सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? विविधा ?

(आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 1 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

विचार करा बरं एकदा! का बघतो आपण टी. व्ही. वरच्या सिरियल्स?  टाईम पास, मनोरंजन हे तर आहेच. करोनाच्या काळात तर घराबाहेर पडणंसुद्धा काहीजणांसाठी अवघडच झालेलं होतं, त्यामुळे टी. व्ही. वरच्या मालिका बघणं हा या काहीजणांसाठी, आणि ज्यांना एरवीही घराबाहेर जाणं अशक्य आहे, अशांसाठीही जीवनावश्यक विधी झालेला आहे! अर्थात, काही लोक तर व्यसन लागल्यासारखे टी. व्ही.बघत असतात!

 पूर्वी जेंव्हा फक्त दूरदर्शनच दिसत असे, तेंव्हा आठवड्यातून एकदाच ठराविक वेळेला ठराविक मालिका दिसत असत. तेंव्हा त्या मालिकांना काहीतरी स्टॅन्डर्ड असायचं, पुढच्या भागाबद्दल उत्सुकता असायची. आणि आठवड्यातून एकदाच बघायला मिळत असल्यामुळे, त्यांचं अप्रूपही असायचं. पण आता टी. व्ही. वर चॅनल्सचा इतका सुळसुळाट झालेला आहे, की विचारायची सोय नाही! आणि वेळकाळ याचंही काही बंधन नाही! 24 तास टी. व्ही. सुरूच! आणि मग आलटून पालटून त्याच त्याच मालिकांचे ‘रिपीट एपिसोड’! बघा लेको, केंव्हाही!

या मालिकांची काही वैशिष्ट्यं आहेत बरं का! मालिकेत खलनायिका असलीच पाहिजे, त्या शिवाय, बहुतेक मालिका दाखवायला परवानगी मिळत नसावी! तिचे एकदोन जोडीदार तर हवेतच! आणि हे सगळे नायक-नायिकेच्या घरातले लोकच असतात बरं! आपल्याच घरातल्या लोकांना असा त्रास देताना या लोकांना अगदी आंनदाच्या उकळ्या फुटत असताना पण दाखवतात! आणखी श्रीमंती तर दाखवलीच पाहिजे मालिकांमधे! हिंदी मालिका बघितल्या, तर भारतात कुठे दारिद्र्य आहे, हे खरंच वाटणार नाही! त्या मानाने मराठी मालिकांमधली श्रीमंती मर्यादित प्रमाणात दाखवली जाते! आणखी एक, त्या नायक-नायिकांना सुखानं जगू द्यायचंच नाही, असा विडा खलनायिकेनं आणि मालिकेच्या दिग्दर्शकानंही मिळून उचललेला असतो! याच्या मागे काय कारण असावं, हे काही माझ्यासारख्या पामराला तरी कळत नाही बुवा! खलनायिकेचं एक ठीक आहे, पण दिग्दर्शकाचं काय घोडं मारलेलं असतंय नायक-नायिकेनं देवच जाणे! आणखी एक मज्जा म्हणजे, खलनायक, तिचे जोडीदार अत्यंत हुशार आणि जितके म्हणून चांगले लोक असतील मालिकेत, ते, अगदी नायक-नायिका धरून, ते सगळे बिनडोक! सतत खलनायिका या लोकांवर मात करत रहाणार आणि ह्यांना कळतच नाही, कोण सगळं वाईट घडवतंय आपल्या आयुष्यात ते! अगदी मालिका संपेपर्यंत हा लपंडाव चालूच! शिवाय, हे नायक-नायिका, विशेषतः नायिका तर संत महंतच जणू! आसपासच्या सगळ्या लोकांशी इतकं चांगलं वागणार, की त्या चांगुलपणाचं अजीर्ण व्हावं! सगळ्यांसाठी सतत त्याग करत रहाणार, कशाचा ना कशाचा. असे दोन प्रकार माणसांचे, एक पूर्णतः काळी छटा असलेला, आणि एक पूर्ण, पवित्र शुभ्र रंगाचा! सामान्यतः प्रत्येक माणसात दोन्ही छटा मिसळलेल्या असतात. कोणीच पूर्णतः वाईट किंवा पूर्णतः, म्हणजे, अती चांगला नसतो. खरोखरचे संत-महात्मे सोडून! पण नायिका गुणांची पुतळीच दाखवली पाहिजे असाही नियम असावा, मालिका बनवण्यासाठी.

बरं, एखादी मालिका आधी विनोदी म्हणून जाहिराती करतात, आपल्याला वाटतं, चला, त्या सासवा-सुनांच्या मालिकांपेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळेल, म्हणून आपण ती मालिका बघायला सुरुवात करतो, पण थोड्याच दिवसात आपला भ्रमनिरास करून त्या मालिकेत खलनायिका घुसवली जाते आणि सुरु होतं परत तेच दळण! क्वचित काही मालिका या सगळ्याला अपवाद ठरतात आणि बघायला आवडतात.  उदा. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ सारखी निखळ विनोदी मालिका. आजही त्या मालिकेच्या नुसत्या आठवणीने सुद्धा हसू येतं. ही हिंदी मालिका होती. पण अशा निखळ विनोदी मालिका फार दिवस चालू ठेवणं अवघड असतं. कारण सातत्त्यानं निखळ विनोदी लिहिणं ही खूप अवघड गोष्ट आहे. पु. लं. सारखे जीनियस या क्षेत्रात कमीच असतात.

मराठीतही सुरुवातीच्या काळात चांगल्या मालिका असायच्या. पूर्वीच्या, फक्त दूरदर्शन होतं, त्या काळातल्या ‘बुनियाद’ आणि ‘हम लोग’ या मालिकांनी लोकप्रियतेचा कळस गाठलेला होता. तसेच ‘तमस’ ही देशाच्या फाळणीबद्दलची मालिका, सई परांजपे यांची ‘अडोस-पडोस’ या काही दर्जेदार मालिका आजही लक्षात आहेत.  ‘झोका’, ‘अग्निहोत्र’, ‘असंभव’, ‘आनंद भुवन’ इ. मी बघितलेल्या काही मराठी मालिकाही आजही आठवतात. पण हळूहळू रोजच्या मालिकांचा रतीब जसा सुरु झाला, तसतसा मालिकांचा दर्जा घसरत गेला. आणि पूर्वी मालिकांना तेरा भागांचं बंधन असायचं, आता तशी काही मर्यादाच नसल्यामुळे प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत बघत आणि वाट्टेल तशा भरकटत मालिका वर्ष नु वर्षे चालूच रहातात.

या मालिकांमधून न पटणाऱ्या, वर्तमान जगाशी सुसंगत नसलेल्या गोष्टीही इतक्या घुसडलेल्या असतात, की विचारायची सोय नाही! हल्ली कोणत्या तरुण मुली साड्या नेसतात? तरुण जाऊ दे, सासू, आई, आज्जी या स्त्रियाही हल्ली फक्त सणा-समारंभातच साडी नेसतात. ही अगदी सामान्य गोष्ट झालेली आहे. पण या मालिकांमधल्या मुली लग्नाआधी ड्रेस वगैरे घालत असल्या तरी लग्न झाल्या क्षणापासून साड्याच नेसायला लागतात. नाहीतर त्या मग वाईट चालीच्या असतात! आता या कर्माला काय म्हणावं? दुष्ट, खलनायिका यांनाच ड्रेस घालायची परवानगी असते मालिकांमधे! आणि सासू, सुना, आत्या, मावशी जी काही स्त्री पात्रं असतील, त्या दिवसरात्र झगमगीत भारी साड्या आणि भरपूर दागदागिने घालून सदैव लग्न समारंभासाठी तयार असल्यासारख्या वावरत असतात मालिकेत! आणि तरीही कुठे बाहेर जायचं असेल तर “मैं तयार हो के आती हूं”, अरे काय! हे हिंदी मालिकांचं जग आहे. हल्ली मराठीमध्ये बहुतेक इतका भडक प्रकार नसतो, पण लग्नानंतर साडी कम्पल्सरी! आणखी एक गम्मत! आपल्यासारख्या सामान्य माणसांचा पोलिसांशी असा कितीकसा संबंध येतो? फार फार तर एखादे वेळी सिग्नल तोडला, किंवा वन वे मधून उलटं जाताना पकडलं गेल्यास दंड भरण्यापुरता! हो की नाही? पण या प्रत्येक मालिकेत या सामान्य घरातला एक तरी माणूस तुरुंगात गेलेला  दाखवलाच पाहिजे, असाही नियम असावा! साध्या-सरळ, सज्जन लोकांचा अतोनात छळ झालेला दाखवला, की या लेखक -दिग्दर्शकांना कसला आसुरी आनंद मिळतो, कोणजाणे!

ऐतिहासिक मालिका बघणं तर मी कधीच सोडून दिलंय. त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची एवढी मोडतोड करतात, की जे लोक अगदी थोडंफार जाणतात, वाचतात त्यांनाही ते बघवू नये! काही अपवाद असतीलही, पण सर्वसाधारण अनुभव काही चांगला नाही! पौराणिक मालिकांमधे, किंवा देव देवतांवर काढलेल्या मालिकांमधे तर काहीही दाखवायची प्रचंड मुभाच मिळालेली असते, या लोकांना. कारण, त्यात खरं खोटं कसं आणि कोण सांगणार? पहिल्या ‘महाभारत’ आणि ‘रामायणा’ मधील चमत्कारांनीच त्याची सुरुवात करून दिलेली आहे. पण ते आपले टी. व्ही. बघण्याचेच सुरुवातीचे दिवस होते, म्हणून त्या मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. आणि हल्ली परत परत नव्याने त्यांच्या नवीन आवृत्त्या निघत असतात. पण त्या नव्या बघितल्यावर मात्र त्या जुन्या कितीतरी चांगल्या होत्या, असं म्हणायची वेळ येते! 

क्रमशः…

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments