सौ शालिनी जोशी
विविधा
☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ७ – संत वेणाबाई ☆ सौ शालिनी जोशी ☆
समर्थ रामदासांनी जिला आपली कन्या मानलं त्या समर्थ शिष्या वेणाबाई. या कोल्हापूरचे गोपजी गोसावी देशपांडे यांची कन्या होत्या. जन्म सोळाशे सालचा. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे वयाच्या आठव्या वर्षी मिरजेच्या देशपांडे यांच्या मुलाबरोबर त्यांचा विवाह झाला. पण अल्पावधीतच त्यांच्यावरती वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. भाग्यवशात लिहिता वाचता येत होते. घरातले काम आणि गीताभागवतादी ग्रंथ हेच आपले सर्वस्व मानून वाचन चिंतनात वेणाबाई सासरी विवेकाने काळ घालवू लागल्या.
बारा वर्षांच्या वेणाबाई अंगणात तुळशी वृंदावनाजवळ बसून पोथी वाचनात घडून गेल्या होत्या. एवढ्यात खड्या आवाजातला एक श्लोक आणि त्या पाठोपाठ ‘जय जय रघुवीर समर्थ’ असा जयजयकार त्यांच्या कानावर पडला. झटकन उठून त्यासमोर पाहू लागल्या तेव्हा,
ब्रह्मचारी सुत्र शिखा l पाई शोभती पादुका l
कटी अडबंद कौपिन l कंठी तुळसीमणिभूषण l
दिव्य मुख दिव्य नेत्र lभाळी आवाळू सुंदर l
असं पुढे कालांतराने ज्यांचं वर्णन वेणाबाईंनी केलं, अशी एक तेजस्वी मूर्ती त्यांना समोर दिसली. हे समर्थ रामदास हे त्यांनी ओळखलं. कारण वेणाबाईंचे आई-वडील रामदासांचे अनुग्रही होते आणि रामदासांच्या विषयी त्यांच्याकडून वेणाबाईनी ऐकले होते. वेणाबाईना पाहताच रामदास मात्र चरकले. वेणाबाईंचे बालवैधव्य त्यांच्या लक्षात आले. समर्थांनी त्यांच्याकडे दुधाची भिक्षा मागितली. पण सासूबाईंनी परवानगी दिली नाही. समर्थांना विन्मुख पाठवल्याच्या दुःखाने त्या व्याकुळ झाल्या. समर्थांच्या दर्शनाची ओढ त्यांना लागली.
वेणाबाई तुळशीवृंदावनाजवळ भागवत वाचत बसल्या असता पुन्हा एकदा समर्थ भिक्षेसाठी आले. वेणाबाईंची चौकशी करून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन समर्थांनी केले. पुढे वेणाबाई माहेरी कोल्हापूरला गेल्या असता, आई-वडिलांच्या बरोबर समर्थांच्या कीर्तनाला जात असत. वेणाबाई त्यात तल्लीन होऊन जात. एके दिवशी समर्थांच्या पायावर डोके ठेवून वेणाबहिनी अनुग्रहाची विनंती केली. करुणाकर रामदासांनी त्यांना मंत्र उपदेश दिला. पण समाजाला हे पटलं नाही. ‘विधवा स्वैर झाली’ असा आरडा ओरडा करत घरातल्यांना दोष द्यायला लोकांनी सुरुवात केली. आई-वडिलांनी गुरुभक्ती सोडण्यास वेणाबाईंना सांगितले. पण वेणाबाईनी त्यांना उत्तर दिलं,
कोणी वंदिती, कोणी निंदिती l वास मी त्यांची पाहीना l
हृदयी धरिले सद्गुरु चरण l प्राणांतीहि विसंबेना l
‘देह माझे मन माझे l सर्व नेले गुरू राजे l’ अशी त्यांची अवस्था झाली होती. जननिंदेला उधाण आले. असह्य होऊन आई-वडिलांनी मुलीला विष प्यायला देऊन कोंडून ठेवले. समर्थ कृपेने त्यानी विष पचवून दाखवले.
यानंतर मात्र वेणाबाईनी आप्तेष्टांचा संबंध तोडला. समर्थांच्या शिष्य शाखेत दाखल झाल्या. मठातील उपहाराची व्यवस्था पाहण्याचे काम त्यां च्याकडे आले. त्याचबरोबर कीर्तन, पुराणे, प्रवचने ऐकणे तसेच स्वाध्याय व तपाचरण यांचा अभ्यास सुरू होताच. त्यांना काव्यरचना ही स्फूरू लागली. भक्ती, ज्ञान, वैराग्य ही समर्थांनी सांगितलेली महंतलक्षणे वेणाबाईंच्या अंगी बाणली.
मिरजेच्या मठाचे धुरीणत्व समर्थांनी वेणाबाईंकडे दिले(१६५६). २२ वर्षे त्यांनी ते कुशलतेने सांभाळले. आदराने त्यांना वेणास्वामी म्हटले जाते. समर्थांनी त्यांना कीर्तनाची परवानगी दिली. त्याकाळी विधवेचे कीर्तन अशुभ मानले जाई. समर्थ स्वतःच कीर्तन ऐकायला बसत. समर्थांच्या इतर शिष्यांना कीर्तनाचा अधिकार मिळाला नाही. समर्थांच्या सहवासात वेणाबाईंचे लेखन वाचन वाढले. समर्थांची लेखनशैली त्यांनी उचलली. वेणाबाईंच्या लेखनात विविधता आहे. रसाळपणा, साधेपणा, बारकावे टिपण्याचे सामर्थ्य आहे. अभंग, श्लोक, आरत्या याचबरोबर रामकथा त्यांनी वेगवेगळ्या रंगात रंगवली. उपदेश रहस्य, कौल, पंचीकरण, सिंहासन, सीतास्वयंवर, श्रीरामगुह संवाद, रामायणाची पाच कांडे इत्यादी त्यांचे साहित्य अर्थनिर्भर व भावनिर्भर आहे. उदाहरणार्थ त्यांचे ‘कौल’ हे काव्य. राम वनवासातून परत आल्यावर, प्रजा मागणी मागते आणि लक्ष्मण ते लिहून घेतो असा तो प्रसंग,
भूमीने कदा पीक सांडू नये रे l वदे राम लक्ष्मणा लिहिरे l
मनासारखे मेघवृष्टीने व्हावे l जया पाहिजे ते प्रसंगी पडावे l
****
मनाची अपेक्षा, पुरे बैल गाडे l घरी दुभती कामधेनूच पाडे l
अशाप्रकारे केवळ भक्तीत रमून न जाता समाजाच्या इच्छाच त्यांनी व्यक्त केल्या. छत्रपतींची गरीब रयत त्यांच्या डोळ्यासमोर असावी.
एकदा चाफळच्या उत्सवाच्या तयारीची सर्व जबाबदारी समर्थांनी वेणाबाईंवर टाकली. उत्सवाच्या १५ दिवस आधी वेणाबाई तापाने फणफणल्या. त्यांनी श्रीरामाची करुणा भाकली. रामापुर्तीच्या डोळ्यात अश्रू आले. रामाबाई नावाची कोणी एक स्त्री बत्तीसशिराळ्याहून मदतीसाठी हजर झाली. तिने समर्थांचे नाव सांगितले. हे समर्थांना समजते तेव्हा खरा प्रकार उलगडला. प्रत्यक्ष रामाने स्री रूपात येऊन मदत केली होती.
वेणाबाईंची प्रकृती नाजूक होती. त्यांना आता पैलतीर दिसू लागला. त्या मिरजेहून सज्जनगडावर आल्या. ‘ स्वामी मला आता आज्ञा द्या’ असा धोसा लावला. सज्जनगडावरील रामनवमीचा उत्सव तृप्त मनानं त्यानी पाहिला. चार वाजता वेणाबाई कीर्तनासाठी उभ्या राहिल्या. समर्थांसह सर्वजण देहभान हरपून भक्ती रसात गुंतले होते. कीर्तन झालं. आरती झाली. वेणाबाईनी वीणा सद्गुरूंच्या हाती दिली. त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवले. ‘आता माहेरा जावे’ हे समर्थांचे शब्द कानी पडतात ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणत वेणाबाई खाली कोसळल्या. चैत्र वैद्य चतुर्दशी शके १६७८. सर्व संगपरित्याग केलेल्या त्या विवेकी वैराग्याचे अंत:करण कातर झाले. त्यांच्या समाधीच्या ठिकाणी चंपक वृक्ष उगवला. त्याची फुले समर्थ पूजेसाठी घेत असत. वेणाबाईंच्या अलौकिक जीवनकार्याची साक्ष देत आज एक दगडी वृंदावन तेथे उभे आहे. धन्य त्या वेणाबाई.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈