श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

दग्ध शौर्य- आम्रफले ! —  ☆ श्री संभाजी बबन गायके 

आपल्या देश-वृक्षाला लगडलेल्या एकशे चाळीस कोटी विविध फळांपैकी पाच आम्रफळं काल-परवा जळून गेली… याची एकशे चाळीस कोटींमधल्या किती जणांना माहिती आहे, देव जाणे!

रमज़ानचा महिना संपायला दोनेक दिवसच शिल्लक आहेत. दिवसभराचा उपवास सोडणं म्हणजे ‘इफ्तार’ एक आनंदाचा क्षण असतो… सर्वधर्मसमभाव तत्वाला जागून आणि उच्च दर्जाच्या सैन्य परंपरेचा एक अविभाज्य भाग म्हणून जम्मूमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्यानं तिथल्या एका गावासाठी ‘इफ्तार’ देऊ केला आहे… त्याचं आमंत्रण साऱ्या गावानं स्वीकारले आहे… कार्यक्रम ठरला आहे. सैन्य या पवित्र कार्यासाठी तयारीला लागलं आहे. आज रात्री सारं गाव एकत्रित उपवास सोडेल… त्यासाठी लागणारी साधनसामग्री आणि विशेषत: फळं खरेदी करून काही जवान शहरातून लष्करी-वाहनातून निघाले आहेत.

दुपारनंतरची साधारणत: चारची वेळ. जोराचा पाऊस सुरू झाला… अंधारून आलं आहे. समोरचं दिसणं दुरापास्त झालेलं आहे… आणि अचानक जवानांच्या वाहनांवर जणू वीज कोसळते… म्हणजे उठलेला आगीचा प्रचंड मोठा लोळ आणि झालेला आवाज यावरून कुणालाही वाटावं… वाहनावर वीजच कोसळली आहे ! 

पण ती वीज नव्हती… प्रचंड शक्तीचा आणि रॉकेट डागतात त्या उपकरणातून डागला गेलेला हातबॉम्ब होता… जोडीला ऑटोमॅटिक रायफल्समधून काही क्षणांसाठी केला गेलेला गोळीबार. हे सारं काही क्षणांत घडलं.

आग भडकली आहे…. शक्य झाले त्या जवानांनी वाहनाबाहेर उड्या घेतल्या… पण पाच तरूण, तडफदार, शूर, बळकट देह मात्र त्या गदारोळात वेळेत बाहेर नाही पडू शकले. त्यांच्या देहाला आगीने एखाद्या अजस्र अजगरासारखा विळखा घातला होता… 

अग्निदेवतेने या देहांवर कोणतीही दयामाया नाही दाखवली… कारण आगीला माणसं नाही ओळखता येत. ही तर नामर्द, भित्र्या, पळपुट्या शत्रूनं लपून लावलेली आग. आग लावलेले नपुंसक लगेच पसारही झाले तिथल्या जंगलात. 

बचावलेल्या सैनिकांनी ही जळती शरीरं कशीबशी वाहनाबाहेर ओढून काढली… वेदनेनं आकांत मांडलेला होता… देहापासून त्वचेने फारकत घेतलेली आणि प्राणवायू देहात प्रवेश करायला कचरत असलेला… आणि बाहेर पडलेला श्वास पुन्हा न परतण्यासाठी निघून चाललेला…

काही क्षणांत चौघांचा जीवनवृक्ष जळून गेला… पाचवा त्याच मार्गावर निघून गेला काही वेळानं. त्यांच्या सवंगड्यांच्या दु:खाला, रागाला, अगतिकतेला पारावर नाही राहिला… कसा रहावा… सततचा सहवास… घट्ट मैत्री.. एकमेकांसाठी जीव द्यायची आणि घ्यायचीही तयारी असलेले हे रणबहाद्दर… पण असल्या भित्र्या हल्ल्यात लढण्याची साधी संधीही न मिळता बळी गेले… त्यांच्यासोबत त्यांनी नेलेली फळेसुद्धा काळीठिक्कर पडलेली होती… फुलांची राखरांगोळी झालेली होती. पाच माणसंच नव्हे तर पाच कुटुंबं बेचिराख झाली होती क्षणार्धात! 

हल्ल्याचा कट कुणी रचला, कुणी मदत केली, कुणी घात केला… सारं शोधून काढलं जाईलच… आणि प्रतिशोधही घेतला जाईल एक न एक दिवस! समोरासमोरच्या हातघाईच्या लढाईत तर शत्रू वाऱ्यालाही उभा राहण्याच्या लायकीचा नाही. पण कपटाने वार करतो! 

त्या पाच जवानांच्या आई-वडिलांच्या, बहिणींच्या, भावांच्या, पत्नींच्या, लहानग्या लेकरांच्या प्रश्नांना उत्तर नाही आजमितीला कुणाकडे. शत्रूला उत्तर दिले जातेच… पण हे पाच देह पुन्हा दिसणार नाहीत. आधीच जळून गेलेले हे देह आता तर खऱ्याखुऱ्या सरणामध्ये जळून राख झालेत आणि कदाचित जळाला अर्पितही झाले असतील. 

ज्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी हि कोवळी फुलं अकाली गळून जातात, जळून जातात त्यांची या देशातल्या सामान्य जनतेला काही तमा आहे की नाही, हा प्रश्नच आहे. की केवळ एकशे चाळीस कोटी वजा पाच असा हिशेब होणार आहे… यापूर्वी झाला तसा? 

हा देश या शूरवीरांच्या सन्मानार्थ एक क्षणही स्तब्ध होत नाही. या राज्यातील जनतेला त्या राज्यातील गेलेल्या सैनिकाबद्दल विशेष काही वाटत नाही. वृत्तपत्रांत, दूरदर्शन वाहिन्यांवर एक बातमी म्हणून ही घटना दिसते आणि लुप्त होऊन जाते. आप्तांचे शोकग्रस्त चेहरे दाखवण्यात, आजकालच्या प्रथेनुसार झालंच तर शॉर्ट रील बनवून ते लाईक्स, शेअरसाठी प्रसृत केले जातात. ‘तेरी मिट्टी में मिल जावॉ…’ ‘याद करो कुर्बानी’ म्हणून झालं की राष्ट्रीय कर्तव्य संपले. चित्रपटगृहात सिनेमापूर्वी बावन्न सेकंद कसंबसं उभं राहून नंतर हवं ते एन्जॉय करायला प्रेक्षक सज्ज होतात तशातली त-हा! 

का नाही हा देश हुतात्म्यासाठी एक दोन मिनिटं देत त्या दिवशी? का नाही सार्वजनिक प्रार्थना होत, शोकसभा होत ठिकठिकाणी? का बलिदानं प्रादेशिक झालीत आजकाल? विदर्भातील जवान धारातीर्थी पडला की फक्त विदर्भानेच आसवं गाळायची? बाकीच्यांनी आयपीएलच्या लुटुपुटुच्या लढाया बघण्यासाठी महागडी तिकीटं विकत घेऊन मज्जा करायची! 

सैनिकांच्या कल्याणासाठी देणारे नियमित देणग्या देतात… ज्यांची ऐपत नाही त्यांनी देऊ नये. हुतात्मा, जखमी सैनिकांच्या परिवारांची काळजी घेणारी काही सहृदय माणसं आहेत या देशात… इतरांना नसेल जमत हे तर नको जमू देत. पण ज्यांनी आपल्यासाठी आपले प्राण वाहिले त्यांच्या प्रती एका दमडीची संवेदनाही दर्शवू नये लोकांनी याचे सखेद आश्चर्य वाटते. 

जनतेची चूक नाही. जनता अनुकरणशील असते. ह्या सवयी राज्यकर्त्यांनी, समाजधुरीणांनी लावायच्या असतात, संवेदंशीलतेच्या, कृतज्ञतेच्या परंपरा निर्माण करायच्या असतात. रशियात नवविवाहित जोडपी पहिली भेट देतात ती त्या देशासाठी लढताना प्राणार्पण केलेल्या सैनिकांच्या थडग्यांना ! आपण कधी बोध घेणार… हाच सवाल आहे. 

“धगधगत्या समराच्या ज्वाळा… या देशाकाशी… जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी “ ..  हे कुसुमाग्रजांचे शब्द सत्यात उतरत राहतीलच… कारण सैनिक कधी मरणाला घाबरणार नाही ! पण आपले काय? आपण प्रार्थनाही करू शकणार नाही का निघून गेलेल्या सैनिकांच्या आत्म्यासाठी? धीराचे दोन शब्दही नाही का देऊ शकणार रडणाऱ्या विधवांसाठी, म्हातारपणाची काठी हरवलेल्या आई-बापांसाठी, तडफडणाऱ्या बहिणींसाठी, मूकपणाने आसवं ढाळणाऱ्या भावांसाठी आणि विव्हळणाऱ्या बालकांसाठी? 

 सैनिकांच्या हौतात्म्याचा शोक घरातून जेव्हा राष्ट्रीय सार्वजनिक पातळीवर पोहोचेल तेव्हाच हुताम्याच्या हौतात्म्याला अर्थ प्राप्त होईल ! तुमच्या आमच्या सुदैवाने हे हुतात्मे यापेक्षा अधिक काही मागत नाहीत ! 

 २० एप्रिल,२०२३ रोजी जम्मू जवळच्या पूंछ येथे झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडलेले लान्स नायक कुलवंत सिंग यांचे वडील बलदेव सिंग हे सुद्धा कारगील युद्धात हुतात्मा झाले होते. कुलवंत सिंग यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सैन्यात पाऊल ठेवले होते. या दुर्दैवी घटनेत हवालदार मनदीप सिंग, लान्स नायक देबाशिष बसवाल, शिपाई हरिक्रिशन सिंग, शिपाई सेवक सिंग ही चार आणखी आम्रफळे देशाच्या वृक्षावरून खाली कोसळून पडली…. हा वृक्ष याची वेदना अनुभवतो आहे का? 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

(जरा जास्तच झालं ना लिहिताना? पण इलाज नाही. इतर कुणाला हे सांगावंसं वाटलं तर जरूर सांगा. नावासह कॉपीपेस्ट्, शेअर करण्यासाठी परवानगीची गरज नाही. शक्य झाल्यास या जळीताचा व्हिडीओ बघून घ्या इंटरनेटवर… धग जाणवेल !)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments