सौ राधिका भांडारकर

??

☆ “स्व सुलोचना – एक सात्विक पर्व संपले ” ☆ सौ राधिका भांडारकर 

(३०जुलै १९२८—०४जुन २०२३)

सिनेसृष्टीतील एक सात्विक पर्व संपलं. एक वात्सल्यमूर्ती काळाच्या पडद्यामागे हरपली.  एका महान कलावंताची प्रेमस्वरूप सफर संपली.

जिचं नाव घेताच कपाळी रेखीव चंद्रकोर, नाकात नथ, डोईवर काठाचा पदर, आणि डोळ्यात शीतल चंद्रप्रकाश असलेली एक अत्यंत तेजस्वी,  कर्तव्यनिष्ठ, करारी, तितकीच प्रेमळ, आणि सात्विक स्त्रीची मुद्रा नकळत उभी राहते, ती म्हणजे चित्रपट सृष्टीचा एक मोठा कालखंड गाजविणाऱ्या श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचीच.

चित्रपटसृष्टीत  त्या सुलोचना दीदी  म्हणून प्रसिद्ध होत्या. चार जून २०२३ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आणि अभिनयाचं एक दिव्य पर्व समाप्त झालं.

१९४३ साली  हिंदी चित्रपट सृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून त्यांनी अभिननयाची  सुरुवात केली.  त्यानंतर राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढी बरोबरही त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी जवळजवळ ३०० हून अधिक मराठी — हिंदी चित्रपटात भूमिका केल्या.

वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं,  कटी पतंग हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट.

चित्रपटात त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांची  भाषा इतकी शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची. भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरु.  त्यांनी त्यांच्यासाठी एक संस्कृत मासिक लावलं.  ते वाचणं अतिशय क्लिष्ट काम होतं मात्र त्याबद्दल अजिबात तक्रार न करता त्यांनी ती मासिकं वाचली आणि भाषा शिक्षण, उच्चार शिक्षणाची अक्षरश: तपस्या पार पाडली. 

जशी भूमिका तसा अभिनय,तशीच संवादाची भाषेची भावपूर्ण नेमकी उलगड. सहज,अकृत्रीम हे त्यांचे खास वैशिष्ट्य.

वास्तविक त्यांचं मूळ नाव रंगु. जयप्रभा स्टुडिओत  काम करण्यात आल्यानंतर त्यांचे विशाल, भावपूर्ण डोळे पाहून भालजी पेंढारकरांनीच त्यांचे सुलोचना असे नामकरण केले आणि चित्रपटसृष्टीत सुलोचना याच नावाने त्यांना प्रसिद्धी मिळाली.

भालजींना त्या बाबा म्हणायच्या. त्यांच्याविषयी आदरपूर्वक बोलताना त्या म्हणतात,” बाबांनी आम्हाला घोड्यावर बसणं, तलवार चालवणं इत्यादी ऐतिहासिक भूमिका करताना आवश्यक असणाऱ्या गोष्टी शिकवल्या. एडिटिंग सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवलं.”

सुरुवातीला त्या नृत्य प्रधान सिनेमात काम करत.  पण भाऊबीज या चित्रपटानंतर त्यांनी तशा प्रकारच्या भूमिका स्वीकारल्या नाहीत.  कारण एक दोन ठिकाणी समारंभात त्यांना अशी विचारणा झाली होती की त्या सिनेमात नृत्य का करतात?  तेव्हा त्यांनी सांगितले होते की त्या नृत्यकला शिकल्या  आहेत.  त्यावेळी त्यांना कोणीतरी म्हणालं की, “तुम्ही म्हणजे एक आदर्श स्त्री आहात.  तुमचे नृत्य पाहून आमच्याही पोरीबाळी नाचायला लागतील ते आम्हाला कसे चालेल?”

त्यावेळेचा काळ इतका आधुनिकतेकडे झुकलेला नव्हता. विचार मागासलेले होते.  पण त्यांच्याविषयी अशी भीती व्यक्त केल्यामुळे त्यांना फार वाईट वाटले आणि मग त्यानंतर त्यांनी चित्रपटात नृत्य करणे सोडून दिले.

सुलोचना दीदींनी  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवला.  त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषत:  आईच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.  हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपट सृष्टीशी त्यांचे नाते जिव्हाळ्याचे राहिले.  त्या जशा पडद्यावर प्रेमळ सोशिक दिसत तशाच त्या लोकांतही एक सर्वांसाठी मायेचा आधार होत्या.  त्यांच्याकडे पाहता क्षणीच एक स्वच्छ, निर्मळ, पावित्र्याचाच अनुभव येत असे. खरोखरच त्यांच्या जाण्याने एक आई गमावल्याचं दुःख होत आहे.

त्यांचा सिने प्रवास अनेक दशकांचा.  त्यांनी अनेक नायिका  अभिनीत केल्या.

एका मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या होत्या,” एक खंत आहे.  पेशवाईतल्या पार्वती बाई, अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी या तीन भूमिका करायच्या राहून गेल्या,”

मराठी चित्रपट सृष्टीला त्यांनी मौलिक योगदान दिले.  प्रपंच चित्रपटासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना १९६३ साली  मिळाला.  महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार, केंद्र शासनातर्फे पद्मश्री, मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्र भूषण आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार —असे अनेक मानाचे तुरे त्यांच्या माथी  मिरवले.  जीवनगौरव,  लाईफ अचीवमेंट अॅवाॅर्ड ही त्यांना मिळाले.

असे हे चित्रपट सृष्टीतील एक निर्मळ, निखळ, विमल व्यक्तिमत्व.  काळ कोणासाठी थांबतो? अशा अनेक कलारत्नांना आपण आजवर मुकलो आहोत.  आज सुलोचना दीदींच्या रूपाने एक मायेची ज्योत  विझली पण कलाकारांचा अंत होत नसतो.  कलेच्या रूपात त्यांचं अस्तित्व अमर असतं.  सुलोचना दीदींनी  स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचाही दीर्घकाळ अभिनयाच्या माध्यमातून गाजवला.  त्यांच्या विविध भूमिकांचा रसिकांनी आस्वाद घेतला.  सत्वगुणाचा खरोखरच प्रत्यक्ष अनुभवच घेतला.  रसिकांच्या मनावर त्यांनी आनंदाचं राज्य केलं. आज त्या नाहीत.  एका महान, जाणत्या कलाकाराची जीवन यात्रा पूर्ण झाली.  त्यांना कृतज्ञता भावनांनी निरोप देऊया!  प्रेमपूर्वक, आदरपूर्वक श्रद्धांजली वाहूया!!🙏💐

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments