श्री व्यंकटेश देवनपल्ली

अल्प परिचय 

श्री व्यंकटेश देवनपल्ली, एम् ए. एल.एल.बी.

बॅंकेतील एक्केचाळीस वर्षाच्या सेवेनंतर असिस्टंट जनरल मॅनेजर पदावरून सेवानिवृत्त. मातृभाषा तेलुगु. शिक्षण मराठी माध्यमातून. मूळ सोलापूर. सध्या बेंगलुरू येथे वास्तव्य व वकिली व्यवसाय.  

श्रीकृष्णदेवराय रचित ‘आमुक्तमाल्यदा’ ह्या तेलुगु काव्यप्रबंधाचा मराठी व हिंदी गद्यानुवाद, साहिती समरांगण सार्वभौम- श्रीकृष्णदेवराय (चरित्र ग्रंथ), राजाधिराज श्रीकृष्णदेवराय (ऐतिहासिक कादंबरी) व ‘इंद्रधनु’ आणि ‘स्वानंदी’ (लघुकथासंग्रह) प्रकाशित.

? जीवनरंग ❤️

☆ इच्छापूर्ती…– भाग- १☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राघव आणि जानकी पुण्यात हजर होते. श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या छोटेखानी देवळातल्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मंदिरात अखंड रामनाम जप सुरू होता. दुपारी बारा वाजता श्रीरामजन्माचा सोहळा भाविकांच्या जयघोषांत संपन्न झाला.

श्रीरामास अभ्यंगस्नान घातल्यानंतर पाळण्यात घालण्यात आले. ‘राम जन्मला गं सखे.., राम जन्मला!’ हे गीत उपस्थित स्त्रियांनी मोठ्या उस्त्फूर्तपणे गायलं. पुरोहितांनी विधीवत पूजा आणि  पौरोहित्य विधी संपन्न केला. प्रभू श्रीरामांच्या जयघोषांत व गुलालात सगळेच भाविक पूर्णपणे न्हाऊन गेले.

रात्रीच्या भजन-कीर्तनाने रामनवमीच्या महोत्सवाची सांगता होणार होती. वामन शास्त्रीबुवांचे कीर्तन, भजन ऐकणे ही एक मोठी पर्वणी असायची. त्यांच्या कीर्तनात सगळंच असायचं. उत्तम वक्तृत्व, संगीत, काव्य-नाट्य-विनोद यांचा अंतर्भाव असायचा. धर्मशास्त्रातला त्यांचा दांडगा व्यासंगच सर्व श्रोत्यांना बांधून ठेवायचा. कीर्तनाला खचाखच गर्दी असायची. त्यांचं निरूपणही तसंच गहन गंभीर असायचं.  परंतु क्षणभरात एखादी विचारज्योत पेटवून, ते मिट्ट काळोखात हरवलेल्या श्रोत्यांच्या अंत:करणात प्रसन्न प्रकाश पसरवत असत. राघवला आज बुवांच्या कीर्तनासाठी थांबता येणार नव्हते. जानकीला दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत हजर व्हायचं होतं. रात्री साडेआठच्या सुमारास ते दोघे कारने पुण्याहून कोल्हापूरकडे निघाले. रस्त्यात शुकशुकाट होता. घुप्प अंधारातून गाडी वेगाने निघाली होती. काहीतरी बोलावं म्हणून जानकीनं विचारलं, “राघवा, आज काय मागितलंस श्रीरामाकडे?” गीतरामायणातील गदिमांची अलौकिक शब्दकळा आणि बाबूजींचे स्वर्गीय सूर यात हरवलेला राघव क्षणभरात भानावर आला आणि स्मितहास्य करीत म्हणाला, “जानकी, तुला ठाऊक आहे. मी श्रीरामाकडे कधीच काही मागितलं नाही. मागणारही नाही. मी आज जो काही आहे, तो श्रीरामामुळेच आहे. मी फक्त त्याचे आभार मानतो. माझा राम अंतर्यामी आहे. मला काय हवंय, ते त्याला पक्कं ठाऊक असतं. असो. आपण निम्म्या रस्त्यावर आलो आहोत. पुढचा रस्ता थोडा कच्चा आहे. थोडे सावकाश जावे लागेल.” 

का कोण जाणे, जानकीला आज थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. तिच्या मनात उलटसुलट विचार येत होते. अशा किर्र अंधारात गाडी बंद पडली तर… आसपास कुणी मदतीला धावून येणार नव्हता. तिच्या मनात शंकाकुशंका घोळत होत्या आणि अचानक कारच्या एका बाजूला खडखडल्यासारखं झालं.

राघवनं गाडी बाजूला घेतली. पाहिलं तर काय, समोरच्या एका चाकाचं टायर पंक्चर झालं होतं. अवतीभवती काहीच दिसत नव्हतं. तितक्यात पावसाची भुरभुरही सुरू झाली. डिक्कीतून जॅक आणि स्पॅनर काढून मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये राघव टायर काढण्याचा प्रयत्न करत होता. बोल्ट घट्ट झाले होते. काही केल्या फिरत नव्हते. तितक्यात मोटारसायकलवरून जाणारे दोघे आडदांड युवक येऊन थांबले. त्यांनी विचारलं, “काय झालं काका?”

टायर पंक्चर झाल्याचं राघवनं सांगितलं. ते आपणहून म्हणाले, “आम्ही काही मदत करू शकतो का?”

जानकीला मात्र मनातून भीती वाटत होती. कोणी चोर दरोडेखोर असतील तर काय करायचं? ती हळूच बाहेर आली. त्या मुलांनी सांगितलं, “काकू तुम्ही आतच बसा. तुमच्या हातातला मोबाईल द्या. त्या उजेडात लगेच स्टेपनी लावून देऊ.”

‘मोबाईल आणि तो कशाला?’ या विचारानं जानकीच्या मनात धडकीच भरली. तिने नाईलाजाने मोबाईल दिला. त्या दोघा बलदंड युवकांनी घट्ट झालेले बोल्ट ढिले केले. काही वेळातच स्टेपनी बदलली आणि मोबाईल परत केला. जानकीने त्यांना देण्यासाठी पर्समधून आधीच पाचशेची नोट काढून ठेवली होती. युवकांनी पैसे घेण्यास नकार दिला.

“आम्हाला काही द्यायची तुमची इच्छा असेल तर इथे देवळात चाललेल्या कीर्तनाला थोडा वेळ तरी हजेरी लावून जा.” असं म्हणताच राघवने जानकीकडे पाहिलं आणि त्यांची कार निमूटपणे त्या मोटरसायकलच्या पाठोपाठ निघाली. लगतच असलेल्या रामाच्या देवळाजवळ जाऊन पोहोचले. राघव आणि जानकी आत गेले.

कीर्तनकार बुवांनी नुकतीच सुरूवात केलेली होती. गुराखी कसं चुकार गुरांना चुचकारत घराकडे वळवत असतो, तसं श्रोत्यांना धार्मिक प्रवचनाकडं वळवायचं होतं म्हणून बुवांनी सगळ्यांना भजनात ओढलं.

“म्हणा, रघुपति राघव राजाराम। पतितपावन सीताराम… सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालग्राम ॥” सगळे श्रोते गाण्यात तल्लीन होऊन गेले.

त्यानंतर बुवा बोलायला लागले, “ज्या श्रीरामचंद्रांनी त्यांच्या जीवनातून जगण्याचा आदर्श निर्माण केला, त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण जमलो आहोत. श्रीरामभक्ती आणि श्रीरामकथा ही आपल्यासाठी जगण्याची एक ताकद देते….” 

बुवा श्रोत्यांच्या अंतरंगाला हात घालत होते. एक एक ओवी बुलंद आवाजात ऐकवत होते. पाठोपाठ निरूपणही करीत होते. हळूहळू गर्दी वाढत होती. विशेष म्हणजे त्यात युवकांचीही संख्या मोठी होती. पण त्यात ते दोघे युवक मात्र कुठेच दिसत नव्हते.

समोर बसलेल्या एका आजोबाने मधेच विचारलं, “बुवा, श्रीरामाचं दर्शन होतं का हो?”

त्यावर बुवा हसून म्हणाले, “आमचे कीर्तनकार गुरू वामनशास्त्री म्हणतात की जवाहिऱ्याचं दुकान थाटायचं असेल तर भक्कम भांडवल लागतं. त्यासाठी चणेदाणे, लाह्या करून विकणाऱ्या भडभुंजाचं भांडवल असून चालत नाही. काया-वाचा-मनसा रामाला भेटण्याची अनिवार ओढ, तळमळदेखील तेवढीच भक्कम असावी लागते. फार कशाला, तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून सांगा. या रामाच्या देवळात वर्षभरात दर्शनासाठी किती वेळा आलात? मला वाटतं, आजच रामनवमीच्या दिवशी आलात! जागोजागी असलेली मारूतीरायांची देवळे बघा. कशी वर्षभर तुडुंब भरलेली असतात. कशासाठी? तर प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती घर करून बसलेली आहे. भीतीचं निर्मूलन फक्त मारूतीरायाच करू शकतात, या श्रद्धेपोटी लोक त्यांच्या देवळात जातात. प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे मर्यादापुरुषोत्तम. त्यांनी धैर्य, शौर्य, स्नेह, त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठेचं महत्व दाखवून दिलं. जिथे श्रीराम आहेत तिथे मारूतीराया निश्चित असतात. समर्थ रामदासस्वामी, भद्राचलमचे भक्त रामदासु आणि तुलसीदासजी यांच्या ठायी ती ओढ, ती तळमळ होती म्हणूनच त्यांना श्रीरामचंद्र प्रभूंचे दर्शन झाले.

समर्थ रामदासस्वामी त्यांच्या एका हिंदी रचनेत म्हणतात, “जित देखो उत रामहि रामा। जित देखो उत पूरणकामा।” तर भद्राचलमचे भक्त रामदासु म्हणतात की “अंता राममयम, जगमंता राममयम अंतरंगमुना आत्मारामुडु। अंता राममयम..” तुलसीदासजींनी “सिय राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी॥“ ही चौपाई लिहिली. या प्रभृतींना संपूर्ण विश्वच श्रीराममय झाल्याचे जाणवत होते, तेव्हा कुठे त्यांना श्रीरामचंद्रप्रभू भेटले. यावरून तुलसीदासजींची एक गंमतीशीर गोष्ट आठवलीय. ऐका तर.

क्रमश: – भाग १

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments