श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ उघडले चंद्राने द्वार… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… आलास ?  ये ये कधीपासून तुझीच वाट पाहत आहे या इथे… बाकी पुढारलेल्या देशातील मोजकेच जण आतापर्यंत इथं माझा पाहुणचार घेऊन गेले… तर काहीजण माझ्या परीघाभोवती फिरतच राहिले, तर काही जण यानातून उतरले गेलेच नाही.. काही तरी घोळ झाला असावा त्यावेळी… बिचारे अभागी ठरले आणि आपल्या देशी अपयशाचे धनी होऊन परतले… किती म्हणून त्यांच्या देशानी अपेक्षा, आशा बाळगल्या होत्या त्या सर्व फोल ठरल्या गेल्या… पण तू मात्र सगळ्यांच्या मागाहून तयारी करत होतास… पुढच्यास ठेच नि मागचा शहाणा या चालीवर त्यांच्या अनुभवाचा चांगला उपयोग करून संभाव्य चुका टाळून या इथे उशीराने का होईना पण व्यवस्थित आलास… मला स्वतःला खूप खूप आनंद झाला… आता तुला काय हवं ते तू कर… माझी कशालाच ना नाही बरं… हवा तितका दिवसाचा मुक्काम कर… संशोधन कर.. जा ये कर… आणखी कुणी तुझ्या बरोबर कुणी येणार असतील तर त्यांनाही बेलाशक आण…आतिथ्य करायला मी सदैव तयार आहे… आगमनाच्या द्वारावर मी स्वतः उभा राहून बरं… तू इथे येउन गेल्याच्या पदचिन्हाबरोबर तुझ्या देशाचा झेंडा येथे लावून जायला विसरू नको.. तुझ्या नंतर जे कोणी इथे येतील त्यांना खुणेच्या गोष्टी पाहून अती आनंद वाटेल… आजवरी तुम्हाला उंच उंच लांब लांबच्या अंतरावरून पाहत होतो पण आपली अशी भेट होईल हे स्वप्नात देखील कल्पिलेले नव्हते… आजवर दूर राहून तुम्ही सगळे जण मला या ना त्या नात्याने बोलवत होतात.. कुणाचा मी चंदामामा, तर कुणाचा मी प्रियतमेचा चंद्रमा, कुणाचा भाऊराया, तर कुणाचा सखा जिवलगा… कितीतरी गुजगोष्टी मी ऐकत आलो आहे.. लिंबोणीच्या झाडामागे दडलो आहे.. पौर्णिमेला खळखळून हसलो आहे नि कधी कधी उगाचच अमावस्येला रूसून अंधारात दडी मारून बसलो आहे… पण पण तो इतिहास आता मागे पडला.. आता तूच माझ्या कडे आलास.. त्या कविंंनां, लेखकांना, गझलकारांना म्हणावं आता खुशाल माझ्या कडे वास्तव्य करून भरभरून लिहा.. तुमची प्रतिभा शारदीय चांदण्या सारखी सतत स्त्रवत राहूदे… भाऊ नसलेल्या बहिणीनां म्हणावं आता हक्कानं माहेरपणाला या.. हा भाऊराया तुम्हाला भरभरून प्रेम देईल.. प्रियकर प्रेयसीनां म्हणावं, आता नारळाच्या, माडाच्या आडोशात बसून प्रिती गुंजन चांदण्यात कशाला करता… चक्क इथे या आणि आपली प्रिती विवाहाची, मधुचंद्राची रात्र साजरी करा… ज्याला जे जे हवं ते ते मी द्यायला तयार आहे… पण पण कलंकित, डागळलेली माणसांना  मी काहीच देऊ शकणार नाही… कारण मी स्वतः एक कलंकित, डागळलेला आहे आणि तशाच माणसांना मी मदत केली तर माझं लांछन अधिक वाढेल… मला त्यातून मुक्त व्हायचं आहे… तेव्हा मी काय सांगितले तेव्हढचं पक्क ध्यानात ठेवा… कलंकित, पापी, डागळलेल्यांना माझ्या इथं प्रवेश निषिद्ध आहे… बाकी स्वच्छ, कलंक विरहित, पुण्यशील लोकांना   हरणाची जोडीची गाडी पाठवून देईन.. तूप रोटीचं सुग्रास भोजन असेल, शेवरीच्या कापसाची मऊ मुलायम गादी निजायला असेल… आल्हाददायक रूपेरी चांदणं, शीतल वायू.. जे स्वप्नात सुद्धा पाहिले नसेल ते ते… पण पण फक्त त्यांना

… अरे अरे हे काय तू आता आला नाहीस तोवर लागलीच परत निघालास… राग आला का माझ्या बोलण्याचा तुला… असा मनुष्य  शोधूनही मिळणार नाही म्हणतोस या त्रिखंडात.. म्हणजे माझी आशा विफल ठरली कि काय… पण काही हरकत नाही पुन्हा येशील तेव्हा या गोष्टीचा नीट अभ्यास करूनच ये… मी तुझी वाट पाहत थांबेन… मेरा घर खुला है… खुलाही रहेगा.. तुम्हारे लिए…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments