मराठी साहित्य – विविधा ☆ रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

😅 रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“काय पंत आज तुमच्या घरातून t v चा आवाज नाही आला सकाळ पासून नेहमी सारखा.”

“अरे वैताग आणला आहे नुसता या tv वाल्यांनी!”

“काय केबल गेली की काय तुमची?”

“अरे केबलला काय धाड भरल्ये?  व्यवस्थित चालू आहेत सगळे चॅनेल्स.”

“मग तुमचा सखा सोबती आज मुका कसा?”

“अरे काय सांगू तुला, कुठलेही चॅनेल लावा सगळीकडे बजेट, बजेट आणि फक्त बजेट!  दुसरा विषयच नाही या लेकांना. नुसता उच्छाद आणलाय सगळ्या चॅनेलवाल्यांनी.”

“पंत, बजेट हाच सध्याचा गरम विषय आहे आणि त्यावर हे चॅनेलवाले आपली पोळी भाजून घेत असतील तर त्यात नवल ते काय?”

“तू म्हणतोस ते बरोबर आहे रे मोरू,  पण ज्यांना “अर्थसंकल्प” हा  शब्द सुद्धा नीट उच्चारता देखील येत नाही, असे लोक वायफळ चर्चा करून आपल्याला अर्थकारण समजावणार? “

“पंत, सध्या दिवसच तसे आलेत, त्याला आपण तरी काय करणार?”

“काय करणार म्हणजे, सरकारचा रिमोट जरी दिल्लीवरून चालत असला, तरी आपल्या t v चा रिमोट आपल्या हातातच असतो ना? मग ती वायफळ चर्चा ऐकण्यापेक्षा केला t. v. बंद!”

“पण पंत त्यात तुमचेच नुकसान नाही का?”

“त्यात कसले बुवा माझे नुकसान? उलट आता बजेटच्या आधीच विजेचे दर वाढलेत, मग t v बंद करून मी एक प्रकारे पैशाची बचतच नाही का करतोय?”

“पण पंत सरकारने कर सवलत किती दिली?  काय काय स्वस्त होणार? काय महाग होणार हे तुम्हाला कसे कळेल?”

“कसं म्हणजे, पेपर मधून, जो मी रोज सकाळी वाचायच्या आधी तूच लंपास करून वाचतोस!”

“काय पंत मी…. “

“अरे मस्करी केली मी तुझी. बर ते सगळे सोड, पण तुला माहीत आहे का, बजेट हा शब्द कुठून आला ते?”

“नाही खरच माहीत नाही पंत, मला कळायला लागल्या पासून अर्थसंकल्पाला इंग्रजी मधे बजेट म्हणतात एव्हढेच ठाऊक आहे!”

“तुला सांगतो ‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’ शब्दा पासून झाली. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा पूर्वी वापर करीत असत आणि या पिशवीला ते तेंव्हा ‘बुजेत’ असे म्हणत. पण अर्थशंकल्पला बजेट हा शब्द प्रचलित होण्या मागे एक गमतीदार किस्सा आहे बघ मोरू!”

“कोणता किस्सा पंत?”

 “अरे १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांच्या संसदेत आले होते. येताना त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणली होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी उघडतांना  त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला. मग काय, तेव्हापासून जगभरात बजेट हाच शब्द प्रचलित झाला.”

“पंत, फारच मनोरंजक आहे हा बजेट शब्दाचा इतिहास. बजेट शब्दा बद्दल तुम्हाला इतकी माहिती आहे, पण खऱ्या बजेट मध्ये तुम्हाला खरच इंटरेस्ट नाही याचेच जरा नवल….. “

“अरे इंटरेस्ट असला काय आणि नसला काय, रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे भाग आहे ना? आणि मला असे एक तरी उदाहरण सांग ना, की अमुक एका बजेट नंतर अमुक तमुक गोष्टींच्या किमती खाली आल्या म्हणून?”

“तसच काही नाही, काही काही गोष्टी खरच स्वस्त…… “

“होतात, होतात पण तात्पुरत्या, परत ये रे माझ्या मागल्या. नंतर तुझ्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्याची सवय होवून जाते!  You know,  public memory is very short.”

“हो, पण पंत आपल्या बजेटची साऱ्या जगात चर्चा होते आणि……”

“त्याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम होतो वगैरे, वगैरे, असेच ना? अरे मोरू म्हणून बजेट वाचतांना कविता वाचून आणि कथा सांगून कितीही साखरपेरणी केली, तरी प्रत्यक्ष महागाईचा सामना करतांना सामान्य माणसाचे  तोंड कडवट होतेच, त्याचे काय? “

“तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे पण…… “

“पण बिण सगळे सोड, मला एक सांग, आपण कितीही संकल्प केले तरी आपल्या खिशातल्या अर्थाला ते झेपायला नकोत का? अरे आपल्या घरचे महिन्याचे बजेट  सांभाळतांना घरच्या फायनान्स मिनिस्टरची काय हालत होते हे तुला मी वेगळे सांगायची गरज आहे का?”

“हो बरोबर, या बाबतीत सगळ्याच आपल्या घरातल्या फायनान्स कम होम मिनिस्टरनां माझा सलाम! महागाईचा कितीही भडका उडाला तरी घरातले बजेट सांभाळणे त्याच  जाणोत! पंत पटल बुवा तुमच म्हणण.”

“पटल ना, मग आता आमचा तू नेलेला आजचा पेपर आणून दे बरं मुकाट, कारण t v बंद केल्याने तोच आता माझा सखा सोबती!”

“तरी पण तुमच्या सारख्या सिनियर सिटीझनने “बुजेत” मध्ये इंटरेस्ट न दाखवणे मला काही पटत नाही.”

“अरे त्यात न पटण्या सारखं काय आहे. सगळ्या बजेट मधे तेच तेच तर असत. एका हाताने दिल्या सारखे करायचे आणि दुसऱ्या दहा मार्गानी दोन हातांनी काढून घ्यायच! आता तो आकडयांचा खेळ खरंच नकोसा वाटायला लागलाय रे! अरे पूर्वी लाखावर किती शून्य सांगताना दमछाक व्हायची आणि बजेटचे सगळे आकडे लाख करोड मधे!  मग माझ्यासारख्या पामराचे काय होईल याची तू कल्पनाच केलेली बरी.”

“पंत, तरी पण माझा मुख्य प्रश्न उरतोच ना!”

“तू तसा ऐकण्यातला नाहीस माहित आहे मला. मोरू आता तुला शेवटचे एकच सांगतो, निर्मल मनाच्या कुठल्याही रामाच्या सीतेने जरी अर्थसंकल्प मांडला, तरी त्याला त्या त्या वेळचे विरोधक नांवच ठेवणार आणि त्या त्या वेळचे राज्यकर्ते मांडलेल्या बजेटची प्रशंसाच करणार, हा आजपर्यंतचा इतिहास आणि अलिखित नियमच आहे! त्यामुळे बजेट चांगले का वाईट या फ़ंदात न पडता, घरातले “बुजेत” सांभाळणाऱ्या घरच्या लक्ष्मीला माझे शतशः प्रणाम!”

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मदतीचा त्रास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ मदतीचा त्रास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

विशु आमची जवळची मैत्रीण.

स्वभावाने लाख, हुशार आणि मदतीस अगदी तत्पर.

गम्मत अशी, की विशूचा मनुष्य संग्रह अत्यंत मोठा… कोणतेही काम सांगा, हिच्याकडे त्यावर उत्तर तयार असते… बरं, यात तिला मोठेपणाही नको असतो… पण मदत करण्याची भारी हौस— 

हसू येईल सांगितले तर,.. पण हिच्या मदतीचा लोकांना त्रास होतो.

कसे म्हणताय?…… ऐका तर.

लेकाचे लग्न विशूने हौसेने केले. सूनबाईना वेगळा फ्लॅट आधीच घेऊन ठेवला होता. सूनबाई घरी प्रवेश करायच्या आधीच, विशूने, आपल्या हौसेने घर अगदी मस्त लावून टाकले.

सूनबाईने बघितले, आणि म्हणाली, “ मला हा नको होता फ्रीज. आणि मला हा रंग नाही आवडत भिंतींना. मला तरी विचारायचे ना आधी. ” 

…. झाले. एवढा खर्च, कष्ट करूनही दोघीही नाराजच.

तरी विशूची जित्याची खोड जात नाही. ती इतकी भाबडी आहे ना, की, समोरचा रागावूही शकत नाही.

सहज वीणा म्हणाली, “ बाई ग परवा केळवण करणार आहे, १0 माणसे यायची आहेत. , काही सुचत नाही बघ, काय मेनू करू, आणि कसे करू. ” 

विशूने तिला न विचारता, तिच्या समोरच एका बाईना फोन केला, आणि मेनूही सांगून मोकळी झाली.

वीणा म्हणाली, “ अग हे काय,. मी आहे ना इथे, मला विचार की. पैसे मी देणारे ना… आणि तुला कुणी सांगितलं मला बाई हवीय ? मी बघीन काय करायचे ते “.

ते विशूच्या गावीही नव्हते..

हल्ली लोक तिला बोलवेनासे झालेत. आली की सर्व सूत्रे हाती घेतलीच म्हणून समजा. भिडस्त लोकांना हे आवडत नाही पण बोलताही येत नाही.

…. तिलाही फटके कमी नाही बसत.. या स्वभावाचे.

कामवालीच्या उनाड मुलाला हिने नोकरी लावून दिली. ४ दिवसात मालकाचा हिलाच फोन. “ बाई कसला मुलगा दिलात–. गेला की काम सोडून. ” 

हिने विचारले कामवालीला, तर फणकाऱ्याने म्हणाली, “काय व बाई. असली नोकरी देतात व्हय? दुधाच्या पिशव्या टाकायच्या- तर कोण तिसऱ्या तर कोण पाचव्या मजल्यावर राहत्यात. पोराचे पाय दुखले, दिली सोडून नोकरी “.

…. विशू हतबुद्ध झाली.

शेजारच्या मुलीचे लग्न जमता जमत नव्हते. विशूच्या ओळखीचा एक मुलगा होता. हिने लगेच, त्या मुलीला, त्याचे स्थळ सुचवले. दोघे, भेटले, बोलले.

ती मुलगी विशूला म्हणाली, “काकू, कसला मुलगा सुचवलात हो. सगळे एकत्रच राहतात. केवढी माणसे, घरात. आणि त्याला पगारही माझ्यापेक्षा कमी. नका बाई असले मुलगे सुचवू. ”

…. बिचारी विशू.

आनंदी गुणी आहे विशू.

मागच्याच महिन्यात तिच्या नातवाची मुंज होती. मुलगा सून विशूकडे आले. म्हणाले, “ आई, कृपा कर. पण आम्हाला तुझी कोणतीही मदत नकोय. आमचे आम्ही समर्थ आहोत सगळं करायला. तुम्ही दोघे फक्त मुंजीला आणि सगळ्या कार्यक्रमाला या. ”…. थोडक्यात, तू अजिबात लुडबूड करू नकोस ही गर्भित धमकीच होती.

विशूला वाईट वाटलं. आमच्या कट्टयावर हिरमुसून बसलेली विशू बघून इतर मैत्रिणींनी विचारलं,

“काय ग काय झालं? “

विशूने घडलेली हकीगत सांगितली. आमची दुसरी मैत्रीण माया म्हणाली,

“आता तरी शहाणी हो ग बाई. तू चांगल्या भावनेने करायला जातेस पण लोकांना तुझी मदत आवडत नाही.

करू देत ग सून मुलगा हवी तशी मुंज. तू फक्त गप्प बस आणि त्यांच्या आनंदात सहभागी हो. अजिबात लोकांना यापुढे नको असलेली मदत करायची नाही. जमेल का एवढं?”

विशू म्हणाली, “ हो ग. मी हे पथ्य नक्की पाळेन. बघालच तुम्ही. ” 

आश्चर्य म्हणजे आता आमची विशू खरोखर सुधारली. कोणी विचारलं तरी सुद्धा ती हल्ली न मागितलेली मदत करत नाही की सल्ले देत नाही…

… त्यामुळे तिला सुख झाले. विशूची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.

©  डॉ. ज्योती गोडबोले 

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पुणे… खूप खूप पूर्वीचे…’ लेखक : श्री दिगंबर देशपांडे – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पुणे… खूप खूप पूर्वीचे…’ लेखक : श्री दिगंबर देशपांडे – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

पेशवाईच्या काळात पुणे हे ओढे, नाले, गर्द झाडी, अरूंद रस्ते, गल्ली-बोळ, बखळी, असंख्य मोठ्या बागा, मोकळी सपाट मैदाने यांनी वेढलेले होते. सदाशिव पेठ हे एक खेडे होते. त्याचे नाव “मौजे नायगांव” असे होते. हा भाग “कारकोळपुरा” म्हणुन ओळखला जात असे. अनाथ विद्यार्थी गृह, नृसिंह मंदिर, खुन्या मुरलीधर हा परिसर कारकोळपुऱ्यात येतो. चिमाजीअप्पांचे पुत्र “सदाशिवरावभाऊ” यांच्या स्मरणार्थ माधवराव पेशव्यांनी या पेठेचे नाव सदाशिव पेठ असे ठेवले.

त्या वेळी पुण्यात मोठमोठे वाडे होते. बहुतेक वाड्यांतुन एखादे झाड, विहीर / आड असे. तांबड्या जोगेश्वरीचे मंदिर हे पुण्याच्या वेशीवर होते. तांबडी जोगेश्वरी, हुजुरपागा, तुळशीबाग, बेलबाग या समोरून एक ओढा वाहत होता. पुण्यात हिराबाग, सारसबाग, मोतीबाग, माणिकबाग, रमणबाग, कात्रज बाग, नातुबाग, विश्रामबाग, बेलबाग, तुळशीबाग या सारख्या मोठ्या आणि विस्तीर्ण बागांचे “साम्राज्य” होते. फुले मंडईजवळ खाजगीवाल्यांची चकले बाग होती. बहुतेक ठिकाणी पेरू आणि बोरांची झाडे होती. भवानी पेठेत बोरांच्या झाडांची दाटी असल्याने या भागाला बोरवन असे म्हणत. पूर्वी पुण्याच्या मध्यवर्ती भागात वड, पिंपळ, चिंच ही झाडे विपुल प्रमाणात होती.

सध्या पर्वतीच्या पायथ्याशी जो कॅनॉल वाहतो आहे, त्याच्या दोन्ही तीरांवर गर्द झाडी होती. तसेच द्राक्षांचे मळेही सगळीकडे होते. आंबा, केळी ही झाडे वाड्यातून असत.

तुळशीबागेत रामाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी हिरवळीतुन पायवाट काढली होती. प्रभात रस्ता, डेक्कन जिमखाना या भागांत तर इमारती नव्हत्या. तेथे गवताच्या उंच गंजी होत्या. गायी म्हशींचे गोठे जागोजागी होते. सुरुवातीला शनिवारवाड्यासमोरील पटांगणात भाज्यांचा बाजार भरत असे. नंतरच्या काळात तेथे प्रवासी मोटार तळ झाला. चतु:श्रुंगीच्या मंदिर परिसरात घनदाट झाडी होती. विश्रामबागेच्या जागी हरिपंत फडक्यांची बाग, शनिपारापलीकडे नारोपंत चक्रदेवांची बाग, शिवाजी मंदिराच्या जागी सावकार गद्रे यांची बाग, पुणे विद्यार्थी गृहाच्या जागी सरदार रास्त्यांची बाग, त्याच्या अलीकडे नगरकरांची बाग अशी बागांची रेलचेल होती.

साधारण इ. स. १७००च्या आसपास पुण्याच्या आजुबाजूला मलकापुर, मुर्तजाबाद, शहापुर, शास्तापुर अशा छोट्या पेठा वसलेल्या होत्या. पुढे बाजीराव पेशव्यांनी मुर्तजाबादचे नाव बदलुन “शनिवार पेठ” असे ठेवले. शनिवार पेठेतल्या वीराच्या मारुतीच्या पुढे रस्ता नव्हता. इ. स. १७५३ मध्ये तळ्यातल्या गणपतीचे तळे नानासाहेब पेशव्यांनी मुद्दाम खणुन घेतले. या तळ्यातील पाण्यामुळे आजुबाजूच्या विहिरींना पाणी आले.

(सध्याच्या) टिळक स्मारक मंदिराच्या जागी पूर्वी पेशव्यांचा बंगला होता. त्याच्या आजुबाजुस मोठी बाग होती. या बागेला पाणी घालण्यासाठी विहीर खणली ती “खजिना विहीर” होय. नानासाहेब पेशव्यांनी १७५० साली हिराबाग बांधली. (येथे नाना साहेबांनी “मस्तानीला” नजर कैदेत ठेवले होते).

माती गणपतीच्या जागी सुद्धा घनदाट जंगल होते. मुठा नदीच्या किनारी असल्यामुळे तेथे मातीचे खूप ढिगारे होते. तेथे गुराखी, आपल्या गुरांना चारण्यासाठी आणत. हुजूरपागेच्या जागी घोड्यांची पागा / तबेले होते. नेहरू स्टेडियमच्या जागी तलाव होता. तो बुजवून तेथे स्टेडियम उभारले. (हल्लीच्या) लॉ कॉलेज रोडवरील फिल्म इन्स्टिट्यूटच्या जागी व्ही. शांतारामांचा “प्रभात स्टुडिओ” होता.

(“जुने पुणे आणि जुने वक्ते” या दिगंबर देशपांडे लिखित पुस्तकातुन साभार.)

लेखक : श्री दिगंबर देशपांडे

संग्राहक : अज्ञात 

प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घराला स्पर्श कळतात ?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

घराला स्पर्श कळतात ?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जिवावरच येतं. एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून निरोप देताना. मग मनातल्या मनात आपणच घराला सांगतो, “येतो परत आठ दिवसांत. तोवर सांभाळ रे बाबा.. “

तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं.

मग कधी कधी आठ दिवसांचे आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजासमोर उभे राहतो, त्या वेळचे समाधान काही वेगळेच असते. प्रवासाचा अर्धा शीण नाहीसा होतो.

पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं. दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं. मलूलतेची छाया पसरलेली असते. घर आळसावलेलं, रुक्ष, निर्जीव भासतं.

जाताना बदललेले कपडे, गडबडीत न विसळलेल्या कपबश्या, वह्यापुस्तकं, खेळण्यांचा पसारा….. आरशावर एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो. रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते,

फ्रीज उघडल्यावर उरल्या सुरल्या भाज्या, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटोचा येणारा दर्प. सिंक वॉश-बेसिन बाथरूम सुकून गेलेले असतात. वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅनसारखाच टांगणीला लागलेला असतो. भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं.

आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!

रुसलेल्या, रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते, मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते.

दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं. ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा बहाल करते. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते..

त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं.

घराला स्पर्श कळतात? हो. कळतात! त्याला आपली माणसेही कळतात. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात. आठवून पहा. काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात.

तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते, तेव्हा लाडात आलेल तिचं घर तिच्याकडे पाहत हसतं. तिलाही मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”… !

शेवटी “बाईच” घराची “आई” असते.. !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – गीता शास्त्र – भाग – ६ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ गीता जशी समजली तशी… गीता शास्त्र  – भाग – ६ ☆ सौ शालिनी जोशी

गीताशास्त्र

गीतेचा प्रत्येक शब्द जेवढा त्या काही आचरणी होता, तेवढा आजही आहे. कारण काळ बदलला तरी माणसाचा स्वभाव बदलत नाही. अर्जुनाला निमित्त्य करून भगवंतांना चिंता आहे सर्व मानव जातीच्या कल्याणाची. त्या दृष्टीने आवश्यक सर्व शास्त्रांचा समावेश गीतेत आहे. म्हणून गीतेला ‘सर्व शास्त्रांचे माहेर’ म्हणतात. जीवनाला प्रेरणा व योग्य मार्ग देणारा प्रत्येक विचार म्हणजे शास्त्र.

गीता हे नीती प्रधान भक्तीशास्त्र, आचरण शिकवणारे कर्मशास्त्र, ज्ञानाचा अनुभव देणारे अध्यात्मशास्त्र, संयम शिकवणारे योगशास्त्र आहे. अशा प्रकारे कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती यांचा समन्वय येथे आहे. सर्व शास्त्रे येथे एकोप्याने नांदतात. कोणाची निंदा नाही. कोणाला कमी लेखले नाही. अधिकाराप्रमाणे आचरण्याचा उपदेश आहे.

गीता हे खचलेल्या मनाला उभारी देणारे आणि मन बुद्धीचा समतोल साधणारं मानसशास्त्र आहे. योग्य व सात्विक आहार यांचे महत्त्व आणि फायदे सांगणारे आहार शास्त्र आहे. त्याचबरोबर राजस व तामस आहाराचे तोटेही सांगितले आहेत. युक्त आहार, विहार, झोप आणि जागृती यांचे फायदे सांगणार आचरणशास्त्र आहे. त्याचबरोबर अति खाणाऱ्याला किंवा अजिबात न खाणाऱ्याला, अती झोपणाऱ्याला किंवा अजिबात न झोपणाऱ्याला योग साध्य होत नाही असेही गीता सांगते म्हणजे कसे असावे आणि कसे असू नये हे दोन्ही सांगणारे तारतम्य शास्त्र आहे.

ज्येष्ठांना त्यांच्या जबाबदारीची आणि समाजातील सर्व घटकांना (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य शूद्र )त्यांची कर्तव्य सांगणारे, सर्व जातींना व स्त्रियांना समान लेखणारं समाजशास्त्र आहे. समाजातील उच्चपदस्थ जे जे आचरण करतात त्याला प्रमाण मानून इतरलोका आचरण करतात हा समाजशास्त्राचा महान सिद्धांत येथे सांगितला आहे.

गीता हे पंचभुतात्मक सृष्टीचे ज्ञान करून देणारे विज्ञान शास्त्र आहे. यालाच गीता अपरा प्रकृती म्हणते. भूमि, आप, अनिल, वायु, आकाश, मन, बुद्धी, अहंकार ही तिची आठ अंगे. यातच सगळी भौतिकशास्त्रे सामावली आहेत. ‘उतिष्ठ, युद्धस्व’ असे सांगून प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यास सांगणार हे विवेक शास्त्र आहे. स्वधर्माची व स्व कर्तव्याची जाणीव करून देऊन त्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा गीता देते. कामक्रोधादि पतनापर्यंत नेणाऱ्या अंत: शत्रूंचा निषेध गीता करते. याशिवाय अक्षय सुखाची प्राप्ती करून देणारे हे आत्मशास्त्र आहे.

‘उद्धरेदात्मनात्मानं ‘ हा स्वावलंबनाचा मंत्र गीता देते. यज्ञ, ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, सुख प्रत्येकाचे गुणाप्रमाणे भेद सांगून सात्विकतेला महत्त्व देते. फलासक्तीचा त्याग, संयम, विवेक यांनी शुद्ध क्रिया गीतेला अपेक्षित आहेत. म्हणून ग्राह्य आणि अग्राह्य ( दैवी आणि आसुरी गुण) गीता समोर ठेवते. अग्राह्य गोष्टींचा त्याग का करावा हे पटवून देते. गीतेला सक्ती मान्य नाही. अंधश्रद्धेला वाव नाही. ‘ यथेच्छसि तथा कुरु ‘असे स्वातंत्र्य गीता देते. गीतेत कोणतेही कर्मकांड नाही. स्वधर्म हाच यज्ञ आणि स्वकर्म हाच धर्म म्हणून स्वकर्मानेच ईश्वराची पूजा. अशा प्रकारे गीता आहे जीवनाचे एक रहस्य पूर्ण शास्त्र आहे.

गीतेचा अभ्यास तरुणांनी अवश्य करावा. त्यांच्यासाठी ज्ञान मिळवण्याचे ते तीन मार्ग गीता सांगते. ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयाl’ ( ४/३४). ज्ञानी गुरूला साष्टांग नमस्कार (नम्रता) प्रश्न विचारणे (शंका निरसन) आणि सेवा (अहंकार गलीत) केल्याने त्यांचे कडून ज्ञान प्राप्ती होते. अशा प्रकारे तरुणांपासून सर्वांना मार्ग दाखवणारे शास्त्र. म्हणून गीता महात्म्यातील पहिला श्लोक सांगतो

गीताशास्त्रमिदं पुण्यं य: पठेत् प्रयत: पुमान्l

विष्णो: पदमवाप्नोति भयशोकादिवर्जित:ll

गीता हे पुण्यमय शास्त्र आहे. त्याच्या चिंतनाने भयशोकादि उर्मीतून मुक्त होऊन माणसाला विष्णूपदाची प्राप्ती होते. त्यानुसार आचरण करणारा पूर्ण सुखाला प्राप्त होतो. अशाप्रकारे संसार मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्याचे संसारातील खरे कर्तव्य काय हे तात्विक दृष्ट्या उपदेश करणारे गीता शास्त्र आहे. केवळ म्हातारपणी वाचण्यासाठी किंवा संसार त्याग करण्यासाठी नाही. तरुण वयात अभ्यासाला केलेली सुरुवात आयुष्यभर दीपस्तंभ होते.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देह बोलतो… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ देह बोलतो… ☆ सुश्री शीला पतकी 

तुम्हीच तोंड दाबून बसल्यावर बोलणार कोण?.. तुम्ही बोलल्याशिवाय होत नाही म्हणजे बोलणे.. वाचा.. यावर आपल्या भावना व्यक्त होणे अवलंबून आहे या गोष्टीचा विचार केला तेव्हा लक्षात आले फक्त वाचा, वाणी, जीभ हीच बोलण्याची साधने नव्हेत आपले संपूर्ण शरीर खरंतर बोलत असते त्याचीच काही उदाहरणे पाहू….

पाहिलंत का तिच्या कपाळावर आठी चढली लगेच म्हणजे… ना पसंती कपाळावर दाखवता येते. तिने नाक कसे मुरडले पहा… ना पसंती दाखवली !नाक जरा वर ओढून घेतले काय चालले ते पसंत नाही मला! ओठ विलग होऊन किंचित हास्य आले.. आवडले किंवा संमती! हसून हसून बेजार झालो.. आनंद !गाल फुगले.. रुसवा !मान उभी हलली.. होकार !मान या कानापासून त्या कानापर्यंत आडवी हलली.. नकार ! मान किंचित झुकवली, आदर !छाती पुढे काढून चालणे.. रुबाब !ऊर बडवून घेणे.. दुःख !पाठीवर थाप.. प्रोत्साहन! मुठी एकत्र करणे आणि हात उंचावणे.. निश्चय !हात हलवणे निरोप देणे! दोन्ही हात वर घेऊन चालत येणे.. शरणागती! दोन्ही हाताने टाळ्या वाजवणे.. आनंद व्यक्त करणे !अंगठा दाखवणे.. चिडवणे किंवा ध्येय साध्य झाले असे सांगणे! करंगळी दाखवणे…. *मी सांगायला नको) एकमेकांच्या हातावर हात देऊन टाळी देणे.. सहमती दर्शक आनंद !हाताने दंड थोपटून दाखवणे, ताकद किंवा बळ !गुडघ्यावर रांगत येणे… शरणागती !एकच पाय विनाकारण हलवणे.. अस्वस्थता! लाथ मारणे.. रागाचा परिपाक खूप रागावणे !लाथा बुक्क्यांनी मारणे प्रचंड राग!! कमरेत वाकणे… मान देणे !साष्टांग दंडवत.. सन्मानदर्शक भक्तीपूर्वक नमस्कार !आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळे… डोळे बारीक करून पाहणे म्हणजे काय चालले याचा अंदाज घेणे!.. डोळे तिरके करणे.. साशंक !डोळे ओले होणे आनंद किंवा भावूक होणे ! डोळे लाल होणे.. संताप !डोळ्यातून घळाघळा अश्रू येणे.. दुःख !डोळे मिटून घेणे.. शांतता !डोळे वटारणे.. धाक, भीती दाखवणे !डोळ्यात कोणताच भावना न दाखवणे.. निर्वीकारिता! भुवया उंचावणे.. प्रश्नचिन्ह???! गाल लाल होणे.. लाजणे !नजर खाली अंगठ्याने जमीन उकरणे आणि बोटाला पदर गुंडाळणे.. लाजेने भिजून जाणे! चेहरा वेडा वाकडा हातवारे डोळे मोठे.. भांडण!( नळावर याचा अनुभव येतो) मान वर न करणे.. विनय व आज्ञाधारकता !थरथर कापणे.. संताप किंवा भीती! जीभ बाहेर काढून दाखवणे.. वेडावणे! मांडीवर एका हाताने थापटणे.. ये तुला बघतोच म्हणणे !दात विचकून दाखवणे… चिडवणे! दोन्ही हाताने समोरच्याला कवेत घेणे.. प्रेम व्यक्त करणे !पाठ फिरवणे.. ती गोष्ट आवडली नाही हे सांगून तिच्यापासून दूर जाणे.. ! या आणि अशा अनेक घटकांच्या हालचाली मधून आपले संपूर्ण शरीर बोलत असते खर तर आपला देह आपले मन आपले हृदय सारेच बोलत असते पण ती भाषा समोरच्या व्यक्तीशी आपण जितके तादात्म्य पावतो तेवढी त्यालाच कळते एकूण हा भाषेचा थोडासा अभ्यास आपल्यासमोर ठेवला आहे देह बोलतो या सदराखाली आपण विचार करा अजून कदाचित काही गोष्टी सापडतील लेख आणि कल्पना आवडली असेल तर लिहा काहीतरी

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “देव आणि स्टीफन हॉकिंग…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “देव आणि स्टीफन हॉकिंग…☆ श्री जगदीश काबरे ☆

स्टीफन हॉकिंग हा जगातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेला, आइन्स्टाइनच्या पंक्तीला बसू शकेल असा माणूस. त्यात अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे व्हीलचेअरला खिळण्याची पाळी त्याच्यावर आली. या रोगात एकेका अवयवावरचा मेंदूचा ताबा नष्ट होत जातो. शेवटची चाळीसेक वर्ष त्याच्या मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेलेल्या आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत तो जगला. म्हणजे, चालत्याबोलत्या सामान्य मनुष्यापासून ते जवळपास निव्वळ विचार करणारा मेंदू अशा शारीर ते बौद्धिक अवस्थेपर्यंत त्याचा प्रवास झाला.

अशा स्थित्यंतरातही त्याने देवाची करुणा न भाकता आपल्या वैचारिक वैभवाने विश्वरचनाशास्त्रातली, कृष्णविवरांची, काल-अवकाशाची कोडी सोडवली. त्याच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीनच प्रश्नांची दालनं उघडली.

हॉकिंग हा स्वत: एक विश्वरचनाशास्त्रज्ञ (कॉस्मोलॉजिस्ट) होता. म्हणजे विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याची रचना काय आहे, या प्रश्नांचा अभ्यास करणारा. या अभ्यासासाठी प्रथम जुन्या ताऱ्यांचा आणि तारकासमूहांचा अभ्यास करावा लागतो. अवकाशात जितकं खोलवर, दूरवर पाहावं तितके जुने तारे दिसतात. असं का होतं? याचं कारण म्हणजे प्रकाशाला प्रवास करायला वेळ लागतो. आपल्या पृथ्वीत आणि सूर्यात जे अंतर आहे, ते कापायला सुमारे आठ मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला सूर्य दिसतो तो आठ मिनिटांपूर्वीचा. सगळ्यात जवळचा तारा सुमारे साडेचार प्रकाशवर्ष दूर आहे. म्हणजे त्याचा आपल्यापर्यंत पोहोचलेला प्रकाशकिरण हा तिथून साडेचार वर्षांपूर्वी निघालेला असतो. अवकाशाची व्याप्ती प्रचंड असल्यामुळे अब्जावधी प्रकाशवर्ष दूरचे तारे दिसतात. त्यामुळे जेवढे दूरचे तेवढे जुने! 

१९२९ मध्ये या अभ्यासातून हबल नावाच्या शास्त्रज्ञाला हे लक्षात आलं, की सर्वच तारकासमूह एकमेकांपासून दूर जात आहेत. एखाद्या फुग्यावर ठिपके काढले आणि तो फुगवला तर सगळेच ठिपके आपल्या शेजारच्या ठिपक्यापासून दूर जाताना दिसतात, अगदी तसेच. जर तारकासमूह सतत दूर जात असतील, तर याचा अर्थ काही काळापूर्वी ते जवळजवळ होते आणि अजून पुरेसं मागे गेले, तर ते सगळेच एका बिंदूत एकवटलेले होते, असा निष्कर्ष निघतो. याचा अर्थ आपलं विश्व अनादी अनंत नसून एका क्षणी सुरू झालं! एका बिंदूपासून उगम होऊन गेल्या १३. ८ अब्ज वर्षांत इतकं महाकाय, प्रचंड झालं. याला ‘महास्फोटाचा सिद्धांत’ (बिग बँग थिअरी) म्हणतात. हे चित्र सामान्य माणसाचं डोकं चक्रावून टाकतं. कारण आपल्या डोळ्यांसमोर विश्वाची अनादी आणि अनंत अशी प्रतिमा ठसलेली असते.

विश्व निर्माण होण्याचा एक क्षण, एक बिंदू असेल तर साहजिकच प्रश्न पडतात- हे कोणी केलं? याआधी तिथे काय होतं? आपण इथे कसे आलो? यापुढे काय? हे विश्व असंच फुगत जाणार, की काही काळाने आकुंचन पावायला सुरुवात होत पुन्हा एका बिंदूत कोलमडणार? या प्रश्नांची हॉकिंगने उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे या विश्वाचा निर्माता देव आहे का? या प्रश्नाला इतरही उपप्रश्न चिकटलेले असतात. म्हणजे देवाची व्याख्या काय? देवाने हे विश्व निर्माण का केलं? देव मनुष्याच्या दैनंदिन जीवनात दखल घेतो का?… वगैरे वगैरे. या प्रश्नाचं उत्तर देताना हॉकिंग म्हणतो, ‘देव आहे की नाही, यावर मला काही भाष्य करायचं नाही. देव असलाच तर त्याने नक्की काय घडवलं, याबद्दल एक संदर्भचौकट मांडायची आहे. ’ यापुढे देवाबाबत हॉकिंगचं म्हणणं आहे की, ‘हे विश्व विशिष्ट नियमांनुसार चालतं. हे नियम अचल आहेत. ते कुठच्याही यंत्रणेमुळे बदलत नाहीत. कारण जे बदलू शकतात ते विज्ञानाचे मूलभूत नियम नसतात. त्यामुळे या अचल आणि सर्वासाठी सारख्या असलेल्या भौतिकीच्या नियमांनाच देव म्हणायचे असेल तर म्हणता येईल. ’ वर दिलेला ‘बिग बँग’चा संदर्भ देऊन हॉकिंग म्हणतो, ‘जेव्हा आपलं विश्व सुरू झालं तेव्हा अवकाश आणि काळही सुरू झाला. त्याआधी काही नव्हतंच. त्यामुळे शून्य काळाच्या आधी कोणीतरी निर्माता असणंही शक्य नाही. ’ हे स्पष्ट करण्यासाठी हॉकिंग उदाहरण देतो ते दक्षिण ध्रुवाचं. ‘तुम्ही दक्षिण ध्रुवावर पोहोचलात तर तिथून अजून दक्षिणेला काय असतं? ध्रुवाच्या व्याख्येपोटीच तिथून दिशा सुरू होतात. तिथून दक्षिणेला काही नसतं. तसंच ‘बिग बँगच्या क्षणाआधीचा क्षण’ असं काही नसतंच. ’ 

यापुढचा प्रश्न येतो तो म्हणजे शून्यातून विश्व कसं निर्माण झालं? हॉकिंग म्हणतो की, विश्व बनवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागतात. एक म्हणजे वस्तुमान- तारे आणि ग्रह बनवण्यासाठी; दुसरं म्हणजे ऊर्जा- सूर्यामध्ये ही भरपूर भरलेली हवी आणि तिसरं म्हणजे अवकाश- हे सगळे नांदण्यासाठी. आइन्स्टाइनने आपल्या सुप्रसिद्ध E = mc² समीकरणानुसार ऊर्जा आणि वस्तुमान एकच आहेत हे दाखवून दिलेलं आहे. याचा अर्थ, भरपूर ऊर्जा आणि अवकाश असेल तर आपल्याला नवीन सृष्टी बनवता येते. हे शून्यातून कसं निर्माण होतं? उत्तर सोपं आहे- नवीन अवकाश निर्माण करताना ऊर्जा मुक्त होते! अवकाशात धन आणि ऋण प्रकारच्या ऊर्जा असतात. (लक्षात ठेवा, सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा नसतात. ) त्यामुळे अवकाश आणि ऊर्जा दोन्ही मोठय़ा प्रमाणावर तयार झाले तरी त्यांची गोळाबेरीज शून्यच होते. एखादा मातीचा ढीग तयार करायचा असेल, तर नुसता ढीग तयार करण्यासाठी माती कुठून आणायची, हा प्रश्न उद्भवतो. मात्र, एक ढीग आणि एक तेवढाच खड्डा यासाठी मातीची गरज पडत नाही.

हे समजण्यासाठी ब्लॅकहोलच्या बाबतीतील माहिती आपण पाहूयात. समजा एक घड्याळ हे ब्लॅकहोलच्या जवळ जवळ नेत गेलो तर काय होईल? जसे जसे हे घड्याळ ब्लॅकहोलच्या जवळ जाईल तसे तसे त्याचा वेग हा कमी कमी होत जाईल आणि एक वेळ अशी येईल कि ज्या वेळी ते घड्याळ ब्लॅकहोल मध्ये पूर्ण आत गेलेले असेल आणि ते पूर्ण पणे थांबलेले असेल. ब्लॅकहोलमध्ये असं का घडतं, याचा ज्या वेळी अभ्यास करण्यात आला त्यावेळी शास्त्रज्ञाच्या लक्षांत आले की, ब्लॅकहोलमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती ही अनंत (Infinite) असते आणि त्यामुळे ती त्या घड्याळाला थांबवते, म्हणजेच वेळेला पण नष्ट करते. त्या ब्लॅकहोल मधून प्रकाशकिरणेही बाहेर जाऊ शकत नाहीत. कारण आत गेलेले प्रकाशकिरण हे ब्लॅकहोलच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे बाहेर निघू शकत नाहीत. म्हणजेच प्रकाशकिरणे ब्लॅकहोलमध्ये गेल्यावर नष्ट होतात. कारण ब्लॅकहोलमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती अनंत असते. अगदी असेच Big Bang च्या वेळेस घडले. त्यामुळे जे लोक मला अश्या प्रकारच्या प्रश्न विचारतात की, ‘खरंच का हे विश्व देवाने बनविले आहे?’ तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देताना मी त्यांना सांगतो की, ‘ह्या प्रश्नामध्येच काहीही अर्थ नाही. हे विश्व देवाने बनविलेले नाही. कारण वेळ, काळ, वस्तुमान ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी निर्माण झाल्या त्याच क्षणी विश्वाची उप्पती झाली. म्हणूनच आपण म्हणतो की “We Got Everything from nothing” 

‘बिग बँग’च्या वेळी विश्व जितकं लहान होतं तितक्या लहान पातळीवर अभ्यास करायचा झाला, तर आइन्स्टाइनच्या सामान्य सापेक्षतावादाची सांगड पुंजभौतिकीशी घालावी लागते. शून्यमय अवकाशात एकवटणाऱ्या वस्तुमानाचा आणि तिथे घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करताना ‘सिंग्युलॅरिटी’ नावाची संकल्पना विचारात घ्यावी लागते. याचं कारण तिथली घनता अमर्याद वाढत जाते. अशा अनंताशी खेळत तिथली गणितं सोडवावी लागतात. हॉकिंगने कृष्णविवरांचा सखोल अभ्यास केला होता. कृष्णविवरांच्या केंद्रातही महाप्रचंड वस्तुमान एकवटलेलं असल्यामुळे तिथेही सिंग्युलॅरिटी तयार होते. म्हणूनच तो म्हणतो, विश्वाची उत्पत्ती- काळ, वस्तुमान, ऊर्जा आणि अवकाश या सगळ्यांचीच सुरुवात ‘बिग बँग’ने झाली. त्याचा निर्माता देव नक्कीच नाही… आहेत ते भौतिकशास्त्राचे अचल नियम. विश्वाच्या निर्मितीचे रहस्य समजून घेण्यासाठी ईश्वराची आवश्यकता नाही. महास्फोट हा केवळ भौतिक विज्ञानाच्या नियमांचा परिणाम आहे. सापेक्षतावाद आणि पुंजवाद यांच्या आधारे विश्वाची निर्मिती कशी शून्यातून होऊ शकते हे समजून घेता येते.

डार्विनच्या सिद्धांतामुळे ईश्वराला जीवशास्त्राच्या परिघाबाहेर करण्यात आले. ईश्वर नाही असे जरी कोणी सिद्ध करू शकले नाही तरी विज्ञानामुळे ईश्वर नामक संकल्पना आनावश्यक बनते हेही तितकेच खरे. म्हणूनच विज्ञान हाच ज्ञान मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे आणि शेवटी त्या मार्गावरूनच आपल्याला विश्वाच्या नियमांचे परिपूर्ण ज्ञान मिळू शकेल, असे स्टीफन हॉकिंग यांना ठामपणे वाटत होते.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एकदा मी शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक स्थानिक फुटबॉल सामना बघितला होता.

तिथे बसल्यावर मी एका मुलाला विचारले की स्कोर काय आहे?

त्याने हसून उत्तर दिले, “ते आमच्यापेक्षा ३-० ने आघाडीवर आहेत. ”

मी म्हणालो, “खरंच.. ! म्हणजे मला म्हणायचे आहे तुम्ही निराश वाटत नाही. “

“निराश!!” त्या मुलाने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं.

“मी निराश का होईन.. ! अजून पंचांनी खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी वाजवलेली नाही.

माझा संघावर आणि संघ व्यवस्थापकांवर पूर्ण विश्वास आहे, आम्ही नक्कीच जिंकू. “

खरोखरीच तसेच झाले, खेळ त्या मुलाच्या संघाने ५-४ च्या आघाडीने जिंकला.

त्याने एका स्मित हास्यासह सावकाश माझ्याकडे बघून हात हलवला आणि तो निघून गेला.

मी आश्चर्याने, आ वासून बघतच राहिलो,

असा आत्मविश्वास…

इतका ठाम विश्वास.. !

त्या रात्री मी घरी परत आल्यावरही, त्याचा प्रश्न माझ्या मनात घुमत होता;

“मी निराश का होईन? अजून पंचांनी खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी वाजवलेली नाही. “

आयुष्य हे सुद्धा एका खेळासारखे आहे, शेवटपर्यंत धैर्याने सामोरे जा…

जीवन अजून संपलेलं नसतांना निराश का व्हायचं?

शेवटची शिट्टी वाजत नाही, तोपर्यंत आशा का सोडायची?

खरी गोष्ट अशी की बरेच लोक खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी स्वतःच वाजवतात.

जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत काहीही अशक्य नाही, आणि तुमच्यासाठी कधीही फार उशीर झालेला नसतो.

अर्धवेळ म्हणजे पूर्णवेळ नसते.

स्वतःच शिट्टी वाजवून खेळ समाप्त करू नका. धीर सोडू नका. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. Do your Best. You can.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “संघर्ष…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “संघर्ष – –” ☆ श्री जगदीश काबरे

हा फोटो एका टोमॅटोच्या झाडाचा आहे. कदाचित एखाद्या प्रवासी यात्रेकरूने टोमॅटोचे बी धावत्या रेल्वेतून फेकली असेल. हे झाड मातीशिवाय, काळ्या पाषाणात रुजले आणि वाढले. लहान असताना शताब्दी किंवा राजधानी एक्सप्रेससारख्या जलद गाड्या याच्या अगदी जवळून जात असतील, कर्कश आवाज याला हादरवत असतील. अस्तित्व संपण्याची भिती होती, पण झाडाने संघर्ष करत स्वतःला जिवंत ठेवले.

ना पाणी, ना खत, ना माती, ना संगोपन… असल्या प्रतिकूल परिस्थितीतही या झाडाने फळ धरले. त्याचा उद्देश एकच होता, वंश सातत्य टिकवणे. या संघर्षात झाडाने तो उद्देश पूर्ण केला.

समाजात बऱ्याच जणांना वाटते की, आपण अपयशी ठरलो, आपले जीवन निरर्थक झाले. परंतु त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून शिकायला हवे. परिस्थिती कितीही कठीण असो, संघर्ष करत राहणे आणि ध्येय गाठणे हेच जीवनाचे खरे यश आहे.

म्हणून साथींनो, परिस्थिती प्रतिकूल असली तरी निराश होऊ नका, संघर्ष करा. कारण यश तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुमची वाट पाहत आहे. जिद्द, चिकाटी आणि विश्वास, हाच असतो माणसाचा यशाकडे जाण्याचा प्रवास. 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ९. पशू पक्षी यांचा आदर करावा ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ९. पशू पक्षी यांचा आदर करावा ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपण ज्या पृथ्वीवर रहातो तेथे मानव एकटाच नसतो. पृथ्वीवर जी जीवसृष्टी आहे त्यातील माणूस हा एक प्राणी आहे. माणूस बुध्दीने सर्वश्रेष्ठ असल्याने सर्वांच्या वरचढ ठरला आहे. तसे पाहिले तर इतर प्राण्यांच्या कडे जे आहे त्यातील काहीच माणसाकडे नाही. पण आपल्या बुद्धीच्या बळावर तो सर्वांना ताब्यात ठेवू शकतो. प्राण्यांच्या ठायी असलेल्या शक्ती मशिन द्वारे प्राप्त करतो. खरे तर सर्व पशू पक्षी निसर्गात महत्वाचे असतात. ते निसर्गाचा समतोल राखतात. त्यांच्या मुळे निसर्गाचे संवर्धन होते. या मुळे आपले जीवन समृध्द होते. निसर्गाचे चक्र अव्याहत चालू रहायचे असेल तर हे पशू, पक्षी, कीटक, वृक्ष, नद्या, डोंगर आवश्यक आहेत. परंतू हे लक्षात न घेता माणसाने आपल्या बुद्धीचा स्वार्थी व बेबंद वापर केला तर माणसाचीच सर्वात जास्त हानी होणार आहे. ज्या जीवसृष्टीच्या आधारे माणूस सुखात जगत असतो, ज्यांच्या आधाराने जगत असतो त्यांचे आपण ऋणी असले पाहिजे. ही साधी माणुसकी आहे.

या विषयी भारतीय संस्कृतीने उच्च आदर्श जपला आहे. श्राद्ध या कृतज्ञता विधीमध्ये धर्मपिंड दिले जाते. ते सर्व पशू, पक्षी, वृक्ष, नद्या, पर्वत ज्या सर्वांनी आपल्याला पोसले त्या सर्वांना हे धर्मपिंड असते.

कोणीही कितीही श्रेष्ठ असेल, बुद्धिवादी असेल तरी कोणालाही क्षुद्र म्हणून हिणवू नये, निंदा करू नये, लाथाडू नये. या निसर्गा पुढे नम्र व्हावे. आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

९/११/२०२४

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares