चित्रकाव्य
माया काही संपत नाही… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि सौ गौरी गाडेकर ☆
☆
श्री आशिष बिवलकर
(१ )
बसवला नातू खांद्यावर,
आजा आनंदात मिरवीत !
पिढ्यानं पिढ्या हेच चाले,
वारसाचा कित्ता गिरवीत !
☆
एक आयुष्याच्या संध्याकाळी,
अस्ताला चाललेला दिनकर !
दुसरा केशरी प्रभा घेऊन,
उगवलेलला कोवळा प्रभाकर !
☆
आयुष्याचे ऊन पावसाळे झेलून,
एक अनुभवाने झुकलेला वृक्ष !
दुजा बिजातून अंकुरलेला,
उज्वल भविष्याची देणार साक्ष !
☆
दोन टोकाच्या दोन पिढ्या,
पण नाते ते आपुलकीचे !
एक दुजाकडे डोळे लावलेले,
त्यांच्या वयातल्या करमणुकीचे !
☆
आजा देई नातवाला,
संस्काराची शिदोरी !
कोवळ्या वेलील्या,
सुकल्या काठीची उभारी !
☆
कष्टाने रखरखलेले हात,
नातवाला कधीच बोचत नाही !
काळजी घेणारे मांजराचे दात,
तिच्या पिलाना कधी टोचत नाही !
☆
म्हातारपणात बालक होऊन,
बालकासंगे आनंदात खेळावे !
दुसरेच असते ते बालपण,
आनंदी क्षणांचे मध घोळावे !
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
( २ )
आज्याचे हात निबरलेले
नातवाला टोचत नाहीत
केससुद्धा आधार देतात
माया काही संपत नाही. —
☆
चष्म्या मधून रस्ता पहात
जपून आजा चालत राही
मायेच्या या गाठोड्याला
जीवापरी जपत राही —
☆
सरती पिढी वारसाला
डोक्यावर बसून घेई
आपल्यापेक्षा मोठा हो
कृतीतून सांगत राही —
☆
दुधापेक्षा साय मऊ
स्नेह तिथे गोळा होई
क्षण क्षण आनंदाचा
जाता जाता जगून घेई —
☆
एक नागडा दुसरा उघडा
कुणाला काही वाटत नाही
माया असते काळजात
तिथे कापडाची गरज नाही —
☆
दोघांचही बालपणच
दोन टोकं जीवनाची
भूपाळी ती एकाची नि
भैरवी ती दुसऱ्याची —
☆
कवी : एक अज्ञात डाॅक्टर
प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈