मराठी साहित्य – विविधा ☆ “माझा (शालेय) इतिहास…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “माझा (शालेय) इतिहास…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

माझा (शालेय) इतिहास…

माझा इतिहास असायचे कारण नाही. तो भूतकाळ आहे. पण इतिहास म्हटले की वजन येते. त्यामुळे हा कालखंड म्हणजे माझा इतिहास.

(माझ्या मतानुसार चांगल्या परिस्थितीत चांगले काम करणाऱ्यांचे नांव होते, तर विपरीत परिस्थितीत चांगले करणारा इतिहास घडवतो. माझे नांव पण नाही, मी इतिहास देखील घडवला नाही. पण फक्त इतिहास म्हटले की वजन येते म्हणून शालेय इतिहास इतकेच.)

इतिहास म्हटले की व्यक्ती, लढाई, संघर्ष, हुकूमशाही, बंड, अन्याय, अत्याचार असेच आणि बरेच डोळ्यासमोर येते.

माझ्या शालेय इतिहासात असे खूप काही नाही. माझ्यावर अन्याय झाला नाही. मी बंड देखील केले नाही. किंवा मशाली आणि पलित्याखाली (रस्त्यावरच्या दिव्याखाली) अभ्यास देखील केला नाही.

पण लढाई, संघर्ष, आणि पालक व शिक्षकांची संयुक्त  हुकूमशाही काही प्रमाणात होती. माझ्या लोकशाहीची काहीप्रमाणात मुस्कटदाबी झाली होती. मुस्कटदाबी यासाठी की मी काय शिकावे यांचे स्वातंत्र्य मला नव्हते. युती, आघाडी असे शब्द मला तेव्हा माहीत नव्हते. किंवा समजले नव्हते. नाही तर पालक, शिक्षक, संस्थाचालक यांची आघाडी असे म्हटले असते किंवा माझी आणि इंग्रजीची युती भल्या पहाटे Good morning बरोबर (शपथ घेऊन) सुरू झाली, आणि Good night बरोबरच (राजीनामा देत) अवघ्या काही दिवसांत किंवा तासांतच तुटली, संपुष्टात असे सांगितले असते. ही युती तुटण्यासाठी कुठलीही (घड्याळाची) वेळ कारणीभूत नव्हती, किंवा कोणाचाही हात त्यात नव्हता. पण शपथ घेतांना आणि राजीनामा देतांना धनुष्यातून बाण सुटला,  अथवा सोडला होता हे नक्की. (बाण सुटला की परत घेता येत नाही, दुसराच घ्यावा लागतो.)

इतिहासात आक्रमणं झालीत. तशी माझ्या शालेय जीवनात आक्रमणे होती. (याला परिक्षा म्हणत असत.) पण ही समजण्यासाठी मला हेर ठेवायची गरज नव्हती. आक्रमणे गनिमी कावा किंवा मी बेसावध असताना झाली नव्हती.

या आक्रमणाची (परीक्षांची) रितसर सूचना यायची. सूचना अगदी शके XXXX, माहे फाल्गुन शुद्ध दशमी ते फाल्गुन कृष्ण पंचमी अशी नसली तरी, यात इंग्रजी महिना तारीख, वार, वेळ, विषय यांचा उल्लेख असायचा. अचानक वार होत नव्हते. थोडक्यात शत्रू दिलदार होता.

ही  आक्रमणे ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळेतच व्हायची. एका वर्षाच्या कालावधीत लहानमोठी मिळून साधारण सहा आक्रमणे असायची. (यात दोन चाचणी, एक सहामाही, परत दोन चाचणी, आणि एक वार्षिक परीक्षा असा क्रम देखील ठरलेला असायचा.)

पाचवी ते दहावी असा महत्वाचा आणि उमेदीचा काळ समजला तरी सहा वर्षे आणि प्रत्येक वर्षात चार अशा एकूण पंचवीस (दहावीत आक्रमणाला तोंड देण्याची पुर्वतयारी म्हणून एक सराव परीक्षा घेत असत.) आक्रमणे झाली. काही आक्रमणे मी तह करून थांबवली. हे तह तोंडी होते. (यालाच तोंडी परीक्षा असे नांव होते. शिक्षकांच्या लेखी याला कमी महत्त्व असावे. कारण त्यांचा भर लेखी परीक्षेवर असायचा, तसे ते तोंडी सांगत असत.)

या आक्रमणांना तोंड मी दिले होते. पण माझ्यावर (ओरडून) तोंडसुख मात्र घरच्यांनी घेतले होते. कारण…… मार्क कमी मिळाले हेच होते. पण तोंडी परीक्षेत माझा (तोंडाचा) दाणपट्टा बऱ्यापैकी फिरायचा.

या आक्रमणाची सूचना घरच्यांना देखील असायची. त्यामुळे त्या काळातल्या माझ्या हालचालींवर त्यांची बारीक नजर असायची. माझी रणनिती काही प्रमाणात तेच ठरवायचे. दहावीत तर तयारी जय्यत होती.

इतिहासात शिकायला, वाचायला, तह, वेढा, स्वकियांची मदत, रसद पुरवठा असेही काही होते. पण याचा अनुभव शेवटी म्हणजे दहावीच्या आक्रमणावेळी अनुभवला. तो देखील सोबत असणाऱ्या इतरांच्या बाबतीत.

एकतर या दहावीच्या आक्रमणाला  परक्या मुलुखात तोंड (दुसऱ्या शाळेत) द्यायचे होते. माझ्या सारखेच अनेक अशा आक्रमणाला तोंड देण्यासाठी आले होते. त्या मुलखाला शत्रू सैन्याचा (पोलिसांचा) वेढा असायचा. तो वेढा भेदून काही स्वकिय (दोस्तराष्ट्र) रसद पुरवण्याची पराकाष्ठा करत असल्याचे मी पाहिले होते. (याला काॅपी पुरवणे असे म्हणत असत. थोडक्यात काॅपीमुक्त अभियानाला देखील इतिहास आहे असे म्हणावे लागेल.) पण खूप कमी जणांना रसद पुरवता येत होती. काही वेळा रसद यायची, पण योग्य ठिकाणी पोहचायची नाही. कारण वेढा सक्त असायचा. (त्यावेळी फितुरीचे प्रमाण कमी होते असे म्हणावे लागेल.)

या आक्रमणात वापरली जाणारी शस्त्र म्हणजे पेन, पेन्सिल, रबर, पट्टी यांची जय्यत तयारी असायची. नि:शस्त्र होण्याची वेळ कधीच आली नाही.

जवळपास सगळ्याच आक्रमणात माझा विजय झाला असला तरी त्याचा विजयोत्सव साजरा करण्याइतका तो दैदिप्यमान कधीच नव्हता.

पाचवी ते दहावी सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रात आमचे शिक्षण झाल्याने या दोन्ही सत्रात शिकवणारे जवळपास सगळेच शिक्षक माझे कमी अधिक प्रमाणात गुरू होतेच. किंवा सगळ्या शिक्षकांना गुरुस्थानी मानण्याचा तो काळ होता. असे सांगायचे कारण…..

हल्ली इतिहास घडवणाऱ्या व्यक्तिंच्या गुरू बाबत देखील बऱ्याच उलटसुलट चर्चा रंगतात. काही त्यात रंग भरण्याचेच काम करतात. पण माझा इतिहास दैदिप्यमान नसल्याने अशा चर्चा घडत नाहीत, घडणार देखील नाही. कदाचित तू खरेच माझा विद्यार्थी होता का? असा प्रश्न एखादा गुरु मलाच करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा या माझ्या शालेय इतिहासातील काही दस्तऐवज (शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका) आजही माझ्या जवळ आहेत. त्याची आता खूप गरज नसली तरी ते दस्तऐवज मी सांभाळून ठेवले आहेत. (पण ते माझ्या पुढच्या पिढीला मी दाखवत नाही.)

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संवादु- अनुवादु– उमा आणि मी- भाग १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ संवादु- अनुवादु– उमा आणि मी- भाग १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

कतंच संवादु- अनुवादु पुस्तक हाती लागलं आणि भराभरा वाचत सुटले. पुस्तक प्रकाशित होऊन ५-६ वर्षे झाली पण माझ्या हातात पडेपर्यंत इतके दिवस गेले. त्याला कारणही माझ्या मर्यादाच होत्या. माझ्या आजारपणामुळे घराबाहेर पडता न येणं, नंतर करोनामुळे ग्रंथालये बंद असणं, तो संपेपर्यंत पुन्हा आजारपण, या सार्‍यातून तावून सुलाखून बाहेर पडेपर्यंत इतका काळ गेला.

सुप्रासिद्ध अनुवादिका उमा कुलकर्णी यांचे हे आत्मकथन. या पुस्तकाबद्दल मला उत्सुकता वाटण्याची दोन कारणे. पहिले म्हणजे त्यांनी अनेक उत्तमोत्तम कन्नड साहित्याचे मराठीत दर्जेदार अनुवाद केले आहेत. या पुस्तकाद्वारे, त्यांनी त्यांच्या अनुवादाची प्रक्रिया, अनुवादाच्या वेळचे अनुभव, त्या मागचे विचार- चिंतन उलगडून दाखवले असणार, याची खात्री होती. दुसरे कारण म्हणजे, उमाताई छुटपुटत्या काळापुरती माझी चुटपुट मैत्रीण होती. ही मैत्री एकमेकींना अगं-तुगं  म्हणण्याइतकी प्रगाढ होऊ शकली नाही, ही चुटपुट मनाला नेहमीच लागून राहिली. अजूनही रहाते. पण या चुटपुटत्या मैत्रिणीचं हे आत्मकथन, म्हणूनही मला या पुस्तकाविषयी कुतुहल होतं. ही चुटपुटती मैत्रीदेखील मी आपणहून तिच्याकडे जाऊन ओळख करून घेतली आणि तिला चिकटले, यातूनच झालेली.

त्याचं असं झालं –

साधारण १९९५ साल असेल. कोल्हापूरला प्रा. अ. रा. तोरो यांची एकदा भेट झाली. ते साहित्याचे उत्तम वाचक. कन्नड साहित्याचे जाणकार. मराठी- कन्नड स्नेहवर्धन चळवळीचे कार्यकर्ते. नुकतीच त्यावेळी मी ‘ डोंगराएवढा’ ही कादंबरी वाचली होती. मला ती खूप आवडली होती. अनुवादही. आणखीही उमाताईंनी केलेले अनुवाद वाचले होते. मग त्यांच्याबद्दल बोलणं झालं. मी म्हंटलं , ‘या लेखिकेची भेट व्हावी, असं अगदी मनापासून वाटतय.’ ते म्हणाले, ‘जरूर जा. तुम्हाला आवडेल त्यांच्याशी गप्पा मारायला!’ मग त्यांनी उमाताईंचा फोन नंबर दिला. त्यानंतर मी पुण्याला गेले, तेव्हा फोन करून उमाताईंकडे गेले. मनात म्हणत होते, ‘मला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडेल, पण त्यांचं काय? त्या नामवंत लेखिका… ‘ पण आमचं छान जमलं. मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि मी त्यांना एकदा चिकटले ती चिकटलेच. पुण्यात गेले की त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारून यायचं हे ‘मस्ट’च झालं माझ्यासाठी. हा प्रत्यक्ष भेटीचा आणि गप्पांचा सिलसिला दोन –चार वर्षासाठीच फक्त टिकला. कारण नंतर माझं पुण्यात जाणं कमी झालं व आमच्या भेटी जवळ जवळ थांबल्याच.  म्हणून मी, ती माझी चुटपुट मैत्रीण म्हणाले. तर तिचं हे आत्मकथन. म्हणून मला विशेष उत्सुकता होती.

अनुवादित साहित्य मला वाचायला आवडतं. वेगळा प्रदेश, वेगळा परिसर, वेगळं लोकजीवन, त्यांची वेगळी विचारसरणी, वेगळी संस्कृती यांची माहिती त्यातून होते आणि एक वेगळाच आनंद मिळतो. उमाताईंची ओळख आणि मैत्री व्हावी, असं मला मनापासून वाटत होतं, त्याचं एक कारण त्या उत्तम अनुवादिका आहेत, हे होतं. वाचता वाचता मीही या क्षेत्रात थोडीशी लुडबूड केली होती. अजूनही करते आहे. मला ज्या कथा – कादंबर्‍या, लेख आवडले, त्यांचा मी अनुवाद केला. केवळ वाचण्यापेक्षा त्या साहित्यकृतीचा अनुवाद केला, तर ती जास्त चांगली समजते आणि त्यातून मिळणारा आनंदही अधीक असतो, असं मला वाटतं. उमाताईंनीही आपल्या पुस्तकात ही गोष्ट आवर्जून नमूद केलीय. ’मुकज्जी’चा अनुवाद त्यांनी ती कादंबरी स्वत:ला नीट कळावी, म्हणून केला होता. त्यातून त्यांना आपण चांगला  अनुवाद करू शकू, हा आत्मविश्वास मिळाला. पुढे त्यांनी कन्नड साहित्यातील अनेक दिग्गज लेखकांच्या निवडक साहित्याचा मराठीत अनुवाद केला आणि त्या नामांकित अनुवादिका झाल्या. अनुवादासाठी उत्तम पुस्तकाची निवड करणं, त्यातील आशय समजावून देणं, अनुवादाच्या परवानगीसाठी पत्रव्यवहार करणं, हा सारा व्याप विरुपाक्षांनी केला. एवढंच नाही, तर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची अनुवादाची प्रक्रिया मी ऐकली, तेव्हा तर मी चक्रावूनच गेले. त्या म्हणाल्या, त्यांना कन्नड वाचताच येत नाही. फक्त समजतं. लिपी येत नाही. त्यांच्यासाठी विरुपाक्ष पुस्तकाचं एकेक प्रकरण टेप रेकॉर्डवर वाचतात. नंतर सावकाशपाणे सवडीने ते ऐकत उमाताई त्याचा मराठीत अनुवाद करतात. थोडक्यात काय, तर स्वैपाकाची अशी सगळी सिद्धता विरुपाक्षांनी केल्यावर प्रत्यक्ष रांधण्याचे काम मात्र उमाताई करतात.  संसारा-व्यवहाराप्रमाणे साहित्य क्षेत्रातही त्यांचे सहजीवन चालू आहे. पुढे गप्पा मारता मारता असंही कळलं, विरूपाक्षांनीही मराठीतील निवडक पुस्तकांचे, लेखांचे कन्नडमध्ये अनुवाद केले आहेत. त्यात सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’, सुनीताबाईंचे ‘आहे मनोहर तरी’, ही पुस्तके आहेत. काही लेखही आहेत. ‘संवादु… ‘ वाचताना कळलं, त्यांची २५ अनुवादीत पुस्तके कन्नडमध्ये प्रकाशित झाली आहेत. उमाताईंची पुस्तके साठीच्या उंबरठ्यावर आहेत.  

उमाताईंनीही आपल्या पुस्तकात, आपण भावानुवाद करत असल्याचे सांगून त्याबद्दलचे विश्लेषण अनेक अनुभव देऊन केले आहे. त्या अनुवादासाठी पुस्तकाची निवड, अनुवादाच्या पुस्तकाचा, आशय, वातावरण, लेखकाची शैली आशा विविध अंगांनी सखोल विचार करतात, हे त्यांनी जागोजागी केलेल्या विवेचनावरून दिसते. सुरुवातीचा काळात पुस्तकाच्या अनुवादाचे, आपण पाच- सहा खर्डे काढल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुढे दोन –तीन खर्ड्यांवर काम भागू लागले. त्यांच्या या परिश्रमतूनच त्यांची पुस्तके अधिकाधिक परिपूर्ण आणि समाधान देणारी झाली आहेत. 

संवादु…. अनुवादु’ वाचता वाचता मी त्यांना एकदा फोनवर म्हंटलं, ‘अनुवादाच्या कार्यामुळे तुम्ही खूप श्रीमंत झालात, नाही का?’ त्या म्हणाल्या, ‘हो. अगदी बरोबर!’ अनुवादामुळे त्यांची शिवराम कारंत, भैरप्पा, पूर्णचंद्र तेजस्वी, अनंतमूर्ती, वैदेही अशा मोठमोठ्या साहित्यिकांशी ओळख झाली. जवळीक जुळली. सहवास लाभला. त्यांच्याशी चर्चा करत स्वत:ला अजमावून पाहता आलं. शिवराम कारंत, भैरप्पा यांच्याविषयी तर त्यांनी अगदी भरभरून लिहिले आहे. अनेक प्रसंग, अनेक अनुभव त्यांनी यात दिले आहेत. एकदा शिवराम कारंत पुणे विद्यापीठात चर्चासत्रासाठी आलेले असताना त्यांच्याकडे उतरायला आले, त्यावेळी त्यांना झालेल्या अपरिमित आनंदाचे वर्णन त्यांनी पुस्तकात केले आहे. ते वाचून मला आठवलं, सांगलीत अनुवादावरच्या एका चर्चासत्रासाठी उमाताई आल्या होत्या , तेव्हा त्या माझ्याकडे उतरल्या होत्या. मी त्यांना फोनवर म्हंटलं, ‘ कारंतांच्या येण्याने तुम्हाला झालेला आनंद आणि तुम्ही माझ्याकडे येण्याने मला झालेला आनंद एकाच जातीचा आहे.’ त्यावेळी फोनवरून ऐकलेलं त्यांचं हसणं, मला प्रत्यक्ष पहाते, असं वाटत राहीलं.

अनुवादामुळे त्यांचे केवळ कन्नड साहित्यिकांशीच स्नेहबंध जुळले, असं नाही तर मराठी साहित्यिकही त्यांचे आत्मीय झाले. डॉ. निशिकांत श्रोत्री, डॉ. द.दी. पुंडे त्यांच्या गुरुस्थानीच होते. पु.ल.देशपांडे, अनिल अवचट, प्रभाकर पाध्ये, कमल देसाई अशी अनेक मंडळी  त्यांच्या अंतर्वर्तुळात होती. त्यांच्याही अनेक हृद्य आठवणी यात आहेत.

कमलताई देसाईंच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सांगलीत एक कार्यक्रम करायचे ठरले. या कार्यक्रमाला उमाताई आल्या होत्या. त्या भेटल्या. पण नुसत्याच भेटल्या. गप्पा झाल्या नाहीत. ‘नवीन काय’ एवढंच विचारणं झालं. उत्तर देणं आणि ऐकणं, त्या भरगच्च कार्यक्रमात होऊ शकलं नाही. घरी येणं वगैरे तर दूरचीच गोष्ट.  कार्यक्रम अतिशय हृद्य झाला.

पुन्हा एकदा डॉ. तारा भावाळकरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या सांगलीत आल्या होत्या. तेव्हाही असाच, व्याख्याने, चर्चा, परिसंवाद असा भरगच्च आणि संस्मरणीय कार्यक्रम झाला होता. तेव्हाही उमाताई भेटल्या. पण याही वेळी नुसत्याच भेटल्या. गप्पा झाल्याच नाहीतच.  त्यानंतर म. द. हातकणंगलेकरसरांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व्याख्यान द्यायला उमाताई सांगलीत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही एका दालनात लावलेले होते. इथेही व्याख्यातीभोवती वाचकांचा गराडा असल्याने आमचं बोलणं नाहीच होऊ शकलं. अशा त्यांच्या चुटपुट लावणार्‍या भेटी होत गेल्या. त्या भेटत राहिल्या पुस्तकातून. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या बातम्यातून.

शिवराम कारंत आणि भैरप्पा म्हणजे त्यांच्या ‘मर्मबंधातली ठेव.’ विविध प्रसंगातील त्यांच्या आठवणी त्यांनी अनेक ठिकाणी पुस्तकात दिल्या आहेत. त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक व्यक्तींबद्दल त्यांनी अगदी मनापासून लिहिले आहे, अगदी आपल्या कामवाल्यांबद्दलसुद्धा त्यांनी प्रेमाने लिहिले आहे.

उमाताईंच्या अनुवादामध्ये कारंतांचे ‘डोंगराएवढा’, ‘तनामनाच्या भोवर्‍यात’, भैरप्पांचे ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘काठ’, ‘तंतू’, पूर्णचंद्र तेजस्वींचे, ‘कार्वालो’,, गूढ माणसं’, ‘चिदंबररहस्य’, गिरीश कार्नाडांचे, ‘नागमंडल’, ‘तलेदंड’ अशी अनेक महत्वाची पुस्तके आहेत. किंबहुना त्यांनी महत्वाच्या वाटणार्‍या पुस्तकांचेच अनुवाद केले आहेत. साहित्य अ‍ॅकॅडमीने अनुवादीत पुस्तकांना पुरस्कार द्यायचे ठरवले आणि पाहिला पुरस्कार उमाताईंना मिळाला. ‘वंशवृक्ष’ या भैरप्पांच्या कन्नड कादंबरीच्या अनुवादासाठी १९८९साली त्यांना तो मिळाला होता. नंतर त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पुणे ग्रंथालयाचा ‘वर्धापन पुरस्कार’, महाराष्ट्र फाऊंडेशनचा विशेष पुरस्कार, ‘वरदराज आद्य पुरस्कार ( मराठी व कन्नड समाजातले साहित्यिक- सामाजिक बंधुत्व वाढवण्यास हातभार लावल्याबद्दल ), आपटे वचन मंदिरचा म. बा. जाधव पुरस्कार ( पारखासाठी), स.ह. मोडक पुरस्कार (पर्वसाठी) इ. अनेक पुरस्कार त्यांना मिळत गेले.

क्रमश: – भाग १

©  उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक मनस्वी कार्यकर्ती :  प्रतिभा स्वामी – लेखिका – सुश्री बागेश्री पोंक्षे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ एक मनस्वी कार्यकर्ती :  प्रतिभा स्वामी – लेखिका – सुश्री बागेश्री पोंक्षे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

आज २०२३ साली अत्यंत वेगाने चालणार्‍या या जगात विचार-भावना-कल्पना यांचं येणं, आपल्यावर त्यांचं अक्षरश: कोसळणं आणि कालचा विचार किंवा कालची गोष्ट याला आज बदलतं स्वरूप मिळणं हे किती सहज झालंय. आजची तरुण पिढीदेखील बदलत्या काळाप्रमाणे खूप वेगाने वेगवेगळ्या गोष्टी शिकतेय. नवनवीन तंत्रज्ञान, त्याचा वापर करून वेगाने आपली कामं पूर्ण करणं आणि रोज नवीन काहीतरी शिकणं हे ही पिढी अगदी सहजपणाने करतेय ! अशा अनेक मनस्विनी मला माझ्या कामामुळे भेटल्या.

— त्यातलं प्रतिभाचं जे भेटणं झालं, ते कायमचं लक्षात राहायला कारणही तसंच होतं. सांगोल्यात मराठी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तिच्या कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या मास्टर्स डिग्रीसाठी तिने कोल्हापूर युनिव्हर्सिटी निवडली.

पदवी पूर्ण केल्यानंतर पाठोपाठच्या दोन भावंडांच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी प्रतिभाने शिक्षणातून दोन वर्षांचा विश्राम घेतला होता. त्या काळात आपल्या वडिलांच्या मिळवत्या हातांना तिने स्वत:च्या हाताची साथ दिली! सांगोला डेपोला मेकॅनिक म्हणून काम करीत असलेल्या वडिलांना थोडा आधार झाला. दोन वर्षांनंतर कोल्हापूर युनिव्हर्सिटीची मास्टर्ससाठीची प्रवेश परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे प्रतिभाला तिचं पुढचं शिक्षण अल्प पैशामध्ये करता येणार होतं. त्यासाठी हा सांगोल्यातून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास!

कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्समधून मास्टर्स केल्यानंतर तिने दोन वर्षं छोटी-मोठी कामं केली आणि नंतर पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर कंपनीत ती रुजू झाली. पगार चांगला होता, पण तिचं मन काही त्यात लागत नव्हतं. मनाला कामाचं समाधान मिळत नव्हतं. घड्याळ्याच्या काट्यांबरोबर फिरत राहून शहरांत काम करताना कामात समाधान नाही.. असं झालं होतं. हे काम काही खरं नाही असं वाटायचं. कंपनीत कामाला जाताना बस स्टेशन, बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी छोटी-छोटी मुलं भिक्षा मागताना तिला दिसायची आणि या मुलांचं भविष्य काय? या विचाराने अस्वस्थपणाचं एक बीज तिच्या काळजात रुजलं. आपण सॉफ्टवेअरच्या कामातून पैसे मिळवतो आहोत, पण उद्याची जी देशाची संपत्ती आहे, अशी ही लहान-लहान मुलं भिक्षा मागत फिरत आहेत. त्यांच्या उभ्या आयुष्याचं ती काय करतील? या प्रश्नांनी ती अस्वस्थ झाली.

अभ्यास केल्यावर तिच्या असं लक्षात आलं की ही सगळी मुलं ग्रामीण भागातून शहरी वस्त्यांमध्ये राहायला आली आहेत. आपण एक-दोघा मुलांसाठी काहीतरी करू शकू; पण अशी खूप मोठ्या संख्येत मुलं आहेत आणि त्यांचा प्रश्न मूळ ठिकाणी जाऊन बघितला, तर तो ‘जगायला’ पुढे काही नाही अशा ग्रामीण भागातल्या मुलांचा प्रश्न आहे, हे तिने जाणलं! यासाठी ग्रामीण भागात काही करून पाहण्याची तिची इच्छा दृढ होत गेली.

‘आज सॉफ्टवेअर क्षेत्रात मी आहे. अनेक जण आहेत. मी माझी कंपनी सोडून दुसरं काम सुरू केलं, तर कंपनीला दुसरं कोणीतरी या कामासाठी नक्की मिळेल. पण या मुलांचा विचार करणारे किती जण असतील? कदाचित त्यांची संख्या कमी असेल. मग मला त्यासाठी गेलं पाहिजे.’ … मनाचा कौल झाला आणि अस्वस्थता संपली.

प्रतिभाचे मामा म्हणजे आदरणीय विजयजी स्वामी. प्रतिभा कायमच तिच्या मनातलं त्यांच्याशी बोले, चर्चा करी. विजयजींशी बोलून निर्णयाचा पक्केपणा तपासायचं प्रतिभाने ठरवलं आणि विजयजींनी तिला ज्ञान प्रबोधिनीत पोंक्षे सरांकडे पाठवलं. तिची सगळी गोष्ट ऐकल्यानंतर ग्रामीण भागातल्या महिलांकरता प्राधान्याने काम करणार्‍या सुवर्णाताई गोखले यांच्याकडे सरांनी तिला पाठवलं. प्रतिभाचा निर्णय पक्का होता. आज तिच्या वयाच्या पस्तिशीतच तिने ग्रामीण भागात राहून आठ वर्षं पूर्णवेळ काम केलंय. ज्या वयात सर्वसाधारणपणे स्वत:च्या नोकरीचं, व्यवसायाचं, लग्नाचं ठरवायचं, त्या वयात प्रतिभाने ग्रामीण भागात राहू काम करायला सुरुवात केली.

सुवर्णा गोखलेंसारख्या हाडाच्या मेंटोरकडे (अधिमित्राकडे) प्रतिभा आली, म्हणून आज तिचे स्वत:चे जे विचार आहेत, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारं वस्तुनिष्ठ असं कृतीवर भर देऊन प्रयोग करत शिकण्यासाठीचं व्यासपीठ तिला मिळालं.

पुण्यापासून 50 कि.मी. अंतरावरील वेल्हे तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी राहून प्रतिभा काम करते आहे. तिने सुरुवात केली ती वेल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या मुलींकरता चालवल्या जाणार्‍या सहनिवासात (होस्टेलमध्ये) राहून, या शिक्षणाची आस असलेल्या मुलींची ताई बनून. अशी ताई जी अभ्यासातले अडलेलं सांगेल, संगणक शिकवेल, एखादे काम कसं करायचं, कामाचं नियोजन कसं करायचं हे तर शिकवेलच, तसाच कामामागचा विचार उलगडून सांगेल. आज अशा 60पेक्षा जास्त युवतींना शिक्षणासाठी योग्य बनवण्याचं आणि वेगवेगळ्या कामात पुढाकार घेण्याचं शिक्षण तिने दिलंय!

पण ती मुळात इथे आली होती ते आणखीही एका कामासाठी. ते काम तिला ग्रामीण भागात राहायला येऊन तीन वर्षं झाल्यावर दिसलं……. समाजाच्या एकूण उतरंडीत सगळ्यात शेवटच्या पायरीवर सुटून राहिलेला कातकरी समाज. आज ग्रामीण भागात तयार केलेल्या युवा मैत्रिणींच्या मदतीने ती वेल्हे तालुक्यातील 15 कातकरी वस्त्यांवर काम करते आहे. शाळेचं नाव काढताच पळून जाणारी कातकरी मुलं आज शाळेची गोडी लागून नियमित शाळेत जायला लागली आहेत, तर काही मुली चक्क वसतिगृहात (सहनिवासात) येऊन राहिल्या आहेत. स्वत:ची आणि वस्तीची स्वच्छता यापासून तिने कामाला सुरुवात केली आहे.

स्वत:चं अस्तित्वच नसलेल्या कातकरी समाजाला इंचभरही मालकीची जागा नाही, पॅन कार्ड-आधार कार्डाच्या रूपात कागदावर त्यांचं अस्तित्व नाही! यासाठी त्यांना पॅन कार्ड, आधार कार्ड मिळवून देण्याच्या कामापासून प्रतिभाने सुरुवात केली आहे. सामाजिक जाणिवेचा आणि अन्यायाने अस्वस्थ होणार्‍या काळजाचा वसा सहनिवासातल्या आणि युवती विभागातल्या प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचावा, म्हणून मावळातल्या मुलींनीच कातकरी मुलांसाठी काम केलं पाहिजे अशी गाठ तिने मारून ठेवली आहे. यातूनच पुढील ज्योत लागणार आहे, लागली आहे.

यातूनच कदाचित शहरातील बस स्टँडवर, बाजारात लोकांसमोर पसरलेले चिमुकले तळवे मनगटाला धरून उलटे करण्याचं आणि त्याची मूठ होईल अशी आशा करण्याचं स्वप्न तिने पाहिलं आहे. तिचं अस्वस्थ मन आता थोडं थोडं शांत होत आहे. ‘मी माझ्यापुरतं माझ्या मनात आलेल्या अस्वस्थतेला कृतीने उत्तर दिलं’ असं जणू ती म्हणते आहे. देशाची उद्याची आशा असलेल्या तरुण मुलामुलींना चांगल्या गोष्टींच्या नादाला लावण्याचा नाद तिने घेतलाय.

वेल्हेे तालुक्यातल्या ६०-७० युवती, त्यांच्यासमोर ठेवलेलं शिक्षणाचं संघटनेचं उदाहरण, १५ कातकरी वस्त्यांमधील कातकरी समाजातले ७०० बहीण-भाऊ, वेल्हे तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधील २०० युवती, मावळ भागामधील गावांमधील ‘स्वाधार’ नावाच्या प्रकल्पातील २०० गावकरी असं आपलं वर्तुळ  वाढवत वाढवत प्रतिभाने आपलं कुटुंब मोठं केलं आहे. या सात-आठ वर्षांत तिने केलेलं काम पाहूनच प्रतिभाचं भेटणं हे माझ्या कायम लक्षात राहिलेलं आहे, असं मी म्हटलं !

https://www.evivek.com/Encyc/2023/3/4/social-worker-Pratibha-Swami.html

लेखिका : सुश्री बागेश्री पोंक्षे

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काही  विचारमोती… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ काही  विचारमोती… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

सागराप्रमाणे दुःख असूनही मोत्यांसारख्या सुखासाठी होणारी वाटचाल म्हणजेच आयुष्य असते.

चुका एकांतात सांगाव्यात, आणि कौतुक चार चौघात करावे, म्हणजे नाती जास्त काळ टिकून राहतात.

विरोधक हा शत्रूसारखा समोर असावा, पण आपल्यात बसून आपलीच मापे काढणारा मित्र नसावा.

फोटो लेने के लिये अच्छे कपडे नही, बस मुस्कुराहट अच्छी होनी चाहिये ।

One of the most beautiful things we can do is to help one another, kindness does not cost a thing.

कारणे सांगणारे लोक कधीच यशस्वी होत नाहीत, आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारणे सांगत नाहीत.

जिंकायची मजा तेव्हाच असते, जेव्हा अनेकजण तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पहात असतात.

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ मी आले, निघाले, सजले फुलले, फुलपाखरू झाले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ मी आले, निघाले, सजले फुलले, फुलपाखरू झाले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… ” अगं ये! ऐकलसं का? आमच्या ऑफिसची पिकनिक निघालीय येत्या शुक्रवारी रात्री लोणावळयाला. आणि रविवारी रात्री उशिरापर्यंत परत येणार आहे, चांगले दोन दिवस मौजमजा करुन. तेव्हा जाताना मला भडंग आणि कांदे मिरच्या बांधून देशील.. आम्ही प्रत्येकाने काय काय खाणं आणायचं तेही वाटून घेतलयं बरं.. तुला उगाच करत बसायला त्रास पडायला नको म्हणून अगदी बिना तसदीचं मी ठरवून घेतले आहे.. थंडी फार असेल वाटते आता तिकडे तेव्हा माझे स्वेटर्स, पांघरूण शिवाय दोन दिवसाचे कपडे देखील बॅगेत भरून देशील..बऱ्याच वर्षांनीं पिकनिक निघतेय. तेव्हा मी न जाऊन चालेल कसे?.. “

“.. हे काय मी एव्हढ्या उत्साहाने तुला सांगतोय आणि तू हाताची घडी घालून डोळे बंद करुन हसत काय बसलीस? कुठल्या स्वप्नात दंग झाली आहेस? मी काय म्हणतोय ते ऐकतेस आहेस ना?.. “

” हो हो डोळे बंद असले तरी कान ऊघडे आहेत बरं! झालं का तुमचं सांगुन? का आणखी काही शिल्लक आहे? नसेल तर मी आता काय सांगते ते ऐका! काय योगायोग आहे बघा! आमची महिला मंडळाची सुद्धा पिकनिक निघालीय याच शुक्रवारी रात्री लोणावळयाला,आणि रविवारी रात्री उशिरापर्यंत परत येणार आहे, चांगले दोन दिवस मौजमजा करुन. बऱ्याच वर्षांनीं पिकनिक निघतेय. तेव्हा मी न जाऊन कसे चालेल ?. आम्हा बायकांना तुम्ही पुरुषांनी संसाराच्या चक्रात बांधून पिळून काढत आलात.. फक्त नोकरी आणि तिच्या नावाखाली आजवर आम्हाला वेठीस धरलंय तुम्ही.. रांधा वाढा घर सांभाळा, आलागेला, पोरबाळं आणि गेलाबाजार सासूरवाडीचा बारदाना झेला.. यातच आमचा जन्म वाया गेला… कधी तरी हौसमोज करायची होती.. मेली काटकसर आमच्या नशीबी पाली सारखी चिकटली ती काही सुटायचं नाव घेईना.. साधं माहेरला चार दिवस जाऊन निवांत राहिन म्हटलं तरीही ते जमेना… या उसाभरीत तो जीव कातावून गेला मग आमच्या महिला मंडळाने हा स्व:ताच पुढाकार घेतला.. आम्ही सगळया झाडून पिकनिकला जातोय म्हटलंय.. अगदी एकेकीने पदार्थ पण वाटून घेतलेत.. तयारीसुद्धा सुरू झाली… मी तुम्हांला सांगणारच होते पण म्हटलं तुम्ही काही शनिवारी रविवारी घर सोडून जाताय कुठे? जायच्या आधी एक दिवस कानावर घालू मग जाऊ.. “

“.. तेव्हा लेडीज फस्ट या न्यायाने मी पिकनिकला जाणार हे नक्की.. तुमची यावेळची पिकनिक पुढे ढकला.. नि मला पिकनिकला जायाला जरा मदत करा… आणि हो एक महत्त्वाचं या पिकनिकच्या दिवसात तुम्ही घर सांभाळणार आहात कुठलीही कुरबुर न करता समजलं.. मला कसे जमेल म्हणायचा आता प्रश्नच येत नाही.. संसाराला आता पंचवीसहून अधिक वर्षे लोटली..आता येथून पुढे संसाराची अर्धी जबाबदारी तुम्हालाही द्यायची ठरली… “

“अहो असं काय बघताय माझ्या कडे डोळे विस्फारून.? मी काही चालली नाही तुम्हाला सोडून.!. आता पन्नास टक्के हक्काचे अधिकार आमचेही आहेत त्याचाच लाभ घेणार.. आमच्या मंडळाने ही जागृती केली.. आणि आणि आम्ही सगळया बायकांनी ती आता अंमलात आणायला सुरुवात केली.. तिचा पहिला उपक्रम हि पिकनिक आहे.. तेव्हा बंच्चमजी तुम्ही इथंच थांबायचं आणि मी एकट्याने पिकनिकला जायचं.. “

मी आले, निघाले, सजले फुलले, फुलपाखरू झाले.. वेग पंखाना आला जसा, आला या लकेरी , घेतली भरारी… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

या दिवशी पूजा करण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. आजच्या पिढीला याची उपयुक्तता सांगणे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येक रुढी ,परंपरेला शास्त्रीय आधार आहे.या दिवशी अभ्यंगस्नान करून, ब्रह्मदेवाची दवणा ( थंड असतो म्हणून ) वाहून नंतर महा शांती केली जाते. ” नमस्ते बहू रुपाय विष्णवे नमः।” हा मंत्र म्हणून विष्णुची पूजा करतात. इतिहास, पुराणे यांचे ज्ञान देतात. गुढीपाडव्या दिवशी जो वार असेल, त्याच्या देवतेचीही पूजा केली जाते. संवत्सर पूजा केल्याने, आयुष्य वृद्धी होते. शांती लाभते.आरोग्य लाभते. समृद्धी येते.अशी समजूत आहे. प्रत्यक्ष गुढी उभी करतांना, एका उंच वेळूच्या टोकाला ,भरजरी  खण किंवा साडी ,साखरेच्या गाठी, फुलांचा हार, आंब्याची आणि कडुलिंबाची  डहाळी, आणि या सर्वांवर तांब्याचा किंवा चांदीचा कलश  सजवून, गुढी दाराशी किंवा खिडकीशी उभी केली जाते.याला ब्रह्मध्वज असे ही म्हटले जाते. विजयाचे, मांगल्याचे आणि उत्साहाचे प्रतीक म्हणून ही गुढी असते. समोर रांगोळी काढून गुढीची पूजा केली जाते. कडुलिंब आणि आंब्याच्या झाडाच्या पंचांगांचे आयुर्वेद शास्त्रातील महत्त्व ओळखून हा सन्मान त्यांना दिला आहे. ( ते देववृक्ष आहेत. )कलश रुपी सूत्राच्या सहाय्याने वातावरणातील सात्विक लहरी घरात प्रवेश करतात. ( अँटेनाच्या कार्या प्रमाणे. )या दिवशी नववर्षाच्या पंचांगाची पूजा करून, वर्षफल श्रवण केले जाते. जेवणात पक्वान्नं करून, प्रसाद म्हणून ,कडूलिंबाच्या चटणीचा प्रसाद ग्रहण केला जातो. कटू संबंध दूर करून साखरेप्रमाणे एकमेकातले संबंध वाढावेत ,अशी एकमेकांना सदिच्छा देतात. शेतकरी जमीन नांगरणीस सुरुवात करतात. पारंपारिक वेषभुशा करुन, मिरवणूक काढून, आनंद लुटतात. कोणी नवीन खरेदी करतात. किंवा नवीन कामाला सुरवात करतात.

आपल्या प्रत्येक  सणाला शास्त्रीय आधार आहे. तो नवीन पिढीने अभ्यासायला हवा. जाणून घ्यायला हवा. या शुभ दिनानिमित्त येणारे नवीन शुभ कृती संवत्सर, शालिवाहन शके १९४५ हे सर्वांना सुखाचे, आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो.

– समाप्त – 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अथर्वशीर्ष… लंडनमधील मंदिरात…” – लेखिका : सौ.संजीवनी निमोणकर ☆ श्री मोहन निमोणकर  ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “अथर्वशीर्ष… लंडनमधील मंदिरात…” – लेखिका : सौ.संजीवनी निमोणकर ☆ श्री मोहन निमोणकर ☆

मुलगा-सून व नातू सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असल्याने त्यांच्याकडे जाण्याचा योग आत्तापर्यंत तीन वेळा आलाय. लंडनच्या दक्षिणेस केंट या काऊंटीत असलेल्या ‘ग्रेव्हज्एंड’ या शहरात ते रहातात. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जायचो, तेव्हा वेळात वेळ काढून तिथे जवळपास असणाऱ्या भारतीय मंदिरात आम्ही जात असू. त्यांच्या घराजवळच एक मोठे गुरुव्दारा आहे. एकदा तेथेच आम्हाला एका हिंदू मंदिराबद्दल समजले व आम्ही तेथे जाण्याचे ठरविले.

एका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आम्ही त्या मंदिरात गेलो होतो. मंदिरात पाऊल ठेवताच खूप प्रसन्न वाटले. राम-सीता, शंकर-पार्वती, गणपती, हनुमान अशा आपल्या देवांच्या अतिशय  सुंदर  संगमरवरी मूर्ती पाहून मन खूपच प्रसन्न झाले. त्या मंदिराच्या जागेच्या मालकीणबाई पंजाबी आहेत व तेथील पुजारी श्री.दुबे हेही मध्यप्रदेशातून आलेले आहेत. त्या दोघांनी आम्हाला मराठी भजनं म्हणण्याचा खूप आग्रह केला. आम्ही त्यांना म्हटले, आज संकष्टी चतुर्थी आहे तर आम्ही गणपतीची आरती म्हणतो. पुजारी श्री.दुबेंना मराठी आरती ‘सुखकर्ता’ माहित होती. ते तर खूप खूष झाले व त्यांनी म्हणायला सांगितली. त्या दोघांनीही आमच्या हातात टाळ दिले व पंजाबी आजी स्वत: मृदुंग वाजवून ठेका देऊ लागल्या. मग आम्ही सुखकर्ता व शेंदूर लाल चढायो ही गुजराथी आरती म्हटली. दोघेही एकदम खूष झाले. दुबेंनी तर त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओही घेतला व आता आम्ही येथील सर्व मराठी माणसांनाही तो पाठवू असे सांगितले. या सर्वाने आम्ही खूपच आश्चर्यचकित व प्रभावितही झालो.

आरत्यांनंतर आजींनी माईक आमची सून सौ.निवेदिताकडे दिला व पुन: मराठी भजन म्हणण्याचा आग्रह केला ! तिने गणपती अथर्वशीर्ष म्हणताच दोघेही खूप खूष… व आजी मृदुंग व दुबेगुरुजी व्हिडिओ काढण्यात दंग! मुलगा व सून दोघांनीही मनापासून गणपती अथर्वशीर्ष म्हटले. मंदिरात आलेल्या हिंदु-पंजाबी भक्तांमध्ये एक इंग्लिश महिलाही होती. ती नियमित दर सोमवारी तिथे येते असे नंतर समजले. त्या इंग्लिश महिलेने अगदी व्यवस्थित मांडी घालून, शांत चित्ताने आणि एकाग्रतेने, मनापासून आपल्या बाप्पाची आरती आणि अथर्वशीर्ष ऐकल्याचा आम्हाला सुखद धक्का तर बसलाच, आणि त्याहीपेक्षा, आपल्या प्रार्थनेमुळे तिथे त्यावेळी निर्माण झालेल्या भक्तिमय प्रसन्न वातावरणात, आपली भाषाही समजत नसलेली ती इंग्लिश महिला इतकी गुंगून गेलेली पाहून, आपल्या संस्कृतीचा आम्हाला खूप अभिमान व गर्वही वाटला

परदेशातही आपली संस्कृती जोपासली जाते आहे, आणि त्यात आपला मुलगा व सून यांचाही वाटा आहे, हे पाहून आम्हाला खरंच खूपच छान वाटले. एक अनामिक अभिमान वाटला. इंग्लंडमधल्या हिंदू देवळात मराठी आरत्या म्हटल्या गेलेल्या पाहून पंजाबी आजी व दुबे गुरुजी यांच्या चेहे-यावरही आम्हाला खूपच समाधान व आनंद दिसून आला. आम्ही दोघेही त्या वातावरणाने अतिशय भारावून गेलो होतो. नकळत मनाने पुण्याच्या घरी पोहोचलो होतो आणि आपण इंग्लंडमध्ये आहोत हेही क्षणभर विसरून गेलो होतो. तिथून परतलो ते पुढच्या  भेटीतही पुन: इथे यायचेच असा  निश्चय करूनच.

लेखिका : सौ.संजीवनी निमोणकर

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्री… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ स्त्री… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

जेव्हा विश्वकर्म्याने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार स्त्री निर्माण करावयास घेतली, तेव्हा त्याने निगुतीने, शांतपणे काम करायला सुरूवात केली.

ब्रह्मदेवाने विचारणा केली.

“स्त्री निर्मितीसाठी एवढा वेळ का लागतो आहे?”

 

विश्वकर्म्याने उत्तर दिले,  “तिची रचना करण्यासाठी मला पूर्ण करावे लागणारे सर्व तपशील तुम्हाला निवेदन करतो.”

  • तिने सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये कार्य केले पाहिजे.
  • ती एकाच वेळी अनेक मुले सांभाळण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
  • तिने आलिंगन दिले की दुखापत झालेल्या गुडघ्यापासून, ते तुटलेल्या हृदयापर्यंत ती काहीही बरे करू शकली पाहिजे.
  • तिने हे सर्व फक्त दोन हातांनी केले पाहिजे.
  • ती आजारी असताना स्वत:चे स्वतःला बरे करू शकली पाहिजे. तसेच दिवसाचे १८ तास काम करू शकली पाहिजे.

 

   ब्रह्मदेव प्रभावित झाले. “फक्त दोन हातांनी हे सर्व करणे ….. अशक्य आहे !”

   ब्रह्मदेव जवळ गेले आणि त्या स्त्रीला स्पर्श केला.

   “पण तू तिला खूप मऊ केले आहेस.”

 

   विश्वकर्मा वदले,”ती मऊ आहे, पण मी तिला मजबूत बनवले आहे.  ती काय सहन करू शकते आणि त्यावर मात करू शकते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही”

   “ती विचार करू शकते का?”  देवाने विचारले…

   विश्वकर्मा  उत्तरले “ती नुसता विचार करू शकत नाही, तर ती तर्क करू शकते आणि वाटाघाटीही करू शकते.”

   देवाने तिच्या गालाला स्पर्श केला….

   “हा भाग गळतोय असं वाटतंय! तू या भागावर खूप ओझं टाकलं आहेस.”

“तिथे गळत नाहीये…

ते डोळ्यातील अश्रू आहेत.” 

विश्वकर्माने देवाला सांगितले …

“ते अश्रू आणि कशासाठी?”

देवाने विचारले……

विश्वकर्मा म्हणाले

“अश्रू हे, तिचे दु:ख, तिच्या शंका, तिचं प्रेम, तिचा आनंद, तिचं एकटेपण आणि तिचा अभिमान व्यक्त करण्याचा मार्ग आहे.”  …

त्याचा देवावर चांगलाच प्रभाव पडला,

“विश्वकर्मा, तू अतिशय प्रतिभावान आहेस.

तू सर्व गोष्टींचा विचार केला आहेस.

खरोखर अद्भुत घडण आहे ही एक स्त्री.”

   ■ तिच्यात पुरुषाला चकित करण्याची ताकद आहे.

   ■ ती संकटे हाताळू शकते आणि जड भार वाहून नेऊ शकते.

   ■ तिला आनंद, प्रेम आणि मते आहेत.

   ■ जेव्हा तिला किंचाळावेसे वाटते, तेव्हा ती हसते.

   ■ जेव्हा तिला रडावेसे वाटते, तेव्हा ती गाते, जेव्हा ती आनंदी असते, तेव्हा रडते आणि जेव्हा ती घाबरते, तेव्हा हसते.

   ■ ती ज्यावर विश्वास ठेवते त्यासाठी ती लढते.

   ■ तिचे प्रेम बिनशर्त आहे.

   ■ “एखादा नातेवाईक किंवा परिचित मरण पावल्यावर तिचे हृदय तुटते, परंतु तिला जगण्याची ताकदही मिळते.”

 

   देवाने विचारले:

“तर मग ती एक परिपूर्ण प्राणी आहे?”

 

विश्वकर्माने उत्तर दिले:

“नाही. यात फक्त एकच त्रुटी आहे. तिचे महत्व किती आणि ती किती मौल्यवान आहे हे ती अनेकदा विसरते.”

      स्त्री असणं अनमोल आहे

तिला स्वतःचा अभिमान वाटावा यासाठी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला हे कळू द्या.

संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

नवीन वर्ष सुरू करण्याच्या प्रथा अनेक आणि वेगवेगळ्या आहेत. एक जानेवारीपासून व्यावहारिक वर्ष सुरू होते. एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष , कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्यापारी वर्ष,  एक जून पासून शैक्षणिक वर्ष, त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचे वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. त्यालाच आपण गुढीपाडवा असे म्हणतो.

याला वर्षप्रतिपदा तसेच युगादी तिथी असेही म्हटले जाते. वर्षारंभाचाचे दिवस जरी वेगवेगळे असले तरी एक गोष्ट समान आहे .ती म्हणजे वर्ष हे बारा महिन्यांचेच आहे. ” द्वादश मासौ संवत्सर:। ” असे वेदाने प्रथम सांगितले .आणि जगाने ते मान्य केले आहे. या सर्वांमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वर्षारंभ सर्वात योग्य प्रारंभ दिवस आहे. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.

नैसर्गिक आणि भौगोलिक—- गुढीपाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपात आवर येतो.( संपात बिंदू, क्रांती वृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे  ज्या बिंदूत परस्परांना छेदतात, तो बिंदू.) आणि त्यावेळी वसंत ऋतू सुरू होतो. त्यावेळी उत्साहवर्धक आणि समशीतोष्ण असे हवामान असते. झाडांनाही नवीन पालवी येत असल्याने, तीही टवटवीत दिसतात. कधीही नवनिर्मिती ही आनंददायी असते. तेव्हा अशा वातावरणात नवीन वर्षाची सुरुवात करणे योग्य आणि आदर्शही आहे.

गुढीपाडवा या सणाला पौराणिक असाही आधार आहे. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा आणि रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला आले, तो हा दिवस. महाभारताच्या आदिपर्वात उपरीचर राजाने, त्याला  इंद्राने दिलेल्या कळकाची काठी  त्याने जमिनीत रोवली. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून गुढी पूजन केले जाऊ लागले. एका कथेनुसार, शंकर-पार्वती यांचे लग्न चैत्र शुद्ध प्रतिपदेला ठरले. आणि तृतीयेला झाले .म्हणून या दिवशी आदिशक्ती पार्वतीचीही पूजा करतात.ऐतिहासिक दृष्टीने विचार करता शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने , मातीचे सैन्य केले .आणि त्यावर पाणी शिंपडून, त्याला जीवन  दिले. आणि प्रबळ शत्रूचा पराभव केला. शालिवाहनाने  क्षात्र तेज संपलेल्या समाजात ,आत्मविश्वास निर्माण केला. आणि शत्रूवर विजय मिळविलेला हा दिवस. आणि शालिवाहन शक  तेव्हापासून सुरू झाले.

अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाचे महत्व सांगायचे तर ,या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली असे मानतात .त्यामुळे तो हा दिवस. वर्षा. रंभाचा मानला जातो.

व्यावहारिकदृष्ट्या गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मानला गेला आहे. या दिवसातील कोणतीही घटिका हि शुभ मुहूर्त असल्याने ,वेगळा मुहूर्त काढावा लागत नाही.” गणेशयामल ” या तंत्र ग्रंथात सांगितले आहे की 27 नक्षत्रां पासून निघालेल्या लहरीं मध्ये सत्वगुण निर्माण करणाऱ्या प्रजापती लहरी,चैत्र महिन्यात आणि विशेषतः चैत्र शुद्ध प्रतिपदेला, सर्वात जास्त असतात. म्हणून तो दिवस वर्षारंभ मानणे योग्य आहे.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चैत्र”… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “चैत्र”… ☆ सौ राधिका भांडारकर 

आंब्याच्या झाडावर कोकीळ पक्षाचे “कुहू” ऐकू येते आणि वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी मिळते.   चैत्राची चाहूल जाणवते. नववर्षाची सारीच नवलाई घेऊन सृष्टीही बहरते.

सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो, त्यावेळी हिंदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार चैत्र महिना सुरू होतो. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची बोंबाबोंब आणि रंगपंचमीच्या रंगात नहाल्यानंतर वसंत ऋतु एखाद्या राजासारखा, दिमाखात अवतरतो.  नवा उत्साह, नवी उमेद, चैतन्याचे नजराणे  घेऊन तो कसा ऐटीत येतो.

जुने जाते नवे येते. वृक्ष नव्या, कोवळ्या, हिरव्या रंगाच्या पालवीने बहतात.  गुलमोहराला अपूर्व रक्तिमा चढतो.  पिवळा बहावा फुलतो.  पलाश वृक्षाची अग्नी फुले डोळ्यांना सुखावतात.  मोगऱ्याचा सुगंध दरवळतो. आणि कोकणचा राजा रस गाळतो. उत्तम उत्तम गोष्टींची मनमुराद पखरण करणारा हा वसंत!  ना कशाची वाण  ना कशाची कमतरता.  सारेच साग्रसंगीत, उच्च अभिरुची दर्शवणारे.

।। गंधयुक्त तरीही उष्ण वाटते किती ..।।

आसमंत उष्णतेने भरून जातो.  उन्हाच्या झळा जाणवतात. तप्त वारे वाहतात पण तरीही हे वारे गंधयुक्त असतात.  अनंत आणि मोगऱ्याचा दरवळ जाणवतो. जंगलात कुठेतरी पिवळी धमक सुरंगीची फुलं उमलतात. आणि त्याचा सुगंध साऱ्या सृष्टीला व्यापून राहतो.

चैत्र महिना— वसंत ऋतु म्हणजे सृजनोत्सव.  चैत्र महिन्याच्या साक्षीने आनंदाचे एक महोत्सवी स्वरूपच प्रकटते.  या मासाचे आपल्या सांस्कृतिक जगण्याशी  उत्कट नाते आहे.

या आनंदोत्सवाचे स्वागत उंच गुढ्या उभारून शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाते.  दुष्टांचा संहार  आणि सुष्टांचा विजय म्हणून हा विजयोत्सवही ठरतो.  या ब्रह्मध्वजाच्या पूजेनेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तोच हा चैत्रमास!  चंद्र, चित्रा नक्षत्राच्या सानिध्यात असतो म्हणून हा चैत्र मास.

संस्कृतीची, धार्मिकतेची, सृजनाची, सौंदर्याची जाण देणारा हा टवटवीत, तजेलदार, तालबद्ध मास— वसंत आत्मा— मधुमास.

चैत्रगौरी पूजनाच्या निमित्ताने आंब्याची डाळ,कैरीचे  पन्हे याचा रसास्वाद घेणे म्हणजे परमानंदच.  अंगणात चैत्रांगण सजते.

या महिन्याला जसे श्रद्धा, भक्तीरसाचे वलय आहे, तसेच शृंगार रसात न्हालेल्या  प्रणय भावनेचाही अनुभव आहे.

पक्षी झाडावर घरटी बांधतात.  त्यांची मधुर किलबिल मिलनाची हाक देतात.  मधुप  फुलातल्या परागाशी प्रीतीचे नाते जुळवतात.  तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज ऐकू येते.  कवी कल्पनांना प्रणय गीतांचे धुमारे फुटतात.  चाफा फुलतो आणि बोल घुमतात,

” हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण

उणे करु आपण दोघेजण रे..”

साऱ्या सृष्टीतच या शृंगार रसाची झलक जाणवत असते. निर्मितीच्या, सर्जनशीलतेच्या भावनांना हळुवारपणे गोंजारणारा हा चैत्र महिना, राधा कृष्णाच्या प्रीतीत रमणारा हा चैत्र महिना,  कुणाच्या कवितेत असाही फुलतो..

सिंगार सिसकता रहा

बिलखता रहा हिया

दुहराता रहा गगन से चातक

पिया पिया …

किंवा,

ऋतू वसंत से हो गया कैसा ये अनुराग

काली कोयल गा रही

भांति भांति के राग…

तर असा हा नवीनतेचा, प्रेमाचा, उत्पत्तीचा,  चैतन्याचा संदेश घेऊन येणारा,  सुगंधाचा दरवळ पसरवणारा, हसरा बागडणारा,  धुंद करणारा चैत्र मास …किती त्यास वर्णावे?

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares