प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 1 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

डाॅ.भालचंद्र फडके

डाॅ.भालचंद्र फडके. एक ज्येष्ठ मराठी साहित्यिक. विद्यार्थीप्रिय आणि समाजप्रिय प्राध्यापक. समाजातील अनेकांना प्रेरणा आणि साहाय्य दिलेला कल्पवृक्ष. 

याचबरोबर  सामाजिक परिवर्तन, लोकशिक्षण अशा अनेक क्षेत्रांत मुक्त संचार केलेल्या निस्पृह आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या सरांच्या सहवासाचा परीसस्पर्श ज्यांना लाभला त्यांच्या आयुष्याचे सोने झाले. फडके सर म्हणजे अमृताचा अथांग सागर. त्यांना पहाण्याचे आणि ऐकण्याचे भाग्य मला मिळाले… 

फडके सर हे मोठे साहित्यिक होते. मात्र त्यांचे एकही पुस्तक शाळेत माझ्या वाचण्यात आले नव्हते. याचं एक मुख्य कारण होतं की,शाळेतल्या पुस्तकांत  त्यांचे धडे नव्हते. हायस्कूल संपवून मी पुढे ओतूरमधील काॅलेजात गेलो. पुणे  विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सेंट्रल कॅम्पसाठी काॅलेजकडून माझी निवड झाली होती. कॅम्प विद्यापीठाच्या परिसरातच होता. विद्यापीठाच्या विस्तीर्ण आणि निसर्गरम्य वातावरणात आमचा मुक्काम होता. तिथं अनेक जणांची उत्तमोत्तम भाषणं ऐकली. फडके सर तेव्हा विद्यापीठाच्या  प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाचे  संचालक होते. ‘ सामाजिक परिवर्तन आणि युवकांची भूमिका’ अशा कुठल्याशा विषयावर ते तास दोन तास बोलले  रहाण्याच्या तंबूंबाहेरच्या उन्हात आम्ही ते मन लावून ऐकत होतो. अतिशय पोटतिडीकीने सर बोलत होते. सरांना मी पहिल्यांदाच पहात होतो. तरी यांना कुठंतरी मी पाहिलंय असं जाणवत होतं. टीव्हीवर किंवा कुठल्यातरी वर्तमानपत्रात मी सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांना पाहिलं होतं. त्यांच्यात आणि फडके सरांमध्ये मला खूप साम्य जाणवले. 

काॅलेजमध्ये शिकत असताना मी काॅलेजतर्फे चालणा-या राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमात संघटक आणि पर्यवेक्षक म्हणून काम केले. विद्यापीठात त्याच विभागाचे फडके सर संचालक होते. त्यावेळी सर्वसामान्य माणसं आणि कार्यकर्ते यांच्याविषयी सतत पत्रे ,निरोप आणि फोनवरून काळजी करण्याची त्यांची प्रवृत्ती मी अनुभवली.

बी.ए. झाल्यावर मी पुण्यातील कर्वे इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सर्व्हिसेस या संस्थेतून एम.एस.डब्ल्यू.केले.

नंतर मी पुणे विद्यापीठातील प्रौढ, निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून रूजू झालो. सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी सरांचा दांडगा लोकसंपर्क, सर्वसामान्य माणसांविषयी  कळकळ  आणि साध्या रहाणीतून त्यांची महानता  मी अनुभवली. आमच्या विभागातर्फ प्रौढ शिक्षण आणि विविध सामाजिक विषयांवर सतत चर्चासत्रे, कृतिसत्रे, परिसंवाद, प्रशिक्षण कार्यक्रम आणि विविध पातळ्यांवर परिषदा आयोजित केल्या जात. त्यावेळी समाजाच्या अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि नामवंत अभ्यासकांना सर आवर्जून घेऊन येत.

माझ्या मते १९८५  वर्ष असावं. देशातील प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आयोजित केलेले पहिले ‘समर इन्स्टिटय़ूट’ आमच्या विद्यापीठात झाले. त्याचे संपूर्ण नियोजन फडके सरांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम हा केंद्राधारित होता. यात वस्ती किंवा गाव  हा आधार होता. यात तीस निरक्षरांना केंद्रात शिक्षण देणे अपेक्षित होते. मात्र एक अडचण सतत जाणवत होती. अनेक दुर्गम भागात निरक्षरता असूनही तीस निरक्षर एकत्र मिळवणे, इतके लोक एकत्र बसतील अशा जागेची उपलब्धता, साहित्याची उपलब्धता होणे अडचणीचे होते. प्रौढ शिक्षण कार्यक्रमातील ही अडचण लक्षात घेऊन एका नवीन कार्यक्रमाचे सूतोवाच फडके सरांनी समर इन्स्टिटय़ूटमध्ये केले. पुढे ‘ कार्यात्मक साक्षरता सामूहिक कार्यक्रम ‘ (Mass program for Functional Literacy)  देशभर कार्यान्वित  झाला. या कार्यक्रमाची बीजे मला फडके सरांच्या त्या भाषणातील मांडणीत दिसून येतात.  पुणे शहरातील विविध वस्त्यांतून विद्यापीठाने प्रायोगिक प्रौढ शिक्षण केंद्रे चालवली. मी या केंद्रांचा समन्वयक होतो. यावेळी या केंद्रातून अनेक उपक्रम राबवले गेले. त्यातून कार्यक्रमांचे नियोजन आणि व्यवस्थापन मी शिकलो.

फडके सरांची एक आठवण मला सांगावीशी वाटते. दिल्ली विद्यापीठातील प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाचे  संचालक डाॅ.एस.सी.भाटिया होते, त्यांनी सांगितलेली ती आठवण…

तेव्हाच्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी भाटिया सरांकडे सरकारच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यावेळी त्यांनी फडके सरांच्या नावाची सूचना मंत्र्यांना केली. सरकारच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी फडके सर अधिक प्रभावीपणे बोलू शकतील असा विश्वास त्यांनी मंत्र्याकडे बोलून दाखवला. मंत्र्यांना भेटायला फडके सर बुशशर्ट आणि पायात चप्पल घालून रेल्वेने गेले आणि सरकारला प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी परखड शब्दांत सुनावले होते.

बारामतीतील एका काॅलेजने प्रौढ शिक्षण कार्यक्रमाला मदत करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा एक दिवसीय मेळावा आयोजित केला होता. यासाठी सरांसोबत आम्ही विभागातील सर्वजण गेलो होतो. काॅलेजने आयोजित केलेला हा एक अभिनव उपक्रम  होता. तो अतिशय यशस्वी झाला. पुण्यात पोहचल्यावर सरांनी यावर मला एक लेख लिहायला सांगितलं .तो लेख त्यांनी सकाळ या नावाजलेल्या वर्तमानपत्रात प्रकाशित होण्यासाठी प्रयत्न केले.

सरांसोबत विभागातील आम्ही अनेक सहकारी नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर काॅलेजच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाला भेट देण्यासाठी गेलो होतो. काॅलेजमधील प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिका-यांनी विड्या वळणा-या कारखान्यातील प्रौढ शिक्षण केंद्रात आमची भेट आयोजित केली होती. एका हाताने विड्या वळत  तेथील निरक्षर महिला शिक्षण घेत होत्या. कामात मग्न असलेल्या महिलांना कसं शिकवायचं हे आव्हान होतं. फडके सरांनी ते आव्हान लिलया पेलले. .तिथल्या फळयावर सरांनी एक शब्द लिहिला- काजू.या शब्दावर सरांनी चर्चा सुरू केली. सरांनी महिलांना विचारलं,” काजू हा एक शब्द आहे.या शब्दांत दोन शब्द लपले आहेत. कोणते ?”

” का आणि जू ” उत्तर आले.

सर ‘का’ विषयी बोलले- “ जगात कोणतेही प्रश्न ‘का ‘या शब्दांतून निर्माण होतात ” असं सांगून ‘ जू ‘म्हणजे काय?”

असा प्रश्न त्यांनी विचारला.स्तब्धता पसरली.सरच म्हणाले, ” जू तुमच्या मानेवर नेहमीच असते.” असं म्हणून स्त्रियांच्या रोजच्या जीवनातील विविध प्रकारच्या  जूचे त्यांनी वर्णन केले.

– क्रमशः भाग पहिला. 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments