४ जून ची संध्याकाळ. मावळत्या सूर्या बरोबर मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक तळपतं व्यक्तिमत्व अनंतात विलिन झालं. आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रत्येकाच्या मनात आपुलकीची, जिव्हाळ्याची जागा निर्माण करणारे एक सोज्वळ, शांत, हसरं व्यक्तिमत्व हरपलं ते म्हणजे सुलोचनादीदी.
त्यांचं मूळ नाव ‘रंगू’. पण त्यांचे बोलके डोळे बघून भालजी पेंढारकरांनी त्यांचं नाव ठेवलं ‘सुलोचना’. तेच खूप लोकप्रिय झालं. त्या सर्वांच्या ‘दीदी’ झाल्या.
त्यांनी असंख्य मराठी हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका केल्या. आपल्या अकृत्रिम अभिनयाने प्रत्येक भूमिका त्या जगल्या आणि आई, वहिनी, बहीण आजी ही त्यांची नाती प्रेक्षकांच्या मनात दृढ झाली. त्यांनी साकारलेली आई म्हणजे साक्षात वात्सल्यमूर्तीच होती. त्यांच्या ऐतिहासिक भूमिका रूबाबदार, भारदस्त, करारी होत्या. त्यांचं शांत, सोज्वळ, प्रसन्न रूप आणि प्रेमाची वत्सल नजर कायम मनात कोरली गेली आहे.
कितीतरी गाणी ऐकली की नजरेसमोर त्यांचे सात्विक रूप तरळून जाते. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, पडला पदर खांदा तुझा दिसतो, माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं, रे उठ रानराजा झाली भली पहाट ही गाणी त्यांच्या अभिनयाने मनात ठसली आहेत.
प्रत्यक्ष जीवनातही त्यांच्या मायाळू, सात्विक, सौहार्दपूर्ण वागणुकीने सर्वांशी त्यांचे जवळचे नाते जुळले होते. त्यांचे जाणे आज प्रत्येकाला हेलावून गेले. आपल्याच घरातली कुणी जिव्हाळ्याची व्यक्ती गेली अशीच प्रत्येकाची भावना आहे. ज्यांच्या जाण्याने चटका लागतो, एक पोकळी निर्माण होते अशांपैकीच त्या एक होत्या. त्यांच्या जाण्याने एक सात्विक पर्व संपले आहे.
☆ मला आलेला विचित्र अनुभव… – लेखिका – सुश्री वैदेही मुळये ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
‘द केरला स्टोरी ‘ च्या पार्श्वभूमीवर मला आलेला अनुभव share करावासा वाटतोय, म्हणून हा लेख.
नक्की वाचा.
ही घटना कुठल्या दुसर्या शहरातील नाही तर मुंबईतली. मी शक्यतो कितीही घाईत असले तरीही काही गोष्टींची पडताळणी करते आणि मगच रिक्षा किंवा टॅक्सी यातून प्रवास करते.
ही गोष्ट आहे एप्रिल महिन्यातली. मी रिक्षेने प्रवास करत होते. (सर्व पडताळणी करूनच.) त्यातला रिक्षावाला- ‘ कुठून आलात, कुठे राहता, रोज याच वेळेत येता का,’ असे प्रश्न विचारायला लागला. मी स्पष्टपणे त्याला खडे बोल सुनावले. तो काही वेळ शांत बसला. परत थोड्यावेळाने ” या भागात ना मॅडम बस जात नाहीत. इतर रिक्षावाले पण जास्त पैसे घेतात.” अशी माहिती द्यायला त्याने सुरवात केली.
माझं उतरायचं ठिकाण आलं. मी मीटरप्रमाणे त्याला पैसे द्यायला गेले. तर त्याने चक्क 20 रुपये कमी घेतले. मी त्याला त्याचं कारण विचारलं तर म्हणाला, “आम्हाला पैसे नाही.. तुम्ही महत्त्वाचे आहात.” मला हे खटकलं.
पुढे तो म्हणाला “ तुम्हाला साधारण किती वेळ लागणारे, मी थांबतो तुमच्यासाठी.” मी म्हंटलं “ कशाला, मला 3 तास तरी लागतील.” हे सांगितल्यावर देखील त्याची थांबायची तयारी होती. मी नको म्हंटलं तर म्हणाला “ मग तुमचा नंबर मला द्या मी फोन करतो.” आत्तापर्यंत हळू हळू सर्व प्रकार माझ्या लक्षात आला होता. त्यामुळे मी माझा नंबर न देता त्याचाच नंबर घेतला आणि नाव विचारलं. नाव माझ्या अपेक्षेप्रमाणेच निघालं- “हुसेन”
तो पुढे काही बोलणार तेव्हाच मी नमस्कार करत म्हंटलं, “ दादा हे प्रकार थांबवा. श्रीराम तुमचं भलं करो.”
हे म्हंटल्यावर अचानक त्याची खरी आपुलकी त्याच्या चेहर्यावर उमटली आणि तो निघून गेला.
घटना साधी वाटते पण विचार केला आणि बुद्धी आणि डोळे उघडे ठेवले, तर किती गंभीर होती याचा अंदाज येईल.
आणखी काही मुद्दे मी नमूद करू इच्छिते …
– त्याचे दोन्ही कान टोचलेले होते.
– त्याचं नाव आणि त्याचा पेहेराव, भाषा, यांचा ताळमेळ कुठेच जाणवत नव्हता.
– तो सगळे कामधंदे सोडून तीन तास थांबणार होता.(का???) याचा विचार तुम्ही करा.
– मीटरपेक्षा 20 रुपये कमी.(पैसे वाचविण्यासाठी देखील एखादी मुलगी सहज फसू शकते.)
– नको तितकी आपुलकी.
… या प्रत्येक मुद्द्यात मोठं कारस्थान आहे. मी सावध होते म्हणून वाचले. प्रत्येक स्त्रीने सावध राहणं गरजेचं आहे.
या प्रसंगानंतर मी सेक्युलर नाही, तर सनातनी आहे याचा मला अधिक अभिमान वाटू लागला हे निश्चित.
काळजी घ्या आणि ‘केरला स्टोरी’ नक्की पहा.
धन्यवाद.
लेखिका : सुश्री वैदेही मुळ्ये
संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अबुल मुजफ्फर मुहउद्दीन मुहमद हे नाव वाचून फार बोध होणार नाही कदाचित. पण औरंगजेब हे नाव हा देश आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र कसा विसरू शकेल? औरंगजेब म्हणजे सिंहासनरत्न. आणि यालाच आलमगीर अशी उपाधी होती… म्हणजे जगज्जेता! छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूरायांच्या महाराष्ट्राच्या मातीतच या औरंगजेबाला मूठमाती द्यावी लागली. पण आपल्या स्मरणात हा धर्मांध,पाषाणहृदयी आणि सत्तापिपासु औरंगजेबही ठाण मांडून बसला आहे.
पण हेच नाव धारण करणारा आणखी एक भारतीय आपण पुन्हा आठवला पाहिजे… आणि स्मरणातही ठेवला पाहिजे… औरंगजेब महम्म्द खान असे या वीराचे नाव…रायफलमॅन औरंगजेब खान… भारतीय सेना !
रायफलमॅन औरंगजेब यांचे वडील मोहम्मद हनीफ भारतीय लष्करात जम्मू अॅन्ड कश्मीर लाईट इन्फंट्री मध्ये सैनिकी सेवा करून निवृत्त झाले आहेत. एक भाऊ आधीच सैन्यात आहे. रायफलमॅन औरंगजेब खान यांच्या एका काकांनी दहशतवादी विरोधी कारवाईत आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. यांचे आणखी दोन भाऊ मोहम्मद तारीख आणि मोहम्मद शब्बीर प्रादेशिक सेनेत भरती होऊन देशसेवा करत आहेत.
हे औरंगजेब खान जम्मू-कश्मीरच्या ४४व्या राष्ट्रीय रायफल्स जम्मू अॅन्ड कश्मिर लाईट इन्फंट्रीमधील वीर शिपाईगडी…तरणेबांड,नीडर नौजवान..२०१२ मध्ये भरती झालेले. सैनिकी संस्कार रक्तात भिनलेले औरंगजेब सैनिक सोडून दुसरे काहीही होण्यासाठी जन्मालाच आलेले नव्हतेच मुळात. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून औरंगजेब यांनी फौजी वर्दी अंगावर चढवली. भारतात घुसलेले परकीय दहशतवादी आणि देशाशी बेईमान असलेले स्थानिक माथेफिरू यांच्याविरुद्ध भारतीय सेनेच्या सुरू असलेल्या अनेक कारवायांमध्ये रायफलमॅन औरंगजेब खान आघाडीवर होते.
२०१८ हे वर्ष भारतीय सैन्य आणि अतिरेकी यांच्या संघर्षात भारताच्या बाजूने झुकते माप टाकणारे सिद्ध झाले होते. ४४,राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटने या वर्षी थोड्या-थोडक्या नव्हे तर तब्बल १९ अतिरेक्यांना त्यांच्या ‘आखरी अंजाम तक’ जाण्यात मोठी मदतच केली होती. ह्या युनिटच्या प्रवेशद्वाराबाहेर एक वाक्य लिहिलेला फलक आहे…त्यावर लिहिलेलं आहे…’ आज कॉन्टॅक्ट होगा ! म्हणजे आज आपली आणि अतिरेक्यांची समोरासमोर भेट होणारच आहे…तयारीत रहा गड्यांनो ! ….. ‘
अतिरेकीविरोधी कारवाई धडाक्यात सुरू होती…अनेक अतिरेकी मारले जात होते…त्यात एक मोठे नाव होते… समीर अहमद भट उर्फ टायगर ! हा हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयंघोषित कमांडर होता. यानेच मेजर मोहित शुक्ल यांना ‘मला मारून दाखव’ असे आव्हान विडीओद्वारे दिले होते. मेजर शुक्लसाहेबांनी त्याला त्याची विडीओ-धमकी चोवीस तास जुनी व्हायच्या आतच यमसदनी धाडला !
स्थानिक भागाची, इथल्या तरुणांच्या मानसिकतेची, त्यांच्या शक्ती आणि मर्मस्थळांची उत्तम माहिती असलेले औरंगजेब म्हणजे भारतीय सेनेच्या हातात असलेले अमोघ अस्त्रच बनले होते. अनेक धाडसी कारवायांमध्ये औरंगजेब सहभागी होते. अशाच एका कारवाईत बारामुल्ला मध्ये औरंगजेब यांनी एका जखमी सैनिकाचे प्राण वाचवताना तीन अतिरेक्याना ठार केले होते.
ईद जवळ आली होती. रायफलमॅन औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेऊन घरी निघाले होते. सैनिकांना सुट्टीवर जाताना शस्त्रे सोबत घेऊन जाण्याची अनुमती नसते. म्हणून औरंगजेब नि:शस्त्र होते. आपल्या युनिटच्या जवळूनच त्यांनी एका खाजगी कार चालकाकडे बसस्टॅन्डपर्यंत जाण्यासाठी लिफ्ट घेतली. परंतु दुर्दैवाने त्यांच्या हालाचालींवर शत्रूची नजर होती. कुणी तरी फितुरही झाले असावे बहुदा ! कार युनिटपासून दूर गेल्यावर लगेच त्यांच्यावर हल्ला केला गेला. कारमधून ओढून घेऊन शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्यात आले. दूर जंगलात नेऊन त्यांच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. काश्मीर खो-यातील जे तरुण देशाच्या बाजूने उभे आहेत, त्यांना धाक दाखवण्यासाठी, मनोधैर्य खच्ची करण्यासाठी त्या अतिरेक्यांनी औरंगजेब यांचा विडीओ बनवून प्रसारित करण्याचा घाट घातला होता. त्यांना वाटले असावे…हा गडी घाबरेल..प्राणांची भीक मागेल ! पण यातले काहीही झाले नाही. रायफलमॅन औरंगजेब यांनी त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून सांगितले…” फौजी हूं….मौत से कैसा डर? मै अपना फर्ज निभा रहा हूं….तुम्हे जो करना है कर सकते हो !” आणि हे सांगताना औरंगजेब यांच्या चेह-यावर भीती नावाच्या भावनेचा लवलेशही नव्हता. आणि अर्थातच याचा त्या अतिरेक्यांना प्रचंड संताप आला असावा….त्यांनी तब्बल दहा दिवस त्यांना अमानुषपणे छळले आणि दहाव्या दिवशी रायफलच्या गोळ्यांनी छिन्न विछीन्न झालेला औरंगजेब यांचा देह रस्त्यावर टाकून ते अतिरेकी जंगलात पळून गेले ! दिवस होता १४ जून २०१८.
रायफलमॅन औरंगजेब खान यांच्या अंत्ययात्रेस हजारोंचा जनसमुदाय लोटला होता… अतिरेक्यांच्या अंत्ययात्रांना जमतो त्यापेक्षा कितीतरी जास्त ! भारतीय सैन्याने पूर्ण सैनिकी सन्मानाने त्यांना अंतिम निरोप दिला. या अलौकिक त्यागाची दखल घेत भारतीय सेनेने औरंगजेब यांना १४ ऑगस्ट २०१८ या दिवशी मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर केले. त्यांच्या जन्मगावातील काही तरुण गल्फ देशांमध्ये नोकरीस होते. त्यांनी भारतीय लष्करी दलांत सामील होऊन औरंगजेब यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्या नोक-या सोडून भारतात परतण्याचा निर्णय जाहीर केला… या बलिदानाच्या काहीच महिन्यानंतर औरंगजेब यांना मारण्यात सहभागी असलेला एक अतिरेकी आपल्या सैन्याने ठार केला. दुस-या वर्षीच औरंगजेब यांचे दोन धाकटे भाऊ प्रादेशिक सेनेत भरती झाले ! एका बलिदानाने देशाला आणखी काही सैनिक मिळवून दिले होते…ही बलिदानाची किमया… हुतात्म्यांच्या रक्ताच्या एक-एका थेंबातून एक एक सैनिक तयार होऊ शकतो… म्हणून बलिदाने सातत्याने तरुणांच्या नजरेसमोर असायला पाहिजेत !
१० मे २०२३ रोजी भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांनी एका विशेष समारंभात या शूर हुतात्मा सैनिकाच्या माता-पित्याकडे, महमद हनीफ आणि राजबेगम यांच्याकडे त्यांच्या बहादूर मुलाने मिळवलेले शौर्यचक्र सुपूर्द केले ! या कार्यक्रमात मेजर आदित्य कुमार (10,गढवाल रायफल्स) मुदस्सीर अहमद शेख (जम्मू-कश्मिर पोलिस) यांना मरणोत्तर शौर्य चक्र, कॉन्स्टेबल रोहित कुमार (जम्मू-कश्मिर पोलिस) यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांने अत्यंत दु:खद अंत:करणाने हे पुरस्कार स्विकारले. या प्रसंगी महामहिम राष्ट्रपती महोदयांनी शिष्टाचार बाजूला सारत वीरपत्नी आणि वीरमातांना स्वत: पुढे होऊन आलिंगन दिले… त्यांचे अश्रू पुसले… आणि सारा भारत देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे… असा संदेश दिला.
या भावपूर्ण समारंभात महामहिम राष्ट्रपती महोदयांनी विविध संरक्षण सेवांमधील शूरांना एकूण आठ कीर्ती चक्र (यात पाच मरणोत्तर), एकोणतीस शौर्य चक्र (यातील पाच मरणोत्तर) प्रदान केली. डिफेन्स इनव्हेस्टीचर नावाने ओळखला जाणारा हा पुरस्कार वितरण समारंभ वर्षातून एकदा आयोजित केला जातो. याचे चित्रण दूरचित्रवाणी बातम्यांमध्ये दाखवले जाते. असे समारंभ खरे तर राष्ट्रीय महत्त्वाचे ठरावेत, शाळांतून-महाविद्यालयांतून याची माहिती दिली गेली पाहिजे.
या लेखातील सर्व छायाचित्रे नीट पहावीत, अशी विनंती आहे. हुतात्मा औरंगजेब यांना अखेरची सलामी दिली जात आहे आणि त्याच छायाचित्रात अतिरेक्यांच्या मगरमिठीत असतानाही नीडर राहिलेले औरंगजेब, त्यांच्या आई-वडीलांनी शौर्यचक्र स्विकारल्यानंतर मा.राष्ट्रपती महोदयांनी त्यांना हात जोडून केलेले अभिवादन, औरंगजेब यांचे दोन्ही भाऊ सैन्यात सामील झाले तेंव्हा त्यांच्या आईच्या चेह-यावरील अभिमान,मा.राष्ट्रपती महोदयांनी वीरमातेला दिलेले सांत्वन-आलिंगन ! हर तस्वीर कुछ कहना चाहती है ! यह देश कब सुनेगा उनकी बाते? सत्ता-संघर्ष, ख-या ख-या पैशांची क्रिकेट-सर्कस, राजकीय-सामाजिक आंदोलनं, मौज-मज्जा यांच्या गदारोळात हे असे महान समारंभ एका बाजूला राहतात….हे खेदजनक आहे, हे कुणीही मान्यच करेल !
… कोण जाणे, हे वाचून कुणी औरंगजेब सेनेची वर्दी शरीरावर परिधान करून देशरक्षणार्थ पुढे सरसावेलही ! जयहिंद !!!
☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन☆
(सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता.)
दारावर मोठ्ठ्या, सोनेरी अक्षरात पाटी डकवलेली होती –
— “गणपत महादेव नलावडे, मेयर“!
गणपतरावांनी एकवार पाटीकडे नजर टाकली आणि आत, कार्यालयात प्रवेश करते झाले. गेले चार दिवस रोज ही पाटी पाहात होते ते. पुण्याचे मेयर होऊन बरोब्बर चारच दिवस तर झाले होते त्यांना ! बरं कार्यालयात टेबल-खुर्च्या आणि इतर साधनं आहेत, म्हणून त्याला कार्यालय म्हणायचं फक्त. नाहीतर गेल्या चार दिवसांपासून अक्षरशः पुष्पभांडार झालंय त्याचं. हाऽऽ पुष्पगुच्छांचा ढीग ! हार-तुरे, शुभेच्छापत्रे, भेटवस्तू तर वेगळ्याच !
जागेवर बसल्या-बसल्या न राहावून त्यांनी शिपायाला हाक मारली. तोही धावतच आला.
“जी…?”
“ही एवढीच पत्रं आलीयेत का रे…?”
“व्हय जी!”
“नीट आठवून सांग… एखादं पत्र म्हणा, पाकीट म्हणा वा गुच्छासोबत येते तशी चिठ्ठी म्हणा; नजरेतून सुटली तर नाही ना तुझ्या?”
“न्हाई जी. म्या सोत्ताच तर डाकवाल्याकडनं सारी घेऊन लावून ठेवली हितं!”
यावर गणपतरावांचा चेहरा पडला असावा. कारण, शिपायाने ताबडतोब विचारले–
“कोन्ता खास सांगावा यायचा हुता का?”
“नाही नाही… काही नाही. जा तू.”
“सायेब, माज्याकडनं काई चूक झाली का?”
“नाही नाही… अरे खरंच तसं काही नाही. जा तू.”
गणपतराव चांगलेच वरमले. ‘ आपण जरा अतीच तर करत नाही ना,’ असंही क्षणभर वाटून गेलं त्यांना.
शिपाई बावळटासारखा चेहरा करून जायला लागला. तशी गणपतरावांनी त्याला थांबवलं. म्हणाले,
“अरे ऐक… आता मी जरा काम करत बसणार आहे. आज काही कुणाच्या भेटी-गाठी ठरलेल्या नाहीत ना…? ठीक आहे तर ! आता कुणालाच आत सोडू नकोस.”
“जी” म्हणून शिपाई निघून गेला.
‘आपण स्वत:च करावी का चौकशी?’, गणपतरावांच्या मनात येऊन गेलं. पण ‘नको नको. ते बरं दिसणार नाही’, असं म्हणून त्यांनी तो विचार झटकला आणि समोरच्या कामाकडे लक्ष द्यायला लागले.
हळूहळू तो विचार मागे पडला. त्यानंतर चांगले दोन-एक तास गणपतरावांनी स्वत:ला कामातच बुडवून घेतलं. समाधीच लागली होती जणू त्यांची.
गणपतरावांची समाधी भंगली ती कसल्याश्या कोलाहलाने. सुरुवातीचे एक-दोन क्षण काही समजलंच नाही. नीट लक्ष देऊन ऐकायला लागले तेव्हा जाणवलं की, त्यांच्या कार्यालयाच्या दाराशीच दोन व्यक्ती वाद घालतायत. गणपतरावांनी जागेवरूनच, “काय चाललंय रे? कोण आहे?” असं विचारलं. त्याबरोबर शिपाई धावतच आत आला. मागोमाग एक कार्यकर्त्यासारखा दिसणारा मनुष्यही आत शिरला. ते पाहून शिपायाच्या कपाळाला नकळतच आठ्या पडल्या. पण साहेबांसमोर चिडणं बरं दिसणार नाही म्हणून तो काही बोलला नाही. गणपतरावांनी इशाऱ्यानेच ‘काय झालं?’ असं विचारलं. त्यावर शिपाई सांगू लागला,
“सायेब पाहा ना, तुमीच म्हनले होते ना कुनालाच आत सोडू नको म्हनून. तर ह्ये सायेब ऐकेचनात. काय तर म्हने, टपाल द्यायचंय. म्या म्हनलं, टपालच हाय नव्हं, मंग द्या की माझ्यापाशी मी द्येतो सायबास्नी नंतर. तर म्हनले की, न्हाय, म्हासभेच्या हापिसातून आलोय न् म्हत्वाचा सांगावा हाय. तुमालाच द्यायचा म्हंत्यात…”
गणपतरावांनी आलेल्या व्यक्तीला एकवार आपादमस्तक न्याहाळलं. हिंदूमहासभेच्या कार्यालयातून आल्याचं सांगतोय हा माणूस, पण मग आपण कधी पाहिल्यासारखं का वाटत नाहीये याला?
त्यांचे भाव ओळखून तो समोरचा तरुण मघाशीच्या भांडणाचा लवलेशही न दाखवता उत्साही स्वरात सांगू लागला,— “ मी रविंद्र जगताप. राजापूरला असतो. नुकताच मुंबईला आलोय शिकायला. राजापूरला असल्यापासून महासभेचं काम करतो मी. आज कामानिमित्त पुण्यात येणार होतो. तर काल संध्याकाळीच तात्यारावांनी बोलावून घेतलं..”
— ‘तात्याराव? बॅ. सावरकर?’ हा उल्लेख होताच गणपतरावांनी कान टवकारले ! जगतापच्या ते यत्किंचितही लक्षात आलं नाही. त्याचा ओघ चालूच होता,
“…मी म्हटलं, देईन की त्यात काय ! आता साक्षात स्वा. सावरकरांनी काम सांगितलेलं. त्यांची सेवा करण्याची संधी म्हणजे साक्षात स्वातंत्र्यलक्ष्मीचीच सेवा करण्याची संधी की ! घेतलं पत्र आणि आलो इकडे ! तर हे महाशय आत सोडेचनात ! साहेब कामात आहेत म्हणे ! आता मला सांगा, सावरकरांच्या निरोपापेक्षा अजून कोणतं काम महत्वाचं असणार आहे? घ्या…!!!” – असं म्हणून जगतापने पत्र गणपतरावांच्या दिशेने सरकावले.
गणपतरावांच्या हाताला हलकासा कंप सुटला होता. परंतु तसं जाणवू न देता त्यांनी ते पत्र हातात घेऊन एका बाजूला ठेवले आणि जगतापकडे वळून म्हणाले,
“जगतापसाहेब, चहा घेता ना?”
“छे छे साहेब, चहा नको. घाईत आहे मी जरा. बाहेर मित्र वाट पहात थांबलेयत. ते काय… ते पुण्यात नवा आहे ना मी. कार्यालय माहिती नव्हतं मला.”
यावर गणपतराव म्हणाले, “हरकत नाही. पुढच्यावेळी आलात तर चहाला जरुर या !” मग शिपायाकडे मान वळवून म्हणाले, “ पुढच्यावेळी हे आले तर अडवू नकोस रे यांना. पाहुणे आहेत आपले !”
शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. ‘आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय ’ असं वाटून जगतापचीही छाती फुगली ! त्या आनंदातच तोही परतला.
– क्रमशः भाग पहिला
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मन आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव … ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
आपले मन काय विचार करते याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. तसे पाहता मन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जे दिसत नाही पण अस्तित्वात आहे ते आपले मन. आपल्या मनात सतत विचारांचा कल्लोळ चालूच असतो. मग हे विचार कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक असतात. आपल्यात तयार होणारी सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा ही मनातूनच उगम पावत असते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी आपणास प्रथम आपल्या मनाची तयारी ठेवावी लागते. कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यास प्रयत्नासोबत आपल्या मनाची भक्कम साथ हवी असते. लोक नकळतपणे बोलतात.. बघा .. ” मनात आले तर करेन, नाहीतर नाही करणार ”
आपले मन काय विचार करते याच्यावर आपले वागणे अवलंबून असते. मनात येणाऱ्या बऱ्या-वाईट विचारांवर आपली वर्तणुक ठरत असते. पण आपल्या मनास वाईट कृत्यांपासून परावृत्त करणे हे आपल्याच हातात असते. मन जर वाईट मार्गाने धावत असेल तर त्याला लगाम घालण्याचेही आपल्याच हाती असते. अर्थात अस्तित्वात नाही पण आपणासी संलग्न आहे अशा मनाचे दोर हे आपल्याच हाती असतात. आपणास जर स्वतःचे व्यक्तिमत्व सुसंस्कृत असे प्रभावी घडवायचे असेल तर मनाला ज्ञानाच्या मार्गाने वळवावे लागेल. आपले मन हे ज्ञानाने परिपूर्ण असले पाहिजे. ज्ञान हे चांगल्या विचारांचे उगम स्थान आहे.
आपण आपल्या विचारात सकारात्मकता ठेवली पाहिजे. त्याकरिता रोज सकाळी योग, प्रार्थना, अनेक चांगले विचार यांची मनाशी सांगड घातली पाहिजे. आपण सकाळी सकाळी जितका चांगला विचार करू तितक्या आनंदात आपले दिवस जातात. आपण पौष्टिक आहार घेऊन जसे शरीर तंदुरुस्त ठेवतो तसे चांगल्या विचारांचा नाश्ता रोज मनास भरवलाच पाहिजे. तेव्हाच आपले जीवन अतिसुंदर आणि निरोगी असेल. आपले मन हे सकारात्मक विचारांनी प्रफुल्लीत असावे. जसे सकारात्मक विचार हे आपणास आशावादी बनवतात, तसे नकारात्मक विचार आपल्याला नैराश्याकडे वाहून नेतात. आपल्या मनावर जर नकारात्मक विचारांचा प्रभाव जास्त असेल तर आपण कोणत्याच कार्यात यशस्वी होऊ शकणार नाही. इतकेच काय आपण जर मनाने दुबळे असू तर आजारी असताना कितीही चांगल्या प्रतीची औषध घेतली तरी बरे होणार नाही. आपण जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा डाॅक्टर म्हणत असतात, ‘ घाबरू नका. तुम्हाला या औषधामुळे बरे वाटेल.’ अर्थात डाॅक्टरसुध्दा प्रथम आपले मनोबल वाढवितात. निर्भय होऊन कोणत्याही संकटाचा सामना केला तर अर्धी लढाई आपण आपल्या मनाच्या तयारीवरच जिंकू शकतो.
आपण कोरोना काळाचा विचार केला तर हा काळ एखाद्या महायुद्धासारखाच होता. पण जे लोक मनाने निर्भय, सबल होते, त्यांनी न घाबरता कोरोनावर मात केली. आणि जे भयभीत झाले ते या रोगाचे बळी ठरले. ‘ मी उद्याचा सूर्य अत्यंत प्रसन्नतेने पहाणार आहे.’ असा विचार आपण रात्री झोपताना केला तर नक्कीच उद्याचा दिवस आपल्यासाठी प्रसन्नता घेऊन येतो. ‘ मी खरोखर सुखी आहे. माझे आयुष्य सुंदर आहे. मी निरोगी आहे. .माझे सर्व मित्र, नातेवाईक चांगले आहेत.’ .. अशी अनेक सकारात्मक वाक्ये आपण रोज आपल्या मनावर कोरली पाहिजेत. जणू आपणच आपल्या भविष्याला सकारात्मकतेचे आव्हान दिले पाहिजे. मी येणाऱ्या संकटावर मात करण्यास समर्थ आहे असा विचार करून स्वतःमध्ये सकारात्मक उर्जा तयार केली पाहिजे.
… अशा प्रकारे आपणाकडे सकारात्मक विचारांचे सुदृढ मन असेल तर आपण आयुष्य खूपच सोपेपणाने आणि सुंदर जगू शकू हे निश्चित.
☆ “स्व सुलोचना – एक सात्विक पर्व संपले ” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(३०जुलै १९२८—०४जुन २०२३)
सिनेसृष्टीतील एक सात्विक पर्व संपलं. एक वात्सल्यमूर्ती काळाच्या पडद्यामागे हरपली. एका महान कलावंताची प्रेमस्वरूप सफर संपली.
जिचं नाव घेताच कपाळी रेखीव चंद्रकोर, नाकात नथ, डोईवर काठाचा पदर, आणि डोळ्यात शीतल चंद्रप्रकाश असलेली एक अत्यंत तेजस्वी, कर्तव्यनिष्ठ, करारी, तितकीच प्रेमळ, आणि सात्विक स्त्रीची मुद्रा नकळत उभी राहते, ती म्हणजे चित्रपट सृष्टीचा एक मोठा कालखंड गाजविणाऱ्या श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचीच.
चित्रपटसृष्टीत त्या सुलोचना दीदी म्हणून प्रसिद्ध होत्या. चार जून २०२३ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आणि अभिनयाचं एक दिव्य पर्व समाप्त झालं.
१९४३ साली हिंदी चित्रपट सृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून त्यांनी अभिननयाची सुरुवात केली. त्यानंतर राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढी बरोबरही त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी जवळजवळ ३०० हून अधिक मराठी — हिंदी चित्रपटात भूमिका केल्या.
वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं, कटी पतंग हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट.
चित्रपटात त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांची भाषा इतकी शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची. भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरु. त्यांनी त्यांच्यासाठी एक संस्कृत मासिक लावलं. ते वाचणं अतिशय क्लिष्ट काम होतं मात्र त्याबद्दल अजिबात तक्रार न करता त्यांनी ती मासिकं वाचली आणि भाषा शिक्षण, उच्चार शिक्षणाची अक्षरश: तपस्या पार पाडली.
जशी भूमिका तसा अभिनय,तशीच संवादाची भाषेची भावपूर्ण नेमकी उलगड. सहज,अकृत्रीम हे त्यांचे खास वैशिष्ट्य.
वास्तविक त्यांचं मूळ नाव रंगु. जयप्रभा स्टुडिओत काम करण्यात आल्यानंतर त्यांचे विशाल, भावपूर्ण डोळे पाहून भालजी पेंढारकरांनीच त्यांचे सुलोचना असे नामकरण केले आणि चित्रपटसृष्टीत सुलोचना याच नावाने त्यांना प्रसिद्धी मिळाली.
भालजींना त्या बाबा म्हणायच्या. त्यांच्याविषयी आदरपूर्वक बोलताना त्या म्हणतात,” बाबांनी आम्हाला घोड्यावर बसणं, तलवार चालवणं इत्यादी ऐतिहासिक भूमिका करताना आवश्यक असणाऱ्या गोष्टी शिकवल्या. एडिटिंग सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवलं.”
सुरुवातीला त्या नृत्य प्रधान सिनेमात काम करत. पण भाऊबीज या चित्रपटानंतर त्यांनी तशा प्रकारच्या भूमिका स्वीकारल्या नाहीत. कारण एक दोन ठिकाणी समारंभात त्यांना अशी विचारणा झाली होती की त्या सिनेमात नृत्य का करतात? तेव्हा त्यांनी सांगितले होते की त्या नृत्यकला शिकल्या आहेत. त्यावेळी त्यांना कोणीतरी म्हणालं की, “तुम्ही म्हणजे एक आदर्श स्त्री आहात. तुमचे नृत्य पाहून आमच्याही पोरीबाळी नाचायला लागतील ते आम्हाला कसे चालेल?”
त्यावेळेचा काळ इतका आधुनिकतेकडे झुकलेला नव्हता. विचार मागासलेले होते. पण त्यांच्याविषयी अशी भीती व्यक्त केल्यामुळे त्यांना फार वाईट वाटले आणि मग त्यानंतर त्यांनी चित्रपटात नृत्य करणे सोडून दिले.
सुलोचना दीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषत: आईच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपट सृष्टीशी त्यांचे नाते जिव्हाळ्याचे राहिले. त्या जशा पडद्यावर प्रेमळ सोशिक दिसत तशाच त्या लोकांतही एक सर्वांसाठी मायेचा आधार होत्या. त्यांच्याकडे पाहता क्षणीच एक स्वच्छ, निर्मळ, पावित्र्याचाच अनुभव येत असे. खरोखरच त्यांच्या जाण्याने एक आई गमावल्याचं दुःख होत आहे.
त्यांचा सिने प्रवास अनेक दशकांचा. त्यांनी अनेक नायिका अभिनीत केल्या.
एका मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या होत्या,” एक खंत आहे. पेशवाईतल्या पार्वती बाई, अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी या तीन भूमिका करायच्या राहून गेल्या,”
मराठी चित्रपट सृष्टीला त्यांनी मौलिक योगदान दिले. प्रपंच चित्रपटासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना १९६३ साली मिळाला. महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार, केंद्र शासनातर्फे पद्मश्री, मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्र भूषण आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार —असे अनेक मानाचे तुरे त्यांच्या माथी मिरवले. जीवनगौरव, लाईफ अचीवमेंट अॅवाॅर्ड ही त्यांना मिळाले.
असे हे चित्रपट सृष्टीतील एक निर्मळ, निखळ, विमल व्यक्तिमत्व. काळ कोणासाठी थांबतो? अशा अनेक कलारत्नांना आपण आजवर मुकलो आहोत. आज सुलोचना दीदींच्या रूपाने एक मायेची ज्योत विझली पण कलाकारांचा अंत होत नसतो. कलेच्या रूपात त्यांचं अस्तित्व अमर असतं. सुलोचना दीदींनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचाही दीर्घकाळ अभिनयाच्या माध्यमातून गाजवला. त्यांच्या विविध भूमिकांचा रसिकांनी आस्वाद घेतला. सत्वगुणाचा खरोखरच प्रत्यक्ष अनुभवच घेतला. रसिकांच्या मनावर त्यांनी आनंदाचं राज्य केलं. आज त्या नाहीत. एका महान, जाणत्या कलाकाराची जीवन यात्रा पूर्ण झाली. त्यांना कृतज्ञता भावनांनी निरोप देऊया! प्रेमपूर्वक, आदरपूर्वक श्रद्धांजली वाहूया!!🙏💐
कोणीही भेटलं की तो “श्रीराम” म्हणायचा. सोसायटीच्या वॉचमनपासून कंपनीच्या मालकापर्यंत सगळ्यांनाच हे ठाऊक होतं, आणि आताशा तर तो दिसला की आपसूकच तेही त्याच्या निमित्ताने रामनाम घेत असत. साधना वगैरे नाही, पण रोज एक माळ रामनाम तो घ्यायचा. त्याच्या मित्राला काही हे आवडायचं नाही, पटायचं नाही. “का करायचं असं ? याने तुला काय फायदा होतो ? तू हे कशासाठी करतोस ?” वगैरे प्रश्नांची तो मित्र याच्यावर सरबत्ती करायचा.
तो एरवी त्या मित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा, हसून सोडून द्यायचा. पण एके दिवशी मित्र खनपटीलाच बसला, “तुला काय मिळतं हे सारखं राम राम करून ? तुला काय तो राम दर्शन देतो का असं केल्याने ?”
“काही मिळण्यासाठी कशाला रामाचं नाव घ्यायचं ?” तो शांतपणे म्हणाला. “आणि दर्शन होण्याचंच म्हणशील तर अजून काही ते दर्शन झालं नाही, हे खरंच आहे. पण ते राहू दे. सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचं आहे. कुठे जाऊ ? मदुराई छान आहे का रे ?”
हा एकदम पर्यटनात कुठे घुसला, मित्राला बोध झाला नाही. पण मदुराई छान आहे हे त्याने ऐकलं होतं, त्यामुळे त्याने उत्साहाने या ठिकाणाला अनुमोदन दिलं.
“गाडी घेऊनच जाईन म्हणतो. Long drive पण होईल. पण जायचं कसं ? रस्ता तर माहित नाहीये.”
“कसा रे तू असा भोटम् ? गुगल मॅप आहे की तुझ्या फोनमध्ये. ती बाई सांगेल तसा जात जा की.” मित्र कीव करत म्हणाला.
“तू गेला आहेस का रे मदुराईला ?” त्याची पृच्छा.
“नाही बुवा. मला तो आपला हा म्हणाला होता – छान आहे मदुराई – म्हणून मी तुला सांगितलं.” मित्राची कबूली.
“एक्झॅक्टली. तू मदुराईला गेलेला नाहीस, पण तो अमका अमका गेला आहे, त्याने तुला सांगितलं, म्हणून त्याच्या अनुभवावर विश्वास ठेवून तू ते मला सांगितलंस. तुला मदुराईचा रस्ता ठाऊक नाही, पण ज्या गुगल मॅपने हजारो जणांना योग्य मार्ग दाखवला त्या गुगल मॅपवर तुला विश्वास आहे. मलाही प्रत्यक्ष देव दिसला नाही, पण आमच्या गुरूंना नक्की देव दिसला आहे, त्यांनी सांगितलं आहे – ज्या गुरू परंपरेनं हजारो लाखोंना मार्गदर्शन केलं, त्या गुरू परंपरेने छातीठोकपणे सांगितलं आहे – नामस्मरण करा, तुम्हाला देवदर्शन होईल. विश्वास ठेवायला एवढं कारण पुरेसं आहे, नाही का ?”
या युक्तीवादाची यथार्थता पटल्याने मित्र निरुत्तर झाला. पण तरी त्याला अजून प्रश्न होतेच.
“अरे, पण तू असे किती दिवस अजून राम राम करत राहणार ? इतकी वर्षे झाली तरी तुला जे हवंय ते अजून का मिळालं नाही ? आणि इतकी वर्षे झाली, तरी अजून फक्त राम राम वरच गाडी अडकली आहे तुझी ? इतकी वर्षं झाल्यावर काही वेगळं, काही नवीन, काही आणखी advanced करावं, असं नाही वाटत ? आणि तुला जर माहितीच नाही, तुला नक्की काय हवंय ते तर मग तुला समजणार तरी कसं की तुला जे हवंय ते तुला मिळालं म्हणून?” तो मित्र काही पिच्छा सोडत नव्हता. त्याची टकळी थांबतच नाही म्हटल्यावर त्याच्या सगळ्याच प्रश्नांची फायनल उत्तरं द्यायला त्याने सुरुवात केली.
“तुला पुष्कर लेले माहित आहे ना ? शास्त्रीय संगीत – नाट्यसंगीत गायक ? ऑलरेडी त्यांचं बऱ्यापैकी नाव झाल्यानंतर, सवाई गंधर्व यांच्या गायकीचे बारकावे शिकण्यासाठी ते पुन्हा एका गुरूंकडे गेले – बहुतेक पंडित सत्यशील देशपांडे यांच्याकडे. तर नवीन काही शिकवण्याऐवजी, गुरुजींनी या ख्यातनाम गायकाला पुनश्च हरि ओम म्हणत, मूलभूत षड्ज लावायचा अभ्यास करायला सांगितलं. पुष्कर आश्चर्यचकित झाले. त्यांच्यासारख्या प्रथितयश गायकाला परत “सा” लावायला शिकायला सांगणं म्हणजे चार्टर्ड अकाऊंटंटला पहिल्यापासून बेरजा वजाबाक्या शिकायला सांगण्यासारखं होतं. पण गुरूंवर श्रद्धा ठेवून त्यांनी तो अभ्यास करायला सुरुवात केली. रोजचा रियाझ संपला की ते प्रश्नार्थक मुद्रेने गुरूंकडे पहायचे – काही सल्ला, सूचना किंवा कदाचित कौतुक ऐकू येईल या अपेक्षेने – पण दर वेळी गुरू स्थितप्रज्ञतेने सांगत – अभ्यास चालू ठेवा.
तीन चार महिने असेच निघून गेले, आणि एक दिवस तो “सा” लागला – सापडला. गुरूंनी काही सांगायची गरजच लागली नाही. तो अनुभव, ती अनुभूती पुष्करना मिळाली – जाणवली. ते शहारले. त्यांनी गुरूंकडे पाहिले. मंद हसत गुरूंनी सांगितले – “ये बात ! अब इस षड्जको पकड कर रख्खो.
त्यामुळे जे मिळायला हवे आहे, ते मिळालं आपसूकच कळेल. कोणी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आता प्रश्न राहतो की जे हवं आहे ते अजून का गवसलं नाही.
“ तुझं असं होतं का रे ? टीव्हीवर जाहिरात चालली असते – अवघ्या पाच दहा सेकंदांचा खेळ – पण आपण तल्लीन होतो, त्या जाहिरातीने हसतो वा टचकन डोळ्यात पाणी येतं. ती तल्लीनता येणं महत्त्वाचं. आपण अजून पोटतिडीकीने राम राम म्हणत नाही रे. खच्चून भूक लागल्यावर लेकरू ज्या विश्वासाने आईला पुकारते, वस्त्रहरण होताना द्रौपदी ज्या आर्ततेने कृष्णाचा धावा करते, ते अजून होत नाही. इतकी वर्षे ती आर्तता, तो विश्वास माझ्या हाकेत आणायचा प्रयत्न करतोय, एवढंच.” तो म्हणाला, त्या मित्राला राम राम घातला, आणि आपल्या कामाला निघून गेला.
आज ३ जून २०२३, म्हणजेच ‘जागतिक सायकल दिन’ आहे. त्या निमित्याने आमच्या संकुलात गेल्या एप्रिल महिन्यात पार पडलेल्या एका उपक्रमाची आठवण झाली. त्याविषयी सांगेनच, पण आधी जाणून घेऊ या खास दिवसाबद्दल. सायकल चालवणे हा व्यायामाचा एक स्वस्त आणि मस्त प्रकार आहे. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ३ जून हा जागतिक सायकल दिवस (वर्ल्ड बायसिकल डे) म्हणून घोषित केला.
आता सायकल चालवण्याचे मुख्य फायदे बघू या.
नियमित सायकल चालवल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण तर होतेच पण वयानुसार कमी झालेली ही शक्ती वृद्धिंगत होते. कोरोना व्हायरससारख्या साथीच्या आजारात रोगांविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती फार महत्वाची असते.
सायकलिंग वजन कमी होण्यास मदत करते. चयापचय सुधारणे, स्नायू मजबूत करणे याशिवाय चरबी जाळणे, या सर्वांतून प्रति तास सुमारे ३०० कॅलरीज जाळल्या जातात.
सायकलिंगमुळे हृदयाची तंदुरुस्ती वाढते. नियमित सायकल चालवल्याने आपल्या हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. दररोज नियमितरित्या फक्त 30 मिनिटे सायकल चालवल्याने हृदयविकाराचा धोका ५० टक्के कमी होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सायकलिंग शरीराची लवचिकता आणि स्नायू तसेच सांधे यांची संयुक्त गतिशीलता सुधारते. संधिवात असलेल्या लोकांसाठी हा व्यायामाचा अत्युत्तम प्रकार आहे.
सायकलिंगमुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच, आपले मानसिक आरोग्य सुधारण्यात सायकल चालवण्याचा हातभार लागतो. व्यायामामुळे एंडोर्फिन (Endorphin) नामक संप्रेरक (hormone) शरीरात निर्माण होतात, यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतात. यासोबत निसर्गाचा आनंद लुटतांना, रोजच्या कंटाळवाण्या कामातून ब्रेक घेतांना आपला मूड छान असतो आणि चिंता अन नैराश्य हे दूर जातात. मंडळी, असे निरोगी शरीर अन निरोगी मन असेल तर सायकल एकटयाने काय किंवा ग्रुप मध्ये काय चालवण्याची मजा न्यारीच!
सायकलिंगमुळे आपले जीवाश्म ईंधनावर, अर्थात fossil fuel (उदा. पेट्रोल) खर्च होणारे पैसे वाचतात. तसेच पेट्रोल, डिझेल आणि वायूचा वापर करणाऱ्या वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साईडमुळे होणारे वायू प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होते. यात विजेचीही बचत होऊ शकते. आजकाल विजेवर चालणारी वाहने अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत, म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
‘सायकल चालवा अभियान’
कांही देश तर आपल्या नागरिकांनी सायकल चालवावी म्हणून विशेष अभियान राबवत आहेत. नेदरलँड या देशाने खूप आधीपासून ‘सायकलिंग हॉटबेड’ म्हणून ख्याती मिळवली आहे, बघा ना, सध्या बाईक (सायकल) ची संख्या २३ दशलक्ष) आणि रहिवासी १७ दशलक्ष! अर्थातच सायकल चालवणाऱ्या व्यक्तींमध्ये हा देश नंबर एक आहे. इथे सायकल चालवणाऱ्या नागरिकांना चक्क पैसे दिल्या जातात. २००६ पासून इथल्या कांही व्यावसायिकांनी बाइक चालवणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटर (किमी) कांही युरो देण्याची योजना सुरु केली आहे. यामुळे कंपन्या आणि कर्मचारी दोघेही आनंदी आहेत. या योजनेप्रमाणे जर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस दररोज १० किमी सायकल चालवली, तर तुम्ही योजनेतून वर्षाला सुमारे ४५० युरो कमवू शकता (आता हे आकडे नक्कीच वाढले असतील). या व्यतिरिक्त जर अजून जास्त प्रमाणात सायकल चालवली तर पुरस्कार देण्यात येतात.
येथील डच सरकारने २०१८ ते २०२१ पर्यंत लोकांना सायकल चालवण्यासाठी आणि कामावर जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नात सायकलिंगच्या पायाभूत सुविधांवर सुमारे ४०० दशलक्ष युरो खर्च करण्याचे ठरवले होते. मैत्रांनो, यासाठी १५ मार्ग केवळ सायकलस्वारांसाठी ‘सायकलस्वार फ्रीवे’ बनवणे आणि सायकलसाठी २५००० आणखी पार्किंगसाठी स्थानके निर्माण करणे या सुविधा देण्याचे उद्दिष्ट होते. वरील सर्व आकडे कोरोना काळाच्या आधीचे (२०१८) आहेत) हे वर्णन यासाठी केले की कुठल्याही योजनेत सरकार, खाजगी व्यावसायिक कंपन्या आणि नागरिक यांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी ठरते.
या बाबतीत नेदरलँड सर्वात पुढे असले तरी इटली, फ्रांस आणि बेल्जियम या इतर युरोपियन देशांमध्ये हे कार्य सुरु झाले आहे. न्यूझीलंडमध्ये देखील या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्या जात आहे. जपानमध्ये देखील सायकल अतिशय प्रचलित वाहन आहे. मैत्रांनो आपल्या देशात सुद्धा सायकलिंगला उत्तेजन देणाऱ्या संस्था आहेत. यात अग्रगण्य नांव आहे Cyclop. तसेच या संबंधी कांही ऍप्स देखील प्रचलित आहेत. या संस्था आणि ऍप विषयी संबंधितांनी अधिक माहिती नेटवरून जाणून घेणे आणि त्यांत सहभागी होणे हिताचे ठरेल. आपल्या माहितीनुसार आपल्या शहरात मोफत सायकल स्टॅन्ड असतील, सरकारतर्फे सायकली पुरवल्या जात असतील किंवा सायकल ट्रॅक असतील तर त्याची माहिती समाजमाध्यमांवर टाकल्यास लोक त्या सोयीचा वापर करतील.
रुणवाल गार्डन सिटीचा ‘साइक्लोफन-अर्थ डे २०२३’
शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्’ म्हणजेच सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शरीर हे एकमेव साधन आहे. म्हणूनच शरीर निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सर्व कर्तव्ये आणि कार्ये या शरीराद्वारेच पार पाडावी लागतात. त्यामुळे या मौल्यवान देहाचे रक्षण करणे व त्याचे आरोग्य राखणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे. हाच विचार करून रुणवाल गार्डन सिटी मध्ये मागील वर्षी प्रथमच सायक्लोफन-२०२२ हा उपक्रम कार्यान्वित केला होता. मागील वर्षी आमच्या पहिल्या सायक्लोफनच्या सांगतेच्या दिवशी, ठाण्याचे प्रसिद्ध बायसिकल मेयर, .श्री चिराग शहा यांनी प्रमुख अतिथि या नात्याने उपस्थित राहून आम्हा सर्वांनाच खूप प्रेरणा दिली होती. त्याच प्रेरणेचे फलित म्हणजे या वर्षी देखील हा उपक्रम राबवल्या गेला.
या आयोजनाचे हे दुसरे वर्ष होते. गेल्या २२ ते ३० एप्रिलच्या अवधीत (कुठल्याही ७ दिवसात) सायकलिंग करणाऱ्यांना दररोज ५ किमी प्रमाणे किमान ३५ किमी असे अंतर, किंवा याच अवधी मध्ये दररोज ३ किमी पायी चालत, किमान २१ किमी असे अंतर पूर्ण करायचे होते. हा माफक चॅलेंज होता. परंतू चालणे, सायकल चालवणे किंवा तत्सम कुठलाही व्यायाम न करणाऱ्यांसाठी हा चॅलेंज तसा भारीच होता. मुलांच्या नुकत्याच सुट्ट्या होऊ घातलेल्या आणि बहुतेकांचे मे महिन्यात बाहेरगावी जाणे असल्याने ‘विश्व वसुंधरा दिवसाचे’ (World Earth Day) निमित्य साधत २२ एप्रिल पासून हा इव्हेंट सुरु झाला. अपेक्षेप्रमाणे मुलांचा सायकल चालवण्यात सहभाग अतिशय कौतुकास्पद होता. दिलेल्या अवधीत जास्तीतजास्त किमी पार करणाऱ्या सायकलस्वाराला आणि पायी चालणाऱ्याला बक्षीस होते. संपूर्ण कुटुंबाने भाग घेतल्यास वेगळे बक्षीस होते.
आमचे कुटुंब यात दर वर्षीप्रमाणे सहभागी होतेच. माझे कुटुंबीय सायकल चालवीत होते. मी मात्र चालण्यात समाधान मानले. रामप्रहरी चालल्यास ऊन आणि घामापासून सुटका असायची. यात कांही लोकांना (मी यात होते) सकाळी उठोनि चालायची खंडित झालेली सवय मात्र परत लागली. यात सहभाग घेणाऱ्यास STRAVA किंवा इतर कुठलेही ऍप वापरून सायकल चालवण्याचे किंवा पायी चालण्याचे किमी रेकॉर्ड करून त्यांचा “पुरावा” आयोजकांना देणे क्रमप्राप्त होते. तसेच निसर्गरम्य स्थानांचे आणि सेल्फी, या सर्व फोटोंचे ‘CycloFUN-2023’ या व्हॅट्सऍप ग्रुप मध्ये स्वागतच असायचे. यात गंमत म्हणजे तुम्ही नोंदणी करतांना तुमचा किंवा तुमची जोडीदार असणे आवश्यक होते. शक्य असल्यास जोडीदाराबरोबर सायकल चालवणे किंवा पायी चालणे, सोबत सेल्फी काढणे वगैरे कार्यक्रम आपसूकच झाले.
या विषयाच्या उत्तरार्धात ‘सायक्लोफन-२०२३’ चे आमचे अनुभव आणि ३० एप्रिल २०२३ ला झालेल्या या उपक्रमाच्या सांगतेचा वृत्तांत सादर करीन. अगदी लवकरच भेटू या.
☆ कूर्मजयंती निमित्त —…☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆
कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहे. – मंदिराच्या बाहेर कासव असण्याचे महत्त्व —
कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असते. कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्त झाले आहे. कासव हे श्रीविष्णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.
काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.
कासवाचे गुण
१) कासवाला ६ पाय असतात, तसेच माणसाला ६ शत्रू असतात.
— काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर
— कासव हे सर्व सोडून नतमस्तक होते. त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडून मंदिरात यावे
२) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातून प्रेम देवून वाढवते. त्याच प्रमाणे देवाने आपल्यावर कृपा दृष्टी ठेवावी ही भावना आहे.
३) कासव आपल्या अष्ट अंगांनी नमस्कार करते. त्याप्रमाणे आपण पण करावा यांकरीता कासव मंदिरात असते.
४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते, त्याप्रमाणे मंदिरात देवासमोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही, हे कासव आपल्याला शिकवते.
कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याचा भावार्थ
कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ ‘ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते ‘, असा आहे.
आपणास माहिती आहे का की कासव (मादी) ही आपल्या पिल्यांना कधीच दूध पाजत नसते. तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते
— त्या प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे, ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्या, या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.
कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत. श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते.
– इदं न मम
संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप दिवसांनी मला निवांत वेळ मिळालेला.. म्हणजे मी तो काढलेला होता अगदी प्रयासाने. स्वतःसाठी वेळ असतोच कुठे आपल्याला या धावपळीच्या जगात ?. घर, नोकरी, मुलं बाळं, नातेवाईक, सण समारंभ यातच गुरफटुन गेलेलो असतो आपण.. स्वतःकडे बघायला वेळच नसतो. स्वतःसाठी वेळ काढावा असे मनात पण येत नाही. बरं ते असो…
खूप उबग आला होता सगळ्याचा. अगदी सगळ्याचा. खोटं खोटं हसण्याचा, खोटं आनंदी आहे सुखी आहे हे दाखवण्याचा. कंटाळला होता जीव. घुसमट असह्य होत होती. काही सेकंद माझी मलाच भीती वाटली. सगळे मुखवटे फाडून टाकून जावे. . कुठे तरी अशा शांत ठिकाणी जिथे मी आहे तशीच मला दिसेन. देखावे करावे लागणार नाहीत. आपण कसे आहोत हे आपले आपल्याला कळत असतेच ना. जगाला दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी ? या विचाराने मन सुन्न झाले. नकळत पायात चप्पल चढवली आणि अशीच चालत निघाले न थांबता. कुठे जायचे असा विचारही मनात आलाच नाही. फक्त चालत राहिले… खिन्न मनाने एकटीच. . . बहुतेक निवांतपणा, एकटेपणा शोधत होते माझे मन. कोणत्याच भावना, कल्पना मनाला शिवतच नव्हत्या.
थोडा थंड वारा अंगाला स्पर्श करून गेला, पालापाचोळा वाऱ्याने सळसळला तेव्हा मी भानावर आले. संध्याकाळची वेळ होती. चंद्राचा मंद प्रकाश चोहोबाजूंनी पसरलेला होता. झाडांची सळसळ, पक्षांचा दुरुन येणारा आवाज आणि आल्हाददायक असे वातावरण एरवी मनाला मोहवून टाकणारेच होते. पण आता मनात अनेक प्रश्नांचे वादळ उठले होते त्यामुळे मनाला चैन नव्हती. मी तशीच जड पावलांनी चालत राहिले. थोड्या अंतरावर एक शांत डोह नजरेस पडला. बहुतेक मघाशी आलेली थंड वाऱ्याची झुळूक डोहाला भेटूनच आली असावी. ती झुळुक अंगावरून मोरपीस फिरवून गेल्याचा भास झाला.
पायात वाळलेली पाने घिरट्या घालत होती. एकदम हसू आले मला. . . घरी पायात सगळी सारखी (बंधने ) घुटमळत असतातच, इथे पण या पानांनी त्यांची जागा घेतली की काय असे वाटले. . . .
जरा निरखून पाहिले असता जाणवले की खट्याळ वारा त्या सुकलेल्या पानांशी छान खेळत होता. माझे तिथे असण्याने त्याच्या खेळात काहीच फरक पडत नव्हता. मी थोडी पुढे चालत आले. एक मोठे झाड दिसत होते. तिथे जरा जवळ गेल्यावर झाडाच्या जवळ थोडे हिरवेगार गवत दिसायला लागले. पायातली चप्पल नकळतच मी काढली आणि अनवाणीच झाडाच्या दिशेने चालू लागले. त्या झाडाखाली थोड़ी विसावले. पायातून हिरवाई डोळ्यात उतरावी तसे डोळे एकदम थंड झालेले. डोळे मिटून घ्यावे या विचारात असतानाच समोर निळाशार डोह एकदम शांत असल्याचे जाणवले, जसे की एखादा सन्यस्त. काहीही हालचाल नाही. कोणतीही वलय नाही. एकदम संथ आणि इतका स्वच्छ की तळ दिसावा. मी जरा पुढे येवून डोकावले तर खरंच तळ दिसत होता.
संध्याकाळची वेळ. चंद्राची एक छान लकेर सरळ पाण्याच्या आरपार अगदी तळाशी गेलेली मला दिसली. त्या किरणांच्या प्रकाशात काही दगड व वनस्पती एकदम चमकून गेले. थोडा मंद प्रकाश होता. त्यामुळे फारसे काही दिसले नाही, पण जे काही थोडेफार दिसले ते विलक्षण होते. खूप वेळ अशीच बघत राहीले त्या डोहाकडे आणि त्या तळातल्या अद्भुत वाटणाऱ्या निसर्गाच्या चमत्काराकडे. विलक्षण ओढ जाणवली मनाला. डोह आणि मन यांच्यांत काहीतरी साम्य असावे का हा विचार एक क्षणभरच मनात आला आणि गेला पण. मन आणि तेही डोहासारखे ? कसे शक्य आहे. इतके स्वच्छ नितळ मन असते का ?
तळ दिसावा एवढे. . . . .
आपल्या मनात किती चांगल्या वाईट घटना, गोष्टी, क्षण घर करून असतात. द्वेष, राग, मत्सर, घृणा, दुःख, वेदना या सगळ्यांनी मनाचा डोह ढवळून निघालेला असतो. मन अगदी गढूळ झालेले असते. त्यात आपल्याला तरी आपल्या मनाचा तळ दिसेल का ? तळ दिसला तरी तो असेल का या डोहासारखा नितळ. मनाच्या तळाशी धगधगत असतात काही सल, काही आठवणी, अपमान. आणि आपण त्यांनाच जोपासत बसतो. चंद्राची एक लकेरसुद्धा आपण त्यावर पडू देत नाही. त्या शांत स्वच्छ डोहाची तुलना मनाशी केली खरी पण ते बुद्धीला रुचेना.
माझ्या मनात असंख्य वादळे घेऊनच तर मी इथे पोहोचले होते. त्यातील साठलेला गाळ असह्य होत होता. पण याचा निचरा करण्याचा प्रयत्न आपल्यलाच करायला हवा …. चला आपल्याच मनात डोकावून बघूया. दिसतो का मनाचा तळ ते तरी बघूया. दिसत नाही ? हरकत नाही आपणच आपल्या मनातील साठलेला गाळ काढायला हवा. द्वेष, राग, मत्सर, घृणा, दुःख, वेदना या गाळरूपी भावनांना बांध घालू या. श्रध्दा, भक्ती, विश्वास, प्रेम या आनंदरूपी तुरटीने मनाचा डोह स्वच्छ नितळ करण्यास सुरुवात करू. सोपे नाही आणि इतके सोपे नसतेच काही…. पण अशक्यही नाही.
पक्षी हळूहळू घरट्यात परतू लागलेले. त्यांच्या दमलेल्या पण सार्थ चिवचिवाटाने मी भानावर आले. माझे मन एकदम शांत निर्मळ भासू लागले. . अगदी त्या डोहासारखे.
मी डोहाकडे पाहिले. तो माझ्याकडेच पहात होता. त्याने एक आश्वासक स्मितहास्य केले. माझ्या चेहर्यावर पण खूप दिवसांनी समाधानाचे हास्य उमटले. ते पण मी त्या डोहाच्या पाण्यातच पहात होते. त्याचे आणि माझे मन एकमेकांचे झालेले अगदी एकरूप …
आता खूप समाधानाने मी माझ्या घरच्या दिशेने भरभर पाऊले टाकत चालू लागले. घरच्या मुलाबाळांच्या ओढीने. पण ही ओढ आता खूप सुखावणारी होती. मी माझे मन जणू डोहाजवळ मोकळे करून निघालेले. दूर जातानाही तो डोह माझ्या मनात स्मरणात तसाच राहिला. अगदी सखा व्हावा असा ….