मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दि रियल हिरो… लेखिका : सुश्री गुंजन गोळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री गुंजन गोळे

? इंद्रधनुष्य ?

☆ दि रियल हिरो… लेखिका : सुश्री गुंजन गोळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

वयाच्या २१ व्या वर्षी सरकारी नोकरी, मानसन्मान, पैसाअडका असं सगळं स्वप्नवत असताना अचानक नोकरीचा राजीनामा देणाऱ्या मुलीला तुम्ही काय म्हणाल?…

कदाचित बेजाबदार किंवा लहरी म्हणाल. 

पण, समाज ‘ति’ला ‘हिरकणी’ म्हणतो आहे, ‘द रियल हिरोज’ या पुरस्काराने सन्मानित करतो आहे. 

पोलीस निरीक्षक पदाची नोकरी सोडून अनेक अनाथ, गरीब, मनोरुग्णांसाठी कार्य करणारी ‘द रियल हिरो’!

२७ डिसेंबर २०१६ ला ‘ती’ विवाहबंधनात अडकली. लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत तिने नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

लग्नाच्या दिवशी तिने व तिच्या जोडीदाराने रक्तदान केले. एवढंच नाही, तर त्यांच्या लग्नाला आलेल्या इतर मंडळीनी देखील रक्तदान केलं. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्याच दिवशी या नवीन जोडप्याने ५ अनाथ मुलींचे पालकत्व घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला. 

कोण ही ती? ही आहे गुंजन गोळे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली ही मुलगी आज तिच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवते आहे. हो ! शब्दशः गाजवते आहे. 

गुंजनने अमरावतीत गवळीगड येथे महिला ढोल पथक सुरु केले आणि राज्यातील पहिले महिला ढोल पथक सुरू करण्याचा मान तिला मिळाला. या पथकात आज १५० महिला आहेत. 

तत्त्वज्ञानामध्ये एम.ए. केल्यानंतर गुंजनने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. प्रचंड कष्ट आणि मेहनतीने अभ्यास केला. युपीएससीमधील Combined Defence Services ची परीक्षा तिने दिली आणि ती उत्तीर्ण देखील झाली. त्यानंतर तिने पोलीस उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा दिली आणि तिने त्यातही यश मिळवलं. 

लहानपणी गुंजनने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. आईवडील आणि तिच्या स्वतःच्या कष्टाचं चीज झालं. 

गुंजन पोलीस निरीक्षक पदावर रुजू झाली. 

दिवसरात्र मेहनत करून मिळवलेल्या नोकरीचा गुंजनने एक दिवस राजीनामा दिला…! आश्चर्य वाटलं ना? 

पण, हा राजीनामा नोकरीचा कंटाळा आला, काम जमलंच नाही, वरिष्ठांचा दबाव आला म्हणून दिला नव्हता. राजीनामा देण्यामागे एक विचार होता. एक ध्येय होतं. वेगळ करून दाखवण्याची जिद्द होती. समाजसेवेची ओढ होती. हे सगळं करण्यासाठी गुंजनला प्रेरित करणारा प्रसंगही तसाच घडला होता. 

एके दिवशी रात्री ड्युटी आटोपून घरी परतत असताना गुंजनला एक मनोरुग्ण महिला अर्धानग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला दिसली. त्या महिलेच्या अंगावर जेमतेम कपडे होते. केस सुटलेले, अनेक दिवस अंघोळ न केल्याने ती विचित्र दिसत होती. त्यातच ती गरोदर आहे हे गुंजनच्या लक्षात आलं. नक्कीच कोणीतरी नराधमाने तिला आपल्या वासनेचं शिकार केलं असणार!

ते दृश्य बघून गुंजनला खूप रडू आलं. किळस वाटली. स्वत:ला माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली. गुंजनने सगळा धीर एकवटला. ती गाडीतून उतरली. त्या महिलेला घेऊन तिची योग्य ती सोय लावण्याचा तिने ठाम विचार केला आणि अजून एक विचार केला, तो म्हणजे अशा महिलांसाठी कार्य करण्याचा!

तिचा विचार पक्का झाला आणि अतिशय कष्टाने मिळवलेल्या नोकरीचा गुंजनने राजीनामा दिला. आधीची पोलीस निरीक्षक गुंजन आता रस्त्यांवरील मनोरुग्ण, वयस्क, अनाथ आजी-आजोबा, मुले यांचा आधार झाली. 

आता गुंजनचा दिवस पहाटे केव्हा सुरू होतो आणि केव्हा संपतो हे तिला देखील कळत नाही. ती अमरावती परिसरातील गरीब-गरजू मुलांना सैनिक भरतीचे प्रशिक्षण देते. स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेते. ढोल पथकाचा सराव घेते. महिला व मुलींना स्वरक्षणाचे धडे देते. साहसी खेळ जसे लाठी-काठी,  तलवारबाजी, दांडपट्टा हे शिकवण्याच्या कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करते. विशेष म्हणजे, या सगळ्यातून मिळणारे पैसे ती समाजकार्यात वापरते.

संध्याकाळी आपल्या दुचाकीवर बसून बिस्किटाचे पुडे, पाण्याच्या बाटल्या, छोटे हातरुमाल अशा विविध साहित्याने भरलेली बॅग घेऊन रस्त्यांवर कोणी उपाशी झोपले आहे का, थंडीत कुडकुडते आहे का? याचा ती शोध घेते आणि गरजुंना ते साहित्य देते. 

आजवर कित्येक नवजात बालकांना तिने मृत्यूच्या जबड्यातून वाचवले आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या आणि रस्त्यावर फेकून दिलेल्या अनेक नवजात शिशुंना तिने जीवदान दिले आहे. तिच्या पुढाकाराने अनेक मनोरुग्ण, कृष्टरोगी यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

गुंजन एक उत्तम गिर्यारोहक देखील आहे! दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ती कळसूबाईचे शिखर सर करते आणि कळसूबाईवर तिरंगा फडकावते. आतापर्यंत १४ वेळा तिने हे शिखर सर केले आहे. 

गुंजनशी बोलताना तिचा बिनधास्त स्वभाव, समाजासाठी वाटणारी तळमळ शब्दाशब्दातून जाणवते. या 

मुलाखतीत तिने एकदाही स्वतःला मिळालेल्या कोणत्याही सन्मानांचा किंवा पुरस्कारांचा उच्चार देखील केला नाही. 

ज्याप्रमाणे पाच मुली दत्तक घेतल्या तशाच ५०० मुली दत्तक घेण्याचा गुंजनचा मानस आहे. महाराष्ट्रात एकही मनोरुग्ण, अनाथ, वयोवृद्ध रस्तावर बेवारस अवस्थेत राहू नये. असं तिला मनापासून वाटतं. पैशाअभावी किंवा वेळीच उपचार न मिळाल्याने जेव्हा एखादा माणूस दगावतो तेव्हा ती स्वतःला फार असहाय्य समजते. 

या सर्वाची दखल समाज कुठेतरी घेत होता. ८ जानेवारीला तिला ‘द रियल हिरोज’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

तिच्यावर लिहिलेल्या ‘काही देणं लागतो’ या डॉ. सुभाष गवई यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुण्यभूमी तपोवन येथे पार पडला. तिला ‘हिरकणी’ पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. 

गुंजनने आतापर्यंत २ वेळा राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. २६ जानेवारीच्या परेडमध्ये देखील तिला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

एकाच वेळी घर, समाज आणि राष्ट्र अशा तीनही आघाड्यांवर आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी मुद्रा उमटवणाऱ्या गुंजनला  मन:पूर्वक शुभेच्छा !

लेखिका : सुश्री सुश्री गुंजन गोळे

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक ११ ते २० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक ११ ते २० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।

योगिन: कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ।।११।।

*

त्यागुनी आसक्ती  अंतःकरण शुद्धीस्तव कर्मा आचरत

स्वभाव जाणुनी देहमनबुद्धीचा कर्मयोगी कर्मा आचरत ॥११॥

*

युक्त: कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।

अयुक्त: कामकारेण फले सक्तो निबध्यते ।।१२।।

*

त्यागुनी कर्मफला कर्मयोगी शांति करितो प्राप्त

त्याग न करता फलाकांक्षेने लोभी बद्ध बंधनात ॥१२॥

*

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।

नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ।१३।।

*

कर्मासी जो आचरितो समर्पित वृत्तीने 

नवद्वार नगरी स्थित  तो परमात्म स्वरूपाने॥१३॥

*

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु: ।

न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ।।१४।।

*

परमेशे ना निर्मिले कर्तृत्व कर्मफल वा कर्म

प्रकृती स्वभावे घडत जाते कर्त्या द्वारे कर्म ॥१४॥

*

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभु: ।

अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव: ।।१५।।

*

ब्रह्मात्मा कधी न करतो पाप वा पुण्य

अज्ञानाने झाकोळूनी जाते जसे ज्ञान

जीवन हा निर्मल नितळ अथांगसा डोह

कर्म करिता मनुजा मात्र लोभवितो मोह ॥॥१५॥

*

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।

तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ।।१६।।

*

तिमीर हटता अज्ञानाचा उजळे तत्वज्ञान 

सूर्यप्रकाशाने सृष्टी जैशी येत उजळून

अनावृत होता ज्ञान झुगारुन  झापड अज्ञान

विश्वात्म्याचे स्वरूप स्पष्ट मानव घेइ जाणून॥१६॥

*

तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणा: ।

गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा: ।।१७।।

*

तद्रुप बुद्धी तदाकार मन परमात्म्याशी अद्वैत

आत्मज्ञाने ते निष्पाप मोक्ष तयांना हो प्राप्त ॥१७॥

*

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।

शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ।।१८।।

*

विद्या-विनयाची ज्याने बाणविली अंगी वृत्ती

कुंजिर श्वा गो चांडाळाशी असते त्याची समदृष्टी ॥१८॥

*

इहैव तैर्जित: सर्गो येषां साम्ये स्थितं मन: ।

निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिता: ।।१९।।

*

इह जन्मी संसारजेता समदृष्टी जयाची स्थित

ब्रह्मासम ते दोषरहित ब्रह्माठायी असती स्थित ॥१९॥

*

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।

स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थित: ।।२०।।

*

मोद नाही प्रियप्राप्तीने ना उद्विग्नता अप्रियाने

स्थितप्रज्ञ ब्रह्मवेत्ता नित्य स्थित ब्रह्मी ऐक्याने ॥२०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हरवलेली रेल्वेगाडी… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हरवलेली रेल्वेगाडी… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

हरवलेली रेल्वेगाडी.

Strange and interesting thing — 

— भारताच्या आसाम मध्ये ४३ वर्षापुर्वी हरवलेल्या रेल्वेगाडीची सुरस कथा. 

5 डिसेंबर 2019…

आशिया-आफ्रिका प्रदेशातील जंगलाचे मॅपिंग करणार्‍या  नासाच्या एका उपग्रहाने, भारताच्या आसाम मध्ये ईशान्येकडील एका घनदाट जंगलात काहीशी अस्पष्ट, धूसर अशी छायाचित्रे टिपली ज्यात एक लांबलचक वस्तू दिसत होती.

हे एखादे लपवून ठेवलेले आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) असावे असा प्रथमदर्शनी त्यांना संशय आला व त्यांनी ती छायाचित्रे पेंटागॉनला संरक्षण खात्याकडे पाठवली.

त्यानंतर या क्षेत्रावर अनेक उपग्रह घुटमळू लागले, ज्याची नोंद आपल्या इस्रो, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन विभाग आणि गुप्तचर संस्थांनी घेतली.

दरम्यान पेंटागॉनमधील रशियन आणि चीनी डबल एजंटांनी त्यांच्या देशांतील गुप्तचर संस्थेला, नासाने शोधलेल्या ‘ICBM ट्रेन’ बद्दल माहिती दिली आणि या देशांतील ‘रॉ’च्या एजंट्सकडून ही माहिती भारतात आली.

आता धोक्याची घंटा वाजू लागली. कोणी जाणीवपूर्वक तर हे कृत्य केले नसेल ना? देशाला बदनाम करण्यासाठी एखाद्या विदेशी सरकारचा तर यात हात नसेल ना?

भारतीय पातळीवर चौकशी सुरू झाली.

पंतप्रधान कार्यालय, संरक्षण गुप्तचर संस्था, राष्ट्रीय तपास संस्था, संरक्षण मंत्रालय आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी यात सहभागी झाले.

मिलिटरी स्पेस कमांड आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड यांनी त्या ठिकाणी अशी कोणतीही क्षेपणास्त्रे ठेवली नसल्याचे सांगितले.

पण त्यानंतरची हवाई पाहणी आणि आपले उपग्रह, इंडियन एअरफोर्स आणि एव्हिएशन रिसर्च सेंटरने घेतलेले फोटो, या सर्वांनी पुष्टी केली की तेथे खरोखरच एक गाडी उभी आहे.

अखेर, राष्ट्रीय संरक्षण कमांडच्या कार्यालयातील एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यासह मार्कोस आणि गरुड पथकातील कमांडोंची एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आली.

जे दृश्य समोर आलं, ते अगदीच अविश्वसनीय होतं!

ईशान्य रेल्वेची, एक संपूर्ण  रेल्वेगाडीच तिथे उभी होती…

मागे जाऊन शोध घेतला, तेव्हा समजलं ते असं…

16 जून, 1976…

रेल्वेच्या कामकाजाचा नेहमीसारखाच एक दिवस…

आसाममधल्या ‘तिनसुखीया’ या छोट्याश्या रेल्वे स्थानकावर सकाळी एक रेल्वे मालगाडी आली. तिनसुखीया हे गुवाहाटीपासून 480 किमी पूर्वोत्तर आणि अरुणाचल सीमेपासून सुमारे 80 किमी अंतरावर आहे.

प्लॅटफॉर्म तसा छोटाच, एकावेळी फक्त दोन रेल्वे गाड्या उभ्या राहतील, एवढाच!

रेल्वे गाडीतील सर्व माल उतरवल्यावर रेल्वे गाडी तिथून हटवणं भाग होतं, कारण पुढील अर्ध्या तासात त्याच रेल्वे ट्रॅकवरून गुवाहाटीला जाणारी एक्सप्रेस येणार होती.

रेल्वे इंजिन ड्रायव्हरला, रेल्वेगाडी सायडिंगला लावण्याचा आदेश दिला गेला.

पण सर्वात जवळचं सायडिंग होतं तिथून 3 किलोमीटर लांब. सायडिंग साठी ती रेल्वेगाडी तिथपर्यंत गेली. 16 जून 1976 रोजी सकाळी 11:08 वाजता गाडी तेथे पोहोचल्याचे रेल्वेच्या नोंदीवरून दिसून आले. 

डॅनियल स्मिथ, रेल्वेइंजिन चालक ड्रायव्हरने , सायडिंग ठिकाणी रेल्वेगाडी  पार्क केली,  व   तो परत चालत चालत चालत  पुन्हा  ‘तिनसुखीया रेल्वेस्थानकावर’  आला.

आणि..

त्याच दिवशी अर्ध्या तासातच  म्हणजे सकाळी 11:31 वाजता मुसळधार पाऊस आला आणि काहीच तासांत तेथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. रेल्वे बोर्डाने केलेल्या चौकशीतून असे दिसून आले की, त्यावेळेस स्थानिक रेल्वे कर्मचारी वाहतूक सातत्य राखण्यात, ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आणि पुराच्या समस्येला तोंड देण्यात पूर्णपणे गुंतले होते. जवळपास संपूर्ण रेल्वेस्टेशन 5 ते 6 फूट पाण्यात बुडाले होते.

येणाऱ्या  सर्व रेल्वेगाड्या  जागच्या जागी  ठप्प झाल्या होत्या.  गावकऱ्यांच्या मदतीने  रेल्वे प्रशासनाने  त्यातील सर्व प्रवाशांना खाली उतरवले व वेगवेगळ्या मार्गांनी त्यांची जाण्याची सोय केली.

या सर्व गडबडीत बरेच दिवस निघून गेले. रेल्वे स्टेशनमास्तरांची बदली झाली.  पुढील काही महिन्यांत बरेचसे रेल्वे कर्मचारीही बदलले.

आपली एक रेल्वेगाडी सायडिंगला उभी आहे, याचा सर्वांना विसर पडला.

सायडिंगची जागाही तशी निर्जन!

लोकांचं त्या बाजूला फारसं जाणं येणंही नव्हतं. हळूहळू झाडांनी संपूर्ण परिसर व्यापला. क्वचितच वापरल्या जाणार्‍या साइडिंगकडे जाणार्‍या रेल्वेट्रॅकचे अवशेष;  जे पुरात वाहून गेले  होते;  लवकरच झाडे झुडुपे आणि  तणांच्या जंगलात   रेल्वेगाडी  दिसेनासे झाले.  तेथील साप, पक्षी आणि वन्य प्राण्यांना आयतंच एक घर मिळाले होते,  त्यांचा मुक्त वावर तेथे रेल्वेगाडीत होता.

बराच काळ लोटला. तेथील उरले सुरले  जुने रेल्वे कर्मचारीदेखील निवृत्त झाले, तर काहींचे निधन झाले.  या  सायडिंग बाजुला डोंगरात लावलेल्या  रेल्वेगाडीची  आठवण   कोणालाच  नव्हती. 

डॅनियल स्मिथ, रेल्वेइंजिन चालक, तिनसुखीयाच्या घटनेनंतर, तीन महिन्यातच  सप्टेंबर 1976 मध्ये, भारतीय रेल्वे सोडून तो ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाला.

नासाच्या उपग्रहाने टिपलेल्या त्या चित्राने त्या  सायडिंग रेल्वेगाडीचा  तर शोध लागलाच, पण यासाठी कामाला लागलेल्या सर्व संरक्षण पथकांनीदेखील सुटकेचा निःश्वास टाकला.

खरोखरच जर तिथे काही आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाईल सापडले असते तर,  साऱ्या जगाला तोंड द्यावे लागले असते.

सलग 43 वर्षे ह्या  सायडिंग लावलेल्या रेल्वेगाडीबद्दल भारतात कोणालाच काही माहीत नव्हते,  हे जगातले कितवे आश्चर्य?

आहे का नाही अजब कारभार !!!

लेखक :  सौरभ रत्नपारखी

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक अद्भुत अनुभव – नामस्मरणाच्या शक्तीचा…” – लेखक : डॉ. संजीव दात्ये ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक अद्भुत अनुभव – नामस्मरणाच्या शक्तीचा…” – लेखक : डॉ. डी. जी. लवेकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

— अनेस्थेशियाशिवाय शस्त्रक्रिया 

“We dare.. we care“

हे वाक्य खरेतर सर्व डॉक्टरांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. आम्ही सर्वजण रुग्णाचा जीव वाचवण्यासाठीच नेहमी प्रयत्न करीत असतो. परंतु पेशंटच्या आग्रहाखातर काही वेळेस आम्हाला अधिकच धैर्य दाखवून उपचार करावे लागतात. असाच एक मला आलेला अनुभव येथे आपणास कथन करीत आहे.

सुमारे वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल आमच्या गुरुदेव रानडे संप्रदायातील एक निष्ठेने नामसाधना करणारे ज्येष्ठ व श्रेष्ठ साधक श्री दादा तेंडुलकर मानेवर एक मोठे काळं पुडीबेंड (Carbuncle with Abscess) झाल्यामुळे सुश्रुत हॉस्पिटल चिंचवड येथे डॉक्टर कानिटकरांकडे ऍडमिट होते. डॉक्टर कानिटकर यांनी त्यांच्या सर्व तपासण्या करून मला सर्जन म्हणून त्यांचे ऑपरेशन करण्यासाठी बोलावले होते. मी त्यांना तपासले व बेंण्ड अर्थातच खूप मोठे असल्यामुळे त्यांना शस्त्रक्रियाही पूर्ण भूल ((General Anaesthesia) देऊन करावी लागेल असे सांगितले. मानेचा बराच भाग खराब झाल्याने व त्यामध्ये पू (pus) झाल्याने लोकल अनेस्थेशिया देणे सुद्धा शक्य नव्हते. 80 वर्ष वय,आटोक्यात नसलेला मधुमेह, ब्लड प्रेशर,वगैरे सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास भूलेमध्ये व शस्त्रक्रियेत असलेला सर्व धोका त्यांना व  नातेवाइकांना  समजावला. जखम भरण्यास वेळ लागेल हे देखील सांगितले होते.

“डॉक्टर तुम्ही माझे ऑपरेशन भूलेशिवाय निर्धास्तपणे करावं ..  मला काही होणार नाही, मी मान देखील हलवणार नाही. मला भूलही नको आणि वेदनाशामक इंजेक्शनही नको. ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी मात्र तुम्ही मला ‘ आता मी सुरु करणार आहे ‘ असे सांगा.  मग मी अगदी स्तब्ध राहीन आणि माझे नामस्मरण चालू ठेवीन “ असे त्यांनी आम्हाला निक्षून सांगितले.

डॉक्टर अस्तिक कानिटकर यांसारख्या अत्यंत अनुभवी भूलतज्ञ डॉक्टरांकडूनही भूल घेण्यास ते अजिबात तयार नव्हते अथवा कोणतेही इंजेक्शन घेण्यास तयार नव्हते. बेंड खूप मोठे होते व त्यांना दुखल्यास आणि त्यांनी मान हलवल्यास जवळपासच्या मानेच्या महत्वाच्या नसा, रक्तवाहिन्यांना इजा होण्याचा धोका होता. कितीही समजावून सांगितले तरी दादा अनेस्थेशियासाठी तयार होईनात. तेव्हा सर्व धोका पत्करून High risk consent घेऊन इमर्जन्सी सर्व इंजेक्‍शन वगैरे तयार ठेवून त्यांना ऑपरेशनसाठी टेबलवर घेतले. एका कुशीवर त्यांना झोपवले. पेंटिंग, ड्रेपिंग, वगैरे सर्व तयारी करून ‘ दादा मी आता ऑपरेशन सुरू करतो ‘असे सांगितले.

“ ठीक आहे. तुम्ही सर्व ऑपरेशन निर्धास्तपणे व्यवस्थित करा व संपले की मला सांगा. तोपर्यंत मी मान हालवणार नाही “  असे म्हणून त्यानी डोळे मिटून त्यांचे नामसाधन शांतपणे चालू ठेवले. त्यांचे बेंड कापून त्यातील सर्व पू व खराब भाग काढून टाकून नंतर औषधांची पट्टी भरेपर्यंत जवळपास अर्ध्या तासाने आता त्यांना ऑपरेशन संपले आहे असे सांगितले. संपूर्ण ऑपरेशन संपेपर्यंत डॉक्टर कानेटकर मॉनिटरवर त्यांचे parameters पहात होते, एकदाही त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. तसेच पेशंटला कोणतेही वेदनाशामक अथवा भुलीचे इंजेक्‍शन द्यावे लागले नाही.

“ संपले का ऑपरेशन ? हरकत नाही “ असे सांगताना त्यांच्या डोळ्यात ना अश्रू होते ना चेहऱ्यावर दुःखी भाव होते. ते सर्व पाहून आम्ही दोघेही नतमस्तक झालो. नंतरच्या ड्रेसिंगच्या वेळेस देखील त्यांनी कधीही हू का चू केली नाही.

सद्गुरूंकडून मिळालेल्या सबीज नामाचे अत्यंत निष्ठेने, चिकाटीने, सातत्याने अंतकरणापासून साधन केल्यास गुरुकृपेने विज्ञानाला देखील अगम्य असलेल्या सुप्त शक्ती साधकाला प्राप्त होतात व ईश्वर साक्षात्कारही होतो असे श्री गुरुदेवांनी व आपल्या संतांनी अनुभवातून सांगितलेल्या गोष्टींची अशी त्यांच्या शिष्यांकडून प्रचिती मिळते तेव्हा आपली श्रद्धा नक्कीच द्विगुणित होते. संत रामदासांनी दासबोधात नामस्मरण भक्ती समासात म्हटलेच आहे —

नामे विघ्ने निवारती , नामे संकटे नासती,                  

नामे होय उत्तम गती अंतकाळी.

……I feel that we doctors should accept —–   

—  We dare..We care & HE (God) CURES.. 

लेखक : डॉक्टर संजीव दात्ये

जनरल सर्जन,  चिंचवड.

लेखक : डॉ. डी. जी. लवेकर

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वसाहती अंतराळातील — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ वसाहती अंतराळातील — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्‍या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्‍या सर्व सुविधा पुरवू शकेल.

अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार, आणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत.

अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण वजन हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल, शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील.

एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिवरायांचे आठवणीत असलेलं चित्र(पट)रूप ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

शिवरायांचे आठवणीत असलेलं चित्र(पट)रूप ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेबांचं चरित्र आणि चारित्र्य रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा नजरेस पडलं त्याला २०२३ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली ! व्ही.शांताराम आणि बाबुराव पेंटर यांचे हे चित्रपट-कार्य ‘सिंहगड’ या शीर्षकाने १९२३ मध्ये चित्रपटगृहात झळकले होते…पण हा चित्रपट मूक होता. विशेष म्हणजे या चित्रपटाला एवढा उदंड प्रतिसाद मिळाला की सरकारला चित्रपटांवर मनोरंजन कर लावायची कल्पना सुचली…आणि त्यातून उत्तम महसूल प्राप्त होऊ लागला! १९२३ नंतर असे एकूण आठ मूक चित्रपट आले ज्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडले. १९३२ मध्ये व्ही.शांताराम यांनी महाराजांवरील पहिल्या बोलपटाचे दिग्दर्शन केले….आणि या चित्रपटाचेही नाव ‘सिंहगड’ हेच होते. यात मांढरे बंधूंपैकी सूर्यकांत यांनी महाराजांची भूमिका केली होती.    

शिवरायांचे चरित्रच एवढे रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे की आजही त्यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट तयार होत आहेत आणि होत राहतीलही. २०२४ पर्यंत या चित्रपटांची संख्या ४३ एवढी होती. शिवाय सर्जा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, अशांसारख्या चित्रपटांतही शिवराय दिसले.  दरम्यान दोन दूरदर्शन हिंदी मालिका आणि काही मराठी मालिकांमध्ये छत्रपतींचं कलाकारांनी घडवलेलं दर्शन झालं. विषयाचा केंद्रबिंदु असलेली शिवरायांची भूमिका साकारणं हे प्रत्येक कलाकारासाठी आव्हानात्मक असतेच असते. कारण महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा आवाकाच अतिविशाल आहे. 

महाराजांची भूमिका करणा-या कलाकारांपैकी अमोल कोल्हे, शंतनु मोघे, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शरद केळकर, रविंद्र महाजनी, महेश मांजरेकर ही काही नावे नजरेसमोर येतात. रितेश देशमुखही लवकरच आपल्याला छत्रपतींच्या भूमिकेत दिसतील. हिंदीत अक्षयकुमारही हे (भलतेच !) धाडस करून बसला आहेच ! या कलाकारांच्या अभिनयक्षमेतेविषयी आणि देखणेपणाविषयी काही शंका नाही आणि प्रेक्षक त्यांचे आभारीही आहेत… वास्तविक छत्रपतीसाहेबांच्या व्यक्तिमत्वाविषयी काही वर्णनं उपलब्ध आहेत. यात महाराजांची शारीरिक उंची बेताची होती हे सर्वच वर्णनात आढळते. असो. साधारणत: महाराजांएवढी शारीरिक उंची असणारे अमोल कोल्हे आणि चिन्मय मांडलेकर आणि सुबोध भावे हे कलाकार आपण पाहिले आहेत. परंतु साधारणपणे आजपासून सत्तर वर्षे मागील पिढीतील प्रेक्षकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जर कोणी अढळ स्थान मिळवलेले असेल तर ते चंद्रकांत मांढरे यांनी. अर्थात चंद्रकांत यांची उंची जास्त होती आणि चेहराही महाराजांच्या उपलब्ध चेह-याशी मिळता-जुळता नव्हता. त्यांचे बंधू सूर्यकांतही छत्रपतींची भूमिका करीत. पण भालजी पेंढारकरांनी चंद्रकांत मांढरेंच्या माध्यमातून ज्या रितीने शिवराय उभे केलेत..त्याला तोड नसावी ! चंद्रकांत यांचं या भूमिकेतील वावरणं अतिशय राजबिंडं, देखणं आहे. संवादफेक अतिशय निर्दोष. अभिनय राजांना साजेसा. एका प्रसंगात महाराज अफझलखानाच्या भेटीस निघालेले आहेत..खान दगा करणारच याची खात्री असल्याने महाराजांनी वाघनखे जवळ बाळगली आहेत. ती वाघनखे पोटाशी लपवून ठेवल्यानंतर एका विशिष्ट निग्रहाने,आत्मविश्वासाने छत्रपती आपली नजर समोर करून पाहतात….अतिशय भेदक भासली चंद्रकांत यांची नजर या प्रसंगातील अभिनयात….वाटलं खुद्द शिवराय बघताहेत मृत्यूच्या डोळ्यांत डोळे घालून! 

हा चित्रपट कृष्णधवल अर्थात ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट होता. पण नंतर नजीकच्याच काळात चंद्रकांत यांचं महाराजांच्या भूमिकेतील रंगीत छायाचित्र उपलब्ध झाले ते या लेखात दिलं आहे. 

बहुदा याच चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगी ‘सेट’वर दिग्दर्शक भालजी पेंढारकर आलेले असताना शिवरायांच्या वेशभूषेत असलेल्या चंद्रकांत हे भालजींना नमस्कार करण्यासाठी खाली झुकू पहात असताना भालजींनी त्यांना, “आपण छत्रपतींच्या वेषात आहात..आपण असं कुणाला वंदन करणं योग्य दिसत नाही” अशा आशयाचं सांगितलेलं वाचनात आलं! विषयाचं गांभीर्य जाणणारे भालजींसारखे दिग्दर्शक मराठीला लाभले, हे सुदैवच !   

हरी अनंत..हरी कथा अनंत असं देवाच्या बाबतीत म्हणलं जातं. शिवरायांच्या कथांच्या आणि त्यांच्या रुपांबाबतही असंच म्हणता येईल. मात्र ही रूपं विविध माध्यमांतून साकारणा-या कलाकारांनी विशिष्ट भान बाळगून असावे असे मात्र वाटते. 

जी बाब चित्रपटांची तीच बाब महाराजांच्या चित्रांबाबत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वेगवेगळ्या प्रकारची असंख्य चित्र उपलब्ध आहेत. त्यात अनेक कलाकारांनी त्यांच्या त्यांच्या कल्पनेनुसार चित्रांना चेहरा,उंची आणि वेशभूषा दिलेली दिसते. त्यावरून अनेक प्रतिकृतीही विक्रीसाठी आलेल्या दिसतात. झेंड्यांवरील चित्रेही एका विशिष्ट चेह-याची आढळतात. पण या सर्वांत लक्ष वेधून घेते ते श्रेष्ठ चित्रकार गोपाळ बळवंत कांबळे यांनी १९७४ मध्ये साकारलेलं महाराजांचं तैलचित्र. महाराष्ट्र शासनाने हे अधिकृत चित्र म्हणून स्विकारलेलं आहे आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हेच चित्र प्रदर्शित केलेलं दिसतं. चित्रपटांची मनमोहक भव्य बॅनर्स रंगवण्यात हातखंडा आणि राष्ट्रीय प्रसिद्धी असेलेल्या गोपाळ बळवंत उर्फ जी.कांबळे यांनी हे चित्र काढण्याबद्दल एक पैसाही मोबदला घेतला नव्हता…ते म्हणाले होते…”देवाच्या चित्राचा मोबदला घ्यायचा नसतो!” या अधिकृत चित्रनिर्मितीचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे… (१९७४-२०२४) ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवरायांचे हे चित्र सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरले जावे, असे वाटते. त्यातून एकवाक्यता दिसेल. असो. 

आपल्या राजांना आपल्या नजरेसमोर आणणा-या सर्व कलाकारांना, लेखकांना, शिव अष्टक संकल्प घेतलेल्या दिग्पाल लांजेकरांसारख्या दिग्दर्शकांना, संगीतकारांना, गायकांना, मूर्तीकारांना, शिल्पकारांना, वक्त्यांना, इतिहासकारांना साष्टांग दंडवत ! प्रातिनिधीक स्वरूपात चंद्रकांतजी मांढरे, भालजी, यांचा चित्रांद्वारे उल्लेख केला आहे. हे केवळ शिव-स्मरणरंजन आहे. ऐतिहासिक प्रमाण असलेलं अभ्यासू लिखाण नाही… 

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

© संभाजी बबन गायके

पुणे

मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऑर्डरिंग द साउंड ऑफ नॉकिंग – लेखक : अज्ञात – संकलक : गिरीश क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

ऑर्डरिंग द साउंड ऑफ नॉकिंग – लेखक : अज्ञात – संकलक : गिरीश क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(पेपर टाकणाऱ्या मुलाने  (Paper Boy ) सांगितलेला हृदयस्पर्शी किस्सा.) 

मी पेपर देण्याच्या  घरांपैकी एकाचा मेलबॉक्स ब्लॉक होता, म्हणून मी दरवाजा ठोठावला.

श्री.बॅनर्जी नावाच्या वृद्ध माणसाने स्थिर पावलांनी हळूच दरवाजा उघडला. मी विचारले,”सर,मेलबॉक्सचे प्रवेशद्वार का बंद केले आहे?”

त्याने उत्तर दिले,” मी जाणूनबुजून बंद केले आहे.”

तो हसला आणि पुढे म्हणाला,”तुम्ही रोज मला वर्तमानपत्र थेट हातात द्यावं अशी माझी इच्छा आहे… कृपया दार ठोठावा किंवा बेल वाजवा आणि मला पेपर व्यक्तिशः द्या.”

मी आश्चर्यचकित झालो आणि उत्तर दिले,”नक्कीच, पण ते आपल्या दोघांसाठी गैरसोयीचे आणि वेळेचा अपव्यय वाटते.”

तो म्हणाला,”ठीक आहे… मी दर महिन्याला तुम्हाला ५००/- जास्तीची फी म्हणून देईन.”

🌹🌹

विनवणी करून वृद्ध पुढे म्हणाला,”जर कधी असा दिवस आला की तुम्ही दार ठोठावले व प्रतिसाद मिळेनासा झाला तर कृपया पोलिसांना कॉल करा!”

मी हैराण होऊन विचारले, “का?”

त्यावर बॅनर्जी म्हणाले, “माझी पत्नी वारली,माझा मुलगा परदेशात आहे,आणि मी इथे एकटाच राहतो, माझी वेळ कधी येईल कोणास ठाऊक?”

असे सांगतांना त्याच क्षणी मला म्हाताऱ्याचे डोळे पाणावलेले दिसले.

🌹🌹🌹🌹

ते पुढे म्हणाले,”मी पेपर तर कधीच वाचले नाहीत  … फक्त दार ठोठावण्याचा किंवा दारावरची बेल वाजण्याचा आवाज ऐकण्यासाठी मी रोजचे वर्तमानपत्र सुरु केले आहे. एक ओळखीचा चेहरा मला दररोज पाहता यावा आणि दोन शब्द हितगूज करून आनंदाची देवाणघेवाण करता यावी यासाठी !”

🌹🌹

बोलता बोलता वृद्धाने भाऊक होत माझा हात आपल्या हातात घेत म्हणाला, “तरुण मित्रा … कृपया, माझ्यावर एक उपकार कर! हा माझ्या मुलाचा परदेशी फोन नंबर आहे. जर एखाद्या दिवशी तू दार ठोठावले आणि मी उत्तर दिले नाही, तर कृपया माझ्या मुलाला फोन करून त्याची माहिती दे..”

हे वाचल्यानंतर मला विश्वास आहे की आपल्या मित्रमंडळात अनेक एकटे – एकटे वृद्ध लोक आहेत.  काहीवेळा तुम्हाला आश्चर्य वाटेल, की ते त्यांच्या म्हातारपणात अजूनही कार्यरत आहेत तसे व्हॉटस्अप वर संदेश का पाठवतात !

वास्तविक या सकाळ-संध्याकाळच्या शुभेच्छांचे महत्त्व दारावर ठोठावण्याच्या किंवा वाजवण्याच्या अर्थासारखेच आहे. एकमेकांना सुरक्षिततेची शुभेच्छा देण्याचा आणि काळजी घेण्याचा हा एक मार्ग आहे.

आजकाल, व्हाट्सअप खूप सोयीस्कर आहे आणि आम्हाला आता वर्तमानपत्रांचे सदस्यत्व घेण्याची गरज राहिलेली नाही.

तुमच्याकडे वेळ असेल तर तुमच्या कुटुंबातील वृद्ध सदस्यांना व्हाट्सअप अॕप कसे वापरायचे ते शिकवा!

एखाद्या दिवशी जर तुम्हाला त्यांच्या सकाळच्या शुभेच्छा किंवा सामायिक केलेले लेख मिळाले नाहीत, तर ते कदाचित अस्वस्थ असतील किंवा त्यांना काहीतरी झाले असेल.

कृपया,आपल्या मित्रांची आणि कुटुंबाची काळजी घ्या. हे वाचून माझे डोळे पाणावले !!! 

लेखक : अज्ञात 

संकलक : गिरीश क्षीरसागर 

© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

सियाचिन…. जगाचं जणू छतच. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली युद्धभूमी आहे ही. आणि ह्या बर्फाच्या साम्राज्यावर आपले पाय रोवून उभे राहण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते आपल्या सैनिकांना. शून्याच्या खाली साठ सत्तर अंश तापमानापर्यंत खाली घसरणारा पारा जगणं हीच मोठी लढाई बनवून टाकतो. एवढं असूनही आपले जवान इथे रात्रंदिवस पहाऱ्यावर सज्ज असतात. यासाठी गरजेची असणारी शारीरिक, मानसिक क्षमता केवळ पुरूषांमध्येच असू शकते, असं वाटणं अगदी साहजिकच आहे. परंतू या समजुतीला खरा छेद दिला तो राजस्थानच्या उष्ण प्रदेशात जन्मलेल्या एका दुर्गेनं. तिचं नाव शिवा चौहान… अर्थात आताच्या कॅप्टन शिवा चौहान मॅडम. 

१८ जुलै १९९७ रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये जन्मलेल्या शिवाचे तिच्या वयाच्या अकराव्या वर्षीच पितृछत्र हरपले. राजेंदसिंह चौहान हे त्यांचं नाव. आईने, अंजली चौहान यांनी मग तिच्या आयुष्याची दोरी आपल्या हाती घेतली.

घरात त्या तिघी. तिची मोठी बहिण कायद्याचं शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात आणि शिवा मात्र चक्क सैन्यात जाण्याच्या जिद्दीने पेटून उठलेली. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचारच हा मूळात मोठ्या हिंमतीचा म्हणावा लागतो. शिवाने सिविल इंजिनियरींगमधली पदवी मिळवली ती केवळ सैन्यात जाण्यासाठीच.

सैन्यात भरती होण्याच्या कठीण मुलाखतीच्या दिव्यातून शिवा प्रथम क्रमांकाने पार पडल्या यातूनच त्यांच्या मनातली प्रखर जिद्द दिसून यावी. २०२० मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवला आणि पुरूषांच्या बरोबरीने कठीण शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पुढच्याच वर्षी त्यांना भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी रेजिमेंट मध्ये नेमणूक मिळाली. त्यांच्या विभागाचं नावच आहे ‘फायर अ‍ॅन्ड फ्यूरी सॅपर्स….’ अर्थात ‘अग्नि-प्रक्षोप पथक..’ हरत-हेच्या वातावरणात सैन्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारा विभाग. 

मागील दोन वर्षांपूर्वी चीनी सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजीत संघर्षात भीष्मपराक्रम गाजवलेले कर्नल संतोष बाबू याच विभागाचे शूर अधिकारी होते… त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते.

सैन्य म्हणजे केवळ हाती बंदूक घेऊन गोळीबार करणे नव्हे… सैन्याला अनेक विभाग मदत करीत असतात… अभियांत्रिकी विभाग यात खूप महत्वाचा असतो. आपल्या कथानायिका कॅप्टन शिवा चौहान याच ‘फायर अ‍ॅन्ड फ्यूरी’च्या अधिकारी.   

Spade म्हणजे फावडे. याचेच फ्रेंच भाषेतील अपभ्रंशित नाव आहे Sappe…सॅपं! त्या काळातील युद्धात किल्ले महत्त्वाचे होते. किल्ल्यांवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या भिंतींच्या अधिकाधिक जवळ जाणे गरजेचे असे. अशा वेळी त्यावेळचे अभियंते वरून झाकले जातील असे खंदक खणत आणि मग सैन्य त्या खंदकांतून पुढे पुढे सरकत जाऊन किल्ल्याच्या समीप जाई. यावरून सैन्यात सॅपर ही संज्ञा रूढ झाली ती आजपर्यंत. 

आधुनिक काळात या सॅपर्सचं अर्थात अभियांत्रिकी सैनिकांचं मुख्य काम असतं ते सैन्याला पुढे जाता यावं म्हणून रस्ते बांधणे, पूल बांधणे, भूसुरुंग पेरणं आणि शत्रूने पेरलेले भूसुरुंग शोधून ते नष्ट करणं. या कामांमध्ये अतिशय उच्च दर्जाची तांत्रिक क्षमता आणि अनुभव गरजेचा असतो. आपल्या सैन्यात बॉम्बे सॅपर्स, मद्रास सॅपर्स असे अन्य अभियांत्रिकी विभाग कार्यरत आहेत.  

कॅप्टन शिवा चौहान यांनी अगदी कमी कालावधीत अतिशय कर्तव्यतत्पर आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम अधिकारी म्हणून लौकिक प्राप्त केला. उंच बर्फाळ पहाड चढून जाणे, इतक्या उंचीवर अभियांत्रिकी कामांना अंतिम स्वरूप देणे इत्यादी कामांत त्या वाकबगार झाल्या.

त्यांच्या आधी महिला अधिकाऱ्यांना सियाचिन मधल्या १५६३२ फुटांवरील युद्धभूमीच्या खालील ९००० हजार फूट उंचीवर असलेल्या बेस कॅम्पपर्यंतच नेमणूक दिली जाई. उरलेली ६६३२ फूट उंची पार करणं तोपर्यंत एकाही महिलेला शक्य झालं नव्हतं. पण शिवा चौहान यांनी खडतर प्रशिक्षणं लीलया पार पाडली. 

सियाचिन भागात सायकल चालवणारी महिला हे दृश्यच अनेकांना कौतुकाने तोंडात बोट घालायला भाग पाडणारे होते. शिवा चौहान यांनी चक्क ५०८ किलोमीटर अंतर कापणारी सायकल मोहिम हाती घेतली आणि पूर्णही करून दाखवली. कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी ही अनोखी मोहिम यशस्वी केली. सियाचिन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारक अशी ही सायकल यात्रा कॅप्टन शिवा चौहान यांनी इतर पुरूष अधिकारी, सैनिक यांचे नेतृत्व करून पूर्ण केली, त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्द्ल कुणाच्याही मनात शंका उरली नाही. 

आणि यानंतर मात्र शिवा चौहान यांनी आणखी ६६३२ फूट उंचीवर जाण्याचा चंग बांधला… प्रचंड कष्ट घेऊन आवश्यक ती सर्व प्रशिक्षणं पूर्ण केली आणि जानेवारी २०२३ मध्ये त्यांना भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी म्हणून सियाचिन वर प्रत्यक्ष कामावर नेमण्यात आले… एका महिलेसाठी हा एक प्रचंड मोठा सन्मान मानला जावा! 

सैनिक हिमवीरांच्या मधोमध मोठ्या अभिमानाने बसलेल्या कॅप्टन शिवा चौहान ह्या नारीशक्तीच्या प्रतीकच आहेत. त्यांच्यापासून समस्त तरूण वर्ग निश्चितच प्रेरणा घेईल. भगवान शिवाचं वास्तव्य असलेल्या हिमाच्छादित पर्वत शिखरांवर शिवा नावाची पार्वतीच जणू भारतमातेच्या रक्षणासाठी बर्फात पाय रोवून उभी आहे! 

कॅप्टन शिवा चौहान, आपणांस अभिमानाने सल्यूट… जय हिंद ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा : कर्मसंन्यासयोग : श्लोक १ ते १० – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा : कर्मसंन्यासयोग : श्लोक १ ते १० – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

अर्जुन उवाच :

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।

यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ।।१।।

कथित अर्जुन 

कर्मसंन्यास उपदेश दिधला श्रीकृष्णा मजला

तरी सांगता आचरण्याला  आता कर्मयोगाला 

कुंठित झाली माझी प्रज्ञा जावे कोण्या मार्गाला

कल्याणदायी असेल निश्चित कथन करावे तेचि मला ॥१॥

श्रीभगवानुवाच :

संन्यास: कर्मयोगश्च नि:श्रेयसकरावुभौ ।

तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ।।२।।

कथित श्रीभगवान 

कर्मयोग अन् कर्मसंन्यास उभय कारीकल्याण

कर्मयोग  तयात श्रेष्ठ सुलभ तयाचे आचरण ॥२॥

*

ज्ञेय: स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति ।

निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बंधात्प्रमुच्यते ।।३।।

*

मनी न द्वेष नच आकांक्षा तोच खरा संन्यासी

भावद्वंद्व रहिता महावीरा मुक्ती भावबंधनासी ॥३॥

*

सांख्ययोगौ पृथग्बाला: प्रवदन्ति न पण्डिता: ।

एकमप्यास्थित:सम्यगुभयोर्विन्दते फलम् ।।४।।

*

फलप्राप्ती संन्यासाची तथा कर्मयोगाची

मूढ मानती सांख्ययोगी भिन्न असते तयांची

परमेशाची प्राप्ती ही तर फलप्राप्ती दोन्हीची

पंडित जाणत फला तयांच्या ही किमया ज्ञानाची ॥४॥

*

यत्सांख्यै: प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।

एकं सांख्यं च योगं च य: पश्यति स पश्यति ।।५।।

*

सांख्य असो वा कर्ममार्गी वा परमधाम तया प्राप्ती 

दोन्हीचे फल एक जाणतो यथार्थ ज्ञानी त्याची दृष्टी ॥५॥

*

संन्यासस्तु महाबाहो दु:खमाप्तुमयोगत: ।

योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ।।६।।

*

कर्मयोगाविना वीरा नच प्राप्ती संन्यासाची

रत ब्रह्म्याशी कर्मयोग्या प्राप्ती परमात्म्याची ॥६॥ 

*

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रिय: ।

सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ।।७।।

*

जितेंद्रिय विशुद्धात्मा अद्वैत समस्त जीवांशी

समर्पित कर्म आचरितो राहतो अलिप्त कर्माशी ॥७॥

*

नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।

पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ।।८।।

*

प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।

इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।।९।।

*

श्रुती दृष्टी श्वसन गंध भोजन वाचा व्यवहार नेत्रपल्लवी

सकल क्रिया इंद्रियस्वभाव तयांसी मी ना कधी चालवी

दृढनिष्ठा ही मनात ठेवुन अलिप्त वावरी तोचि खरा योगी

कर्म ना करितो मी भाव जागवी ठायी तत्ववेत्ता सांख्ययोगी ॥८,९॥

*

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति य: ।

लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ।।१०।।

*

समर्पित कर्मे परमात्म्या विनासक्तीने आचरण

अलिप्त तो पापांपासून जैसे जले कमलपर्ण ॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऑपरेशन रांदोरी बेहाक…. अर्थात थेट भेट गनिमांना ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

ऑपरेशन रांदोरी बेहाक…. अर्थात थेट भेट गनिमांना ! 

जपानी युद्धसदृश खेळांमध्ये प्रतिस्पर्धी एकमेकांवर सर्व शक्तिनिशी चालून जातात… निकराचा हल्ला चढवतात…. आपल्या जीवाची पर्वा न करता… कारण शत्रूही तसाच चालून आलेला असतो… एखाद्या मस्तवाल रानडुकरासारखा. या युद्धप्रकाराला रांदोरी म्हणतात बहुदा. 

एप्रिल, २०२० मधील ही घटना आहे. लोकांना आपल्या जीवाची भ्रांत असल्याने इतर ठिकाणी काय सुरू आहे, याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती! 

कोरोनामुळे सर्व जगासारखाच हिंदुस्थानही थांबला होता. जीवघेण्या रोगाच्या भीतीने रस्ते ओस पडले होते…. पण सीमेवर गस्त सुरू होती. हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तुफान बर्फवृष्टी होत होती. दोन्ही देशांच्या सीमांना एकमेकांपासून अलग करणारी काटेरी तारांची कुंपणेही बर्फात गाडली गेलेली होती. आसमंतात बर्फाच्या पांढऱ्या रंगाशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते. पण अत्याधुनिक यंत्रांना बरेच काही दिसत होते. 

अत्यंत कमी दृश्यमानता असल्याचा आणि सीमेपलीकडून झालेल्या फायरींगचा आडोसा घेत पाच प्रशिक्षित पाकिस्तानी अतिरेकी भारतीय सीमा ओलांडून कश्मिरात दाखल झालेही होते… रक्तपात घडविण्यासाठी… 

स्थळ कुपवाडा सेक्टर मधील केरन भाग. भारताच्या Unmanned Ariel Vehicle अर्थात छोट्या चालक विरहीत विमानांत बसवलेल्या कॅमेऱ्यांनी आणि इतर उपकरणांनी शत्रूच्या त्या पाच जणांच्या पावलांचे ठसे अचूक टिपले आणि नियंत्रण कक्षाला पाठविलेही होते… दिवस होता १ एप्रिल,२०२०. 

अधिकाऱ्यांनी त्वरीत योजना आखली. आदेश दिले गेले आणि जवान त्या तसल्या भयावह हवामानात अतिरेक्यांच्या मागावर निघाले. बर्फवृष्टी, तुफान वारा आणि कमी प्रकाश याची तमा न बाळगता आपले वाघ पिसाळलेल्या लांडग्यांच्या मागावर निघाले. त्यादिवशी अतिरेकी टप्प्यात आले नाहीत. दोन आणि तीन एप्रिल या दोन्ही दिवशी ही शोधमोहिम सुरू राहिली. या दिवशी मात्र एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा आपले जवान आणि अतिरेकी यांच्यात गोळीबाराच्या फैरी झडल्या…पण त्या अवलादी निसटून जाण्यात यशस्वी ठरल्या. पण पळून जाताना त्यांना त्यांच्याजवळची जड हत्यारे टाकून पळावे लागले होते.

रांदोरीचा आजचा पाचवा दिवस. लांडग्यांना सीमेपलीकडे पळूनही जाऊ द्यायचे नव्हते आणि आपल्या सीमेत घुसूही द्यायचे नव्हते…. त्यांना वर पाठवणे गरजेचे होते. 

ते पाचही जण एक नाल्यात लपून बसले. आधुनिक दळणवळण साधने, खाण्या-पिण्याचे मसालेदार पदार्थ, मद्य, वेदनाशामक औषधे, दारूगोळा…. असा सगळा जामानिमा करून आली होती मंडळी. 

त्यांचा ठावठिकाणा लक्षात आला. पण एकतर शेकडो मीटर्स उंचीवरची रणभूमी. गळ्याइतके बर्फ साठलेले. श्वास घेणे महाकठीण. आता रामबाण सोडायला पाहिजे असे लक्षात आले….

पॅरा एस.एफ. अर्थात स्पेशल फोर्स कमांडोज मैदानात उतरवण्याचे ठरले. भीती आणि अशक्य या शब्दांची साधी तोंडओळखही न झालेले नीडर, उच्च दर्जाचे आणि शारीरिक, मानसिक क्षमातांची अंतिम कसोटी पाहणारे प्रशिक्षण प्राप्त केलेले सहा-सहा कमांडोंचे दोन गट हेलिकॉप्टरमधून अतिरेक्यांच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणाच्या जवळ उतरवण्यात आले. शस्त्रसज्ज असलेले हे बहाद्दर जमिनीवर उतरले तेंव्हा त्यांच्या कमरेपेक्षा जास्त उंचीचा बर्फ तिथे साठलेला होता.. जणू ते एखाद्या सरोवरातच उतरलेले असावेत. 

एका तुकडीचे नायक होते सुभेदार संजीव कुमार साहेब. सोबत पॅराट्रूपर बाल कृष्णन, पॅराट्रूपर छत्रपाल सिंग, पॅराट्रूपर अमित कुमार, हवलदार दवेंद्र सिंग आणि ….

दिवसभर माग काढला गेला…. रात्र पडली आणि उलटून जाण्याच्या बेतात होती. 

पहाट झाली. रस्ता कसा होता? मूळात रस्ताच नव्हता. प्रचंड चढ-उतार, काही ठिकाणी गळ्याइतके बर्फ, तर काही ठिकाणी जीवघेणी खोली असलेल्या दऱ्या. एका दरीच्या किनाऱ्यावर जमा झालेले बर्फ घट्ट होऊन दरीच्या बाजूस साठून राहिलेलं. जमीन ते दरीची किनार यातील फरक लक्षात येणं अशक्य झालेलं. पण अतिरेक्यांच्या पावलांचे ठसे तर त्याच आसपास दिसले होते… ते तिथेच लपून बसलेले असावेत! 

सुभेदार संजीवकुमार साहेब नेतृत्व करीत पुढे पावले टाकीत होते… सावधानतेने. त्यांच्या अर्धा पाऊल मागे बाल कृष्णन आणि छत्रपाल सिंग होते… त्यांचे एकत्रित वजन त्या बर्फाच्या तुकड्याला पेलवले नाही आणि ते तिघेही दीडशे फूट खाली कोसळले….. अत्यंत वेगाने. त्यांच्या शरीरातील अनेक हाडं तुटली….. 

पण त्यांना आपल्या वेदनांचा विचार करायला सवडच मिळाली नाही! त्यांच्या समोर ते पाच अतिरेकी उभे होते… म्हणजे ते लपून बसलेले अतिरेकी ही तीन शरीरं आपल्या पुढ्यात अचानक कोसळलेली पाहून ताडकन उभे राहिले होते. यांच्या रायफल्स सज्ज होत्या… नेम धरण्याची गरज नव्हतीच. काही फुटांचंच तर अंतर होतं…. त्यांनी अंदाधुंद फायरींग सुरू केलं. या तिन्ही जखमी वाघांनी डरकाळी फोडत प्रत्युत्तर दिलेच…. 

गोळीबाराचा आवाज ऐकून वर असलेल्या वीरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या रक्षणार्थ त्या तेवढ्या उंचीवरून बेधडक खाली उड्या घेतल्या…. त्यात पॅराट्रूपर सोनम शेरींग तमंग सुद्धा होते. 

सुभेदार संजीवकुमार साहेब आणि अमितकुमार समोरच्या लांडग्यांवर तुटून पडले होते… जखमी हातांनी मारामारी सुरू केली…. त्यांच्या शरीरात तोवर पंधरा गोळ्यांनी प्रवेश केला होता. इतर दोघांची गतही काही वेगळी नव्हती…

तमंग यांनी एका अतिरेक्याला अगदी जवळून टिपले. एकावर हातगोळा टाकला. अमित कुमार जागीच हुतात्मा झाले होते. संजीवकुमार साहेब गंभीर जखमी होतेच. तमंग यांनी त्यांना मागे खेचलेही होते…. पण उशीर झाला होता. पण या पाचही वाघांनी स्वर्गाकडे प्रयाण करताना त्या पाच जनावरांना नरकात नेऊन फेकण्यासाठी स्वत:च्या दातांत घट्ट धरले होते…! 

एक अतिरेकी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला… पण आपल्या इतर जवानांच्या गोळ्या तो चुकवू शकला नाही. 

आपल्या सहकाऱ्यांचा पराक्रम सांगण्यासाठी दैवाने पॅराट्रूपर सोनम शेरींग यांना सुखरूप ठेवले होते जणू! पण देशाने पाच वाघ गमावले होते. देशाने या पाचही योद्ध्यांचा मरणोत्तर यथोचित गौरव केला. 

सोनम शेरींग यांना मा. राष्ट्रपती मा. श्री.रामनाथजी कोविंद साहेबांच्या हस्ते शौर्य चक्र स्विकारताना आपल्या हुतात्मा सहकाऱ्यांच्या आठवणींनी गहिवरून आले होते! 

५ एप्रिल, २०२३ रोजी या बलिदानाला तीन वर्षे झाली! भारतमातेच्या पांढऱ्या शुभ्र हिमभूमीवर आपल्या लालभडक रक्ताचे शिंपण करणाऱ्या या वीरांचे स्मरण होणं साहजिकच आहे, नाही का? 

सामान्य लोकांना या असामान्य बलिदानाची पुन्हा माहिती व्हावी म्हणून हे सामान्य लेखन. प्रतिक्रिया देताना या हुतात्म्यांचं एकदा स्मरण आणि त्यांच्या आत्म्यांच्या कल्याणासाठी आराध्य देवतांकडे प्रार्थना तुम्ही करालच, याची खात्री आहे. 

🇮🇳 जय हिंद. जय हिंद की सेना. 🇮🇳

सोबत दिलेले छायाचित्र शेरींग साहेबांचे आहे. पुरस्काराचे वेळी घडलेल्या प्रसंगाचे थोडक्यात वर्णन केले जाते. ते ऐकत असतानाची त्यांची ही भावमुद्रा आहे !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print