मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 1 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 1 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

डाॅ.भालचंद्र फडके

डाॅ.भालचंद्र फडके. एक ज्येष्ठ मराठी साहित्यिक. विद्यार्थीप्रिय आणि समाजप्रिय प्राध्यापक. समाजातील अनेकांना प्रेरणा आणि साहाय्य दिलेला कल्पवृक्ष. 

याचबरोबर  सामाजिक परिवर्तन, लोकशिक्षण अशा अनेक क्षेत्रांत मुक्त संचार केलेल्या निस्पृह आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या सरांच्या सहवासाचा परीसस्पर्श ज्यांना लाभला त्यांच्या आयुष्याचे सोने झाले. फडके सर म्हणजे अमृताचा अथांग सागर. त्यांना पहाण्याचे आणि ऐकण्याचे भाग्य मला मिळाले… 

फडके सर हे मोठे साहित्यिक होते. मात्र त्यांचे एकही पुस्तक शाळेत माझ्या वाचण्यात आले नव्हते. याचं एक मुख्य कारण होतं की,शाळेतल्या पुस्तकांत  त्यांचे धडे नव्हते. हायस्कूल संपवून मी पुढे ओतूरमधील काॅलेजात गेलो. पुणे  विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सेंट्रल कॅम्पसाठी काॅलेजकडून माझी निवड झाली होती. कॅम्प विद्यापीठाच्या परिसरातच होता. विद्यापीठाच्या विस्तीर्ण आणि निसर्गरम्य वातावरणात आमचा मुक्काम होता. तिथं अनेक जणांची उत्तमोत्तम भाषणं ऐकली. फडके सर तेव्हा विद्यापीठाच्या  प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाचे  संचालक होते. ‘ सामाजिक परिवर्तन आणि युवकांची भूमिका’ अशा कुठल्याशा विषयावर ते तास दोन तास बोलले  रहाण्याच्या तंबूंबाहेरच्या उन्हात आम्ही ते मन लावून ऐकत होतो. अतिशय पोटतिडीकीने सर बोलत होते. सरांना मी पहिल्यांदाच पहात होतो. तरी यांना कुठंतरी मी पाहिलंय असं जाणवत होतं. टीव्हीवर किंवा कुठल्यातरी वर्तमानपत्रात मी सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांना पाहिलं होतं. त्यांच्यात आणि फडके सरांमध्ये मला खूप साम्य जाणवले. 

काॅलेजमध्ये शिकत असताना मी काॅलेजतर्फे चालणा-या राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमात संघटक आणि पर्यवेक्षक म्हणून काम केले. विद्यापीठात त्याच विभागाचे फडके सर संचालक होते. त्यावेळी सर्वसामान्य माणसं आणि कार्यकर्ते यांच्याविषयी सतत पत्रे ,निरोप आणि फोनवरून काळजी करण्याची त्यांची प्रवृत्ती मी अनुभवली.

बी.ए. झाल्यावर मी पुण्यातील कर्वे इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सर्व्हिसेस या संस्थेतून एम.एस.डब्ल्यू.केले.

नंतर मी पुणे विद्यापीठातील प्रौढ, निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून रूजू झालो. सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी सरांचा दांडगा लोकसंपर्क, सर्वसामान्य माणसांविषयी  कळकळ  आणि साध्या रहाणीतून त्यांची महानता  मी अनुभवली. आमच्या विभागातर्फ प्रौढ शिक्षण आणि विविध सामाजिक विषयांवर सतत चर्चासत्रे, कृतिसत्रे, परिसंवाद, प्रशिक्षण कार्यक्रम आणि विविध पातळ्यांवर परिषदा आयोजित केल्या जात. त्यावेळी समाजाच्या अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि नामवंत अभ्यासकांना सर आवर्जून घेऊन येत.

माझ्या मते १९८५  वर्ष असावं. देशातील प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आयोजित केलेले पहिले ‘समर इन्स्टिटय़ूट’ आमच्या विद्यापीठात झाले. त्याचे संपूर्ण नियोजन फडके सरांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम हा केंद्राधारित होता. यात वस्ती किंवा गाव  हा आधार होता. यात तीस निरक्षरांना केंद्रात शिक्षण देणे अपेक्षित होते. मात्र एक अडचण सतत जाणवत होती. अनेक दुर्गम भागात निरक्षरता असूनही तीस निरक्षर एकत्र मिळवणे, इतके लोक एकत्र बसतील अशा जागेची उपलब्धता, साहित्याची उपलब्धता होणे अडचणीचे होते. प्रौढ शिक्षण कार्यक्रमातील ही अडचण लक्षात घेऊन एका नवीन कार्यक्रमाचे सूतोवाच फडके सरांनी समर इन्स्टिटय़ूटमध्ये केले. पुढे ‘ कार्यात्मक साक्षरता सामूहिक कार्यक्रम ‘ (Mass program for Functional Literacy)  देशभर कार्यान्वित  झाला. या कार्यक्रमाची बीजे मला फडके सरांच्या त्या भाषणातील मांडणीत दिसून येतात.  पुणे शहरातील विविध वस्त्यांतून विद्यापीठाने प्रायोगिक प्रौढ शिक्षण केंद्रे चालवली. मी या केंद्रांचा समन्वयक होतो. यावेळी या केंद्रातून अनेक उपक्रम राबवले गेले. त्यातून कार्यक्रमांचे नियोजन आणि व्यवस्थापन मी शिकलो.

फडके सरांची एक आठवण मला सांगावीशी वाटते. दिल्ली विद्यापीठातील प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाचे  संचालक डाॅ.एस.सी.भाटिया होते, त्यांनी सांगितलेली ती आठवण…

तेव्हाच्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी भाटिया सरांकडे सरकारच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यावेळी त्यांनी फडके सरांच्या नावाची सूचना मंत्र्यांना केली. सरकारच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी फडके सर अधिक प्रभावीपणे बोलू शकतील असा विश्वास त्यांनी मंत्र्याकडे बोलून दाखवला. मंत्र्यांना भेटायला फडके सर बुशशर्ट आणि पायात चप्पल घालून रेल्वेने गेले आणि सरकारला प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी परखड शब्दांत सुनावले होते.

बारामतीतील एका काॅलेजने प्रौढ शिक्षण कार्यक्रमाला मदत करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा एक दिवसीय मेळावा आयोजित केला होता. यासाठी सरांसोबत आम्ही विभागातील सर्वजण गेलो होतो. काॅलेजने आयोजित केलेला हा एक अभिनव उपक्रम  होता. तो अतिशय यशस्वी झाला. पुण्यात पोहचल्यावर सरांनी यावर मला एक लेख लिहायला सांगितलं .तो लेख त्यांनी सकाळ या नावाजलेल्या वर्तमानपत्रात प्रकाशित होण्यासाठी प्रयत्न केले.

सरांसोबत विभागातील आम्ही अनेक सहकारी नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर काॅलेजच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाला भेट देण्यासाठी गेलो होतो. काॅलेजमधील प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिका-यांनी विड्या वळणा-या कारखान्यातील प्रौढ शिक्षण केंद्रात आमची भेट आयोजित केली होती. एका हाताने विड्या वळत  तेथील निरक्षर महिला शिक्षण घेत होत्या. कामात मग्न असलेल्या महिलांना कसं शिकवायचं हे आव्हान होतं. फडके सरांनी ते आव्हान लिलया पेलले. .तिथल्या फळयावर सरांनी एक शब्द लिहिला- काजू.या शब्दावर सरांनी चर्चा सुरू केली. सरांनी महिलांना विचारलं,” काजू हा एक शब्द आहे.या शब्दांत दोन शब्द लपले आहेत. कोणते ?”

” का आणि जू ” उत्तर आले.

सर ‘का’ विषयी बोलले- “ जगात कोणतेही प्रश्न ‘का ‘या शब्दांतून निर्माण होतात ” असं सांगून ‘ जू ‘म्हणजे काय?”

असा प्रश्न त्यांनी विचारला.स्तब्धता पसरली.सरच म्हणाले, ” जू तुमच्या मानेवर नेहमीच असते.” असं म्हणून स्त्रियांच्या रोजच्या जीवनातील विविध प्रकारच्या  जूचे त्यांनी वर्णन केले.

– क्रमशः भाग पहिला. 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सावित्री… लेखिका : सुश्री मानसी काणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ सावित्री… लेखिका : सुश्री मानसी काणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

यंदाची वटपौर्णिमा आता जवळ आलीय. यादिवशी प्रथेप्रमाणे वटसावित्रीची कथा वाचताना, दरवर्षी सावित्री मला नव्याने समजत जाते. खरं तर ही एक पुराण कथा! भोळ्या भाबड्या पतीभक्तीपरायण बायकांनी ती ऐकायची आणि श्रद्धेने माथा टेकवायचा.पतीचे प्राण यमाकडून परत आणणं म्हणजे का सोपी गोष्ट आहे? याबरोबरच सासऱ्यांचं अंधत्व दूर करणं, त्यांचं गेलेलं राज्य परत मिळवणं, आपल्या निपुत्रिक पित्यासाठी पुत्र लाभाचा वर मिळवणं…. हे सगळं त्या सावित्रीने केलं. आज तर्काच्या कसोटीवर घासून पाहिली तर यातली एकही गोष्ट आपल्याला पटणार नाही कदाचित.पण तरीही मी या कथेतले नवे नवे अर्थ शोधत राहते…आणि एका क्षणी मला समजतं ,की कोणतीही गोष्ट विपरीत परिस्थितीशी झगडून, आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा उपयोग करून, विनम्र भावाने, कधी विनवणी करून मिळवणं आणि मिळवलेल्या गोष्टीचा उपयोग संपूर्ण कुटुंबासाठी होईल, हे पाहणं म्हणजेच सावित्री असणं, सावित्री होणं !

सावित्री म्हणजे कोणी राजकन्या, राणी किंवा वनवासिनी नाही,तर प्रत्येक स्त्री म्हणजे सावित्री ! स्त्रीत्वाचं प्रखर तेज म्हणजे सावित्री! सत्यवान, वटवृक्ष किंवा यमधर्म ….हे सगळं निमित्तमात्र. अविरत प्रयत्न, आणि यशाचा ध्यास म्हणजे सावित्री !

सावित्री बुद्धिमान होती. पतिनिष्ठा, पातिव्रत्य, कर्तव्य, धर्म या बाबतीतली आपली मतं तिनं यमाला सांगितली. वेळप्रसंगी त्याची स्तुती केली आणि त्यामुळे प्रसन्न झालेल्या यमा कडून वेगवेगळे वर मिळवले. तिला केवळ आपल्या पतीचे प्राण नको होते ,तर त्यानं उत्तम प्रतीचं आयुष्य जगावं,असं वाटत होतं .मग आधी तिनं आपलं राज्य परत मिळवलं .मग सासऱ्यांची दृष्टी परत मिळवून राज्यकारभाराची व्यवस्था नीट राहील असं पाहिलं.पित्यासाठी पुत्र मागून त्याच्या राज्याचा भविष्यकाळ सुरक्षित केला. सत्यवानाचे प्राण परत नाही मिळाले तर पतीशिवाय आपणही जिवंत राहणार नाही म्हणून, आपल्याशिवाय जगणाऱ्या आपल्या लोकांसाठी तिनं हे वर मिळवले. मग यमाने सत्यवानाच्या प्राणाखेरीज कोणताही वर मागण्यास सांगितल्यावर मोठ्या चतुराईनं सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत, असा वर मागितला.आणि हा वर खरा होण्यासाठी यमाला सत्यवानाचे प्राण परत द्यावेच लागले.हा एक प्रकारचा गनिमी कावाच होता आणि या युद्धात ती जिंकली.

माझ्या आजूबाजूला असंख्य स्त्रिया वावरत असतात. आपल्या मनाला मुरड घालून मुलाबाळांच्या भवितव्यासाठी अनेक घरी उजाडल्यापासून मावळेपर्यंत धुणीभांडी, केरफरशी करणारी माझी कामवाली,जीवनाशी तिची  सुरू असलेली लढाई, मुलींना चांगलं सासर मिळवून देणं, त्यांची बाळंतपण करणं, मुलानं शिकावं म्हणून तिचा चाललेला अट्टाहास,हे सगळं मी रोज पाहते.तीस वर्षे नवऱ्याच्या दुर्धर आजारासह सर्व संसारिक जबाबदाऱ्या उत्तम पार पाडणाऱ्या माझ्या जिवलग मैत्रिणीचा संघर्ष मी पाहिला आहे. त्यासाठी अनेक सुखाच्या क्षणांचा तिने केलेला त्याग माझ्या डोळ्यासमोर आहे. अकाली गेलेल्या नवऱ्याच्या माघारी त्याची उरलेली जबाबदारी रात्रंदिवस कष्ट करून पार पडणारी माझी वहिनी तर माझ्यासमोरच आहे. या सर्वजणींना मी पाहते ,तेव्हा या  त्या सावित्रीपेक्षा कणभर ही कमी नाहीत, याबद्दल माझी खात्री पटते. आज नवऱ्याच्या बरोबरीने कष्ट करणाऱ्या मुली त्यांच्या ताणतणावाचा अर्धा भाग आपल्या खांद्यावर पेलतात, म्हणजेच त्या त्यांचं आयुष्य वाढवितात. मतिमंद, अपंग मुलांना मोठं करणाऱ्या मातांच्या कौतुकासाठी तर शब्दच अपुरे पडावेत.ज्या चिकाटीनं सत्यवानाचे प्राण परत मिळेपर्यंत सावित्री यमाच्या मागोमाग चालत राहिली, त्याच चिकाटीनं त्या इच्छित साध्य गाठण्यासाठी मुलांबरोबर रोज अग्निदिव्य करीत असतात.

सध्या सगळ्याच पुराणकथांना भाकडकथा समजण्याचा काळ आहे. त्यातले दृष्टांत काल्पनिक समजले जातात. पण, थोड्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना  आधुनिक काळाशी जोडलं तर सत्ययुग,  द्वापारयुगातल्या या गोष्टी आजही लागू पडताना आपल्याला दिसतात. पुराणकालीन स्त्री सत्वाच्या, तपाच्या बळावर उभी असेल, तर आजची स्त्रीसुद्धा बुद्धी सामर्थ्याच्या आणि परिश्रमांच्या जोरावर आकाशाला गवसणी घालते आहे. आपल्याला जे हवे ते अविरत प्रयत्नांनी मिळवते आहे. आपल्या यशाने कुळाचे नाव वाढवते आहे. कोणतीही जबाबदारी स्वबळावर पार पाडण्याची ही कुवत म्हणजेच तर हे सावित्रीपण आहे.  आणि त्यासाठीचे प्रयत्न म्हणजेच वटसावित्रीचं व्रत आहे !

लेखिका : सुश्री मानसी काणे

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भगवंताची मिठी… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ भगवंताची मिठी… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

सोप्प नसतं हो, भगवंताचं होणं. प्रचंड निरागसता लागते, स्वच्छ मन लागतं. तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का? नाही ना…. कधी सहज म्हणून कुणाला निरपेक्ष मदत केली आहे  का? करून बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. अतीव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणाच्या उत्कर्षाचं कारण व्हा, कुणाच्या यशात भक्कम साथ द्या, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणी कुणाचं नसतं हो.. तरीही कुणाचं तरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा, कुणाची ताई व्हा, तर कुणाचा भाऊ.. मग बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणाच्या चेह-यावरचं हास्य बना, कुणाचे अश्रूंनी तुडुंब भरलेले डोळे पुसा, मग बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या, थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील.. मग भगवंताने स्वतःहून मिठी मारल्यासारखं वाटेल. आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय. स्वतःचं स्टेटस वाढवायचय् प्रत्येकाला.. कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा.. खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खूप उंचावर असेल, अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहूल लागेल. व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या, अन्न द्या, ते आमरस नाही हो मागत.. तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खूष असतात.. कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. आपल्याकडे आपलं असं काय आहे? भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो. मग त्यानी दिलेलं कघी कुणाला मनापासून द्या.. मग बघा … भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही.

कवयित्री- अज्ञात

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी आजी… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझी आजी… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

माझी आजी डोळ्यासमोर येते तेव्हा तिच्या आयुष्याच्या दोन चित्रमालाच डोळ्यासमोर येतात. एक तिचे स्वातंत्र्यपूर्व आयुष्य आणि दुसरं स्वातंत्र्यानंतरचे!

राधाबाई कृष्णाजी पेंडसे, आजोबांची दुसरी बायको ! पहिली फारच लवकर गेली आणि त्यानंतर आजोबांनी दुसरे लग्न केले. कोकणातली आई – बापा विना आजोळी वाढलेली दहा-बारा वर्षाची ती मुलगी आजोबांबरोबर लग्न करून थेट लांब कराची ला गेली ! नव्हता शिक्षणाचा गंध, नव्हता श्रीमंतीचा साज ! केवळ घराला जड होऊ नये म्हणून कोणीतरी लग्नाचा विचार केला आणि ती बोहल्यावर चढली. अशी ही साधीसुधी मुलगी कोकण सोडून दूरवर गेली एका मोठ्या बंगल्याची मालकीण म्हणून ! आजोबांची सरकारी नोकरी होती. ते ऑब्झर्वेटरीत नोकरीला असल्याने कराची जवळील मनोरा बेटावर त्यांचे वास्तव्य होते. दूरवरून येणाऱ्या बोटी, मचवे ह्यांना हवामानासंबंधीचे मार्गदर्शन करण्याचे काम असे. मॅट्रिक झाल्यानंतर नोकरी करणे गरजेचे होते त्यामुळे इतक्या लांब ठिकाणी ते नोकरीसाठी गेले. आजी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी कराचीला गेली. घरी नोकर चाकर होते. दहा-बारा खोल्यांचे घर होते, पण संसार मांडायला लागणारा आधार कुणाचा नव्हता ! आपल्या आपण सर्व शिकायचे. नवऱ्याच्या कडक शिस्तीत राहायचे आणि आज्ञा पालन करायचे एवढेच तिला माहिती ! कधीतरी कोकणात जायला मिळे, पण प्रेमाची माणसे कमीच होती. माहेरची चितळे.. परशुरामाच्या घाटीत राहणारी.. भाऊ वहिनी होते, पण परिस्थिती 

बेताचीच ! दारिद्र्य सगळीकडेच होते, पण भात आणि कुळीथाच्या पिठल्याला कमी नव्हतं ! घाटी उतरायची, चिपळूणला जायचं, काय असेल ते आंबे, फणस, रातांबे विकायचे. चार पैसे मिळत त्यातच बाजार करायचा ! अशा पद्धतीने कोकणातल्या कुटुंबांचा व्यवहार चालत असे.

लग्नानंतर आजी कराचीला गेली. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे दर दोन वर्षांनी एक बाळंतपण होत होतं. सहा मुलं झाली. तीन मुली, तीन मुलगे. सर्वांना एका ठिकाणी राहणं परवडणारे नव्हते ! मग दोन मुलं सातारला काकांकडे वाढली तर  चार मुले कराचीला वाढली. माझे वडील सर्वात मोठे! त्यांचे बालपण  ऐषारामात गेले. कारण आजोबांची नोकरी मानाची होती. मोठ्या मोठ्या इंग्रज साहेबांचा वावर भोवती असे.

राहणीमान चांगले ठेवता येई. कपातून चहा प्यायला मिळे. साहेब लोकांशी संपर्क असल्याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. आजोबांना पुस्तकांची प्रचंड आवड होती. विशेष करून इंग्रजीची आवड होती. घरामध्ये पुस्तकांचे शेल्फ भरलेले असे. कराचीजवळचे मनोऱ्याचे घर म्हणजे लौकिक अर्थाने चांगले, सुसंपन्न स्थितीतील घर होते. शिक्षणाची मनापासून आवड असल्यामुळे आजोबांनी आजीलाही लिहा वाचायला शिकवले होते. घट्ट नऊवारी नेसणारी आमची आजी नाकी डोळी नीटस,  उंच, शिडशिडीत बांध्याची होती. मनोऱ्याला काही मराठी कुटुंबही होती. मोजकीच ब्राह्मण कुटुंब असल्यामुळे ही मंडळी एकमेकांना धरून असत. वडिलांचे बीएससी पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. युद्धाचा काळ असल्याने सेन्साॅर ऑफिसला नोकरी मिळाली होती. लवकरच लग्न होऊन त्यांचे बिऱ्हाड कराचीमध्ये झाले. त्यांच्याबरोबर माझे काका, आत्या ही मंडळी कराचीत घर करून राहिली. आजी मनोरा ते कराची अशा फेऱ्या मारत संसार करत होती.

याच दरम्यान भारताच्या फाळणीच्या गोष्टी सुरू होत्या. आजोबांची रिटायरमेंट झाली,  त्यांना कराचीमध्ये राहण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी कराचीला मोठे घर घेतले. आणि सर्व मंडळी त्या घरात राहू लागली पण १९४७ च्या सप्टेंबर मध्ये फाळणीनंतर अवघ्या एका महिन्यातच सर्व पेंडसे कुटुंबाला पाकिस्तान सोडावे लागले आणि भारतात आपल्या मूळ गावी आयनी मेटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथे निर्वासित म्हणून यावे लागले. इथून आजीच्या आयुष्याचा दुसरा कालखंड सुरू झाला ! कराचीचे, मनोऱा बेटावरचे साहेबी जीवन संपले आणि कोकणात आयनी- मेट्याजवळील पाटील वाडी या ठिकाणी आजोबांनी जागा घेतली.  त्या जंगलात झोपडीवजा घर बांधून आजी- आजोबा राहू लागले .मोठ्या बंगल्यात राहणारी आजी आता आजोबांबरोबर झोपडीत राहू लागली. मुलांच्या शिक्षणासाठी चिपळूणला बिऱ्हाड केले होते. पाटील वाडी आणि चिपळूण अशा फेऱ्या करत पुन्हा एकदा आजीच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आजोबांना डायबिटीस होता. कोकणातील कष्टकरी जीवनात आणि निर्मळ वातावरणात त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहिला होता. माझी आजी या सगळ्याला तोंड देत मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी झटत होती. कष्टाची तर तिला कायमच सवय होती. डोक्यावर आंब्याच्या, फणसाच्या पाट्या घेऊन आजी खेडला विक्रीसाठी येत असे. ती दिवसाकाठी आठ दहा मैल सहज चालत असे. आसपासच्या लोकांना ‘निर्वासित म्हणून आलेले पेंडसे’ परिचयाचे होते. काही जण आपुलकीने त्यांना मदत करत असत.

अशीच जीवनाच्या खाचखळग्यातून आजीची वाटचाल ७० सालापर्यंत चालू होती. १९७० साली आजोबा गेले आणि पुन्हा एकदा आजी एकटी पडली.. ती अधूनमधून आमच्याकडे, काकांकडे, आत्याकडे येत जात असे, पण तिला तिथे जास्त काळ करमत नसे. स्वतंत्र विचाराची, कणखर स्वभावाची अशी आजी कोकणात एकटी घरी राही. एकदा ती घरात एकटी आहे असे पाहून चोरांनी कडी काढायचा प्रयत्न केला पण आजी इतकी धीट की तिला जाग आल्याने हातात काठी घेऊन ती दाराजवळ आली आणि चोराच्या हातावर  काठीने मारले. चोर पळून गेले. पण त्यानंतर मात्र तिच्या भाच्याने  तिला आपल्या घरी रोज रात्री झोपण्यासाठी नेण्याचे ठरवले. काही काळ असा गेला. पुढे माझ्या भावाला मुलगा झाला आणि आजीला पंतवंड झाले. त्यानिमित्ताने तिला पुण्यामध्ये आणले आणि परत कोकणात तिला जाऊ दिले  नाही.

आयुष्याचे असे दोन  कालखंड… एक कराचीचा आणि एक कोकणातला – दोन परस्पर विरुद्ध

तिने अनुभवले. नकळत या सर्व गोष्टींचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. कधीतरी ती मनाने मनोऱ्याच्या घरी असे तर कधी कोकणात असे ! आयुष्यात घडलेल्या घडामोडींमुळे तिचे मन अस्वस्थ झाले होते. संकटांना तोंड देऊन ती थकली होती. तिच्याआधी माझे वडील गेले, त्यामुळे मुलगा गेल्याचे दुःख ती विसरू शकत नव्हती. आठवड्यातील सात दिवसातले चार-पाच दिवस तरी तिचा उपासच असे. पण  कष्ट केलेले तिचे शरीर या सगळ्याला तोंड देत होते. शरीर झिजले होते पण तिला कोणताही आजार नव्हता त्यामुळे थकत गेलेली आजी हळूहळू या सगळ्या मोहमायेतून  बाहेर पडली. झाडाचे जीर्ण पान जसे अलगदपणे गळून पडते, तशी माझी आजी म्हातारपणामुळे अनंतात विलीन झाली. माझ्या आत्त्याने पेंडसे कुटुंबाच्या आठवणींचे एक पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकाच्या आधारे मला माझ्या आजीचे हे चित्र डोळ्यासमोर उभे राहते !

तिच्या स्मृतीला माझा शतशः प्रणाम !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सैतानी क्रौर्य —” ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? मनमंजुषेतून ?

☆ “सैतानी क्रौर्य —” ☆ श्री संभाजी बबन गायके 

नमस्कार,

‘ द केरला स्टोरी ‘ हा बहुचर्चित सिनेमा बघितला. धर्मांध झालेली  माणसे पशुपेक्षा किती क्रूर वागतात  हे पाहून मनाचा  थरकाप उडाला.  काफिरांच्या  मुलींना पद्धतशीरपणे  ट्रॅप करून  त्यांचे योनशोषण करणे, त्यांना हिंदू धर्माचा  तिरस्कार करायला लावणे, प्रेग्नेंट करून त्यांना धर्मांतर करायला लावणे, धर्माचे  युद्ध खेळणारे सैनिक म्हणून सिरीयात  पाठवणे, माणसांच्या  रूपातील हैवानांच्या लैंगिक वासना  भागवण्यासाठी मुलींना गुलाम ( sex slave) करणे, वापरून झाल्यावर निर्दयीपणे  हत्या करणे.. एकापेक्षा एक भयानक  वास्तव त्यात दाखवले  आहे.

मला  जुळ्या मुली आहेत, आई  वडील  म्हणून त्यांना चांगले  संस्कार देण्याचं आमचं  कर्तव्य डोळ्यात तेल घालून  आम्ही पार पाडत  असतो. पण  हा सिनेमा बघितल्यावर शांतीधर्मीय मुलांच्यापेक्षा त्यांच्या मुलींची  भीती  जास्त वाटू  लागली आहे. या सिनेमात असिफा  नावाची  मुलगी एजंट  बनून कसं  पद्धतशीरपणे  तिच्या रूममेटचे  ब्रेनवॉश करत  असते हे दाखवलं आहे. जर एखादी असिफा आपल्या मुलींची  मैत्रीण झाली तर .. या विचाराने झोप उडाली  आहे.

हा चित्रपट मनोरंजन म्हूणन नका  बघू, आपल्या डोळ्यात अंजन  टाकण्याचं  काम  या सिनेमाने केले आहे. कोणत्याही प्रकारचा  तेढ  निर्माण व्हावा हा मुळीच  हेतू नाही.

मी तर म्हणतो शांतीधर्मिय मुलींनी पण हा सिनेमा बघावा. अरब  देशांच्या मानाने हिंदुस्थानमध्ये स्त्री किती सुरक्षित आहे हे त्यांना कळेल.

द केरला  स्टोरी पाहून  सुचलेले पुढील काव्य आपण  वाचावे  आणि आपल्या मित्र मंडळीना फॉरवर्ड.. शेअर  करावे…

 द केरला स्टोरी

तुमच्या आमच्या  वेलीवर,

उमलणारी सुंदर कळी !

लव्ह जिहादच्या विखराला,

पडतेय नकळत बळी !

 

घरातल्या ओसरीवर,

मुक्त बागडणारी ती चिमणी !

भुर्रर्रकन कुणा संगे उडून जाई,

शिक्षा ठरावी ती जीवघेणी !

 

एखादे नासके फळ ,

संपूर्ण पेटीच  नासवते !

एखादी असिफाची संगत,

तुमच्या मुलींना फसवते !

 

आंधळ्या जिहादी प्रेमासाठी,

कुठल्याही थराला जाऊन झुकते !

गतप्राण झालेल्या बापाला,

काफीर म्हणत तोंडावर थुकते !

 

भाबड्या मुलींच्यासाठी,

प्रेमाचे  जाळे  विणले जाते !

जातीनुसार पटवणाऱ्याला,

इनामाची बोली मात्र मिळते !

 

त्या बनतात मुलं काढायचं यंत्र,

नंतर दिला जातो काडीमोड !

उशीर झालेला  असतोच तिला,

आयुष्यभराची मोडते खोड !

 

कुणी फसते इसिसच्या जाळ्यात,

पाठवली जाते तिला सिरीयात !

वासनाधुंद लांडगे लचके तोडती,

आयुष्य होऊन जाते तिचे बरबाद !

 

हजारो कोवळ्या कळ्या,

कुस्करल्या गेल्यात आजवर !

पस्तीस तुकडे बघितले तरी,

अक्कल कशी न येई ठिकाणावर !

 

द केरला स्टोरी

आहे धकधकते वास्तव !

तुम्हा आमच्या पदरातला,

दाखवणारा विस्तव !

 

तरुण मुलींनी तर बघाच,

त्यांच्या पालकांनी ही बघावा !

राष्ट्रापुढचा भविष्यातला धोका,

आजच पाहून तो ओळखावा !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दग्ध शौर्य- आम्रफले !” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

दग्ध शौर्य- आम्रफले ! —  ☆ श्री संभाजी बबन गायके 

आपल्या देश-वृक्षाला लगडलेल्या एकशे चाळीस कोटी विविध फळांपैकी पाच आम्रफळं काल-परवा जळून गेली… याची एकशे चाळीस कोटींमधल्या किती जणांना माहिती आहे, देव जाणे!

रमज़ानचा महिना संपायला दोनेक दिवसच शिल्लक आहेत. दिवसभराचा उपवास सोडणं म्हणजे ‘इफ्तार’ एक आनंदाचा क्षण असतो… सर्वधर्मसमभाव तत्वाला जागून आणि उच्च दर्जाच्या सैन्य परंपरेचा एक अविभाज्य भाग म्हणून जम्मूमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्यानं तिथल्या एका गावासाठी ‘इफ्तार’ देऊ केला आहे… त्याचं आमंत्रण साऱ्या गावानं स्वीकारले आहे… कार्यक्रम ठरला आहे. सैन्य या पवित्र कार्यासाठी तयारीला लागलं आहे. आज रात्री सारं गाव एकत्रित उपवास सोडेल… त्यासाठी लागणारी साधनसामग्री आणि विशेषत: फळं खरेदी करून काही जवान शहरातून लष्करी-वाहनातून निघाले आहेत.

दुपारनंतरची साधारणत: चारची वेळ. जोराचा पाऊस सुरू झाला… अंधारून आलं आहे. समोरचं दिसणं दुरापास्त झालेलं आहे… आणि अचानक जवानांच्या वाहनांवर जणू वीज कोसळते… म्हणजे उठलेला आगीचा प्रचंड मोठा लोळ आणि झालेला आवाज यावरून कुणालाही वाटावं… वाहनावर वीजच कोसळली आहे ! 

पण ती वीज नव्हती… प्रचंड शक्तीचा आणि रॉकेट डागतात त्या उपकरणातून डागला गेलेला हातबॉम्ब होता… जोडीला ऑटोमॅटिक रायफल्समधून काही क्षणांसाठी केला गेलेला गोळीबार. हे सारं काही क्षणांत घडलं.

आग भडकली आहे…. शक्य झाले त्या जवानांनी वाहनाबाहेर उड्या घेतल्या… पण पाच तरूण, तडफदार, शूर, बळकट देह मात्र त्या गदारोळात वेळेत बाहेर नाही पडू शकले. त्यांच्या देहाला आगीने एखाद्या अजस्र अजगरासारखा विळखा घातला होता… 

अग्निदेवतेने या देहांवर कोणतीही दयामाया नाही दाखवली… कारण आगीला माणसं नाही ओळखता येत. ही तर नामर्द, भित्र्या, पळपुट्या शत्रूनं लपून लावलेली आग. आग लावलेले नपुंसक लगेच पसारही झाले तिथल्या जंगलात. 

बचावलेल्या सैनिकांनी ही जळती शरीरं कशीबशी वाहनाबाहेर ओढून काढली… वेदनेनं आकांत मांडलेला होता… देहापासून त्वचेने फारकत घेतलेली आणि प्राणवायू देहात प्रवेश करायला कचरत असलेला… आणि बाहेर पडलेला श्वास पुन्हा न परतण्यासाठी निघून चाललेला…

काही क्षणांत चौघांचा जीवनवृक्ष जळून गेला… पाचवा त्याच मार्गावर निघून गेला काही वेळानं. त्यांच्या सवंगड्यांच्या दु:खाला, रागाला, अगतिकतेला पारावर नाही राहिला… कसा रहावा… सततचा सहवास… घट्ट मैत्री.. एकमेकांसाठी जीव द्यायची आणि घ्यायचीही तयारी असलेले हे रणबहाद्दर… पण असल्या भित्र्या हल्ल्यात लढण्याची साधी संधीही न मिळता बळी गेले… त्यांच्यासोबत त्यांनी नेलेली फळेसुद्धा काळीठिक्कर पडलेली होती… फुलांची राखरांगोळी झालेली होती. पाच माणसंच नव्हे तर पाच कुटुंबं बेचिराख झाली होती क्षणार्धात! 

हल्ल्याचा कट कुणी रचला, कुणी मदत केली, कुणी घात केला… सारं शोधून काढलं जाईलच… आणि प्रतिशोधही घेतला जाईल एक न एक दिवस! समोरासमोरच्या हातघाईच्या लढाईत तर शत्रू वाऱ्यालाही उभा राहण्याच्या लायकीचा नाही. पण कपटाने वार करतो! 

त्या पाच जवानांच्या आई-वडिलांच्या, बहिणींच्या, भावांच्या, पत्नींच्या, लहानग्या लेकरांच्या प्रश्नांना उत्तर नाही आजमितीला कुणाकडे. शत्रूला उत्तर दिले जातेच… पण हे पाच देह पुन्हा दिसणार नाहीत. आधीच जळून गेलेले हे देह आता तर खऱ्याखुऱ्या सरणामध्ये जळून राख झालेत आणि कदाचित जळाला अर्पितही झाले असतील. 

ज्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी हि कोवळी फुलं अकाली गळून जातात, जळून जातात त्यांची या देशातल्या सामान्य जनतेला काही तमा आहे की नाही, हा प्रश्नच आहे. की केवळ एकशे चाळीस कोटी वजा पाच असा हिशेब होणार आहे… यापूर्वी झाला तसा? 

हा देश या शूरवीरांच्या सन्मानार्थ एक क्षणही स्तब्ध होत नाही. या राज्यातील जनतेला त्या राज्यातील गेलेल्या सैनिकाबद्दल विशेष काही वाटत नाही. वृत्तपत्रांत, दूरदर्शन वाहिन्यांवर एक बातमी म्हणून ही घटना दिसते आणि लुप्त होऊन जाते. आप्तांचे शोकग्रस्त चेहरे दाखवण्यात, आजकालच्या प्रथेनुसार झालंच तर शॉर्ट रील बनवून ते लाईक्स, शेअरसाठी प्रसृत केले जातात. ‘तेरी मिट्टी में मिल जावॉ…’ ‘याद करो कुर्बानी’ म्हणून झालं की राष्ट्रीय कर्तव्य संपले. चित्रपटगृहात सिनेमापूर्वी बावन्न सेकंद कसंबसं उभं राहून नंतर हवं ते एन्जॉय करायला प्रेक्षक सज्ज होतात तशातली त-हा! 

का नाही हा देश हुतात्म्यासाठी एक दोन मिनिटं देत त्या दिवशी? का नाही सार्वजनिक प्रार्थना होत, शोकसभा होत ठिकठिकाणी? का बलिदानं प्रादेशिक झालीत आजकाल? विदर्भातील जवान धारातीर्थी पडला की फक्त विदर्भानेच आसवं गाळायची? बाकीच्यांनी आयपीएलच्या लुटुपुटुच्या लढाया बघण्यासाठी महागडी तिकीटं विकत घेऊन मज्जा करायची! 

सैनिकांच्या कल्याणासाठी देणारे नियमित देणग्या देतात… ज्यांची ऐपत नाही त्यांनी देऊ नये. हुतात्मा, जखमी सैनिकांच्या परिवारांची काळजी घेणारी काही सहृदय माणसं आहेत या देशात… इतरांना नसेल जमत हे तर नको जमू देत. पण ज्यांनी आपल्यासाठी आपले प्राण वाहिले त्यांच्या प्रती एका दमडीची संवेदनाही दर्शवू नये लोकांनी याचे सखेद आश्चर्य वाटते. 

जनतेची चूक नाही. जनता अनुकरणशील असते. ह्या सवयी राज्यकर्त्यांनी, समाजधुरीणांनी लावायच्या असतात, संवेदंशीलतेच्या, कृतज्ञतेच्या परंपरा निर्माण करायच्या असतात. रशियात नवविवाहित जोडपी पहिली भेट देतात ती त्या देशासाठी लढताना प्राणार्पण केलेल्या सैनिकांच्या थडग्यांना ! आपण कधी बोध घेणार… हाच सवाल आहे. 

“धगधगत्या समराच्या ज्वाळा… या देशाकाशी… जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी “ ..  हे कुसुमाग्रजांचे शब्द सत्यात उतरत राहतीलच… कारण सैनिक कधी मरणाला घाबरणार नाही ! पण आपले काय? आपण प्रार्थनाही करू शकणार नाही का निघून गेलेल्या सैनिकांच्या आत्म्यासाठी? धीराचे दोन शब्दही नाही का देऊ शकणार रडणाऱ्या विधवांसाठी, म्हातारपणाची काठी हरवलेल्या आई-बापांसाठी, तडफडणाऱ्या बहिणींसाठी, मूकपणाने आसवं ढाळणाऱ्या भावांसाठी आणि विव्हळणाऱ्या बालकांसाठी? 

 सैनिकांच्या हौतात्म्याचा शोक घरातून जेव्हा राष्ट्रीय सार्वजनिक पातळीवर पोहोचेल तेव्हाच हुताम्याच्या हौतात्म्याला अर्थ प्राप्त होईल ! तुमच्या आमच्या सुदैवाने हे हुतात्मे यापेक्षा अधिक काही मागत नाहीत ! 

 २० एप्रिल,२०२३ रोजी जम्मू जवळच्या पूंछ येथे झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडलेले लान्स नायक कुलवंत सिंग यांचे वडील बलदेव सिंग हे सुद्धा कारगील युद्धात हुतात्मा झाले होते. कुलवंत सिंग यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सैन्यात पाऊल ठेवले होते. या दुर्दैवी घटनेत हवालदार मनदीप सिंग, लान्स नायक देबाशिष बसवाल, शिपाई हरिक्रिशन सिंग, शिपाई सेवक सिंग ही चार आणखी आम्रफळे देशाच्या वृक्षावरून खाली कोसळून पडली…. हा वृक्ष याची वेदना अनुभवतो आहे का? 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

(जरा जास्तच झालं ना लिहिताना? पण इलाज नाही. इतर कुणाला हे सांगावंसं वाटलं तर जरूर सांगा. नावासह कॉपीपेस्ट्, शेअर करण्यासाठी परवानगीची गरज नाही. शक्य झाल्यास या जळीताचा व्हिडीओ बघून घ्या इंटरनेटवर… धग जाणवेल !)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “श्रद्धा आणि विश्वास…” लेखक –अज्ञात☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “श्रध्दा आणि विश्वास…” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज नैवेद्याला नुसती दूधसाखर ठेवलीये हो.. गोड मानून घ्या.. ” असं म्हणून आज्जींनी स्वामींच्या मूर्तीला भक्तिभावाने नमस्कार केला..आणि ‘आज बाहेर पडायलाच हवं. फळं, भाजी सगळंच आणायला झालंय. छान उघडीप पण आहे.’ असं स्वतःशीच म्हणत त्या बाहेर जायची तयारी करू लागल्या. “बाहेर जाऊन येते हो. उद्याला नैवेद्यासाठी फळं, पेढे घेऊन येते.  उद्या परत दुधसाखरच समोर ठेवली तर म्हणाल आजही दुधसाखरच का ? म्हणून..”असं स्वामींच्या मूर्तीकडे बघून म्हणत त्या स्वतःशीच हसल्या अन कुलूप लावून बाहेर पडल्या..त्यांना एकुलती एक मुलगी.. लग्न होऊन सासरी गेली.. यजमान त्या आधीच गेलेले…मुलीच्या लग्नानंतर त्यांनी रहाता भला मोठा बंगला विकून कोथरूडमध्ये छोटासा फ्लॅट घेतला आणि त्या स्वामींच्या सोबतीने राहू लागल्या.. माहेरी सगळेच स्वामींचे भक्त त्यामुळे नकळत्या वयापासून त्यांच्यावर श्रद्धा जडली ती आजपावेतो..एकटेपण आल्यावर मग स्वामींच्या मूर्तीशी बोलायची सवयच जडली… अगदी एखाद्या माणसाशी बोलावं तसं त्या स्वामींच्या मूर्तीशी बोलत. अगदी सगळं सगळं सांगत. एकट्या असल्या तरी व्यवस्थित स्वयंपाक करून बरोब्बर साडेबाराला मूर्तीसमोर नैवेद्याचं ताट ठेवत अन पंधरा मिनिटांनी, “स्वामी, बरं झालंय ना सगळं ? तिखट नाही ना लागलं काही ? ” असं त्यांना विचारून तेच ताट त्या स्वतः घेत असत..इच्छा एकच होती की शेवटी लोळत घोळत पडू नये..शांतपणे मरण यावं.. हल्ली त्या तसं स्वामींना वारंवार सांगत…दिवस, वर्षं सरत होती. आज अंथरुणावर अंग टाकायच्या आधी हात जोडून त्यांनी नेहमीप्रमाणे स्वामींचं स्मरण केलं.. आणि  ” स्वामी, आता आयुष्याच्या या सांजवेळी पुढच्या प्रवासाला निघून जावंसं वाटतं…जे योग्य असेल ते घडवून घ्या..” अशी प्रार्थना करून त्यांनी डोळे मिटले..मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या कपाळावर कुणीतरी हात ठेवल्याचा त्यांना भास झाला अन, ” बाळ, सगळं तुझ्या मनासारखं होईल, पण अजून वेळ आलेली नाही.”  हे वाक्य अगदी स्पष्टपणे ऐकू आलं.. त्या जाग्या होऊन अंथरुणावर उठून बसल्या.. काही दिवसांपासून चाललेली मनाची घालमेल संपली. अतीव समाधानानं अंतःकरण भरून आल्यासारखं झालं. त्यांनी स्वामींकडे पाहिलं. मंदशा दिव्याच्या उजेडात स्वामींची मूर्ती तेज:पुंज दिसत होती. खरं सांगू, यालाच म्हणतात श्रध्दा आणि विश्वास.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवत्व… लेखिका – सुश्री रश्मी लाहोटी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ देवत्व… लेखिका – सुश्री रश्मी लाहोटी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

“पाळी नाही आली.”

“लघवी तपासली का?”

“नाही.”

“झोप टेबलवर.”

तपासणी झाली. नवऱ्याला आत बोलवायला सांगितलं. दहा बारा महिन्याचं बाळ अगदी काळजीपूर्वक सांभाळत तो आत आला. 

खूपदा दिसणारं हे चित्र. कुटुंबनियोजनाची काळजी घेण्यात अजूनही बरीच जनता उदासीन असते. काही हजार मोजले की मोकळं ! हा सोप्पा पण चुकीचा समज.

“अडीच महिने झालेत.”

“हो, पाडायचं.”

“आधी काळजी घ्यायची की मग.”

“ ….”

“आधीचं काय?”

“मोठा मुलगा पाच वर्षांचा, अन् ही मुलगी दहा महिन्यांची !”

“ॲापरेशन करून टाकायचं असतं… किमान लवकर तरी यायचं, मोठा गर्भ पाडायचा म्हणजे तिला त्रास होणारच की !”

“आम्हाला ठेवायचंच होतं, म्हणून इतकं लांबलं.”

“इतकं लहान बाळ असून ठेवायचं होतं?” आता आईच्या कडेवर विसावलेल्या गुटगुटीत मुलीकडे पहात विचारलं.

“हे भावाचं आहे. भाऊ चार महिन्यांपूर्वी ॲक्सिडेंटमधे गेला. त्याची बायको दोन महिन्यापूर्वी बाळाला टाकून गेली, त्यामुळे हे आता आमचंच. म्हणून आता तिसरं नको.”  नवरा बाळाच्या केसात हात फिरवत म्हणाला.

“हिला मंजूर आहे का?” बायकोकडे पहात विचारलं.

“हिनेच सुचवलंय…” नवरा तिच्याकडे कौतुकाने पहात म्हणाला.

“आताचा भावनेच्या भरात केलेला विचार कायम राहील का नंतरही?” सर्वसाधारण प्रश्न आणि शंका!

“विचार बदलू नये अन् बारकीवर अन्याय होऊ नये म्हणूनच हे पाडायचं अन् लगेच ॲापरेशन करायचंय. कारण तीन तीन लेकरं पोसण्याइतकी ऐपत नाही आमची.” तिचं पोरीचा गालगुच्चा घेत ठाम उत्तर !

आपल्या आजूबाजूलाच कितीतरी अगदी साधीसुधी दिसणारी, पण खूप मोठ्या उंचीवरची माणसं आपल्याला पहायला मिळतात ! देव फक्त मंदिरातच विराजमान असतो असं थोडंच आहे !! देवत्व असं कितीतरी लोकांच्या मनात आणि वागणुकीतही दिसतं कधीकधी आणि आपल्या मनाचं मोरपीस करतं !!!

लेखिका : सुश्री रश्मी लाहोटी

प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पोत (बुनावट, Texture)… लेखक : अज्ञात ☆ डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ पोत (बुनावट, Texture)लेखक : अज्ञात ☆ डाॅ. शुभा गोखले

.कापडाच्या स्पर्शाशी संबंधित असलेला हा शब्द हल्ली ऐकायलाही मिळत नाही फारसा. 

.हल्ली सगळे कापडाचा Feel घेतात. मात्र लहानपणी निरुपायाने आईबरोबर खरेदीला जावं लागलं की हा शब्द हमखास कानावर पडायचा. 

काल खादी भांडारात हा शब्द अचानक फिरुन समोर आला. एकदम वाटलं, अरे पोत फक्त कापडाला थोडाच असतो !…… 

 पोत आवाजालासुद्धा असतो की. 

– लताजींच्या आवाजाला निर्मळतेचा पोत, 

– जगजीत सिंग च्या आवाजाचा मखमली पोत,

– आमच्या शाळेतील संस्कृतच्या सरांच्या आवाजाचा विद्वत्तेचा पोत, 

– आजीच्या आवाजाचा विशुद्ध मायेचा पोत.

– तर काही जणांच्या खोट्या स्तुतिसुमनांच्या मागे दडलेला किळसवाण्या स्वार्थाचा पोत उघड असतो.

अगदी एकेकाच्या स्वभावालासुद्धा पोत असतो.

– देशस्थांच्या स्वभावाचा पोत घोंगडीसारखा असतो, जरा खरखरीत पण ऊबदार. 

– कोकणस्थांच्या स्वभावाचा पोत मात्र पार्‍यासारखा असतो, कितीही जवळ आलं तरी स्वतःचं अस्तित्व   वेगळं टिकवून ठेवतो. 

– काही जणांच्या स्वभावाला सुरवंटाच्या केसांचा पोत असतो, जवळीक साधायचा प्रयत्न केला की कातडी सोलवटलीच पाहिजे. 

– काही जणांच्या स्वभावाला फणसाच्या सालीचा पोत आहे, दुखवत नाही पण फार जवळही येऊ देत नाही. 

– तर काहींच्या स्वभावाला मात्र, निरांजनाच्या प्रकाशाचा पोत आहे ..  शांत, शीतल, प्रसंगी दाहक, पण तरीही घर उजळून टाकणारा.

एकेका वयालासुद्धा निरनिराळा पोत असतो. 

– बालपणाला सायसाखरेचा पोत असतो,

–  पौगंडाला गुळगुळीत कागदावरच्या देखण्या चित्राचा पोत असतो, जे हवंहवंसं वाटतं पण हाती गवसत नाही. 

– तारुण्याला फुलपाखराच्या पंखांचा पोत असतो, देखणं, सुंदर पण विस्कटून जायला तत्पर. 

– तिशी-पस्तिशीला पाचशे रुपयांच्या कोर्‍या करकरीत नोटेचा पोत असतो, 

तर,

– पन्नाशीला धुऊन वापरून मऊ झालेल्या सोलापुरी चादरीचा पोत असतो.

–  साठीला मातीच्या मडक्याचा पोत असतो, दिसतं कणखर, पण असतं हळवं. 

– सत्तरीपुढे मात्र मिठाईवरच्या राजवर्खाचा पोत होतो,.. पाहताच मनात आदर निर्माण करणारा, मात्र काळजीपूर्वक हाताळायला हवं याचं भान देखील देणारा.

बघता बघता किती तऱ्हेतऱ्हेचे पोत या पोतडीत गोळा झालेत ना ?

स्वतःचा पोत ओळखा….!…. मनस्पर्शी पोत….. 

ह्या ‘पोता’नी अनेक आठवणींचं “पोतं” उघडेल…..अशी आहे बघा भाषेची करामत.!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ “मन साफ तर सर्व  माफ…!!” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “मन साफ तर सर्व  माफ…!!” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

कधीकधी केराचा डबाही, मनापेक्षा बरा वाटतो…!

दिवसातून एकदा का होईना निदान तो रिकामा तरी होतो…!!

आपण मात्र मनात कितीतरी, दुःखद आठवणी साठवतो…

काय मिळवतो यातून आपण…? स्वतःचे दुःख वाढवत रहातो…!

घडून गेलेल्या वाईट गोष्टी, वर्षानुवर्षे मनात ठेवतो…

त्या ज्याच्यामुळे घडल्या, त्यांचा पुढे तिरस्कार करतो…!

आता केराच्या डब्यासारखच, दररोज मनही साफ करायचं…

विसरून सारे जुने दुःख, स्विकारुन नव्या सुखांना आनंदाने भरायचं…!

सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचं.

स्वतः नेहमीच आनंदी रहायचं…!

आणि, दुसर्‍यांनाही आनंदी ठेवायच…!!

मन साफ तर सर्व  माफ…!!

आपला दिवस आनंदात जाओ || 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print