श्री श्रीनिवास गोडसे

? विविधा ?

☆ “ळ कार…” भाग – १  ☆ श्री श्रीनिवास गोडसे

(एक मे…मराठी राजभाषा दिनानिमित्त)

27 फेब्रुवारी— मराठी भाषा गौरव दिन.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस. या दिवशी अचानक मनात एक कल्पना आली आणि त्यावर सत्वर अंमलबजावणी देखील केली. मी एक अक्षर आणि त्या अक्षरासोबत ळ जोडून आलेले शब्द याची माहिती पाठवायची सुरुवात केली आणि अ पासून ज्ञ पर्यंत पोहोचता पोहोचता २५ दिवस सलग हा कार्यक्रम झाला. जवळपास दोन हजाराच्या आसपास शब्द हाताशी लागले. यामध्ये अनेक शब्द नव्याने वाचनात आले. फार मजा आली हा उद्योग करताना. सर्वोच्च शब्द ळ ने म आणि व यांच्याबरोबर साधले आहेत. त्याचप्रमाणे ळ बरोबरचे सर्वोच्च दहा जोडीदार काढायचे म्हटले तर प्रथम स्थान म, व, प, क, स, ग, ह, ब, भ आणि स या (सर्वोच्च10) बरोबर जवळपास 58% शब्द ळ बरोबर आले आहेत.

ळ नाही तर मराठी कशी होईल याचा अनुभव घ्यायचा आहे तर पहा…

समजा मी बोललो वा लिहिले…

“अवचिता परिमलु झुलकला आलू मालू

मी म्हणे गोपालु आला गे माये”

लवथवती विक्राला ब्रम्हांडी माला

विषे कंठ काला त्रिनेत्री ज्वाला

घननिला लडिवाला…

अरे अरे.. ! वाचवत नाही आणि बघवत नाहीत हे मराठीचे हाल

ळ ऐवजी ल या अक्षराचा वापर केला तर काय घोळ होतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

हिंदीत ळ अक्षर वापरले जात नाही, पण मराठी बरोबर तमिळ, तेलगू, मल्याळम, गुजराती, कन्नड, तुळू, कोकणी, राजस्थानी, हरीयाणवी भाषेत वापरले जाते. त्यातील काही भाषांमध्ये ळ लिहिताना त्याच्या खाली टिंब म्हणजे नुक्ता (ऴ) दिला जातो. हिंदी ही संस्कृतची लेक परंतु तिच्या वर उर्दू, फारशी, अरबी भाषेचे संस्कार आणि स्थानिक उच्चार परंपरा यामुळे ळ चा वापर दुर्मिळ झाला.

पण म्हणून खालील शब्द पहा ना ! ज्याच्यामध्ये ळ आणि ल चा बदल झाला तर अर्थात प्रचंड फरक होतो…

अंमल- अंमळ

वेल – वेळ

खल – खळ

पाल – पाळ

नाल – नाळ

कल – कळ

लाल – लाळ

ओल – ओळ

मल – मळ

चाल – चाळ

दल – दळ

छल – छळ

काल – काळ

गलका – गळका

बघितले ?

तर आपल्या मराठी लोकांना गरजच नाही की याचे अर्थ वेगळे सांगावेत…

हिंदीचा भाषा म्हणून जरूर अभिमान आहे आणि तिचा मानही नक्कीच मोठा आहे पण म्हणून ळ ऐवजी ल वापरावा लागू नये हे मात्र नक्की. कारण ळ मध्ये एक वेगळा गोडवा आहे. ळ ला त्याचे ‘अढळ’ पद मिळावे म्हणून प्रकाश निर्मळ या व्यक्तीने खूप मोठा लढा सरकार दरबारी दिला. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर सुधारित हिंदी वर्णमालेत ळ ला त्याचे विशेष असे अढळ स्थान नुकतेच मिळवून दिले. त्यावरचा वेगळा लेख जिज्ञासूं करिता आंतरजाल अर्थात इंटरनेटवर उपलब्ध आहे…

तर मंडळी ळ आपल्या मराठीजनांचा खूप खूप आवडता उच्चार आहे

अगदी बघा ना…

“भरल्या मळवटाने आलेली मावळण, तिला यथावकाश डोहाळे लागतात, तीचे नव्हाळी अनुभवताना आवळे-चिंचेसह अनेक डोहाळे पुरवले जातात. बाळंतपण इस्पितळात पार पडते, बाळ होते (जुळे, तिळे, आवळे-जावळे) नाळेपासून बाळाला वेगळे केले जाते, मग पाळणा आंदोळुन बारसे होते. खेळणी म्हणून खुळखुळा दाखवला जातो, बाळलेणी म्हणून रुणझुण वाळा घातला जातो. बाळ पळू लागते. तोंडाचे बोळके पसरून खिदळू लागते. कधी कधी तर घळाघळा रडून अश्रू ढळू लागते,

तेव्हा सहज येणारे

उळुउळुउळु बाळा ss

हात ग माऊ…

आठवा…

हळूहळू बाळ गुळुगुळु बोलू लागते. त्याच्या पायात वाळा घातला जातो. काजळाचा टिळा लावला जातो.

‘अडगुळं मडगुळं सोन्याचं कडबुळं रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा… ‘

मग चाल चाल वाटे करून पांगुळगाडा आणला जातो. बाळ आईबापांची ओळख धरते. टाळू भरतो,

‘टाळ्या टाळ्या लेमन च्या गोळ्या ‘

दंतावळीचे आगमन होते… जिव्हाळी वळवळू लागते…

बोबडे बोल बोलू लागते. गालावर खळी शोभू लागते. डोळ्यात काजळ,

केसांची गुंतवण

कानात बाळी शोभू लागते…

आता हा दुसरा परिच्छेद…

” पावसाळ्यातल्या दाटलेल्या मेघमाळा, खळखळाट करून वाहणारे ओहोळ, डोंगराळ प्रदेशात दाटलेले मळभ, भरलेले आभाळ, ढगाळ वातावरण, गवताळ जमिनीवर हरळी, गवत खाऊन भरलेले वळू. शेतमळ्यात ढेकुळ फोडत नांगरणारे घाम गाळणारे, राबणारे मळेकरी, कुळवाड्यांची कोळपणी, विरळणी आणि शेतातली कामे, जोंधळ्याची खळ्यात पडलेली रास, नांगरांचे फाळ, शेतात चालणारे विळे, जळाने उचंबळून खळखळून वाहाणारे ओहोळ, भरलेली तळी, त्यात उमलणारी कमळे, भुईकमळे, कर्दळीचे रान, गोशाळेत गाईंच्या आचाळांना पिणारी वासरे, मायंदाळ झालेली फळप्राप्ती…

हिवाळ्यात थंडगार, झुळझुळत वाहणारे वारे देहावर शिळक उमटवतात, हळूहळू वातावरण बदलते, आंब्याच्या डहाळीला मोहर फुलतो, थंडीत पांघरलेली वाकळ फडताळात जाते आणि दिवस पळू लागतात, उन्हाच्या झळांना सुरुवात होते, मुंगळे जळ धुंडाळताना ओळ लावून धावताना नजरेस पडतात, फाल्गुनात होळीच्या ज्वाळा पेटतात आणि उन्हाळा अजूनच तीव्र होतो, अचानक आभाळात मेघमळा धावू लागतात, यालाच आपण वळीव, अवकाळी पावसाळा म्हणतो. वैशाखाच्या उन्हात वाळवणे साधली जातात.

ळ ने आपले जग असे व्यापले आहे…

अगदी आपल्या देहापासूनच सुरुवात करू

आपलं टाळकं, अनेक टाळकी, तोंडावळा, मोकळी वेणी, केसांची गुंतवळ,

कानाची पाळी, कानातला मळ, अंगातले बळ,

कपाळ, भाळ, कपाळावर मळवट,

गालाची खळी,

नाक चाफेकळी,

तोंडात जिभाळी, पांढरी शुभ्र दंतावळ, लाळ, चुळ, आरोळी,

गळा, गळ्यातला माळा, हातात असलेल्या कोपरखळ्या, तळवट, तळहात, मळहात,

बोटातली नम्र करंगळी, हाताची ओंजळ,

पायाचा तळवा,

पोटातला कोथळा,

दोन दोन डोळे, त्यावर चाळशी, डोळे नसतील तर आंधळे किंवा असून रातांधळे,

मुखकमळ, त्यातला मंजुळ आवाज, कधी कधी माणसाला आलेली मुखदुर्बळता, मुखातली कवळी,

पुरुषांचा मिशाळ, दाढीचा केसाळ चेहरा,

बोलातली मधाळता, अति झाली तर लाळघोटेपणा,

रोजची अंघोळ,

शरीराचा हाडकूळेपणा (हाडकपाळ्या) अथवा ढोबळेपणा,

हातापायांचे मुरगळणे असो किंवा लुळेपण,

अंगातली कळ, उन्हाळ्यात उठणारे घामोळे, उठणारी पुळी, चामखीळ, जखमांचे किंवा घटनांचे चिघळणे, गंडमाळा, मुळव्याध, रक्तबंबाळ होणे, रक्ताची गुठळी,

लेकुरवाळेपण, मुलेबाळे, मुलीबाळी, वंशावळ वाढणे,

जीवनाच्या शेवटीचे काळ येणे, काळ होणे…

एवढेच नव्हे तर पुढे हळहळ,

ती झाली की

मृत्यूनंतर भूतावळ, हडळ, आणि भुतांचा राजा वेताळ पण…

😃

रंगात बघा… काळा, पिवळा, निळा, जांभळा, ढवळा, पवळा, गव्हाळ, चुनकळी, दुधाळ, हिरवानिळा पण…

कीटकांमध्ये मुंगळे, डोंगळे, झुरळ, पेंगुळ, टोळ, हरणटोळ, जळवा आळ्या…

फुलांमध्ये कमळ, कर्दळी, भुईकमळ, ब्रह्मकमळ… पक्षांमध्ये कावळा, बगळा, कोकीळ, डोमकावळा,

वेगळे असे वटवाघुळ,

फळांमध्ये आवळा, केळी, राजकेळी, कोहळा, जांभूळ, डाळिंब, आळू, ताडगोळे, नारळ अर्थात श्रीफळ…

मिसळण्याच्या डब्यात हळद, तीळ,

मसाल्यात जायफळ, मायफळ, कारळे, काळेमिरे, काळेतिळ, पांढरे तिळ

पालेभाज्यात तांदळी, अळू, मायाळू, चिघळ, घोळ, टाकळा,

फळभाज्यात भोपळा, दुधीभोपळा, पडवळ, रताळं, मुळा

तेलात नारळाचे, कारळयाचे, तिळाचे तेल

धान्यात तांदूळ, जोंधळे

कडधान्यात कुळीथ, विविध डाळी,

गोडात गुळ

मांसाहारात कोळंबी, खाद्यपदार्थ आंबोळी, गुळांबा, विविध उसळी, कडबोळे, भाताचे ढिकळ, गोळ्या, तिळगुळ, रायवळ आंबे, पोळ्या

स्वयंपाक घरातल्या वस्तूंमध्ये मुसळ, उखळ, ओगराळे, घंगाळ, चाळण, थाळी, थाळा, नरसाळे, विळी

ज्वलनात कोळसा

घरातल्या इतर वस्तूंमध्ये खेळ, खुंटाळी,

शाळेत गेलो तर फळा, धूळपाटी, वर्गमूळ, घनमूळ, अर्धवर्तुळ, पूर्ण वर्तुळ, वर्तुळखंड शाईतल्या हिंगुळात पण ळ आहेच

अंकामध्ये 39 ते 48 यामध्ये ळ येतोच

सणांमध्ये दिवाळी आणि व्रतांमध्ये मंगळागौरी

वारात मंगळवार

तर ग्रहात मंगळ

अगदी पाताळात, भूतळात, भूमंडळात, आभाळात, अंतराळात, तारामंडळात पण ळ आहेच

पृथ्वीला निळावंती म्हटले जाते तसेच पुष्कळा ही म्हटले जाते

व्यवसायात माळी, साळी, गवळी, गोंधळी या शब्दात ळ येतोच.

क्रमशः…

©  श्री श्रीनिवास गोडसे

इचलकरंजी, मो – 9850434741

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments