डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १५ (ऋतु सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १५ ( ऋतु सूक्त )

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – १- इंद्र; २- इंद्र; ३- त्वष्ट्ट; ४- अग्नि; ५- इंद्र; ६- मित्रावरुण; ७-१० द्रविणोदस् अग्निः; ११- अश्विनीकुमार; १२- अग्नि

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंधराव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी इंद्र, त्वष्ट्ट, मित्र, वरुण, द्रविनोदस् अग्नि, अश्विनीकुमार आणि अग्नि या ऋतुकारक देवतांना आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त ऋतुसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : 

इंद्र॒ सोमं॒ पिब॑ ऋ॒तुना त्वा॑ विश॒न्त्विन्द॑वः । म॒त्स॒रास॒स्तदो॑कसः ॥ १ ॥

ऋतुंसवे देवेंद्रा येउन सोमरसा प्राशुन घ्या  

तुमच्या उदरा सोमरसाने भरा तृप्त व्हावया 

प्राशन होता सोमरसाला बहू मोद लाभेल 

तुमच्या उदरी सोमरसही कृतार्थ तो होईल ||१||

मरु॑तः॒ पिब॑त ऋ॒तुना॑ पो॒त्राद्य॒ज्ञं पु॑नीतन । यू॒यं हि ष्ठा सु॑दानवः ॥ २ ॥

मरुत देवते सवे घेउनी ऋतू देवतांना 

सोमरसाला अर्पण करितो भक्तीने सर्वांना

पात्रातुनिया पान करावे मधूर सोमरसाचे

दानशूर तुम्ही दाना द्यावे यज्ञा साफल्याचे ||२||

अ॒भि य॒ज्ञं गृ॑णीहि नो॒ ग्नावो॒ नेष्टः॒ पिब॑ ऋ॒तुना॑ । त्वं हि र॑त्न॒धा असि॑ ॥ ३ ॥

यावे उभयता नेष्ट्र देवते अमुच्या यज्ञाला

धन्य करावे आम्हा अमुच्या प्रशंसून यज्ञाला

तुमचा  खजिना अमूल्य रत्ने वाहे ओसंडोनी

ऋतुसमवेत सोमरसाचे घ्यावे पान करोनी ||३||

 

अग्ने॑ दे॒वाँ इ॒हा व॑ह सा॒दया॒ योनि॑षु त्रि॒षु । परि॑ भूष॒ पिब॑ ऋ॒तुना॑ ॥ ४ ॥

देवांना घेउनिया अग्निदेवा यागा यावे

तीन आसनांवरी तयांना विराजीतहि करावे

अलंकार त्यांवरी चढवुनी मोहक सजवावे

सर्व ऋतूंच्या संगे अनला सोमपाना करावे ||४||

ब्राह्म॑णादिंद्र॒ राध॑सः॒ पिबा॒ सोम॑मृ॒तूँरनु॑ । तवेद्धि स॒ख्यमस्तृ॑तम् ॥ ५ ॥

सोमपान करुनीया सारे ऋतू तुष्ट होता

प्राशन करि रे या कलशातुनी सोमरसा तू आता

हे देवेंद्रा तुझी कृपा तर शाश्वत अविनाशी  

प्रसन्न व्हावे आर्जव अर्पण तुमच्या पायाशी ||५||

यु॒वं दक्षं॑ धृतव्रत॒ मित्रा॑वरुण दू॒ळभं॑ । ऋ॒तुना॑ य॒ज्ञमा॑शाथे ॥ ६ ॥

सर्व तयारी यज्ञाची या झाली रे सिद्धता 

विघ्न आणण्या यासी कोणी समर्थ नाही आता 

सृष्टीपालक मित्रा वरुणा ऋतू घेउनी या

इथे मांडिल्या यज्ञाला स्वीकारायाला या ||६||

द्र॒वि॒णो॒दा द्रवि॑णसो॒ ग्राव॑हस्तासो अध्व॒रे । य॒ज्ञेषु॑ दे॒वमी॑ळते ॥ ७ ॥

हे द्रविणोदस अग्निदेवा आर्त ऋत्विज 

सोमरसाच्या निर्मीतीस्तव ग्रावा घेउनी सज्ज

यागयज्ञे तुम्हा आळवित भक्तीभावाने

वैभवाभिलाषा मनी धरुनी  अर्पीती अर्चने ||७||

द्र॒वि॒णो॒दा द॑दातु नो॒ वसू॑नि॒ यानि॑ श्रृण्वि॒रे । दे॒वेषु॒ ता व॑नामहे ॥ ८ ॥

दिगंत आहे महती थोर अशा वैभवाची

द्रविणोदस आम्हा होऊ द्यावी प्राप्ती त्याची

समस्त देवांना आळविले वैभवप्राप्तीस्तव

वैभव देण्या आम्हाला तू येई सत्वर धाव ||८||

द्र॒वि॒णो॒दाः पि॑पीषति जु॒होत॒ प्र च॑ तिष्ठत । ने॒ष्ट्रादृ॒तुभि॑रिष्यत ॥ ९ ॥

द्रविणोदाला सोमरसाचे प्राशन करण्याला 

आंस लागली पूर्ण कराया होऊ सिद्ध चला

नेष्ट्रा नि ऋतु यांचे झाले अजुनी हवी करा

द्रविणोदाग्नीच्या तुष्टीस्तव सोमा सज्ज करा ||९||

यत्त्वा॑ तु॒रीय॑मृ॒तुभि॒र्द्रवि॑णोदो॒ यजा॑महे । अध॑ स्मा नः द॒दिर्भ॑व ॥ १० ॥

हे द्रविणोदा हवी अर्पिण्या तुम्ही हो चवथे

सर्व ऋतूंच्या सवे तुम्हाला हविर्भाग अर्पिले

स्वीकारुनिया घेइ तयासी कृपावंत होउनी 

प्रसाद देई आम्हा आता तू प्रसन्न होवोनी ||१०||

अश्वि॑ना॒ पिब॑तं॒ मधु॒ दीद्य॑ग्नी शुचिव्रता । ऋ॒तुना॑ यज्ञवाहसा ॥ ११ ॥

दिव्य कांतिच्या पुण्यव्रता हे अश्विनी देवा

यज्ञसिद्धीचा पवित्र पावन वर आम्हा द्यावा

सवे घेउनीया ऋतुदेवा यागास्तव यावे

सोमरसाचे प्राशन करुनी आम्हा धन्य करावे ||११||

गार्ह॑पत्येन सन्त्य ऋ॒तुना॑ यज्ञ॒नीर॑सि । दे॒वान्दे॑वय॒ते य॑ज ॥ १२ ॥

गार्ह्यपत्य हे अग्नीदेवा अमुचा गृहस्वामी तू 

सर्व ऋतुंच्या बरोबरीने अध्वर्यू  होशी तू  

मान देऊनी आर्जवासि या पाचारण हो करा 

हविर्भागासह यज्ञाला देवांना अर्पण करा ||१२||

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/WWfSmTvHD3w

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 15 – 21

Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 15 – 21

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments