्की. (बाण सुटला की परत घेता येत नाही, दुसराच घ्यावा लागतो.)

इतिहासात आक्रमणं झालीत. तशी माझ्या शालेय जीवनात आक्रमणे होती. (याला परिक्षा म्हणत असत.) पण ही समजण्यासाठी मला हेर ठेवायची गरज नव्हती. आक्रमणे गनिमी कावा किंवा मी बेसावध असताना झाली नव्हती.

या आक्रमणाची (परीक्षांची) रितसर सूचना यायची. सूचना अगदी शके XXXX, माहे फाल्गुन शुद्ध दशमी ते फाल्गुन कृष्ण पंचमी अशी नसली तरी, यात इंग्रजी महिना तारीख, वार, वेळ, विषय यांचा उल्लेख असायचा. अचानक वार होत नव्हते. थोडक्यात शत्रू दिलदार होता.

ही  आक्रमणे ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळेतच व्हायची. एका वर्षाच्या कालावधीत लहानमोठी मिळून साधारण सहा आक्रमणे असायची. (यात दोन चाचणी, एक सहामाही, परत दोन चाचणी, आणि एक वार्षिक परीक्षा असा क्रम देखील ठरलेला असायचा.)

पाचवी ते दहावी असा महत्वाचा आणि उमेदीचा काळ समजला तरी सहा वर्षे आणि प्रत्येक वर्षात चार अशा एकूण पंचवीस (दहावीत आक्रमणाला तोंड देण्याची पुर्वतयारी म्हणून एक सराव परीक्षा घेत असत.) आक्रमणे झाली. काही आक्रमणे मी तह करून थांबवली. हे तह तोंडी होते. (यालाच तोंडी परीक्षा असे नांव होते. शिक्षकांच्या लेखी याला कमी महत्त्व असावे. कारण त्यांचा भर लेखी परीक्षेवर असायचा, तसे ते तोंडी सांगत असत.)

या आक्रमणांना तोंड मी दिले होते. पण माझ्यावर (ओरडून) तोंडसुख मात्र घरच्यांनी घेतले होते. कारण…… मार्क कमी मिळाले हेच होते. पण तोंडी परीक्षेत माझा (तोंडाचा) दाणपट्टा बऱ्यापैकी फिरायचा.

या आक्रमणाची सूचना घरच्यांना देखील असायची. त्यामुळे त्या काळातल्या माझ्या हालचालींवर त्यांची बारीक नजर असायची. माझी रणनिती काही प्रमाणात तेच ठरवायचे. दहावीत तर तयारी जय्यत होती.

इतिहासात शिकायला, वाचायला, तह, वेढा, स्वकियांची मदत, रसद पुरवठा असेही काही होते. पण याचा अनुभव शेवटी म्हणजे दहावीच्या आक्रमणावेळी अनुभवला. तो देखील सोबत असणाऱ्या इतरांच्या बाबतीत.

एकतर या दहावीच्या आक्रमणाला  परक्या मुलुखात तोंड (दुसऱ्या शाळेत) द्यायचे होते. माझ्या सारखेच अनेक अशा आक्रमणाला तोंड देण्यासाठी आले होते. त्या मुलखाला शत्रू सैन्याचा (पोलिसांचा) वेढा असायचा. तो वेढा भेदून काही स्वकिय (दोस्तराष्ट्र) रसद पुरवण्याची पराकाष्ठा करत असल्याचे मी पाहिले होते. (याला काॅपी पुरवणे असे म्हणत असत. थोडक्यात काॅपीमुक्त अभियानाला देखील इतिहास आहे असे म्हणावे लागेल.) पण खूप कमी जणांना रसद पुरवता येत होती. काही वेळा रसद यायची, पण योग्य ठिकाणी पोहचायची नाही. कारण वेढा सक्त असायचा. (त्यावेळी फितुरीचे प्रमाण कमी होते असे म्हणावे लागेल.)

या आक्रमणात वापरली जाणारी शस्त्र म्हणजे पेन, पेन्सिल, रबर, पट्टी यांची जय्यत तयारी असायची. नि:शस्त्र होण्याची वेळ कधीच आली नाही.

जवळपास सगळ्याच आक्रमणात माझा विजय झाला असला तरी त्याचा विजयोत्सव साजरा करण्याइतका तो दैदिप्यमान कधीच नव्हता.

पाचवी ते दहावी सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रात आमचे शिक्षण झाल्याने या दोन्ही सत्रात शिकवणारे जवळपास सगळेच शिक्षक माझे कमी अधिक प्रमाणात गुरू होतेच. किंवा सगळ्या शिक्षकांना गुरुस्थानी मानण्याचा तो काळ होता. असे सांगायचे कारण…..

हल्ली इतिहास घडवणाऱ्या व्यक्तिंच्या गुरू बाबत देखील बऱ्याच उलटसुलट चर्चा रंगतात. काही त्यात रंग भरण्याचेच काम करतात. पण माझा इतिहास दैदिप्यमान नसल्याने अशा चर्चा घडत नाहीत, घडणार देखील नाही. कदाचित तू खरेच माझा विद्यार्थी होता का? असा प्रश्न एखादा गुरु मलाच करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा या माझ्या शालेय इतिहासातील काही दस्तऐवज (शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका) आजही माझ्या जवळ आहेत. त्याची आता खूप गरज नसली तरी ते दस्तऐवज मी सांभाळून ठेवले आहेत. (पण ते माझ्या पुढच्या पिढीला मी दाखवत नाही.)

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments