सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? विविधा ?

☆ डोही मनाच्या… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की

पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही

तसेच माणसांच्या मनाचा तळ समजला की

त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही

खूप दिवसांनी मला निवांत वेळ मिळालेला.. म्हणजे मी तो काढलेला होता अगदी प्रयासाने. स्वतःसाठी वेळ असतोच कुठे आपल्याला या धावपळीच्या जगात ?. घर, नोकरी, मुलं बाळं, नातेवाईक, सण समारंभ यातच गुरफटुन गेलेलो असतो आपण.. स्वतःकडे बघायला वेळच नसतो. स्वतःसाठी वेळ काढावा असे मनात पण येत नाही. बरं ते असो…

खूप उबग आला होता सगळ्याचा. अगदी सगळ्याचा. खोटं खोटं हसण्याचा, खोटं आनंदी आहे सुखी आहे हे दाखवण्याचा. कंटाळला होता जीव. घुसमट असह्य होत होती. काही सेकंद माझी मलाच भीती वाटली. सगळे मुखवटे फाडून टाकून जावे. . कुठे तरी अशा शांत ठिकाणी जिथे मी आहे तशीच मला दिसेन. देखावे करावे लागणार नाहीत. आपण कसे आहोत हे आपले आपल्याला कळत असतेच ना. जगाला दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी ? या विचाराने मन सुन्न झाले. नकळत पायात चप्पल चढवली आणि अशीच चालत निघाले न थांबता. कुठे जायचे असा विचारही मनात आलाच नाही. फक्त चालत राहिले… खिन्न मनाने एकटीच. . . बहुतेक निवांतपणा, एकटेपणा शोधत होते माझे मन. कोणत्याच भावना, कल्पना मनाला शिवतच नव्हत्या.

थोडा थंड वारा अंगाला स्पर्श करून गेला, पालापाचोळा वाऱ्याने सळसळला तेव्हा मी भानावर आले. संध्याकाळची वेळ होती. चंद्राचा मंद प्रकाश चोहोबाजूंनी पसरलेला होता. झाडांची सळसळ, पक्षांचा दुरुन येणारा आवाज आणि आल्हाददायक असे वातावरण एरवी मनाला मोहवून टाकणारेच होते. पण आता मनात अनेक प्रश्नांचे वादळ उठले होते त्यामुळे मनाला चैन नव्हती. मी तशीच जड पावलांनी चालत राहिले. थोड्या अंतरावर एक शांत डोह नजरेस पडला. बहुतेक मघाशी आलेली थंड वाऱ्याची झुळूक डोहाला भेटूनच आली असावी. ती झुळुक अंगावरून मोरपीस फिरवून गेल्याचा भास झाला.

पायात वाळलेली पाने घिरट्या घालत होती. एकदम हसू आले मला. . . घरी पायात सगळी सारखी (बंधने ) घुटमळत असतातच, इथे पण या पानांनी त्यांची जागा घेतली की काय असे वाटले. . . .

जरा निरखून पाहिले असता जाणवले की खट्याळ वारा त्या सुकलेल्या पानांशी छान खेळत होता. माझे तिथे असण्याने त्याच्या खेळात काहीच फरक पडत नव्हता. मी थोडी पुढे चालत आले. एक मोठे झाड दिसत होते. तिथे जरा जवळ गेल्यावर झाडाच्या जवळ थोडे हिरवेगार गवत दिसायला लागले. पायातली चप्पल नकळतच मी काढली आणि अनवाणीच झाडाच्या दिशेने चालू लागले. त्या झाडाखाली थोड़ी विसावले. पायातून हिरवाई डोळ्यात उतरावी तसे डोळे एकदम थंड झालेले. डोळे मिटून घ्यावे या विचारात असतानाच समोर निळाशार डोह एकदम शांत असल्याचे जाणवले, जसे की एखादा सन्यस्त. काहीही हालचाल नाही. कोणतीही वलय नाही. एकदम संथ आणि इतका स्वच्छ की तळ दिसावा. मी जरा पुढे येवून डोकावले तर खरंच तळ दिसत होता.

संध्याकाळची वेळ. चंद्राची एक छान लकेर सरळ पाण्याच्या आरपार अगदी तळाशी गेलेली मला दिसली. त्या किरणांच्या प्रकाशात काही दगड व वनस्पती एकदम चमकून गेले. थोडा मंद प्रकाश होता. त्यामुळे फारसे काही दिसले नाही, पण जे काही थोडेफार दिसले ते विलक्षण होते. खूप वेळ अशीच बघत राहीले त्या डोहाकडे आणि त्या तळातल्या अद्भुत वाटणाऱ्या निसर्गाच्या चमत्काराकडे. विलक्षण ओढ जाणवली मनाला. डोह आणि मन यांच्यांत काहीतरी साम्य असावे का हा विचार एक क्षणभरच मनात आला आणि गेला पण. मन आणि तेही डोहासारखे ? कसे शक्य आहे. इतके स्वच्छ नितळ मन असते का ?

तळ दिसावा एवढे. . . . .

आपल्या मनात किती चांगल्या वाईट घटना, गोष्टी, क्षण घर करून असतात. द्वेष, राग, मत्सर, घृणा, दुःख, वेदना या सगळ्यांनी मनाचा डोह ढवळून निघालेला असतो. मन अगदी गढूळ झालेले असते. त्यात आपल्याला तरी आपल्या मनाचा तळ दिसेल का ? तळ दिसला तरी तो असेल का या डोहासारखा नितळ. मनाच्या तळाशी धगधगत असतात काही सल, काही आठवणी, अपमान. आणि आपण त्यांनाच जोपासत बसतो. चंद्राची एक लकेरसुद्धा आपण त्यावर पडू देत नाही. त्या शांत स्वच्छ डोहाची तुलना मनाशी केली खरी पण ते बुद्धीला रुचेना.

माझ्या मनात असंख्य वादळे घेऊनच तर मी इथे पोहोचले होते. त्यातील साठलेला गाळ असह्य होत होता. पण याचा निचरा करण्याचा प्रयत्न आपल्यलाच करायला हवा …. चला आपल्याच मनात डोकावून बघूया. दिसतो का मनाचा तळ ते तरी बघूया. दिसत नाही ? हरकत नाही आपणच आपल्या मनातील साठलेला गाळ काढायला हवा. द्वेष, राग, मत्सर, घृणा, दुःख, वेदना या गाळरूपी भावनांना बांध घालू या. श्रध्दा, भक्ती, विश्वास, प्रेम या आनंदरूपी तुरटीने मनाचा डोह स्वच्छ नितळ करण्यास सुरुवात करू. सोपे नाही आणि इतके सोपे नसतेच काही…. पण अशक्यही नाही.

पक्षी हळूहळू घरट्यात परतू लागलेले. त्यांच्या दमलेल्या पण सार्थ चिवचिवाटाने मी भानावर आले. माझे मन एकदम शांत निर्मळ भासू लागले. . अगदी त्या डोहासारखे.

मी डोहाकडे पाहिले. तो माझ्याकडेच पहात होता. त्याने एक आश्वासक स्मितहास्य केले. माझ्या चेहर्‍यावर पण खूप दिवसांनी समाधानाचे हास्य उमटले. ते पण मी त्या डोहाच्या पाण्यातच पहात होते. त्याचे आणि माझे मन एकमेकांचे झालेले अगदी एकरूप …

आता खूप समाधानाने मी माझ्या घरच्या दिशेने भरभर पाऊले टाकत चालू लागले. घरच्या मुलाबाळांच्या ओढीने. पण ही ओढ आता खूप सुखावणारी होती. मी माझे मन जणू डोहाजवळ मोकळे करून निघालेले. दूर जातानाही तो डोह माझ्या मनात स्मरणात तसाच राहिला. अगदी सखा व्हावा असा ….

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
3 4 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments