सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ फिनिक्सकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

जीवनात चढउतार येतात, मानापमानाचे खेळ सुरू असतात. बरेचदा अपयश, बदनामीमुळे मानसिक, शारीरिक होरपळ होते. यातूनही नव्या जिद्दीने पुन्हा उभे रहात नवा डाव सुरू होतो. अशाच एका जिद्दी, नव्या उमेदीने पुन्हा डाव मांडणाऱ्या माणसाचे मनोगत डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ‘फिनिक्स’ या कवितेत मांडले आहे. तिचाच आज आपण रसास्वाद घेणार आहोत.

फिनिक्स  कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆

पुनःपुन्हा पुनःपुन्हा

तोच अनुभव, त्याच ज्वाळा

पेटून निघालोय अंतर्बाह्य

शरीराने अन् मनानेही

……….. नकळतच!

 

क्षणभर बरं वाटलं

अजूनही मन शिल्लक आहे तर …..

            ….. जिवंत आहे

विश्वासच बसत नव्हता!

 

हे सुखही क्षणभराचंच

दुर्लक्ष करता येत नव्हतं

बसणाऱ्या चटक्यांकडे

अन् होरपळून निघालो

याच ज्वाळांच्या

भाजून काढणाऱ्या आठवणींनी!

 

आता मात्र ठरवलंय

जळून खाक व्हायचं

            ….. नेहेमीसारखंच

पण यावेळी मात्र

उठायचं नाही परत फिनिक्ससारखं

पुन्हा भाजून घ्यायला

अन् पुन्हा जाळून घ्यायला!

 

का केलास मग तो

हळुवार संजीवन स्पर्श

माझं मन आणि शरीर

जळून उरलेल्या

या तप्त राखेला

पुन्हा एकदा जन्म द्यायला

एका नव्या फिनिक्सला?

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

पुन:पुन्हा पुन:पुन्हा

तोच अनुभव, त्याच ज्वाळा

पेटून निघालोय अंतर्बाह्य

शरीराने अन् मनानेही

…. नकळतच !

आयुष्यात अपयशाचा, संकटांचा पुन्हा पुन्हा तोच दाहक अनुभव मी घेतला आहे. त्या धगीने नकळतच मी शरीराने आणि मनानेही पूर्णपणे होरपळून निघालो आहे.

या कवितेचे शीर्षकच कवितेचे सार सांगत आहे. आपल्याच राखेतून नवा जन्म घेत आकाशात झेपावणारा पक्षी म्हणजे फिनिक्स. पौराणिक कथांमध्ये त्याला अमरपक्षी म्हणतात. स्वतःच्या राखेतून उठण्याच्या क्षमतेमुळे त्याला अमर म्हटले जाते. अशीच विजिगीषू वृत्ती असणाऱ्या एका परिस्थितीशी लढणाऱ्याचे हे मनोगत.

मुक्तछंदात असणारी ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात लिहिलेली आहे. कवी मोकळेपणाने आपण आयुष्यात अनुभवलेले दाहक प्रसंग कथन करीत परिस्थितीशी संवाद साधतो आहे. या अनुभवाने आपण पूर्णपणे गलितगात्र झाल्याचे सांगत आहे. अपयश, बदनामी, प्रेमभंग, अपमान अशासारख्या गोष्टींनी पुन्हा पुन्हा या प्रसंगाला सामोरे जातो आहे. त्याची तीव्रता दाखवायला नुसते पुन्हा पुन्हा असे न लिहिता पुन:पुन्हा पुन:पुन्हा असा प्रभावी शब्दप्रयोग केलेला आहे.

क्षणभर बरं वाटलं

अजूनही मन शिल्लक आहेत तर…

… जिवंत आहे

विश्वास बसत नव्हता !

या अवस्थेची जाणीव झाली. संवेदना जागी झाली आणि खूप बरं वाटलं. कारण हे जाणवण्या एवढं माझं मन अजून सावध आहे म्हणजे मी अजून जिवंत आहे. पण खरंच माझा यावर विश्वासच बसत नाही.

बसलेल्या कठोर आघाताने आपण जणू निष्प्राण झालो, पूर्ण उमेद खचल्याने धुळीला मिळालो अशीच कवीची भावना झालेली असते. पण संवेदना जागृत आहेत हे लक्षात आल्यावर आपण अजून जिवंत आहोत ही जाणीव त्याला होते आणि थोडसं निर्धास्त पण वाटतं.

हे सुखही क्षणभराचंच

दुर्लक्ष करता येत नव्हतं

बसणाऱ्या चटक्यांकडे

अन् होरपळून निघालो

याच ज्वाळांच्या

भाजून काढणाऱ्या आठवणींनी !

मी जिवंत आहे या जाणिवेचे सुख क्षणीकच ठरले. कारण त्या दाहकतेने बसणाऱ्या चटक्यांकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं आणि त्यांच्या त्या भयावह आठवणींनी पुन्हा पुन्हा जीव पोळून निघत होता.

अशा जीवघेण्या आघातामुळे होणारे शारीरिक मानसिक त्रास, चटके हे नेहमी दृश्य असतात. ते सोसावेच लागतात. त्यामुळे विसरता येत नाहीत आणि त्यांच्या आठवणी या जास्त त्रासदायक असतात. त्यामुळे आपण आता संपलो असे वाटून आत्मविश्वास रसातळाला जातो.

आता मात्र ठरवलंय

जळून खाक व्हायचं

…नेहमीसारखंच

पण यावेळी मात्र

उठायचं नाही परत फिनिक्ससारखं

पुन्हा भाजून घ्यायला

अन् पुन्हा जाळून घ्यायला ?

आता मात्र मी ठरवलंय असा पुन्हा अनुभव आला की, नेहमीसारखं त्यात जळून खाक व्हायचं. म्हणजेच नेस्तनाबूत व्हायचं. पण आता या राखेतून त्या फिनिक्स पक्षासारखं पुन्हा उठायचं मात्र नाही. पुन्हा होरपळत त्यात नव्याने जाळून घ्यायचं नाही. म्हणूनच आता पुन्हा कसलाही प्रयत्न करायचा नाही. जिवंत असूनही मेल्यासारखे जगायचे.

कवी झालेल्या होरपळीने इतका गलितगात्र झाला आहे की, आता पुन्हा पुन्हा हा अनुभव घ्यायची त्याची तयारी नाही. त्यामुळे त्याने आता पुन्हा उभारी घ्यायचीच नाही. असंच उध्वस्तपण सोसत रहायचं असा निर्धार केला आहे.

का केलास मग तो

हळुवार संजीवन स्पर्श

माझं मन आणि शरीर

जळून उरलेल्या

या तप्त राखेला

पुन्हा एकदा जन्म द्यायला

एका नव्या फिनिक्सला ?

या दाहक आघाताने जणू जळून राख झालेल्या माझ्या तापलेल्या मन आणि शरीराला तू का तुझा संजीवन देणारा स्पर्श केलास ? आता यातून पुन्हा एकदा नव्या फिनिक्सला जन्म द्यायचा काय ?

इथे कवीला कुणीतरी आधाराचा हात देणारे, मानसिक उभारी देणारे, पुन्हा लढण्याचे बळ देणारे भेटलेले आहे. त्यामुळे तो पुन्हा उभा राहतोय. पण त्याला या पुन्हा पुन्हा येणाऱ्या अपयशाची, कटू अनुभवाची जबरदस्त भीती वाटते आहे. त्यामुळे तो त्या सुहृदाला विचारतो, ” का मला संजीवन देणारा तुझा स्पर्श केलास ? का माझी जीवनेच्छा पुन्हा जागृत केलीस ? “

झाल्या आघाताने कवीचे मानसिक खच्चीकरण होते. त्यातून तो सावरतो. पुन्हा उभा रहातो. पुन्हा कोसळतो. त्याची असह्य तगमग होते. ही सारी मानसिक, भावनिक आंदोलने सहजसुंदर शब्दरचनेत मांडण्यात कवी अतिशय यशस्वी झालेला आहे.

या कवितेत फिनिक्स या रूपकाचा खूप छान उपयोग केलेला आहे. परिस्थितीने पूर्ण हतबल झालेला कवी पुन्हा नव्या उभारीने परिस्थितीला सामोरे जात नव्याने डाव मांडतो. यासाठी योजलेले फिनिक्सचे रूपक अगदी यथार्थ आहे.

ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात असली तरी प्रत्येकजणच आपल्या आयुष्यात अशा परिस्थितीला केव्हा ना केव्हा सामोरा गेलेलाच असतो. त्यामुळे ही कविता फक्त एकट्या कवीची न रहाता सर्वस्पर्शी होते. कारण असे अनुभव हे सार्वत्रिक असतात. हे अनन्योक्ती अलंकाराचे छान उदाहरण म्हणता येईल.

माणसाला आयुष्याच्या वाटचालीत कधी शत्रूकडून त्रासदायक आघात, व्यवहारात, व्यवसायात पूर्ण अपयश, मित्रांकडून फसवणूक, जोडीदाराकडून प्रेमात अपेक्षाभंग अशा जीवघेण्या अनुभवांना तोंड द्यावे लागते. तो मोडून पडतो. शारीरिक, मानसिक होरपळ होते. आत्मविश्वास लयाला जातो. अशावेळी एखादा मित्र, एखादा हितैषी, जिवलग, जोडीदार आधाराचा हात देतो. पाठीशी खंबीर उभा राहतो. मनाची उभारी वाढवून पुन्हा लढण्याचे बळ देतो. पुन्हा वाटचाल सुरू होते. पुन्हा अशा अनुभवाची पुनरावृत्ती होते. पण माणसाची दुर्दम्य  इच्छाशक्ती, जबरदस्त जीवनेच्छा गप्प बसू देत नाही. त्यामुळे पुन्हा नव्या उमेदीने तो जगण्याला सामोरा जाण्यास तयार होतो.

अशाच पद्धतीने लढणाऱ्याच्या मानसिक आंदोलनाचा एक सुंदर आलेख कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी फिनिक्स मध्ये मांडलेला आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments