डाॅ. मीना श्रीवास्तव

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ‘जागतिक सायकल दिन’-३ जून २०२३ (पूर्वार्ध) ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो,

आज ३ जून २०२३, म्हणजेच ‘जागतिक सायकल दिन’ आहे. त्या निमित्याने आमच्या संकुलात गेल्या एप्रिल महिन्यात पार पडलेल्या एका उपक्रमाची आठवण झाली. त्याविषयी सांगेनच, पण आधी जाणून घेऊ या खास दिवसाबद्दल. सायकल चालवणे हा व्यायामाचा एक स्वस्त आणि मस्त प्रकार आहे. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ३ जून हा जागतिक सायकल दिवस (वर्ल्ड बायसिकल डे) म्हणून घोषित केला.

आता सायकल चालवण्याचे मुख्य फायदे बघू या.

  • नियमित सायकल चालवल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण तर होतेच पण वयानुसार कमी झालेली ही शक्ती वृद्धिंगत होते. कोरोना व्हायरससारख्या साथीच्या आजारात रोगांविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती फार महत्वाची असते.
  • सायकलिंग वजन कमी होण्यास मदत करते. चयापचय सुधारणे, स्नायू मजबूत करणे याशिवाय चरबी जाळणे, या सर्वांतून प्रति तास सुमारे ३०० कॅलरीज जाळल्या जातात.
  • सायकलिंगमुळे हृदयाची तंदुरुस्ती वाढते. नियमित सायकल चालवल्याने आपल्या हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. दररोज नियमितरित्या फक्त 30 मिनिटे सायकल चालवल्याने हृदयविकाराचा धोका ५० टक्के कमी होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
  • सायकलिंग शरीराची लवचिकता आणि स्नायू तसेच सांधे यांची संयुक्त गतिशीलता सुधारते. संधिवात असलेल्या लोकांसाठी हा व्यायामाचा अत्युत्तम प्रकार आहे.
  • सायकलिंगमुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच, आपले मानसिक आरोग्य सुधारण्यात सायकल चालवण्याचा हातभार लागतो. व्यायामामुळे एंडोर्फिन (Endorphin) नामक संप्रेरक (hormone) शरीरात निर्माण होतात, यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतात. यासोबत निसर्गाचा आनंद लुटतांना, रोजच्या कंटाळवाण्या कामातून ब्रेक घेतांना आपला मूड छान असतो आणि चिंता अन नैराश्य हे दूर जातात. मंडळी, असे निरोगी शरीर अन निरोगी मन असेल तर सायकल एकटयाने काय किंवा ग्रुप मध्ये काय चालवण्याची मजा न्यारीच!
  • सायकलिंगमुळे आपले जीवाश्म ईंधनावर, अर्थात fossil fuel (उदा. पेट्रोल) खर्च होणारे पैसे वाचतात. तसेच पेट्रोल, डिझेल आणि वायूचा वापर करणाऱ्या वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साईडमुळे होणारे वायू प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होते. यात विजेचीही बचत होऊ शकते. आजकाल विजेवर चालणारी वाहने अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत, म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 

सायकल चालवा अभियान

कांही देश तर आपल्या नागरिकांनी सायकल चालवावी म्हणून विशेष अभियान राबवत आहेत. नेदरलँड या देशाने खूप आधीपासून ‘सायकलिंग हॉटबेड’ म्हणून ख्याती मिळवली आहे, बघा ना, सध्या बाईक (सायकल) ची संख्या २३ दशलक्ष) आणि रहिवासी १७ दशलक्ष! अर्थातच सायकल चालवणाऱ्या व्यक्तींमध्ये हा देश नंबर एक आहे. इथे सायकल चालवणाऱ्या नागरिकांना चक्क पैसे दिल्या जातात. २००६ पासून इथल्या कांही व्यावसायिकांनी बाइक चालवणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटर (किमी) कांही युरो देण्याची योजना सुरु केली आहे. यामुळे कंपन्या आणि कर्मचारी दोघेही आनंदी आहेत. या योजनेप्रमाणे जर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस दररोज १० किमी सायकल चालवली, तर तुम्ही योजनेतून वर्षाला सुमारे ४५० युरो कमवू शकता (आता हे आकडे नक्कीच वाढले असतील). या व्यतिरिक्त जर अजून जास्त प्रमाणात सायकल चालवली तर पुरस्कार देण्यात येतात. 

येथील डच सरकारने २०१८ ते २०२१ पर्यंत लोकांना सायकल चालवण्यासाठी आणि कामावर जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नात सायकलिंगच्या पायाभूत सुविधांवर सुमारे ४०० दशलक्ष युरो खर्च करण्याचे ठरवले होते. मैत्रांनो, यासाठी १५ मार्ग केवळ सायकलस्वारांसाठी ‘सायकलस्वार फ्रीवे’ बनवणे आणि सायकलसाठी २५००० आणखी पार्किंगसाठी स्थानके निर्माण करणे या सुविधा देण्याचे उद्दिष्ट होते. वरील सर्व आकडे कोरोना काळाच्या आधीचे (२०१८) आहेत) हे वर्णन यासाठी केले की कुठल्याही योजनेत सरकार, खाजगी व्यावसायिक कंपन्या आणि नागरिक यांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी ठरते. 

या बाबतीत नेदरलँड सर्वात पुढे असले तरी इटली, फ्रांस आणि बेल्जियम या इतर युरोपियन देशांमध्ये हे कार्य सुरु झाले आहे. न्यूझीलंडमध्ये देखील या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्या जात आहे. जपानमध्ये देखील सायकल अतिशय प्रचलित वाहन आहे. मैत्रांनो आपल्या देशात सुद्धा सायकलिंगला उत्तेजन देणाऱ्या संस्था आहेत. यात अग्रगण्य नांव आहे Cyclop. तसेच या संबंधी कांही ऍप्स देखील प्रचलित आहेत. या संस्था आणि ऍप विषयी संबंधितांनी अधिक माहिती नेटवरून जाणून घेणे आणि त्यांत सहभागी होणे हिताचे ठरेल. आपल्या माहितीनुसार आपल्या शहरात मोफत सायकल स्टॅन्ड असतील, सरकारतर्फे सायकली पुरवल्या जात असतील किंवा सायकल ट्रॅक असतील तर त्याची माहिती समाजमाध्यमांवर टाकल्यास लोक त्या सोयीचा वापर करतील.

रुणवाल गार्डन सिटीचा ‘साइक्लोफन-अर्थ डे २०२३

शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्’ म्हणजेच सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शरीर हे एकमेव साधन आहे. म्हणूनच शरीर निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सर्व कर्तव्ये आणि कार्ये या शरीराद्वारेच पार पाडावी लागतात. त्यामुळे या मौल्यवान देहाचे रक्षण करणे व त्याचे आरोग्य राखणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे. हाच विचार करून रुणवाल गार्डन सिटी मध्ये मागील वर्षी प्रथमच सायक्लोफन-२०२२ हा उपक्रम कार्यान्वित केला होता. मागील वर्षी आमच्या पहिल्या सायक्लोफनच्या सांगतेच्या दिवशी, ठाण्याचे प्रसिद्ध बायसिकल मेयर, .श्री चिराग शहा यांनी प्रमुख अतिथि या नात्याने उपस्थित राहून आम्हा सर्वांनाच खूप प्रेरणा दिली होती. त्याच प्रेरणेचे फलित म्हणजे या वर्षी देखील हा उपक्रम राबवल्या गेला.

या आयोजनाचे हे दुसरे वर्ष होते. गेल्या २२ ते ३० एप्रिलच्या अवधीत (कुठल्याही ७ दिवसात) सायकलिंग करणाऱ्यांना दररोज ५ किमी प्रमाणे किमान ३५ किमी असे अंतर, किंवा याच अवधी मध्ये दररोज ३ किमी पायी चालत, किमान २१ किमी असे अंतर पूर्ण करायचे होते. हा माफक चॅलेंज होता. परंतू चालणे, सायकल चालवणे किंवा तत्सम कुठलाही व्यायाम न करणाऱ्यांसाठी हा चॅलेंज तसा भारीच होता. मुलांच्या नुकत्याच सुट्ट्या होऊ घातलेल्या आणि बहुतेकांचे मे महिन्यात बाहेरगावी जाणे असल्याने ‘विश्व वसुंधरा दिवसाचे’   (World Earth Day) निमित्य साधत २२ एप्रिल पासून हा इव्हेंट सुरु झाला. अपेक्षेप्रमाणे मुलांचा सायकल चालवण्यात सहभाग अतिशय कौतुकास्पद होता. दिलेल्या अवधीत जास्तीतजास्त किमी पार करणाऱ्या सायकलस्वाराला आणि पायी चालणाऱ्याला बक्षीस होते. संपूर्ण कुटुंबाने भाग घेतल्यास वेगळे बक्षीस होते.

आमचे कुटुंब यात दर वर्षीप्रमाणे सहभागी होतेच. माझे कुटुंबीय सायकल चालवीत होते. मी मात्र चालण्यात समाधान मानले. रामप्रहरी चालल्यास ऊन आणि घामापासून सुटका असायची. यात कांही लोकांना (मी यात होते) सकाळी उठोनि चालायची खंडित झालेली सवय मात्र परत लागली. यात सहभाग घेणाऱ्यास STRAVA किंवा इतर कुठलेही ऍप वापरून सायकल चालवण्याचे किंवा पायी चालण्याचे किमी रेकॉर्ड करून त्यांचा “पुरावा” आयोजकांना देणे क्रमप्राप्त होते. तसेच निसर्गरम्य स्थानांचे आणि सेल्फी, या सर्व फोटोंचे ‘CycloFUN-2023’ या व्हॅट्सऍप ग्रुप मध्ये स्वागतच असायचे. यात गंमत म्हणजे तुम्ही नोंदणी करतांना तुमचा किंवा तुमची जोडीदार असणे आवश्यक होते. शक्य असल्यास जोडीदाराबरोबर सायकल चालवणे किंवा पायी चालणे, सोबत सेल्फी काढणे वगैरे कार्यक्रम आपसूकच झाले.

या विषयाच्या उत्तरार्धात ‘सायक्लोफन-२०२३’ चे आमचे अनुभव आणि ३० एप्रिल २०२३ ला झालेल्या या उपक्रमाच्या सांगतेचा वृत्तांत सादर करीन. अगदी लवकरच भेटू या. 

धन्यवाद ! 🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

टीप :

  • या लेखासाठी इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा उपयोग केला आहे.
  • या लेखासोबत दिलेल्या भित्तिचित्रांचे (wall painting) किंवा अन्य फोटो वैयक्तिक आहेत. ही सुंदर भित्तिचित्रे आमच्या संकुलाच्या जवळपासच्या परिसरातील आहेत.
  • हा लेख माझे नाव आणि फोन नंबर यासकट अग्रेषित करावा.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments