श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(आत डोकावून पाहिलं. भिंती बांधून वाड्याचं रूपांतर असंख्य खोल्यांत झालं होतं.) इथून पुढे — 

“वास्तविक, गेल्यावर्षी या घराचं वाटणीपत्र झालं. तेच तुझ्या वहिनीच्या जिव्हारी लागलं. ‘तुम्ही भावांच्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवून चांगलं शिक्षण दिलंत आणि आपल्या मुलांकडे मात्र दुर्लक्ष केलंत. तुम्हीच स्वत:ला घरातला एकमेव कर्तासवरता समजून स्वत:च्या उत्पन्नाची उधळपट्टी करीत होता. कुठलाही भाऊ स्वत:च्या खिशात हात घालत नव्हता. माझ्या या वेडीचं म्हणणं तुम्ही कधीच ऐकून घेतलं नाही. आता अशी पश्चाताप करायची वेळच आली नसती.’ म्हणून ती खंत व्यक्त करायची. 

मी तिला सांगायचो, ‘अगं ज्याच्या त्याच्या नशिबात असतं, ज्याचे त्याला मिळत असते आभाळगाणे किंवा माती. भले आपली मुलं जास्त शिकली नसतील. पण आज स्वत:च्या कर्तबगारीच्या जोरावर काहीतरी कमवत आहेत ना? ते महत्वाचे आहे. आपल्या दोघांना फुलासारखं जपताहेत ना? बस्स, अजून काय हवं आहे?’ पण ते तिला पटायचं नाही. आणि एके दिवशी ध्यानी-मनी नसताना अचानक हृदयघाताने देवाघरी गेली.” 

तितक्यात सतीशच्या सुनेने चहा आणला. ‘माझी मोठी सून निर्मला’ असं सांगत सतीशने तिला माझी ओळख करून दिली. निर्मलाने मला नमस्कार केला. “मामंजीकडून आणि आमच्या सासूबाईंच्याकडून मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय.” असं म्हणत ती निघून गेली. 

चहा घेता घेता सतीश म्हणाला, “माझी दोन्ही मुलं वेगवेगळा व्यवसाय करतात. तुझी वहिनी गेल्यावर मीच त्या दोघांना दोन खोल्यांत वेगळा  संसार थाटून दिला. माझ्या जेवण्याखाण्याची व्यवस्था एक महिना माझी मोठी सून पाहते. एक महिना माझी धाकटी सून पाहते. एरव्ही देखील काही चांगलंचुंगलं केलं की ते माझ्यासाठी पाठवतातच.

दोघीही सुना मला हवं नको ते पाहतात. न्याहारी, चहा, दोन वेळचं जेवण अगदी वेळेवर माझ्या खोलीत आणून देतात. सकाळी कामावर जाताना आणि रात्री कामावरून आली की दोन्ही मुलं माझ्याकडे येऊन विचारपूस करून जातात. आणखी काय हवंय सांग? 

तुला आठवतं का? तुझ्या आग्रहाला बळी पडून मी एक विमा उतरवला होता. सुदैवाने त्याचे हप्ते नियमितपणे भरत होतो. गेल्या वर्षी त्याची बर्‍यापैकी रक्कम आली आणि तेच पैसे बॅंकेत गुंतवले. महिन्याला बाराशे रूपये व्याज येतं. त्यात माझं औषधपाणी व इतर खर्च भागतात. कुणाकडे एक रूपया मागत नाही. झालंच तर दोन्ही सुनांच्या घरी अधूनमधून पालेभाजी आणून देतो.”           

“तुझा वेळ कसा जातो?” असं विचारल्यावर सतीश थोडासा खुलला. “अरे ती काही समस्या नाही. लायब्ररीतली सगळी पुस्तकं आपले मित्र आहेत. बहुतेक करून आत्मचरित्रे वाचतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात कुठे येतात असे डोळे दिपवून टाकणारे सोनेरी क्षण? तसंच अगदी कडेलोट व्हायच्या क्षणी ही माणसं स्वत:ला सावरून परत कशी ठामपणे उभी राहतात, आणि आपण कसे लहान लहान संकटात कोलमडून जातो हे लक्षात येतं.

पुस्तक वाचून झालं की उत्तराची अपेक्षा न ठेवता मी त्या लेखकाला पोस्टकार्डावर एक खुशीपत्र लिहून पाठवतो. दुसर्‍याला अत्तर लावताना तुमची बोटंही सुगंधी होतात म्हणतो ना तसे. 

आता बघ, संध्याकाळचे साडेसहा वाजले की दंगा करणारी ही सगळी कार्टी, हातपाय तोंड धुऊन दप्तर घेऊन माझ्या खोलीत येतात. आसनं टाकून शुभं करोति म्हणून झाल्यावर अभ्यासाला लागतात. मी तिथंच पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असतो. कुणाला काही अडलं की माझ्या जवळ येऊन विचारतात. गणित, सायन्स, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या विषयातलं काहीही.

आपल्या मास्तर लोकांनी असं काही घोटून घेतलंय की आज पन्नास वर्षानंतर देखील ते पुसलं गेलेलं नाही. माझ्या खोलीत काळा कापडी बोर्ड लटकवलेला आहे. त्यावर मी गणितं सोडवून दाखवतो. निबंध कसे लिहायचे त्याचे मुद्दे सांगतो. ही मुलं दोन तास अभ्यासात अगदी गढून जातात आणि साडे आठ वाजले की भुर्र्कन उडून जातात. माझाही वेळ अगदी पंख लावल्यागत उडून जातो.”         

सतीशने समोरच्या हातगाडीवाल्याला बोलावून अर्धा डझन केळी विकत घेतली. तितक्यात खेळ संपवून परत आलेल्या प्रत्येक मुलाच्या हातात सतीशनं एक एक केळं ठेवलं. सगळी पोरं धूम ठोकून पळाली. 

मी सहजच म्हटलं, “सतीश, यात तुझी नातवंडं कुठली?” 

सतीश केविलवाणं हसत म्हणाला, “खरं सांगू? या सहा नातवंडात, चार नातवंडे माझ्या दोघा भावांची आहेत. अरे, या घराच्या वाटण्या झाल्या आहेत. पण नातवंडांच्या वाटण्या झाल्या नाहीत, त्यामुळे ही सहाही नातवंडे अगदी माझ्याच वाटणीला आली आहेत असं समजतो. माझे भाऊ, मला मोठा भाऊ मानत असतील की नाही माहीत नाही पण मी या सर्व नातवंडांचा ‘मोठा आजोबा’ आहे. अगदी लहानपणापासून ही मुलं माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली आहेत. मी या जगातून जाईपर्यंत ही सगळी नातवंडं फक्त माझीच असणार आहेत!” 

सतीश बराच भावुक झाला होता. संध्याकाळ होत आली होती. बाहेर चिमण्यांचा चिवचिवाट वाढला होता. आता निघावं म्हणून मी उठायला लागलो. तेंव्हा सतीशनं थरथरत्या हातानं माझा हात घट्ट धरून ठेवला होता. जणू त्याला मला सोडायचंच नव्हतं. ‘पुढच्या वेळी आल्यावर निवांत भेटेन’, असं म्हणत जड मनाने मी माझ्या मित्राचा निरोप घेतला.    

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments