सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २० – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कंबोडियातील अद्वितीय शिल्पवैभव ✈️

सिंगापूर आणि थायलंड हे देश आपल्या परिचयाचे आहेत. बँकॉक म्हणजे थायलंडच्या राजधानीला अनेकांनी भेट दिली असेल. थायलंडला जोडून आग्नेय दिशेला  कंबोडिया नावाचा एक छोटासा देश आहे. बँकॉकला विमान बदलून आम्ही कंबोडियाच्या सियाम रीप या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो.

कंबोडियाचे आधीचे नाव कांपुचिया तर प्राचीन नाव कंबुज असे होते. इसवी सन ९७४ मधील तिथल्या एका संस्कृत शिलालेखाप्रमाणे दक्षिण भारतातील एका राजाने कंबोडियाच्या नागा राजकन्येशी विवाह केला होता. सियाम रीपपासून जवळच अंगकोर नावाचे ठिकाण आहे. अंगकोर ही त्यावेळी कंबोडियाची राजधानी होती. अंगकोर येथे १८०० वर्षांपूर्वी बांधलेला हिंदू देवालयांचा एक शिल्पसमूह  ७७ चौरस किलोमीटर एवढ्या प्रचंड परिसरात आहे. इथल्या अद्वितीय शिल्पकलेवर तामिळनाडूतील चोला शैलीचा तसेच ओरिसा शैलीचा प्रभाव जाणवतो.सॅ॑डस्टोन, विटा व लाल- पिवळा कोबा वापरून उभारलेले हे शिल्पांचे महाकाव्य जगातील सर्वात मोठे धार्मिक शिल्पकाम समजले जाते.

प्राचीन काळापासून इथे खमेर संस्कृती नांदत आहे व आजही इथले ९०% लोक खमेर वंशाचे आहेत. त्यांची लिपी व भाषा खमेर आहे. कंबोडियावर अनेक शतके व्हिएतनाम, थायलंड, चीन, जपान, फ्रान्स अशा अनेक देशांनी राज्य केले. सोळाव्या शतकात धाडसी युरोपीयन प्रवाशांना इथल्या जंगलात फिरत असताना अंगकोर इथल्या शिल्पसमूहाचा अकस्मात शोध लागला.

अंगकोर वाट ( मंदिर )हे बरेचसे सुस्थितीत असलेले प्रमुख देवालय आहे. राजा सूर्यवर्मन (द्वितीय ) याच्या कारकिर्दीमध्ये हे देवालय १२ व्या शतकाच्या पूर्वार्धात बांधण्यात आले. या अतिशय भव्य, देखण्या मंदिराला पाच गोपुरे आहेत. यातील मधले उंच गोपूर हे मेरू पर्वताचे प्रतीक मानले जाते. ही मेरू पर्वताची पाच शिखरे मध्यवर्ती मानून साऱ्या विश्वाची प्रतीकात्मक स्वरूपात उभारणी होईल अशा पद्धतीने पुढील प्रत्येक राजाने इथले बांधकाम केले आहे.  मंदिराभोवतालचे तळे सागराचे प्रतीक मानले जाते. गुलाबी कमळांनी भरलेल्या तळ्यात मंदिराचे देखणे प्रतिबिंब पाहून मंदिर प्रांगणातील उंच, दगडी पायऱ्या चढायला सुरुवात केली.

जगातील सर्वात मोठी श्रीविष्णूची आठ हात असलेली भव्य मूर्ती इथे आहे. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या, खांद्यावरून सिल्कचे सोवळे पांघरलेल्या या मूर्तीची आजही पूजा केली जाते. परंतु या मूर्तीचे मस्तक आता भगवान बुद्धाचे आहे.खमेर संस्कृतीमध्ये हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्मांचा प्रभाव होता. श्री विष्णूचे मूळ मस्तक आता म्युझियम मध्ये आहे.

या मंदिराच्या दोन्ही बाजूच्या लांबलचक ओवऱ्या त्यावरील सलग, उठावदार, प्रमाणबद्ध कोरीव कामामुळे जगप्रसिद्ध आहेत.  ६०० मीटर लांब व दोन मीटर उंच असलेल्या या दगडी पॅनलवर रामायण व महाभारत यातील अनेक प्रसंग अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत. कुरुक्षेत्रावर लढणारे कौरव-पांडव, त्यांचे प्रचंड सैन्य, हत्ती, घोडे, रथ व त्यावरील योद्धे, बाणाच्या शय्येवर झोपलेले भीष्म,बाणाने वेध घेणारे द्रोणाचार्य , भूमीत रुतलेले रथाचे चाक वर काढणारा कर्ण, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा श्रीकृष्ण, हत्तीवरून लढणारा भीम व त्याच्या ढालीवरील राहूचे तोंड असे अनेकानेक प्रसंग कोरलेले आहेत.

पायाला बांधलेल्या उखळीसकट रांगणारा कृष्ण, कृष्णाने करंगळीवर उचललेल्या गोवर्धन पर्वताखाली आश्रय घेणारे गुराखी व गाई, आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत हलविणारा रावण,  शंकराला बाण मारणारा कामदेव, कामदेवाच्या मृत्यूनंतर रडणारी रती, वाली व सुग्रीव युद्ध, वासुकी नागाची दोरी करून समुद्रमंथन करणारे  देव-दानव, त्या समुद्रातून वर आलेले मासे, मगरी, कासवे ,आकाशातील सूर्य- चंद्र, कूर्मावतारातील विष्णूने तोलून धरलेला मंदार पर्वत अशा अनेक शिल्पाकृती पाहून आपण विस्मयचकित होतो.

दुसऱ्या बाजूच्या पॅनेलवर सूर्यवर्मन राजाची शाही मिरवणूक आहे. यात प्रधान, सेनापती, हत्ती, घोडे, रथ,  बासरी , ढोलकी व गॉ॑ग वाजविणारे वादक दाखविले आहेत. त्या पुढील पॅनलवर हिंदू पुराणातील स्वर्ग-नरक, देव-देवता, रेड्यावरील यमराज दाखविले आहेत. या सबंध मंदिरात मिळून जवळजवळ  १८०० अप्सरांचे पूर्णाकृती शिल्प आहे. त्यांच्या केशरचना, नृत्यमुद्रा, भावमुद्रा, दागिने, वस्त्रे पाहण्यासाठी जगभरचे कलाकार आवर्जून कंबोडियाला येतात.  विविध ठिकाणी शंकर, मारुती, गणपती यांच्या छोट्या मूर्ती आहेत. हे गणपती दोन हातांचे, सडपातळ व सोंड पुढे वाकलेली असे आहेत. जिथे गणपतीला चार हात आहेत तिथे मागील दोन हातात कमळ, चक्र आहे.

वास्तुशास्त्राचा अजोड नमुना म्हणून वाखाणलेल्या या देवालयाचे एकावर एक तीन मजले आहेत. लांबलचक कॅरिडॉर्स व उंच जिने यांनी ते एकमेकांना जोडलेले आहेत. दुसऱ्या मजल्यावर जाताना भगवान बुद्धाचे उभे व बसलेले वेगवेगळ्या मुद्रांमधील अनेक पुतळे आहेत. गॅलरीच्या दोन्ही बाजूच्या खांबांवर नागाची शिल्पे आहेत. तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पाच मजले उंच शिडी चढून जावे लागते. तेथील गच्चीवरून या मंदिराची रचना व आजूबाजूचा भव्य परिसर न्याहाळता येतो. मंदिराच्या गॅलऱ्यांचे दगडी खांब एखाद्या लेथवर केल्यासारखे गुळगुळीत, सुरेख वळणावळणांचे आहेत. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेले, भव्य पण प्रमाणबद्ध रचना असलेले, असंख्य रेखीव शिल्पाकृती असलेले हे महाकाव्य भारावून टाकणारे असेच आहे.

अंगकोर थोम ( शहर ) येथील गुलाबी कमळांच्या तळ्यावरील छोटा पूल ओलांडला की रस्त्याच्या एका बाजूला देव तर दुसऱ्या बाजूला दानव सात फण्यांच्या नागाचे लांबलचक जाड अंग धरुन समुद्रमंथन करताना दिसतात. या नगरीचे प्रवेशद्वार २३ मीटर्स म्हणजे जवळजवळ सात मजले उंच आहे. त्यावर चारी दिशांना तोंडे असलेली एक भव्य मूर्ती आहे. प्रवेशद्वाराशी दोन्ही बाजूंना तीन मस्तके असलेला इंद्राचा ऐरावत आहे. हत्ती सोंडेने कमळे तोडीत आहेत. त्यांच्या सोंडा प्रवेशद्वाराचे खांब झाले आहेत. अशी पाच प्रवेशद्वारे असलेल्या या शहराचा बराचसा भाग आता जंगलांनी व्यापला आहे. आठ मीटर उंच व प्रत्येक बाजू तीन किलोमीटर लांब अशी भक्कम , लाल कोब्याची संरक्षक भिंत या शहराभोवती उभारण्यात आली होती. यातील फक्त दक्षिणेकडील भाग सुस्थितीत आहे.

प्रत्येक कोपऱ्यात उंच देवालय तसेच लोकेश्वर बुद्धाची देवळे आहेत. मुख्य देवालय तीन पातळ्यांवर असून त्यावर ५४ उंच मनोरे आहेत. प्रत्येक मनोर्‍यावर राजाच्या चेहऱ्याशी साम्य असलेले चार हसरे चेहरे आहेत. फणा उभारलेले नाग, गर्जना करणारे सिंह आहेत. सहा दरवाजे असलेल्या लायब्ररीसारख्या बिल्डिंग बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यावरील पट्टिकांवर कमळे, देवता असे कोरले आहे. एक आरोग्य शाळा ( हॉस्पिटल ) आहे. एके ठिकाणी नागाच्या वेटोळ्यावर बसलेली, चेहर्‍याभोवती नागाचा फणा असलेली, बारा फूट उंचीची भगवान बुद्धाची पद्मासनात बसलेली मूर्ती आहे.उंच चौथऱ्यांच्या खालील बाजूला अप्सरा, चायनीज व खमेर सैनिक, वादक, प्राण्यांची शिकार, शिवलिंग, आई व मूल, बाळाचा जन्म, मार्केटमध्ये भाजी-फळे विकणाऱ्या स्त्रिया, माकडे, कोंबड्यांची झुंज, मोठा मासा, गरुडावरील विष्णू, नौकाविहार करणाऱ्या स्त्रिया अशी अनेक शिल्पे आहेत. एका चौथऱ्यावर खाली हत्तींची रांग तर एके ठिकाणी मानवी धडाला सिंहाचे तोंड, गरुडाचे तोंड कोरलेली अनेक शिल्पे आहेत. अगदी खालच्या पातळीवर पाताळातील नागदेवता,जलचर आहेत. एके ठिकाणी हाताचा अंगठा नसलेला व लिंग नसलेला एक राजा कोरला आहे. त्याला ‘लेपर किंग’ असे म्हणतात. राजा जयवर्मन सातवा व राजा जयवर्मन आठवा यांच्या कारकिर्दीमध्ये हे शहर उभारले गेले.

कंबोडिया_ भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments