श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “अथर्वशीर्ष… लंडनमधील मंदिरात…” – लेखिका : सौ.संजीवनी निमोणकर ☆ श्री मोहन निमोणकर ☆

मुलगा-सून व नातू सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असल्याने त्यांच्याकडे जाण्याचा योग आत्तापर्यंत तीन वेळा आलाय. लंडनच्या दक्षिणेस केंट या काऊंटीत असलेल्या ‘ग्रेव्हज्एंड’ या शहरात ते रहातात. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जायचो, तेव्हा वेळात वेळ काढून तिथे जवळपास असणाऱ्या भारतीय मंदिरात आम्ही जात असू. त्यांच्या घराजवळच एक मोठे गुरुव्दारा आहे. एकदा तेथेच आम्हाला एका हिंदू मंदिराबद्दल समजले व आम्ही तेथे जाण्याचे ठरविले.

एका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आम्ही त्या मंदिरात गेलो होतो. मंदिरात पाऊल ठेवताच खूप प्रसन्न वाटले. राम-सीता, शंकर-पार्वती, गणपती, हनुमान अशा आपल्या देवांच्या अतिशय  सुंदर  संगमरवरी मूर्ती पाहून मन खूपच प्रसन्न झाले. त्या मंदिराच्या जागेच्या मालकीणबाई पंजाबी आहेत व तेथील पुजारी श्री.दुबे हेही मध्यप्रदेशातून आलेले आहेत. त्या दोघांनी आम्हाला मराठी भजनं म्हणण्याचा खूप आग्रह केला. आम्ही त्यांना म्हटले, आज संकष्टी चतुर्थी आहे तर आम्ही गणपतीची आरती म्हणतो. पुजारी श्री.दुबेंना मराठी आरती ‘सुखकर्ता’ माहित होती. ते तर खूप खूष झाले व त्यांनी म्हणायला सांगितली. त्या दोघांनीही आमच्या हातात टाळ दिले व पंजाबी आजी स्वत: मृदुंग वाजवून ठेका देऊ लागल्या. मग आम्ही सुखकर्ता व शेंदूर लाल चढायो ही गुजराथी आरती म्हटली. दोघेही एकदम खूष झाले. दुबेंनी तर त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओही घेतला व आता आम्ही येथील सर्व मराठी माणसांनाही तो पाठवू असे सांगितले. या सर्वाने आम्ही खूपच आश्चर्यचकित व प्रभावितही झालो.

आरत्यांनंतर आजींनी माईक आमची सून सौ.निवेदिताकडे दिला व पुन: मराठी भजन म्हणण्याचा आग्रह केला ! तिने गणपती अथर्वशीर्ष म्हणताच दोघेही खूप खूष… व आजी मृदुंग व दुबेगुरुजी व्हिडिओ काढण्यात दंग! मुलगा व सून दोघांनीही मनापासून गणपती अथर्वशीर्ष म्हटले. मंदिरात आलेल्या हिंदु-पंजाबी भक्तांमध्ये एक इंग्लिश महिलाही होती. ती नियमित दर सोमवारी तिथे येते असे नंतर समजले. त्या इंग्लिश महिलेने अगदी व्यवस्थित मांडी घालून, शांत चित्ताने आणि एकाग्रतेने, मनापासून आपल्या बाप्पाची आरती आणि अथर्वशीर्ष ऐकल्याचा आम्हाला सुखद धक्का तर बसलाच, आणि त्याहीपेक्षा, आपल्या प्रार्थनेमुळे तिथे त्यावेळी निर्माण झालेल्या भक्तिमय प्रसन्न वातावरणात, आपली भाषाही समजत नसलेली ती इंग्लिश महिला इतकी गुंगून गेलेली पाहून, आपल्या संस्कृतीचा आम्हाला खूप अभिमान व गर्वही वाटला

परदेशातही आपली संस्कृती जोपासली जाते आहे, आणि त्यात आपला मुलगा व सून यांचाही वाटा आहे, हे पाहून आम्हाला खरंच खूपच छान वाटले. एक अनामिक अभिमान वाटला. इंग्लंडमधल्या हिंदू देवळात मराठी आरत्या म्हटल्या गेलेल्या पाहून पंजाबी आजी व दुबे गुरुजी यांच्या चेहे-यावरही आम्हाला खूपच समाधान व आनंद दिसून आला. आम्ही दोघेही त्या वातावरणाने अतिशय भारावून गेलो होतो. नकळत मनाने पुण्याच्या घरी पोहोचलो होतो आणि आपण इंग्लंडमध्ये आहोत हेही क्षणभर विसरून गेलो होतो. तिथून परतलो ते पुढच्या  भेटीतही पुन: इथे यायचेच असा  निश्चय करूनच.

लेखिका : सौ.संजीवनी निमोणकर

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments