सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ अल्बम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

दरवर्षी चार जुलैला वाढदिवस असतो माझा आणि दरवेळी मागचे किती वाढदिवस कसे झाले, ते डोळ्यासमोर येऊन जातात! जणू फोटोच्या अल्बमची पाने मी उलटत होते! पन्नास वर्षांपूर्वी फोटो काढणे हे तितकेसे कॉमन नव्हते. कॅमेराच मुळी नवीन होता तेव्हा! साधारण ६०/६५ वर्षांपूर्वी आमच्या घरी कॅमेरा होता, अर्थात ही माझ्यासाठी ऐकीव गोष्ट! माझ्या वडिलांना फोटोग्राफीची आवड होती. फोटो काढणे, ते स्वतः डेव्हलप करणे हे ते शिकले होते, त्यामुळे आमच्याकडे खूप जुने फोटो अजूनही बघायला मिळतात! स्वातंत्र्यापूर्वी वडिलांचे कुटुंब कराची ला होते, तेथील त्यांच्या घराचे, कराची शहरातील फोटो अजूनही आमच्या अल्बम मध्ये आहेत.

अगदी पूर्वीच्या कॅमेरात आठ फोटो निघत असत. नंतर छोटे छोटे सोळा आणि 24 फोटो निघणारे रोल आले. कॅमेरा मध्ये जसजशा सुधारणा होऊ लागल्या तस तसे अधिक चांगले आणि जास्त फोटो मिळू लागले.आणि खर्च ही कमी येऊ लागला. फोटोंचा अल्बम ही लोकांच्या आवडीची गोष्ट बनू लागली. घरातील लग्न,मुंजी, बारसे किंवा कोणताही कार्यक्रम असला की फोटो काढून त्यांचा अल्बम बनवला जाऊ लागला. आमचे दादा मग प्रत्येक अल्बम ला नाव देत. “गोड स्मृती” नावाचा पहिला अल्बम अजूनही माझ्या माहेरी आहे. तिथे गेले की मी कौतुकाने ते जुने फोटो बघू शकते आणि त्यामुळे मनाला खूप आनंद मिळतो. अल्बम मधील काही व्यक्ती आता काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी आपल्याला फोटो बघून ते जुने दिवस आणि माणसे यांचे स्मरण होते! आता तर काय मोबाईल मुळे फोटो काढणे खूपच सोपे झाले आहे, पण प्रिंटेड फोटो अल्बम ची शान मला वेगळीच वाटते!

स्वतःच्या आयुष्याचा हा अल्बम उघडताना माझ्याही डोळ्यासमोर माझ्या छोट्या छोट्या छबी दिसू लागल्या. आईच्या कडेवर बसलेली मी, तर कधी रडत असलेली, नुकतीच पावले टाकू लागलेली मी, मला फोटोतून दिसली. नवीनच पंजाबी ड्रेस घालून शाळेला जायच्या तयारीत असलेली चार-पाच वर्षाची ऋजू ही एका फोटोत दिसली. दोन वेण्या वर बांधलेल्या आणि काळ्या रंगाचे पांढरे खडी असलेले परकर पोलके घालून वडिलांबरोबर समुद्रावर फिरायला गेलेली मी, मला फोटोत दिसली. त्यानंतर स्कर्ट ब्लाउज घालून शाळेत जाणारी मी मला जाणवून देत होती की,’ तू आता मोठी झालीस!’ नकळत 1964 साल उजाडले आणि मी दहा वर्षाची झाले!

शाळेत असताना  माझ्या वाढदिवसाला आई माझ्या मैत्रिणींना घरी फराळाला बोलवत असे. आणि मग छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रम ही होत असे. त्यात चिठ्ठ्या टाकून उचलायला सांगितले जाई आणि चिठ्ठीत असेल त्याप्रमाणे गाणे, नाच, नक्कल किंवा खेळ करून दाखवावे लागत असे. तेव्हा खायच्या पदार्थात पावभाजी, केक नसे पण घरी केलेले दडपे पोहे, चिवडा, लाडू यासारखे पदार्थ असत. मग आमची पार्टी मजेत होत असे. असे वाढदिवस साजरे करता करता अल्बम मध्ये मॅट्रिकच्या वर्षीचा ग्रुप फोटो आला आणि त्यामुळे आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो याची जाणीव झाली.

कॉलेजची वर्षे सुरू झाली आणि घरचा वाढदिवस बंद होऊन बाहेर हॉटेलात वाढदिवस साजरा होऊ लागला. फोटोसेशन होऊ लागले. मित्र मैत्रिणींबरोबर वाढदिवस मजेत साजरे होऊ लागले. छान छान गिफ्टची देवाणघेवाण होऊ लागली आणि हा अल्बम विस्तारत गेला.

अजूनही कधी ते फोटो बघते तेव्हा पुन्हा एकदा मनावर आठवणींचे मोरपीस फिरते! बघता बघता किती वाढदिवस साजरे झाले ,परंतु खरी मजा आणि प्रेम मिळाले ते लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला! सरप्राईज म्हणून मिळणारी साडी किंवा दागिना वाढदिवसाला शोभा आणू लागला. मग नवऱ्याबरोबर केक कापतानाचा फोटो अल्बम मध्ये आला. मुलांच्या जन्मानंतर आपल्यापेक्षा मुलांचे वाढदिवस साजरे करत असलेले फोटो अल्बम मध्ये दिसू लागले. ते चौकोनी कुटुंब असे आमचे फोटो आता अल्बम खुलवू लागले!

मध्यंतरीच्या काळात मुलांनी आमचे वाढदिवस साजरे केले.’ आई, तुझ्या वाढदिवसाला मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार आहे’. म्हणत मुले त्यांनी साठवलेल्या पैशातून माझ्यासाठी आठवणीने छोटी मोठी वस्तू आणू लागली आणि माझा ऊर आनंदाने आणखीनच भरून  येई! अरेच्या! किती मोठे झालो आपण! असे म्हणतच अल्बम मधल्या फोटो भर पडत होती!

आता काय साठी उलटली! मुलांची लग्न कार्ये झाली. सून, जावई, नातवंडे यांच्या आगमनाने वाढदिवस पुन्हा एकदा जोरात साजरे होऊ लागले! फॅमिली ग्रुप फोटोंची अल्बम मध्ये भर पडली. छोटी नातवंडे अंगा खांद्यावर विसाऊ लागली. काळ्या केसांमध्ये रुपेरी चांदीची भर पडली. वय जाणवायला लागले. वाढदिवसाला आणलेला गजरा माळण्याइतके ‘ केस नाही गं उरले’ असं लेकीला म्हटलं तरी,’ आई तुला मोगरीचा गजरा आवडतो ना, म्हणून मी मुद्दाम आणलाय ‘ असं म्हटलं की त्या छोट्याशा केसांवर तो घालावाच लागे. असे वाढदिवस साजरे करता करता हळूहळू साठी उलटली. सांधे कुरकुरायला लागले. आता काही नको तर वाढदिवस असे वाटू लागले. इतकी वर्षे काढलेले फोटो अल्बम मध्ये बघताना आपल्या मधला फरक जाणवू लागला!

कुठे ती लहान ऋजू, नंतर लग्नानंतरची उज्वला आणि आता तर उज्वला आजी! अल्बम मधील सरकती वर्षे बघता बघता मी रंगून गेले! फोटो मुळेच ही किमया झाली आहे. खरंच, मन:चक्षुपुढे येणाऱ्या छोट्या मोठ्या व्यक्ती आपण वर्णन करून सांगू नाही शकत! पण फोटो मुळे मात्र व्यक्ती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते ,ही तर आहे फोटो अल्बम ची किमया!

आता दरवर्षी चार जुलैला वाढदिवस येतो. मुलांच्या सोबत साजरा करताना केक कापला जातो. फोटो काढून होतात. पुन्हा एका नवीन वर्षात पदार्पण केले म्हणून! आठवणींच्या अल्बम मध्ये आणखी एका फोटोची भर! अशाच आनंदात वाढदिवस साजरा करत राहायचंय, जोपर्यंत भिंतीवरच्या फोटोमध्ये आपण जाऊन बसत नाही तोपर्यंत….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments