सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २२ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

१. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचा आज स्मृतीदिन.  ( इ.स. १९२९ – २२ जुलै २०११ )

सुरेशचंद्र नाडकर्णी  हे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक होते. मराठी लेखक होते. गझलचे अभ्यासक होते आणि संगीततज्ज्ञही होते. तसेच ते आंतरराष्ट्रीय क्रीडासमीक्षकही होते. गझल आणि रुबाई या दोन्ही प्रकारचा त्यांचा मुळापासून अभ्यास होता. मराठी आणि उर्दू दोन्ही भाषेत त्यांनी वरील दोन्ही प्रकारात विपुल काव्यरचना केली आहे. उर्दू काव्यावर त्यांनी पीएच. डी. मिळवली होती. ‘उंबराचे फूल ‘ हा त्यांचा काव्यसंग्रह. तसेच  ‘गजल’ हे ‘गजल ‘ काव्यप्रकाराला वाहिलेले पुस्तक त्यांनी लिहिले. सुरेश भट या आपल्या मित्राच्या आग्रहामुळे त्यांनी मराठीत गजला व रुबाया लिहिल्या.

वाडिया कॉलेजमधे ते प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांनी अध्यापनाबरोबरच अनेक विषयांवर संशोधन व लेखन केले आहे. त्यांची अनेक पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहेत. ‘साप्ताहिक स्वराज्य’मधे ते एके काळी हिन्दी गाण्यांचे रसग्रहण लिहीत असत। क्रीडासमीक्षाही त्यांनी लिहिल्या आहेत. ‘ क्रीडा ज्ञानकोश ’,  ‘‘अ‍ॅथलॅटिक्समधील सुवर्ण पदकाच्या दिशेने ’ ही त्यांची पुस्तके त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील नैपुण्याची साक्ष देतात.

सुरेशचंद्र नाडकर्णी यांची पुस्तके –

१.    ‘उंबराचे फूल’ (कविता संग्रह), 

२.    गजल,

३.   बहुरंग ( लेखसंग्रह ), 

४.  सदानंद – सुखी माणसाचा सदरा इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. 

याशिवाय विज्ञानाशी संबंधितही  त्यांची पुस्तके आहेत.

श्री. नाडकर्णी यांना विनम्र आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

२.  मराठी ग्रामीण कवी, बहुढंगी कथालेखक, चतुरस्त्र ग्रामीण कादंबरीकार म्हणून ज्यांचा लौकिक होता, अशा श्री. गजानन लक्ष्मण ठोकळ यांचा आज स्मृतीदिन. ( २६ मे १९०९ – २२ जुलै १९८४ ). 

ग.ल. ठोकळ यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कामरगाव इथे झाला. त्यांचे गाव कायम दुष्काळी व कोरडवाहू शेती असलेले होते. त्यांच्या ग्रामीण कथा – कादंबर्‍यातून प्रामुख्याने हे वर्णन दिसून येते. त्यातून ग्रामीण माणसे साधी – भोळी, सरळ मनाची, आपुलकी- आत्मीयता जपणारी, आतिथ्यशील अशी दाखवलेली आहेत, तर शहरी माणसे बेरकी असल्याचे दाखवलेले आहे, हे सर्वात आधी सांगावेसे वाटते. 

त्यांच्या आईला वाचनाची आवड होती, आणि तिने आणलेली सगळी पुस्तके ते वाचून काढत असत. वयाच्या  १६व्या वर्षी त्यांची ‘आकाशगंगा’ ही पहिली कविता प्रसिद्ध झाली. सुरुवातीला काही वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. आणि नंतर “ श्री लेखन वाचन भांडार “ हे दुकान सुरू केले, जे वाचकांचे आकर्षण ठरले होते . या जोडीनेच ‘ ४०० हून जास्त मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करणारे प्रयोगशील प्रकाशक ‘ अशीही ख्याती त्यांनी मिळवली होती. 

ते अव्वल दर्जाचे कथालेखक तर होतेच, पण स्वतःची वेगळीच शैली जोपासणारे उत्तम कवीही होते . तेव्हा प्रसिद्ध असणाऱ्या रविकिरण मंडळातील कवींचा त्यांच्यावर जरी प्रभाव होता, तरीही कवी म्हणून त्यांचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य होते , आणि ते म्हणजे त्यांच्या कवितेत ठळकपणे दिसणारे ग्रामीण जीवनाचे अस्सल, गहिरे रंग . पण जनमानसात आणि साहित्यविश्वातही  “ कथाकार “ हीच त्यांची ठळक ओळख निर्माण झाली होती . कवयित्री शांता शेळके म्हणत की , “ ठोकळ यांनी निर्माण केलेले स्त्री-पुरूषांचे चित्रविचित्र जग हा वास्तव विश्वाचा एक छेद असतो .” वाचकाचे रंजन करतांना त्याला प्रत्यक्ष जीवनातील विविध अनुभवांचा प्रत्यय देणारा समर्थ कथाकार अशी श्री. ठोकळ यांची सार्थ ओळख निर्माण झाली होती . 

 ग.ल. ठोकळ यांची पुस्तके –

१. कोंदण, २. गावगंड, ३. मत्स्यकन्या, ४. मीठभाकर, ५. कडू साखर, ६. ठोकळ गोष्टी ( याचे अनेक भाग आहेत.) ७. टेंभा, ८. ठिणगी, ९. क्षितिजाच्या पलीकडे, १०. सुगी (निवडक ठोकळ कथा) यापैकी ‘ टेंभा ‘ ही त्यांची आत्मचरित्रवजा कादंबरी आहे . 

“ गावगंड “ ही त्यांनी १९४२ च्या क्रांतिपर्वावर लिहिलेली कादंबरी इतकी गाजली की काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात तिचा समावेश केला गेला होता. 

त्यांच्या जानपदगीतांचा प्रातिनिधिक संग्रहसुद्धा खूप प्रसिद्ध होता, आणि त्याला श्री. वि. स. खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिली होती.  

ग.ल. ठोकळ यांच्यावर ‘ साहित्यश्रेष्ठ ग.ल. ठोकळ ‘  हे पुस्तक लिहिले गेले आहे. अनेक संस्था, साहित्यातील श्रेष्ठ कलाकृतींना ग.ल. ठोकळ यांच्या नावाचा पुरस्कार देतात.

आजच्या ‘ कवितेचा उत्सव ‘ सदरात वाचू या, सर्वांना शाळेच्या आठवणीत घेऊन जाणारी त्यांची एक ग्रामीण बाजाची कविता ..

श्री. ग. ल. ठोकळ यांना मनःपूर्वक श्रद्धांजली. 🙏

☆☆☆☆☆

३. मराठवाड्यातील साहित्यिक म्हणून नावाजलेले श्री यशवंत कानिटकर यांचाही आज स्मृतीदिन. (१२/१२/१९२१ – २२/७/२०१५) 

लेखक आणि कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. कानिटकरांची आणखी एक विशेष ओळख होती ती ‘ भाषातज्ञ ‘ म्हणून . चार भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातल्या हैदराबाद राज्याच्या भाषा विभागात ‘ भाषांतरकार ‘ म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती . १९५६ मध्ये झालेल्या ‘ राज्य – पुनर्रचनेनंतर त्यावेळच्या मुंबई राज्यात त्यांची बदली झाली. मुंबईतील सचिवालयात ‘ भाषा संचालक ‘ म्हणून ते रुजू झाले. या भूमिकेतून त्यांनी भाषाविषयक प्रश्नावर , राजभाषा, परिभाषा, अनुवाद, कोशरचना, आदि स्वरूपाचे विपुल लेखन केले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर, सरकारी कारभाराची भाषा मराठी असेल असे सरकारने जाहीर केले. आणि त्यासाठी ‘ प्रशासनिक परिभाषा कोश ‘ व मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्याचे काम श्री. कानिटकरांनी केले. भाषासंचालक या भूमिकेतून, राजभाषा मराठीविषयक धोरण राबवणे, परिभाषा कोश, अमराठी कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषेच्या परीक्षांचे आयोजन, केंद्राच्या राज्यासाठी असणाऱ्या अधिनियमांचा अनुवाद , अशी अनेक महत्वाची कामे त्यांनी केली. 

पण या सगळ्या शासकीय कामात अतिशय व्यस्त असूनही त्यांचे मराठी साहित्यावरचे प्रेम मात्र तसूभरही कमी झाले नव्हते. साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत मराठी शब्दकोशाचे मुख्य संपादक म्हणून ते काम करत होतेच, पण व्यक्त करण्यासारखे स्वतःचे खास असे खूप काही त्यांच्याजवळ असल्याचे त्यांना सतत जाणवत होते. काव्यकलेवर त्यांची हुकूमत होती, आणि काव्याच्या सामर्थ्याची उचित जाणही होती. त्यामुळेच ‘ मेनका ‘ हा त्यांचा कवितासंग्रह खूप प्रसिद्ध झाला होता. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या मते ‘ श्री. कानिटकरांच्या कवितांचे छंद, त्यांची भाषा, आकृतिबंध, आणि त्यांची प्रतिमासृष्टी, सगळेच वेगळे होते. त्यांच्या कवितेचे नाते मर्ढेकरांच्या कवितांशी जरी जोडता येत असले, तरी त्या परंपरेतील नवकाव्य त्यांनी हाताळलेले दिसत नाही.’ आयुष्यावरचे उत्कट प्रेम, अर्थपूर्ण जगणे, प्रेम, सृजनता, निसर्गसौंदर्याची अतिशय आवड, हे त्यांच्यातले कविता करण्यासाठी आवश्यक असणारे गुण, तेव्हाच्या हैदराबादमधल्या वातावरणात खूपच खुलले होते. पण मुंबईत आल्यावर माणसांचे तिथले जगणे पाहून, नंतरच्या त्यांच्या कवितांमधून नव्या जाणीव जागृत झाल्याचे स्पष्ट लक्षात येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कविता —–

खाडीखाडीतील घाण, करी नाकाशी कालवा । गाडीगाडीत चोंदली , विश्वसंस्कृति हवा ।।

असा प्राणवायू भत्ता , आम्हा अवांछिता लाहे । घेतो श्वास परी आता, माझे नाक माझे नोहे ।।

अशी पोषिता काजळी, लागे ज्योतीलाही धाप । कशासाठी ओठांवर पौरुषाची तळटीप ।।

– ‘ खानावळीतील अन्न ‘, ‘ अंधाराला खडे मारिती ‘,’ नगरातील राजपथा ‘ ही अशा कवितांची आणखी काही उदाहरणे . 

श्री. कानिटकरांचे इतर प्रकाशित साहित्य—-

१. ‘आज इथे तर उद्या तिथे ‘ – मराठवाड्यातील अनुभवांवर आधारित ललित लेखांचा संग्रह . 

२. ‘ ते दिवस ती माणसे ‘

३. ‘ पश्चिमवारे ‘ 

४. ‘ मराठी भाषा : स्वरूप आणि उपयोजन ‘ 

५. ‘ लोकमान्य टिळकांचा भाषाविचार ‘

याव्यतिरिक्त ‘ लोकमान्य टिळक ‘ या आठ खंडांतील ग्रंथाच्या आठव्या खंडाचे संपादनही त्यांनी केले होते. तसेच ‘ प्रतिष्ठान ‘ मासिकाचे ते संपादक होते.    

श्री. यशवंत कानिटकर यांना विनम्र आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

४. मराठी नाटककार आणि कादंबरीकार श्री. पदमाकर गोवाईकर यांचा आज स्मृतीदिन. ( २४/४/१९३६ – २२/७/२००१ ) 

त्यांचे प्रकाशित साहित्य —-

१. नाटके : ‘ सांगू नये ते ‘, ‘ वय वेडं असतं ‘, ‘ वणवा ‘, ‘ बहरलेल्या हिवाळ्यात ‘, ‘ भिरभिरे ‘, ‘ ऐक ‘, ‘ देह देवाचे मंदिर ‘, ‘ जनमेजय ‘. 

२ कथासंग्रह : ‘ गोफ ‘, ‘ नायगारा ‘, ‘ ऋतुगंध ‘, ‘ देवगंधार ‘, ‘ पोपटपंची ‘, ‘ शहाण्यांची शाळा ‘, सांजवाणी ‘. 

“ कडकलक्ष्मी “ या चित्रपटात ते अभिनेते म्हणूनही रसिकांना दिसले होते. 

श्री. गोवाईकर रसिकांच्या कायम स्मरणात राहण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे सातासमुद्रापलीकडेही गाजलेली त्यांची सुंदर कादंबरी  “ मुंगी उडाली आकाशी “. ही कादंबरी श्राव्य माध्यमातूनही ते रसिकांसमोर सादर करायचे. म्हणजे हे “ एकपात्री अभिनव कादंबरी – वाचन “ त्यांनी स्वतः केलेले होते. निवेदन आणि विशेष म्हणजे त्याचे संगीत-संयोजनही त्यांनीच केलेले होते. या कादंबरी-वाचनाच्या कॅसेट्स प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या, आणि अजूनही आहेत. श्री संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांच्या जीवनावर रेखाटलेली ओघवत्या भाषेतली ही कादंबरी म्हणजे अंतःकरणाला पीळ पाडणारी खरोखरच एक अनमोल कथा आहे. 

श्री. गोवाईकर यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी विनम्र प्रणाम. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments