श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ रानपाखरू – भाग ३ –  लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

 (मागील; भागात आपण पाहिले – तिनं पार पक्कं ठरीवलं.संध्याकाळची हुरहूर सोडली तर संगी परत घरात हसूखेळू लागली. तिला हसतांना पाहून आतीचा बी जीव भांड्यात पडला.तवर मामाबी दुसऱ्या स्थळांच्या तपासाला लागले. आता इथून पुढे )

येता दिस नव्यासारखा सुरू झाला.

दोघी फुईभाच्यांनी मिळून लोनच्याची तयारी केली.आख्खा दिवस आडकित्त्यानी कैऱ्यांच्या फोडी करन्यात गेला .फोडी साफ करून मिठाचं पानी काढून टाकून हळदमीठ लावून वाळाया घातल्या. करकरीत फोडी आता जरा मऊ पडल्या.

पुढच्या खोलीच्या दाराचे दोन्ही कान उघडल्यावर उन्हाचा कडोसा हक्कान आतमंदी आला व्हता.त्या कडोश्यात न्हालेल्या फोडी हळदूल्या दिसत व्हत्या. जसजसं ऊन चढत गेलं तसतसं फोडींनी अंग चोरलं. आतीच्या कुंकवावानी रंगाच्या लुगड्यावर त्यांचा पिवळा रंग लय तेज दिसत व्हता.

तेवढ्यात त्या समद्या लालपिवळ्या वाळवनावर येक परकरी सावली पडली. जोडीदारीन आली व्हती..

हातात गोधडीचा बोजा.

आती आणि संगीला मोहऱ्या निवडतांना पाहून ती घुटमळली आन हळूच म्हनली,

“मावशे!! संगीला घडीभर पाठवती का माझ्याबरबर  नदीवर?”

आतीनं जरावेळ विचार केला..

“अं..येवढा का गं उशीर आज पान्याला?

बरं जा घेऊन तिला. पन तिन्ही सांज व्हायच्या आधी येऊन लागा बर्का.जा गं संगे! तुझा मामा किर्तनातून परत यायच्या आदी ये “

“हुं” म्हनत हातातलं ताट परातीत सारून संगी पटकन उठली. आतीलाबी वाटलं,

 ‘तेवढाच जीव रमंल पोरीचा.’

दोघी नदीच्या वाटंला लागल्या.जोडीदारीन संगीला उगीच इकडचा तिकडचा विषय काढून बोलतं करायचा प्रयत्न करीत व्हती.संगी वरवर समदं ठीक असल्यासारखं बोलत व्हती.पन अंमळशानं तिचा आतीमामांसमोर घातलेला आनंदी मुखौटा चिरफाटला.जोडीदारनीला समदं समजत व्हतं.

“संगे!! तुला कळलंच असंन ना?”

“काय गं?”

“शिंदेसायबाच्या मोठ्या पोरीचं जमलं म्हनत्यात.”

यदौळ खालमानेनं चालनाऱ्या संगीनं चमकून वर पायलं.तिच्या चेहऱ्याची थरथर व्हवू लागली. निसतंच कानावर पडनारं बोलनं आता थेट काळजात शिरलं व्हतं..जखम करीत व्हतं.ती काई बोलली नाई. आशेचा बारकासा धागाबी तटकन तुटून गेला.काळजाच्या डव्हात गरगरत दिसेनासा झाला.

जराशानं संगीनं मोठा श्र्वास घेतला,सुटल्यासारखं हसली. तिनं मनाच्या पाटीवरून मागल्या ऐतवारचा परसंग पार पुसून टाकला.पैल्यासारख्या..पार पैल्यासारख्या गप्पा सुरू केल्या.जोडीदारनीला हायसं वाटलं.

नदीकाठची त्यांची नेहमीची गप्पांची जागा जवळ आली .दोन काळेभोर ,मोठाले दगड..त्यांच्या बाजूला चाफ्याची चारदोन झाडं जीव खाऊन फुलल्याली.जुन्यापान्या झाडांचा वाळला पाचोळा साऱ्या वाटंवर पायाखाली इथूनतिथून गालिचासारखा अंथरलेला.पोरींच्या पायतळीच्या रेषा त्या वाटेला ठावकी व्हत्या. भुईचंपा,पळशी,पाचुंद्याची फुलं उन्हाला वाकूल्या दाखवीत व्हती. समद्या झाडांवर पिवळ्या,पोपटी,हिरव्या रंगांच्या पानांचे पक्षी अंगभर फुल्लारलेले.नदीवरून गार गार वारं येत व्हतं.मातीचा वल्ला वास मनाचा ताबेदार झाला व्हता.सोबत पाखरांच्या गप्पा..

नदीमायच्या साक्षीनं दोघी गूज बोलू लागल्या.गोधडीला धुता धुता मनबी निर्मळ झालं जनू.

गोधडी वाळू घातल्यावर दोघीही कातळावर ओनावल्या.पाय नदीच्या पान्याबरबर नाचत व्हते.पैंजनं गानी म्हनत व्हती.वल्लं शरीर कातळाच्या खरबरीत पन मायाळू पाठीवर सैलावलं .दोघींचेबी डोळे निळ्या आकाशात ढगांच्या कापूसगोंड्यांकडं टुकूरटुकूर बघत व्हते..     जरावेळ पाठीचा काटा मोडल्यावर जोडीदारीन म्हनली, “संगे चल आपून तो जुना खेळ खेळू…कपच्यांचा.बघू कुनाची कपची नदीवर जास्त उड्या मारती??”

निळ्या आकाशाकडे बघतांना निळ्याच डोळ्यांची मालकीन झालेली संगी निळाईचा हात धरूनच म्हनली,

“चल.”

दोघींच्या चेहऱ्यावर हसन्याचं खुळं फूल उमललं.दोघींनीबी खेळासाठी बऱ्याच कपच्या शोधून   आनल्या.चढाओढीनं नदीच्या डव्हाचा तलम पदर छेदू लागल्या. आधी आधी घटकेत बुडी मारनाऱ्या कपच्या जुन्या दिसांची शपथ आठवल्यावर पान्यावर नाचू लागल्या.तो तो पोरींच्या हसण्याला उफाळ आला.संगीची कपची तर दोन दोन डुबक्या घेत लांबवर पळत व्हती‌.जोडीदारनीला तर काई जमंना.ती फुरंगाटली,

“संगे!! तुझी कपची कसं काय बरं दोन डुबक्या मारती? माझी तर बळंबळं येवढीतेवढी येक उडी मारती आन् खुशाल बुडी घेती बघ..आता गं?”

तेवढ्यात मागून एक कपची तीरासारखी सरसरत आली आन नदीच्या पदराशी नाजूक छेडखानी करीत तीन डुबक्या मारीत दुसऱ्या तीराच्या दिशेनं  गेलीबी. दोघींनाबी काई सुधरलंच नाई. संगीच्या हातातली कपची तशीच व्हती.येवढा नेम कुनाचा बरं? असा आचार करून दोघींनी मागं वळून पाह्यलं.

“काय जमतंय का?” पल्लेदार पुरूषी आवाज आला. मिशीच्या आकड्यावर ताव भरत कूनाचीतरी रांगडी आकृती कातळावर येक पाय ठिवून उभी व्हती.त्याच्या दंडावर तटतटलेले स्नायू संगीच्या नजरेत भरले…

पुन्यांदा.

महिपतरावाचा पोरगा समोर ऐटीत उभा व्हता.जोडीदारीन म्हनली,

“अगं हा तर ऐतवारी आलेला पावनाच दिसतोय..”

संगीनं वळखलं नवतं थोडंच? तिनं तिच्याबी नकळत त्याच्याकडं रोखून बघितलं आन तिची नजर खाली झुकली.तळव्यात घट्ट धरलेली कपची घामेजून चिंब झाली.तिच्या मनात राग व्हताच आन त्याच्या नजरेचा मागबी..

डोळे नको भरायला म्हनून ती मासूळीसारखी तडफडत व्हती.जोडीदारीन त्यांची जुगलबंदी बघत हलकंच चार पावलं मागं सरकली ..सुर्यातळी पाठ करून असलेल्या जोडीदारनीची सावली लांबत गेली.

दोघांमधील जडावल्या बाईसारखी शांतता येकदाची बाळंतीन झाली.संगी रागं भरलेल्या आवाजात बोलली ,

” तुमचं लगीन जमल्याचं साखरपान वाटायला आलात व्हय इथं? शिंदेसायबाचं दुकानातले आयतं बुंदीलाडू आमच्या आदबूनिदबू केलेल्या पुरनपोळीवर भारी पडलं म्हनायचं..”

संगीच्या रागाची आगवळ सुटली होती.तिनं मनातलं गरळ वकून टाकलं आन तोंड पुन्यांदा शिवून टाकलं.. पन दोन्ही डोळ्यांची तळी तिच्या आवरन्याला न जुमानता खळ्ळकन भरून आली. गुलाबपाकळ्यांवानी असलेल्या पातळ नाकपुड्या थरथरू लागल्या.जिवनी बारीक पोरावानी बाबर ओठ काढती झाली.

समोरच्या राकट चेहऱ्यावर आता खट्याळ हसू फुललं व्हतं.त्यादिवशीचं बुजऱ्या हसन्याचं ठिगळ कुडल्याकुडं पांगलं व्हतं.

“अस्सं झालंय व्हय?’

‘ हुं!  तुमाला कोनी सांगितलं ह्ये?”

संगीनं मागं वळून पाह्यलं.तिचे डोळे जोडीदारनीला शोधत व्हते.

“तिकडं काय बघताय? मी सांगितलं तर जमंल ना?”

पोरगा पुन्हा एकदा खोडकर हसला.संगीची सैरभैर नजर पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर गुतली.. त्याच्या गालावरच्या खळीत घट्टमुट्ट अडकून बसली.

“अवो बाईसाहेब!! शिंदेसायबाच्या पोरीची ष्टाईल या गावरान गड्याला कवा रूचायची? शेताच्या बांधावरनं फिरता फिरता तिचं तंगडं मोडाया बसलंय…शेहरातली मड्डम ती. माज्या गळ्यात पट्टा बांधून दाराशी बांधायजोगी..

………..

गावच्या यड्याला गावचंच कोन तरी खूळं मानूस पायजेल…नाय का? जे मानूस गड्याच्या मातकट हातानं खुडलेली चिच्चाबोरं न लाजता खाईल.. शेनामुताचा वास येतो म्हनून पावडरीनं धूत बसनार नाय…” येक गडगडाटी पन मायाळू हसू नजर खाली झुकलेल्या संगीला ऐकायला आलं..तिच्या नजरंसमोर त्याचा मर्दानी हात आला. त्या मोठाल्या तळव्यातली चिच्चाबोरं पाहून संगी हरखली.यदौळ रडू येऊ नाई म्हनून तिनं शिकस्त केली व्हती पन आता मातूर डोळ्यातलं पानी थांबायचं नाव घेत नवतं.दुसऱ्या तळव्यात खाऱ्या पान्याचं तळं भरत चाललं व्हतं.मनातल्या रानपाखरांच्या पंखात आता बेगुमान वारं भरलं व्हतं… 

– समाप्त – 

लेखिका – डॉ. क्षमा शेलार

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments