मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जगावेगळे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ जगावेगळे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त:पादाकुलक)

जगावेगळी धरा आमुची

गगन आमुचे जगावेगळे

जगावेगळे तीर्थ आमुचे

यात्री आम्ही जगावेगळे !

 

विश्व मानुनी घरट्याला रे

सुखे नांदती सर्व पाखरे

अखंड अमुच्या शापित पंखी

नभापारचे खूळ सळसळे !

 

आलो सोडुन सुवर्णनगरी

त्या बेड्या ते पाश रुपेरी

झेलुन जखमा नक्षत्रांच्या

ह्रदयाशी आकाश घेतले !

 

पानगळीचा ऋतू निरंतर

अरण्य जेथे ओकेबोके

होत साजरे तिथेच अमुचे

ऋतुरंगांचे नित्य सोहळे !

 

प्रकाश व्हाया जरा दुजांचा

विझवुन आलो निजज्योतींना

मुळि न थांबलो दुवे घ्यावया

आनंदाश्रू तमात पुसले !

 

अशीच बुडता नभी पापणी

जावा जीवनओघ थांबुनी

जगावेगळे अमुचे जीवन

मरणही व्हावे जगावेगळे !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे #76 ☆ आईची माया… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 76 ? 

☆ आईची माया… ☆

आईची माया, निर्व्याज असते

आईची माया, निर्भेळ असते

आई पवित्र तुळस अंगणातली

आई दुःखानंतर पहिली हाक असते…!

 

आई दूध असते, दही असते

दह्याचे त्या लोणी पण होते

लोणी काढल्यावर तूप निघते

आई तशी लोण्या-सम कढते…!

 

सदैव चिंता आपल्या बाळाची

चिल्या-पिल्यांची, सानथोरांची

रहाते अर्धपोटी उपाशी जरी

तसूभर कमी नाही थाप मायेची…!

 

तिची थोरवी किती मी सांगू

किती गाऊ तिचे ते पोवाडे

तिच्या पुढे स्वर्ग छोटा होईल

तिच्याविणा सर्वच काम अडे…!

 

अशी ही माय माऊली

तिला वरद देवाचा

तिच्या प्रेमात साठवला

प्रसाद परमेश्वराचा…!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 5 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 4 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

९.

आपलेच ओझे आपल्याच खांद्यावर

घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मूर्खा!

स्वतः च्याच दाराशी भिक्षा मागणाऱ्या

भिक्षेकऱ्या!

 

समर्थपणे ओझं पेलणाऱ्या हाती ते ओझं दे

पश्चातापानं तुला परत पहावं लागणार नाही.

 

तुझ्या आकांक्षांच्या श्वास-स्पर्शानं

तुझ्या अंतरीच्या

ज्या ज्ञानदीपाला तू स्पर्श करतोस

तो तुझ्या श्वासातल्या फुंकरीनं

क्षणात विझून जातो.

 

वासनेनं माखलेल्या पापी हातातून

तू दान घेऊ नकोस

शुद्ध पवित्र प्रेमानं अर्पण केलेलंच स्वीकार.

 

१०.

सर्वात दरिद्री, पददलित आणि सर्वस्व गमावलेल्यांच्य वस्तीत तुझे चरण स्थिरावतात,

तिथेच तुझ्या पादुका असतात.

 

सर्वात दरिद्री, पददलित आणि सर्वस्व गमावलेल्यांच्या वस्तीत त्या तुझ्या चरणांच्या गाभाऱ्यापर्यंत

किती यातायात केली तरी मी वाकूनही पोहोचू शकत नाही.

 

सर्वात दरिद्री, पददलित आणि सर्वस्व गमावलेल्या

सामान्यांची वस्त्रे मिरवत तू जात असतोस

आमचा गर्व आम्हाला तुझ्यापर्यंत येऊ देत नाही.

 

सर्वात दरिद्री, पददलित आणि निराधार असलेल्या,

सोबत हरवलेल्यांना तू सोबत देतोस.

माझ्या अंत:करणाला तिथं यायचा मार्ग सापडत नाही.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऋण… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ ऋण…  ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

ऋण

     आता तू उभी आहेस

तुझ्या पायावर… मात्र

ज्या मातीवर तुझे पाय आहेत

त्या मातीची ओळख ठेव..

विसरु नकोस ऋण मातीचं

जिनं घडवलं लेणं आयुष्याचं !

माती नसती तर…

कदाचित तुझे पाय अधांतरी..

पाय तुझे आहेत

तू कुठंही जा…पण

माती तुझी नाही हे न विसरता..

तिचं ऋण पायदळी  तुडवता!

अगं ऋण तुडवायचं नसतं

ते अभिमानाने मिरवायचं असतं !

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आजकाल ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? कवितेचा उत्सव ?

☆ आजकाल ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

इमारतीची उंची वाढली, माणुसकीची झाली कमी

काळाने माणूस उंचावला, व्यक्तिमत्वाची नाही हमी

 

पदव्या झाल्या स्वस्त, शहाणपणाची आहे वाण

खऱ्याचे झरे गहाळ, खोट्याचे डोंगर महान

 

स्वची भाषा वाढली, मूल्य धारातीर्थी पडली

सुखसोयी मुबलक, वेळेची कमतरता आली 

 

हुशारी त्याची वाढली, समस्या ही वाढली

दुरूनच बोलणे त्याचे, नकोशी नाती झाली

 

रस्ते झाले रुंद, त्याची दृष्टी झाली अरुंद

अन्यायाचे दर्शन होता, डोळे झाले बंद

 

औषध झाली मुबलक, त्याचे आरोग्य मात्र कमी

जगण्यात वाढ वर्षाची, पण वर्षांमध्ये जगणे कमी

 

प्रेम क्वचितच करतोय, पण तिरस्कार सहज होतॊय

शुद्ध हवेसाठी झटतोय, पण मन प्रदुषीतच असतय

 

आवक खूप वाढतेय, पण नियत कमी होतेय

मदतीची मूठ त्याची, बंदच कायम दिसतेय

 

गप्पा जागतिक शांतीच्या, घरात वातावरण युद्धाचे

वाटण्या झाल्या जमिनीच्या, तुकडे झाले नात्याचे

 

राहणीमान सुधारले त्याचे, जगण मात्र खालावले

घर खूप विस्तारले त्याचे, कुटुंब वृक्ष रोडावले

 

घरं खूप सजवली त्याने, पण घरटी नसे साजेशी

वस्तू वाढल्या माणसे कमी, बोलावे तरी कोणाशी

 

दिखाव्याच्या खोलीत त्याच्या, खूप काही मांडलेले 

मनाची खोली रिक्त त्याची, खूप काही सांडलेले

 

आजकाल हे असच होतय, पहिल्यापेक्षा वेगळे घडतंय

आजकाल हे असच होतय, त्याच्यासाठी ते वेगळे नसतंय

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काल आमच्या शाळेत वेगळंच घडलं… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

? जीवनरंग ❤️

☆ काल आमच्या शाळेत वेगळंच घडलं… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

 नमस्कार मंडळी !!

 

काल आमच्या शाळेत वेगळंच प्रकरण घडलं

गुरुजींना न्यायला देवानं यमाला अर्जंट धाडलं !

 

न विचारताच यम घुसला डायरेक्ट गुरुजींच्या वर्गात

चला गुरुजी आपल्याला जायचं आहे स्वर्गात

 

एका मिनीटात तुम्हाला येणार आहे अटॅक

तुमचा जीव माझ्या मुठीत येईल मग फटॅक

 

यमाचं बोलणं ऐकूण गुरुजी लागले रडू

खूप दिवसांनी घेतलाय रे यमा हाती खडू

 

कोरोनाने पोरांची शाळा होती बंद

आजच्या दिवस घेऊ दे त्यांना शिकण्याचा आनंद

 

फक्त एक कविता दाखवतो त्यांना गाऊन

मग जा खुशाल तू माझे प्राण घेऊन

 

ठीक आहे म्हणत यम वर्गाबाहेर बसला

गुरुजींचा डान्स पाहून तो ही फार हसला

 

यमालाही आठवलं त्याचं बालपण

दाटून आला गळा त्याचा गहिवरलं मन

 

आजच्या दिवस एक्स्ट्राचा घ्या म्हणला जगून

उदया येतो म्हणत यम गेला आला पावल्या निघून

 

दुसऱ्या दिवशी सकाळीच यम झाला हजर

गुरुजींचीही पडली त्याच्यावरती नजर

 

काहीही म्हण यमा अर्जंट आहे काम

केंद्रावर जाऊन येतो तोवर जरा थांब

 

सर्वेक्षणाची फाईल साहेबांस येतो देऊन

किरकोळ रजेचा अर्जही येतो जरा ठेवून

 

करायच्या आहेत अजून तांदळाच्या प्रती

पोरांची बी काढायची आहेत बँकेमधे खाती

 

आकारिकचं काम पण घेतलंय काल हाती

डोक्यामध्ये नुसती गणगण काय आणि किती

 

शेवटचे हे आठ दिवस थांब यमा मित्रा

तोवर माझ्या मिटवतो भानगडी ह्या सतरा

 

शेवटची ही संधी गुरुजी आज नककी देईन

पुढच्या सोमवारी प्राण घ्यायला मी पुन्हा येईन

 

गुरुजींच्या डोक्याला आलं कुटुंबाचं टेन्शन

आपण गेलो तर काय होईल आपल्याला नाही पेंशन

 

म्हणता म्हणता उगवला शेवटचा तो सोमवार

शाळेकडे गुरुजी झाले स्कुटरवरती स्वार

 

तेवढ्यात गुरुजींच्या आलं काहितरी ध्यानात

गुरुजी थेट घुसले एका कपड्याच्या दुकानात

 

यम म्हटला गुरुजी आज इकडं कसं काय?

तेवढ्यात गुरुजींनी धरले यमाचे ते पाय

गणवेषाचं तेवढं लावू दे आज मार्गी

आजच्या दिवस थांब उद्या जाऊ आपण स्वर्गी

 

काय राव गुरुजी तुम्ही रोजच आहे बिझी

तुमच्या अशा वागण्यानं डयुटी धोक्यात येईन ना माझी

 

आजच्या दिवस यमा घे रे गड्या समजून

किर्द , दुरुस्ती दाखल्याचेही काम आहे पडून

 

उदया पासून सुरु आहे c० साहेबाचा दौरा

कामाभोवती फिरतोय बघ गुरुजी नावाचा भोवरा

 

परवा पासून खेळायची आहे टॅग ची पण इनिंग

पुढच्या आठवड्यात घ्यायचं आहे गणित पेटीचं ट्रेनिंग

 

नंतर करायची आहे स्कॉलरशिपची तयारी

लसीकरणाची ही पार पाडायची आहे जबाबदारी

 

पोरांच्या परीक्षा मग तपासायचे पेपर

नवोदय मधे पोरं करायची आहेत टॉपर

 

कामाच्या या तानाची डोक्या  भेळ

आमच्याकडं नाही यमा  मरायलाही वेळ

 

खूप वाटतं फुलवावा ज्ञानाचा हा मळा

कांदा मुळा भाजी आमची खडू आणि फळा

 

पोरांमधे जीव ओतून करतो आम्ही काम

त्यांचा मधेच दिसतो कृष्ण आणि राम

 

फुकट पगार  म्हणणार्‍यांची वाटते भारी कीव

हरकत नाही आज माझा घेऊन टाक जीव

 

यमाला आलं गलबलून , सारं काही ऐकून

तुम्हाला न्यायला गुरुजी आता येणार नाही चुकून

 

वाटेल तेव्हा या गुरुजी उघडेन स्वर्गाचं दार

सुंदर करा भारत आणि पोरं करा हुशार

 

टाटा बाय बाय करत करत  यम गेला निघून

परत येण्याआधी तो घ्या ना छान जगून

 

जगणं मरणं म्हणजे नाही काही वेगळं

नरक आणि स्वर्ग इथचं आहे सगळं

 

कामाशी काम करून घडवा नवा भारत

कामाशिवाय इथं कुणी अमर नाही ठरत.

– अनामिक 

संग्राहिका – सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ -वसंत बहार- ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? -वसंत बहार-  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

आरंभ होतो चैत्र मास

प्रवेश सूर्य मेषराशीत

चाहूल लागे वसंत ऋतूची

झाडांवर चैत्रपालवीची सुरुवात..

सरता मागे ऋतू शिशीर

उष्मा जाणवे आसमंतात

फुलून येता बहावा गुलमोहोर

लाल पिवळ्या फुलांची बरसात..

सृजन चाहूल चैत्रारंभाची

येतो बहरून आंब्याचा मोहोर

फुलांमधूनही ओसंडे आनंद

सण गुढीपाडव्याचा शुभदिन प्रवर..

वेड लावी सुगंध दरवळ

शुभ्र धवल मोगर्‍याचा

कुहू कुहू कोकीळ कुंजन

आस्वाद आंब्याची डाळ पन्ह्याचा..

तळपतो भास्कर आकाशी

चुणूक तेजस्वी उन्हाची

उष्ण झळाळीचे दिवस येती

सृजनशीलता चैत्र मासाची..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वर्षारंभ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ वर्षारंभ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

वसंत ऋतुच्या आगमने

शक संवत्सर सुरू होते

मरगळ झटकून सारी

निसर्गात चैतन्य फुलते ||

 

वर्षारंभी नवलाई होते

निसर्ग किमया बहरते

पानगळीच्या जागेवरती

नवी पालवी नाचू लागते ||

 

पळस पांगारा बहव्याला

गुलमोहरा येई फुलोरा

निसर्गाची रंगपंचमी ही

अदभूत रंगीत नजारा ||

 

मोगऱ्याचा गंध धुंदावतो

सुटे आंब्याचा घमघमाट

सजे चैत्रागौरीची आरास

आंब्याची डाळ पन्ह्याचा थाट ||

 

ठायी ठायी रंगांची आरास

फळा फुलांना बहर भारी

सृजनोत्सवाने सुरू होई

नववर्षाची नवी भरारी ||

 

दु:खावरती माती सारत

आनंदाचे ते बीजारोपण

नवीन स्वप्ने नवीन आशा

घेऊन येतील नवे शुभ क्षण ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सण आला सौख्याचा… ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे  ☆ 

सुश्री उषा जनार्दन ढगे

 ? कवितेचा उत्सव  ? 

☆ सण आला सौख्याचा… ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

होतसे मराठी नववर्षारंभ

    चैत्राच्या शुध्द प्रतिपदेस

शुभ दिन चैत्रपाडव्याचा

    पहिला सण असे हा खास…

 

वस्र रेशमी कलश रुप्याचा

   सजवूनी गुढी उभारली दारी

प्रतीक असे हे सुमांगल्याचे

    चैतन्य सुख संपदा नांदे घरी…

 

रेखूनी रांगोळी प्रवेशद्वारी

    स्वागतास तोरण सुशोभित

करावे सेवन कडुनिंब पानांचे

    लाभे आरोग्य शरीर रोगमुक्त…

 

सुमंगल सांस्कृतिक समुचित

    वैशिष्ट्यपूर्ण चैत्राचा हा मास

दिस गुढीपाडव्याचा मुहूर्त

    योग्य असे सर्व शुभकार्यांस…

 

वसंत ऋतूची लागता चाहूल

    आम्रवनी कूजन कोकिळेचे

धरती पानाफुलांनी सजते

    आगमन होते वैपुल्यतेचे…

 

गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी

    संपला राम सीतेचा वनवास

रघुवीरकृपेने जाऊनी  विपदा

    आपत्तीचा शीघ्र होवो र्‍हास…!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 96 – गारवा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 96 – गरवा ☆

 बहरला निसर्ग हा मंद धुंद ही हवा।

तना मनास झोंबतो आसमतं गारवा। ।धृ।।

 

वृक्ष वल्ली उधळती गंध हा दश दिशा।

तारकाच उतरल्या शोभिवंत.. ही नीशा।

चंद्र जाणतो कला मनात प्रीत मारवा ।।१।।

 

स्वप्न रंगी  हा असा मन मयूर नाचला ।

ह्रदय तार छेडताच प्रेमभाव जागला

धुंद मधुर नर्तना ताल पाहिजे नवा ।।२।।

 

तेज नभी दाटता तने मनात नाचली ।

कधी कशी कळेना भ्रमर मुक्ती जाहली ।

रुंजी घालतो मना भ्रमर हा हवा हवा ।।३।।

 

वेचते अखंड मी मुग्ध धुंद क्षणफुलां।

क्षणोक्षणी सांधल्या अतूट रम्य शृंखला।

अर्पिली अशी मने सौख्य लाभले जीवा ।।४।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares