श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मातीची ओढ… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली   

(पण एखाद्याला सोन्याचे अंडे खाण्यापेक्षा कोंबडीच कापून खायची असेल तर त्याला कोण काय करणार?)  इथून पुढे —–    

“सदाकाका, आम्हाला शेती करण्यात इंटरेस्ट नाहीय. इथे एकरी चार लाख रूपये भाव चालला आहे असं ऐकलंय. बारा लाख रूपये येतील. विकणेच रास्त ठरेल.” सुधीरने सांगून टाकले.

“ही शेतजमीन बाहेरच्या कुणालाही विकू नये अशी आमच्या आबांची इच्छा होती.”

“ठीक आहे, मग बारा लाख रूपये देऊन तुम्ही विकत घ्या.”

आक्का आणि काशिनाथकडे पाहत सदाभाऊ म्हणाले, “ठरलं तर. पुढच्या आठवड्यात सौदा पूर्ण करू. आमच्या एका भावानं आपला हिस्सा विकून खाल्ला आहे असं गावात बभ्रा व्हायला नको म्हणून विक्रीपत्राच्याऐवजी दानपत्र करून घेऊ. दुसरी अट, यापुढे किसन आमच्याबरोबर इथेच राहील. मंजूर असेल तर बोला.” किसनरावांना एका शब्दानंही न विचारता सुधीर आणि अविनाश यांनी दोन्ही अटी मान्य करून टाकल्या. विशाखाच्या डोळ्यांत पाणी तरारलं. किसनरावांनी मायेनं विशाखाच्या पाठीवर हात ठेवला.

किसनरावांच्या शेतजमीनीची विक्री वा दानपत्र करण्यासाठी सुधीर आणि विशाखाकडून रीतसर संमतीपत्र तसेच किसनरावांच्या नावाने योग्य ते कुलमुख्त्यारपत्र लिहून रजिस्टर करून घेतलं. सदाभाऊ, आक्का आणि काशिनाथ या तिघांनी मिळून बारा लाख दिले. दानपत्र केलंच नाही, किसनरावांचं नांव सातबाऱ्यावर तसंच राहिलं. ते नियमितपणे शेतात जाऊन शेतीची कामं बघायला लागले. अकाउंटिंगच्या आणि बॅंकेच्या कामात काकांच्या रूपाने प्रशांतला मोठा आधार मिळाला.

अविनाशचं क्लिनिक सुरू झालं. सुधीरनं फ्लॅट बुक केला. बघता बघता दोन वर्षे सरून गेली. विशाखा आठवड्यातून एकदा तरी फोन करत होती. सुरूवातीला सुधीरचे येणारे फोन कमी कमी होत गेले. वाड्यावर किसनरावांची सर्वचजण काळजी घ्यायचे. त्यांना त्यांच्या नातवंडांची आठवण यायची.

अलीकडेच त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला. एकदा फोनवर बोलताना ही गोष्ट विशाखाच्या लक्षात आली. “बाबा, आधीच फोन करायचं होतं ना. तुमचे जावईच डॉक्टर आहेत. मी तुम्हाला घेऊन जायला आले असते.”

किसनरावांनी सांगितलं, “बेटा, मला काहीही झालं नाही. प्रशांतने शहरात नेऊन सगळ्या टेस्ट्स करवून घेतल्या आहेत. औषधोपचारदेखील चालू आहे.”

विशाखाने सदाकाकांशी बोलून घेतलं. ‘दोनच दिवसात परत पाठवणार असशील तरच किसनला येऊन घेऊन जा.’ असं सदाभाऊंनी स्पष्टच सांगून टाकलं.

विशाखाने लगोलग सुधीरला फोनवर सांगितलं, ‘सुधीर, बाबांची तब्येत बरी दिसत नाहीये. उद्या सुटीच आहे. सकाळी लवकर ये. आपण जाऊन बाबांना काही दिवसासाठी इकडे घेऊन येऊ.’

सकाळी दोघे कारने गावाकडे निघाले. बाबांना परत आणण्याच्या कल्पनेनेच सुधीर अस्वस्थ झाला होता. अखेर त्यानं तोंड उघडलं, “ताई, बाबांच्या तब्येतीच्या दृष्टिने त्यांनी गावातच राहणं चांगलं आहे. इकडे कशाला बोलावते आहेस? तुला माहीत आहे की मी भाड्याच्या घरात राहतो ते. माझ्याकडे जागा कुठे आहे? बाबांना तुझ्याकडेच का घेऊन जात नाहीस? औषधोपचारासाठी तुमच्याकडे क्लिनिकही आहे.”

विशाखाला सुधीरचं बोलणं आवडलं नाही. पण तिने विचार केला, अविनाशने तर रूग्णांच्या सेवेचंच व्रत घेतलं आहे. पितृतुल्य सासऱ्यांना तो थोडंच नाही म्हणणार आहे?  “बरं, मी घेऊन जाईन. झालं.” विशाखा ठसक्यात म्हणाली.

खूप दिवसांनी बाबांना पाहिल्यावर विशाखाच्या डोळ्यांत पाणी आलं. किसनराव म्हणाले, “वेडाबाई मला काहीही झालं नाही. हे रिपोर्ट्स बघ आणि ही औषधे.”

“बाबा तुम्हाला इथे काही कमी आहे म्हणून आम्ही न्यायला आलो नाही. तुमची तब्येत बरी नाही हे ऐकून सुधीरही अस्वस्थ झाला होता आणि तुमचे जावई तुम्हाला घेऊन या म्हणून आग्रह करीत होते म्हणून आम्ही आलो.” विशाखाने रेटून सांगितलं. दुपारच्या जेवणानंतर किसनरावला घेऊन विशाखा आणि सुधीर निघाले.

सुधीरची मुलं आतेभावांना भेटायला म्हणून विशाखाच्या घरीच आली होती. सगळ्यांच नातवंडांना एकत्र पाहून किसनराव खूप सुखावले. थकवा वाटत असल्यामुळे जेवण करून ते झोपायला गेले.

अविनाश क्लिनिकहून उशीरा आले. जेवणं झाल्यानंतर विशाखाने अविनाशला सहज सांगितलं, “अहो, सुधीरचा फ्लॅट लहान पडतो म्हणून मी बाबांना आपल्याकडेच घेऊन आले आहे.”

त्यावर अविनाश एकदम भडकला, “इथे का आणलंस? तुझ्या बाबांना सांभाळण्याची जबाबदारी तुझ्या भावाची आहे. फ्लॅटसाठी पैसे घेताना त्याला लाज वाटली नाही. उद्या सकाळीच त्यांना सुधीरच्या घरी पाठव. त्याला जमत नसेल तर वृद्धाश्रमात दाखल कर म्हणावं. माझे बॅंकेचे लोन फिटताच मी घेतलेले पैसे परत करीन, हे तुझ्या बाबांना सांग. कळलं?”

विशाखा पहिल्यांदाच अविनाशचं हे वेगळं रूप पाहत होती. “अविनाश, तुम्ही रात्रंदिवस रूग्णांची इतकी सेवा करीत राहता म्हणून त्यांना चार दिवस इकडे आणलं होतं. तुमच्या मनांत, घरात माझ्या बाबांच्यासाठी काहीच का स्थान नाही? बरोबर आहे म्हणा, इतर रूग्णांची सेवा केल्याने तुम्हाला पैसे मिळतात. हे मी विसरलेच. आणि हो, माझ्या बाबांचे पैसे परत करायचं म्हणत होता, जेंव्हा त्यांचे पैसे परत कराल त्यावेळी पैसे घ्यायला ते असतील की नाही हे त्या देवालाच माहीत. नोकरी सोडायला लावून तुम्ही माझे पंख कापून टाकलेत. आता एक अगतिक कन्या आपल्या बापासाठी तरी काय करणार म्हणा.” असं म्हणून विशाखा पटकन तिथून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश क्लिनिकला गेल्यानंतर नाष्टा घेऊन विशाखा बाबांच्या खोलीत गेली. किसनराव सामान बांधूनच बसले होते. “बेटा, काल रात्रीचं तुमचं बोलणं ऐकलंय मी. माझ्यामुळे तू आपल्या संसारात विष कालवू नकोस. मायेची ऊब आणि आपुलकीचा ओलावा गवसत नसल्याने शहरातील बरीचशी वृद्धमंडळी मुळातच खुरटल्यासारखी दिसतात. गजबजल्या गोकुळात असून देखील एखाद्या वृद्धाश्रमात असल्यासारखे ते एकाकीच असतात. मला जाऊ दे.

घाबरू नकोस मी काही वृद्धाश्रमात जाणार नाहीय. कुणी शेतकरी बापडा वृद्धाश्रमात असल्याचं मी तरी आजवर ऐकलेलं नाही. गावाकडे माझी भावंडं माझी आतुरतेने वाट पाहताहेत. मला माझ्या मातीच्या मायेची ओढ लागून राहिलीय. टॅक्सी बोलावून घे. मी जाईन.” विशाखा स्वाभिमानी बाबांची संवेदनशीलता जाणून होती.

घरासमोर एक टॅक्सी येऊन थांबली. अगदी अकल्पितपणे टॅक्सीतून प्रशांत उतरला. “ताई, काका आहेत का ग?” असं म्हणत आत आला.

किसनराव बॅग घेऊन हसतच बाहेर आले. “प्रशांत गावाकडे चाललास ना?  बेटा, मला इथे करमत नाही. चल मी येतो.”

विशाखाच्या डोक्यावर आशिर्वादाचा हात ठेवून किसनराव टॅक्सीत बसले. सुधीरने बाबांच्या तब्येतीची चौकशीही केली नाही. आपलं काळीज ज्या जावयाच्या हातात सोपवलं होतं, तो जावई किमान सासऱ्यांना भेटला  देखील नाही. ‘बाबा इथे आरामात रहा, जायची घाई करू नका’ किमान असं तोंडदेखलं तरी बोलून तरी अविनाशने बाबांचा मान राखायला हवा होता. दोनच दिवसांचा प्रश्न होता. बाबा कुठे इथे आयुष्यभर राहायला आले होते?’ असं विशाखाला वाटून गेलं.

बाहेर नुकताच पाऊस पडून गेला होता पण या विचारांच्या वावटळीत, अगतिक विशाखाच्या डोळ्यांतला पाऊस मात्र थांबतच नव्हता.

— समाप्त — 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments