डॉ मीना श्रीवास्तव

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आनंदाच्या गावा जावे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

पुस्तक – ‘आनंदाच्या गावा जावे’

लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव

प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स

पृष्ठसंख्या – १६३  पाने

पुस्तकाचे मूल्य – १६१ रुपये

पुस्तक परीक्षण- डॉ. मीना श्रीवास्तव, ठाणे

विश्वास सरांच्या विविधरंगी लेखणीतून साकारलेले त्यांचे जुलै २०२२ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक वाचले. त्यांच्या लेखणीला असे विविधरंग प्राप्त होण्याचे कारण, त्यांचे विविध विषयांवरील अफाट वाचन, गहन चिंतन आणि अनवरत मनन असावे, असा मला विश्वास आहे! बरे, नुसते वाचन करतील ते विश्वास सर कसले? कारण त्यांची जबरदस्त निरीक्षणशक्ती, जी, हे जेथे जातात तेथे यांच्या सांगाती असतेच असते. मी हे ‘निरीक्षण’ यासाठी नोंदवीत आहे, की या बहुल-विषय सामग्रीने सुसज्जित पुस्तकात असलेले विषय! पुस्तकातील समग्र ३९ लेख वाचले, अन पुस्तक वाचल्यावर मी माझ्या अल्पमतीने त्यांना कांही श्रेणींमध्ये विभागले अन ते-ते विषय परत चाळले. ते लेख असे (कंसात लेखांची संख्या दिली आहे): प्रेरणादायी व्यक्तिचित्रे (११), शिक्षण आणि तत्वज्ञान (११), भक्तिरसपूर्ण लेख (५), समाजबोध (४), संगीत (३), आरोग्य (२), कविता (२) आणि साहित्यिक विनोद (१). अर्थात या श्रेणी ढोबळ मानानेच विभागल्या आहेत. या माहितीचा हेतू इतकाच की, लेखकाने या पुस्तकात हाताळलेले बहुरंगी आणि बहुढंगी विषय आपल्यापर्यंत पोचावेत.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

यावरून हे लक्षात येते की प्रत्येक जाणत्या अन नेणत्या, तसेच प्रत्येक वयोगटातील वाचकासाठी या पुस्तकात कांही ना कांही आहे, इतकंच काय, ज्यांना विविध विषयांवर ललित साहित्य वाचायची आवड आहे, त्या वाचकांसाठी तर ही अत्यंत पौष्टिक तसेच रुचकर साहित्यिक मेजवानीच समजावी. अर्थात आभासी मेजवानीचे महत्व आपण जाणतोच, विचारांना खाद्य (food for thought) पुरवायचे असेल तर या पुस्तकाला पर्याय नाही असेच मी म्हणेन. आता यातील सर्वाधिक लेख असलेले विषय बघू या. लेखकाचे स्वतःचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहेच, याचा अनुभव त्यांनी आजवर लिहिलेल्या पुस्तकांतून, लेखमालांमधून, रेडिओवरील आणि प्रत्यक्ष भाषणांतून आपल्याला येतच असतो. त्याच अनुभवाचे संपन्न रूप या ११ लेखातून प्रकर्षाने जाणवते. मोजकी उदाहरणे द्यायची तर यांत आदर्श व प्रसिद्ध व्यक्ती (अंधत्वावर मात करून कर्तृत्वाने आकाशदीप झालले राहुल देशमुख, बहुआयामी शिक्षणाच्या धनी डॉक्टर शारदा बापट, आपल्या हृदयसिंहासनावर सदैव अधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी) आहेतच. परंतू आधी अप्रसिद्ध असून देखील लेखकाच्या सानिध्याने आणि या पुस्तकाच्या पानांवर आता अधिष्ठित होऊन प्रसिद्ध झालेल्या व्यक्ती अधिक आहेत. त्यांच्या हरहुन्नरी आणि विशेष कर्तृत्वाची दखल घेऊन लेखकाने त्यांचा यथोचित सन्मान केलाय, याबद्दल मी सरांचे आणि त्या व्यक्तींचे मनःपूर्वक अभिनंदन करते. यात लेखकाची चोखंदळ अभिरुची दिसते. कारण या व्यक्ती विविध क्षेत्रातील आहेत. उदाहरण द्यायचे तर आधुनिक रामदास, हे सामान्य असूनही असामान्य सामाजिक कार्य करणारे! आणि माळे गुरुजी. अशाच इतरही व्यक्तींचा मनोज्ञ वेध लेखकाने घेतलाय! सजीव व्यक्तिचित्रण तर सरांचे बलस्थान. म्हणूनच त्या सर्वांना जणू भेटण्याचे समाधानच लाभावे इतक्या त्या सरांनी आपल्या सहज सुंदर ओघवत्या लेखनातून जिवंत केल्या आहेत. या पुस्तकाचे मला तरी हेच सर्वोच्य आनंदाचे निधान वाटले.

आता अन्य श्रेणीकडे वळू या. शैक्षणिक विषय आणि तत्वज्ञान हे तर सरांचे त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक अनुभवाचे लाडके विषय! यामुळे ते लिहितांना लेखकाला अन वाचतांना वाचकांना आनंदाचे डोही आनंदतरंग असा अनुभव आला नाही तरच नवल! अशिक्षित कोण (उदा.बहिणाबाई), उन्नयन विचारांचे अन भावनांचे, कौशल्यासुत (हा राम नाही, पण कौशल्य नसेल तर कधी-कधी जीवनात राम नाही हा सरांचा एकदम अनवट विचार!) कोण कुणाजवळून शिकले ही मला अत्यंत भावलेली भावस्पर्शी गोष्ट, (पाश्चात्त्य असूनही आपल्या हृदयाचा संपूर्णपणे ठाव घेणारी) एका शिक्षिकेची अन तिच्या टेडी या विद्यार्थ्याच्या हृदयंगम नात्याची. मंडळी, आपण शिक्षक असा किंवा विद्यार्थी, या संपूर्ण कथेचे वाचन हा दैवी अनुभव हे आणखी एका अश्रूभरल्या आनंदाचे पान!

मंडळी, आता ज्या प्रकरणाचा उल्लेख करते ते शेवटचे आणि अतिशय वाचनीय, कारण संपूर्ण पुस्तकातील सर्वात अधिक पानांचे म्हणून नव्हे, तर ध्येयनिश्चितीच्या मार्गावरील पायऱ्या, खाचाखळगे आणि मळलेल्या वाट सोडून देखील मार्गक्रमण कसे करता येईल याचे विस्तृत, सुनियोजित, परखड आणि अनुभवपूर्ण, तरीही पायरी-पायरीने वृद्धिंगत होणारे रोमांचकारी विवेचन. कारण प्रत्येक पायरीच्या पुढे काय विचार असेल याची उत्सुकता! हे शीर्षक वाचून हे समस्त प्रकार विद्यार्थ्यांकरिता राखीव असावेत असे मला (उगीच) वाटले, मात्र, मित्रांनो मला यात मला पहिला धडा हाच मिळाला की बाह्यरंगावर (शीर्षक) जाऊ नका, अंतरंगात जाऊन बघाल तर या परीस आनंदाचे क्षण नोहे! विश्वास सर, या शेवटच्या भागात आपण आनंदाचेच नव्हे तर आपल्या लेखनकौशल्याचे देखील शिखर गाठलेत बरं का!

आता इतर भागांविषयी लिहिणे म्हणजे डुप्लिकेट पुस्तक छापल्यासारखे होणार. शिवाय आपल्याला पुस्तक वाचायला प्रवृत्त करणे हा माझा प्रमुख उद्देश आहे.

सरांची लालित्यपूर्ण भाषा म्हणजे त्यांच्यासारखीच साधी, सुलभ आणि सर्वांना आपलीशी वाटणारी. क्लिष्ट शब्दांचे आणि अवजड कल्पनांचे जाळे नसल्याने या सुगम आणि नितांतसुंदर साहित्याचा आस्वाद प्रत्येक जण घेऊ शकेल. अभिजात लेखन वजनदार असलेच पाहिजे असे नाही. शिक्षकी बाणा जपत त्यांनी हे ललित लेखन असे केले आहे की मागील बाकावर बसलेल्या मस्तीखोर किंवा ढ विद्यार्थ्याला देखील याचे आकलन होईल. किंबहुना हाडाच्या शिक्षकाचे टार्गेट बहुदा हेच विद्यार्थी असतात. साहित्याच्या बाबतीत मी पण बॅकबेंचर होते. म्हणूनच या पुस्तकाबद्दल मला विशेष प्रेम निर्माण झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असो, आपण कोठेही बसा मित्रांनो, मल्टिप्लेक्समधील मेगास्क्रीनप्रमाणे हे सर्व लेख तुमच्या डोळ्यांचे अन हृदयाचे पारणे फेडणार यात मला कुठलीच शंका नाही.

या पुस्तकाच्या शीर्षकाविषयी माझे मत मांडते. यात आनंदाच्या वाटाच वाटा आढळतील. कुठलेही पान उघडा, ३-४ पानांत आनंदाचे दार उघडलेलं दिसणार. आपण फक्त चालायचे काम करा (चालण्यावर देखील एक धडा हाय! चालतंय की म्हणून, न चालणाऱ्यांसाठी खास आहेर!) आणि सरांच्या ऋजू व्यक्तिमत्वासमान मृदू, मुलायम भाषेत सूचना आहेत. (त्यांचा आवाज ऐकायला मिळाला असता तर तलत सारख्या असे म्हटले असते) योग, व्यायाम, सामाजिक कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि बरंच कांही!

आपण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रकृती, तसेच या पुस्तकातील व्यक्तिरेखांनी त्यांच्या प्रेरणादायक आयुष्यात आनंद शोधलाय. काहींच्या जीवनात अपार दारिद्र्य, हाल, कष्ट, मेहनत, या सर्वांत देखील आनंद असतो हे या पुस्तकाच्या वाचनातून कळले. मला तर हे पुस्तक वाचतांना असे वाटले की आपण एका अत्यंत रमणीय अशा उपवनात विहार करतोय! त्यात दिसलेत काटेरी विविधरंगी गुलाब, जाई-जुई या जुळ्या बहिणी, रंगीबेरंगी शेवंती, नाजूक पारिजातक, धुंद गंध असलेला सोनचाफा, कमलिनी आणि कुमुदिनी वगैरे वगैरे, एक विसरले: बकुळीची नाजूक फुले देखील दृष्टीस पडली की! यांच्या मनमोहक रंगांचा अन मनोवेधक गंधांचा किती अन कसा आस्वाद घ्यावा हा प्रश्नच होता. पण एकदा उपवनाची मालकी मिळाली की, कधीही अन कितीही वेळा हे अवर्णनीय सुख अनुभवता येईल याचा आनंद आहे. अन शेवटी जाता जाता आठवले ते निराळेच, या उपवनाची हिरवीजर्द वाट चाळीगावावरून सुरु झाली, दूर-दूर गेली आणि परत मुक्काम पोस्ट, आनंदाचे गाव, म्हणजे चाळीसगावातच येऊन थांबली की!

विश्वकर्मा पब्लिकेशन्सनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक विकत घ्या, वाचा आणि दुसऱ्यांना भेट द्या, हेच आजच्या दिनाचं आनंदवनभुवन समजा!

धन्यवाद!

पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments