श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सकाळी वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. “काय कधी आलास?” असं विचारतच भास्कर आत आला. बऱ्याच वर्षानी त्याला पाहत होतो. दाढीचे खुंट वाढलेले. अंगात अघळपघळ सदरा पायजमा. भास्कर आमच्या पूर्वीच्या घराशेजारी असायचा. अर्थात अजूनही तिथेच राहतो. 

त्याची आई कुठल्या तरी सरकारी डिपार्टमेंटमध्ये क्लार्क होती. आपल्या दोन्ही मुलांना शिकवायचा तिने खूप प्रयत्न केला. मुलगी सुनिता पदवीधर झाली, मात्र भास्कर मॅट्रिकही पास होऊ शकला नाही. मग त्याने खाजगी नोकरी धरली. 

मी विचारलं, “आई कशी आहे?” 

त्यावर मान खाली घालून बोलला, “बरी असेल. वडील गेल्यानंतर आईला काही दिवसांसाठी घेऊन जाते म्हणून सुनिता घेऊन गेली. नंतर आम्ही आईला नीट सांभाळू शकणार नाही म्हणून तिला परत पाठवायचं नांवच काढत नाही. 

या गोष्टीला तीन वर्ष झालीत. सुरक्षिततेच्या नांवाखाली आईचे सगळे दागिने आधीच सुनिताने स्वत:च्या ताब्यात घेतले. तिचा खरा डोळा आईच्या हजारांच्या पेन्शनीवरही होता. हे सगळं पूर्वनियोजित होतं. माझ्या वाटणीला तेवढं भाड्याचं राहतं घर आलंय बघ.”

एक मात्र खरं की भास्करचं त्याच्या आईवर निस्वार्थी प्रेम होतं, यात शंकाच नाही. ही विलक्षण गोष्ट ऐकून मी चाटच पडलो. 

तो पुढे म्हणाला, “बरं ते जाऊ दे. तुझा मित्र सतीश भेटला होता. त्याने तुझी आठवण काढली. गेल्यावर्षी त्याला स्ट्रोक आला होता. पठ्ठा चिवट आहे. जरा हालचाली मंद झाल्या आहेत, पण तो आपल्या पायावर उभा आहे. जमलंच तर भेट त्याला.” असं म्हणून भास्करने निरोप घेतला.      

मध्यंतरी मी सांगलीला असताना माझा एक वर्गमित्र मला भेटायला आला होता. व्यापाराच्या निमित्ताने आला होता. आम्ही जवळच्याच हॉटेलात जेवायला गेलो. भरपूर गप्पा मारल्या. “गावी आल्यावर नक्की फोन कर” असं म्हणून त्यानं निरोप घेतला.

नंतर एकदा गावी गेल्यावर त्या मित्राला मोबाईल लावला. मी ‘हॅलो’ म्हणताच तिकडून आवाज आला. “हां बोल, कसा काय फोन केलास? काही काम होतं कां?”

त्याच्या अशा अनपेक्षित कोरड्या प्रतिसादाने मी चांगलाच वरमलो. “अरे नाही. चुकून तुझा नंबर लागला वाटतं. आय अ‍ॅम सॉरी!” म्हणून फोन कट केला. त्यानंतर कधी कुणा मित्राला फोन करण्याच्या किंवा भेटण्याच्या फंदात पडलो नाही….                

सतीश माझा खूप जवळचा मित्र होता. आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘चला मित्राला भेटू या’ म्हणून मी स्कूटीवरुन निघालो. वीसेक वर्षानंतर मी त्या परिसरात जात होतो. सगळंच कसं बदलून गेलं होतं. शोधत शोधत सतीशच्या घराजवळ आलो. उन्हं उतरली होती. बाहेर सहा सात मुलं अंगणात खेळत होती. त्या मुलांना सतीशच्या विषयी विचारलं. त्यांनी तिथेच झाडाखाली खुर्ची टाकून बसलेल्या गृहस्थाकडे बोट दाखवत, ओरडून सांगितलं, “आजोबा तुमच्याकडे कोण आलंय पहा.” मी गाडी लावली. 

बऱ्याच कालावधीनंतर मी सतीशला भेटत होतो. खूपच कोमेजलेला दिसत होता. मुळांपासून उखडलेल्या झाडाची जशी स्थिती होते तसा तो खुर्चीत आक्रसून बसला होता. आपल्या नेहमीच्याच चिरपरिचित पांढरा पायजमा आणि कुर्ता या वेषांत होता. त्याच्या मनाच्या स्थितीप्रमाणेच कपड्यांवर देखील सुरकुत्या पडल्यामुळे तो केविलवाणा दिसत होता. मला आश्चर्य वाटलं. तो किती ऐटीत असायचा. मी पहिल्यांदाच त्याला असा पाहत होतो. 

माझ्या डोक्यावरील कॅपमुळे त्यानं मला लगेच ओळखलं नाही. कॅप काढताच, खुर्चीतून सावकाश उठून उभा राहिला आणि हात हातात घेऊन म्हणाला, “अरे, किती वर्षांनी तुला माझी आठवण आली? चक्क दहा वर्षानंतर भेटतोयस. तुझी वहिनी नेहमी तुझी आठवण काढायची.”

एव्हाना लांबून पाहणाऱ्या मुलांच्या लक्षात आलं की ‘हा कुणीतरी आजोबांचा जवळचा मित्र असणार’. ते धावतच आले. 

सतीशने त्या पोरांना सांगितलं, “बाळांनो, आत जाऊन दोन कप चहा टाकायला सांगा.”

पोरं पळतच आत गेली. जीभ जड झाल्यानं, त्याला बोलायला काहीसं अवघड जात होतं.   

मी विचारलं,“कसा आहेस?” तर खिन्नपणे म्हणाला, “बरा आहे म्हणायचं. आला दिवस ढकलायचा. तुझी वहिनी सोडून गेली, एकटा पडलो.”

मी म्हटलं, “वहिनी अशा अचानक निघून जातील असं वाटलं नव्हतं.”

सतीश घुश्शातच म्हणाला, “जाऊ दे, गेली तर गेली. मला काही फरक पडत नाही.” 

खरं तर हा वरवरचा त्रागा होता. वयाच्या अठराव्या वर्षीच सतीशचं लग्न झालं होतं. त्यांचं एकमेकावरचं घट्ट प्रेम काही झाकलेलं नव्हतं. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवताच, कसाबसा हुंदका दाबत तो म्हणाला, “अरे, तिने तरी असं मध्येच दगा द्यायला नको होतं. आताच मला तिच्या सहवासाची खरी गरज होती.”

काही वेळ स्तब्धतेत गेला. घसा खाकरत सतीश पुढं सांगत होता, “तुला तर माहीत आहे. आमचं एकत्र कुटुंब होतं. सगळ्या भावांचा वेगळा व्यवसाय होता. खरेदी विक्रीत मिळणारी दलाली हा माझा बिनभांडवली धंदा होता. सचोटीच्या व्यवहारामुळे मी भरपूर पैसे मिळवत होतो. मी एकटाच निस्वार्थीपणाने घरात लागेल तो खर्च करीत होतो.

‘जो पर्यंत तुम्ही बाजारात उभे असाल तोपर्यंत तुमचे उत्पन्न चालू राहील. त्यानंतर काय? आपल्या म्हातारपणासाठी चार पैसे मागे टाका.’ असं तुझी वहिनी सारखं सांगायची पण मी कधी मनावर घेतलं नाही. 

ती जिवंत होती तेव्हाच मी गंभीरपणे आजारी पडलो. सहा महिने बिछान्याला खिळून होतो. उत्पन्नाचं साधन गेलं. 

भावांची मुलं कर्तीसवरती झाली होती आणि घर सांभाळायची जबाबदारी जेव्हा त्यांच्यावर आली तेव्हा अचानक वेगळे होण्याचा प्रस्ताव पुढे आला. अखेर भावाभावांच्यात घराच्या वाटण्या झाल्या. माझ्या हिश्श्याला त्या कोपर्‍यातल्या तीन खोल्या आल्या.”

आत डोकावून पाहिलं. भिंती बांधून वाड्याचं रूपांतर असंख्य खोल्यांत झालं होतं. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments