मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आजीची माया… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आजीची माया… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

“आई, येत्या सत्तावीस एप्रिलला अनु आणि प्रिया विथ फॅमिली आपल्याकडे येणार आहेत!” सुधीरनं मोठ्या उत्साहात सांगितलं. 

“गेल्या कित्येक वर्षात त्या एकत्र कधीच फिरकल्या नाहीत. तर आताच दोघींना एकाचवेळी यायचं कसं सुचलं? तेहि असं अचानक?” सरस्वती खिन्न मनाने बोलली.

“अगं असं काय करतेस? येत्या तीस एप्रिलला तुझी पंचाहत्तरी साजरी करायचीय आहे ना?”

“माझी पंचाहत्तरी साजरी करायची काही आवश्यकता नाही. मी वयाने वाढले आहे, त्यात माझं काय कर्तृत्व आलंय? तो काळाचा नियम आहे, त्यात माझी काहीच कर्तबगारी नाही.” सरस्वती अनिच्छेनेच बोलली.

“आई तू म्हणतेस ते खरं आहे. अगं कृतज्ञतेचा म्हणून एक भाग असतो. आई वडिलांची पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन असे कौतुकसोहळे प्रियजनांना साजरे करावेसे वाटतात. आई, हे सगळं या दोघी बहिणींनी मिळून हे ठरवलंय. त्या दोघींचं ह्या निमित्ताने मनमिलाप झालं असेल तर मी कसं नाही म्हणू?” सुधीरनं सांगितलं. पण सरस्वतीला ते खरं वाटलं नाही. ती काहीच बोलली नाही.           

सुधीरनं लगेच अनुला फोन लावला. “अनु, तुम्ही सहकुटुंब सत्तावीस एप्रिलला इथे हजर असणार आहात. मी कसलीही सबब ऐकून घेणार नाही. येत्या तीस एप्रिलला आईची पंचाहत्तरी साजरी करायचीय. अनु आणि प्रिया या दोघींनीच हा कार्यक्रम आखला आहे म्हणून मी आईला पटवून सांगितलंय. ती किती खूश झाली, हे तुला कसं सांगू? तुम्ही दोघी आता एकत्र येणार नसाल तर कधी येणार आहात गं, आई गेल्यावर?.. खूप झालं तुमचं नाटक. तुम्हा सगळ्यांची रेल्वेची तिकीटं मी उद्या बुक करतोय. समजलं?” अनु काही बोलायच्या आतच सुधीरनं फोन ठेवून दिला. प्रियाला फोन लावून त्यानं तेच संभाषण रिपीट केलं.             

कित्येक वर्षानंतर, नागपूरहून अनसूया आणि नाशिकहून प्रियवंदा त्यांच्या मुलांच्या सोबत एकाच दिवशी माहेरात येऊन पोहोचल्या. दोन्ही लेकी, चारी नातवंडांना पाहून सरस्वतीच्या चेहऱ्यावर आनंदाचं प्रसन्न चांदणं पसरलं. कधीकाळी उन्हाळ्याच्या सुटीत ही मंडळी दरवर्षी न चुकता यायची आणि जाताना एकाच दिवशी जायची.

नातवंडांनी भरलेलं गोकुळ पाहून सरस्वतीला काय करू, काय नको असं व्हायचं. कुठल्या दिवशी काय बेत करायचा ते सरस्वती आधीच ठरवायची. त्यानुसार सून सुजाता कामाला लागायची. 

त्या मेनूत सरस्वती एकदा तरी न्याहरीला गव्हाची गूळ घालून केलेली लापशी स्वत:च्या हातानं बनवायचीच. त्यात काजू बदामाचे तुकडे पेरलेले असायचे, त्यावर तुपाची धार पडताच खमंग वास सुटायचा. सुरूवातीला एका बाऊलमधे  लापशी घेऊन सरस्वती आपल्या मऊशार सायीसारख्या हातानं ती सगळ्या नातवांना प्रेमानं एक एक घास भरवायची. दोन्ही मुलींची चार आणि सुधीरची दोन मुलं अशी एकंदरीत सहा नातवंडे डायनिंग टेबलवर पाहून सरस्वतीचा जीव आनंदाने भरून जायचा. 

सरस्वतीच्या तिन्ही मुलांना एक मुलगा आणि एक मुलगी ह्याचं वरदान लाभलेलं होतं. सगळी मुलं एकाच वयाची होती. फार तर दोन तीन वर्षाचं अंतर. सरस्वतीला मुद्दलाचा विसर पडला होता, ती व्याज पाहूनच हरखून जायची.   

सुधीरमामा तालेवार नसला तरी मोठा दिलदार माणूस. आणि भाचरांवर जीव ओवाळून टाकणारा. उन्हाळा म्हटलं की आंब्याचेच दिवस. भाचरं यायच्या आधीच हापूस आंब्यांच्या पेट्या आणून ठेवायचा. सुधीरमामाला आंब्याची छान पारख होती. आमरसासाठी हापूस तर कापून खायला केशर, बदाम, लालबाग, लंगडा, तोतापुरी घेऊन यायचा. प्रत्येक आंब्याची वेगळीच चव असायची. आंब्यांचा घमघमीत सुवास सर्वत्र दरवळत असायचा. सगळी मुलं एकत्र बसून हसतखेळत कधी आमरस पुरी तर कधी आमरस धिरडं आणि त्या सोबत कुरडया, पापड्या, मिरची भजी, मसालेभात हादडायचे. वामकुक्षी म्हणत मुलं तासभर झोप काढायचे. कधी त्यांचे पत्त्यांचे डाव रंगत असत तर कधी कॅरम बोर्ड लागायचा. 

संध्याकाळ झाली की सगळी मुलं आजीबरोबर शुभंकरोती म्हणायचे. आजी-आजोबा चांदण्याच्या आकाशाखाली बसून रामायण महाभारतातल्या कितीतरी गोष्टी सांगायचे. मामा व्हीसीआर सोबत एकाद्या सिनेमाची व्हिडियो कॅसेट भाड्याने घेऊन यायचा. सिनेमा पाहून झाला की रात्रीच्या जेवणाची वेळ व्हायची. कुणालाच तशी जास्त भूक नसायची. कधी पावभाजी तर कधी साधी खिचडी किंवा थालीपीठ खाल्लं की भागायचं. 

गच्चीवर संध्याकाळी पाईपने पाणी मारून ठेवल्याने सगळी मुलं रात्री झोपायला ते गच्चीवरच जात असत. तोवर गच्ची थंड झालेली असायची. त्यावर मस्त गाद्या पसरून मुलं ठिय्या मांडत असत. गप्पा गोष्टी करत, रेडिओवर विविध भारतीची गाणी ऐकत पडायचे. थंड हवेच्या झुळकीने झोप अनावर झाली की आकाशातले नक्षत्र, तारे मोजत हळूहळू डोळे मिटत मस्त झोपायचे. सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडल्यावरच उठायचे. कुणीही उठवायला यायचा नाही.

सर्व मुलांच्या दरम्यान एक अतूट स्नेहाचा घट्ट धागा होता. दोघा बहिणींचं अतिशय घट्ट सख्य होतं. प्रियंवदेची मुलं अभ्यासात खूप हुशार होती. प्रियंवदा मोठ्या उत्साहाने तिच्या मुलांची प्रगती अनसूयेला सांगायची. बघता बघता मुलांच्यातल्या निरोगी स्पर्धेचं रूपांतर कधी असूयेत झालं हे कुणाला कळलंच नाही. दोघा बहिणींच्या नात्यात खोल दरी निर्माण होत गेली. मुलांचं आजोळी येणं बंद झालं. 

संस्कार वर्ग, पोहण्याचे क्लासेस, गिटार क्लासेस, व्हेकेशन बॅचेस, त्यासाठी एक ना अनेक कारणं होती. त्यामागचं खरं कारण वेगळं होतं हे कळायला सरस्वतीला वेळ लागला नाही. अनसूयेच्या मनात असूयेनं स्थान मिळवलं. ताईला माझ्या मुलांची प्रगती पाहवत नाही हे प्रियंवदेच्या मनात घर करून राहिलं. 

मुलं आता आपापल्या दुनियेत व्यस्त झाली. नोकरीही करत होते. कुणी सॉफ्टवेअर तरी कुणी कुठे. नात्यात ईर्ष्या आणि गैरसमजाचा कळी शिरला की त्यात दुरावा हा येतोच.     

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥गुरुदक्षिणा॥ – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥ गुरुदक्षिणा ॥ – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(एक दिवस आश्रमाचे माझ्या वडिलांच्या वयाचे  व्यवस्थापकच हे करायला लागले तेव्हा मी पळून गेले तिथून.) इथून पुढे – 

मी दहावीची परीक्षा दिली होती. मी मामाकडे आले. त्याच्या संसारात मी जडच होते त्यांना ! मामा म्हणाला, “ बकुळ,आपण लग्न करूया तुझं ! “ पण बाई, हे असले किळसवाणे अनुभव घेऊन मला पुरुष देहाबद्दल प्रचंड तिटकारा वाटायला लागला होता..मी  मामाला सांगितलं, “ मी जन्मात नाही लग्न करणार. तू जर माझं लग्न बळजबरीने लावलंस तर मी जीव देईन.”  त्यांना दोघांना मी घडलेली हकीकत सांगितल्यावर तर रडूच आलं त्यांना. मी गावाकडे केली बारीकसारीक कामं, पण तिथे कोण देणार एवढा पैसा? मग मला एका बाईंनी पुण्याला आणलं. त्या मावशींनी छान  काम दिलं आणि तुमच्यासारखी चांगली माणसं पण मिळाली. बाई, मी कायम राहीन तुमच्याकडे. मला आता दुसरीकडे नका ना पाठवू. “ 

देवकीच्या डोळ्यात पाणी आलं. “ बकुळ, तू फार गुणी आणि हुशार आहेस. तू असं आयुष्य वाया नको घालवू ग. पुढे शीक, असं काहीतरी शिक्षण घे की तुला सन्मानाने जगता येईल. मी शिकवीन, सगळी मदत करीन तुला. शिकशील का पुढे? बघ ! किती मार्क होते तुला दहावीला? “ बकुळ म्हणाली “ ऐशी टक्के “     “अग वेडे, मग तर तू घरकाम नाहीच करायचं. आपण तुला डी एड ला घेऊया प्रवेश. करशील ना? दोन वर्षे शिकावे लागेल पण जन्माचं कल्याण होईल ग बाळा तुझं !” 

“ बाई,मी नक्की करीन तुम्ही म्हणताय तर ! तुम्हाला अपयश देणार नाही मी .आणि तुमचे सगळे पैसे फेडून टाकीन मी! “ 

“ वेडे, ते बघू नंतर. मला काय कमी आहे बकुळ? तू फक्त  वीस वर्षाची आहेस जेमतेम. बघूया काय  करता येतं ते.” एका प्रख्यात कॉलेजमध्ये बकुळला डी एड ला सहज प्रवेश मिळाला. बकुळ लवकर उठून जमेल तेवढं काम करून कॉलेजला जायची. राहीने आनंदाने बकुळला आपली सायकल दिली. तिने नवीन टू व्हीलर घेतल्याने सायकल पडूनच होती तिची.  बघता बघता बकुळच्या डीएडचं पहिलं वर्ष संपलं. बकुळला खूप सुंदर मार्क्स मिळाले. आता ती त्या कॉलेजमध्ये रुळून गेली. तिला काही वेळा वाटायचं, आपण काम करणारी मुलगी आहोत, आणि दिवसभर हा कोर्स करत असल्याने आपला घराला पूर्वीसारखा उपयोग होत नाही. ही  खंत ती बोलून दाखवायची देवकीला. देवकी तिला म्हणायची, “असं नको म्हणू. माझी मुलं लहान असताना तू खूप मदत केली आहेस बकुळ ! आता निवांत शीक, लक्ष लावून अभ्यास कर बेटा. सगळं छान होईल तुझं बघ.” बकुळ चांगल्या मार्कानी डीएड झाली. तिला एका शाळेत नोकरीची ऑफर सुद्धा आली.

.बकुळ पेढे घेऊन आली आणि तिने देवकीच्या पायावर डोकं ठेवलं. “ अग वेडे, हे काय करतेस? “ देवकीने तिला पोटाशी धरलं. “ नाही हो बाई, मी बघते ना, आमच्या डी एड कॉलेजमध्ये कुठून कुठून मुली येतात हो ! त्या किती कष्ट करून शिकतात, कोणी पहाटे मेसमध्ये दोनशे पोळ्या करून येतात, तर कोणी चाकणहून रोज अपडाऊन करतात. किती हाल आहेत बाई बाहेर ! कोणाचे वडील दारुडे तर कोणाची आईच अपंग ! किती किती सोसतात हो मुली बाहेरच्या जगात !” बकुळच्या डोळ्यात पाणी होतं हे सांगताना. “ बाई,एक मुलगी तर पोलिओ झालेली आहे पण किती जिद्दीने शिकतेय. मी तर किती भाग्यवान आहे हो, तुमच्या घरी सुरक्षित राहून शिकले आहे. मुलीसारखी मानता मला तुम्ही. बाई, हे बघा ना माझं  लेटर. मला पंधरा हजार पगार देणार आहेत सुरुवातीला. मी करू ना ही नोकरी? “ 

“ अग जरूर कर बकुळ ! खूप खूप अभिनंदन तुझं ग !” 

“ बाई,”  संकोचून बकुळ म्हणाली.. “ मी आता इथे किती दिवस रहाणार? मी डी एड कॉलेजच्या वसतिगृहात राहीन आता. मला ते कमी खर्चात तिकडे राहू देणार आहेत. आता आणखी नका लाजवू.  जाऊ द्या मला आता बाई !” बकुळ रडायला लागली. सगळं घर तिच्याभोवती जमलं.आजींना सुद्धा गहिवरून आलं… “ जा तू बकुळ. अशीच स्वतःच्या पायावर उभी रहा.” आजींनी तिला पाचशे रुपये बक्षीस दिले. “ सुट्टीच्या दिवशी येत जा हो रहायला हक्काने!” त्या म्हणाल्या.

देवकीने बकुळला छानशी बॅग दिली, छान साड्या घेऊन दिल्या. बकुळ होस्टेलवर राहायला गेली. तिने देवकीशी कायम संपर्क ठेवला. बकुळ आता पर्मनंट झाली नोकरीत.  मग तिचं फारसं  येणं जाणं होऊ शकेना देवकीकडे. देवकीची मुलं मोठी झाली. रोहन राही पुढचं शिकायला अमेरिकेला गेले आणि घरात देवकी आणि तिचा नवरा एवढेच उरले. आजीही मध्यंतरी कालवश झाल्या.

आज अचानक खूप वर्षांनी बकुळ देवकीला भेटायला आली. “ बाई, कशा आहात? “ म्हणून तिने मिठीच मारली देवकीला. “  बाई मी आता एका शाळेत सुपरवायझर झाले, आणि मी त्या शाळेच्या हॉस्टेलची मेट्रन म्हणून पण काम करते. मला शाळेने रहायला क्वार्टर्स पण दिले आहे बाई ! तुमची कृपा सगळी … “ बकुळच्या डोळ्यात अश्रू होते. “ बाई, मला लग्न कधीच नाही करावंसं वाटलं नव्हतं आणि आत्ताही वाटत नाहीये. मी आता अशीच मस्त राहीन. नको वाटतो तो अनुभव मला. आणि खूप मिळवतेय की मी ! बाई तुमचे उपकार कसे फेडू? नाही तर ही बकुळ अशीच घरकाम करत, कदाचित अशीच मरूनही गेली असती. तुम्ही देवमाणसं आहात बाई ! “ बकुळने देवकीच्या पायावर डोकं ठेवलं. “ बाई डोळे मिटा ना जरा….”   बकुळ हसत म्हणाली.

देवकीने हसत डोळे मिटले. बकुळने तिच्या हातावर काय ठेवले हे बघायला डोळे उघडले तर हातात सोन्याचे चांगलेच जड नाणे होते. “ बाई, तुम्ही माझ्यासारख्या दगडातून सोनं घडवलं म्हणून हे माझी आठवण म्हणून तुम्हाला ! नाही म्हणू नका  ना ! तुम्ही केलंत ना, त्यापेक्षा याची किंमत कमीच आहे, पण आज गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून मला घडवणाऱ्या पहिल्या गुरूला ही गुरुदक्षिणा ! ” 

देवकीने बकुळला जवळ घेतले आणि दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. “आनंदाश्रू आहेत हे बकुळ… नको पुसू !” देवकी म्हणाली आणि आत चहा करायला वळली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥गुरुदक्षिणा॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥ गुरुदक्षिणा ॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

दारावरची बेल वाजली. आत्ता दुपारी कोण आलं असेल म्हणून देवकी जरा वैतागूनच दार उघडायला गेली. . . दार उघडलं तर दारात बकुळ उभी.

जवळजवळ सात आठ वर्षांनी देवकी बकुळला बघत होती. पहिल्यांदा तर तिने बकुळला ओळखलंच नाही. केवढा बदल झाला होता बकुळ मध्ये ! छानसं पोनीटेल, एका हातात घड्याळ आणि गळ्यात सोन्याची चेन. अंगावर सुंदर साडी आणि प्रसन्न हसतमुख चेहरा !

कुठे पूर्वीची कामवाली बकुळ !  शेपटा वळलेला, मोठं कुंकू आणि  हातभर बांगड्या. बकुळ देवकीकडे दिवसभर कामाला होती. देवकी होती भूल देणारी डॉक्टर. चोवीस तास तिला केव्हाही कॉल यायचे. देवकीची मुलं लहान होती आणि देवकीला चोवीस तास रहाणाऱ्या बाईची अत्यंत गरज होती. तिचे सासू-सासरे होते म्हणा, पण देवकीच्या सासरचा गोतावळा खूप होता. सतत पाहुणे, माणसांचे येणे जाणे असायचं आणि मग सासूबाईंना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ व्हायचा नाही. देवकीचा नवरा होता डोळ्यांचा डॉक्टर ! तोही दिवसभर घरी नसायचा.

देवकीने हजार लोकांना बाईबद्दल सांगून ठेवले होते. अशात कोणीतरी ही बकुळ पाठवली. आली तेव्हा बकुळ असेल सोळा सतरा वर्षाचीच. पहाता क्षणीच देवकीला आवडली ही मुलगी. मोठे डोळे, पण विलक्षण चमकदार ! 

देवकी म्हणाली, “ काय ग नाव तुझं? किती शिकली आहेस? कोणी पाठवलं तुला? “ 

“ बाई, मी बकुळ ! तुमच्या मैत्रीण नाहीत का उषाताई, त्यांनी पाठवलं मला. मी काम करत होते त्या मावशी मुलाकडे गेल्या कायमच्या. मला राहून असलेलं काम हवंय म्हणून मला उषाताईंनी पाठवलं. मी दहावी शिकले बाई, पण पुढं नाही शिकता आलं. मला. आईवडील नाहीत, मामाने वाढवलं आणि आता मामी नको म्हणती मला रहायला. रोज रोज भांडण करण्यापेक्षा मीच मग चोवीस तासांचं काम बघतेय “. . एका दमात बकुळने आपली माहिती सांगितली.

देवकीला अत्यंत गरज होती अशा बाईची ! ती म्हणाली  “ मी बघते तुला ठेवून घेऊन महिनाभर ! आवडलं, आपलं पटलं तर मग बघूया. मी कधीही केव्हाही बाहेर जाते. आजी आहेत कुरकुऱ्या, तुला पटवून घ्यावे लागेल हं ! “ बकुळ हसली आणि म्हणाली, “ बाई, उद्यापासून येऊ ना? “ देवकीला फार आनंद झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच बकुळ हजर झाली. नीट नेटकी साधी साडी, जाड केसांचा शेपटा, त्यावर गजरा !देवकीचा बंगला मोठा होता, त्यामुळे बकुळला ठेवून घेण्यात देवकीला अडचण नव्हती. आल्याआल्या पदर बांधून देवकी म्हणाली, “ बाई, घर दाखवा ना आपलं ! स्वयंपाकघरात गेल्यावर आजींना तिनं खाली वाकून नमस्कार केला. आजींनी प्रश्नार्थक मुद्रेने देवकीकडे बघितलं.

“ आजी, ही बकुळ. आपल्याकडे राहून काम करणार आहे. तुमच्या हाताखाली ही मदत करील तुम्हाला स्वयंपाक घरात ! “ 

आजी म्हणाल्या, “ हो का? आत्तापर्यंत सतरा जणी आल्या, आता हिचा काय उजेड पडतो बघूया. ”  देवकीने बकुळकडे पाहिलं. बोलू नकोस अशी खूण केली आणि तिला तिची खोली दाखवली. देवकीने तिला काम समजावून सांगितलं. मुलांची ओळख करून दिली. तेवढ्यात फोन वाजलाच ! डॉ मराठ्यांकडे तिला लगेचच कॉल होता.

देवकी म्हणाली, “ बकुळ मी जातेय ! जमेल तसं कर. आले की बाकीचे सांगेन मी !” त्या दिवशी देवकीला घरी यायला रात्रीचे नऊ वाजले. एक मिनिट फुरसत मिळाली नाही तिला. घरी आता काय काय झालं असेल म्हणतच देवकी घरी आली. हॉलमध्ये  देवकीची मुलं राही आणि रोहन बकुळ जवळ बसले होते आणि ती त्यांना गोष्ट सांगत होती आणि आजी सुद्धा ऐकत होत्या, मन लावून ! देवकीने सुटकेचा निश्वास टाकला. सुरुवात तरी चांगली झाली म्हणायची… देवकी हसून मनाशी म्हणाली. हळूहळू बकुळ घरी रुळायला लागली. देवकीच्या फोनजवळ डायरी असायची आणि त्यात सगळे तिचे कॉल्स वेळ, तारीख नोट केलेले असायचे. बकुळ हळूहळू हे करायला शिकली. आता देवकीला कोणताही फोन आला की बकुळ म्हणायची, “ एक मिनिट हं सर ! बाईंची डायरी बघून सांगते. मी ! उद्या आठ वाजता नाहीये कुठे कॉल. मी लिहून ठेवते तुमचा कॉल आणि बाई आल्या की मग करतीलच तुम्हाला कॉल. ! “ बाकीच्या डॉक्टरांना बकुळचे कौतुकच वाटायचे. ‘ देवकी, तुझ्या बकुळने फिक्स केलाय बरं कॉल ! मस्त तयार झाली ग तुझी ही असिस्टंट ! “ इतर डॉक्टरणी देवकीला हेव्याने म्हणायच्या. बकुळ हळूहळू उजवा हात झाली देवकीचा. घरात तर ती सगळ्यांची आवडती झालीच ! रोहन राहीला तर एक क्षण करमत नसे बकुळताई शिवाय, आणि आजीही खूष होत्या तिच्यावर ! देवकीला खूप लळा लागला बकुळचा. ती आता घरातलीच सदस्य नव्हती का झाली? मुलं मोठी व्हायला लागली. आता तर त्यांना सांभाळायची आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायची तशी गरजही उरली नाही. देवकी एक दिवस लवकर घरी आली होती. बकुळचे सगळे काम संपले होते. देवकीने तिला विचारलं, “ बकुळ, खूप दिवस तुला विचारीन म्हणते, पण मी तुझ्या खाजगी आयुष्याबद्दल कधीही चौकशी केली नाही ग ! तू अशी लोकांकडे कामं करत किती वर्षे रहाणार बाळा? किती गुणी आहेस तू. काय ठरवलं आहेस तुझ्या पुढच्या आयुष्याचं बेटा? “ 

बकुळच्या डोळ्यात पाणी आलं. “ बाई, काय सांगू तुम्हाला ! फार हाल काढलेत हो मी ! माझे आई वडील खूप लवकर गेले आणि मी एकटीच मुलगी त्यांना. मग मामा मामीनं थोडे दिवस संभाळलं. त्यांनाही त्यांची मुलंबाळं होतीच आणि गरीबीही होतीच की पाचवीला पुजलेली. नाईलाजानं त्यांनी मला अनाथाश्रमात ठेवलं. पण मामी नेहमी यायची मला भेटायला, थोडे पैसे द्यायची, कपडे घ्यायची. ती तरी आणखी काय करणार होती? मी होते त्या आश्रमात मुलं मुली दोन्ही होती. मी आश्रमाच्या शाळेतच जात होते. हे सुंदर रूप सगळीकडे आड यायला लागलं हो बाई. एका रात्री एका मुलानं बळजबरी केली माझ्यावर ! मी आरडाओरडा केला. पण काही दिवसांनी हे वारंवार घडत गेलं. कोणाकडे दाद मागणार मी? एक दिवस तर आश्रमाचे माझ्या वडिलांच्या वयाचे  व्यवस्थापकच हे करायला लागले तेव्हा मी पळून गेले तिथून….

– क्रमशः भाग पहिला

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लंच टाईम… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ लंच टाईम… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(पण आपल्याला केदार आवडायचा कारण तो मदन मोहन, अनिल विश्वास, खैय्याम अशा संगीतकारांची गाणी म्हणायचा.) — इथून पुढे – 

त्याच्या गावामध्ये त्याचे गुरु राहुल देव बर्मन यांच्याकडे वादक होते. आता ते मुंबई सोडून त्याच्या गावी स्थायीक झाले होते. स्वर, ताल, आलापी सर्व काही व्यवस्थित समजवत होते. त्यानी सर्व ज्ञान केदारला दिले होते. विश्वास मनात म्हणायचा, मी जशी राजापूरच्या खेड्यातून इतपर्यंत मजल मारली तसाच केदार. —शहरातील मुलं खूप नशिबवान. त्यांना हवी ती वाद्ये सहज उपलब्ध होतात. नाहीतर पालक वाद्य विकत घेऊन देतात किंवा आजूबाजूला हवे तेवढे क्लासेस आहेतच. शहरातील मुलांना इच्छा असेल तर मार्ग सहज मिळतो. आपल्याला हार्मोनियमवर बोटे फिरवायला वयाची १२ वर्षे लागली. त्यानंतर विविध राग. आणि तबला पेटी सोडून इतर वाद्ये फक्त लांबून बघायची. मुंबईत येऊन गुरु चरणदास यांच्या गुरुकूलमध्ये मात्र सगळी वाद्य सतार, संतुर, व्हायोलीन, बासरी, इलेक्ट्रीक गिटार, सिंथेसायझर हवी ती वाद्ये हात जोडून उभी होती. विश्वासला आपले रत्नागिरीतील गुरु ताम्हणकर बुवा आठवले. एकदा राजापूरात कीर्तन करायला आलेले. पेटीच्या साथीला कोणी नाही म्हणून आपण साथीला बसलो. लहान वयातील आपली बोटे स्वर बरोबर काढतात हे पाहून त्यांना आनंद वाटला. आपल्या वडिलांशी बोलून ते शनिवार रविवार रत्नागिरीत शिकवू लागले. वडिलांना एसटीचे भाडे देणे कठिण म्हणून आपण एसटीचे भाडे देऊ लागले. विश्वासच्या डोळ्यासमोर ताम्हणकर बुवा आले. असे गुरु अजून जगात आहेत म्हणून विद्यादान गरीबांना मिळते. 

विश्वासने आपला अंतिम रिझल्ट लिहायला घेतला. एवढ्यात केबिनचे दार उघडून सरदेसाई आत आला. या हिंदी चॅनेलवर सारे हिंदी भाषीक. फक्त रखवालदार मनोहर आणि या प्रोग्रॅमचा मॅनेजर सरदेसाई तेवढे मराठी बोलणारे. 

‘‘गुड मॉर्निंग जाधव’’

‘‘यस गुड मॉर्निंग सरदेसाई. अंतिम रिझल्ट पाच मिनिटात देतो. ’’

‘‘जाधव, त्यासंबंधातच मी बोलायला आलोय.’’

‘‘बोला.’’

सरदेसाईंनी केबिनचे दार आतून बंद केले आणि जाधव समोरच्या खुर्चीवर बसला.

‘‘जाधव, चॅनेलची इच्छा आहे, या स्पर्धेत निकिता पहिली यावी.’’

‘‘व्हॉट नॉनसेन्स, अरे निकिता माझ्याकडे सर्वात शेवटी आहे. तिचा स्कोअर ऐंशीच्या खाली आहे.’’

‘‘असू दे, अंतिम पाच मध्ये आलेला कोणीही विजेता किंवा विजेती होऊ शकतो.’’

‘‘बरोबर, पण गेल्या एक महिन्याचे मार्क निकिताला सर्वात कमी आहेत. आणि पहिल्या नंबरवर….’’

‘‘कोणीही असू दे, निकिताच विजेती होणार असे चॅनेलचे म्हणणे आहे.’’

जाधव ओरडला – ‘‘अरे का पण ? केदारवर हा अन्याय आहे.’’

‘‘याचे कारण, एन चॅनेलला दक्षिण भारतात विशेषतः ओरीसा, आंध्रप्रदेश या भागात हातपाय पसरायचे आहेत आणि निकिता ही ओरीसाची आहे. या स्पर्धेत ती विजेती झाली म्हणजे त्या भागातील लोक एन चॅनेल घरोघरी घेतली. आणि हा अंतिम फेरीचा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहतील. 

‘‘चॅनेलच्या धंद्यासाठी खर्‍या गायकावर अन्याय? मग स्पर्धा घेता कशाला ? आणि परिक्षक हवे कशाला ? चॅनेलला वाटेल त्याला बक्षिसे देऊन मोकळं व्हायचं.’’

‘‘असे कार्यक्रम असले तरच टिआरपी जास्त मिळतो. लोक तहान भूक विसरुन टिव्ही पाहत राहतात. आम्हाला पण अशाच कार्यक्रमांना प्रायोजक मिळतात. विशेषतः लहान मुलांच्या स्पर्धेत लोक जास्त इमोशनल होऊन कार्यक्रम पाहतात. चॅनेल घरोघरी पोहचते. चॅनेलला खूप पैसे मिळतात. आणि परिक्षकांना पण मिळतात. ’’

‘‘अशा पैशांवर थुंकतो मी. मी पण कोकणातून गरीब घराण्यातून आलोय. दुर्गम भागात विद्या मिळवायची याला किती त्रास असतो ते मला माहिती आहे. मी केदारला ९० टक्केपेक्षा जास्त मार्क दिलेत. आणि निकिता ऐंशी टक्केच्या खाली आहे. माझ्या मार्कलिस्टवर केदारच पहिला येणार.’’

जाधवने पुन्हा मार्कलिस्ट समोर घेतली आणि तो अंतिम रिझल्ट तयार करु लागला. 

‘‘जाधव एक मिनिट थांब, हे फोटो पहा. मी पाच मिनिटांनी येतो. मग बोलू आपण.’’ त्याच्या समोर फोटोचे इनव्हलप ठेवून सरदेसाई केबिन उघडून बाहेर गेला. जाधवने इनव्हलप हातात घेतले आणि एका बाजूने उघडले. आतमधून चार फोटो बाहेर पडले. कसले फोटो म्हणून जाधव पाहू लागला आणि तो चमकला, त्याचे आणि एका कॉलगर्लचे एकामेकाच्या मिठीतले फोटो होते. त्याच्या लक्षात आले गेल्यावर्षी एक अल्बम लाँच व्हायचा होता त्यावेळी अलिबागच्या हॉटेलमध्ये पार्टी होती. पार्टीनंतर त्याच मध्ये हॉटेलमध्ये रहायचे होते. तो पार्टी संपवून त्याच्या रुमवर गेला तेव्हा त्याच्या रुममध्ये ही कॉलगर्ल आधीपासून हजर होती. त्याला पाहताच ती त्याच्या गळ्यात पडत होती. पण त्याने तिला ढकलले. हा ‘‘हनीट्रॅप’’ आहे आणि यापासून लांब रहायला हवे हे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने आरडाओरड करुन इतरांना बोलावले. ती कॉलगर्ल चडफडत पळाली. तसे आपण पोलीसात कळविणार होतो पण अल्बमची मंडळी हात जोडू लागली. तसेच त्या हॉटेलची माणसेपण आमचे नाव खराब होईल पुन्हा येथे कोण येणार नाही तेव्हा पोलीसांना बोलवू नये म्हणून आग्रह करु लागली म्हणून आपण गप्प बसलो. पण हे फोटो या चॅनेलकडे कसे आले? की, गेल्यावर्षीपासून या चॅनेलचे आपल्यावर लक्ष होते ? आपल्याला परिक्षक बनवायचे आणि हवा तसा रिझल्ट नाही दिला तर हनीट्रॅपमध्ये अडकवायचे. जाधवने पुन्हा फोटो पाहिले. प्रत्येक फोटोत ती कॉलगर्ल त्याच्या हातावर पडलेली दिसत होती. जाधवला वाटलं आपण त्याच वेळी पोलीस कंम्पलेंट करायला हवी होती. आता असे फोटो पाहून आपल्यावर कोण विश्वास ठेवणार ? त्याला त्याची पत्नी अनिताची आठवण झाली. तिला पण हा प्रसंग सांगायला हवा होता. पण ठिक आहे. अनिताचा आपल्यावर विश्वास आहे. अशा फोटोंवर विश्वास ठेवणारी ती नाही. या झगमगत्या दुनियेत अशा गोष्टी नेहमीच्याच. विश्वास ने मनात म्हटले, ‘ सरदेसाई असल्या फोटोनी माझा रिझल्ट बदलणार नाही. मी तुझ्या चॅनेलला पुरुन उतरेन. ‘ 

– क्रमशः भाग दुसरा

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लंच टाईम… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ लंच टाईम… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

विश्वास जाधव बिल्डींगच्या लिफ्टमधून बाहेर पडला आणि शिळ वाजवत पार्किंगमधील गाडीच्या दिशेने गेला. पार्किंग लॉटमधून त्याने शिताफीने गाडी बाहेर काढली आणि गल्लीतून बाहेर पडून गाडी मुख्य रस्त्यावर आणली. आता अंधेरीचा स्टुडिओ त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस म्हणजेच ग्रँड फिनाले. आज फारसे टेंशन नाही, कारण स्पर्धेचा निकाल जवळपास तयार होता. गेले आठ आठवडे स्पर्धा सुरु होती. एकंदर वीस हजार गायकांमधून वीस जण निवडले गेले. आणि या वीस जणांना आपल्या तिघांच्या हातात सोपवले गेले. माधुरी ही हिंदीतील गायिका या चॅनेलच्या प्रत्येक स्पर्धेला असे. ह्या चॅनेलची स्पर्धा आणि माधुरी हे ठरलेलेच होते. तिला फॅन्स पण फार होते. गेले पाच सिझन तिने गाजवले होते. विश्वासला पण तिच्या गाण्याबद्दल आदर होता. पण परिक्षक म्हणून सोबत बसल्यावर त्याच्या लक्षात आले की ती फार गर्विष्ठ आहे आणि या चॅनेलची लाडकी असल्याने जवळ जवळ हुकूमशहा आहे. दुसरा परिक्षक मंगेश हा पॉप म्युझिक मधील लोकप्रिय कलाकार. तो स्वभावाने बरा होता. पण उडत्या चालीची गाणी आणि पाश्चात्य गाणी त्याला जास्त आवडत. त्यामुळे शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी त्याला आवडत नसत. त्यामुळे अशा गाण्यावर तो टिका करायचा हे विश्वासला आवडत नव्हते. तिसरा विश्वास. हा उदयोन्मुख संगीतकार. त्याचा पाया शास्त्रीय संगीताचा होता आणि गुरु चरणदास यांचेकडे तो शास्त्रीय गाणे शिकला होता आणि त्यांच्या गुरुकुलमध्ये अजूनही शिकत होता. विश्वासचे दोन मराठी आणि दोन हिंदी सिनेमे गाजले होते. आणि हिंदी अल्बम्सनी लोकप्रियता मिळविली होती. खरं म्हणजे हिंदीतील या प्रसिध्द चॅनेलने विश्वासला परिक्षक म्हणून निवडले तो प्रसंग विश्वासच्या डोळ्यासमोर आला. एका मराठी चॅनेलच्या वार्षिक कार्यक्रमाच्यावेळी विश्वास आमंत्रितांच्या खुर्चीत बसला होता. एवढ्यात एक पंचवीस वर्षाची मुलगी त्याच्या जवळ आली – 

‘‘ आप विश्वासजी है ना ?’’

‘‘ हा, आप कौन ?’’

‘‘ मै, रचना.. एन चॅनल की तरफसे -’’

‘‘ क्या है ?’’

‘‘ मेरे सुपीरियर आपसे बात करना चाहते है, जरा बाहर आओगे ?’’

विश्वास बाहेर गेला. ती त्याला पार्किंग लॉटकडे घेऊन गेली. तिथे एका कारमध्ये तिचा सुपिरियर बसला होता. 

‘‘ हाय मिस्टर विश्वास, मै शशांक .. फ्रॉम चॅनेल एन, हमारे चॅनेल का पाँचवा सुरसंगम एक महिनेके बाद शुरू होगा.  हम चाहते है की, आप सुरसंगम प्रोग्रॅमके परीक्षकके रुप में काम करें ’’

‘‘ लेकिन मेरी कमिटमेंट…..’’

‘‘ कोई बात नहीं, ये प्रोग्रॅमकी शुटींग सप्ताहमें एक दिन होगी, सुबह १० से रात १० तक, बाकी के दिन आप फ्री है,’’

‘‘ मुझे सोचना पडेगा ’’

‘‘ कोई बात नही, हम फिर कल फोन करेंगे ’’

रात्रौ विश्वास पत्नी अनिता बरोबर बोलला. तिला पण एवढ्या मोठ्या चॅनेलने स्वतःहून संपर्क ठेवल्याबद्दल आश्चर्य वाटले. पण चांगले पैसे मिळत असतील तर ऑफर स्विकारायला हरकत नाही असे तिने मत व्यक्त केले. दुसर्‍या दिवशी एन चॅनेलवरुन पुन्हा रचनाचा फोन आला. चॅनेलने आठवड्याला लाख रुपये पेमेंट देण्याचा शब्द दिला. एक दिवस शुटींग, प्रत्येक एपिसोडचे कपडे वगैरे सर्व चॅनेल्सचे. विश्वासने विचार केला. प्रत्येक महिन्यात सहा लाख मिळत असतील आणि दोन महिने स्पर्धा चालली तर बारा लाख मिळतील. शिवाय या हिंदी चॅनेलमुळे भारतभर प्रसिध्दी. त्यामुळे हिंदी आणि प्रादेशिक सिनेमा मिळण्याची शक्यता मोठी. कार्यक्रमामुळे घराघरात आपण ओळखलो जातो हा मोठा फायदा. विश्वासला वाटले, राजापूर तालुक्यातील आपल्या गावातसुध्दा प्रत्येक घरी आपण दिसू. त्यामुळे आपले आईवडील, नातेवाईक, गाववाले किती खूष होतील हे त्याच्या डोळ्यासमोर आले आणि त्याने ही ऑफर स्वीकारली.

विचार करता करता त्याची गाडी स्टुडिओपाशी आली. त्याची गाडी पाहताच रखवालदार मनोहर धावला. त्याने फाटक उघडून त्याची गाडी आत घेतली. विश्वासने गाडी पार्किंग लॉटमध्ये लावताच मनोहरने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्याची बॅग बाहेर काढून तो विश्वास बरोबर सेटच्या दिशेने चालू लागला. 

‘‘ मग विश्वासराव, फायनल किरण मारणार का ?’’

‘‘ बघू , अजून दोन परीक्षक आहेत ना?’’

रखवालदार मनोहर हळू आवाजात म्हणाला –

‘‘ तसं नव्हं, या आधी प्रत्येकवेळी धक्काच बसलाय, आम्ही अंदाज बांधतो एक आणि जिंकतो दुसराच काही करा विश्वासराव त्या किरणलाच नंबर द्या, केवढा लांबून आलाय ओ, उत्तराखंडवरुन आणि गातो काय एक नंबर. या मुंबईत त्याची लोक फॅन झालीत. गरीब आहे पोरगा. पहिल्यांदा आला तवा त्याच्या अंगावरची कापडं बघवत नव्हती. मी त्याला माझ्या पोराची कापडं आणून दिली. मग चॅनेलची कापडं आली सोडा. “

‘‘ बर, बघू.’’ असं म्हणून विश्वास सेटवरील आपल्या केबिनकडे गेला. त्याने पाहिले माधुरीच्या केबिनमधून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येत होता. म्हणजे माधुरी लवकरच सेटवर पोहोचली होती. मंगेशची केबिन बंद होती. म्हणजे तो अजून पोहोचला नव्हता. विश्वासने आपली केबिन उघडली आणि एसी चालू केला. टेबलावरील ग्लासातून पाणी प्याला आणि लॉकर उघडून गेल्या दोन महिन्यातील मार्कलिस्टवर त्याने नजर टाकली. मघाशी रखवालदार मनोहर बोलला ते त्याला पुन्हा आठवले. ‘‘ या आधी प्रत्येक स्पर्धेत धक्काच बसला ’’ 

‘ धक्का का बसला ?’  विश्वासच्या मनात आलं, धक्का बसू शकतो, कारण सर्वसामान्य लोकांचे मत आणि परिक्षकांचे मत एक होणे कठिण असते. प्रेक्षक मूळ गायकाचा आवाज हुबेहुब काढला की खुष होतात पण परिक्षकाला सुर, ताल, राग, आलापी सर्वच पहावे लागते…  तो विषय झटकून विश्वासने आठ आठवड्यातील मार्कलिस्ट समोर आणली. पहिल्या चार आठवड्यात पंधरा जण कट झाले. आणि शेवटच्या महिन्यात राहिले पाच जण. जयंती, अरुण, केदार, तन्मय, निकिता. दोन मुलगे तीन मुली. त्याने स्वतः दिलेल्या मार्क्सचा अंदाज घेतला. केदार निःसंशय पहिला होता. त्याने पाहिले केदार ९० टक्केच्यावर होता. त्यानंतर जयंती, तन्मय, अरुण ही मंडळी पंच्याऐंशीच्या आसपास. आणि निकिता ऐंशीच्या खाली. त्याच्या डोळ्यासमोर केदार आला…..  केदार पासवान…  १४-१५ वर्षाचा, उत्तराखंडमधून आलेला. चेहर्‍यावरुन कळतं होतं तेथल्या आदिवासी भागातून आला असणार. मोडकी तोडकी हिंदी बोलत होता. कदाचित त्याची मातृभाषा वेगळी असेल. पहिल्या वीसात आला तेव्हा खूप घाबरलेला होता आणि सिनीअर परिक्षक माधुरी हिंदी आणि इंग्लिश मधून बोलून त्याला नर्व्हस करत होती. पण आपल्याला केदार आवडायचा कारण तो मदन मोहन, अनिल विश्वास, खैय्याम अशा संगीतकारांची गाणी म्हणायचा. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

Select मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(आत डोकावून पाहिलं. भिंती बांधून वाड्याचं रूपांतर असंख्य खोल्यांत झालं होतं.) इथून पुढे — 

“वास्तविक, गेल्यावर्षी या घराचं वाटणीपत्र झालं. तेच तुझ्या वहिनीच्या जिव्हारी लागलं. ‘तुम्ही भावांच्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवून चांगलं शिक्षण दिलंत आणि आपल्या मुलांकडे मात्र दुर्लक्ष केलंत. तुम्हीच स्वत:ला घरातला एकमेव कर्तासवरता समजून स्वत:च्या उत्पन्नाची उधळपट्टी करीत होता. कुठलाही भाऊ स्वत:च्या खिशात हात घालत नव्हता. माझ्या या वेडीचं म्हणणं तुम्ही कधीच ऐकून घेतलं नाही. आता अशी पश्चाताप करायची वेळच आली नसती.’ म्हणून ती खंत व्यक्त करायची. 

मी तिला सांगायचो, ‘अगं ज्याच्या त्याच्या नशिबात असतं, ज्याचे त्याला मिळत असते आभाळगाणे किंवा माती. भले आपली मुलं जास्त शिकली नसतील. पण आज स्वत:च्या कर्तबगारीच्या जोरावर काहीतरी कमवत आहेत ना? ते महत्वाचे आहे. आपल्या दोघांना फुलासारखं जपताहेत ना? बस्स, अजून काय हवं आहे?’ पण ते तिला पटायचं नाही. आणि एके दिवशी ध्यानी-मनी नसताना अचानक हृदयघाताने देवाघरी गेली.” 

तितक्यात सतीशच्या सुनेने चहा आणला. ‘माझी मोठी सून निर्मला’ असं सांगत सतीशने तिला माझी ओळख करून दिली. निर्मलाने मला नमस्कार केला. “मामंजीकडून आणि आमच्या सासूबाईंच्याकडून मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय.” असं म्हणत ती निघून गेली. 

चहा घेता घेता सतीश म्हणाला, “माझी दोन्ही मुलं वेगवेगळा व्यवसाय करतात. तुझी वहिनी गेल्यावर मीच त्या दोघांना दोन खोल्यांत वेगळा  संसार थाटून दिला. माझ्या जेवण्याखाण्याची व्यवस्था एक महिना माझी मोठी सून पाहते. एक महिना माझी धाकटी सून पाहते. एरव्ही देखील काही चांगलंचुंगलं केलं की ते माझ्यासाठी पाठवतातच.

दोघीही सुना मला हवं नको ते पाहतात. न्याहारी, चहा, दोन वेळचं जेवण अगदी वेळेवर माझ्या खोलीत आणून देतात. सकाळी कामावर जाताना आणि रात्री कामावरून आली की दोन्ही मुलं माझ्याकडे येऊन विचारपूस करून जातात. आणखी काय हवंय सांग? 

तुला आठवतं का? तुझ्या आग्रहाला बळी पडून मी एक विमा उतरवला होता. सुदैवाने त्याचे हप्ते नियमितपणे भरत होतो. गेल्या वर्षी त्याची बर्‍यापैकी रक्कम आली आणि तेच पैसे बॅंकेत गुंतवले. महिन्याला बाराशे रूपये व्याज येतं. त्यात माझं औषधपाणी व इतर खर्च भागतात. कुणाकडे एक रूपया मागत नाही. झालंच तर दोन्ही सुनांच्या घरी अधूनमधून पालेभाजी आणून देतो.”           

“तुझा वेळ कसा जातो?” असं विचारल्यावर सतीश थोडासा खुलला. “अरे ती काही समस्या नाही. लायब्ररीतली सगळी पुस्तकं आपले मित्र आहेत. बहुतेक करून आत्मचरित्रे वाचतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात कुठे येतात असे डोळे दिपवून टाकणारे सोनेरी क्षण? तसंच अगदी कडेलोट व्हायच्या क्षणी ही माणसं स्वत:ला सावरून परत कशी ठामपणे उभी राहतात, आणि आपण कसे लहान लहान संकटात कोलमडून जातो हे लक्षात येतं.

पुस्तक वाचून झालं की उत्तराची अपेक्षा न ठेवता मी त्या लेखकाला पोस्टकार्डावर एक खुशीपत्र लिहून पाठवतो. दुसर्‍याला अत्तर लावताना तुमची बोटंही सुगंधी होतात म्हणतो ना तसे. 

आता बघ, संध्याकाळचे साडेसहा वाजले की दंगा करणारी ही सगळी कार्टी, हातपाय तोंड धुऊन दप्तर घेऊन माझ्या खोलीत येतात. आसनं टाकून शुभं करोति म्हणून झाल्यावर अभ्यासाला लागतात. मी तिथंच पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असतो. कुणाला काही अडलं की माझ्या जवळ येऊन विचारतात. गणित, सायन्स, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या विषयातलं काहीही.

आपल्या मास्तर लोकांनी असं काही घोटून घेतलंय की आज पन्नास वर्षानंतर देखील ते पुसलं गेलेलं नाही. माझ्या खोलीत काळा कापडी बोर्ड लटकवलेला आहे. त्यावर मी गणितं सोडवून दाखवतो. निबंध कसे लिहायचे त्याचे मुद्दे सांगतो. ही मुलं दोन तास अभ्यासात अगदी गढून जातात आणि साडे आठ वाजले की भुर्र्कन उडून जातात. माझाही वेळ अगदी पंख लावल्यागत उडून जातो.”         

सतीशने समोरच्या हातगाडीवाल्याला बोलावून अर्धा डझन केळी विकत घेतली. तितक्यात खेळ संपवून परत आलेल्या प्रत्येक मुलाच्या हातात सतीशनं एक एक केळं ठेवलं. सगळी पोरं धूम ठोकून पळाली. 

मी सहजच म्हटलं, “सतीश, यात तुझी नातवंडं कुठली?” 

सतीश केविलवाणं हसत म्हणाला, “खरं सांगू? या सहा नातवंडात, चार नातवंडे माझ्या दोघा भावांची आहेत. अरे, या घराच्या वाटण्या झाल्या आहेत. पण नातवंडांच्या वाटण्या झाल्या नाहीत, त्यामुळे ही सहाही नातवंडे अगदी माझ्याच वाटणीला आली आहेत असं समजतो. माझे भाऊ, मला मोठा भाऊ मानत असतील की नाही माहीत नाही पण मी या सर्व नातवंडांचा ‘मोठा आजोबा’ आहे. अगदी लहानपणापासून ही मुलं माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली आहेत. मी या जगातून जाईपर्यंत ही सगळी नातवंडं फक्त माझीच असणार आहेत!” 

सतीश बराच भावुक झाला होता. संध्याकाळ होत आली होती. बाहेर चिमण्यांचा चिवचिवाट वाढला होता. आता निघावं म्हणून मी उठायला लागलो. तेंव्हा सतीशनं थरथरत्या हातानं माझा हात घट्ट धरून ठेवला होता. जणू त्याला मला सोडायचंच नव्हतं. ‘पुढच्या वेळी आल्यावर निवांत भेटेन’, असं म्हणत जड मनाने मी माझ्या मित्राचा निरोप घेतला.    

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सकाळी वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. “काय कधी आलास?” असं विचारतच भास्कर आत आला. बऱ्याच वर्षानी त्याला पाहत होतो. दाढीचे खुंट वाढलेले. अंगात अघळपघळ सदरा पायजमा. भास्कर आमच्या पूर्वीच्या घराशेजारी असायचा. अर्थात अजूनही तिथेच राहतो. 

त्याची आई कुठल्या तरी सरकारी डिपार्टमेंटमध्ये क्लार्क होती. आपल्या दोन्ही मुलांना शिकवायचा तिने खूप प्रयत्न केला. मुलगी सुनिता पदवीधर झाली, मात्र भास्कर मॅट्रिकही पास होऊ शकला नाही. मग त्याने खाजगी नोकरी धरली. 

मी विचारलं, “आई कशी आहे?” 

त्यावर मान खाली घालून बोलला, “बरी असेल. वडील गेल्यानंतर आईला काही दिवसांसाठी घेऊन जाते म्हणून सुनिता घेऊन गेली. नंतर आम्ही आईला नीट सांभाळू शकणार नाही म्हणून तिला परत पाठवायचं नांवच काढत नाही. 

या गोष्टीला तीन वर्ष झालीत. सुरक्षिततेच्या नांवाखाली आईचे सगळे दागिने आधीच सुनिताने स्वत:च्या ताब्यात घेतले. तिचा खरा डोळा आईच्या हजारांच्या पेन्शनीवरही होता. हे सगळं पूर्वनियोजित होतं. माझ्या वाटणीला तेवढं भाड्याचं राहतं घर आलंय बघ.”

एक मात्र खरं की भास्करचं त्याच्या आईवर निस्वार्थी प्रेम होतं, यात शंकाच नाही. ही विलक्षण गोष्ट ऐकून मी चाटच पडलो. 

तो पुढे म्हणाला, “बरं ते जाऊ दे. तुझा मित्र सतीश भेटला होता. त्याने तुझी आठवण काढली. गेल्यावर्षी त्याला स्ट्रोक आला होता. पठ्ठा चिवट आहे. जरा हालचाली मंद झाल्या आहेत, पण तो आपल्या पायावर उभा आहे. जमलंच तर भेट त्याला.” असं म्हणून भास्करने निरोप घेतला.      

मध्यंतरी मी सांगलीला असताना माझा एक वर्गमित्र मला भेटायला आला होता. व्यापाराच्या निमित्ताने आला होता. आम्ही जवळच्याच हॉटेलात जेवायला गेलो. भरपूर गप्पा मारल्या. “गावी आल्यावर नक्की फोन कर” असं म्हणून त्यानं निरोप घेतला.

नंतर एकदा गावी गेल्यावर त्या मित्राला मोबाईल लावला. मी ‘हॅलो’ म्हणताच तिकडून आवाज आला. “हां बोल, कसा काय फोन केलास? काही काम होतं कां?”

त्याच्या अशा अनपेक्षित कोरड्या प्रतिसादाने मी चांगलाच वरमलो. “अरे नाही. चुकून तुझा नंबर लागला वाटतं. आय अ‍ॅम सॉरी!” म्हणून फोन कट केला. त्यानंतर कधी कुणा मित्राला फोन करण्याच्या किंवा भेटण्याच्या फंदात पडलो नाही….                

सतीश माझा खूप जवळचा मित्र होता. आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘चला मित्राला भेटू या’ म्हणून मी स्कूटीवरुन निघालो. वीसेक वर्षानंतर मी त्या परिसरात जात होतो. सगळंच कसं बदलून गेलं होतं. शोधत शोधत सतीशच्या घराजवळ आलो. उन्हं उतरली होती. बाहेर सहा सात मुलं अंगणात खेळत होती. त्या मुलांना सतीशच्या विषयी विचारलं. त्यांनी तिथेच झाडाखाली खुर्ची टाकून बसलेल्या गृहस्थाकडे बोट दाखवत, ओरडून सांगितलं, “आजोबा तुमच्याकडे कोण आलंय पहा.” मी गाडी लावली. 

बऱ्याच कालावधीनंतर मी सतीशला भेटत होतो. खूपच कोमेजलेला दिसत होता. मुळांपासून उखडलेल्या झाडाची जशी स्थिती होते तसा तो खुर्चीत आक्रसून बसला होता. आपल्या नेहमीच्याच चिरपरिचित पांढरा पायजमा आणि कुर्ता या वेषांत होता. त्याच्या मनाच्या स्थितीप्रमाणेच कपड्यांवर देखील सुरकुत्या पडल्यामुळे तो केविलवाणा दिसत होता. मला आश्चर्य वाटलं. तो किती ऐटीत असायचा. मी पहिल्यांदाच त्याला असा पाहत होतो. 

माझ्या डोक्यावरील कॅपमुळे त्यानं मला लगेच ओळखलं नाही. कॅप काढताच, खुर्चीतून सावकाश उठून उभा राहिला आणि हात हातात घेऊन म्हणाला, “अरे, किती वर्षांनी तुला माझी आठवण आली? चक्क दहा वर्षानंतर भेटतोयस. तुझी वहिनी नेहमी तुझी आठवण काढायची.”

एव्हाना लांबून पाहणाऱ्या मुलांच्या लक्षात आलं की ‘हा कुणीतरी आजोबांचा जवळचा मित्र असणार’. ते धावतच आले. 

सतीशने त्या पोरांना सांगितलं, “बाळांनो, आत जाऊन दोन कप चहा टाकायला सांगा.”

पोरं पळतच आत गेली. जीभ जड झाल्यानं, त्याला बोलायला काहीसं अवघड जात होतं.   

मी विचारलं,“कसा आहेस?” तर खिन्नपणे म्हणाला, “बरा आहे म्हणायचं. आला दिवस ढकलायचा. तुझी वहिनी सोडून गेली, एकटा पडलो.”

मी म्हटलं, “वहिनी अशा अचानक निघून जातील असं वाटलं नव्हतं.”

सतीश घुश्शातच म्हणाला, “जाऊ दे, गेली तर गेली. मला काही फरक पडत नाही.” 

खरं तर हा वरवरचा त्रागा होता. वयाच्या अठराव्या वर्षीच सतीशचं लग्न झालं होतं. त्यांचं एकमेकावरचं घट्ट प्रेम काही झाकलेलं नव्हतं. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवताच, कसाबसा हुंदका दाबत तो म्हणाला, “अरे, तिने तरी असं मध्येच दगा द्यायला नको होतं. आताच मला तिच्या सहवासाची खरी गरज होती.”

काही वेळ स्तब्धतेत गेला. घसा खाकरत सतीश पुढं सांगत होता, “तुला तर माहीत आहे. आमचं एकत्र कुटुंब होतं. सगळ्या भावांचा वेगळा व्यवसाय होता. खरेदी विक्रीत मिळणारी दलाली हा माझा बिनभांडवली धंदा होता. सचोटीच्या व्यवहारामुळे मी भरपूर पैसे मिळवत होतो. मी एकटाच निस्वार्थीपणाने घरात लागेल तो खर्च करीत होतो.

‘जो पर्यंत तुम्ही बाजारात उभे असाल तोपर्यंत तुमचे उत्पन्न चालू राहील. त्यानंतर काय? आपल्या म्हातारपणासाठी चार पैसे मागे टाका.’ असं तुझी वहिनी सारखं सांगायची पण मी कधी मनावर घेतलं नाही. 

ती जिवंत होती तेव्हाच मी गंभीरपणे आजारी पडलो. सहा महिने बिछान्याला खिळून होतो. उत्पन्नाचं साधन गेलं. 

भावांची मुलं कर्तीसवरती झाली होती आणि घर सांभाळायची जबाबदारी जेव्हा त्यांच्यावर आली तेव्हा अचानक वेगळे होण्याचा प्रस्ताव पुढे आला. अखेर भावाभावांच्यात घराच्या वाटण्या झाल्या. माझ्या हिश्श्याला त्या कोपर्‍यातल्या तीन खोल्या आल्या.”

आत डोकावून पाहिलं. भिंती बांधून वाड्याचं रूपांतर असंख्य खोल्यांत झालं होतं. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जिव्हाळा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री संध्या पूरकर ☆

🌸 जीवनरंग 🌸

☆ जिव्हाळा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री संध्या पूरकर 

आईला ऑपरेशनसाठी आत नेलं, तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटर जवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती.

आज पहाटे साडेपाचला आई बाथरुमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. तो आणि विशाखा तिला घेऊन करूणा आर्थोपेडिक हाॅस्पिटलमध्ये घेऊन आले. एक्स-रे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डाॅक्टर म्हणाले. तेही लगेच करायला हवं होतं. सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले आले. आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं. 

या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती. हाॅस्पिटलच्या कँटिनचा मुलगा चहा घेऊन आला, तसं प्रसन्न आणि विशाखा, दोघांनी चहा घेतला.

चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बाॅसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखानं तीन दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरीवलीला. आज घरातलं आवरून दुपारी ती आणि सई, तिची लेक, मालाडला जाणार होत्या, तिच्या माहेरी. आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं. 

तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, “अरे देवा ! अग आम्ही आलो असतो ग, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री १०३ होता, अजूनही पूर्ण उतरलेला नाही. बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन.”

‘यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे. इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या न कुठल्या टूरवर जात असतात आठ-पंधरा दिवस !’ विशाखा मनात म्हणाली. 

“अहो, राजूभावजींना फोन करायला हवा ना?” तिनं प्रसन्नला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा दोन नंबरचा भाऊ ! प्रसन्न सगळ्यात धाकटा. 

” करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर ! तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील. शंभर चौकश्या करतील. असं कसं झालं? तुम्ही काळजी घ्यायला हवी होती. यांव करा नि त्यांव ! तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरीवलीला. मी करतो मॅनेज इथे. तसंही पेशंटचं जेवणखाण इथेच मिळणार आहे.”

“अहो, तुम्ही एकटे कसं कराल? मी आज काही जात नाही. उद्याचं उद्या बघू. आईंना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच, त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे. तरी त्या बिचार्‍या येतात धावून मदतीला !”

मीरा प्रसन्नची बहिण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू-सासरे दोघंही ऐंशीच्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा. 

असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलावणं आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डाॅक्टर गेले. पाच-सहा दिवस तरी आईला हाॅस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं. एका रूममध्ये दोन पेशंट असणार होते. 

आईला रूममध्ये ठेवून वाॅर्डबाॅय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून जरा गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या काॅटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होतं. 

त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता. पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली. 

सईचा फोन आला होता, ‘ मी येऊ का आजीजवळ बसायला? ‘ उद्या लग्नाला कसं जायचं आपण, या विचाराने थोडी नाराजही झाली होती ती ! पण विशाखानं तिला घरीच थांब म्हटलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून, बाहेरून पोळी-भाजी आणून /मागवून ठेवायलाही सांगितलं. मग तिनं  प्रसन्नला घरी पाठवलं. तो स्वतःचं आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती.

विशाखा सासूबाईंच्या काॅटजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. ‘जिव्हाळा’ च्या कुलकर्णी काकू बोलत होत्या. “अग, सुधाताईंचं ‘सुप्रभात’ आलं नाही ग्रुपवर सकाळी, म्हणून मी फोन केला, तर तो पण उचलला नाही त्यांनी. म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सुधाताईंचं ऑपरेशन?”

“हो काकू, ऑपरेशन झालं व्यवस्थित. अजून एक-दीड तासांनी त्या शुद्धीवर येतील, म्हणाले डॉक्टर.”

“बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना भाचीच्या लग्नासाठी? ते तू ठरल्याप्रमाणे जा. सई बोलली मला, मग ग्रुपवर कळवलं मी ! आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी. रात्री माटेवहिनी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल, ऑफिसला जाता जाता ! मग काळेबाई, निशा, देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला. त्यामुळे प्रसन्नलाही लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरूष मंडळी आहेतच.” असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा ! 

‘जिव्हाळा’, हा खरं तर सासऱ्यांच्या पेंशनर्स मित्रांचा ग्रुप.  ठाण्यात राहणाऱ्या या पंधरा जणांनी हा ‘जिव्हाळा’ ग्रुप बनवला होता. या ग्रुपपैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर, बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे. मग ती मदत आर्थिक असो, सोबत करण्याची असो की इतर काही.

कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी, तर कोणी एकेकटेच. शिवाय नोकरी व्यवसायामुळेही मुलं-सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ – प्रसंग काही सांगून येत नाही. पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता.

सासऱ्यांनंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी ‘सुप्रभात’, चा मेसेज टाकला म्हणजे, ‘All is well’ समजायचं. इतर वेळी फोन, मेसेज करायचाच गरज असेल तर. त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं-सुनादेखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते. 

विशाखाला अगदी भरून आलं होतं. इथे रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही  जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. आता ती निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती. 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री संध्या पूरकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नशिबा आधी कर्म धावते… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

🌸 जीवनरंग 🌸

☆ नशिबा आधी कर्म धावते… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सुलभा घरातील पसाऱ्यात शांत बसली होती. अवतीभवती कोणी नव्हते. आईला जाऊन आज पंधरा दिवस झाले होते. दिवस कार्य झाले  आणि नातेवाईक मंडळी आपापल्या गावी परत गेली .तशीही फारशी ये- जा त्यांच्या घरी नव्हतीच, पण आई गेली आणि होते तेही बंध संपले. वडील आधीच गेले होते. आई तेव्हापासूनच हबकली होती.तशी तीही फार कर्तृत्ववान होती असं नव्हतं, पण घरात सर्वांना चार घास जेवायला तरी मिळत होतं!

सुलभा विचारांच्या शृंखलेत गुरफटली होती. तेवढ्यात “ताई,ए ताई, एकटीच काय करतेयस? संध्याकाळ झाली ना! देवाला दिवा पण नाही लावलास?” बाहेरून हाकारा करीतच संगीता आली आणि सुलभाची विचार श्रृंखला तुटली! 

आई गेल्यानंतर आज पहिल्यांदाच संगीता कामावर गेली होती. आनंदही कामावरून तितक्याच आलाच.. दोघेही भुकेजून आले होते .सुलभाने मनाची मरगळ झटकली आणि जेवणाची तयारी केली. संगीता आणि आनंद दोघेही तिला दिवसभरातील कामावरच्या गोष्टी सांगत होते. संगीता म्हणाली,” ताई ,आज डॉक्टर काकांनी सगळी चौकशी केली. पैशाची काही गरज असेल तर सांग म्हणाले. आनंदनेही त्या गोष्टीला दुजोरा दिला. दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते आणि त्या डॉक्टरांचा आधारही होता घराला! सुलभाच्या मनात आले किती चांगली माणसं भेटली आहेत नशिबाने! जेवण  झाल्यावर संगीता आणि आनंद आपापल्या कामाला लागले. संगीताने भांडी घासली, आनंद आवरायला मदत करत होता.सुलभा आवराआवर झाल्यावर निवांत काही वेळ बसली.संगिता, आनंद झोपायला गेले,पण सुलभाला काही झोप लागेना! सगळ्या जीवनाचा चलत् चित्रपट तिच्या डोळ्यासमोर दिसत होता!

आपली आई स्वभावाने प्रेमळ,गरीब स्वभावाची होती खरी,पण जगातील व्यवहार तिला कळला नाही.तिचे नशिबंच असे कसे की तिला कुठूनच सुख मिळाले नाही.

माहेरी परिस्थिती बरी होती,भावंडे सहा…सगळी शिकलीसवरली,पण ही एकटीच चौथी पास!

सुलभा ला सुरुवातीचे बालपणी चे दिवस आठवले , जेव्हा त्यांचे एकत्र कुटुंब होते .आई वडील, आजी -आजोबा, दोन काका-दोन काकू,मुले अशी सर्व एकत्र राहत होती. पण आजी – आजोबा गेल्यानंतर घरात वाटणीच्या गोष्टी सुरू झाल्या. सुलभा समजत्या वयाची होती. वाटणीत यांच्या वाट्याला फक्त दोन खोल्या आल्या. सुलभा आईला विचारत असे, ‘आपल्यालाच का फक्त दोन खोल्या? बाकीच्यांना तीन तीन खोल्या आहेत.’ ‘अगं , आपल्या ला कर्ज होते, ते भागवण्यासाठी काकांनी पैसे दिले. त्यामुळे आपल्याला एक खोली कमी मिळाली.’

सुलभाच्या वडिलांचे दुकान होते. दुकानात कामाला एक दोन माणसे होती. तशीच काउंटरवर  एक मुलगी होती. ती हुशार होती. कामात चलाख होती. सुलभाच्या वडिलांना तिची कामात मदत होत असे. कसे कोण जाणे, सुलभाच्या वडिलांचे तिच्याशी सूत जुळले आणि घराकडे दुर्लक्ष होऊ लागले! हळूहळू दुकानचा कारभार त्या मुलीच्या हातात गेला. बाकीच्या दुकानांच्या स्पर्धेत दुकानचा खूप कमी झाला.

शेवटी दुकानावर कर्ज झाले आणि ते विकून टाकावे लागले. १/२ वर्षातच वडीलही गेले आणि सुलभा आता पूर्णपणे घराला बांधली गेली!नशीबा आधी  कर्म धावते याचा प्रत्यय सुलभाला येऊ लागला.

त्या दरम्यान सुलभा एका वाचनालयात कामाला जाऊ लागली होती. आता ती कॉलेजला होती . आर्ट्स साईडला असल्यामुळे सकाळी कॉलेज करून संध्याकाळी ती लायब्ररीत काम करू शकत असे. तिथे पुस्तक बदलायला येणाऱ्या स्वप्नीलच्या प्रेमात ती कशी पडली तिचा तिलाच कळलं नाही. स्वप्निल देखणा होता. आर्थिक परिस्थिती बरी असावी बहुतेक! सुलभा त्याच्या प्रेमात पडली. सुलभा ला ते दिवस आठवत होते. स्वप्निल तिच्याशी गोड गोड बोलत असे.एक दिवस त्याने सुलभाला सांगितले,’ माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तू आवडतेस आणि मला वाटतं ,तुलाही मी आवडतो. तुझी संमती असेल तर आपण लग्न करूया का?’सुलभा मनातून खूप आनंदली. तिलाही स्वप्नील आवडत होता.तिला परी कथेतील राजकुमार मिळाल्यासारखा आनंद वाटला होता.मागचा पुढचा विचार न करता

सुलभा ने त्याच्या प्रेमाला होकार दिला. घरी आईला हे सांगितले. मुलगा आपल्या जातीतील असल्याने घरच्यांनी फारसा विरोध केला नाही.

दोघांचे लग्न थाटात पार पडले.अगदी द्रुष्टं लागण्यासारखी जोडी दिसत होती.

… सुलभाने नवीन आयुष्याला सुरुवात झाली.नव्या नवलाईचे  दिवस होते ते!आनंदात दिवस चालले होते. स्वप्निलच्या घरची मंडळी चांगली होती पण स्वप्निल काहीच करत नव्हता. छोटे मोठे उद्योग करत असे, पण फारसे शिक्षण नसल्यामुळे मिळकत बेताचीच होती. आपल्या अडाणी वयातल्या प्रेम विवाह मुळे आपलं तर नुकसान झाले याचा तिला पश्चाताप होत असे. लवकरच तिच्या संसारात नवीन पाहुणा येण्याची चिन्ह दिसली. आता तरी स्वप्निल काहीतरी करेल या आशेवर सुलभा दिवस घालवत होती.

सुलभाचे मन भूतकाळातील आठवणींवर तरंगत होते .तिला पहिली मुलगी झाली. खूप छान छोटीशी भावली सारखी! दिसायला छान गोरी पान मुलगी पाहून सर्वांनाच आनंद झाला. हळूहळू स्वप्निल संसारात रुळला होता. काही दिवस चांगले गेले. अचानक तिच्या सासूबाईंना पॅरॅलेसिस चा अटॅक आला. दवाखान्याच्या खर्चा पायी पुन्हा एकदा आर्थिक परिस्थिती खालावली. सुलभाने आता पदार्थ करून विकण्याचे काम सुरू केले. स्वप्निल ची फारशी मदत नसे. पण आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहत होती. सुलभा- स्वप्नील ची जुई आता तीन वर्षाची झाली होती. खूप गोड मुलगी होती ती! सुलभाला पुन्हा एकदा आई होण्याची चाहूल लागली.

या वेळेला मुलगा होऊ दे ,मग मात्र थांबू या.. असा त्यांनी विचार केला.

आयुष्याला कलाटणी मिळण्याचा तो दिवस उजाडला.. मुलगा झाला पण त्याचा आजार वेगळाच होता. त्याच्या पाठीचा कणा नीट नव्हता. त्यामुळे थोड्याच दिवसात लक्षात आले की तो आपल्या पायावर उभा राहू शकणार नाही.. सुलभा हादरली. ऑपरेशन साठी खूप खर्च येणार होता. सर्वांच्या मदतीने त्याचे ऑपरेशनही केले आणि तो कुबड्या घेऊन का होईना पुढे चालू शकेल इतपत त्याच्यामध्ये सुधारणा होईल, असे डाॅक्टरांनी सांगितले. एकंदर परिस्थिती आता कठीण झाली होती आणि स्वप्निल चा तर तिला काहीच आधार नव्हता! शेवटी नाईलाजाने मुलांना घेऊन सुलभा माहेरी परत आली.

माहेरी येऊनही सुलभाच्या परिस्थितीत फारसा फरक पडत पडला नव्हता. इकडे आल्यावर स्वतःची दोन मुले, पाठची बहीण भाऊ  आणि आई असं सर्व कुटुंब सुलभाला पाहावे लागत होते. तिने आता डबे करायला सुरुवात केली.

तसेच काही घरची पोळ्यांची कामे सुरू केली.

धाकटी बहीण,संगिता  18 वर्षाची झाली आणि तिच्या मामांनी तिच्या लग्नाचे पाहायला सुरुवात केली पण जेमतेम दहावी शिकलेल्या मुलीला चांगले स्थळ कुठून मिळणार? शहरात तर नाहीच, मग जवळपासच्या गावातील स्थळे पाहता पाहता एका साखर कारखान्याच्या गावाचे स्थळ कळले. मुलगा कारखान्यात क्लार्क म्हणून काम करत होता. एक आत्या त्याच्याजवळच राहत होती. ती अशीच नवरा गेल्याने माघारी आली होती. राहायला दोन खोल्या होत्या. अधून मधून आत्या तिथे येते एवढेच कळलं .. एरवी मुलगा एकटाच राहत होता असं कळलं होतं. मामा-मामी घर बघून आले. संगिताने मुलगा पसंत केला. त्या दिवशी आत्त्या तिथे आलेली होती, पण एकटीच आहे तेव्हा येत असेल म्हणून मोठ्या लोकांनी फारसे लक्ष घातले नाही. नातेवाईकांनी कुठे फारसे जायला नको, म्हणून लग्न ठरवून टाकले एक जबाबदारी संपली म्हणून! चार सहा महिने ठीक गेले .संगिताकडून बरेच दिवसात काही खुशाली कळली  नव्हती ,पण हळूहळू तिची घुसमट कुठेतरी बाहेर पडणारच होती. एकावेळी ती माहेरी निघून आली आणि तिने मामीला सांगितले की, ‘आत्त्या तिच्या नवऱ्याच्या घरी येऊन राहते आणि संगिताला फक्त घरकाम, भांडी धुणे करणारी मोलकरीण केले होते’. हे कळताच मामा, मामी प्रत्यक्ष तिच्या गावी गेले. चौकशी करता ते सर्व खरेच निघाले! बिचारी संगिता! मागच्या जन्मी आपण काय केले होते म्हणून असे आपल्या वाट्याला आले! संगिता माहेरी आली आणि सुलभावर आणखीन एक जबाबदारी येऊन पडली!

माहेरी येऊनही सुलभाच्या परिस्थितीत फारसा फरक पडत पडला नव्हता. इकडे आल्यावर स्वतःची दोन मुले, पाठची बहीण, भाऊ  आणि आई असं सर्व कुटुंब सुलभाला पाहावे लागत होते. तिने आता डबे करायला सुरुवात केली.

तसेच काही घरची पोळ्यांची कामे सुरू केली.त्यातच स्वतः च्या अपंग मुलाला सांभाळायचे! असं कुठलं नशीब घेऊन आली होती सुलभा की कुठूनच तिला सुख मिळत नव्हते!

धाकटा आनंदही फारसा हुशार नव्हता.. संगीता आणि आनंद दोघेही डाॅक्टर काकांकडे कामाला जात होते आणि पोटापुरते मिळवत होते.डाॅक्टरही सहृदयी होते, मुलांना आपणहून मदत करत होते.आई अशिक्षित आणि तिन्ही मुलांच्या अशा तीन तऱ्हा!त्यातच आईचे आजारपण सुरू झाले.तब्येतीने स्थूल आणि संधिवात यामुळे तिला काम तर होत नव्हते.शेवटी आजार वाढत गेला आणि आई गेली…

आई जाऊन आता पंधरा दिवस झाले.तिला  आई गेल्याचे दुःखही वाटत नव्हतं इतकं मन बधिर झाले होते. पोरकेपणाची जाणीव होत होती. आई काही करत नव्हती पण निदान घरात तिचे अस्तित्व तरी होते. आताही दोन भावंडे आणि दोन मुले यांना सांभाळत आपले पुढे कसे होणार हेच तिला कळत नव्हते! शेवटी काळाच्या हातचे भावले आहे आपण! जसं घडेल तसं घडेल! आपलीच कर्माची कहाणी! नशिबापुढे काही चालत नाही, खचून न जाता उभं राहायला पाहिजे या विचाराने सुलभा उठली.आणि घरातील पसारा आवरू  लागली.उद्यापासून कामे सुरू करू या! या सर्वांच्या तोंडात चार घास घालण्यासाठी तिच्यातील मोठी बहीण आणि मुलांची आई जागी झाली होती या एका मनोबळावर सुलभा उठली आणि घराला आवरू लागली!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घरातलीच — एक गृहितक! – सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

? जीवनरंग ❤️

☆ घरातलीच — एक गृहितक! – सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

सकाळच्या जेवणाच्या तयारीतच तिने डिनरसाठी लागणारी कोशिंबीर नि भाजीचीही चिराचिरी करून ठेवली. ‘आता फुलकेही दोन्ही वेळचे उरकून घेऊ ’ ह्या विचाराने तिनं तवा तापत टाकला नि पोळपाट लाटणं हाती घेतलं.सरावाने लाटण्याखालची पोळी झरझर गिरकी घेत मोठी होत होती नि जोडीला  विचारांची आवर्तनंही ! 

सासूबाईंचा काल त्यांच्या मोठ्या लेकाशी झालेला संवाद  तिच्या कानावर पडला होता  तो आठवला.

(‘एकत्र कुटुंबात तग धरण्यासाठी म्हणून की काय आपले कान हळुहळु अधिकच तिखट होऊ लागलेयत ’ असा एक खोडकर विचार मनात डोकावला तिच्या ! )

“ हॅलो समीर, अरे दीप्ती नि क्षमा जायच्या आहेत  नं मुलुंडला उद्या दुपारी ? तू नि मोहन या इथेच ! ठीकै ?”

पलिकडून रूकार मिळाल्याचा अंदाज आला  तिला एकंदर संवादावरून ! 

दीप्ती नि क्षमा  तिच्या सख्ख्या जावा. मुलुंडला ज्या काकांकडचं बोलावणं आलं होतं त्यांच्याशी  तिचंही नातं, क्षमा नि दिप्तीसमानच असल्यामुळे आमंत्रण तर  तिलाही होतं त्या फंक्शनचं !

पण…

हार्ट प्रॅाब्लेमचं निदान झाल्यामुळे गेली दोनेक वर्ष  तिच्या सासूबाईंची तब्येत तशी नरमगरमच ! 

तसं तर दिप्ती-क्षमाच्याही त्या ‘अहो’ आईच ! 

परंतु … दोघीही स्वतंत्र आपापल्या घरी…ही आजार-झळ न पोचे दूरवरी … अशी सोईस्कर व्यवस्था !

‘आता २ दिवस बेड -रेस्टच घेते ’ असा सासूबाईंचा फतवा कोणत्याही क्षणी निघे. त्याप्रमाणे तो काल सकाळीही निघाला. ती घरातलीच नं, मग घरचं सगळं तिलाच बघायला हवं हा न्याय ( ?) लावून दोन्ही लेकांना ‘ इथेच या ’ चे फोन गेले देखिल.

तिचं  लग्न ठरल्यानंतरचे आईचे शब्द आठवले आत्ता तिला, “ अगं , माणसं हवीत बाई ! इथे तू एकुलती एक ! तिथे तीनतीन भावंडं ! तुम्ही दोघं सासू-सासऱ्यांजवळ रहाणार म्हणजे घर सतत जागतं असेल. ह्या ना त्या निमित्ताने सगळी जमत रहातील. भरल्या घराची चव काही न्यारीच असते बाई ! मला आतून असं वाटतंय की तुझ्या समजूतदार नि माणूसप्रिय स्वभावाने घराचं गोकुळ करशील बघ ! ”

तिला वाटलं, ‘ खरंच तेव्हा आपल्याही मनात खुशीचे लाडू फुटत होतेच की ! कामाचा उरक , बोलका स्वभाव नि हवीहवीशी नाती,  ह्या आपल्या  गुणांनी-मनोधारणेनी अख्ख्या कुटुंबाला आपलंसं करता येणं काही कठीण नाही ’ असं स्वप्न आपणही पाहिलं होतंच की !

पण……

अहो आईंची चूल शेअर करतांना, विस्तवाखालचं वास्तव निराळंच असतं हे लक्षात येऊ लागलं नि ह्याच वास्तवाच्या चटक्यांनी मग तिला जागृत आणि जागरूकही केलं. 

सणावारी एकत्र जमण्याचे कार्यक्रम, धार्मिक कार्य करण्याचे ठराव  नि अशा अनेक गोष्टी, वेगळ्या चुली मांडलेल्या मुलांच्या-सूनांच्या सोईनुसार ठरत नि जाहीर होत… Execution करायला काय…  ती आहेच घरात ! घर म्हटलं म्हणजे ‘ तिला ‘ करायला हवंच ! 

नि …’ घर ‘ कोणाचं ? तर ते मात्र नक्कीच ‘ आमचंय ‘ .. म्हणजे अहो आई नि सासरेबुवांचं !

ही अशी ट्रीटमेंट मिळूनही सुरुवातीला वाटलं  तिला की कुटुंबात घट्ट स्थान मिळवायला काही काळ तर जाऊ द्यायला हवा. कामाचं योगदान देऊन जबाबदाऱ्या पार पाडल्या की ‘ आमच्या ‘ घराचं परिवर्तन सहज आपल्या ‘ घरात होईल ‘ नि तिलाही कुटुंबपरिघावर विराजमान होता येईल.

माहेरी एकुलती एक असल्यामुळे म्हणा किंवा माहेरची न्यूक्लिअर फॅमिली असल्याने म्हणा, दुहेरी वागणूकीचा गंधही नव्हता  तिला सुरुवाती सुरुवातीला. आई-वडील स्वत:च्याच  मुलांमध्ये असा पक्षपात कसा करू शकतात ? जवळ राहिलेल्या मुलापेक्षा बाहेर गेलेल्या मुलांशी अधिक गोडीचे संबंध का दर्शवतात ? जवळ राहिलेल्या मुलाच्या बायकोबरोबर सगळ्या गोष्टी शेअर कराव्या लागण्याचा वचपा काढायला अशी रणनीती आखत असतील का ?… असे अनेक प्रश्न * तिच्या* मनात घोळत असत तेव्हा.

वर्षागणिक अनुभवाअंती  तिच्या प्रश्नांमध्ये भरच पडत गेली.

दीर-जावांनी त्यांच्या घरी केलेला एखाद-दोन दिवसांचा पाहुणचार ,आणलेल्या लहानसहान गिफ्टस् , केवळ फोनवरून केलेली विचारपूस नि ह्या सगळ्याचं ‘ अहो आईंनी ‘ भरभरून केलेलं कौतुक , (तेही घरच्या सुनेने  २४/७ दिलेल्या * योगदानाला कर्तव्याच्या* कॅटेगरीत सोईस्करपणे ठेवून) 

… म्हणजे * दिव्याखाली अंधार ?* की *कौटुंबिक राजकारण * ??

‘ वैयक्तिक घरगुती संबंध आपल्या जागी नि राजकारणी संबंध आपल्या जागी ’ ही अशी पक्षीय राजनीतीतली वाक्यं आपल्याला परिचयाची होती. पण * घरगुती राजनीती एव्हाना  चांगलीच परिचयाची झालेय आपल्याला. आज काही झालं तरी ह्या राजनीतीला बळी न पडता घराबाहेर पडायचंच नि तेही हसतमुखाने चोख प्रत्युत्तर देऊन !

‘ स्स ! हाssय !!’ शेवटचा फुलका तव्यावरून उतरवतांना जशी वाफ हातावर आली, तशी विचारांच्या तंद्रीतून * ती* बाहेर आली. 

“ हे काय तू कुठे निघालीस ? संध्याकाळी समीर नि मोहन यायचेत लक्षात आहे नं ?”

दुपारची झोप झालेली पाहून चहा घेऊन आलेल्या  तिला  अहो आईंचा प्रश्न आला.

“ अय्या, अहो आई , तुम्ही विसरलात का ? मुलुंडच्या काकांचं आपल्यालाही आमंत्रण आहे ! आणि ….

अहो, समीरदादा नि मोहनदादा यायचेत म्हणजे सगळी रक्ताची नातीच जमायचीत ! मग म्हटलं आपणच काकांच्या आमंत्रणाचा मान ठेवावा. तुम्हा सगळ्यांना मोकळेपणाने बोलता येईल नि आपल्या घरची  प्रतिनिधी म्हणून मीही समारंभात उपस्थिती लावीन. ठीक आहे ?”

तिच्या ह्या अनपेक्षित मूव्हमुळे हैराण झालेल्या ‘ अहो ‘ आईंकडे हसतमुखाने कटाक्ष टाकून  ती पर्स उचलून घराबाहेर पडली.

लेखिका : सुश्री अनुजा बर्वे

(कथा सत्य कथाबीजावर आधारित आहे. आजच्या घडीलाही जिथे जिथे असा “सापत्न भाव“ आढळत असेल त्यांना ह्या कथेशी रिलेट करता येईल असं वाटतं.) 

संग्राहिका –  सुश्री पार्वती नागमोती

मो. ९३७१८९८७५९

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print