सौ राधिका भांडारकर

??

☆ “जागर” ☆ सौ राधिका भांडारकर 

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी माझे काही विचार या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करते.

।।नमो देव्यै महादेव्यै

शिवायै सततं नम:

नम: प्रकृत्यै भद्रायै

नियत: प्रणता स्मताम् ।।

अश्विन शुद्धप्रतिपदेपासून घरोघरी घटस्थापना होते. देवीचे मूर्त तेज वातावरण उजळते. मंत्रजागर आरत्या  यांचा नाद घुमतो. उदबत्त्या ,धूपार्तीचे सुगंध दरवळतात. दररोज नवनवे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात.

नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रेही परिधान केली जातात. सर्वत्र उत्साह ,मांगल्य ,पावित्र्य पसरलेले असते.

लहानपणापासून आपण एक कथा  ऐकत आलो आहोत…महिषासुराची. या महिषासुराने पृथ्वी आणि पाताळात अत्याचार माजवला होता.आणि त्यास स्वर्गाचे राज्य हासील करायचे होते. सर्व देव इंद्रदेवांकडे जाऊन ,महिषासुरापासून रक्षण करण्याची प्रार्थना करतात. इंद्र आणि महिषासुरात युद्ध होते व या युद्धात इंद्रदेव पराभूत होतात. हतबल झालेले देव ब्रह्मदेवाकडे येतात, व आसुरापासून रक्षण करण्याची विनंती करतात. महिषासुराचा वध हा मनुष्यमात्राकडून होणे असंभव होते. मग ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या तेजातून एक स्त्रीशक्ती निर्माण केली जाते. ही स्त्रीशक्ती म्हणजेच आदीमाया… आदिशक्ती… दुर्गामाता.

शंकराचे त्रिशूळ, विष्णुचे चक्र, वरुणाचा शंख, यमाची गदा, तसेच कमंडलु, रुद्राक्ष, अशा दहा शस्त्रांची परिपूर्ण शक्ती…दशभुजा दुर्गा..सर्वशक्तीमान रुप. तिचे आणि महिषासुराचे घनघोर युद्ध होते, व महिषासुराचे दारुण मर्दन होते. म्हणून ही महिषासुरमर्दिनी…. सिंहारुढ ,पराक्रमी, तेज:पुंज देवी.

नवरात्रीचे महाराष्ट्रात आणखी एक विशेष म्हणजे भोंडला. भोंडला म्हटले की शालेय जीवनातले दिवस आठवतात. नवरात्रीत सगळ्या सख्या,नऊ दिवस .वेगवेगळ्या सखीकडे जमतात. पाटावर ,सोंडेत माळ धरलेल्या हत्तीचं चित्र काढायचं,अन् त्या पाटाभोवती फेर धरुन एकेक प्रचलित लोकगीतं गायची..

तर असा हा भोंडला, भुलाई, किंवा हादगा …. 

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा।।

अक्कण माती चिक्कण माती .. खळगा जो खणावा

अस्सा खळगा सुरेख बाई .. जातं ते रोवावं…

अस्स जातं सुरेख बाई .. शेल्यानं झाकावं

अस्सा शेला सुरेख बाई .. पालखीत ठेवावा

अश्शी पालखी सुरेख बाई .. माहेरी धाडावी

अस्सं माहेर सुरेख बाई .. खायाला देतं

अस्सं सासर द्वाड बाई .. कोंडून मारतं..

अस्सं आजोळ गोड बाई .. खेळाया मिळतं…

गाणी रंगत जातात. सख्या आनंदाने फुलतात. आणि मग शेवटी…. 

बाणा बाई बाणा स्वदेशी बाणा

गाणे संपले खिरापत आणा..।।

खिरापत ही गुलदस्त्यातील. ती ओळखायची.अन् नंतर चट्टामट्टा करायचा…नवरात्रीच्या या उत्सवातील,असा हा पारंपारिक खेळ…सामुहिक आनंदाचा सोहळा.

अर्थात् नवरात्र म्हणजे देवीचाच उत्सव. तिची शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री, ही निरनिराळी नऊ नावे असली तरी ती एकाच आदीशक्तीची विविध रुपे आहेत. देवीच्या कथाही अनेक आहेत. पण सामाईकपणे ही नारीशक्ती आहे. आणि तिचा अवतार,अहंकार, क्रोध, वासना, पशुप्रवृत्ती, यांचा संहार करण्यासाठीच झाला आहे…

दरवर्षी नवरात्री उत्सवात या सर्वांचं मोठ्या भक्तीभावाने पूजन, पठण होते. गरबा,दांडीयाचा गजरही या आनंदोत्सवाला सामायिक स्वरुप देतोच..

…. पण मग एका विचारापाशी मन येऊन ठेपतं…

आपले सर्वच सण हे आध्यात्मिक संदेश घेऊन येतात..अर्थपूर्ण , नैतिक संदेश.

उत्सव साजरे करताना या संदेशाचं काय होतं..?

ज्या स्त्रीशक्तीची नऊ दिवस पूजा केली जाते, दहाव्या दिवशी अनीतीचा रावण जाळला जातो ,आणि मग अकराव्या दिवसापासून पुन्हा तीच हतबलता…??

…… खरोखरच स्त्रीचा सन्मान होतो का? स्त्री सुरक्षित आहे का आज? ज्या शक्तीपीठाची ती प्रतिनिधी आहे, त्या स्त्रीकडे किंवा त्या स्त्रीबाबत विचार करण्याचा समाजाचा दृष्टीकोन  नक्की कसा आहे…?

आज तिच्या जन्माचा आनंदोत्सव होतो का? का तिला उमलण्याच्या आतच खुडलं जातं…?

ज्या पवित्र गर्भातून विश्वाची निर्मिती होते, त्या देहावर पाशवी, विकृत वासनेचे घाव का बसतात…?

विद्रोहाच्या घोषणांनी काही साध्य होते का?

समाजासाठी मखरातली देवी आणि आत्मा असलेली, चालती बोलती स्त्री..ही निराळीच असते का?

असे अनेक प्रश्न, अनेक वर्षे..  युगानुयुगे, अगदी कथांतून, पुराणातून, इतिहासातून व्यक्त झाले आहेत.

आणि आजही ते अनुत्तरीत आहेत.

स्त्रीचा विकास झाला म्हणजे नक्की काय झाले? …. ती शिकली. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली. उच्चपदे तिने भूषविली. तिच्या वागण्या बोलण्यातही फरक पडला. तिचा वेशही बदलला. ती आत्मनिर्भरही  झाली.

…. पण तिचा संघर्ष संपला का? तिचे हुंदके, तिची घुसमट, तिची होरपळ…. आहेच त्या चौकटीत.

एका मोठ्या रेषेसमोरची ती एक लहान रेषच… दुय्यमच. म्हणून डावलणं आहेच. सन्मान कुठे आहे तिचा…?

.. मग हा जागर कधी होणार?

तिच्या सामर्थ्याचं त्रिशूळ, बुद्धीचं चक्र, विचारांची गदा, सोशिकतेचं कमंडलु ,भावनांची रुद्राक्षं, तेजाचे तीर …. जेव्हा  धार लावून तळपतील, तेव्हाच या शक्तीपीठाचा उत्सव सार्थ ठरेल…

नवरात्री निमित्ताने जोगवा मागायचाच असेल तर  स्त्री जन्माच्या  पावित्र्याचा..मांगल्यांचा… शक्तीच्या आदराचाच असला पाहिजे हे मनापासून वाटते…

हे देवी ! तुझ्या दशभुजा, सर्व शस्त्रांसहित पसर आणि तुझ्या दिव्य तेजाचंच दर्शन दे…..!!!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments