श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 🎁 रिटर्न गिफ्ट ! 🎁 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत !”

“हां, सुप्रभात.”

“हे काय, आज तुमचा मूड नेहमी सारखा दिसत नाही.”

“हो, आहे खरा आज थोडा त्रासलेला.”

“मला कारण सांगितलं पंत, तर तुम्हाला पण थोडं हलक हलक वाटेल आणि त्यावर काहीतरी… “

“तुला कधी, सरकारी किंवा कुठल्या ऑफिस मध्ये ‘लाल फितीचा’ त्रास झालाय ?”

“लाल फित म्हणजे…. “

“अरे, म्हणजे कुठचेही सरकारी काम, तू त्या ऑफिसला गेला आहेस आणि लगेच…. “

“काहीतरीच काय पंत, साध्या रेशन कार्डावरचा पत्ता…. “

“बदलायला पण दहा दहा खेपा माराव्या लागतात, बरोबर ना ?”

“आता कसं बोललात पंत !”

“अरे त्यालाच तर… “

“कळलं, कळलं, पण तुम्हाला कुठे आला हा लाल फितीचा अनुभव?”

“अरे त्याच काय झालं, मोनो रेल सध्या तोट्यात चालली आहे, म्हणून आता कमी गर्दीच्या वेळात त्याचा एखादा रेक…. “

“बारस, वाढदिवस, लग्न, कोणाची साठी, पंच्यातरी, असे समारंभ साजरा करायला भाड्याने देणार आहेत, ही बातमी कालच वाचली, पण त्याच काय ? तुम्हाला पण एखादा रेक भाड्याने…. “

“हवा होता म्हणून गेलो होतो चौकशी करायला तर… “

“पंत तुम्हाला कशाला…… “

“अरे माझ्यासाठी नाही, नातवाच बारस करणार होतो, मोनोच्या रेक मध्ये. कुणी विमानातून उड्या मारून हवेत हार घालून लग्न करतात, कुणी क्रूझवर मुंज ! म्हटलं आपण पण जरा वेगळ्या पद्धतीने नातवाचे बारसे करूया, म्हणून चौकशी करायला गेलो तर… “

“तर काय, उपलब्ध नाही म्हणाले का रेक ?”

“हो ना, म्हटलं कालच तर  तुम्ही रेक भाड्याने देणार असं जाहीर केलेत आणि आज लगेच बुकिंग फुल्ल कसं काय ?”

“मग काय म्हणाला तिथला माणूस ?”

“तो म्हणाला, चारीच्या चारी रेक राजकीय पक्षांनी बुक केले आहेत म्हणून.”

“ते कशा साठी ?”

“अरे ज्या दिवशी मला बारशाला रेक पाहिजे होता त्याच दिवशी त्या सर्व पक्षांची कसली तरी मिटिंग आहे.”

“पंत, पण त्यांना चारही रेक कशाला पाहिजेत, एकात पण मिटिंग….. “

“होऊ शकते, पण सध्या तीन पक्षाच सरकार आहे ना म्हणून…. “

“मग तीन रेक पुरे की, चौथा तुम्ही बुक …. “

“करू शकत नाही, कारण ज्या अपक्षांनी बाहेरून सरकारला पाठिंबा दिला आहे त्यांची वेगळी मिटिंग चौथ्या…. “

“कळलं, म्हणजे तुम्हाला आता एखादा छोटा हॉल घेण्या शिवाय….. “

“पर्याय नाही खरा.”

“तुम्ही काळजी करू नका पंत, आपल्या अहमद सेलर चाळींचे सभागृह द्यायची जबाबदारी माझी !”

“मला ठाऊकच होत, तू मला या बाबतीत मदत…. “

“झालंच तुमचं काम समजा पंत, तुम्ही निश्चिन्त असा.  पण मला एक वेगळाच प्रश्न पडलाय… “

“आता कसला प्रश्न?”

“ती तुम्ही आपल्या चाळीच्या गच्ची मधे कसली पोती….. “

“ती होय, अरे ती ‘बीटाची’ पोती आहेत, म्हणजे असं बघ…. “

“पंत आपण ज्या ‘बीटाची’ कोशिंबीर वगैरे करतो किंवा सॅलेड मध्ये….. “

“वापरतो तीच ही, अगदी  बरोबर ओळखलस.”

“हो पण एव्हढी पोती भरून बिटाचं तुम्ही…… “

“सांगतो, सांगतो. अरे मोनो रेल मध्ये बारसे केले असते तर जवळच्याच लोकांना बोलवावे लागले असते, मग बाकीचे चाळकरी नाराज होणार…. “

“म्हणून त्यांना शांत करायला तुम्ही काय बिट…… “

“काहीतरी बोलू नकोस, अरे तेव्हढी….. “

“पंत, पण तुम्ही एव्हढी पोती भर भरून ‘बिट’ आणल्येत ना,  की ती सगळी आपल्या आठ चाळींना…..

“पुरावित याच हिशोबानेच आणली आहेत बरं !”

“काय सांगता काय पंत, तुम्ही खरच आठी चाळींना….. “

“अरे नीट ऐकून तर घे, तू मगाशी मोनो भाड्याने देणार, ही बातमी वाचलीस म्हणालास ना, मग तशीच दुसरी एक बातमी तुझ्या नजरेतून सुटलेली दिसत्ये.”

“ती कुठची ?”

“अरे RBI चे ‘बिटकॉइन’ बद्दलचे अपील दिल्ली हायकोर्टाने फेटाळले, ती बातमी.”

“असं, म्हणजे आता ‘बिटकॉइन’ या आभासी चलनाला भारतात पण मान्यता….. “

“मिळाली आहे आणि बारशाच्या रिटर्न गिफ्ट मध्ये मला खरे ‘बिटकॉइन’ देण या जन्मीच काय पण पुढचे सात जन्म पण शक्य नाही, म्हणून मी बारशाचे रिटर्न गिफ्ट म्हणून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्या सगळ्या बीटांची कॉइन पाडून ती वाटायचा माझा विचार पक्का झाला आहे.”

“खरच धन्य, धन्य आहे तुमची पंत !”

“आहे ना धन्य, मग तुझ्यासाठी बारशाच्या दिवशी एक एक्सट्रा कॉइन आठवणीने घेऊन जा, मला बारशाला हॉल मिळवून देणार आहेस ना, त्या बद्दल !”

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments