श्री श्रीनिवास गोडसे
विविधा
☆ “ळ कार…” भाग – २ ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆
(एक मे…मराठी राजभाषा दिनानिमित्त)
(पृथ्वीला निळावंती म्हटले जाते तसेच पुष्कळा ही म्हटले जाते व्यवसायात माळी, साळी, गवळी, गोंधळी या शब्दात ळ येतोच)
आडनावांची यादी केली तर वेगळाच लेख होईल एवढी प्रचंड आडनावे वेगवेगळी गावे या ळ ने व्यापली आहेत.
अगदी देवघरात डोकावलो तरी शंखाळे, टाळ, चिपळी, माळ, जपमाळ, त्रिशूळ, दीपमाळ, महाळुंग, महाळसा, म्हाळसाकांत, काळभैरव, मूळपीठ, मूळपुरुष दागिने पहा मळसूत्र, मंगळसूत्र, जोंधळीपोत, मुक्ताफळ, मोहनमाळ वेळापत्रकात भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, तिन्हीत्रिकाळ, दीर्घकाळ, आकाळ, दुष्काळ, सुकाळ, येरवाळी आहेत। कामाचा मोबदला देताना येणाऱ्या गोष्टीत या गोष्टी बघा ना आणणावळ, करणावळ, खानावळ, खोदणावळ, घडणावळ, चाळणावळ, जळणावळ, जेवणावळ, धुणावळ, राखणावळ.
याशिवाय खळबळ खळखळ, मळमळ, जळजळ, भळाभळा यासारखी अनेक क्रियाविशेषणे खुप आहेत
गदिमांनी रचलेले घननिळा लडिवाळा… पहिल्यांदा आले आहेच
पण खास किशोर कुमार यांच्या करिता शांताराम नांदगावकरांनी रचलेले ळ विरहित एकमेव गाणे म्हणजे
अश्विनी येss नाss
जगु कसा तुझ्याविना मी राणी ग ?
या ळ विरहित असल्याने किशोर कुमार यांना ते म्हणणे खूप सहज झाले आणि मराठीत असलेले त्यांचे हे एकमेव गाणे, खूप गाजले
आपल्या चार वेदांत ऋग्वेद हा सर्वात जुना व मोठा वेद आहे या वेदाची सुरुवातच
ओम अग्नीमिळे पुरहित, यज्ञस्य देव बुद्धिजम
अशी आहे
यातही ळ ने आपले स्थान मिळवले आहे.
वेदांचा काळ हा इसवीसन पूर्व 4000 वर्षे सांगितला जातो म्हणजे आजपासून सहा हजार वर्षांपूर्वी देखील ळ चे अस्तित्व होते आणि ते प्रगत होते.
उच्चार शास्त्रात मात्र ळ चा उच्चार अग्निमेड़े पुरोहितम असा केला गेला.
मगाशी लिहिल्याप्रमाणे ळ चे अस्तित्व अनेक भाषेत जरी असले तरी मराठीत त्याचा वापर सर्वोच्च असावा असा तर्क आहे. मराठी चे वेगळेपण, सौष्ठव, ओळख यात ळ चा बराच वाटा आहे. यासाठी संशोधनाला खूप वाव आहे.
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की गुगल चा कळफलक पण हिंदी साठी अ चा प्रतिनिधी म्हणून वापर करतो तर मराठी साठी ळ चा प्रतिनिधी म्हणून वापर करतो…
‘एवढा अढळ ळ’ पण त्यांने सगळ्यांच्या बरोबर राहून प्रत्येकाला गोड स्वरूप दिले. मात्र स्वतः एकही शब्द स्वतःची सुरुवात होण्याने तयार केला नाही. हेच या नम्र अक्षराचे विशेष मला खूप आवडले
हा ळ मला ईश्वर स्वरूपच भासला
सगळ्यात आहे आणि कशातच स्वतःला महत्त्व घेतले नाही अगदी अलिप्त…
या लेखाला नाव देताना मात्र अचानक ळकार हे नाव मनात चमकून गेले आणि म्हणूनच ही ळकारा ची योजना
वाचनात गोडी रहावी म्हणून इच्छा असूनही ळ चे अनेक शब्द असून ते घेतले नाहीत… काही विषय वाचकांवर सोडून द्यायचे असतात तसा हा विषय मी आपणावर सोडून देत आहे…
संत ज्ञानेश्वर आणि संत रामदास यांना ळ विषयी खूप प्रेम आहे. उकाराबरोबरच ळ चा खूप वापर त्यांनी आपल्या लेखनात सुंदरता आणि गोडवा आणण्याकरीता केलेला आहे
ज्ञानेश्वरांनी केलेला ळ चा वापर पहा
पसायदान :-
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
अभंग :-
चंदनाची चोळी ।
माझें सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी ।
वेगीं भेटवा कां ॥३॥
*
सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।
पोळे आगिसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥
समर्थांनी केलेला ळ चा वापर पहा
गणेश स्तवन दासबोध:-
नाना सुगंध परिमळें| थबथबा गळती गंडस्थळें |
तेथें आलीं षट्पदकुळें| झुंकारशब्दें ||११||
*
मुर्डीव शुंडादंड सरळे| शोभे अभिनव आवाळें |
लंबित अधर तिक्षण गळे| क्षणक्ष्णा मंदसत्वी ||१२||
श्री राम आरती:-
मस्तकी मुकुट किरीटी तेजाळ |
झळझळ झळकती कीळा भासे कल्लोळ ||
मकराकृती कुंडले रत्ने सुढाळ|
कस्तुरी केशर सुंदर भाळी परिमळ || २ ||
कासे कसिला पीतांबर पिवळा |
चरण कमळी रूळे वृंदाची माळा ||
घननीळ तनु सुंदररूपे सावळा |
रामदास वंदी चरणांबुज कमळा || ५ ||
श्री हनुमान आरती :-
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ||
शिवरायांना लिहिलेले पत्र:-
आचारशीळ विचारशीळ। दानशीळ धर्मशीळ।
सर्वज्ञपणें सुशीळ। सकळा ठाई।।
*
या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।
खूप लिहावेसे वाटते पण विस्तार भयास्तव इथेच थांबणे इष्ट. नाही तर लेख खूप अघळपघळ झाला असता.
अभिजात मराठीच्या फक्त जपण्याने थांबून चालणार नाही. शब्दांची भर पण घालायला हवी. आपली भाषा समृद्ध करायला हवी.
हिंदीच्या टेंभ्या पुढे, दिवटी पुढे मराठीची ही समई मनाच्या देवघरात जपून ठेवूया, तेवत ठेवूया.
© श्री श्रीनिवास गोडसे
इचलकरंजी, मो – 9850434741 shrinivasgodse@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈