डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य आणि बासरी… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रत्येकाचं आयुष्य, हे बासरी सारखं पोकळच असतं अनेक ठिकाणी अनेक छिद्र असतात…! 

कोणतं छिद्र कधी झाकायचं ? कधी उघडायचं ? 

श्वास कधी घ्यायचा ? आणि फुंकर कधी मारायची ? 

— एकदा याचं गणित समजलं, की मग आयुष्य सुरेल होतं…!!! 

आयुष्यात दुःख कुणाला नाही ?

आता हेच पहा ना…. कुणी लिहितंय तर कुणी वाचतंय…. !!! 

गुरुस्थानी असलेले श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर, मागच्या वेळी बोलताना मला म्हणाले, दुःख कमी करण्याचा एकच उपाय, तो म्हणजे ..  ” देके जावो, या फिर छोडके जावो…!”

सोबत घेऊन जायचा कोणताही पर्याय नसेल, जे आज ” माझं ” आहे ते मला इथेच जर सोडून जायचं असेल … तर मी उद्या ते दुसऱ्याला द्यायला काय हरकत आहे… ? ज्याचा आज मी उपभोग घेत आहे, ते माझं नाहीच… उद्या ते दुसऱ्याच्या पदरात असणार आहे, मी ज्याला माझं म्हणतोय ती फिरती ढाल आहे, आज माझ्याकडं आहे, उद्या दुसरीकडे ही ढाल जाणार, हे एकदा समजलं, तर जातांना ही ढाल दुसऱ्याला खुल्या दिलानं द्यायला काय हरकत आहे ? 

— लेके तो जा नही सकते….. तेव्हा ” देके जावो, या फिर छोडके जावो…!”

Give it… or leave it !!! 

वरील तत्व तंतोतंत अंमलात आणत, आपण तळागाळातल्या समाजाला आपल्या घासातला घास द्यायला अगोदरच सुरुवात केली आहे. 

आपल्या देण्याच्या या वृत्तीला मनापासून नमस्कार. 

भिक्षेकरी ते कष्टकरी …. 

१ . परिस्थितीने पिचलेले एक तरुण कुटुंब ! नाही म्हणायला एक झोपडं होतं, बाजूला शिवाजीनगर कोर्ट परिसरात “तो” छोटा विक्रीचा व्यवसाय करून बायको आणि दोन पोरांना जगवायचा. याचं झोपडं जिथं होतं, बरोब्बर तिथूनच मेट्रोला जायचं होतं… तिचा तसा हट्टच होता…. मग सर्व झोपड्या जमीनदोस्त झाल्या… याची कशी शिल्लक राहील ? अनेक कुटुंबं उध्वस्त झाली… मग आता नक्कीच विकास होणार याची खात्री पटली… ! 

ज्या रस्त्यावर अनेक लोक छोटे विक्री व्यवसाय करत होते, त्यांचे सर्व सामान उचलून त्यांना तिथे विक्रीस बंदी आणली… उदरनिर्वाह थांबला… लहान लेकरं भुकेने इकडे तडफडत होती, आणि चकाचक होण्याच्या नादात शहर मात्र तिकडं “स्मार्ट” होत होतं…! 

याचाही व्यवसाय थांबला, जगण्याचे आणि जगवण्याचे सर्व रस्ते बंद झाले. याने मग झाडाला लटकून फास घेण्याचा प्रयत्न केला… ऐनवेळी कुणीतरी बघितले आणि थोडक्यात वाचला ! 

याला मी आधीपासून ओळखत होतो. याला बोलावून घेतलं…. सातारी शिव्या आणि पुणेरी टोमण्यांनी याला आधी चांगला बुकलून काढला…. इतका, की यापेक्षा फास परवडला असता, असं त्याला वाटलं असेल. 

इलाज नव्हता… गोळ्या औषधांनी बरं होत नसेल, तर सुई टोचावीच लागते…! 

यानंतर मात्र त्याला प्रेमानं जवळ बसवून, तू गेल्यानंतर, बायको आणि लहान पोरांचे हाल कसे झाले असते… हे त्याला समजावून सांगितले. तो रडायला लागला. त्याला समजेल अशा भाषेत मग सांगितलं, ‘आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळत नसेल, तर वाट बदलून बघायची असते मित्रा… चालणं थांबवायचं नसतं…!.. ‘पानगळीत झाडं आपली पिकलेली पानं फक्त बदलतात येड्या … आपलं मूळ नव्हे !’ 

सोमवारी २५ सप्टेंबरला विक्रीसाठी याला लागतील त्या सर्व गोष्टी घेऊन दिल्या आहेत. विक्रीची जागा बदलली आहे… एक कुटुंब सावरलं आहे. बायकोच्या ज्या ओढणीने तो गळफास घेणार होता, तीच ओढणी, आता तो गळ्याभोवती गुंडाळून काम करतो…!  त्याच्या गळ्या भोवती पडलेले काळे निळे व्रण आणि झालेल्या जखमा आता हीच ओढणी झाकते… ! 

२ .  परिस्थितीच्या चटक्यांनी पोळलेले… पत्नीवर निस्सिम प्रेम करणारे… पण तिच्याकडूनच फसवले गेलेले… भ्रमिष्ट होऊन, रस्त्यात एक्सीडेंट होऊन पडलेले एक बाबा…!  २३ तारखेला शनिवारी रस्त्यावरच यांची दाढी कटिंग करून, आंघोळ घालून यांना उपचारासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. पूर्ण बरे झाल्यानंतर, यांचे पुढे काय करायचे… याची दिशा भविष्यात समजेल… ! 

बाबांनी आतापर्यंत जगलेलं आयुष्य… त्यांचे झालेले विश्वासघात, हे सर्व ऐकून मी सुद्धा अंतर्बाह्य हलून गेलो होतो. 

शेवटी एकच समजलं ..  ” विश्वास किंमती असतो पण धोका खूप महाग… !!!” 

याच बाबांचा संपूर्ण आयुष्यपट “कुणी जीव घेता का जीव ?” या दीर्घ लेखात स्वतंत्रपणे मांडला आहे. 

वैद्यकीय

१.  एक वेळ अशी येते.. आई बाप थकून आणि सुकून जातात… गळून पडतात…. तेवढ्यात सुना, किंवा मुलं येतात, माने खाली हात घालून उठवतात… सुकलेल्या निर्जीव डोळ्यात तेवढ्यापुरती जान येते …चकाकी येते… सुकलेली ती पानं मग हरखून भावुक होवून विचारतात, ‘ मला कुठे नेत आहात ?’ 

समोरचा निर्विकारपणे सांगतो, ‘ जाळायला नेतोय… हल्ली सुकलेलं सरपण मिळतंय कुठं…??? ‘

अशी अनेक सुकलेली लाकडं आम्हाला रस्त्यावर ठिकठिकाणी मिळतात…. आम्ही आधी या लाकडांना शुचिर्भूत करतो, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो… झालेल्या सर्व जखमांवर फुंकर मारून, पुन्हा या जुन्या खोडातून पालवी फुटावी यासाठी प्रयत्न करतो. ! 

या महिन्यात अशा तीन अतिगंभीर रुग्णांना ऍडमिट केले आपल्या आशीर्वादाने ते जगले आहेत. 

त्यांची कर्मकहाणी इथे किंवा स्वतंत्र लेखात मांडावीशी वाटते, परंतु साहित्यातला बीभत्स रस सुद्धा इथे ओशाळेल, म्हणून संयमाने आणि नाईलाजाने थांबतो … !!! 

२. याव्यतिरिक्त रस्त्यावरील खरोखरचे गरजू ओळखून त्यांना कुबड्या, वॉकर, काठ्या, व्हील चेअर, मानेचे तथा कमरेचे पट्टे अशी वैद्यकीय साधने दिली आहेत.  त्याचप्रमाणे त्यांच्या रक्त लघवीच्या सर्व तपासण्या करून रस्त्यावरच त्यांना वैद्यकीय उपचार केले आहेत…. हेतू एकच …. बरं झाल्यानंतर स्वाभिमानानं यांनी काहीतरी काम करावं आणि सन्मानानं माणूस म्हणून जगावं…!

अन्नपूर्णा प्रकल्प

खिशाला छिद्र पडलं की पैशाच्या आधी नाती गळून पडतात ही आजची वस्तुस्थिती आहे ! 

बापाच्या शर्टाला पदर नसतो आणि आईच्या पदराला खिसा नसतो… तरीही आईबाप आपल्या मुलाबाळांना झाकायला…  त्यांना काही द्यायला… कधीही कमी पडत नाहीत…! 

पण जेव्हा बापाच्या खिशाला छिद्र पडतं किंवा आईचा पदर फाटतो , त्यावेळी मात्र त्यांची किंमत तुटलेल्या आणि झिजलेल्या पायताणासारखी होते…

वापरून फेकलेली अशी बरीच पायताणं आम्हाला रस्त्यावर जागोजागी उकिरड्यावर भेटतात…! आमच्या अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही अशा उकिरड्यावर पडलेल्या किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गोरगरीबांना, रोज…. हो दररोज…. जेवणाचे डबे हातात देत आहोत. 

कोविडच्या पहिल्या लॉकडाऊन पासून सुरू केलेला आमचा हा प्रकल्प,  आजतागायत आपल्या आशीर्वादाने दररोज सुरू आहे…. ! 

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा त्यांना सन्मानानं “मजुरी” द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे. 

आमच्या या सर्व महिला पुणे महानगरपालिकेच्या “स्वच्छता अभियान च्या ब्रँड अँबेसिडर” म्हणून सध्या चमकत आहेत. 

भीक नको बाई शिक

आपल्या माध्यमातून भीक मागणाऱ्या पालकांच्या ५२ मुलांना दत्तक घेतलं आहे, आणि त्यांच्या सर्व शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या आहेत. 

माझ्या पूर्व आयुष्यावर मी जे पुस्तक लिहिलं आहे, त्याची विक्री करतो आहे. या विक्रीतून येणारा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरत आहे. 

आमचा हा संपूर्ण प्रवास आहे… भिक्षेकऱ्यांना  कष्टकरी बनवण्याचा… माणूस म्हणून त्यांना जगणं शिकवण्याचा…. !!! कोणत्याही प्रवासात, महत्वाचं काय असतं ? प्रवास सुखकर झाला …? नाही, हे फारसं महत्वाचं नाही…!  प्रवासात खूप अडचणी आल्या …? नाही, हेही फारसं महत्वाचं नाही, त्या तर येणारच …! 

मग ? इच्छित स्थळी पोचला नाहीत अजून ??? …. यालाही फारसं महत्व नाही, रोज थोडं थोडं चालतोय, इच्छित स्थळ येईलच कधीतरी …! 

अरे…. मग महत्त्वाचं काय…. ??? .. महत्त्व असतं, प्रवासात दिलेल्या सोबतीला….! 

चालताना दम लागला तर, पाठीवरून मायेनं फिरवलेल्या हाताला…!! 

धावताना तहानेनं जीव व्याकुळ झाला असता, ओंजळभर पाणी पाजणाऱ्या त्या ओंजळीला….!!! 

खाच खळगे पार करताना, कधी ठेच लागते, अंगठा रक्ताळतो… वेदना आपल्याला होते…. आणि अश्रू समोरच्याच्या डोळयात असतात… महत्त्व असतं त्या समोरच्या थेंबभर अश्रूला….! 

तुम्ही सर्वजण हेच तर करताय…. माझ्या या प्रवासात “सोबत” राहून….! 

आणि म्हणून “आपल्या सोबतीने” झालेल्या या प्रवासाचा लेखाजोखा आपणास सविनय सादर….!

सफर अहम नही…. मंजिल भी अहम नही…

अहम है…. सफर मे मिली हुई साथ….!!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments