मराठी साहित्य – विविधा ☆ “सन्मानाने मरणाचा हक्क…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सन्मानाने मरणाचा हक्क…☆ श्री जगदीश काबरे ☆

कितीही कटू वाटले तरी एक सत्य आपण स्वीकारले पाहिजे की, जीवन कितीही प्रवाही आणि अमर वाटत असले तरी त्याचा एक अविष्कार म्हणजे आपण मानव पूर्णतः मर्त्य आहोत. आपल्या जगण्याच्या धडपडीचा अविष्कार पुनर्जन्म नसून प्रजनन आहे. आपण माणूस म्हणून एकसंध नसून आपले शरीर हे विविध अवयवांनी बनलेल्या पेशींचा समूह आहे, त्या पेशी ज्या समान गुणसूत्रांनी संचालित होतात, त्या गुणसूत्रांचेच मूर्त रूप आपले शरीर असते. सर्व पेशी त्या गुणसूत्रांच्या एकेक अक्षराबरहुकून वागत असतात, त्या सूक्ष्म पेशींचा एकत्रित भव्य आविष्कार म्हणजे शरीर असते. शरीराचे अवयव म्हणजे मी नाही. पण सजीव शरीर तर मी आहे! घराचे छप्पर घर नसते, घराची फरशी घर नसते, घराच्या भिंती घर नसते, पण ह्या सर्वांनी मिळून घर तयार होते. तसे शरीरसुदधा! फरक येवढाच की, बाहेरून वस्तू आणून माणूस घर बनवतो तर शरीर आतूनच बाहेर वाढत जाते. या शरीरातील हृदयाची धडधड थांबणे म्हणजेच मृत्यू होय. जीवनाची असोशी आणि मृत्यूचे भय माणसाच्या मनात सतत असल्यामुळे माणसाने मृत्यूनंतरचे जीवन कल्पीले आणि वेदनारहित अमर आत्म्याचा जन्म झाला.

असा आत्मा अस्तित्वात नसल्यामुळे वास्तवात शरीर जर्जर झाले असेल तर त्याचा त्रास माणसाला होतो. अशा वेळेस घरातील जवळच्या सुहृद नातेवाईकांनाही त्याचा त्रास होत असतोच. पण बरेचदा आपलेपणाने तर कधी कर्तव्य बुद्धीने ते सगळे सहन करत असतात. जीवनभर स्वावलंबी जगल्यानंतर शेवटच्या काळात परावलंबी होणे हे कोणत्याही स्वाभिमानी माणसाला दुःखदायकच वाटत असते. अशावेळेला त्याने जर इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली तर ते चूक कसे ठरेल? पण अजूनही आपल्याकडे इच्छामरण म्हणजे आत्महत्या असे समजण्यात येते. म्हणून व्याधीग्रस्त माणसाला मरणाची वाट बघत व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. हा सहानुभूतीच्या नावाखाली रुग्णाला जिवंतपणे मरणयातना देणारा अनुभव क्रूरपणाचा नाही का?

हे लक्षात घेऊन न्यायालयाने वैद्यकीय इच्छापत्राला मान्यता दिली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. आता जबाबदारी वाढते ती इच्छामरणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांची. जर एखाद्याने इच्छापत्रात ‘विशिष्ट उपचारानंतर मला शांतपणे मरू द्यावे’, असे म्हटले असेल तर त्याचा सन्मानाने मारण्याचा हक्क आपण मान्य करायला हवा. माणसाला सन्मानाने जगायला हवे असते तसेच सन्मानाने मरायलाही. पण या कायद्यामुळे आत्महत्याही कायदेशीर होईल आणि या कायद्याचा गैरवापर पैसाअडक्यासाठी केला जाईल, अशी भीती बाळगणे म्हणजे नदीला केव्हातरी मोठा पूर येईल आणि आपण त्यात बुडून वाहून जाऊ; म्हणून नदीकाठी घर बांधणे चुकीचे असे समजण्यासारखे आहे. कारण प्रत्येक कायदा हा दुधारी शास्त्रासारखा असतो. त्याचा वापर विधायक करावा की विघातक हे शेवटी आपल्यावर अवलंबून असते.

एवंच आजच्या धकाधकीच्या जीवनात जर एखाद्याने आयुष्य पूर्णपणे उपभोगले असेल आणि शेवटच्या काळात व्याधीग्रस्त होऊन खितपत मरण येण्यापेक्षा जर त्याने इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली असेल तर त्याला सन्मानाने मरण्याचा हक्क मिळाला पाहिजे. असेही मरणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करणे हे धर्मसंमत आहेच. तेव्हा आता शासकीय आणि सामाजिक पातळीवर न्यायालयाच्या या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे मला वाटते. तुम्हाला?🤔

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओळख परिचय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ओळख परिचय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

एखाद्या कार्यक्रमात प्रमुख किंवा आमंत्रित व्यक्तींची ओळख करून देताना त्या ओळखीत काही चांगल्या गोष्टीच अपेक्षित असतात. अगदी तसा नियम नसला तरीही. पण अति उत्साहात काही गोष्टी घडतात.

एका फुटबॉल सामन्याच्या उद्घाटनाला एका राजकिय नेत्याला बोलवल होत. त्यांची ओळख पुढिल प्रकारे करण्यात आली.

या महाशयांची जशी ओळख आहे तसा हा माणूस नाहिच. आणि जसा हा माणूस आहे तसं यांना कोणीही ओळखत नाही. आपली खरी ओळख जाणिवपूर्वक लपवण्यात ते आजपर्यंत यशस्वी झाले आहेत. व पुढेही यशस्वी होतील.

या सामन्याच्या उद्घाटनाला जे महाशय बोलवले आहेत त्यांचा राजकिय प्रवास आणि फुटबॉल यांचा जवळचा संबंध आहे. खेळावे कसे हे त्यांना माहित नसले तरी तुडवले कसे जाते याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.

कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरुवात केल्यापासून आज नावाला येईपर्यंत (खरंतर नावारुपाला असंच म्हणणार होतो. पण त्यांच्याकडे पाहून फक्त नावाला येईपर्यंत असच म्हणतो.) पक्षातीलच वेगवेगळ्या मान्यवरांनी वेळोवेळी त्यांना व्यवस्थित तुडवले आहे.

आपल्याच पक्षात आपली प्रचंड घुसमट होत आहे असं त्यांना पदोपदी वाटत असल्यानेच त्यांनी चारपाच वेळा वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला. पण हा पक्षप्रवेश सोहळा म्हणून कधीच झाला नाही. फुटबॉल मध्ये जस पास देतांना झालेल्या चुकीमुळे तो सहज प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या पायात जातो, तसेच हे पक्षातील लोकांच्या चुकीमुळेच दुसऱ्या पक्षाच्या पायावर पोहोचले. प्रतिस्पर्धी असलेल्या काही थोड्याच लोकांनी यांना पायात घेण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला असेल. थोडक्यात त्यांना तुडवतांना झालेल्या चुकीमुळे ते प्रत्येकवेळी दुसऱ्या पक्षात (पायाशी) गेले.

फुटबॉल, जस प्रत्येकाला तो आपल्या पायात असावा असं वाटत असलं तरी त्याला समोरच्याच्या जाळ्यात टाकण्यासाठीच धडपड असते तशीच धडपड यांच्या आयुष्यात आली आहे. कितीदा तरी यांना जाळ्यात ढकलण्याचा मनापासून आणि जोर लाऊन प्रयत्न झाला.

फुटबाॅलच्या मैदानात त्याला हात लागला की फाऊल असतो, त्याच पध्दतीने कोणत्याही परिस्थितीत आपला हात सगळ्यांनीच यांच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी डोक्याच्या वापर केला, पण हात लांब ठेवला. हात दाखवून अवलक्षण याच धर्तीवर हात लावून अवलक्षण कोणालाही नको होतं.

फुटबॉल मध्ये जसं काही चुका मुद्दाम केल्यातर यलो किंवा रेड कार्ड दाखवून एक प्रकारची तंबी दिली जाते, तशाच यांना वेगवेगळ्या नोटीस देऊन तंबी देण्यात आली आहे.

आज स्पर्धेच उद्घाटन करतांना तुडवण्यात काय मजा असते, याचा आनंद त्यांना घेता येईल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि यांचा परिचय थांबवून त्यांना मनोगत व्यक्त करायला बोलवतो…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भय… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆

सौ. ज्योती विलास जोशी

अल्प परिचय

शिक्षण – बी.एस.सी. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हाॅस्पिटल मॅनेजमेंट.

छंद:—

ऑइल पेंटिंग, गायन, वादन.

आकाशवाणीवरील ‘ऐसी अक्षरे रसिके’ या कार्यक्रमात ललितबंधिंचे सादरीकरण व अभिवाचन.

? विविधा ?

☆ भय… ☆ सौ. ज्योती विलास जोशी 

जगात शुभंकराकडं जसं मन आकृष्ट होतं, तसंच भयंकराचं देखील वेगळं आकर्षण आहे. लहानपणापासूनच शिस्तीचा बडगा ठेवत प्रथम बाऊची आणि नंतर बागुलबुवाची भीती दाखवली जाते. या भीतीनं मनाचा एक कप्पा व्यापला जातो. लहान मुलं रडता रडता आपण कशासाठी रडत होतो हे विसरतात. त्यांच्या डोळ्याचे रांजण कोरडे पडतात. आवाजाची तान शिथिल होते, पण मायेची माणसं जवळ असल्याने अपेक्षा मात्र पूर्ण होते हे नक्की…. वय वाढेल तसं भीती एक मानसिकता होते. मनाला जाणवणारी संवेदना असते ती. अनाठाई भीतीनं विचारांचे पंख कापले जातात. भीतीनं कापरं भरलेलं मन, ‘सिदन्ती मम गात्राणी मुखम् च परिशुष्यते’ अशी तक्रार करायला सुरुवात करतं. मन पुट पुटायला लागतं ‘भय इथले संपत नाही. ‘ भयानक हा स्थायीभाव असणारा हा रस नवरसातला एक… जणू लाव्हाच!

आयुष्याला एक शिस्त असावी म्हणून माणसाने देव, धर्म, नियमावली, जाती, समाजमान्यता या भयांना जन्माला घातलं. मुकपणे पाहणाऱ्या या निसर्गाला देखील माणूस खाऊ की गिळू असं करू लागला. म्हणूनही ही बंधने असावीत. हास्य रस हा केवळ मनुष्य प्राण्यात स्त्रवतो परंतु भयरस मात्र समस्त प्राणिमात्रात दिसून येतो. साहित्यसृष्टीही या रसाने व्यापून गेली आहे. केवळ भयकथा लिहिणारे लेखक प्रसिद्ध आहेत. चित्रपट सृष्टीतील भयपटांचा एक चाहतावर्ग आहे. मृत्यू, सूड, खून, मारामारी, रक्तरंजित कथा यांचे सिनेमे पाहणारा एक प्रेक्षक वर्ग आहे. ‘भुताचा पिक्चर सुपरहिट’ हे समीकरण बनलंय. आताशा माणसं भुतांना घाबरत नाहीत. ती स्वतःच चालती-बोलती भूतं झालीत. माणूसच माणसाला घाबरायला लागलाय. पूर्वी भुतं तरंगायची पण आता माणसंच हवेत असतात. त्यांचेच पाय जमिनीला लागत नाहीत. ती स्वतः भूतं झालीत. मारामाऱ्या, युद्ध, मृत्यु, खून, सूड यांची शस्त्र घेऊन ही भूतं पृथ्वीवर नंगा नाच करू लागलीत. त्यांच्यावर इलाज करणारा यांत्रिक बोलवायला हवा. ही भूतं निसर्गालाही डिवचतात. त्यानं निसर्गाचाही कोप होतो. निसर्गाची प्रतिक्रिया म्हणून पाझरलेला भयरस तर अति दाहक! आताशा नवरसातून निर्माण झालेले राग, द्वेष, त्वेष, मत्सर, लालसा, अहंकार यांची भूतं मनाच्या रंगमंचावर नंगानाच करू लागली. आयुर्वेदात भयज्वर भयअतिसार अशा रोगांवर भयचिकित्सा सुरू झाली आहे आहे हे आपल्या संस्कृतीचं दुर्दैव आहे..

मोठे होऊ तसं बाऊ गेला… बागुलबुवा गेला. नंतर आला करोना नावाचा गब्बर सिंग! ! जो डर गया वो मर गया असं म्हणून थैमान घालू लागला. भितीची अनेक रूपं दाखवू लागला. भीतीतून अस्वस्थता वाढू लागली आणि अनामिक विचारांना मोकाट वाव मिळाला. आणि मग उत्तराऐवजी नवीन प्रश्नच निर्माण झाले. समाजाच्या अवहेलनेची भीती, जिथे जिथे आपण जोडले गेलोय तो जोड तुटण्याची भीती. आर्थिक विपन्नतेची भिती अपयशाची, अज्ञानाची, अज्ञाताची, निर्णय चुकल्याची अशा अनेक भीतीने जीव ग्रासून गेलाय.

जीवन आव्हानांचा सागर आहे त्याकडे कसं पाहायचं लढून म्हणजेच फाईट करून की पळून जाऊन म्हणजे फ्लाईट घेऊन की फ्राईट होऊन म्हणजे थिजून हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. तेव्हा कुठे हा भयरस आटेल.. आणि तो मनकंपनास कारणीभूत होणार नाही…

©  सौ ज्योती विलास जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५५ ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र– ताईच्या साऱ्या यातनांची, तिच्या मनाच्या तळात सुरू असणाऱ्या उलघालीची केशवरावांइतकीच माझी आईसुद्धा एक महत्वपूर्ण साक्षीदार होतीच. अर्थात पुढे तिचं तिथं असणंच माझ्या मनात निर्माण झालेल्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरं शोधण्यास मला माझ्याही नकळत सहाय्यभूत ठरणार आहेत याची शक्यता मात्र त्याक्षणी मला जाणवलेली नव्हती एवढं खरं!)

अतिशय प्रेमाने, कर्तव्य भावनेने आम्ही दिलेले पैसे आमच्या भावनांचा विचार करून, आम्हाला बरं वाटावं म्हणून तरी ताईनं घ्यायला हवे होते, असेच मला वाटत असे. पण हे वाटणं किती चुकीचं, एकांगी विचार करणारं, ताईवर अन्याय करणारं होतं हे आईच्याच बोलण्यातून एकदा मला स्वच्छ जाणवलं.

असंच एक दिवस आई सांगत होती, “अरे तुम्ही सद्भावनेने दिलेले पैसे घेणंही ती नाकारते म्हणून किती वाईट वाटायचं तुला. पण तुम्हा सर्वांच्या पैशाचं कांहीच नाही. त्याही पुढचं सांगते.

‘माझ्या नवऱ्याच्या निवृत्तीनंतर आलेल्या पैशावर माझा एकटीचाच अधिकार कसा?’ असं म्हणायची ती. या विचारानेही ती सतत खंतावत असायची. मला खूप वाईट वाटायचं. मी परोपरीने तिला समजवायची. पण तिची समजूतच पटायची नाही. ‘अगं तुझे भाऊ आपण होऊन, मदत म्हणून देतायत तुला तर घेत कां नाहीस? प्रत्येकवेळी नको कां म्हणतेस?’ असं मी तिला एकदा म्हंटलं तर म्हणाली, ‘ आई, एकदा घेतले ना तर ती सुरुवात ठरेल. मग त्याला शेवट नाही. आमच्या मुलांना आम्ही कांही फार मोठी इस्टेट ठेवणार नाही आहोत, मग त्यांना कर्जंतरी का म्हणून ठेवायची?’

‘अगं, कर्ज म्हणून ते कुठं देतायत ? ते कुणीच दिलेले पैसे परत मागणार नाहीयेत ‘

‘ त्यांनी नाही मागितले तरी परत द्यायला नकोत? माझ्या भावांनी तरी ते पैसे कष्ट करूनच मिळवलेत ना? मग? मी त्यांची मोठी बहीण असून त्यांना कधीच काहीच देऊ शकले नाही, मग त्यांच्याकडून घेऊ कशी? नको आई. ते मला नाही आवडणार. परमेश्वर देईल तेच फक्त माझं. “

ताई गेल्यानंतर पुढे कितीतरी दिवस तिच्याच संदर्भातलं हे असंच सगळं आईच्या मनात रूतून बसलेलं होतं. त्या आठवणींमधलं ‘परमेश्वर देईल तेच फक्त माझं’ हे ताईचं एक वाक्य पुढे घडून गेलेल्या आक्रितामागचा कार्यकारणभाव सामावून घेणारं आणि म्हणूनच अतिशय महत्वाचं होतं हे आईच्या बोलण्यातूनच मला जाणवलं, ते ताईला लाॅटरीचं बक्षिस लागल्याचं समजल्यानंतर! कारण त्यासंदर्भात माझ्या मनात निर्माण झालेल्या सगळ्याच प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरं देणारंच ते वाक्य होतं! ! त्यातला शब्द न् शब्द पुढे माझ्या ताईच्या सात्विक कणखरपणाचं प्रतीक जसा तसाच तिने अतूट श्रध्देने प्राप्त केलेला तिचा परमेश्वरावरील अधिकार सिध्द करणाराही ठरला! !

” तू भाऊबीजेला आला होतास तो प्रसंग आठवतोय ना तुला?” एकदा बोलता बोलता आईनं विचारलं.

” हो. त्याचं काय?”

“तो प्रसंगच निमित्त झालाय पुढच्या सगळ्याला.. “

” म्हणजे?”

“भाऊबीजेदिवशी तुला रिक्षापर्यंत पोचवून केशवराव घरी परत आले ना तेव्हा त्यांना तू काय म्हणालास हे तुझी ताई खोदून खोदून विचारत राहिली. बराच वेळ त्यांनी सांगायचं टाळलं तेव्हा खनपटीलाच बसली. शेवटी त्यांना ते सांगावंच लागलं. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मला खूप बरं वाटलं. तुम्ही सगळी भावंडं एकमेकांना धरून असल्याचं पाहून मला तुम्हा सर्वांचं खरंच खूप कौतुक वाटलं. पण तुझी ताई? ते सगळं ऐकून ती मात्र खूप अस्वस्थ झाली. केशवरावांचं बोलणं संपलं, तसं आतल्या आत घुसमटत रडत राहिली. आम्ही तिला ‘काय झालं’, असं विचारलं, समजावलं तेव्हा तिने नकारार्थी मान हलवली. डोळे पुसले. भिंतीचा आधार घेत उठायचा प्रयत्न करू लागली. मी तिला सावरायला पुढे येईपर्यंत ती भिंतीच्या आधाराने स्वतःला सावरत आत देवघरापर्यंत आली. देवापुढे निरांजन लावलंन् आणि तशीच अलगद डोळे मिटून देवापुढं बसून राहिली. मी तोवर आत येऊन तिचं अंथरूण, पांघरूण झटकून नीट केलं आणि सहज डोकावून पाहिलं तर अजूनही तल्लीन अवस्थेत ती देवापुढे बसून होती! पुढचं दृश्य पाहून मी चरकलेच. तिच्या मिटल्या डोळ्यातून अश्रूंची धार लागलेली,.. चेहरा गदगदत होता, चेहऱ्यावरची नस न् नस थरथरत होती..! .. मी लगबगीने पुढे धावले. तिला उठवायला हात लावणार, तेवढ्यात आत आलेल्या केशवरावांनी मला थांबवलं. ‘तिला थोडावेळ बसू दे… बरं वाटेल.. ‘ हलक्या आवाजात ते म्हणाले.

 थोड्या वेळाने ती शांत झाली. एकाग्रतेने नमस्कार करून शांतपणे डोळे उघडले. पदराने चेहरा खसखसून पुसला. आधारासाठी हात पुढे केला आणि उठली. आत जाऊन पडून राहिली. मग तिने केशवरावांना हाक मारून बोलावून घेतलं.

‘तुम्ही मला नेहमी तुला काय हवं, असं विचारता ना? मोकळेपणाने सांग, मी आणून देईन असं म्हणता. हो ना? आज मी सांगणाराय. जे सांगेन ते ऐकायचं. मागेन ते मला आणून द्यायचं.. ‘ ती म्हणाली.

केशवरावांनी तत्परतेने ‘सांग, काय हवंय.. ?’ असं विचारलं.

‘आज बुधवार आहे. उद्या गुरुवार. उद्यापासून दर गुरुवारी मला पाच रुपयांचं महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट आणून द्यायचं’

‘लॉटरीचं तिकिट? भलतंच काय?’

‘यात भलतंसलतं काय आहे? मला हवंय. ‘

‘अगं पण कां? कशासाठी?’

‘ते योग्य वेळ आली कीं सांगेन. मी आजपर्यंत इतक्या वर्षात हट्टानं कांही मागितलंय कां तुमच्याकडं? नाही ना? आज मी सांगतेय म्हणून ऐकायचं. बाकी दुसरं मला काहीही नकोय.. ‘

ती म्हणाली होती.

तिला पाच लाखांचं बक्षीस लागलं तो तिसरा गुरुवार होता.. “

आई सांगत होती. तिचा प्रत्येक शब्द मला अधिकच बुचकळ्यांत टाकणारा होता.

“बक्षीस लागल्यानंतर ताईची प्रतिक्रिया काय होती?”

“खूप आनंद झाला होता तिला. हे सगळं कां.. कसं घडलं याचा उलगडा भारावलेल्या अवस्थेत ती स्वतःच जेव्हा बोलली तेव्हा झाला. तुझं आणि केशवरावांचं बोलणं तिला समजलं तेव्हा जणू कांही आपला केविलवाणा भविष्यकाळ तिला अस्वस्थ करू लागला होता. आपल्या या आजारपणात नवऱ्याचे फंड/ग्रॅच्युइटीचे सगळे पैसे संपून जाणार हे तिला स्पष्टपणे दिसत होतंच. ते संपले की कुणाकडून तरी पैसे मागावे लागणारच हे तिला तीव्रतेने जाणवलंही, पण तेच तिला मान्य नव्हतं. त्या अस्वस्थतेत तिने त्यादिवशी देवासमोर बसून गजानन महाराजांना साकडं घातलं होतं..!

‘माझ्या नवऱ्याने रात्रंदिवस जागून आणि कष्ट करून ४० वर्ष राबल्यानंतर त्याला जे पैसे मिळालेत त्यावर माझा एकटीचाच अधिकार कसा?’ हा तिचा प्रश्न होता! ‘ते सगळे पैसे माझ्या औषधपाण्यांत संपल्यानंतर माझ्या नवऱ्याने त्याच्या म्हातारपणात आपल्या मुलांच्या संसारात एखाद्या आश्रितासारखं कां म्हणून पडून रहायचं? मला माझ्या स्वतःसाठी तुमच्याकडं काहीही मागायचं नाहीय. नशिबाने माझ्या पदरात टाकलेले हे भोग मला मान्य आहेत. पण कृपा करून तुम्ही माझ्या या घरातली ही आर्थिक लूट थांबवा. त्या बदल्यात माझं हे यातनामय आयुष्य चार सहा महिने वाढवा हवं तर. माझे सगळे भोग, यातना, दु:ख.. तोंडातून ब्र ही न काढता मी निमूट सहन करेन. पण मी अखेरचा श्वास घेईन, तेव्हा माझ्या नवऱ्याने घाम गाळून मिळवलेले साडेतीन लाख रुपये जसेच्या तसे त्याच्याजवळ शिल्लक रहायला हवेत… ‘

ही गजानन महाराजांसमोर तिने मांडलेली तिची कैफियत होती! आणि.. आणि.. महाराजांनी तिचं गा-हाणं ऐकलं होतं…! “

आईच्या तोंडून हे ऐकताना सरसरून काटा आला होता माझ्या अंगावर! आणि त्याच क्षणी हे ‘गजानन महाराज’ कोण हे जाणून घ्यायची उत्कट इच्छाही माझ्या मनात निर्माण झाली होती! !

‘तू स्वतःच एकदा वेळ काढून ही पोथी वाच म्हणजे तुला नीट समजेल गजानन महाराज कोण ते.. ‘ असं माझी ताईच एकदा मला म्हणाली होती आणि आता ते जाणून घ्यायची प्रेरणा द्यायलाही माझी ताईच अशी निमित्त झाली होती!

पुढच्या सगळ्या शोधाचा त्या दिशेने सुरू झालेला माझा प्रवास आणि त्या प्रवासवाटेवर आलेले अनुभव माझ्या ताईच्या जाण्याच्या दुःखाचं सांत्वन करणारे होतेच आणि अलौकिक आनंदाच्या स्पर्शाने मला कृतार्थ करणारेही! ! त्या अनुभवांचा माझ्या अंतर्मनाला झालेला स्पर्श हा माझ्या आठवणींमधला अतिशय महत्त्वाचा तितकाच मोलाचा ठेवा आहे!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हनुमंत आमुची कुळवल्ली… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ हनुमंत आमुची कुळवल्ली ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

(हनुमान जयंती निमित्त एक लेख)

।श्रीराम। रामायणात हनुमंताची भूमिका फार मोलाची राहिली आहे. रामाच्या कार्यात अग्रभागी आणि अतितत्पर कोण असेल तर तो एकमेव हनुमंत किंवा हनुमान. हनुमंताच्या अंगी अनेक गुण होते आणि त्याचा उपयोग त्याने कधीही स्वतःसाठी केला नाही तर तो केला फक्त एका रामासाठी. हनुमंताच्या रामभक्तीच्या अनेक कथा प्रसिध्द आहेत. बुद्धीवंतामध्ये वरिष्ठ, अतिचपल, कार्यतत्पर, कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य, संभाषण चतुर, उत्तम सेवक, सर्व शक्तिमान, (बुद्धी आणि शक्ती एकत्र असणं अतिदुर्मिळ!) असे हनुमंताचे अनेक गुण सांगितले जातात. रामायणात वर्णन केल्याप्रमाणे हनुमंताची आणि रामाची भेट तशी उशिरा म्हणजे सिताहरण झाल्या नंतरची आहे. पण पहिल्या भेटीतच हनुमंताचे वाक्चातुर्य पाहून प्रभू श्रीराम प्रसन्न झाले तसेच प्रथमच रामाचे दर्शन होऊन हनुमंत रामाचा कायमचा दास झाला. जिवाशिवाचे मिलन झाल्याचा तो अमृतक्षण होता. पण एकदा रामाची भेट झाल्यावर मात्र हनुमंतानी कधीच रामास अंतर दिले नाही. तो रामाचा एकनिष्ठ सेवक बनला. आपल्या असामान्य आणि अतुलनीय भक्तीने हनुमंताने नुसते देवत्व (रामतत्व) प्राप्त केले नाही तर जिथे जिथे रामाची पूजा केली जाते तिथे हनुमंताची पूजा व्हायला लागली. रामाचे अनंत भक्त आहेत पण राम पंचायतनात मात्र फक्त हनुमंताचा समावेश आहे. आज सुद्धा जिथे जिथे रामकथा ऐकली जाते, सांगितली जाते तिथे तिथे हनुमंतासाठी मानाचे आसन ठेवलेले असते.

पूर्वी आपल्याकडे अध्ययन आणि अध्यापन हे मौखिक पद्धतीने म्हणजे पाठांतर रूपानेही केले जात असे. लिखीत स्वरूपात अध्ययनाची पद्धती त्यामानाने अलीकडील आहे. याचा एक दुष्परिणाम असा झाला की बराचसा इतिहास आपल्याकडे लिहिला गेला नाही आणि जो लिहिला गेला तो परकीय प्रवाशांनी किंवा आक्रमकांनी. स्वाभाविकपणे तो त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला. त्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांनी लिहिल्या. यातून एक गैरसमज पसरविला गेला की रामायणात जे वानर होते ते (व्वा!) नर नसून ती फक्त ‘माकडं’ होती. ही आपल्या पराक्रमी आणि विजयी इतिहासाची जगाने केलेली क्रूर चेष्टा आहे, असेच म्हणावे लागेल. रामायणात असे वर्णन आहे की किष्किंधा राज्य हे सुग्रीवाच्या अधिपत्याखाली होते. त्या राज्याचा सेनापती होता केसरी. आणि ह्या केसरीचा पुत्र हनुमंत. सध्याची दक्षिणेकडील चार राज्यं म्हणजे त्याकाळातील किष्किंधानगरी. सात मजली सोन्याचे महाल असल्याचे वर्णन रामायणात आहे. आजच्या काळात एखाद्या राज्याच्या मंत्र्याची संपत्ती किती असते आपल्याला कल्पना आहे, मग या चार एकत्रित राज्याचा सेनापती किती श्रीमंत असेल. असा हा भावी सेनापती हनुमंत रामाचा दास होतो, नुसता कागदोपत्री दास न होता तो कायमचा रामदास होतो यातच त्याच्या भक्तीचे ‘मर्म’ सामावले आहे.

हारुद्र जे मारुती रामदास।
कलीमाजि जे जाहले रामदास।।

असे ज्याचे वर्णन करण्यात येते ते समर्थ रामदास यांना सुरुवातीपासूनच हनुमंताबद्दल तीव्र ओढ, श्रद्धा, भक्ती होती. प्रभुश्रीरामानी दृष्टांत दिल्यापासून समर्थानी ‘समर्थ’ होईपर्यंत आणि पुढे कार्यसमाप्तीपर्यंत हनुमंताची अखंडित साधना केली. त्याचे यथायोग्य परिणाम आपण शीवकाळात अनुभवले.

शक्तीने मिळती राज्ये। शक्ती नसता विपन्नता।।

यासमर्थ वचनाची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. तो काळ मोगलांच्या आक्रमणाचा होता. टोळधाड यायची, घरावर नांगर फिरवला जायचा, आपलीच माणसे क्षुल्लक ‘वतनां’साठी, जहागीरीसाठी आपल्याच माणसांना मारायची. स्वाभिमान नष्ट झाला होता, समाजाला एक प्रकारचे सामूहिक नपुंसकत्व प्राप्त झाले होते. समाज आपले शौर्य, वीर्य, धेर्य विसरला होता. कोणीतरी ह्या सर्वावर बसलेली काजळी झटकण्याची गरज होती. अशा अस्वस्थ मनाचा अभ्यास करून समर्थानी हनुमंताची मंदिरे स्थापन करून बलोपासनेस सुरुवात केली. तरुण बलवान व्हायला लागले आणि विविध मठांतून शक्ती आणि बुद्धियुक्त असे नवीन तरुण घडू लागले आणि त्याचा उपयोग छत्रपतींना स्वराज्य स्थापनेसाठी झाला.

रामदास स्वामीनी पूर्ण विचार करून आपल्या आराध्य देवतेची निवड केली. आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा खुपच पुरातन आहे. शिष्य साधनेतून इतका ‘तयार’ होतो की शिष्याचे नुसते विचार बदलत नाहीत तर त्याची कुडी सुद्धा गुरुसारखी किंवा उपास्यदेवतेसारखी होते. आपला समाज हनुमंतासारखा बलवान, बुद्धिमान, सर्वगुंणसंपन्न व्हावा म्हणून हनुमंताची मंदिरे आणि मठ स्थापन करण्यात आले. उपास्य देवतेची निवड करतानाही समर्थांनी कोंदंडधारी रामाची निवड केलेली आहे. आपल्या पत्नीला रावणाने पळवून नेल्यावर रामाने आयोध्येला निरोप पाठवून सैन्य मागविले नाही, तर स्वतः उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीच्या आधारे, तेथील सामान्य मनुष्यांच्या (वानराच्या) साह्याने लंकेवर स्वारी करून आपल्या पत्नीला सोडवून आणले. ह्यासर्व कार्यात हनुमंत एकनिष्ठेने रामकार्यात कटिबद्ध होता. हनुमंताने जेंव्हा सिताशोधनासाठी लंकेत गेला, सितामाईला भेटला आणि म्हणाला की तुम्ही माझ्या सोबत चला, मी आपल्या मुलासमान आहे, आपण माझ्या माताच आहात. पण ती पतिव्रता म्हणाली की स्वतः प्रभू राम इथे येतील, ज्याने मला पळवून आणले त्याचा नाश करतील तेंव्हाच मी त्यांच्या सोबत येईन. ह्याला म्हणतात निष्ठा! 

अशा या हनुमंताची समर्थांनी उपासना केली आणि समाजाकडून कडून करवून घेतली. त्याकाळात रूढ झालेल्या क्षुद्र देवतांची पूजा, उपासना समर्थांनी बंद पाडली आणि तीही हनुमंताची उपासना सुरु करून. योग्य असा पर्याय उपलब्ध करून समर्थानी समाजाच्यातील भक्तीला आणि शक्तीला जागृत केले. ‘आधी केलं आणि मग सांगितले’ या उक्तीस जागून स्वतः समर्थ रोज एक हजार सूर्य नमस्कार घालायचे. त्या काळात आणि आज सुद्धा स्वतः व्यायाम करणारा संत पाहायला मिळणं हे दुर्मिळच! . समाजाची दुखरी नस काय आहे हे जाणून त्यानुसार उपचार करण्याचं काम समर्थानी केलं. एखाद्या मनुष्याला साधना करून मुक्ती मिळण्यापेक्षा संपूर्ण समाज एक पायरी उन्नत झाला तर ती प्रगती जास्त चांगली, हे सूत्र उरात ठेऊन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समर्थानी अवघे जीवन खर्च केले. स्वतः लौकिक अर्थाने कधीही प्रपंच न करणारा हा रामदासी संतपुरुष लोकांनी ‘प्रपंच नेटका करावा’ असे सांगत होता. प्रपंच नेटका करण्यासाठी काय करावे लागेल हे सुद्धा त्यांनी सूत्रबद्ध रीतीने दासबोधात लिहून ठेवलेआहे.

सर्वसामान्य मनुष्य (समाजपुरुष) हा लहान मुलाप्रमाणे वागतो. तो आदर्श जीवन जगायचं प्रयत्न करेलच असे नाही पण तो लहान मूलाप्रमाणे अनुकरणशील मात्र नक्कीच असतो. एखादया लहान मुलांचे वडील सैनिक असतील तर त्या लहान मुलास आपण सैनिक व्हावेसे वाटते, एखाद्याचे वडील डॉक्टर असतील तर त्याला आपण डॉक्टर व्हावेसे वाटते. हे अगदी स्वाभाविक आहे. त्या मूलासमोर जो आदर्श प्रस्तुत केला जातो, तसे होण्याचा ते मूल प्रयत्न करतं, म्हणून समर्थांनी समाजापुढे हनुमंत हा आदर्शांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून प्रस्तुत केला. हनुमंताचा आणिक एक विशेष गुण आहे. हा हनुमंत उपजत देव म्हणून जन्माला आलेला नाही, तर आपल्या भक्तीने, नराचा नारायण व्हावा त्याप्रमाणे भगवंताची (रामाची) नित्य सेवा करून देवत्वास पोचलेला आहे. हनुमंत कर्तव्यतत्पर, प्रयत्नवादी आहे. व. पु. काळे म्हणतात त्याप्रमाणे मोटर सायकल वरून प्रभात फेरफटका (morning walk) करणाऱ्यांना हनुमंत कधीच उमगणार नाही. सर्व सैन्याला खांद्यावर बसवून लंकेत नेणं हनुमंताला अवघड नव्हतं, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत होण्यासाठी त्याला लढायला लावणं जास्त गरजेचं होतं आणि म्हणून सर्व वानरांच्या साह्याने रामसेतू बांधून लंकेत जाऊन युद्धात रावणांचा पराभव करून, त्याला मारून रामानी सितामाईला परत आणली.

आपल्या कुळातील पूर्वजांची माहिती कोणी आपल्याला विचारली तर आपण फारतर तीन किंवा चार पिढ्यांची नावे सांगू, पण त्या आधीच्या पिढ्यांची नावे सांगता येतीलच असे नाही, पण आपण हनुमंताच्या कुळातले आहोत, रामकृष्णाच्या वंशातले आहोत, छत्रपतींच्या वंशातले आहोत, असं नुसतं म्हटलं तरी आपले रक्त तापते, छाती गर्वाने फुगते आणि आपल्या अंगात आपसूक वीरश्री संचारते. ज्यांना आपला इतिहास वैभवशाली होता हे माहित असतं त्यांचा भविष्यकाळ सुद्धा उज्ज्वल असतो अशा प्रकारचे एक वचन आहे. आपल्या बाबतीत ते नितांत खरे आहे. जिजाबाईंनी शिवबाला रामायणातील, महाभारतातील विजयाचा इतिहास शिकविला, अन्याय सहन करायचा नसतो, तर त्याविरुद्ध लढून न्याय मिळवायचा असतो हे शिकविले आणि मग चार इस्लामी पातशाह्यांच्या छाताडावर उभे राहून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

आज आपण आपल्या मुलांना हिंदुस्थानच्या पराजयाच्या आणि युरोपीय देशांच्या विजयाचा इतिहास शिकवीत आहोत, त्यामुळे आपली तरुण पिढी परकीय देशांच्या विकासासाठी परदेशी जात आहे, आपण सर्वच बाबतीत त्याचे अंधानुकरण करीत आहोत. आपण जन्माने हिंदू आणि आचरणाने ख्रिश्चन/मुस्लिम बनत आहोत. ह्याला एकाच कारण आहे ते म्हणजे आपण आपलो ‘कुळवल्ली’ विसरलो आहोत किंवा जाणीवपुर्वक विसरले जावी म्हणून समाजात विविध दुष्ट शक्ती कार्यरत आहेत. आपण वेळीच सावधान होण्याची गरज आहे. लौकिक अर्थाने परंपरा न पाळता जरा जागरूक राहून, ‘धर्म’ सजगतेने समजावून घेऊन आचरणात आणण्याची गरज आहे. छत्रपती जन्माला येतीलही पण त्याआधी मावळे मात्र आपल्याला आपल्या घरातच घडवावे लागतील. असे आपण करू शकलो किंवा प्रयत्न चालू केला तर हनुमंत आमुची कुळवल्ली असे म्हणून घेण्यास आपण पात्र होऊ.

।जय जय रघुवीर समर्थ।
।श्रीराम।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लग्नात आईकडून मिळणारा बाळकृष्ण… ☆ सौ. वृषाली सहस्रबुद्धे ☆

सौ. वृषाली सहस्रबुद्धे

ओळख माझी

नाव – सौ. वृषाली आनंद सहस्रबुद्धे

शिक्षण – एम्. एस्‌सी. (गणित), बी. एड्.

वाचनाव्यतिरीक्त इतर छंद – विणकाम, पर्यटन, शिकवणे, शास्त्रीय संगीत ऐकणे, नाटक व चित्रपट बघणे.

वृत्तपत्रातून कविता, लेख, प्रवासवर्णन, चित्रपट समीक्षा प्रकाशित झालेल्या आहेत.

? विविधा ?

लग्नात आईकडून मिळणारा बाळकृष्ण… ☆ सौ. वृषाली सहस्रबुद्धे 

रामजन्मभूमीचा विवाद संपुष्टात आल्यानंतर आता कृष्णजन्मभूमीचाही विवाद संपविणार अशा बातम्या येत असतानाच एक लेख वाचनात आला. त्या लेखकाला कुणीतरी “तुला राम हवा की कृष्ण?’ असा प्रश्न विचारला होता. त्याने उत्तरात त्याला राम आणि कृष्ण दोघंही हवेत असं सांगून राम हवा असण्याची आणि कृष्ण हवा असण्याची कारणे विस्तृतपणे विशद केली होती. लेख तर छानच होता. पण तो वाचून एक प्रश्न पडला की जर राम आणि कृष्ण दोघंही आमच्यासाठी आवश्यक आहेत तर घरोघरी मूर्तिस्वरूपात जसा बाळकृष्ण असतो तसा राम का नसतो? दोघंही खरं तर विष्णूचेच अवतार ना!!

मग राम राजा म्हणून आपण त्याच्यापुढे आदराने फक्त नतमस्तक होतो, पण त्याला आपला जवळचा मित्र मानत नाही आणि कृष्ण, जो कधीच राजा झाला नाही, तो त्याच्या खोडकर, हसऱ्या स्वभावामुळे आपल्याला खूप जवळचा वाटतो असं तर काही नाही ना? अचानक मग लक्षात आलं की बाळकृष्ण तर आपण माहेरहून घेऊन येतो. मुलीची सासरी पाठवणी करते वेळी सगळ्यात शेवटी आई मुलीच्या हातात चूपचाप बाळकृष्णाची गुडघ्यावर बसलेली मूर्ती देते. मला वाटतं कृष्णाचे विविध पैलू याला कारणीभूत आहेत.

लग्न झाल्यानंतर मुलगी माहेरचं सारं काही: घरदार, आईवडील, आनंदाने जगलेली नाती, जमविलेले आणि जपलेले मित्र-मैत्रिणी या सगळ्यांना; मागे सोडून जाते. सासरी गेल्यावरही या सगळ्यांची आठवण तिला येणारच असते. पण फक्त या आठवणींमध्ये रमून तिने तिच्या सासरच्या कर्तव्यात चूक करणे, त्यांना पुरेसा वेळ न देणे, त्यांना काय हवं नको ते न पाहणे हे अयोग्यच असते. आणि आपल्याला काहीही सोडून द्यावं लागलं तरी चालेल, पण कर्तव्यात कसूर होता कामा नये हे कृष्णापेक्षा जास्त चांगलं कोण सांगणार? तो जितकं काही मागे सोडत कर्तव्य करत पुढे गेला तितकं कुणीही केलं नाही. जन्म झाल्या झाल्या आईवडील सुटले, जिथे बालपण गेलं ते गोकुळ मागे राहिलं, राधेला विसरावं लागलं, पुढे मथुरा, द्वारका सगळं काही कर्तव्यासाठी सुटत गेलं, पण त्यांच्या मोहपाशात न अडकता तो त्याचं काम अगदी अचूकपणे करत गेला. हेच तर प्रत्येक आई आपल्या मुलीला शिकवत असते ना कायम! म्हणूनच माहेरच्या मोहात अडकून राहून तू तुझ्या कर्तव्यात कसूर करू नकोस असंच कदाचित आई मुलीला बाळकृष्ण देऊन समजावून सांगत असावी.

कृष्णाचा आणखी एक ठळक पैलू आहे तो म्हणजे प्रेमाचा – अशरीरी आणि शरीरी दोन्ही. तो चांगला पुत्र, भ्राता तर आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे तो एक अत्यंत चांगला सखा आहे. स्त्री-पुरुष मैत्रीचा उद्गाता आहे. त्याखातर सखीच्या केवळ धावा करण्याने तो वस्त्रहरणाच्या प्रसंगी तिच्या मदतीला धावून आला. राधाकृष्णाचं प्रेम तर अतिशय मनोहारी. त्याचा जनमानसावर इतका पगडा आहे की अजूनही कृष्णाचं नाव हे त्याच्या कुठल्याही पत्नी बरोबर न घेता ‘राधाकृष्ण’ असंच घेतलं जातं. या सर्वच नात्यांना त्याने नेहमीच योग्य न्याय दिला आहे. लग्नानंतर मुलीलाही सून, पत्नी, वहिनी, काकू, मामी, आई अशा अनेक प्रकारच्या भूमिका पार पाडायच्या असतात. त्यातील कुठल्याही नात्यावर अन्याय न करता तिला त्या सर्व भूमिका व्यवस्थित पार पाडता याव्या, ही जाण तिला असावी, तिनं प्रत्येक नातं प्रामाणिकपणे निभवावं, सगळ्यांना बरोबर घेऊन संसार करावा म्हणून हा बाळकृष्ण आई मुलीला देत असणार.

हा खोडकर, प्रेमळ, हसरा, सगळं सोसणारा कृष्ण प्रसंगानुरूप कठोरही होतो. तो युक्ती-प्रयुक्ती वापरून पूतना, कंस, जरासंध यांचा वध करतो, पण महाभारतातील युद्धाच्या वेळी मदत मागायला आलेल्या आपल्या मित्राला “न धरी शस्त्र करी, मी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार” असं म्हणून आपलं सारं सैन्य दुर्योधनाला देऊन टाकतो. कारण तो जी मदत करतो ती अप्रत्यक्षपणे. स्वतः हातात शस्त्र घेऊन तो त्याच्या प्रिय मित्रालाही वाचवत नाही, उलट त्याला गीतेचा उपदेश करून स्वतःचा लढा स्वतःच करायला प्रवृत्त करतो. हेच तर मुलीला सासरी करायचं असतं ना! शक्यतो न बोलता सहन करायचं असतं, पण जिथे चूक होत असेल तिथे खंबीरपणे लढायचंही असतं. कुटुंब सुखात, आनंदात रहावं म्हणून आनंदी खोडकरपणा बाळगावा लागतो तर कठीण प्रसंगात कृष्ण होऊन गीतेचं रहस्यही उलगडावं लागतं, जीवनाचा प्रत्येक टप्पा समर्थपणे ओलांडावा लागतो.

संसार जसजसा फुलायला लागतो तसतसा त्यात पदोपदी कृष्ण भेटायला लागतो. घरातल्या लहान मुलांना त्यांच्या एवढंच होऊन सांभाळणं म्हणजे गोकुळातील यशोदेचा खोडकर कृष्ण. मनावर दगड ठेवून मुलांना शिक्षणासाठी बाहेर गावी किंवा परदेशात पाठविणे म्हणजे सांदीपनींच्या आश्रमात शिकायला गेलेला देवकीचा कृष्ण. कुणाच्याही गरीब वा श्रीमंत असण्याचा विचार न करता सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणे म्हणजे सुदाम्याचा कृष्ण. लग्नात शृंगार असावा पण वासना किंवा असूया नसावी म्हणजे रुक्मिणीचा कृष्ण. सगळ्यांची जेवणं झाल्यावर उरलेलं अन्न खाऊन तृप्त होणे आणि घरादाराला समाधानी ठेवणे म्हणजे द्रौपदीच्या सूर्यथाळीत उरलेले एकच पान खाऊन स्वतःबरोबर जगाला तृप्त करणारा कृष्ण. आपल्या माणसाला वळणावर आणण्यासाठी त्याला योग्य सल्ला देत खंबीर निर्णय घेऊन कठीण प्रसंगाचा समर्थपणे सामना करण्यास शिकविणे म्हणजे अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण.

असा विविध रूपातील कृष्ण उलगडायला लागला की मुलीला तिच्या आई मधील देवकी-यशोदा तर कळतातच, शिवाय रुक्मिणी-सत्यभामेच्या प्रेमाबरोबरच राधा व मीरेची कृष्णाबद्दलची ओढही कळते, तिला द्रौपदीचे सखाप्रेमही कळते. असा सखाच सासरी जाताना तिच्या आईने तिला दिलेला असतो. तो जेव्हा सगळ्यांपासून लपवून आई देते तेव्हा त्या युगपुरूषाच्या दर्शनाबरोबरच आईचा मायेचा स्पर्शही मुलीच्या हाताला होतो. त्या मायेच्या शिदोरीबरोबर तिने दिलेल्या विश्वासू सख्याच्या आधारानेच तिला तिचा संसार तल्लीन होऊन करायचा असतो. पण वेळ आल्यावर विरक्त होऊन आपण उभा केलेला संसार पुढच्या पिढीच्या हाती सोपवायचा असतो.

निर्लेप मनाने, कुणाचाही दुस्वास न करता, स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन, कर्तव्यात न चुकता संसार कर, वेळप्रसंगी खंबीर राहून निर्णय घे आणि त्यांच्यावर ठाम रहा, पण शेवटी सगळं सोडून मुक्त हो हा गुरुमंत्रच आई पाठवणीच्या वेळी गुपचूप बाळकृष्ण देऊन मुलीला देत असते. आणि गुरुमंत्र तर कानातच देतात ना; तोही हळूच. हेच सगळ्यांपासून लपवून आईने मुलीला बाळकृष्ण द्यायचं प्रयोजन असणार, नाही का?

©  सौ. वृषाली सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी आधुनिक श्रद्धाळू… ☆ सुश्री वैशाली पंडित ☆

सुश्री वैशाली पंडित

परिचय 

शैक्षणिक अर्हता – बी. ए. बी. एड्. मराठी/ समाजशास्त्र

माझं लेखन – तरूण भारत, पुढारी, लोकमत, मिळून सा-याजणी यांत सदरलेखनसकाळ स्मार्ट सोबती या पुरवणीत सलग सहाव्या वर्षी सदर सुरू आहे. अंतर्नाद, आरती मासिकातून कथालेखन. कोकण मराठी साहित्यपरिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष म्हणून सहा वर्ष काम सांभाळले. अनेक साहित्यिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी चालवले. झपूर्झा या मासिकातून कथा लेखन.

पुस्तके –

  1. दीपमाळेची फुले (ललित लेख संग्रह) – आरती प्रकाशन, डोंबिवली. कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार.
  2. आगीनझाड (कथासंग्रह) पंडित पब्लीकेशन, कणकवली. कोमसाप पुरस्कार.
  3. असा घडला सेनानी (चरित्र कादंबरी,) पंडित पब्लिकेशन कणकवली
  4. आधण आणि विसावण (ललितबंध) अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर, कोमसाप पुरस्कार.
  5. पाच दशक नऊ सुटे (ललितबंध)- अभिनंदन प्रकाशन. कोल्हापूर
  6. कल्याणकटोरा (संतचरित्रात्मक कादंबरी) विघ्नेश प्रकाशन, कणकवली. कोमसाप पुरस्कार.
  7. श्री गजानन विजयग्रंथ साहित्यिक पारायण – संतकवी दासगणू यांच्या अध्यायांवर रसग्रहणात्मक लेख. — अल्टीमेट प्रकाशन, नाशिक
  8. मंत्रभूल, -(ललित लेखबंध-)- सकाळ प्रकाशन पुणे
  • अन्य –
  • ‘कानगोष्टी’ ही शिशुवर्गासाठींची गोष्टींची श्रवणफीत. मात्र आता सीडीप्लेअर कालबाह्य झाल्याने त्या गोष्टी माझ्या यु ट्युब चॕनेलवर ऐकता येतील. मुलांचा श्रवण विकास व्हावा यासाठीच या गोष्टी आहेत.
  • पाच दशक नऊ सुटे या पुस्तकाचा वाचकार्पण सोहळा तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख हिच्या हस्ते केला. दिशामुळे तो आणि ती या बरोबर ते या समाजाशीही मैत्रबंध निर्माण झाला.
  • ऐलमा पैलमा अक्षरदेवा, सिंधुदुर्ग महिला साहित्य समूहाची स्थापना २०१४ मध्ये झाली.
  • अनेक साहित्यिक, सामाजिक उपक्रम त्यात सुरू असतात. पुढच्या वर्षी दशकपूर्ती आहे. सिंधुदुर्गातल्या ३० नव्या जुन्या लेखिका एकत्र येतात. दृढ साहित्यबंध निर्माण झालेला आहे.
  • मी फेसबुकवर सक्रिय असते. स्पर्शतृष्णा हा माझा सर्वाधिक व्हायरल झालेला लेख होता.
  • गोमंतकातील चौदाव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • मिळून सा-याजणीची गेली २० वर्षे प्रतिनिधी.
  • मॕन इन थ्री पीस ही कथा गोव्यातील एका दिग्दर्शकाने सिनेमासाठी निवडली.
  • आकाशवाणीवरून अनेक कथा कविता प्रसिद्ध

? विविधा ?

☆ मी आधुनिक श्रद्धाळू… ☆ सुश्री वैशाली पंडित 

हो बाई ! मी अगदी आधुनिक आहे. जुन्याजीर्ण श्रद्धा कालबाह्य झाल्यात. आपण काळाबरोबर बदलायला हवं नाहीतर रद्दीतसुधा घ्यायचं नाही कोणी. हे मला पक्कंच कळलेलं आहे. तर सांगत काय होते, हं मी आधुनिक…

म्हणून तर मी स्मार्टफोन वापरायला शिकले. अगदी ह्याच्यात्याच्या हातापाया पडून, मिनत्या करून मोबायलातलं एकेक तंत्र माहीत करून घेतलं. फेसबुक म्हणू नका, व्हाटसप म्हणू नका सगळीकडे मुसंडी मारली. माहेर, सासर, शाळेतले, कॉलेजातले, इथले-तिथले पन्नासग्रुप फोनवर आले. प्रत्यक्षात कधी बोलायला मिळत नव्हतं ते इथे अगदी धो धो बोलून घ्यायला लागले. जळ्ळं प्रत्येकवेळी बोलायलाच हवं असं तरी कुठे ? इकडून आलेला मेसेज तिकडे ढकलला तरी चालतोच की ! ओटीतला ब्लाऊजपीस कसा हिचा तिला, तिचा हिला परत आपल्याच ओटीत येतो, तस्से मेले हेही मेसेज परत आपल्याच व्हाटसप्यात येतात ते सोडा.

आणखी एक बरं झालं बाई ! रोजच्या जेवणाचं ताटही फेसबुकाला, वॉटसपाला नैवेद्य दाखवायचं व्रत नेमाने करता आलं. एरव्हीच्या शिळ्याफोडणी भातालाही सव्वाशे लाईक्स आले की ऊर कसा भरून येतो नै ? नाहीतर त्याला घरात माझ्याशिवाय विचारत कोण होतं ?

भरलं वांगं, दहीबुंदी, काजुकुर्मा, असल्या पदार्थांचे फोटो मी टाकले तेव्हा उभ्या गुगलने मला सुगरण, यम्मी, माऊथवाॕटरींग असाल्या कमेंटी टाकल्या. ही बाई बघावं तेव्हा आॕनलाईनवर असते, करते तरी कधी ? सगळ्यांनाच आश्चर्य. पण म्हटलं ना, मी आधुनिक… करायला कशाला हवंय काही ? नेट लावलं की हव्वा तो पदार्थ पुढ्यात. तेच ब्लाऊजपीस पुढच्या ओटीत टाकत रहायचे. माझा आजचा मेन्यू म्हणून. फक्त ज्या ग्रूपवर घरातली मुलं सुना, नातवंडं नाहीत तिथेच ते टाकायचं. नाहीतर ” कधी गं हा मेन्यू होता आपल्याकडे ? मुगाची खिचडीच तर केलीस उशीर झाला म्हणून. ” असं बिनदिक्कत विचारायला कमी नाही करायचे हे लोक.

आता खर्च म्हणाल तर… वाढला थोडासा. खोटं कशाला बोला ? नेटपॕकचा तर राजरोसच वाढला पण दुधाचा खर्च वाढला. गॕसचे सिलिंडर महिन्याला एकाच्या जागी दोन लागायला लागले. काय ? नाही कळलं काही ? अहो, आख्खं गुगल बोटाखाली रगडताना होते दुधाची अंमळशी सांडलवंड. जातं महिन्यातून फक्त वीसपंचवीसदा दूध उतू. पण एवढी बिझी असल्यावर घसा-याचा खर्च नाही का गृहित धरत ? मग ?

तर… असं सगळं सुरळीत चाललेलं. तर या मोबाईलबाळालाच दृष्ट लागावी ? कसंतरीच करायला लागलं की. डोळाच उघडीना. नेहमीचा त्याचा चार्जरचा अंगठा तोंडात दिला, तास झाला तरी हाल नाही की चाल नाही. शेवटी चांगला दुसरा लांबशेपटीवाला चार्जर लावला तरी तेच. जीव धास्तावला अगदी. म्हटलं दृष्ट तरी काढावी. सिमकार्ड मुठीत धरून तीनदा उतरवलं, पुटपुटलेही. ” डीपीची, सेल्फीची, जॉईनची, क्वीटची, अपलोडाची, डाऊनलोडाची, नोकीयाची, सॕमसंगची, आयबाॕलची कोणाची नजर लागली असेल तर फुटो त्याचा कॕमेरा !” पण… छे ः !

मग काय न्या डाॕक्टरकडे. घसघशीत बिल घेऊन त्याने केले उपचार. आणला घरी. तर त्यात वॉटसप काही केल्या उगवेना. आता करू तरी काय ? माझे कित्ती कॉंन्टॕक्टस ताटकळले असतील माझ्याशिवाय, कोणी नवी साडी घेतली, कोणी जुनी गाडी विकली, कोणाच्या सासूने कोणाला कसे टोमणे मारले, कोणाच्या सुनेने आगाऊपणा केला काही समजणार नाही मला ?

तेवढ्यात यांच्या मित्राचा मुलगा बायको मुलासह आमच्या घरी आला. तिघांच्याही हातात त्यांचे मोबाईल. आमच्याशी बोलताना दोन शब्द आम्हाला आणि बाकीचं मोबाईलमधे तोंड घातलेलं. माझा उतरलेला चेहरा बघून त्यांनी कारण विचारलं मी सांगितलं. म्हणे हात्तेरेकी. आमचा बबलू इइइझ्झीली देईल दुरूस्त करून. बबलू. इयत्ता सातवी क ने इकडे तिकडे खाटखुट केलं आणि उगवलं की व्हाॕटसप. सगळी ओळखीची तोंडं दिसली डीप्यांमधली आणि हायसं झालं. आनंदाच्या भरात बबलूचे कित्ती फोटो काढू न् किती नको झालं मला. खुषीत एक आख्खं पार्लेजी बिस्कीट जास्तच घातलं त्याच्या प्लेटमध्ये.

ते गेले आणि कौतुकाने मोबुल्याला मांडीवर घेतलं. काय सांगू ? त्याचं एक दुखणं बरं झालं आणि अनेक बारीकसारीक कुरबुरी सुरू झालेल्या दिसल्या. एकतर व्हाॕटसपवरची काहींची नावं गुल. नुसतेच नंबर. लोकही असले खत्रूड ना, डीपी दर तासाला बदलतात. कोणाचा नंबर ते कळतच नव्हतं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे…. आई आई ग्ग्ग ! फेसबुक गायब… काय ढवळलं त्या कार्ट्याने तो गुगल जाणे. कासावीस झाला जीव. शेवटी सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम् त्यजति पंडितः म्हणतातच ना ! मी म्हटलं मेलं वाॕटसप तर वाॕटसप.

पण नावं नव्हती त्यांचे मेसेज आले तर कोणाला काय रिप्लाय द्यावा कळतच नव्हतं. अंदाज पंचे काहीही ठोकत होते. एकाला मी तो बायकोला फिरायला नेत नाही म्हणून झापलं तर ते सासरच्या ग्रूपवरचे मामेसासरे निघाले. त्यांचं लग्नच नाहीये झालेलं. माझी जीवाची मैत्रीण समजून आमच्या नवराबायकोतल्या उखाळ्या पाखाळ्या लिहिल्या तर तो मेसेज नेमका दादाला पोचला. त्याने दात दाखवत तो माझ्या नव-याला फाॕरवर्ड केल्याचा रिप्लाय टाकला. काय बघा स्वभाव ! याचं त्याला त्याचं याला करावं का असं ?

शेवटी विनंती केली पर्सनली, बाबांनो, कृपया नावं कळवा. तर काहीनी निरागसपणे कळवलं काहींनी ओळखा बघू असं मलाच कोड्यात टाकलं. नतद्रष्ट मेले.

आपली मेसेज फाॕरवड करायची लिस्टही बिनसलेली. एकाला दाबावं तर सुळ्ळकन भलतीकडेच तो मेसेज पसार. आमचा अगदी चौघींचाच एक भन्नाट ग्रुप आहे. तिथे कसलाही विधिनिषेध नाही. जिभेची हाडं तिथे चुकून मिळायची नाहीत. असाच एक ठ्यां हसायला लावणारा मेसेज मी तिथे पाठवायला म्हणून दाबला तर तो थेट एका सोवळ्या ग्रुपवर जाऊन आदळला. एकच हाहाकार उडाला तिथे. अगदी ब्राह्मणांच्या स्वयंपाकघरात चिंचगुळाच्या आमटीत मांजराने तळलेला बांगडा टाकल्यावर जे होईल ते झालं. पुढची दहा मिन्टं मी तिथे साॕरी… चुकले. परत नाही असं होणार अशा नाकदु-या टाईप करीत होते.

घरात कोणी आजारी असेल तर प्राण कसे कंठाशी येतात ते मी सांगायला नको. मी किती मोबाईल तज्ज्ञ गाठले, किती पैसे त्यांच्या खिशात घातले त्याचा हिशेबच नाही. एखादा तज्ज्ञ मोबाईल चिमटीत धरतो, उगाच इथे तिथे बोटं आपटतो आणि जाहीर करतो, “प्च काय नाय उपयोग याचा. शाप डबा झालाय. ” काहींनी माझा इमेल आयडी स्वःच्या आवडीने बदलला. माझी जन्मतारीख तर इतकी वेगवेगळी पडली की शिवरायांनाही खंत वाटावी. बरं तारीख वेगळी टाकली एकवेळ मान्य. पण साल ? माझ्या पोरांचा टवाळ्या करणारा मेसेज. एकविसाव्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! एक शुभेच्छा अठराव्या वाढदिवसाची आली. असं करता करता बहुतेक माझ्या आईलाच कन्यारत्न प्राप्त झाल्याच्या शुभेच्छा माझ्या नातवांकडून गेल्या तर नवल नको वाटायला. थोरल्या नि धाकट्याने तर फेसबुकचे किती अकाउंट उघडलेस गं म्हणत मला काही कळत नसल्याची ग्वाही दिली. सुनेने एकदा बघू काय झालंय म्हणत मोबाईल हातात घेतला आणि इस्स्स.. म्हणत ओढणी तोंडावर घेतली. “अहो ममी, असले फोटो कशाला डाऊनलोड केलेत ?” म्हणत घाईघाईने तो डिलीट केला. मी काहीही न करता मला हे भोगावं लागत होतं.

इथे नाही काही होणार. हा प्राॕब्लेम मुंबईलाच बघावा लागेल. असा घरातून मला सल्ला मिळाला. पण…. आशा चिवट. परत कोणी मोबाईलतज्ज्ञ वाटला की त्याच्या पायावर मोबाईलला घालते. तो सांगेल ते गंडेदोरे करायची तयारी असते माझी. मग ? शेवटी मी आधुनिक ना ? माझ्या श्रद्धाही आधुनिक. ना ?

©   सुश्री वैशाली पंडित

मालवण, जि. सिंधुदुर्ग, मो. ९४२२०४३०२५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आधुनिक अंधश्रद्धा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “आधुनिक अंधश्रद्धा…☆ श्री जगदीश काबरे ☆

प्रत्येक समाज वा संस्कृती कित्येक पिढ्यांपासून आलेल्या रूढी परंपरांचे शक्य तितके पालन करण्याच्या प्रयत्नात असतो. अशा रूढी परंपरामध्ये श्रद्धा–अंधश्रद्धांचा वाटा फार मोठ्या प्रमाणात असतो. काही वेळा त्यांच्यातील फोलपणा स्पष्टपणे दिसत असूनसुद्धा, ‘त्यामुळे काही नुकसान तर होत नाही ना’ असे म्हणत त्या पाळल्या जातात. मांजर आडवे गेल्यास एक क्षण थांबून पुढे गेल्यामुळे अपशकुनाचा परिणाम होणार नाही याची खात्री असते. मानसिकता तशीच ठेवून सामान्यपणे त्या त्या काळातील जीवनशैलीप्रमाणे शकुन-अपशकुनांचे आयकॉन्स बदलतात. बैलगाड्यांची पूजा करणारे आता मोटार गाड्यांची पूजा करतात. परंतु पूजा करण्याची मानसिकता नष्ट झाली नाही. भारतीय परंपरेने याबाबतीत तर कहर केला आहे व अजूनही आपण त्या जंजाळापासून मुक्त होऊ शकलो नाही. स्वत:ला अत्याधुनिक म्हणून घेणारे श्रीमंत व अतिविकसित राष्ट्रांतील समाजसुद्धा याला अपवाद नाहीत. विकसित देशातील प्रगत बनवणारे नागरिक बरेचदा 13 आकडा अशुभ समजतात. त्यामुळे त्यांच्या हॉटेलमध्ये 13 नंबरची खोली असत नाही. अत्याधुनिक जीवनशैलीनुसार या समाजातील शकुन-अपशकुन विमान, डॉक्टर्स, सिगारेट्स इत्यादीत शोधल्या जातात. यांतील काही नमुनेदार गोष्टी खाली दिल्या आहेत.

1) विमान: विमानप्रवासात फुलाचा गुच्छ नेणे अशुभ समजले जाते. रिकाम्या आसनांचे सीट बेल्ट्स क्रॉस करून ठेवतात. तसे न ठेवल्यास भूत येऊन त्या सीटवर बसून प्रवास करते म्हणे! ग्रेलिन नावाच्या भुतामुळे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड होतो, असा समज आहे. त्यासाठी बीअरचा नैवेद्य दाखविला जातो.

2) अॅम्ब्युलन्स : घाईगर्दीच्या वेळी अम्ब्युलन्समधून लिफ्ट घेणे अशुभ समजले जाते. वाटेत अम्ब्युलन्स दिसल्यास ती नजरेआड होईपर्यंत शास रोखून धरला जातो. तसे न केल्यास अम्ब्युलन्समधील रुग्णाचा मृत्यू अटळ आहे, असे समजतात.

3) कॅलेंडर: वर्ष, दिवस वा महिना संपायच्या आत कॅलेंडरचे पान बदलणे अशुभ समजले जाते. लीप वर्षाच्या २९ फेब्रुवारीला जन्मलेल्या मुलीचे लग्न लवकर होते व ती आयुष्यभर निरोगी राहते.

4) खुर्ची : खुर्चीसारख्या निरुपद्रवी वस्तूभोवतीसुद्धा अंधश्रद्धा आहेत. खुर्ची खाली पडणे अशुभ समजले जाते. कुणीतरी उठून गेल्यानंतर खुर्ची पडल्यास ती व्यक्ती खोटारडी मानली जाते. दवाखान्यातील खुर्चीवर झाकून ठेवलेले कापड खाली जमीनीवर पडल्यास नवीन रुग्ण येतो. खुर्ची उलटी ठेवल्यास घरात भांडण होते, अशा समजुती खुर्चीबाबत आहेत.

5) हातरुमाल : हातरुमाल खाली पडल्यास स्वतः उचलणे अशुभ समजले जाते. घडी केलेला रुमाल सतत बाळगणे संकटांना आमंत्रण देऊ शकते. एखाद्याचा/एखादीचा रुमाल उसना घेणे म्हणजे त्याचे/तिचे दु:ख/ अश्रू मागून घेणे. रुमालाला गाठ बांधून ठेवल्यास भूतबाधा होत नाही. जर बायकोने नवऱ्याच्या हातात रुमाल दिला तर त्या नवराबायकोमध्ये हमखास भांडण होते.

6) सुईदोरा : काळा दोरा ओवलेली सुई रस्त्यावर दिसणे अशुभ समजले जाते. गरोदर स्त्रीने अशी सुई बघितल्यास तिला मुलगी होणार. दिवसाची सुरुवात सुई या शब्दाने केल्यास दिवस वाईट जाणार. मित्राला सुई देणे हे मैत्री तोडल्याचे लक्षण आहे. शिवत असताना सुई मोडल्यास तो शुभशकुन मानला जातो.

7) फोटो : भिंतीवर टांगलेली फोटोची फ्रेम अचानक पडल्यास संकट कोसळणार. एखाद्या प्राण्याबरोबर फोटो काढून घेणे हे प्राण्याच्या स्वरूपातील भुताचा फोटो काढल्यासारखे होते. तिघांचाच फोटो काढल्यास मधल्या व्यक्तीवर संकट येते. आवडत्या व्यक्तीचा फोटो स्टिअरिंग व्हीलजवळ ठेवल्यास गाडीला अपघात होत नाही.

8) साबण: एकमेकांना साबण देणे मैत्री तोडण्याचे लक्षण मानले जाते. आंघोळ करताना साबण निसटणे संकटाला आमंत्रण दिल्यासारखे असते.

9) चमचे : चमचा खाली पडल्यास घरात लहान मूल येणार. मोठा चमचा स्वयंपाकाच्या ओटयावर किंवा डायनिंग टेबलवर पडल्यास ८-१० माणसं जेवायला येणार. चमचा उलटा पडल्यास मनासारखी गोष्ट होणार नाही.

10) बंद घड्याळ : घराच्या भिंतीवर बंद घड्याळ असेल त्या घराचे नशीब थांबते आणि घराची भरभराट होणे बंद होते. म्हणून घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नये, असा समज जनमानसात पसरलेला आहे.

11) मीठ देणे : जर आपण शेजाऱ्याला हाताने मीठ दिले तर आपले आपल्या शेजाऱ्यांशी भांडण होते. म्हणून कधीही मीठ हातात दिले जात नाही.

12) कावळा : घराच्या खिडकीवर बसून जर कावळा ओरडला तर पाहुणे येणार असा समज असतो.

13) मांजर : मांजर डावीकडून उजवीकडे आडवे गेले तर आपल्यावर संकट कोसळणार. मांजर जर उजवीकडून डावीकडे गेले तर आपले काम होत नाही.

14) काच : जर घरात अचानक एखादी काच तडकली तर त्या घरावर काहीतरी संकट कोसळणार, म्हणून काच तडकणे हे अशुभ समजले जाते.

15) नखं कापणे : रात्री नखे कापणे अशुभ समजले जाते.

याच प्रकारे अमावस्येच्या रात्री प्रवास करणे, बुधवारी प्रवासाला सुरुवात करणे, शनिवारी केस कापणे, हे अशुभ समजले जाते. अशा बऱ्याच अंधश्रद्धेच्या गोष्टी, शकून-अपशकूनाच्या गोष्टी आजही तुम्हाला अगदी शिक्षित घरांमध्येसुद्धा सर्रासपणे घडताना दिसतात. यावरून आपण सर्व शिक्षित तर झालो, पण सुशिक्षित मात्र झालो नाही, हे मात्र नक्की. मी माझ्या आयुष्यात वर दिलेल्या उदाहरणातील सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आलेलो आहे. पण माझ्या आयुष्यात काहीही वाईट घडले नाही. माझ्या घरात अजूनही एका भिंतीवर एक घड्याळ गेली तीन वर्षे बंद स्थितीत आहे. कारण ती वेळ माझ्या पत्नीच्या मृत्यूची होती. म्हणून त्याच वेळेला ते बंद करून ठेवलेले आहे. पण घरातील बंद घड्याळामुळे माझ्यावर कुठलेही गंडांतर आलेले नाही. एकूण हे सगळे मनाचे खेळ आहेत. तुमचा आत्मविश्वास खंबीर असेल तर तुम्हाला असल्या चिल्लर गोष्टींची चिंता करायची गरज वाटत नाही, हे आपण जेवढ्या लवकर लक्षात घेऊन तो सुदिन.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ७ – संत वेणाबाई ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ७ – संत वेणाबाई ☆ सौ शालिनी जोशी

समर्थ रामदासांनी जिला आपली कन्या मानलं त्या समर्थ शिष्या वेणाबाई. या कोल्हापूरचे गोपजी गोसावी देशपांडे यांची कन्या होत्या. जन्म सोळाशे सालचा. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे वयाच्या आठव्या वर्षी मिरजेच्या देशपांडे यांच्या मुलाबरोबर त्यांचा विवाह झाला. पण अल्पावधीतच त्यांच्यावरती वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. भाग्यवशात लिहिता वाचता येत होते. घरातले काम आणि गीताभागवतादी ग्रंथ हेच आपले सर्वस्व मानून वाचन चिंतनात वेणाबाई सासरी विवेकाने काळ घालवू लागल्या.

बारा वर्षांच्या वेणाबाई अंगणात तुळशी वृंदावनाजवळ बसून पोथी वाचनात घडून गेल्या होत्या. एवढ्यात खड्या आवाजातला एक श्लोक आणि त्या पाठोपाठ ‘जय जय रघुवीर समर्थ’ असा जयजयकार त्यांच्या कानावर पडला. झटकन उठून त्यासमोर पाहू लागल्या तेव्हा,

ब्रह्मचारी सुत्र शिखा l पाई शोभती पादुका l

कटी अडबंद कौपिन l कंठी तुळसीमणिभूषण l

दिव्य मुख दिव्य नेत्र lभाळी आवाळू सुंदर l

असं पुढे कालांतराने ज्यांचं वर्णन वेणाबाईंनी केलं, अशी एक तेजस्वी मूर्ती त्यांना समोर दिसली. हे समर्थ रामदास हे त्यांनी ओळखलं. कारण वेणाबाईंचे आई-वडील रामदासांचे अनुग्रही होते आणि रामदासांच्या विषयी त्यांच्याकडून वेणाबाईनी ऐकले होते. वेणाबाईना पाहताच रामदास मात्र चरकले. वेणाबाईंचे बालवैधव्य त्यांच्या लक्षात आले. समर्थांनी त्यांच्याकडे दुधाची भिक्षा मागितली. पण सासूबाईंनी परवानगी दिली नाही. समर्थांना विन्मुख पाठवल्याच्या दुःखाने त्या व्याकुळ झाल्या. समर्थांच्या दर्शनाची ओढ त्यांना लागली.

वेणाबाई तुळशीवृंदावनाजवळ भागवत वाचत बसल्या असता पुन्हा एकदा समर्थ भिक्षेसाठी आले. वेणाबाईंची चौकशी करून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन समर्थांनी केले. पुढे वेणाबाई माहेरी कोल्हापूरला गेल्या असता, आई-वडिलांच्या बरोबर समर्थांच्या कीर्तनाला जात असत. वेणाबाई त्यात तल्लीन होऊन जात. एके दिवशी समर्थांच्या पायावर डोके ठेवून वेणाबहिनी अनुग्रहाची विनंती केली. करुणाकर रामदासांनी त्यांना मंत्र उपदेश दिला. पण समाजाला हे पटलं नाही. ‘विधवा स्वैर झाली’ असा आरडा ओरडा करत घरातल्यांना दोष द्यायला लोकांनी सुरुवात केली. आई-वडिलांनी गुरुभक्ती सोडण्यास वेणाबाईंना सांगितले. पण वेणाबाईनी त्यांना उत्तर दिलं,

कोणी वंदिती, कोणी निंदिती l वास मी त्यांची पाहीना l

हृदयी धरिले सद्गुरु चरण l प्राणांतीहि विसंबेना l

‘देह माझे मन माझे l सर्व नेले गुरू राजे l’ अशी त्यांची अवस्था झाली होती. जननिंदेला उधाण आले. असह्य होऊन आई-वडिलांनी मुलीला विष प्यायला देऊन कोंडून ठेवले. समर्थ कृपेने त्यानी विष पचवून दाखवले.

यानंतर मात्र वेणाबाईनी आप्तेष्टांचा संबंध तोडला. समर्थांच्या शिष्य शाखेत दाखल झाल्या. मठातील उपहाराची व्यवस्था पाहण्याचे काम त्यां च्याकडे आले. त्याचबरोबर कीर्तन, पुराणे, प्रवचने ऐकणे तसेच स्वाध्याय व तपाचरण यांचा अभ्यास सुरू होताच. त्यांना काव्यरचना ही स्फूरू लागली. भक्ती, ज्ञान, वैराग्य ही समर्थांनी सांगितलेली महंतलक्षणे वेणाबाईंच्या अंगी बाणली.

मिरजेच्या मठाचे धुरीणत्व समर्थांनी वेणाबाईंकडे दिले(१६५६). २२ वर्षे त्यांनी ते कुशलतेने सांभाळले. आदराने त्यांना वेणास्वामी म्हटले जाते. समर्थांनी त्यांना कीर्तनाची परवानगी दिली. त्याकाळी विधवेचे कीर्तन अशुभ मानले जाई. समर्थ स्वतःच कीर्तन ऐकायला बसत. समर्थांच्या इतर शिष्यांना कीर्तनाचा अधिकार मिळाला नाही. समर्थांच्या सहवासात वेणाबाईंचे लेखन वाचन वाढले. समर्थांची लेखनशैली त्यांनी उचलली. वेणाबाईंच्या लेखनात विविधता आहे. रसाळपणा, साधेपणा, बारकावे टिपण्याचे सामर्थ्य आहे. अभंग, श्लोक, आरत्या याचबरोबर रामकथा त्यांनी वेगवेगळ्या रंगात रंगवली. उपदेश रहस्य, कौल, पंचीकरण, सिंहासन, सीतास्वयंवर, श्रीरामगुह संवाद, रामायणाची पाच कांडे इत्यादी त्यांचे साहित्य अर्थनिर्भर व भावनिर्भर आहे. उदाहरणार्थ त्यांचे ‘कौल’ हे काव्य. राम वनवासातून परत आल्यावर, प्रजा मागणी मागते आणि लक्ष्मण ते लिहून घेतो असा तो प्रसंग,

भूमीने कदा पीक सांडू नये रे l वदे राम लक्ष्मणा लिहिरे l

मनासारखे मेघवृष्टीने व्हावे l जया पाहिजे ते प्रसंगी पडावे l

 ****

मनाची अपेक्षा, पुरे बैल गाडे l घरी दुभती कामधेनूच पाडे l

अशाप्रकारे केवळ भक्तीत रमून न जाता समाजाच्या इच्छाच त्यांनी व्यक्त केल्या. छत्रपतींची गरीब रयत त्यांच्या डोळ्यासमोर असावी.

एकदा चाफळच्या उत्सवाच्या तयारीची सर्व जबाबदारी समर्थांनी वेणाबाईंवर टाकली. उत्सवाच्या १५ दिवस आधी वेणाबाई तापाने फणफणल्या. त्यांनी श्रीरामाची करुणा भाकली. रामापुर्तीच्या डोळ्यात अश्रू आले. रामाबाई नावाची कोणी एक स्त्री बत्तीसशिराळ्याहून मदतीसाठी हजर झाली. तिने समर्थांचे नाव सांगितले. हे समर्थांना समजते तेव्हा खरा प्रकार उलगडला. प्रत्यक्ष रामाने स्री रूपात येऊन मदत केली होती.

वेणाबाईंची प्रकृती नाजूक होती. त्यांना आता पैलतीर दिसू लागला. त्या मिरजेहून सज्जनगडावर आल्या. ‘ स्वामी मला आता आज्ञा द्या’ असा धोसा लावला. सज्जनगडावरील रामनवमीचा उत्सव तृप्त मनानं त्यानी पाहिला. चार वाजता वेणाबाई कीर्तनासाठी उभ्या राहिल्या. समर्थांसह सर्वजण देहभान हरपून भक्ती रसात गुंतले होते. कीर्तन झालं. आरती झाली. वेणाबाईनी वीणा सद्गुरूंच्या हाती दिली. त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवले. ‘आता माहेरा जावे’ हे समर्थांचे शब्द कानी पडतात ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणत वेणाबाई खाली कोसळल्या. चैत्र वैद्य चतुर्दशी शके १६७८. सर्व संगपरित्याग केलेल्या त्या विवेकी वैराग्याचे अंत:करण कातर झाले. त्यांच्या समाधीच्या ठिकाणी चंपक वृक्ष उगवला. त्याची फुले समर्थ पूजेसाठी घेत असत. वेणाबाईंच्या अलौकिक जीवनकार्याची साक्ष देत आज एक दगडी वृंदावन तेथे उभे आहे. धन्य त्या वेणाबाई.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ळ कार…” भाग – २ ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆

श्री श्रीनिवास गोडसे

? विविधा ?

☆ “ळ कार…” भाग – २  ☆ श्री श्रीनिवास गोडसे

(एक मे…मराठी राजभाषा दिनानिमित्त)

(पृथ्वीला निळावंती म्हटले जाते तसेच पुष्कळा ही म्हटले जाते व्यवसायात माळी, साळी, गवळी, गोंधळी या शब्दात ळ येतोच)

आडनावांची यादी केली तर वेगळाच लेख होईल एवढी प्रचंड आडनावे वेगवेगळी गावे या ळ ने व्यापली आहेत. 

अगदी देवघरात डोकावलो तरी शंखाळे, टाळ, चिपळी, माळ, जपमाळ, त्रिशूळ, दीपमाळ, महाळुंग, महाळसा, म्हाळसाकांत, काळभैरव, मूळपीठ, मूळपुरुष दागिने पहा मळसूत्र, मंगळसूत्र, जोंधळीपोत, मुक्ताफळ, मोहनमाळ  वेळापत्रकात भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, तिन्हीत्रिकाळ, दीर्घकाळ, आकाळ, दुष्काळ, सुकाळ, येरवाळी आहेत। कामाचा मोबदला देताना येणाऱ्या गोष्टीत या गोष्टी बघा ना आणणावळ, करणावळ, खानावळ, खोदणावळ, घडणावळ, चाळणावळ, जळणावळ, जेवणावळ, धुणावळ, राखणावळ.

याशिवाय खळबळ खळखळ, मळमळ, जळजळ, भळाभळा यासारखी अनेक क्रियाविशेषणे खुप आहेत

गदिमांनी रचलेले घननिळा लडिवाळा… पहिल्यांदा आले आहेच

पण खास किशोर कुमार यांच्या करिता शांताराम नांदगावकरांनी रचलेले ळ विरहित एकमेव गाणे म्हणजे

अश्विनी येss नाss

जगु कसा तुझ्याविना मी राणी ग ?

या ळ विरहित असल्याने किशोर कुमार यांना ते म्हणणे खूप सहज झाले आणि मराठीत असलेले त्यांचे हे एकमेव गाणे, खूप गाजले

आपल्या चार वेदांत ऋग्वेद हा सर्वात जुना व मोठा वेद आहे या वेदाची सुरुवातच

ओम अग्नीमिळे पुरहित, यज्ञस्य देव बुद्धिजम

अशी आहे

यातही ळ ने आपले स्थान मिळवले आहे. 

वेदांचा काळ हा इसवीसन पूर्व 4000 वर्षे सांगितला जातो म्हणजे आजपासून सहा हजार वर्षांपूर्वी देखील ळ चे अस्तित्व होते आणि ते प्रगत होते.

उच्चार शास्त्रात मात्र ळ चा उच्चार अग्निमेड़े पुरोहितम असा केला गेला. 

मगाशी लिहिल्याप्रमाणे ळ चे अस्तित्व अनेक भाषेत जरी असले तरी मराठीत त्याचा वापर सर्वोच्च असावा असा तर्क आहे. मराठी चे वेगळेपण, सौष्ठव, ओळख यात ळ चा बराच वाटा आहे. यासाठी संशोधनाला खूप वाव आहे.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की गुगल चा कळफलक पण हिंदी साठी अ चा प्रतिनिधी म्हणून वापर करतो तर मराठी साठी ळ चा प्रतिनिधी म्हणून वापर करतो…

‘एवढा अढळ ळ’ पण त्यांने सगळ्यांच्या बरोबर राहून प्रत्येकाला गोड स्वरूप दिले. मात्र स्वतः एकही शब्द स्वतःची सुरुवात होण्याने तयार केला नाही. हेच या नम्र अक्षराचे विशेष मला खूप आवडले

हा ळ मला ईश्वर स्वरूपच भासला

सगळ्यात आहे आणि कशातच स्वतःला महत्त्व घेतले नाही अगदी अलिप्त…

या लेखाला नाव देताना मात्र अचानक ळकार हे नाव मनात चमकून गेले आणि म्हणूनच ही ळकारा ची योजना

वाचनात गोडी रहावी म्हणून इच्छा असूनही ळ चे अनेक शब्द असून ते घेतले नाहीत… काही विषय वाचकांवर सोडून द्यायचे असतात तसा हा विषय मी आपणावर सोडून देत आहे…

संत ज्ञानेश्वर आणि संत रामदास यांना ळ विषयी खूप प्रेम आहे. उकाराबरोबरच ळ चा खूप वापर त्यांनी आपल्या लेखनात सुंदरता आणि गोडवा आणण्याकरीता केलेला आहे

ज्ञानेश्वरांनी केलेला ळ चा वापर पहा

पसायदान :-

वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥

अभंग :-

चंदनाची चोळी ।

माझें सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी ।

वेगीं भेटवा कां ॥३॥

*

सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।

पोळे आगिसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥

समर्थांनी केलेला ळ चा वापर पहा 

गणेश स्तवन दासबोध:-

नाना सुगंध परिमळें| थबथबा गळती गंडस्थळें |

तेथें आलीं षट्पदकुळें| झुंकारशब्दें ||११||

मुर्डीव शुंडादंड सरळे| शोभे अभिनव आवाळें |

लंबित अधर तिक्षण गळे| क्षणक्ष्णा मंदसत्वी ||१२||

श्री राम आरती:-

मस्तकी मुकुट किरीटी तेजाळ |

झळझळ झळकती कीळा भासे कल्लोळ ||

मकराकृती कुंडले रत्ने सुढाळ|

कस्तुरी केशर सुंदर भाळी परिमळ || २ ||

कासे कसिला पीतांबर पिवळा |

चरण कमळी रूळे वृंदाची माळा ||

घननीळ तनु सुंदररूपे सावळा |

रामदास वंदी चरणांबुज कमळा || ५ ||

श्री हनुमान आरती :-

करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ||

शिवरायांना लिहिलेले पत्र:-

आचारशीळ विचारशीळ। दानशीळ धर्मशीळ।

सर्वज्ञपणें सुशीळ। सकळा ठाई।।

या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।

महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।

खूप लिहावेसे वाटते पण विस्तार भयास्तव इथेच थांबणे इष्ट. नाही तर लेख खूप अघळपघळ झाला असता.

अभिजात मराठीच्या फक्त जपण्याने थांबून चालणार नाही. शब्दांची भर पण घालायला हवी. आपली भाषा समृद्ध करायला हवी.

हिंदीच्या टेंभ्या पुढे, दिवटी पुढे मराठीची ही समई मनाच्या देवघरात जपून ठेवूया,  तेवत ठेवूया.

©  श्री श्रीनिवास गोडसे

इचलकरंजी, मो – 9850434741 shrinivasgodse@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares