डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥ गुरुदक्षिणा ॥ – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(एक दिवस आश्रमाचे माझ्या वडिलांच्या वयाचे  व्यवस्थापकच हे करायला लागले तेव्हा मी पळून गेले तिथून.) इथून पुढे – 

मी दहावीची परीक्षा दिली होती. मी मामाकडे आले. त्याच्या संसारात मी जडच होते त्यांना ! मामा म्हणाला, “ बकुळ,आपण लग्न करूया तुझं ! “ पण बाई, हे असले किळसवाणे अनुभव घेऊन मला पुरुष देहाबद्दल प्रचंड तिटकारा वाटायला लागला होता..मी  मामाला सांगितलं, “ मी जन्मात नाही लग्न करणार. तू जर माझं लग्न बळजबरीने लावलंस तर मी जीव देईन.”  त्यांना दोघांना मी घडलेली हकीकत सांगितल्यावर तर रडूच आलं त्यांना. मी गावाकडे केली बारीकसारीक कामं, पण तिथे कोण देणार एवढा पैसा? मग मला एका बाईंनी पुण्याला आणलं. त्या मावशींनी छान  काम दिलं आणि तुमच्यासारखी चांगली माणसं पण मिळाली. बाई, मी कायम राहीन तुमच्याकडे. मला आता दुसरीकडे नका ना पाठवू. “ 

देवकीच्या डोळ्यात पाणी आलं. “ बकुळ, तू फार गुणी आणि हुशार आहेस. तू असं आयुष्य वाया नको घालवू ग. पुढे शीक, असं काहीतरी शिक्षण घे की तुला सन्मानाने जगता येईल. मी शिकवीन, सगळी मदत करीन तुला. शिकशील का पुढे? बघ ! किती मार्क होते तुला दहावीला? “ बकुळ म्हणाली “ ऐशी टक्के “     “अग वेडे, मग तर तू घरकाम नाहीच करायचं. आपण तुला डी एड ला घेऊया प्रवेश. करशील ना? दोन वर्षे शिकावे लागेल पण जन्माचं कल्याण होईल ग बाळा तुझं !” 

“ बाई,मी नक्की करीन तुम्ही म्हणताय तर ! तुम्हाला अपयश देणार नाही मी .आणि तुमचे सगळे पैसे फेडून टाकीन मी! “ 

“ वेडे, ते बघू नंतर. मला काय कमी आहे बकुळ? तू फक्त  वीस वर्षाची आहेस जेमतेम. बघूया काय  करता येतं ते.” एका प्रख्यात कॉलेजमध्ये बकुळला डी एड ला सहज प्रवेश मिळाला. बकुळ लवकर उठून जमेल तेवढं काम करून कॉलेजला जायची. राहीने आनंदाने बकुळला आपली सायकल दिली. तिने नवीन टू व्हीलर घेतल्याने सायकल पडूनच होती तिची.  बघता बघता बकुळच्या डीएडचं पहिलं वर्ष संपलं. बकुळला खूप सुंदर मार्क्स मिळाले. आता ती त्या कॉलेजमध्ये रुळून गेली. तिला काही वेळा वाटायचं, आपण काम करणारी मुलगी आहोत, आणि दिवसभर हा कोर्स करत असल्याने आपला घराला पूर्वीसारखा उपयोग होत नाही. ही  खंत ती बोलून दाखवायची देवकीला. देवकी तिला म्हणायची, “असं नको म्हणू. माझी मुलं लहान असताना तू खूप मदत केली आहेस बकुळ ! आता निवांत शीक, लक्ष लावून अभ्यास कर बेटा. सगळं छान होईल तुझं बघ.” बकुळ चांगल्या मार्कानी डीएड झाली. तिला एका शाळेत नोकरीची ऑफर सुद्धा आली.

.बकुळ पेढे घेऊन आली आणि तिने देवकीच्या पायावर डोकं ठेवलं. “ अग वेडे, हे काय करतेस? “ देवकीने तिला पोटाशी धरलं. “ नाही हो बाई, मी बघते ना, आमच्या डी एड कॉलेजमध्ये कुठून कुठून मुली येतात हो ! त्या किती कष्ट करून शिकतात, कोणी पहाटे मेसमध्ये दोनशे पोळ्या करून येतात, तर कोणी चाकणहून रोज अपडाऊन करतात. किती हाल आहेत बाई बाहेर ! कोणाचे वडील दारुडे तर कोणाची आईच अपंग ! किती किती सोसतात हो मुली बाहेरच्या जगात !” बकुळच्या डोळ्यात पाणी होतं हे सांगताना. “ बाई,एक मुलगी तर पोलिओ झालेली आहे पण किती जिद्दीने शिकतेय. मी तर किती भाग्यवान आहे हो, तुमच्या घरी सुरक्षित राहून शिकले आहे. मुलीसारखी मानता मला तुम्ही. बाई, हे बघा ना माझं  लेटर. मला पंधरा हजार पगार देणार आहेत सुरुवातीला. मी करू ना ही नोकरी? “ 

“ अग जरूर कर बकुळ ! खूप खूप अभिनंदन तुझं ग !” 

“ बाई,”  संकोचून बकुळ म्हणाली.. “ मी आता इथे किती दिवस रहाणार? मी डी एड कॉलेजच्या वसतिगृहात राहीन आता. मला ते कमी खर्चात तिकडे राहू देणार आहेत. आता आणखी नका लाजवू.  जाऊ द्या मला आता बाई !” बकुळ रडायला लागली. सगळं घर तिच्याभोवती जमलं.आजींना सुद्धा गहिवरून आलं… “ जा तू बकुळ. अशीच स्वतःच्या पायावर उभी रहा.” आजींनी तिला पाचशे रुपये बक्षीस दिले. “ सुट्टीच्या दिवशी येत जा हो रहायला हक्काने!” त्या म्हणाल्या.

देवकीने बकुळला छानशी बॅग दिली, छान साड्या घेऊन दिल्या. बकुळ होस्टेलवर राहायला गेली. तिने देवकीशी कायम संपर्क ठेवला. बकुळ आता पर्मनंट झाली नोकरीत.  मग तिचं फारसं  येणं जाणं होऊ शकेना देवकीकडे. देवकीची मुलं मोठी झाली. रोहन राही पुढचं शिकायला अमेरिकेला गेले आणि घरात देवकी आणि तिचा नवरा एवढेच उरले. आजीही मध्यंतरी कालवश झाल्या.

आज अचानक खूप वर्षांनी बकुळ देवकीला भेटायला आली. “ बाई, कशा आहात? “ म्हणून तिने मिठीच मारली देवकीला. “  बाई मी आता एका शाळेत सुपरवायझर झाले, आणि मी त्या शाळेच्या हॉस्टेलची मेट्रन म्हणून पण काम करते. मला शाळेने रहायला क्वार्टर्स पण दिले आहे बाई ! तुमची कृपा सगळी … “ बकुळच्या डोळ्यात अश्रू होते. “ बाई, मला लग्न कधीच नाही करावंसं वाटलं नव्हतं आणि आत्ताही वाटत नाहीये. मी आता अशीच मस्त राहीन. नको वाटतो तो अनुभव मला. आणि खूप मिळवतेय की मी ! बाई तुमचे उपकार कसे फेडू? नाही तर ही बकुळ अशीच घरकाम करत, कदाचित अशीच मरूनही गेली असती. तुम्ही देवमाणसं आहात बाई ! “ बकुळने देवकीच्या पायावर डोकं ठेवलं. “ बाई डोळे मिटा ना जरा….”   बकुळ हसत म्हणाली.

देवकीने हसत डोळे मिटले. बकुळने तिच्या हातावर काय ठेवले हे बघायला डोळे उघडले तर हातात सोन्याचे चांगलेच जड नाणे होते. “ बाई, तुम्ही माझ्यासारख्या दगडातून सोनं घडवलं म्हणून हे माझी आठवण म्हणून तुम्हाला ! नाही म्हणू नका  ना ! तुम्ही केलंत ना, त्यापेक्षा याची किंमत कमीच आहे, पण आज गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून मला घडवणाऱ्या पहिल्या गुरूला ही गुरुदक्षिणा ! ” 

देवकीने बकुळला जवळ घेतले आणि दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. “आनंदाश्रू आहेत हे बकुळ… नको पुसू !” देवकी म्हणाली आणि आत चहा करायला वळली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments