सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? विविधा  

☆ फाल्गुनातील चैत्रविलास… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

निसर्गात ऋतूंचा रंगलेला बहारदार खेळ पाहिला कि अचंबित व्हायला होतं. तसेच बाराही महिने एकामेकात एखादा गोफ विणावा तसे ते अलगद एकत्र गुंफलेले असतात. एक महिना या निसर्गातून आपला निरोप घेण्यापूर्वीच नवीन  महिन्याला आमंत्रित करतो. खुलेआम त्याचे स्वागत करतो.

तसाच फाल्गुनही याला अपवाद कसा असेल? या महिन्यात उन्हाळ्याची तलखी असतेच पण मधूनच वाऱ्याच्या सुखदशा लहरी स्पर्शतात आणि मनाला आनंद देतात. या महिन्यात सृष्टीला प्रणयाची बाधा झालेली असते. पक्षीवर्गात ही प्रणयातूरता जाणवते. पक्ष्यांच्या स्वरातील माधुर्य अधिकच गहिरे होते. त्यांचे स्वर अधिक मंजूळ होतात. चिमण्या, कावळे, साळुंख्या अशा सर्व पक्ष्यांच्या सूरांत ही मधुरता असते. एक उत्कटता साऱ्या निसर्गात असते. मधूनच मृगजळांचे भास होतात. प्रणयार्त पक्षीही किती संयमी असतात. हा गुण घेण्यासारखा आहे मानवाने. शांत दुपार हे फाल्गुनाचे आणि एक वैशिष्ट्य आहे. यावेळी आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी मनात रुंजी घालत असतात.  बाहेर उन्हाचा तडाखा वाढत असतो. पण बाहेर पक्ष्यांच्या मधुरवाने मनात आनंद निर्मिती होते. उन्हाचा ताव, मनी आठव पिंगा आणि पक्ष्यांचा मधुरव अशी ही सरमिसळ या फाल्गून दुपारी असते.

फाल्गुन पौर्णिमेच्या दरम्यान निसर्गातील रंगपंचमी अगदी भराला आलेली असते. पळस तर फुलून लालकेशरी साज लेवून नटलेला आहे. त्यात मोहरी च्या फुलांचा गर्दपिवळा रंग, झाडावेलींवरील पालवीच्या अनेकविध छटा हा रंगोत्सवच ना? म्हणूनच श्रीहरी गोपगोपींसह, राधेसह होलिकोत्सव साजरा करून रंगांमध्ये न्हाऊन निघत असेल. साऱ्या जगताला समानतेची शिकवण अशाच कृतीतून भगवंत देत असतो. अथांग प्रेम देणारा हा फाल्गुन मास आहे. आत्यंतिक प्रणय आणि आत्यंतिक विरह असा दुर्मिळ संगम फाल्गुन मासातअसतो. वातावरणात तरुवेलींची सुकलेली पाने गळतात. पानगळ हाच शिशिराचा स्थायीभाव असतो. पण फाल्गुनातच साऱ्या वृक्ष वेलींवर नाजूक पालवी फुटू लागते. असं वाटतं कि फाल्गुन मास आतुरतेने आपल्या चैत्र सख्याची वाट पहात असतो.

उन्हाने भाजणाऱ्या झाडा-वेलींना मायेने कुरवाळत हा हसरा फाल्गुन नवपालवीची शुभवार्ता सांगत असतो. फाल्गुन सख्याच्या अंतरीची हाक चैत्रसख्याला ऐकू येते. मग अलगद निसर्गात, इथेतिथे पानोपानी चैत्राच्या चाहूल खुणा खुणावू लागतात. वनराणी जणु आपल्या जवळील हिरव्या रंगाच्या हिरवट, पोपटी गर्द शेवाळी, पिवळसर सोनेरी राजवर्खी रंगाची मुक्तहस्ते उधळण करू लागते. मग तरु-लतांवर ही रंगल्याली नाजूक  पालवी वाऱ्यावर लवलव करु लागते. शिरीष, पिंपळ आदि वृक्ष ही नाजूक पालवीचे सजतात.       

फाल्गुन महिन्यात खऱ्या अर्थाने चैत्रही धरेवर अवतरतो. यावेळी फाल्गुन आणि चैत्र अगदी हातात हात घालून सज्ज असतात कारण ऋतूराजाच्या आगमनाची जय्यत तयारी त्यांना करायची असते. कळ्याफुलांना, तरुवेलींना, नभातील चंद्र तारकांना,अगदी वातलहरींना ही हा सांगावा द्यायचा असतो. आंब्याच्या मोहोराचा, कडुलिंबाच्या फुलोऱ्याचा मस्त गंध वातावरणात दरवळत असतो. पक्षीही पंख फडफडत आनंदाने गगनात उंच भऱ्याऱ्या घेतात आणि त्याबरोबरच नरपक्षी माद्यांना आमंत्रित करण्यात मशगुल असतात. फाल्गुनाचा चैत्रविलास असा रंगलेला असतो.

हळूहळू फाल्गुनाची निरोपाची घडी जवळ आलेली असते. पण आपला उत्साह, आपले चिरतारुण्य तो हसतमुखाने आपल्या चैत्रसख्याकडे सुपूर्द करतो. ह्या निरोपावेळी करुण वातावरणात सुध्दा फाल्गुनाचे निर्मळ हास्य मिसळते आणि चैत्रही आनंदी बनतो. दोघांच्या गळामिठीची साक्षीदार ही सारी सृष्टी असते. आता फाल्गुन तर निरोप घेतो पण चैत्र मास मन घट्ट करून निसर्गाशी एकरूप होऊन जातो. या मधुमासाचा गोडवा किती वर्णावा! चैत्रमास हा ‘वसंताचा आत्मा’च. त्यामुळे या महिन्यात कोकिळ  मदमस्त ताना घेतो. आम्रतरुवर आता मोहोरातून बाळकैऱ्या डोकावू लागतात. सोनचाफा, पांढरा चाफा, लाल चाफा फुलतात. त्यांच्या सुगंधात जाई, जुई, मोगरा, मदनबाण यांचे गंध मिसळून साऱ्या परिसरात गंधमळे फुलल्याची जाणीव वातलहरी करून देतात. कमलिनीच्या मिठीत भ्रमर मत्त होतात. पळसाबरोबर पांगारा, सावरी, फुलतात. वनराई पुष्पवैभव दिमाखात मिरवत असते. चैत्रपालवी नी फुले यांची रानभूल पडते. पक्षी मीलनोत्सुक असतात. कुठे घरटीही दिसू लागतात व लांबट, वाटोळी, चपटी … साऱ्या निसर्गात वासंतिक सोहळा रंगलला पाहून चैत्र खुलतो, गाली हसतो…

फाल्गुनाच्या रंगोत्सवी

चैत्रविलास हा रंगला

पानोपानी, पक्षांच्या कंठी

चैत्र  रुणझुण नादावला|

 

सांज क्षितीजावर असे

चित्रशिल्प भुलवितसे

अवनीवर वासंतिक

उत्सव गंधभरा सजलासे|

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments