सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ वेल… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मैत्रीण म्हणाली गोकर्णीच्या बिया आहेत लाव तुझ्या कुंडीत…

पावसाळ्याचे दिवस आहेत रुजतील बघ…

कुंडी रिकामी नव्हती .तुळशीच्या कुंडीतच  तीनी खड्डा केला …आणि त्यात बिया पेरल्या. पाणी घातलं .

दर दोन दिवसांनी ती बघायची अजून अंकुर वर आला नव्हता.

काही दिवस तिचे तिकडे लक्षच गेले नाही .आणि त्या दिवशी अचानक दोन पानं दिसली …

तिला विलक्षण आनंद झाला.. वेल भराभर वाढायला लागली..

ती प्रचंड खुश…

तुळशीच्या फांद्यांचा आधार घेऊन वेल वर चढायला लागली..

भरपूर हिरवीगार पानं दिसत होती.

ती रोज परत परत बघायची वेल ऊंच ऊंच गेली  होती ….

त्या दिवशी सुनबाई जवळच उभी होती म्हणाली..

“ आई इतकं काय निरखून बघताय?”

“ अगं वेल वाढली आहे पण अजून फुलं काही लागली नाहीत “

सून जरा शांत बसली.. नंतर हळूच म्हणाली..

“आई इतकी घाई नका करू.. वेलीला वाढू दे …सशक्त होऊ दे.. तिला योग्य वाटेल तेव्हा येतील फुलं…

तिचा तिला वेळ द्या….  कदाचित तिची अजून तयारी झाली नसेल…”

तिने सुनेकडे बघितलं … म्हणाली, “  अग फुलांची वेल आहे मग फुलं आलीच पाहिजेत …फुलं येत नाहीत म्हणजे काय…. “

सून काही बोलली नाही. शांतपणे बाजूला झाली .

‘फुल कशी येत नाही बघतेच आता…..’ असं म्हणत  तिने त्यावर उपाय करायला सुरुवात केली .

अनेक जण सांगणारे भेटले.  माहितीचे नवेनवे स्तोत्र हाताशी होतेच .जे जे जमेल ते ते ती करत होती .

एकदा सुन म्हणाली …. 

“आई या सगळ्याचा वेलीला त्रास होत असेल …हिरवीगार वेल पण छान दिसते आहे….”

तिने सुनेच्या  बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तिचा फुलासाठी आटापिटा सुरू होता.

यश मात्र येत नव्हते .काही दिवसांनी ती निराश झाली…आणि मग तो खटाटोपही  कमी झाला .

मध्ये काही दिवस असेच गेले………… एक दिवस ती उठली सहज वेलीकडे लक्ष गेले …

ती चमकली.  फुलासारखं तिला काहीतरी दिसलं… जवळ गेली तर लक्षात आलं ते प्राजक्ताचे फुल होतं…. 

वाऱ्यावर वेल डोलली …तसे ते फुल अजूनच तिला छान वाटलं…

ती बघत बसली….आज वेल जास्त सुरेख दिसते आहे असं तिला वाटलं.

मनोमन तिला सगळं काही उमगलं…

अचानक तिने हळूच सुनेला जवळ घेतलं. पाठीवर थोपटलं …तिचे हात हातात घेतले.. तो आश्वासक हात बरंच काही सांगून गेला…

… आई स्टूलावर  चढली होती. ती पडेल अशी लेकीला भीती वाटत होती …” आई मी स्टूल  घट्ट धरून ठेवते म्हणजे तू पडणार नाहीस….” आपल्या छोट्याशा हाताने तिने स्टूल  पकडले…

आईला आधार देण्यासाठी…आईची काळजी लेकीच्या इवल्याशा  डोळ्यात दिसत होती….

दोघी  कौतुकाने   छोटुकल्या प्राजक्ताकडे बघत होत्या…

सासू सुनेचे डोळे गच्च भरून वाहत होते……

कुठलाही गाजावाजा न होता एका वेलीनी अवघड प्रश्न सहजपणे सोडवला होता…….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments