मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आगमन… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ आगमन… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

आजी होणे किंवा आजोबा होणे  या इतके परम सुखाचे क्षण मनुष्य जीवनात कोणते असू शकतील?

नातवंडे म्हणजे आजी आजोबांच्या डोळ्यात चमकणाऱ्या दागिन्यांसारखी असतात.

नातवंडं असणे म्हणजे जणू काही जगाचे मालक होणे.

तो असा एक खजिना आहे की त्याचे मूल्य म्हणजे फक्त हृदयातील प्रेम.

नातवंड म्हणजे मुखवटा घालून आलेला देवदूतच.

तुमच्या हृदयापर्यंत, हसण्याचा, तुमचे जीवन आनंदाने भरण्याचा आणि तुमचे जग प्रेमाने भरुन टाकण्याचा देवाचाच मार्ग.

घरात नातीचा जन्म झाला आहे आणि आजोबांचं मन आनंदाने तुडुंब भरून गेले आहे. या आनंद भावनांचं हे आनंद गीत आगमन कवी आहेत डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध काव्यसंग्रहातून)

☆ – आगमन…  – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली

आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालविली ।ध्रु।।

*

नाजूक जिवणी हळूच हंसली मुग्ध कलीका दरवळली

इवले इवले हात चिमुकले स्फूर्ति उमेद सापडली

आर्त नजर तव प्रेमे सजुनी अंगागातुन मोहरली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली १

*

प्रतिक्षेमध्ये तुझाच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली

तुझ्या पावले सुकर जाहली सार्थ अपेक्षा जोजविली

ज्योतिर्मयी  हो सर्वांसाठी दिव्य प्रार्थना आळविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली २

*

खंडित कैसे जीवन होणे ज्योत नव्याने तेजविली

स्त्रोत वाहतो अखंड अमृत तुझ्याच रूपे जाणविले

संपुनि जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली ३

 – डॉ. निशिकांत श्रोत्री

अतिशय हळुवार मनातलं, वात्सल्य जागं करणारं हे भावुक गीत. “आजोबा’ या नव्या पदवीने बहरून गेलेलं कवीचं मन गातंय.

मावळतीच्या क्षितिजावरती उदयाची जाणीव झाली

आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालविली।ध्रु।

खरं म्हणजे जीवनातलं हे संध्यापर्व. मावळतीच्या रंगानं रंगत असणारं. पण जीवनाच्या या टप्प्यावर नव्या आशा पल्लवित  करुन स्नेहा तुझे आगमन झाले आणि या संध्येच्या क्षितिजावर नव्या उदयाचीच जाणीव झाली. जणू काही मागे गेलेली अनेक वर्षे पुन्हा एकदा तुझ्या जन्माने नव्याने बहरली.

नाजूक जिवणी हळूच हसली मुग्ध कलीका दरवळली  

इवले इवले हात चिमुकले स्फूर्ति उमेद सापडली

आर्त नजर तव प्रेमे सजुनी अंगांगातून मोहरली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली १

गोड गुलाबी कोवळ्या ओठातलं तुझं हास्य जणू काही मूक कळीतून दरवळणाऱ्या सुगंधासारखंच. तुझ्या इवल्याशा चिमुकल्या हाताने माझ्यात कशी नवस्फूर्ती,नवचैतन्य उसळवलं.  तुझी ती इवल्याशा  डोळ्यातली निष्पाप नजर प्रेमाचा एक वेगळाच रंग घेऊन माझ्या अंगा अंगातून मोहरली. खरोखरच या उतार वयात माझ्या जीवनात पडलेल्या तुझ्या पावलाने माझाही जणू नवजन्मच झाला.

प्रतिक्षेमध्ये तुझ्याच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली

तुझ्या पावले सुकर जाहली सार्थ अपेक्षा जोजविली

ज्योतिर्मयी हो सर्वांसाठी दिव्य प्रार्थना आळविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली २

किती वाट पाह्यला लावलीस ग बाळे?  तुझ्या प्रतीक्षेत घालवलेली ती वर्षे किती कठीण गेली आणि कशी सहन केली ते तुला कसं कळेल! मुलांची लग्न झाली की आता नातवंड कधी मांडीवर खेळेल याची स्वाभाविक उत्सुकता आईवडीलांना असते.पण बर्‍याच वेळा आपली विवाहित मुले मुल होऊ देण्याचा विचार पुढे ढकलत असतात. त्यामुळे डोळे मिटण्यापूर्वी ते बालरुप दिसावे याची आर्तता उत्कट होत असते.

पण आज मात्र तुझी पावलं जीवनांगणी उमटली आणि स्वप्न पूर्ण झालं. जणू सारं काही भरून पावलं. आयुष्याचे सार्थक झाले.  आता या क्षणी माझी  ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की’” त्या भास्कराचं तेज तुला मिळो! आणि सर्वांच्या वाटा तू या दिव्य प्रकाशाने उजळवून टाकाव्यात.

खंडित कैसे जीवन होणे ज्योत नव्याने तेजविली

स्रोत वाहतो अखंड अमृत तुझ्याच रूपे जाणविली

संपूनि जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली ३

वाटलं होतं आयुष्य आता सरत आलं. पण तुझ्या जन्मानं या देहातली विझत चाललेली प्राण्याजोत जणूं काही पुन्हा नव्याने चेतवली गेली. पुन्हा नव्याने जगण्याची आशा पालवली. पुन्हा जगण्यात रंग भरले गेले. तुझ्या जन्माच्या रूपाने जणू काही अमरत्वाचा स्त्रोत वाहतो आहे असं वाटू लागलं.  अंतर्यामी सुकलेले झरे पुन:श्च आनंदाने बरसू लागले आहेत. मी आता निवृत्तीच्या वाटेवर असताना   माझी कर्मवारसारूपी वीणा तुझ्याच हाती सोपवत आहे. म्हणजे पुन्हा सूर सजतील. संपत आलेली मैफल पुन्हा एकदा नादमय होईल. नवे रस, नवे गंध, नवे रंग या माझ्या मावळतीच्या क्षितिजावर पुन्हा एकदा आनंदाने फेर धरतील.

खरोखरच डॉक्टर श्रोत्री यांचं हे गीत म्हणजे वात्सल्य रसाचा अमृतमय झराच. वाचक हो! श्रोतेहो! प्रत्येकाच्या आनंद अनुभवाला जोड देणारं हे ममत्त्व गीत. भावभावनांचा, प्रेमाचा अमृत स्पर्श देणारा, अंतरंगातून सहजपणे वाहणाऱ्या ममतेच्या स्त्रोताची जाणीव करून देणारा अत्यंत कोमल, हळुवार आणि सहज शब्दांचा या गीतातला साज केवळ आनंददायी आहे आणि त्यासाठी कवीला माझा त्रिवार सलाम!

तसं पाहिलं तर साधी सरळ भाषा. अलंकारांचा डोईजडपणा नाही. काव्यपंक्तींमध्ये कुठलेही अवघड वळण नाही.भावनांचा प्रवाह वाचकांच्या मनाशी थेट मिळणारा असा शब्दवेध. सहज जुळलेली यमके, गीत वाचताना मनात एक माधुर्याचा ठेका धरतात.

या गीतामध्ये एक वत्सल दृश्य आहे. नुकतंच जन्माला आलेलं बाळ,कापसासारखी मुलायम तनु.  नाजूक जिवणी, चिमुकले हात पाय, निर्मळ, निष्पाप नजर आणि या साऱ्या विशेषणांतून जाणवणारं एक दैवी, स्वर्गीय निरागसत्व अंतःकरणात मायेचे तरंग उमटवतं.

प्रतीक्षेमध्ये तुझ्याच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली या ओळीतला पिल्ला हा शब्द तर मनाला इतका बिलगतो. खरंच बाळा, लेकरा, चिमण्या या शब्दांमध्ये पाझरतं ते फक्त आणि फक्त अंतरातलं वात्सल्य, दाट प्रेम!

पीजे हार्वे यांनी म्हटलं आहे कोणते गाणे प्रेमाबद्दल नाही? मग ते प्रेम पुरुषाकडून स्त्रीवर असो, आई वडिलांकडून मुलांपर्यंत असो किंवा पुढे नातवंडांपर्यंत असो.. ते पुढे जातच असते.

या भाष्याचा अर्थ डॉक्टर श्रोत्रींच्या या गीतात जाणवतो.

आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालवली  ही ध्रुवपदातील ओळ खूपच बोलकी आहे.  स्नेहा हे विशेष नाम असू शकते अथवा  स्नेहरुपा या अर्थानेही असू शकते.  पण यातून जाणवतो तो नातीच्या जन्माचा कवीला झालेला आनंद.  नातीचं बाळरूप पाहता क्षणीच त्यांच्या अंतरात सुखाचा फुलोरा फुलतो.  आणि सहजपणे ते उद्गारतात ज्योतिर्मयी हो  कवीच्या मनातली ही उत्स्फूर्त संवेदना जाणून माझ्या मनात खरोखरच असंख्य मुग्ध कळ्या सुगंध घेऊन दरवळल्या.

या ठिकाणी आणखी एक नमुद करावेसे वाटते.

संपुनी जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली या ओळीतल्या वीणा हाती सोपवणे या वाक्प्रचाराला एक संदर्भ आहे. प्रवचनकार  निवृत्त होताना आपल्या वारसाला  वीणेच्या रुपात प्रवचनाचा वारसा देतात. या इथे कवीने  आपल्या नातीला आपला वारसा मानून जे काही त्यांचं आहे ते तिला देऊन टाकले आहे.

एकंदरच कवीच्या मनातली स्पंदनं या गीतात इतकी सजीवपणे जाणवतात की त्यासाठी डॉक्टर श्रोत्रींना पुन्हा एकदा सलाम.

विषयांतर असूच शकतं पण जाता जाता सहज सुचलं म्हणून लिहिते, डॉ. श्रोत्री हे स्त्रीरोगतज्ञ. व्यवसायाच्या निमीत्ताने त्यांनी अनेक जन्मलेली मुले हाती घेतली असतीलच. तोही अर्थातच व्यावसायिक असला  तरी भावनिक सोहळाच. पण जेव्हा स्वत:ची नात जन्माला येते तेव्हां फक्त आणि फक्त “आज मी आजोबा झालो!”

हेच सुख. तेव्हा त्यांच्यातल्या वैद्याचा कवी कसा होतो याचा अनुभव आगमन या गीतात होतो. आणि त्याचीही गंमत वाटते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ध्यान’ अंतर्बाह्य बदल घडविणारे अंग ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

ध्यान’ अंतर्बाह्य बदल घडविणारे अंग ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(प्रथम पुरस्कार प्राप्त लेख)

योग शिबिर चालू होते.  गुरुजींनी पहिलाच प्रश्न विचारला.  आपण आनंदी समाधानी आहात का? दुसरा प्रश्न– पूर्वीचे लोक जास्त सुखी होते की, आताचे जास्त सुखी आहेत? विचार सुरू झाले. खरंच  भौतिक प्रगती इतकी झाली. कष्ट कमी झाले. तरीही पूर्वीचा माणूस जास्त सुखी होता. अशी उत्तरे आली .का बरं असं असेल?

आज समाजाचं चित्र पाहिलं तर,  अगदी लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत, प्रत्येक जण ताण-तणावात जगतोय असं दिसतं.  नुसत्याच बाह्य उपचारांनी आणि पाश्चात्य वैद्यक शास्त्राच्या उपायांनी सुद्धा खरं आरोग्य राखता येत नाही. त्यासाठी आपली जीवनदृष्टी आणि जीवनशैली बदलायला हवी. ही गोष्ट आता पाश्चात्यांनाही कळून चुकली आहे. त्यामुळे ते लोक आता भारतीय अध्यात्म योग साधनेचा अभ्यास आणि अनुभव घेऊ लागले आहेत . मग ही योग साधना काय आहे बरं? उपनिषदांमध्ये तसेच भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात तर भगवंतांनी अर्जुनाला ‘ध्यान योग’  सांगितला आहे .पतंजलीनी आदर्श आणि निरामय जीवन कसे जगावे, याबद्दल शास्त्रीय दृष्ट्या योगदर्शन लिहिले आहे. मानवी मन आणि सत्याची त्यांना पुरेपूर माहिती होती त्यामुळेच त्यांनी योगशास्त्र लिहिले.

‘ योग ‘ म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध , अशी पतंजलीनी व्याख्या केली आहे. कसे जगावे? ती एक कला म्हणून कशी अंगी करावी? याबद्दल पतंजलीनी आपल्या ग्रंथात अत्यंत महत्त्वाचा असा अष्टांग योग सांगितला आहे .  “ध्यान ” या अंगाचा विचार करत असताना, त्यापूर्वीची पाच अंगे, (बाह्यांगे )म्हणजे साधनपादाची थोडक्यात माहिती घ्यायला हवी. १) यम — (सत्य ,अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य ,अपरिग्रह )  २)  नियम– ( शुद्धी , संतोष , तप , स्वाध्याय , ईश्वरप्रणिधान )  ३) आसन– शरीर निश्चल राहून सुख वाटते ती स्थिती . ४) प्राणायाम— प्राणाचे नियमन किंवा प्राणाला दिशा देणे. मन एकाग्र होऊन शारीरिक शक्ती वाढते . ५) प्रत्याहार — इंद्रियांवर ताबा मिळवून त्यांची बाहेरची धाव बंद करण्याचा प्रयत्न करणे. म्हणजेच प्रत्याहार. त्यासाठी खूप निग्रह करावा लागतो. पुढील तीन महत्त्वाची आंतर अंगे म्हणजे विभूतीपाद. ६)  धारणा — एखाद्या गोष्टीवर मन स्थिर करणे म्हणजे धारणा. वरील सहा पायऱ्या चढून गेल्यानंतरची महत्त्वाची पायरी म्हणजे ” ध्यान”. ७) ध्यान — ध्यै — विचार करणे, हा धातू आहे .चिंतन किंवा विचार हे धारणे संबंधित असतील तरच त्याला ध्यान म्हणता येईल. नुसतेच अर्धा तास बसणे म्हणजे ध्यान नव्हे. चित्त धारणेच्या विषयावर  स्थिरावल्यानंतर, त्यापासून जो प्रत्यय येत असतो, त्याच्याशी एकतानता साधणे या क्रियेलाच ध्यान म्हणतात. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट पाहतो त्यावेळी नेत्र पटलावर प्रतिबिंब उमटते. त्या तेजाने नसा चेतविल्या जाऊन ,संवेदना मेंदूकडे जातात. मेंदू कडून त्याचा अर्थ लावला की त्याचे  ज्ञान होते. म्हणजेच प्रत्यय आला, असे आपण म्हणतो. ध्यानामध्ये एकाच विषयाचा विचार करण्याची सवय लागली की, निर्णय शक्ती चांगली प्राप्त होते. आणि एखादा प्रश्न चटकन सुटू शकतो. जप करणे हेही ध्यान होऊ शकते. कोणत्या ना कोणत्या मूर्त रूपाचा आधार घेऊन विचार करणे, हा आपला स्वभाव असतो. ईश्वराचे चिंतन करताना ,कोणते ना कोणते मूर्त रूप समोर येईल. कारण विचार आणि रूप अविच्छेद्य आहेत. पंचेंद्रिय आणि मन त्यावर गुंतून ठेवून ,स्थिर करून, ध्यानाच्या अभ्यासाने मनाची संपूर्ण एकाग्रता साध्य होते. जप नुसत्या जिभेवर न ठेवता मनातून केला पाहिजे . सुरुवातीला जप मोठ्याने करावा. म्हणजे तो ठसतो . जप करताना दुसरे विचार आले तरी ते विचार संपले की जप पुन्हा सुरू करावा. मन थकलेले असेल तर ध्यानामुळे बळकट होते .सोन्याची चीप असेल तर, ती धारणेचा विषय. आणि सोन्याची तार म्हणजे धारणा. ही तार कुठेही तुटता कामा नये, असे चिंतन म्हणजे ध्यान. झोपेत स्वतःचे अस्तित्व विसरतो .आवडी नावडी, गरीब श्रीमंती अशा भावनिक पातळ्या सोडल्या की शांत झोप लागते. ती निष्क्रियता हेच ध्यान. झोपेचे ज्ञान आपल्याला जागृती कडे  किंवा सत्याकडे नेते.

ध्यान करताना काही गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवायला हव्यात. ध्यान करताना शांत जागा निवडावी. खूप भूक लागली असेल तर ध्यान लागणार नाही. तसेच पोट गच्च भरले असेल तर ध्यान न होता झोपच लागून जाईल. ध्यान करण्यापूर्वी घरातली कॉल बेल बंद करावी. तसेच घरातल्या प्राणिमात्रांना जवळ घेऊ नये. मनात सर्वात जास्त प्रलोभने डोळे निर्माण करतात, त्यामुळे ध्यान करताना डोळे बंद करून ,श्वासावर लक्ष केंद्रित करून ,नंतर दीर्घ श्वास घ्यावेत. त्यामुळे ताण कमी होतो. 90 दिवस सलग ध्यान केले तर, कुटुंबातील इतर व्यक्तींनाही सकारात्मक परिणाम दिसतो. अध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर, योग साधनेसाठी सूर्योदयापूर्वीची सर्वोत्तम वेळ. त्याचप्रमाणे संध्यासमयी  ४–३० ते  पाच नंतर. कारण त्यावेळी आपली मर्यादा ओलांडण्याची क्षमता उत्तम असते. पृथ्वीच्या ऊर्जा संक्रमणातून जात असतात. आणि शरीर प्रणातील संघर्ष मोठ्या प्रमाणात कमी झालेला असतो. शारीरिक प्रणाली पृथ्वीच्या जीवनप्रणालीशी संलग्न झाली की ,आपोआप जाग येते. भारतासारख्या उष्णकटिबंधीय वातावरणात योगाचा विकास झाल्याने सगळे योगाभ्यास सकाळी  किंवा संध्याकाळी करावेत.

ध्यानाचे फायदे किती सांगावे तितके कमीच ! वीस मिनिटाच्या ध्यानाने चार ते पाच तासांच्या झोपे इतकी विश्रांती मिळते. ध्यान मनाचा आणि मेंदूचा व्यायाम आहे. विश्रांती, जागरूकता आणि एकाग्रता येते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. ध्यानानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासून येणारी ऊर्जा डोळ्याला स्पर्श करावी. व  हळुवार डोळे उघडावे. जेव्हा शंभर लोक एकत्र ध्यान करतात, तेव्हा त्याच्या लहरी पाच कि.मी. पर्यंत पसरतात. आणि नकारात्मकता नष्ट करतात. हॉवर्ड येथील ‘ सारा लाझर ‘ हिच्या टीमला कळून आले की,, ” माईंड फुलनेस मेडिटेशन” खरोखरच मेंदूची रचना बदलू शकतो. आठ आठवडे माइंड फुलनेस आधारित “स्ट्रेस रिडक्शन हिप्पो कॅम्पस”  मध्ये कॉर्टीकल  जाडी वाढवते. जे शिकणे आणि स्मरणशक्ती नियंत्रित करते. .मेंदूच्या अभ्यासाने अहवाल दिला आहे की व्यक्तीनिष्ठ चिंता आणि नैराश्याच्या पातळीपासून मुक्त होण्यास एकूणच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. दर आठवड्यास नवीन अभ्यास समोर येत आहेत. काही प्राचीन फायदे जे आत्ताच एफ. एम .आर. आय .किंवा  इ.ई.जी. सह पुष्टी होत आहे. खरोखरच ध्यान आपल्या सर्वात महत्त्वाच्या अवयवांमध्ये मोजता येण्याजोगे बदल घडवून आणते.ऐलिन लुडर्स यांनी आणखी एक संशोधन करून सांगितले की, ध्यानामुळे मेंदूतील करड्या द्रवामध्ये वाढ होते. जे विचारक्षमतेचे मुख्य स्रोत असते.एम्मा  सेप्पाला या प्रसिद्ध वैज्ञानिक आणि कॅलिफोर्निया स्टॅनफोर्ड विश्वविद्यालय येथील संशोधिका यांनी सांगितले की, ध्यानाने स्मरणशक्तीत वाढ होते व बौद्धिक पातळी उंचावते.   सृजनशीलता वाढते. मनाची साफसफाई होते याची शक्ती आपल्या गुलामी आणि प्रकृती यांचा प्रतिकार करण्यास समर्थ होऊन आनंदात पोहोचवते. भावनिक स्थिरता वाढते तसेच वैचारिक आणि भावनिक केंद्रशांत राहतात ध्यानाने अमिग्डालाचा आकार कमी होतो जो ताणतणावाने वाढतो.

अंधशाळेतले मुलं स्वतःमध्ये स्थिर राहून भजन किंवा कविता म्हणतात .योग साधना कोण करू शकतो? तर युवा, वृद्धो  वा अतिवृद्धो वा, व्याधीतो दुर्बलोपिवा /  अभ्यासात सिद्धि- माप्नोती , सर्व योगेष्वतंद्रितः//

अष्टांग योगातील पाच बाह्यंगे आणि धारणा ,ध्यान ही अंतरंगे साध्य झाली की, शेवटची समाधी  या पायरी पर्यंत जाता येते. समाधीत ज्ञानग्रहण होते. अनेकांना सिद्धीही प्राप्त होतात. समर्थ रामदास ,ज्ञानेश्वर माऊली, आणि अनेक संतांना सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे तर ,पुणे येथील डॉक्टर प. वि. वर्तकांनी समाधी स्थितीत ‘ मंगळ ‘ ग्रहावरील वर्णन पाहिले. आणि तेथे लाख वर्षांपूर्वी पाणी आणि शेवाळ होते असे 1975 साली सांगितले .त्यानी सांगितलेले सर्व मुद्दे खरे असल्याच्या बातमी नुसार 1986 साली, त्यांचे विवेकज्ञान सत्य असल्याचे सायन्सच्या संशोधनानी सिद्ध झाले. नंतर त्यानी ‘ गुरु ‘ ग्रहाचेही वर्णन सांगितले. अमेरिकेतील डॉक्टर दीपक चोप्रा यांनी लिहिलेले “क्वांटम हीलिंग “

हे पुस्तक बेस्ट सेलर बुकच्या यादीत आलेले आहे. त्यात त्यांनी योगाचा अभ्यास वैद्यकीय उपचारांनाही कसा पूरक ठरतो,, तसेच ज्ञानाच्या  माध्यमातून  खोल मनापर्यंत  पोचून, अडचणी समजून घेऊन ,मनातला गुंता सोडविता येतो . तसेच ध्यानाच्या माध्यमातून आजार बरे करण्यास कशी मदत होते, हे सविस्तर पुस्तकात सांगितले आहे.

श्री. श्री .रविशंकर यांच्या “आर्ट ऑफ लिविंग ” च्या ऍडव्हान्स मेडिटेशनच्या कोर्समध्ये आम्ही कितीतरी ध्यानाचे प्रकार शिकलो. पंचकोष, ओरा, ओँकार, चंद्र, (पौर्णिमेचा), सूर्य ,शरीरातील षटचक्रांवरचे हरी ओम, असे कितीतरी ध्यानाचे प्रकार शिकून खूप आनंद मिळवला. दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये लोक हे ज्ञान आत्मसात करत आहेत. रामदेव बाबांचीही शिबिरे चालू आहेत. योगाचे अनेक शिक्षकही तयार झाले आहेत. शालेय पातळीपासून अभ्यास व्हायला हवा. जागोजागी स्पर्धा, ताण-तणाव दिसत आहेत .अशा वेळी स्वच्छ , निर्मळ,  आणि निरामय आरोग्यासाठी योग साधनेचीच गरज आहे .आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी 21 जून हा ‘जागतिक योग दिवस,’ आणि 21 मे हा ‘जागतिक ध्यान दिवस ‘ असे म्हणून अधिष्ठान दिले आहे. त्याचा परिणाम ही जाणवू लागला आहे .सर्वजण मिळून सर्वांसाठी प्रार्थना करूया.

//सर्वेपि सुखिनः  सन्तु, सर्वे संतु निरामयः//.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रेमाचं वय…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “प्रेमाचं वय…” ☆ श्री मंगेश मधुकर 

रविवारची संध्याकाळ मला नेहमीच अस्वस्थ करते.उगीचच उदास वाटतं.आजसुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती. टीव्हीत मन रमलं नाही.मोबईलचा कंटाळा आला.काय करावं सुचत नव्हतं.एकदम ब्लॅंक झालो.टेरेसवर जाण्याची लहर आली.सौंना आश्चर्य वाटलं.तसंही बऱ्याच महिन्यात गेलो नव्हतो.दोन मजले चढून टेरेसवर आलो.आजूबाजूला नव्या-जुन्या बिल्डिंग्जची गर्दीच गर्दी वायरचं पसरलेलं जाळं त्यावर बसलेले कावळे,कबुतरं नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी पाहून जरा बरं वाटलं.टेरेसवर शांतता होती.कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून सहज दिसणार नाही अशी जागा पाहून बसलो.बेचैनी कमी झाली तरी मनात वेगवेगळे विचार सुरूच होते.इतक्यात बारीक आवाजात बोलण्याचा आवाज आला…..  

“ए,काल संध्याकाळी काय झालं.”

“काही नाही”

“बोल की,येस की नो”

“अजून मी फायनल सांगितलं नाही.”

“लवकर सांग.आधीच उशीर झालाय.”

“तुलाच जास्त घाई झालेली दिसतेय”.

“उगाच भाव खाऊ नकोस.मी मधे नसते तर काहीच झालं नसतं”

“फुकट केलं नाहीस.दोघांकडून गिफ्ट घेतलय.तेव्हा जास्त उडू नकोस.”

“ओ हो!!बॉयफ्रेंड काय मिळाला लगेच बेस्ट फ्रेंड उडायला लागली.”

“मार खाशील.गप बस.ममीचा मोबाईल आणलाय.तिला कळायच्या आत त्याच्याशी बोलू दे”

“लवकर फोन लाव.स्पीकरवर टाक”

“गावजेवण नाहीये.कुणी ऐकलं तर..कान इकडं कर.दोघी मिळून ऐकू”नंतर फक्त दबक्या आवाजात बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता.फोन बंद झाल्यावर पुन्हा नॉर्मल बोलणं सुरू झालं. 

“आता पार्टी पाहिजे”

“कशाबद्दल”

“बॉयफ्रेंड मिळाला”

“तो तर मिळणारच होता.बघितलं ना कसला पागल झालाय.नुसता बघत रहायचा.”

“हा तू तर ब्युटी क्वीनच ना”

“जळतेस का?”

“माझा ही आहेच की..”

“तोंड पाहिलं का?ज्याच्यावर मरतेस तो तर बघत पण नाही आणि तू उगाच …”

“माझं मी बघेन.जास्त शायनिंग मारू नकोस.बॉयफ्रेंड टेंपररी पण मैत्री परमनंट आहे.लक्षात ठेव.”

“ए गपयं.सेंटी मारू नको.”

“अजून काय म्हणाला सांग ना”

“तुला कशाला सांगू.आमचं सिक्रेट आहे”

“ते फोडायला एक मिनिट लागणार नाही.आता सांगतेस की ………..”

“तो फार अडव्हान्स आहे”

“असं काय केलं”

“करायला अजून नीट भेटलोय कुठं?”

“मग नुसती पोपटपंची”

“ती सुद्धा जाम एक्सयटिंग आणि अंगावर काटा आणणारी”

“मामला अंगापर्यंत पोचला.लकी आहेस”

“सालं,माझ्याकडे मोबाईल नाही त्यामुळे सगळा लोचा होतो.आमचं नीट बोलणं होत नाही.”

“त्यालाच सांग की घेऊन द्यायला”

“त्याच्याकडे आईचा जुना फोन आहे.मागितला तर आधी किस दे म्हणाला”

“अय्यो..”खी खी हसण्याचा आवाज आला.तितक्यात खालच्या मजल्यावरून जोरजोरात हाका सुरू झाल्या तेव्हा घाबरून ताडकन उभ्या राहीलेल्या दोघी स्पष्ट दिसल्या पण त्यांना मी दिसलो नाही.दोघी धावत खाली गेल्या.टेरेसवर मी एकटाच होतो.खरं सांगायचं तर मुलींचं इतकं ‘बोल्ड’ बोलणं  माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला पचनी पडलं नाही.नवीन पिढी खूप फास्ट आहे याची कल्पना होती तरीही एवढी फास्ट  असेल असं वाटलं नाही.जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता कारण एक सहावीत शिकणारी अन दुसरी सातवीत. 

नकळत नव्वदच्या दशकातले शाळेतले दिवस आठवले अन हसायला आलं.ते लहानपण म्हणजे मित्र,मित्र आणि मित्र यापलीकडे काही नव्हतं.भरपूर खेळायचं अन अधे-मधे अभ्यास असं चालायचं.‘प्रेम’ वगैरे गोष्टींची जाणीव नववीत गेल्यावर व्हायची.एखादी आवडायची मग स्वप्नं गुलाबी व्हायची.तिच्यावरून चिडवणं,त्यावर मित्रांमध्ये नुसत्याच चर्चा.कृती काही नाही.लपून छ्पून बघणं चालायचं.खूप इच्छा असूनही बोलायची हिंमत नव्हती.मुलींशी बोलताना भीती वाटायची.तिथं प्रेम व्यक्त करणं तर फार लांबची गोष्ट.त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती.वडीलधारे,शिक्षकांचा धाक,दरारा होता.मार पडेल याची भीती वाटायची.आता मात्र सगळंच खूप सोपं आणि सहज झालंय.” अशा विचारांची लागलेली तंद्री सौंच्या आवाजानं तुटली.

“काय झालं” तिनं विचारलं. तेव्हा नुकताच घडलेला प्रसंग सांगितला.

“मग यात विशेष काही नाही हा वणवा सगळीकडेच पेटलाय.घर घर की कहानी.थॅंक्स टू मोबाईल आणि इंटरनेट.”

“मुलं अकाली प्रौढ होतायेत हे चांगलं नाही.” 

“कारट्यांना,अजून धड नाक पुसता येत नाही अन प्रेम करतायेत”सौं हसत म्हणाली.

“हे सगळं उथळ,वरवरचं आहे.काळजी वाटते.”

“कसली”

“हे सगळं कुठं जाईल??आणि बालपणीचा निरागसपणा कुठंयं ?

“तो तर केव्हाच संपला.आता मुलांचं भावविश्व बदललयं.बॉयफ्रेंड/गर्ल फ्रेंड असणं हे प्रेस्टीज मानलं जातं. त्यासाठी वयाची अट नाही.याविषयी प्राउड फील करणारेही आजूबाजूला आहेत.आता बालपण लवकर संपतं कारण…” 

“ प्रेमाचं वय् अलिकडं आलंय” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिवरायांचे आठवणीत असलेलं चित्र(पट)रूप ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

शिवरायांचे आठवणीत असलेलं चित्र(पट)रूप ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेबांचं चरित्र आणि चारित्र्य रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा नजरेस पडलं त्याला २०२३ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली ! व्ही.शांताराम आणि बाबुराव पेंटर यांचे हे चित्रपट-कार्य ‘सिंहगड’ या शीर्षकाने १९२३ मध्ये चित्रपटगृहात झळकले होते…पण हा चित्रपट मूक होता. विशेष म्हणजे या चित्रपटाला एवढा उदंड प्रतिसाद मिळाला की सरकारला चित्रपटांवर मनोरंजन कर लावायची कल्पना सुचली…आणि त्यातून उत्तम महसूल प्राप्त होऊ लागला! १९२३ नंतर असे एकूण आठ मूक चित्रपट आले ज्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडले. १९३२ मध्ये व्ही.शांताराम यांनी महाराजांवरील पहिल्या बोलपटाचे दिग्दर्शन केले….आणि या चित्रपटाचेही नाव ‘सिंहगड’ हेच होते. यात मांढरे बंधूंपैकी सूर्यकांत यांनी महाराजांची भूमिका केली होती.    

शिवरायांचे चरित्रच एवढे रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे की आजही त्यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट तयार होत आहेत आणि होत राहतीलही. २०२४ पर्यंत या चित्रपटांची संख्या ४३ एवढी होती. शिवाय सर्जा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, अशांसारख्या चित्रपटांतही शिवराय दिसले.  दरम्यान दोन दूरदर्शन हिंदी मालिका आणि काही मराठी मालिकांमध्ये छत्रपतींचं कलाकारांनी घडवलेलं दर्शन झालं. विषयाचा केंद्रबिंदु असलेली शिवरायांची भूमिका साकारणं हे प्रत्येक कलाकारासाठी आव्हानात्मक असतेच असते. कारण महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा आवाकाच अतिविशाल आहे. 

महाराजांची भूमिका करणा-या कलाकारांपैकी अमोल कोल्हे, शंतनु मोघे, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शरद केळकर, रविंद्र महाजनी, महेश मांजरेकर ही काही नावे नजरेसमोर येतात. रितेश देशमुखही लवकरच आपल्याला छत्रपतींच्या भूमिकेत दिसतील. हिंदीत अक्षयकुमारही हे (भलतेच !) धाडस करून बसला आहेच ! या कलाकारांच्या अभिनयक्षमेतेविषयी आणि देखणेपणाविषयी काही शंका नाही आणि प्रेक्षक त्यांचे आभारीही आहेत… वास्तविक छत्रपतीसाहेबांच्या व्यक्तिमत्वाविषयी काही वर्णनं उपलब्ध आहेत. यात महाराजांची शारीरिक उंची बेताची होती हे सर्वच वर्णनात आढळते. असो. साधारणत: महाराजांएवढी शारीरिक उंची असणारे अमोल कोल्हे आणि चिन्मय मांडलेकर आणि सुबोध भावे हे कलाकार आपण पाहिले आहेत. परंतु साधारणपणे आजपासून सत्तर वर्षे मागील पिढीतील प्रेक्षकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जर कोणी अढळ स्थान मिळवलेले असेल तर ते चंद्रकांत मांढरे यांनी. अर्थात चंद्रकांत यांची उंची जास्त होती आणि चेहराही महाराजांच्या उपलब्ध चेह-याशी मिळता-जुळता नव्हता. त्यांचे बंधू सूर्यकांतही छत्रपतींची भूमिका करीत. पण भालजी पेंढारकरांनी चंद्रकांत मांढरेंच्या माध्यमातून ज्या रितीने शिवराय उभे केलेत..त्याला तोड नसावी ! चंद्रकांत यांचं या भूमिकेतील वावरणं अतिशय राजबिंडं, देखणं आहे. संवादफेक अतिशय निर्दोष. अभिनय राजांना साजेसा. एका प्रसंगात महाराज अफझलखानाच्या भेटीस निघालेले आहेत..खान दगा करणारच याची खात्री असल्याने महाराजांनी वाघनखे जवळ बाळगली आहेत. ती वाघनखे पोटाशी लपवून ठेवल्यानंतर एका विशिष्ट निग्रहाने,आत्मविश्वासाने छत्रपती आपली नजर समोर करून पाहतात….अतिशय भेदक भासली चंद्रकांत यांची नजर या प्रसंगातील अभिनयात….वाटलं खुद्द शिवराय बघताहेत मृत्यूच्या डोळ्यांत डोळे घालून! 

हा चित्रपट कृष्णधवल अर्थात ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट होता. पण नंतर नजीकच्याच काळात चंद्रकांत यांचं महाराजांच्या भूमिकेतील रंगीत छायाचित्र उपलब्ध झाले ते या लेखात दिलं आहे. 

बहुदा याच चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगी ‘सेट’वर दिग्दर्शक भालजी पेंढारकर आलेले असताना शिवरायांच्या वेशभूषेत असलेल्या चंद्रकांत हे भालजींना नमस्कार करण्यासाठी खाली झुकू पहात असताना भालजींनी त्यांना, “आपण छत्रपतींच्या वेषात आहात..आपण असं कुणाला वंदन करणं योग्य दिसत नाही” अशा आशयाचं सांगितलेलं वाचनात आलं! विषयाचं गांभीर्य जाणणारे भालजींसारखे दिग्दर्शक मराठीला लाभले, हे सुदैवच !   

हरी अनंत..हरी कथा अनंत असं देवाच्या बाबतीत म्हणलं जातं. शिवरायांच्या कथांच्या आणि त्यांच्या रुपांबाबतही असंच म्हणता येईल. मात्र ही रूपं विविध माध्यमांतून साकारणा-या कलाकारांनी विशिष्ट भान बाळगून असावे असे मात्र वाटते. 

जी बाब चित्रपटांची तीच बाब महाराजांच्या चित्रांबाबत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वेगवेगळ्या प्रकारची असंख्य चित्र उपलब्ध आहेत. त्यात अनेक कलाकारांनी त्यांच्या त्यांच्या कल्पनेनुसार चित्रांना चेहरा,उंची आणि वेशभूषा दिलेली दिसते. त्यावरून अनेक प्रतिकृतीही विक्रीसाठी आलेल्या दिसतात. झेंड्यांवरील चित्रेही एका विशिष्ट चेह-याची आढळतात. पण या सर्वांत लक्ष वेधून घेते ते श्रेष्ठ चित्रकार गोपाळ बळवंत कांबळे यांनी १९७४ मध्ये साकारलेलं महाराजांचं तैलचित्र. महाराष्ट्र शासनाने हे अधिकृत चित्र म्हणून स्विकारलेलं आहे आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हेच चित्र प्रदर्शित केलेलं दिसतं. चित्रपटांची मनमोहक भव्य बॅनर्स रंगवण्यात हातखंडा आणि राष्ट्रीय प्रसिद्धी असेलेल्या गोपाळ बळवंत उर्फ जी.कांबळे यांनी हे चित्र काढण्याबद्दल एक पैसाही मोबदला घेतला नव्हता…ते म्हणाले होते…”देवाच्या चित्राचा मोबदला घ्यायचा नसतो!” या अधिकृत चित्रनिर्मितीचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे… (१९७४-२०२४) ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवरायांचे हे चित्र सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरले जावे, असे वाटते. त्यातून एकवाक्यता दिसेल. असो. 

आपल्या राजांना आपल्या नजरेसमोर आणणा-या सर्व कलाकारांना, लेखकांना, शिव अष्टक संकल्प घेतलेल्या दिग्पाल लांजेकरांसारख्या दिग्दर्शकांना, संगीतकारांना, गायकांना, मूर्तीकारांना, शिल्पकारांना, वक्त्यांना, इतिहासकारांना साष्टांग दंडवत ! प्रातिनिधीक स्वरूपात चंद्रकांतजी मांढरे, भालजी, यांचा चित्रांद्वारे उल्लेख केला आहे. हे केवळ शिव-स्मरणरंजन आहे. ऐतिहासिक प्रमाण असलेलं अभ्यासू लिखाण नाही… 

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

© संभाजी बबन गायके

पुणे

मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अतिथि… – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ अतिथि… – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

“मी आजच्या  अतिथींना   विनंती  करतो की,  त्यांनी  दीप प्रज्वलन  करावं…..”

असं निवेदक म्हणाला 

आणि  स्मितहास्य  फुललं.

अतिथी. … !

माझ्याशी महिनाभर  आधी  बोलून   तारीख , वार , वेळ  नक्की  करून  कार्यक्रम  सादर  करण्यासाठी  निमंत्रित  केलेला मी  ‘अतिथी ‘कसा  काय  ठरलो?

तिथी , वार,  वेळ  न ठरवता  जो  येतो  तो  अतिथी.

पण  अगदी मोठमोठय़ा  कार्यक्रमाच्या  पत्रिकेतदेखील ‘प्रमुख  अतिथी’ अमुक अमुक  असं चक्क  दहा  दिवस  आधीच  लिहिलेले  असतं.असो !

पण  खरंच  विचार  केला तर  आजच्या  काळ, काम,  वेग  या  बंधनात  पुरते गुरफटून  घेतलेल्या  टेक्नोसेव्ही मोबाईल  जगतात  ‘अतिथी ‘म्हणून  येणं  किंवा जाणं शक्य  आहे  का?

पंधरा- वीस  वर्षांपूर्वी  ही  मजा  नक्कीच  होती.

“कालपासून  तुझी  सारखी  आठवण  येत  होती  आणि  आज  तू  हजर “,  असं म्हणताना  तो  खुललेला चेहरा   दिसायचा.

“आलो  होतो  जरा  या  बाजूला.    बरेच  दिवस  भेट  नाही…”

“तुमच्या  हातची  थालीपीठांची आठवण झाली. चला  तेवढंच  निमित्त…”

“बसा  हो  भावोजी, कांदा  चिरलेलाच आहे. दहा  मिनिटांत थालिपीठ  देते आणि  आज दहीही फार  सुरेख  लागलंय  हो! आलेच. “

असा संवाद जर आज ऐकवला तर,  “बापरे ! किती  मॅनर्सलेसपणे  वागत  होती  माणसं ?   न  कळवता  असे  कसे  कोणाच्या  दारात  उभी  ठाकू शकतात  ?  भयंकर आहे.” अशा  प्रतिक्रिया  नक्कीच  येतील.

कारण  अतिथी  परंपरा  आता  कालबाह्य  झाली आहे. नव्हे,  ती  हद्दपार  होणे  किती  महत्वाचे आहे,  हे  आम्हाला  पटले  आहे.

आम्ही  स्वतःभोवती  एक सोयीस्कर  लहानसं  वर्तुळ  आखून  घेतलंय.  त्या  परिघामध्ये उपयुक्ततेनुसार  माणसं  वाढतात  किंवा  कमी  होतात.

“येतोय”..”निघालोय”. ..” बस मिळाली” ..”ट्रेन  पकडतोय”…”लिफ्टमधे आहे”… अशा अपडेशनमधे  कोठेतरी  अचानक  मिळणारा भेटीचा सुखद धक्का  हरवून  गेलाय.

परवा मुलीने  “अतिथी देवो भव”चा अर्थ  विचारला…

तिच्याच  भाषेत  सांगायचं  म्हणून  म्हटलं, “outdated software आहे.  हे आता नाही कुठे कुणी install   करत.”

एकदा आपल्या आवडत्या व्यक्तीला  न  सांगता, न कळवता, भेटून  तर  पहा.

old version किती user friendly होतं,  याचा  अनुभव   नक्कीच येईल .

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ 1. वसंत पंचमी… डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆ 2. शाळेची योग्य वेळ… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

? विविधा ?

☆ 1. वसंत पंचमी… डाॅ.व्यंकटेश जंबगी  ☆ 2. शाळेची योग्य वेळ… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

डाॅ. व्यंकटेश जंबगी

☆ 1. वसंत पंचमी… डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

“जय शारदे वागीश्वरी

विधिकन्यके विद्याधरी, वागीश्वरी”

ज्येष्ठ कवयित्री के.शांता शेळके यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ही रचना….

साक्षात सरस्वती मातेला आपल्या समोर उभी करते.

रसिकहो, वसंत पंचमी म्हणजे या विद्येच्या देवतेचा जन्म उत्सव!

ही सकल कला, संगीत आणि वाणीची देवता..केवळ श्वास घेतला म्हणजे जगणं नाही… मनुष्याच्या जीवनात विद्या,कला हवी.. त्याचबरोबर मधुर वाणी..

सरस्वतीच्या हातातील वीणा संगीत साधनेचे द्योतक आहे…

तिची शुभ्र वस्त्रे सात्विक भाव सांगतात…कमळ संसार सागरातून अलिप्तता शिकविते.

पूर्वी शाळेत पाटी पूजन असे.

आता पाटीच नाही..

हसरी, सुमुखी, उपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे मधुमती अशी ही सरस्वतीची मूर्ती.. हे स्वरूप.

“विद्या विनयेन शोभते!” हेच सांगते…

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

© डाॅ.व्यंकटेश  जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४ मो ९९७५६००८८७

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

☆ 2. शाळेची योग्य वेळ… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

शाळेची योग्य वेळ – 

1) आमचं बालपण 2) मुलांचं बालपण 3) शिक्षक म्हणून.  

कोकणातलं ठार खेडं. चालतच शाळेत जायचं. आमची पूर्ण प्राथमिक मराठी शाळा. पंचक्रोशीत एकच. ती दुबार भरायची. सकाळी 7.30 ते 10.30 दुपारी 2.30 ते 5.30.

पाच मैलांवरून येणाऱ्या मुलांनी कसं यायचं?केव्हा उठायचं? त्यांच्या दुपारच्या वेळेचं काय? जेवणाचं काय?हा विचार कोणीही का केला नव्हता ?  कारण  शिक्षण सार्वत्रिक नव्हतं. ब्राह्मणांची मुलं सातवी पर्यंत कशीबशी  शिकायची नि मास्तर व्हायची. बाकीची जरा जाणती झाली की “मुंबईक  जावन रामाबालू नायतर गिरणीत चिकटुची.” शहरातल्या  काही शाळा 11 ते 5 .तरी पहिली ते चौथी सकाळीच. का? माहित नाही.

2) आमची मुलं लहान असतानाही थोडीफार अशीच परिस्थिती होती.  मोठ्यांच्या शाळा, कॉलेजीस, ऑफिसेस दुपारी, पण लहान मुलांना मात्र सकाळचीच शिस्त (?) किंवा शिक्षा. कारण?

3) मी शिक्षक असताना  फारच दारूण अवस्था होती. आमची शाळा खेड्यातली. तरी टेक्निकल हायस्कूल. टेक्निकलचे वर्ग सकाळी. बाकीचे पाचवीते दहावी सर्व वर्ग 11त 5..गावातल्या पहिली ते चौथी प्राथमिक शाळा — जिल्हा परिषदेच्या. त्याही 11ते 5 होत्या. छान चाललेलं.

— मुलांची संख्या वाढली , तुकड्या वाढल्या. इमारत पुरेनाशी झाली. शाळा दुबार भरवणे हा पर्याय उरला. आणि  लहान मुलांवर संकट आलं. पाचवी ते सातवी 7.30 ते 12. आठवी ते आता दहावी कं12.30 ते6. दोन्ही शिफ्टच्या मधल्या सुट्टया लहान झाल्या. आमची शेतकऱ्यांची, मजुरांची मुलं त्यांच्या आयाही  कामाला जायच्या.  त्यांनी मुलांचे डबे कधी करायचे?बरींच मुलं बिन आंघोळीची यायची. कारण पाणी सुटलं तरी ते भरून ठेवायला हवं आयांना.  मुली तर आपापल्या वेण्या कशातरी गुंडाळून यायच्या. केस विंचरायला सवड नको? पहिल्या तासाला वर्गात घाण वास सुटलेला असायचा. पोट साफ करून तरी मुलं येतील ही शंकाच. मुलांना स्वच्छl रहाण्याचं शिक्षण कसं मिळायचं? शाळेची इमारत बांधणं ही काही साधी गोष्ट नव्हती. अशी सगळी आबदा.  इमारत होईपर्यंत असंच सगळं.

आता काही उपाय.–

1) शाळेच्या इमारती डामडौल नसलेल्या पण, मोठ्या, सर्व वर्गाना पुरतील अशा बांधाव्यात म्हणजे कमी खर्चात ऐसपैस असाव्यात. दोन शिफ्ट करण्याची वेळच येऊ नये.

2) मुंबई, पुण्याच्या सर्व स्त्रिया नोकरी करतातच. त्यांच्या मुलांची सकाळची शाळा त्यांना सोयीची. मुलांना सगळ्या तयारीनिशी एकदा शाळेत पाठवलं की स्वतःची तयारी. पण त्यात मुलांच्या झोपेचं, शीशूच काय? त्यांच्या बालपणावर उगीचच ताण, त्यांच्या आजी,आबांना ठेऊन घ्याव. ते निवांतपणे, प्रेमाने नातवंडांचं करतील, एकदा मुलांच्या बाजूने विचार केला की उपाय खूप आहेत. शब्द मर्यादेमुळे बास.   

© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

रिटायर्ड मुख्याध्यापिका

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416. मो. – 9561582372, 8806955070.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्षातून यशाकडे… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? मनमंजुषेतून ?

…बाळा, निवृत्त हॊ… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

(आई बाबांचे  पन्नाशीच्या मुलाला पत्र) 

प्रिय बाळा.. शुभाशीर्वाद. 

‘आईबाबा मी voluntary रिटायरमेंट घेऊ कां ?’ हा तुझा प्रश्न आणि आमच्याकडून  तुला हवं असलेलं उत्तर आणि अनुभवाचा सल्ला विचारण्याचा तुझा हेतू  लक्षात आला. तू भविष्याच्या विचाराने गोंधळून न जाता अवश्य रिटायरमेंट घे. आतापर्यंत धावपळीच्या सर्कशीत कितीतरी मोलाचे, सोन्यासारखे क्षण तुम्ही गमावलेत. तुला नोकरी लागल्यापासून सारखा पळतोयसच तु त्यापुढे तुला बायका,मुले,आई वडील यांच्यासाठी द्यायला जराही वेळ नाहीये.इतकं धाऊन-धाऊन काय मिळवता रे तुम्ही? पैसाच  नां?  अरे तो कितीही मिळवलास ना तरी अपुराच ठरतो. आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे बघ. हा गरीब वर्ग एका खोलीतच आपला स्वर्ग सजवतो. तेच स्वयंपाक घर.तिथेच हॉल आणि तिथेच बेडरूम . तुझे मात्र हिल स्टेशनवर दोन बंगले, फार्म हाऊस राहता प्रशस्त प्लॅट आहे .एवढी जागा, बंगले, खरंच लागतात का रे ? आणि तिथल्या शांततेचा अनुभव घ्यायला वेळ तरी मिळालाय का तुम्हाला?या सगळ्या धावपळीच्या चक्रातून तू बाहेर पड.  आता पन्नाशी उलटलीय तुझी . कुठेतरी थांबायलाच हवं. मिळवलेल्या पैशाचा उपभोग घेण्याची हीच योग्य वेळ आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करून रोग बळावले तर पुढील आयुष्यात कसा उपभोग घेणार तुम्ही या ऐश्वर्याचा? सेवानिवृत्त होऊन मोकळ्या हवेतला मोकळा श्वास घ्यायला तुझ्या फार्म हाऊस मध्ये जाण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि कुणासाठी  सांठवताय रे इतका पैसा ? मुलांना शिक्षण दिलेस. त्यांच्यासाठी भरपूर पैसा खर्च केलास. पण सहज मिळालेलं आयत  सुख मुलांना आळशी बनवतं . त्यांना त्यांच्या हाताने काहीतरी करू दे ना  जरा ! स्वावलंबी होण्याची सवय लागू दे त्यांना .तुझ्या बरोबर सुनबाई घरच्या राम रगाड्यात भरडली गेली. तिलाही मोकळी हवा मिळू दे.तिच्याही कष्टी मनाला तुझ्या प्रेमाचा शिडकावा हवाच की रे!आपल्या खानदेशात तुझ्या जन्मगावी तिला घेऊन जा.तापी काठची भरताची वांगी,  मेहरूंणची बोरं, उडीद ज्वारी घालून केलेली कळण्याची पौष्टिक भाकरी, भाकरीवरचा झणझणीत ठेचा, तो खातांना ठेच्याच्या झणझणीतपणा बरोबरच आनंदाचे अश्रू पण येतिल तिच्या डोळ्यातून ., ते बघ.

आता बेकारी, महागाई आभाळाला पोचलीय. ज्यांना नोकरी नाही अशांसाठी तू काहीतरी कर.तू तुझी जागा खाली कर म्हणजे नवतरुणांना नवीन जागा मिळेल.सूर्य नाही होता  येणार तुला. पण त्यांच्यासाठी आशेचा प्रकाशदिप तर होउ शकतोस ना तू?

तेव्हा बाळा आता निवृत्ती घे. आमच्या अनुभवाची शिदोरी घेऊन खऱ्या अर्थाने शांत,निवांत, निरामय आयुष्याचा आस्वाद घे. लहानपणीच्या आठवणीत रंगून जा. वर्तमानाचा आनंद घेऊन भविष्यकाळाची स्वप्न उज्वल कर.                 

सौ सुनबाईंना आणि आमच्या गोड नातंवंडांना शुभाशीर्वाद

तुझे हित चिंतणारे …. तुझेच हितचिंतक

सौ आई-बाबा.

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे.  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘सौभाग्यकांक्षिणी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

‘सौभाग्यकांक्षिणी‘ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

पोष्टमन ऽऽऽऽऽ….

ही हाळी ऐकून रावसाहेब धोतराचा सोगा सावरत लगबगीने  बाहेर आले …

सरकारकडून पत्र होतं ..

ते त्यांनी लगबगीनं फोडलं आणि एका दमात वाचून सरळ उभे राहिले. लगबगीने आत गेले व त्यांच्या कपाटातल्या एका खणात ते पत्र ठेवून त्यास कुलूप लावले व चावी कनवटीस लावली.

एक दीर्घ सुस्कारा सोडला.

तिथून निघाले. सरळ बाहेर आले.आत डोकावून त्यांनी मोठ्या आवाजात आवाज दिला.

‘जरा माळावर जाऊन येतो बरं.’

आणि परतीच्या प्रत्युत्तराची वाट न पाहता कसलीशी खूणगाठ मनाशी बांधली व आलेला हुंदका गिळला .बराच वेळ ते शून्यात  नजर लावून बसले होते.

दिवस ढळायची वेळ झाली, तसे ते सावकाश निघाले वाड्याकडे.

ते जरा गप्पच दिसत होते. ते पाहून सारजाबाईंनी विचारलेही, ‘काय झालं’ म्हणून.

पण ते ‘काही नाही’ म्हणून दुस-या विषयावर बोलू लागले.

‘सुनबाईंना कोण घेऊन येणार ? कधी येणार ? की आपण धाडू या मनोहरला ? (रावसाहेबांचा कारभारी) पण २/३ दिवस असा विचार चालला असता सुनबाईंना घेऊन तिचे भाऊ आले .

जुळी मुले अगदी जयंतसारखी दिसत आहेत. सारजाबाईंनी बाळंतिणीवरून भाकरतुकडा ओवाळून टाकला.घर कसं भरून गेल्यासारखं दिसत होतं.

वाड्यावर बाळांच्या आगमनाने चैतन्य आलं होतं.

दिवस कसे भराभर जात होते.अजय सुजय आता चालू लागले होते.थोडेथोडे बोलायचेदेखील.

सुनबाई आनंदी होत्या आता लवकरच मुलांचे बाबा येणार होते घरी.

‘मुलांना पाहून किती खूश होतील!’ह्या जाणिवेने ती पुलकित झाली..

पण मुलांच्या देखभालीत ती मामंजींना विचारायचे विसरून जायची की जयंत कधी येणार? काही पत्र आले का? रोज रात्री ती ठरवायची की उद्या विचारीन पण राहूनच जायचे.

आज मात्र तिने पदराची गाठच मारून ठेवली की सकाळी मामंजींना विचारायचेच.

सकाळी संधी साधून तिने ‘जयंत कधी येणार,याबद्दल काही कळले का?’ हा विषय काढला. तेव्हा रावसाहेब उत्तरले,

‘अग कालच त्याच्या ऑफिसवरून संदेश आला होता. त्याची ड्यूटी वाढली असल्याने  त्याला महत्त्वाच्या कामानिमित्त परदेशी पाठवलेय व ते मिशन गुप्त असल्याने तो पत्रव्यवहार नाही करू शकणार, असं सांगितलं त्याच्याऑफिसमधून.  कधी नव्हे तो तुला जरा विसावा मिळाला. तू दुपारी झोपली होतीस, म्हणून तुला सांगायचे राहून गेले .बरं झालं, तू आठवण काढलीस.’

ती जरा हिरमुसलीच.

आता काम संपणार कधी आणि जयंत येणार कधी ? मुलांना कधी भेटतील त्यांचे बाबा ? बाबांना कधी भेटतील त्यांची मुलं ?

ती विचार करू लागली.

तितक्यात सुजयच्या आवाजानं तिची विचारशृंखला तुटली  व ती मुलांच्यात गुंग झाली.

एक वर्ष उलटलं.

तिचं रोज वाट पाहणं सुरूच होतं.

मग रावसाहेबांनी भर दुपारी बातमी आणली की ‘टपाल कार्यालयात संदेश आलाय की जयंताला शत्रूच्या लोकांनी पकडलेय. तो कधी सुटेल काही सांगता येत नाही.’आणि सुनबाईच्या डोळ्यातून खळकन दोन टीपे गळली.

ती निर्धाराने म्हणाली, ‘मामंजी, ते येणारच सुटून. मी सावित्रीसारखी देवाला आळवेन. माझा विश्वास आहे देवावर. हे येतीलच.तुम्ही काळजी करू नका.’

दिवसांमागून दिवस गेले.

वर्षांमागून वर्ष.

सुजय, अजय आता कॉलेजला जाऊ लागले.

ते आपल्या आईला म्हणत,

‘आई, तुला वाटतं का की बाबा परत येतील?’

तशी ती चवताळायची व म्हणायची,’ते येणारच!

युद्धकैदी सोडतात ना त्यात तेही सुटतील!’

 सासुबाईंनीही डोळे मिटले, जयंताची वाट पाहत. मामंजी घरात फारसे राहत नसत .

पण सगळे सणवार, हळदी कुंकू साग्रसंगीत होत असे.

मुलांची लग्नेही जमली.

सगळे यथोचित पार पडले.

पण सुनबाईंचे वाट पाहणे मात्र थांबले नव्हते.

हल्ली मामंजी फारसे कोणाबरोबर बोलत नसत .एकटेच बसून रहायचे.

आणि एके दिवशी तेही गेले.

महिनाभराने मामंजींची खोली साफ करायला सुनबाई त्या खोलीत गेल्या.

त्यांना जयंताची सगळी पुस्तके,लहानपणीचे कपडे एका कपाटात व्यवस्थित ठेवलेले दिसले.

त्या एकेक वस्तू प्रेमाने हाताळत होत्या .जणू त्या वस्तूंमधून जयंत त्यांना दिसत होते .आतल्या खणात काय असावे बरं, इतके किल्ली कुलपात .?

मामंजी तर सगळे व्यवहार माझ्यावर सोपवून निवृत्त झाले होते .सासुबाईही कशात लक्ष घालत नसत.

मग  काय असावे बरे आत ?

त्यांनी तो खण उघडला.आत सरकारचे पत्र होते.

त्या मटकन खाली बसल्या

आणि वाचू लागल्या…

‘जयंत रावसाहेब भोसले सीमेवरील बॉंबहल्ल्यात  शहीद!’

दुसरे पत्र मामंजीचे. सुनबाईस.

‘चि.सौ.कां.सुनिता,

हो. मी तुला सौ.म्हणतोय कारण मला तुझ्या सौभाग्यलंकारात जयंतास पाहायचे होते .तुला विधवेचे आयुष्य जगू द्यायचे नव्हते .म्हणून मी जयंताची बातमी सर्वांपासून गुप्तच ठेवली होती. मला आणखी एक गोष्ट सिद्ध करायची होती की विधवेने कुलाचार केला तरी देव कोपत नाही. तू माझी स्नुषा नसून सुकन्याच आहेस. तुझ्या मंगळसूत्राने, तुझ्या कुंकवाने, तुझ्या हिरव्या बांगड्यांनी, तुझ्या जोडव्यांनी, तुझ्या किणकिण वाजणा-या पैंजणांनी मला घरात लक्ष्मीचा निवास असल्याचे जाणवायचे . 

तू अशीच सौभाग्यलंकार लेऊन रहा .व अखंड सौभाग्यवती म्हणूनच तुझे या जगातून जाणे होऊ दे.

ही या बापाची इच्छा पुरी कर.

     -तुझा पित्यासमान मामंजी.’

तिने पत्राची घडी घातली .

अगदी गदगदून पोटभर रडली.

शांतपणे आपले अश्रू पुसले.

कोणी नसताना दोन्ही पत्रे जाळली.

दिवाबत्ती केली.व सुनांच्या हळदीकुंकवाच्या तयारीला लागली.

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाळा मला समजून घेशील ना ? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

बाळा मला समजून घेशील ना ? ☆ श्री विश्वास देशपांडे

(नुकतेच अमळनेर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले. ते कितपत यशस्वी झाले याबद्दल वेगवेगळी मते/वाद ऐकायला मिळतात. त्या पार्श्वभूमीवर माझा पूर्वी लिहिलेला हा लेख)

रात्रीची शांत वेळ. शहरातली वर्दळ आता कमी झाली होती. रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले होते. कधी कधी रात्रीची शांत वेळ मला फिरण्यासाठी योग्य वाटते. बऱ्याच वेळा मी या गोदावरीच्या काठी येऊन बसतो. गोदामैया शांतपणे वाहत असते. तिच्या पात्रामध्ये दिव्यांचे छान प्रतिबिंब पडलेले असते. आजबाजूला असणाऱ्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर गॊदामैयाचे हे रूप मला भावते. दिवसभर तिच्या काठाशीही वर्दळ असते. भाविक येतात, व्यापारी येतात,श्रीमंत, गरीब, लहान थोर सारे सारे गोदामाईचा आश्रय घेतात. पण रात्री आपापल्या मुक्कामी निघून जातात. गोदामाई काही म्हणत नाही. पण रात्रीच्या शांत वेळी तिच्या तीरावर जाऊन बसावं. ती यावेळी निवांत असते. दिवसा तिला काही बोलावसं वाटत नसलं तरी यावेळी ती आपलं मन मोकळं करते. 

असाच मी तिच्या कुशीत जाऊन बसलो. अंमळ थंडीच होती. पण तिच्याजवळ बसलं की सगळं काही विसरायला होतं. माई म्हणाली, ‘ आलास. ये. बैस जरा. तुला खूप काही सांगायचं आहे. पण त्या आधी तिकडे पलीकडे माझी सखी उभी आहे. आम्ही दिसायला वेगवेगळ्या असलो तरी माझा आणि तिचा आत्मा एकच आहे. तू माझ्याकडे जसा हक्काने येतोस, तसाच तिच्याकडेही जा. तिची थोडी विचारपूस कर. मग पुन्हा तुझ्याशी बोलायला मी आहेच. ‘ मी म्हटलं, ‘ माई, तू काळजी नको करुस. मी जातो लगेच तिच्याकडे आणि तिला काय हवं नको ते पाहतो. ‘ 

मी गेलो. खरंच भरजरी वस्त्र लेऊन एक कुलीन, घरंदाज स्त्री उभी होती. कपाळावर कुंकवाचा टिळा होता. मुद्रेवर न लपणारं विलक्षण तेज होतं. मी तिला प्रणिपात केला. म्हटलं, ‘ मला गोदामैयाने पाठवलं तुमच्याकडे. कोण आपण .? मी आपल्याला काही मदत करू शकतो का ? 

क्षणभर ती माऊली स्तब्ध होती. मग म्हणाली, ‘ असं परक्यासारखं नको बोलूस रे. मी तुझी आईच आहे. एका आईनं तुला जन्म दिला. मी तुला शब्द दिले, भाषा दिली. शेतामध्ये धान्य पेरतो. नंतर ते अनेक पटींनी परत मिळतं. तशी लहानपणापासून तुझ्या अंतरात मी शब्दांची पेरणी केली. ती भाषेच्या रूपाने तुझ्या लेखणीतून, वाणीतून प्रकट झाली. आता तरी लक्षात आलं ना की मी कोण आहे ते ! 

‘ होय माते, तू तर माझी माय. माय मराठी. मला लक्षातच आलं नाही आधी. मला क्षमा कर. ‘ 

‘ असू दे लेकरा. चालायचंच. तुझा काही दोष नाही त्यात. ‘

पण माते मला सांग, तू आता इथे कशी काय ? 

अरे तुझ्या लक्षात नाही आलं का ? दोन तीन दिवस इथे साहित्य संमेलन होतं ना…! म्हणून आले होते खूप आशेने !

‘ पण माते मला सांग तुझी ही अशी अवस्था कशानं झालं ? तुझ्या अंगावरचा हा भरजरी शालू कशानं फाटला ? माये, तू तर श्रीमंत, धनवान. तुला कशाचीच कमी नव्हती. माझ्या ज्ञानोबा माउलींना तर तुझा केवढा अभिमान ! संस्कृतमधील गीता त्यांनी तुझ्यारूपाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. ज्ञानोबा माऊली म्हणाली, ‘ माझा मऱ्हाटीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ‘ खरंच माऊलींच्या शब्दाशब्दातून अमृताचे थेंब ठिबकत होते. म्हणूनच माऊलींनी तो वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वरी नंतर ‘ अमृतानुभव ‘ लिहिला. माऊलींनी सांगितलेल्या गीतेवरील टीका ‘ ज्ञानेश्वरी ‘ ऐकताना श्रोत्यांनी जे श्रवणसुख अनुभवलं त्याला तोड नाही. उपमा नाही. सर्वांगाचे जणू कान झाले. पुढे तुकोबांनी अभंग लिहिले. त्याची गाथा झाली. तुकोबांच्या मनाला भिडणाऱ्या तरल अभंगांनी इंद्रायणीसारखंच मराठी मनाला भिजवून चिंब केलं. समर्थ रामदासांनी दासबोध सांगितला. मनाचे श्लोक सांगून मनाला बोध केला. शिवरायांना ‘ जाणता राजा, श्रीमंत योगी, सामर्थ्यवंत, वरदवंत, कीर्तिवंत….’ अशी विविध सार्थ विशेषणे लावून तुझ्या श्रीमंतीचा प्रत्यय आणून दिला. 

संत नामदेव, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई अशा कितीतरी संतांनी तुझं वैभव वाढवलं. आमची निरक्षर असलेली बहिणाबाई इतकं सुंदर काव्य बोलली की भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान तर काय सांगावं…! त्यांच्या शब्दात सांगायचं तर  तू म्हणजे स्वातंत्र्यदेवतेसारखीच आहेस. 

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली 

स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली 

तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यही तूचि… 

या ओळी तुला सुद्धा लागू होतात. 

ग दि माडगूळकर, मंगेश पाडगावकर, भा रा तांबे, बा भ बोरकर यासारखे कवी, लोकमान्य टिळक, लोकहितवादी, विष्णुशास्त्री चिपळूणकर, आचार्य अत्रे, वसंत कानेटकर, पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी यांच्यासारख्या अनेक लेखकांनी तुझ्या अंगावर विविध रूपांचा साज चढवला. कविवर्य कुसुमाग्रज, वि स खांडेकर, विंदा करंदीकर यांनी तर मराठी साहित्यात जी भाषेची समृद्धी, श्रीमंती आणली, त्यामुळे साहित्य अकादमीला तुझी दखल घ्यावीच लागली. कुसुमाग्रज तर मराठी मातीबद्दल बोलताना म्हणाले…

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा

 काय बोलू, किती बोलू आणि कसं सांगू असं होतंय मला. आणि माते, तरीही तुझी आज अशी अवस्था ? ‘ 

‘बाळा, तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे. पण या सगळ्या पूर्वसुरींच्या गाथा आपण किती दिवस गाणार ? आता आपण काय करतो ते अधिक महत्वाचं नाही का ? आणखी काही दिवस जर माझ्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी अवस्था तू कल्पनाही करू शकणार नाहीस अशी होईल. अर्थात सुदैवाने मला माझ्या सुपुत्रांकडून आशा आहे. चांगले दिवस बघायला मिळतील याची खात्री आहे. पण त्यासाठी तुम्हाला हातपाय हलवावे लागतील रे….’ 

‘तू बघतोस ना की शाळांमधून दिवसेंदिवस मराठी भाषा हद्दपार होताना दिसते आहे. आवश्यक भाषा म्हणून काही शाळा नाईलाजाने शिकवतात ती ! मराठी माध्यमातून शिकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. हिंदी, इंग्रजी या भाषांबद्दल माझ्या मनात आकस नाही रे. पण लहानपणी मुलांना वाढीसाठी आईचंच दूध चांगलं असतं नाही का ? लहानपणी मुलाला आईचं दूध मिळालं तर त्याचा शारीरिक, बौद्धिक विकास निकोप होतो….’ 

‘साहित्य संमेलनात माझ्या वाढीसाठी खूप काही प्रयत्न होतील अशी मनात आशा ठेवून मी आले होते. तशी माझी अगदीच निराशा झाली नाही. पण कसं होतं ना, घरात मुलाचं लग्न झालं, सून आली की आईची तशी उपेक्षाच होते. तिला आई आई म्हणून म्हटलं जातं . पण घरात होणाऱ्या निर्णयात तिचा फारसा विचार घेतला जात नाही. तसंच काहीसं झालं आहे… ‘

‘माझी एक खंत आहे, सांगू का ? ‘

‘हो, सांग ना…! मलाही जाणून घ्यायचं आहे. ‘ 

ही दरवर्षी जी साहित्य संमेलनं घेतली जातात ना, ती चांगलीच गोष्ट आहे. पण माझा जो वाचक आहे, साहित्याचा आस्वाद घेणारा रसिक आहे त्याचा विचार कोणी करतं का ? मंडळाचे पदाधिकारी आणि राजकीय नेते जसं ठरवतील तसंच संमेलनाचं स्वरूप असतं. सामान्य माणसांचा विचार कुठे असतो त्यात ? मला राजकीय नेत्यांचं वावडं नाही. त्यांनी साहित्य संमेलनात जरूर यावं. पण केवळ एक रसिक म्हणून. व्यासपीठावर सारस्वतांचीच मांदियाळी असावी. संमेलनाची दशा, दिशा त्यांनीच ठरवावी. तुम्ही सगळ्या रसिक वाचकांनी ठरवलंत तर राजकीय नेत्यांची आर्थिक मदत घेण्याची गरज पडणार नाही. मला ते आवडतही नाही. कारण मग मूळ मुद्दे बाजूला राहतात. किरकोळ कारणांवरून हेवेदावे, धुसफूस होते. आरोप होतात. संमेलनाला गालबोट लागते. तुला म्हणून सांगते. जेव्हा व्यासपीठावर कार्यक्रम सुरु होते ना, तेव्हा मी व्यासपीठावर नव्हतेच ! तुमच्यामध्ये पण बसलेले नव्हते. मी उभी होते एका कोपऱ्यात. आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे कोणाचं लक्ष जातं ? उत्सव माझा, माझ्या नावानं सगळं पण उपेक्षित मीच ! तू जे मघाशी विचारलंस ना की हा भरजरी शालू कशानं फाटला, त्याचं कारण आता तुझ्या लक्षात आलं असेल. नाही म्हणायला मला एका गोष्टीचा आनंद झाला. मराठी वाचकांचा टक्का वाढल्यासारखा मला दिसतो. कारण ग्रंथविक्री विक्रमी झाली…’ 

‘अनेक नवोदित कवी, लेखक नवनवीन साहित्य लिहून मोलाची भर घालताहेत. तरीही मला वाटतं की अजून उत्तमोत्तम, कसदार साहित्य निर्माण व्हावं. त्या साहित्याच्या वाचनाने नवीन पिढ्या समृद्ध व्हाव्यात. हे साहित्य संस्कार देणारं असावं, जगणं शिकवणारं असावं. सामान्य माणसांच्या आयुष्याशी निगडित गोष्टींची चर्चा साहित्यात व्हावी. त्याला त्यापासून मार्गदर्शन मिळावं. सामान्य रसिक वाचक केंद्रस्थानी ठेवून लेखक, कवींनी लिहितं व्हावं. मराठी मातीत जन्मलेले अनेक सुपुत्र अनेक उच्च पदांवर काम करत आहेत. कोणी शास्त्रज्ञ, कोणी प्राध्यापक इ. पण यातली बरीचशी मंडळी इंग्रजीत लेखन करण्यात धन्यता मानतात. त्यांनी आपले विचार सर्वसामान्यांसाठी मराठीत मांडावे… ‘ 

‘शासनाकडून मला फार अपेक्षा नाहीत. माझ्या अपेक्षा तुमच्यासारख्या माझ्या सुपुत्रांकडून आहेत. वाचक, लेखक, कवी यांनी मला समृद्ध करावे ही माझी अपेक्षा. साहित्य संमेलने व्हावीत ती तुम्हा सगळ्या रसिक वाचक, लेखकांच्या बळावर असे मला वाटते. त्यात उत्स्फूर्तता हवी, बळजबरीचा रामराम नको… ! बाळा, माझ्या मनातलं सांगितलं तुला. खूप काही बोलण्यासारखं आहे. पण सगळं सांगण्यातही अर्थ नसतो. समोरच्या व्यक्तीनं सुद्धा समजून घेतलं पाहिजे तरच सांगण्याला, बोलण्याला काही अर्थ उरतो. बाळा, घेशील ना मला समजून…? ‘ 

तिचे डोळे पाणावले होते. उरात हुंदका दाटून आला होता. मी तिच्या चरणांना वाकून स्पर्श केला. माझ्याजवळही आता शब्द नव्हते. मी फक्त एवढंच म्हटलं, ‘ आई, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हण…’ तिचा मोरपिशी हात पाठीवरून फिरला. काय नव्हतं त्या स्पर्शात ! ज्ञानोबा, तुकोबा, सावरकर, कुसुमाग्रज आदी सर्व मराठी सारस्वतांचे आशीर्वाद त्यात सामावले होते. मी भारावून वर पाहिलं, तर माऊली अदृश्य झाली होती. गोदामाई शांततेत वाहत होती. माईला मनोमन नमस्कार केला. तिची मूक संमती घेऊन मार्गस्थ झालो. दिव्यांनी रस्ते उजळले होते आणि तारकांनी आकाश… ! 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

सियाचिन…. जगाचं जणू छतच. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली युद्धभूमी आहे ही. आणि ह्या बर्फाच्या साम्राज्यावर आपले पाय रोवून उभे राहण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते आपल्या सैनिकांना. शून्याच्या खाली साठ सत्तर अंश तापमानापर्यंत खाली घसरणारा पारा जगणं हीच मोठी लढाई बनवून टाकतो. एवढं असूनही आपले जवान इथे रात्रंदिवस पहाऱ्यावर सज्ज असतात. यासाठी गरजेची असणारी शारीरिक, मानसिक क्षमता केवळ पुरूषांमध्येच असू शकते, असं वाटणं अगदी साहजिकच आहे. परंतू या समजुतीला खरा छेद दिला तो राजस्थानच्या उष्ण प्रदेशात जन्मलेल्या एका दुर्गेनं. तिचं नाव शिवा चौहान… अर्थात आताच्या कॅप्टन शिवा चौहान मॅडम. 

१८ जुलै १९९७ रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये जन्मलेल्या शिवाचे तिच्या वयाच्या अकराव्या वर्षीच पितृछत्र हरपले. राजेंदसिंह चौहान हे त्यांचं नाव. आईने, अंजली चौहान यांनी मग तिच्या आयुष्याची दोरी आपल्या हाती घेतली.

घरात त्या तिघी. तिची मोठी बहिण कायद्याचं शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात आणि शिवा मात्र चक्क सैन्यात जाण्याच्या जिद्दीने पेटून उठलेली. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचारच हा मूळात मोठ्या हिंमतीचा म्हणावा लागतो. शिवाने सिविल इंजिनियरींगमधली पदवी मिळवली ती केवळ सैन्यात जाण्यासाठीच.

सैन्यात भरती होण्याच्या कठीण मुलाखतीच्या दिव्यातून शिवा प्रथम क्रमांकाने पार पडल्या यातूनच त्यांच्या मनातली प्रखर जिद्द दिसून यावी. २०२० मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवला आणि पुरूषांच्या बरोबरीने कठीण शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पुढच्याच वर्षी त्यांना भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी रेजिमेंट मध्ये नेमणूक मिळाली. त्यांच्या विभागाचं नावच आहे ‘फायर अ‍ॅन्ड फ्यूरी सॅपर्स….’ अर्थात ‘अग्नि-प्रक्षोप पथक..’ हरत-हेच्या वातावरणात सैन्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारा विभाग. 

मागील दोन वर्षांपूर्वी चीनी सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजीत संघर्षात भीष्मपराक्रम गाजवलेले कर्नल संतोष बाबू याच विभागाचे शूर अधिकारी होते… त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते.

सैन्य म्हणजे केवळ हाती बंदूक घेऊन गोळीबार करणे नव्हे… सैन्याला अनेक विभाग मदत करीत असतात… अभियांत्रिकी विभाग यात खूप महत्वाचा असतो. आपल्या कथानायिका कॅप्टन शिवा चौहान याच ‘फायर अ‍ॅन्ड फ्यूरी’च्या अधिकारी.   

Spade म्हणजे फावडे. याचेच फ्रेंच भाषेतील अपभ्रंशित नाव आहे Sappe…सॅपं! त्या काळातील युद्धात किल्ले महत्त्वाचे होते. किल्ल्यांवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या भिंतींच्या अधिकाधिक जवळ जाणे गरजेचे असे. अशा वेळी त्यावेळचे अभियंते वरून झाकले जातील असे खंदक खणत आणि मग सैन्य त्या खंदकांतून पुढे पुढे सरकत जाऊन किल्ल्याच्या समीप जाई. यावरून सैन्यात सॅपर ही संज्ञा रूढ झाली ती आजपर्यंत. 

आधुनिक काळात या सॅपर्सचं अर्थात अभियांत्रिकी सैनिकांचं मुख्य काम असतं ते सैन्याला पुढे जाता यावं म्हणून रस्ते बांधणे, पूल बांधणे, भूसुरुंग पेरणं आणि शत्रूने पेरलेले भूसुरुंग शोधून ते नष्ट करणं. या कामांमध्ये अतिशय उच्च दर्जाची तांत्रिक क्षमता आणि अनुभव गरजेचा असतो. आपल्या सैन्यात बॉम्बे सॅपर्स, मद्रास सॅपर्स असे अन्य अभियांत्रिकी विभाग कार्यरत आहेत.  

कॅप्टन शिवा चौहान यांनी अगदी कमी कालावधीत अतिशय कर्तव्यतत्पर आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम अधिकारी म्हणून लौकिक प्राप्त केला. उंच बर्फाळ पहाड चढून जाणे, इतक्या उंचीवर अभियांत्रिकी कामांना अंतिम स्वरूप देणे इत्यादी कामांत त्या वाकबगार झाल्या.

त्यांच्या आधी महिला अधिकाऱ्यांना सियाचिन मधल्या १५६३२ फुटांवरील युद्धभूमीच्या खालील ९००० हजार फूट उंचीवर असलेल्या बेस कॅम्पपर्यंतच नेमणूक दिली जाई. उरलेली ६६३२ फूट उंची पार करणं तोपर्यंत एकाही महिलेला शक्य झालं नव्हतं. पण शिवा चौहान यांनी खडतर प्रशिक्षणं लीलया पार पाडली. 

सियाचिन भागात सायकल चालवणारी महिला हे दृश्यच अनेकांना कौतुकाने तोंडात बोट घालायला भाग पाडणारे होते. शिवा चौहान यांनी चक्क ५०८ किलोमीटर अंतर कापणारी सायकल मोहिम हाती घेतली आणि पूर्णही करून दाखवली. कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी ही अनोखी मोहिम यशस्वी केली. सियाचिन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारक अशी ही सायकल यात्रा कॅप्टन शिवा चौहान यांनी इतर पुरूष अधिकारी, सैनिक यांचे नेतृत्व करून पूर्ण केली, त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्द्ल कुणाच्याही मनात शंका उरली नाही. 

आणि यानंतर मात्र शिवा चौहान यांनी आणखी ६६३२ फूट उंचीवर जाण्याचा चंग बांधला… प्रचंड कष्ट घेऊन आवश्यक ती सर्व प्रशिक्षणं पूर्ण केली आणि जानेवारी २०२३ मध्ये त्यांना भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी म्हणून सियाचिन वर प्रत्यक्ष कामावर नेमण्यात आले… एका महिलेसाठी हा एक प्रचंड मोठा सन्मान मानला जावा! 

सैनिक हिमवीरांच्या मधोमध मोठ्या अभिमानाने बसलेल्या कॅप्टन शिवा चौहान ह्या नारीशक्तीच्या प्रतीकच आहेत. त्यांच्यापासून समस्त तरूण वर्ग निश्चितच प्रेरणा घेईल. भगवान शिवाचं वास्तव्य असलेल्या हिमाच्छादित पर्वत शिखरांवर शिवा नावाची पार्वतीच जणू भारतमातेच्या रक्षणासाठी बर्फात पाय रोवून उभी आहे! 

कॅप्टन शिवा चौहान, आपणांस अभिमानाने सल्यूट… जय हिंद ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print