आई जाउन आता ४ वर्षे होऊन गेली. पण आईची आठवण झाली नाही असा एकही दिवस जात नाही. कधी कधी भाउक होऊन आईच्या आठवणीने कासाविस झाले तर बाकीचे म्हणतात, काय लहान असल्यासारखे करतेस? तुला स्विाकारायला हवं ना? मग अशाने जास्तच व्यथित व्हायला होते.
अशी अवस्था कितीतरी जणांची होत असेल. पण मग विचार करताना आई भोवती मन पिंगा घालू लागले. आई विषयीचे कितीतरी विचार डोक्यात येऊन गेले.
प्रत्येक ठिकाणी देवाला जाता येणे शक्य नसल्याने देवाने आई निर्माण केली.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
आईची किंमत जो करत नाही त्याला जगाशी लढण्याची हिंमत होत नाही.
तसेच आईचा महिमा सांगणार्या कितीतरी कविता आठवल्या
गदिमा, मभाचव्हाण, यशवंत अशा कितीतरी कविंसोबत अलिकडेच कवि अनिल दिक्षीत, उद्धव कानडे आदि कविंच्या भावपूर्ण कविता मन हेलावून टाकतात.
मग वाटले खरच जगात कुठेही गेले तरी आईला किती महत्व आहे ना? मुलांना जन्म देण्याचे सामर्थ्य एका आईतच असते. तसेच त्यांना वाढवणे संस्कार करणे हे काम जबाबदारी न वाटता फूल उमलते तसं, सकाळी दव पडते तसं,सहज नकळत करण्याचे कसब हे एका आईठायीच असते.
वात्सल्य, प्रेम, ममता तिच्या अंगी ठासून भरलेली असते. आणि मग आई ही कोणी व्यक्ती नसून वृत्ती आहे असे वाचल्याचे आठवले. ती एक वृत्ती म्हणजे भावना असल्याने ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राची तर विठ्ठल हे जगत माऊली झाले. अनेक पुरुष संत हे गुरूमाऊली बनले.
म्हणजेच आईपण ही वृत्ती खूप अवघड असूनही ती वृत्ती जो धारण करू शकतो तो आई होऊ शकतो.
सगळ्यांच्या आवडी निवडी सांभाळणे, सगळ्यांवर सारखे प्रेम करणे,चुका पोटात घेणे, शी-शू मनात कोणतीही घृणा न ठेवता आनंदाने काढणे, मुलांना हृदयाशी धरणे, चांगल्या-वाईट गोष्टिंचे ज्ञान देऊन चांगल्या गोष्टी मनावर बिंबवणे, सतत काहीतरी मुलांसाठी करत रहाणे, स्वत्व विसरून फक्त देत रहाणे,जिच्या सान्निध्यात आल्यावर सुरक्षित वाटते , लढण्याचे बळ येते असा भक्कम आधार होणे, अशी लाखो कारणे देता येतील जी वरवर अगदी सामान्य वाटतील पण करायला गेले तर किती अवघड आहे हे समजते.
मग ज्या लेकरांची आई लवकर देवाघरी गेली त्या लेकरांना आई बापाचे प्रेम एकट्या पुरुषाने दिले अशी कितीतरी उदाहरणेही पहातो म्हणजेच तो पुरूष त्याच्या अंगी असलेले आईपण जागृत करून मुले घडवतो. किंवा मुलांसाठी दुसरी आई आणतो . पण अशावेळी ती आई सावत्र बनते. का? तिच्या अंगी आईपण नसते का? असते तिच्या अंगीही आईपण असतेच पण मनात कुठेतरी दुजाभाव असतो म्हणून स्वत: जन्माला घातलेल्या मुलांवर ती मुद्दाम अधिक प्रेम आदर देते. मग अशावेळी ती नवर्याच्या मुलाची आई होऊच शकत नाही कारण आईपण असणार्या व्याख्येला ती कुठेतरी छेद देत असते.
फार कशाला कैकयीने सावत्र पणा जागृत ठेऊन रामाला वनवासात पाठवले हे उदाहरण सगळ्यांना माहित आहेच.
तसेच कृष्णाचा सांभाळ करणारी यशोदा, कर्णाला वाढवणारी राधा या खर्या अर्थाने आई झाल्या अशी उदाहरणे पण सर्वश्रृत आहेतच की!!
मग आई, आईपण याचे मोठेपण शब्दातीत असल्याची जाणिव होते. प्रत्येक घरात एक आई असते. तुमची आमची सेम असते पण आमच्या आईसारखी दुसरी कोणीच नाही असे सारखे वाटत रहाते.
तरी देखील दुसर्यांच्या आईत आपली आई म्हणजे त्या आईतील आईपण जाणून तिच्या चरणीही नतमस्तक होते.
ज्ञानेश्वर विठ्ठल इतर गुरू माऊली यांच्यातील आईपणा पाहून प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे त्यांनी किती प्रयत्नामधून हे आईपण आपल्या ठायी आणले असेल ते वाटून त्यांचा हेवा वाटतो .
स्वत: आई होऊनही काही गुण स्वभावत:च अंगी आले तरी आपल्या आईसारखे नाहीच जमत असे वाटून तिचे श्रेष्ठत्व मनातच जाणून तिच्यासारखे होण्याचा मन प्रयत्न करते.
असे मातृत्व अर्थात आईपण जर सगळ्यांच्या हृदयी आले तर?•••
☆ “चालले कोण तिकडच्या घरी–…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
‘निघाले आज तिकडच्या घरी ’ असे म्हणत शंभर वर्षांपूर्वी मुली स्वतःच्या वडिलांचे घर सोडून, सगळे नातेवाईक, आप्त, मित्र मैत्रिणी यांना सोडून स्वतःच्या सासरी जात असत. मग त्यांना एका बागेतले झाड उपटून दुसऱ्या बागेत पुन्हा लावण्याचा प्रयत्न होत आहे.. .. अशा पद्धतीची उपमा देऊन आणि त्यांच्या त्यागाची परिसीमा वर्णन करत त्यांच्याबद्दल सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याची स्पर्धा सर्व कवी आणि साहित्यिकांमध्ये लागलेली असे. अगदी नाटक सिनेमासह सगळीकडे या पद्धतीने स्त्रीने स्वतःचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, शिक्षण, छंद, या सगळ्यांचा त्याग करून सासरची मंडळी ही
देवासमान म्हणून त्यांचा छळ सहन करत आपले आयुष्य काढायचे. आपले जीवन सासरच्या घरास अर्पण करायचे. अशा प्रकारची परिस्थिती त्यावेळेला असेलही. अनेकांवर अन्याय झालाही असेल. नव्हे तो झाला आहेच.
परंतु कालमान परिस्थिती बदलत गेली. नोकरी व्यवसायानिमित्ताने गावाकडची माणसे शहरात येऊ लागली. लग्न झाल्यावर घरे अपुरी पडायला लागली. पुरेशी घरे असूनसुद्धा योग्य ती प्रायव्हसी न मिळाल्याने होणारी कुचंबणा. त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगळ्या ठिकाणी राजा- राणीचा नवा संसार थाटून नवरा बायको नव्या वाटेवरून मार्गक्रमण करू लागले. तरीही जुन्या काळचे त्याग जुन्या काळच्या त्या रोपटे उपटलेल्या उपमा यातून साहित्यिक तर नाहीच, पण व्हाट्सअपचे पोस्ट टाकणारे ट्रॉलर्स सुद्धा बाहेर पडायला तयार नाहीत. स्त्रीच्या त्या महान त्यागाची, व्हाट्सअपवर सुद्धा रकानेच्या रकाने भरून वर्णने अजून येत राहिली.
साधारणपणे आमच्या आधीच्या पिढीपासून नंतर आमची पिढी आणि पुढील पिढी तर नक्कीच लग्नानंतर स्वतःचे स्वतंत्र संसार थाटू लागले. त्यामुळे मुलीची परिस्थिती आणि मुलाची परिस्थिती काही वेगळी राहिली नाही. मुलगासुद्धा स्वतःच्या संसारासाठी स्वतःचे नातेवाईक, स्वतःची मित्रमंडळी, स्वतःच्या संपूर्ण वातावरणाचा त्याग करून दोघेजण एकमेकांच्या परिस्थितीत समसमान त्याग करून आपापले सुखी संसार थाटू लागले. आमच्या पिढीतले अनेक आई-बाप सुद्धा शक्य होईल तसे मुलांच्या स्वतंत्र संसारासाठी तजवीजही करू लागले. मुलगा लग्न झाल्यावर वेगळा राहणार हे नक्की होऊन ते नवीन गृहीतक बनून गेले. तरीही अजून सर्व मुले त्याकाळच्या स्त्रीच्या त्यागापुढे फिकी पडत गेली.
कित्येक वर्षांपूर्वी याबाबतीत मी आमच्या आईशी वाद घातला होता. मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये काहीच फरक नाही. दोघेही आपापले वातावरण सोडून एकत्र येऊन तिसऱ्या वातावरणात एकत्र राहतात. त्यामुळे त्यापैकी कोणी एक त्याग मूर्ती म्हणून मिरवण्याचे काही कारण नाही. हा विचार डोक्यात होताच, पण त्याबाबत काही लिहावं हे मात्र डोक्यात आलं नाही. परंतु कालच व्हाट्सअप वर एक कविता पाहिली आणि आपल्याच मनातले विचार कुणीतरी सांगतंय हे लक्षात आलं. खरं म्हणजे व्हाट्सअप वर कविता फॉरवर्ड करताना काही माणसे मूळ कवीचे नाव काढून का टाकतात हे मला अजून समजले नाही. काव्य करणाऱ्या कवीला त्याच्या हुशारीचे श्रेय द्यायलाच पाहिजे. परंतु खालील कवीला ते श्रेय नाकारून कुणीतरी ती फक्त कविताच मला फॉरवर्ड केली. अर्थात कोणाला त्या कवीचे नाव माहित असल्यास कृपया मला कळवावे … त्या कवीला शाबासकी देण्यासाठी.
ती कविता पुढे देत आहे. त्याला दाद मिळावी ही मनापासून इच्छा आणि अपेक्षा ….
— पण मुलंही जातात घर सोडून…!
मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून.
☆ 20 मुलांची आई ! … सुश्री अंजली कुलथे – लेखक : श्री धनंजय कुरणे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
सुश्री अंजली कुलथे
14 वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला….26/11/2008 च्या रात्री नराधम अतिरेकी ‘अजमल कसाब ‘ त्याच्या एका सहकाऱ्यासोबत ‘कामा हॉस्पिटल’च्या आवारात शिरला आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला..
हॉस्पिटलचे दोन्ही सेक्युरिटी गार्ड्स जागीच ठार झाले.. ते दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.. जरा पुढे एक नर्स जखमी अवस्थेत पडली होती.. कसाब व त्याचा साथीदार पोर्च ओलांडून पहिल्या मजल्याचा जिना वेगानं चढत होते…
‘अंजली कुलथे’ नावाची 50 वर्षांची नर्स, हे भयानक दृश्य पहिल्या मजल्यावरून पहात होती… 26/11 ला ती ‘नाईट शिफ्ट’ला होती.. ती ‘प्रसूती कक्षाची इन-चार्ज’ होती.. तिच्या वॉर्डमध्ये 20 गर्भवती महिला होत्या….
… हातात बंदूका घेतलेले दोन अतिरेकी जिन्यावरून आपल्याच वॉर्डच्या दिशेनं येतायत हे पाहून अंजली जिवाच्या करारानिशी पुढे सरसावली.. आणि तिनं तिच्या वॉर्डाचे दोन जाडजूड दरवाजे कसेबसे बंद केले..
सर्व 20 महिलांना आणि त्यांच्या काही नातेवाईकांना तिनं त्या मजल्याच्या टोकाला असलेल्या छोट्या ‘पॅन्ट्री’च्या खोलीत हलवलं.. वीस गर्भवती महिलांना अशा आणीबाणीच्या वेळी शिफ्ट करणं ही किती नाजूक आणि जोखमीची गोष्ट होती…
कसाब व त्याचा साथीदार हॉस्पिटलच्या टेरेसवर गेले होते व तिथून खाली जमलेल्या पोलिसांवर गोळया झाडत होते.. ग्रेनेड टाकत होते… ते पाहून अंजलीनं, बाहेर येऊन, ‘जखमी होऊन पडलेल्या नर्सला’ कॅज्युअल्टी मध्ये नेलं आणि तिच्यावर योग्य उपचार सुरु झाले..
इतक्यात वीस पैकी एका महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या.. अंजलीनं तिला हाताला धरून, भिंतीला चिकटून चालत चालत डिलिव्हरी रूम मध्ये नेलं आणि तिथल्या डॉक्टरच्या साहाय्यानं प्रसूती सुखरूप पार पाडली..
हल्ल्याचा हा थरार संपल्यावर अनेक दिवस अंजली झोपेतून घाबरून उठत असे.. एका महिन्यानी तिला पोलिसांनी पाचारण केलं.. कसाबची ओळख पटवण्यासाठी… नंतर त्याच्या खटल्यात तिला साक्षीला बोलावण्यात आलं.. तिनं कोर्टाला एक विनंती केली… “माझा ‘युनिफॉर्म’ घालून येण्याची परवानगी
मिळावी ! ‘कारण, त्या भीषण रात्री या युनिफॉर्मवर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच मी हे धाडस करू शकले..” असं तिचं म्हणणं होतं…
अंजली कुलथे यांनी त्या रात्री फक्त वीस महिलांचेच नव्हे तर, ‘ ही दुनिया पाहण्याआधीच मृत्युच्या जबड्यात पोहोचलेल्या ‘ वीस बालकांचेही प्राण वाचवले. आज ही मुलं चौदा वर्षांची असतील… त्यांना कदाचित ठाऊकही नसेल की त्यांच्या ‘ दोन जन्मदात्री ‘ आहेत… त्यांना नऊ महिने पोटात वाढवून प्रत्यक्ष जन्म देणारी एक आई …. आणि अंजली कुलथे … जन्माआधीच जीवदान देणारी दुसरी आई !
अंजलीताई तुमच्या अतुलनीय धैर्याला आणि प्रसंगावधानाला सविनय प्रणाम !
लेखक : श्री धनंजय कुरणे
संग्राहिका – सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मुलगी” – लेखक :श्री अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला. होणारा नवरा मुलगा सुस्वभावी व चांगल्या घरचा, त्याच्या आई-वडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभावा असाच होता.वडिलांना आनंद होताच पण मुलीला मिळणा-या चांगल्या सासरवरुन त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझं कमी झालं होतं.
एक दिवस लग्नाआधी मुलांकडून मुलीच्या वडिलांना त्यांच्याकडे जेवणाकरता बोलविण्यात आले होते.
वडिलांची तब्येत बरी नव्हती, तरी पण त्यांना तब्येतीचे कारण मुलीच्या होणा-या सासरकडच्यांना देता आले नाही.
मुलांकडच्यांनी मोठ्या आदरसत्काराने त्यांचं स्वागत केलं. मग मुलीच्या वडिलांकरता चहा आणण्यात आला.
मधुमेहामुळे वडिलांना साखर वर्ज्य करायला आधीच सांगण्यात आलं होतं. परंतु पहिल्यांदाच लग्नापूर्वी, मुलीच्या होणाऱ्या सासरकडून आलेल्या बोलावण्यामुळे आणि त्यांच्या घरात असल्यामुळे वडिलांनी गपगुमान चहाचा कप हातात घेतला. चहाचा पहिला घोट घेताच त्यांना आश्चर्य वाटले!
चहात साखर अजिबात नव्हती. शिवाय त्यात वेलदोड्याचा सुगंधही येत होता. त्यांनी विचार केला की, ही लोकंदेखील आपल्या घरच्यासारखाच चहा घेतात.
दुपारचं जेवण. तेसुद्धा घरच्या सारखंच होतं. जेवणानंतर त्यांना थोडा आराम करता यावा, म्हणून डोक्याखाली दोन उशा व पातळ पांघरूण देण्यात आलं. आरामपश्चात त्यांना बडीशेप घातलेलं पाणी पिण्यास देण्यात आलं.
मुलीच्या होणा-या सासरहून पाय काढताना वडिलांना त्यांच्या आदरतिथ्यात घेतलेल्या काळजीबद्दल विचारल्याशिवाय राहवलं नाही. त्यांनी मुलांकडच्यांना याविषयी विचारले, “मला काय खायचं, प्यायचं, माझ्या तब्येतीला काय चांगलं हे आपल्याला एवढया उत्तमप्रकारे कसे काय माहिती ?”
यावर मुलीच्या होणा-या सासू म्हणाल्या, “काल रात्रीच तुमच्या मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली- माझे सरळ स्वभावी बाबा काही म्हणणार नाहीत. त्यांच्या तब्येतीकडे बघता आपण त्यांची काळजी घ्यावी, ही विनंती.”
हे ऐकून वडिलांचे डोळे पाणावले होते.
वडील जेव्हा घरी पोहचले, तेव्हा घराच्या भिंतीवर समोर असलेल्या त्यांच्या स्वर्गवासी आईच्या तस्बीरीवरुन त्यांनी हार काढून टाकला. हे पाहून पत्नी म्हणाली, “हे आपण काय करता आहात ?”
यावर डोळ्यात अश्रू आणीत मुलीचे बाबा म्हणाले, “माझी काळजी घेणारी आई या घरात अजूनही आहे. ती कुठेच गेलेली नाही. ती या लेकीच्या रुपात याच घरात आहे.
जगात सर्वच म्हणतात ना, मुलगी ही परक्याचे धन असते.एक दिवस ती सोडून जाईलच. पण मी जगातील सर्व आई-वडिलांना सांगू इच्छितो की,मुलगी कधीच तिच्या आई-बापाच्या घरातून जात नसते, तर ती त्यांच्या हृदयात राहते. आज मला अभिमान वाटतो आहे की, मी एका ‘मुलीचा बाप’ आहे!”
लेखक: अज्ञात
संग्राहक – श्री कमलाकर नाईक
फोन नं 9702923636
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
कधीकधी उगीचचं आपली नेहमीचीच आवडती काम करायला मूड लागत नाही, संगतवार अशी लिंक लागत नाही तेव्हा एरवी काय करावे असा प्रश्न पडायचा,काही सुचायचं नाही. विशेषत: पावसाळा आणि हिवाळा आपली संपूर्ण दिवसभराची कामे सुसंगत पार पाडावयाची असल्यास ह्याच्या शिवाय पर्याय नाही असा रामबाण उपाय. पण जेव्हापासून माझी मी मला नीट ओळखायला लागले तेव्हा हा मूड चुटकीसरशी बदलवण्याच कसब मला साधलयं.आणि ते ही एका सीप मध्येच.
हाँ,हाँ, असं दचकू नका.एक सीप म्हणजेच एक घुँट चाय का भाई.खरचं मस्त वाफाळलेला,आलं घातलेल्या,फेसाळ दुधाचा चहा म्हणजे अमृत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडीनुसार चहामध्ये वापरलेल्या साहित्याचं प्रमाण वेगवेगळं असतं.
आजकाल मधुमेही,अतिशय तब्येतीबाबतीत जागरूक मंडळी बिनसाखर,कमीसाखर,चहापत्तीचं अल्प प्रमाण, अगदी कमी उकळलेला चहा घेणा-या शहरी लोकांचं प्रमाण बरचं वाढलयं.चहाच्या परिवारात ग्रीन टी,लेमन टी ह्यासारखी भावंडही घुसलीयं.पण जो मजा कड्डक मिठ्ठी,आलं,गवतीचाय डालके जो चाय बनती है नं उसका जवाब नही. तबल्याचा गंध नसूनही हा चहा घेतल्यावर प्रत्येकाच्या तोंडून “वाह ताज”बाहेर हे पडतचं पडतं.
खरतरं चहाची आणि माझी ओळख तशी जरा उशीराच झाली. पण कसं असतं नं ओळख,नातं परिचय किती वेळ किंवा उशीरा झाला ह्याच्यापेक्षाही ते नातं,ती ओळख किती मनापासून घट्ट असते त्यावर त्याची खोली अवलंबून असते.त्याचं नात्याप्रमाणे माझी चहाशी ओळख जरी उशीरा झाली तरी ती मैत्री, ओळख खूप मनापासून, घट्ट, न शेवट असणारी झालीय हे ही खरे.
आज हे सगळं चहापुराण आठवायचं कारण म्हणजे गुगलबाबाच्या माहितीनुसार 15 डिसेंबर हा “चहा दिवस”आहे.आम्ही लहान असतांना माझं माहेर गाईम्हशीवालं.दुधदुभतं माहेरी भरपूर त्यामुळे चहा तोंडी लागणं शक्यच नव्हतं.गाईम्हशींनी दुध दिलं नाही किंवा दुध नासलं तरचं चहा तोंडी लागायचा. पुढेपुढे दुधाचे दात पडल्यावर,जरा ब-यापैकी अक्कल फुटल्यावर मात्र जी चहाशी घट्ट मैत्री झाली ती आजतागायत वाढतेच पण कमी व्हायच नावचं नाही बघा.जशी चहा घ्यायची मजा ही फुल्ल कपभरुन चहामध्येअसते तशीच एक आगळीवेगळी लज्जत ही कटींग चहा मध्येही असते आणि तो अर्धा कटींग चहा आपल्या जिवाभावाच्या,आवडत्या व्यक्तीनं जर दिला असेलं नं तर क्या कहना. आजकाल अमृततुल्य वा प्रेमाचा चहा अशी बरीच तयार चहाची दुकान आहेत शिवाय वारेमाप चहा कॅन्टीन पण आहेत परंतु मला अगदी मोजून इन मिन तीन ठिकाणचा चहा आवडतो, एक म्हणजे माझ्या स्वतःच्या हातचा घरचा चहा, दुसरा आमच्या बँकेत बनणारा चहा आणि तिसरा अमरावतीच्या शाम चौकातील सुंदरम् कॅफे मधील चहा. आमच्या बँकेत तर दोन पुरुष कर्मचारी असा अफलातून साग्रसंगीत आल वैगेरे घालून दिलखेचक चहा करतात न की मस्त चहा ने कामाचा मुडच बनून जातो.
ह्या चहापुराणावरुनच आठवलं बघा.चहा आणि प्रेम किंवा मैत्री ह्यांच एक अनोखं असं नातं असतं.एक कुणी अनामिकानं लिहीलेली चहा आणि मैत्री वरील ही पोस्ट माझी खूप आवडती.ह्या पोस्टमध्ये मी थोडा बदल केलायं.पोस्ट खालीलप्रमाणे
चहाच्या कपासोबतच त्याने मैत्रीचा हात पुढे केला,तेव्हा ती भांबावली,लग्न झालयं,मुलं मोठी झालीयं,छान चाललयं सगळं असं म्हणाली.तो हासून म्हणला अगं मी मैत्री म्हणतोयं तुला.
ती पुढे म्हणाली मला हे आवडत नाही, मी बरी माझे काम बरे,ह्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळही नाही, तेव्हा हलकेच चहाचा कप पुढे करुन हसून परत बोलला तो, अग मी मैत्री म्हणतोयं तुला.
इथे मेली सगळ्या जगाची नजर,सगळ्यांना नसत्या उचापती,प्रमोशन्स तोंडावर, साध्या गोष्टीनेही काहूर माजतं,तो चहाचा कप तिच्या ओठी लावतं खळखळून हसतं म्हणाला अगं मी मैत्री म्हणतोयं तुला.
थंड होत असलेल्या चहात हिचे अश्रु पडताच डोळे पुसायला पेपरनँपकीन पुढे करतच तो परत बोलला अगं मी मैत्री म्हणतोय तुला.
चहा थंड झाल्यामुळे तो दणदणीत आवाजात परत तिच्या आवडीचा फुल्ल,कड्डक, मीठा चाय आँर्डर करतो तेव्हा ती खुदकन डोळे पुसत हसते.आणि जेव्हा तो फुल्ल चहा कटींग करून आळीपाळीने प्याल्यावर तीच आभाळं खरचं निरभ्र होतं,मनावरचं ओझं हलकं होतं म्हणून तो परत म्हणतो अगं वेडाबाई ह्याचसाठी मैत्री म्हणतोय तुला.
आणि मग ह्या चहाच्या साक्षीनचं परत दोघे शेवटच्या श्वासापर्यंत अंतापर्यंत मैत्रीसाठी बांधील राहण्याची जणू भीष्म प्रतिज्ञाच घेतात.
शृंगार हा रसांचा राजा आहे, रसपती आहे. प्रेम— रती हा शृंगाराचा स्थायीभाव. शृंगार उत्तान असेल, सात्विक असेल अथवा वियोगातला विप्रलंभ शृंगार असेल पण मानवी जीवनातच नव्हे तर अवघ्या निसर्गातच या रसराजाचं दर्शन होत असतं. गीतकार आणि कवी मंडळींचा तर हा लाडका विषय. मग त्यात प्रेम, संध्याकाळ, नदीकाठ, समुद्रकिनारा तर असतातच पण अग्रभागी असतो तो चंद्र! प्रियतमेच्या नजरेतला प्रियकर. चित्तवृत्ती फुलवणारी चंद्र, चांदणं, यामिनी यांची शेकडो गीत आज पर्यंत रचली गेली आहेत. अगदी महान कवी कालीदासांचे मेघदूत हे काव्य विप्रलंभ शृंगारचे एक अप्रतिम उदाहरण आहे. असंच एक सुंदर शृंगार गीत घेऊन येत आहेत डॉ. निशिकांत श्रोत्री. या गीताचं शीर्षक आहे निशाशृंगार ( निशिगंध काव्यसंग्रह)
☆ – निशाशृंगार – डॉ निशिकांत श्रोत्री ☆
असुन रंग काळा रुपेरी हा साज सजली निशा
नटूनी थटूनि घेऊनि येई धुंदी नशा।।ध्रु।
हिर्यांची कटी मेखला दिव्य शोभे
आकाशगंगा सजविण्यास लाभे
शेल्यावरी कृष्ण नक्षत्र शोभे
अलंकार सजवीत रजनीस या ।१।।
जरी रात्र काळी निशानाथ भाळी
किती कौतुकाने मिरवी झळाळी
रिझविण्यास कांता निशा सज्ज झाली
लपेटूनिया भवती दाही दिशा ।।२।।
रजनीकांत प्रणये निशा तृप्त झाली
धुंदीस बघुनी हवा कुंद झाली
तृप्त शशांक धन्य ती रजनी
संपन्न हो प्रीतीचा हा वसा ।।३।।
डाॅ. निशिकान्त श्रोत्री.
हे गीत वाचत असताना अक्षरशः अंगावर मोरपीस फिरतं. इतकं नाजूक, इतकं कोमल आणि तरल शब्दातले हे गीत सहजपणे एका धुंद लहरीत तरंगायला लावतं.
असून रंग काळा रुपेरी
हा साज सजली निशा
नटूनी थटूनि घेऊनि
येईल धुंदी नशा …
यात प्रत्यक्ष निशा— रात्रच प्रियतमेच्या भूमिकेत आहे. ही निशा कशी? तर कृष्णवर्णी काळी. पण तिनेही रुपेरी साज चढवलेला आहे. नटलेली, थटलेली चंदेरी चांदण्याचा पेहराव घातलेली निशा प्रणय भावनेने धुंद झालेली भासत आहे.
*हिऱ्यांची कटी मेखला दिव्य शोभे
आकाशगंगा सजविण्यास लाभे
शेल्यावरी कृष्ण नक्षत्र शोभे
अलंकार सजवीत रजनीस या …
प्रथम याओळींचा अन्वयार्थ लावूया.
कटी, हिर्यांची मेखला दिव्य शोभे
सजविण्यास आकाशगंगा लाभे
कृष्ण शेल्यावरी नक्षत्र शोभे
अलंकार सजवीत रजनीस या…
खरोखरच ही चार चरणे वाचल्यानंतर प्रथम मनात येतं ते
जे न देखे रवी ते देखे कवी
किती सुंदर कल्पनांची ही शब्दसरी!
निशेच्या साज शृंगारकडे पाहताना कवी म्हणतात, या निशेच्या कमनीय कटीवर— कमरेवर जणूं काही आकाशगंगारूपी हिऱ्यांची साखळी आहे. आकाशगंगा म्हणजे तारका समूहाचा डोळ्यांना लुब्ध करणारा नभातला एक लांबलचक पट्टाच. आज कवीच्या नजरेत मात्र ही आकाशगंगा काळ्या निशेचा हिऱ्यांचा कमररपट्टाच आहे. आकाशातलं चमचमणारं चांदणं, निशेच्या काळ्या शेल्यावर कसं चंदेरी बुट्ट्यांसारखं शोभिवंत वाटत आहे. खरोखरच या कृष्णवर्णी रजनीने हेच अलंकार चढवून स्वतःला नटवले आहे, सजवले आहे. ते कुणासाठी बरे? पाहूया पुढच्या कडव्यात.
जरी रात्र काळी निशानाथ भाळी
किती कौतुकाने मिरवी झळाळी
रिझविण्यास कांता निशा सज्ज झाली
लपेटुनिया भवती दाही दिशा…
ही प्रियतमा रात्रीच्या रूपात आहे. ती काळी आहे. पण तिच्या भाळावर —कपाळावर मात्र चमचमणारा, लखलखीत, प्रकाशमय असा शशांक आहे. किती कौतुकाने, अगदी मालकी हक्कानेच ती तिच्या निशानाथाची झळाळी मिरवत आहे! तिच्या संपूर्ण काळ्या रंगालाच त्याने उजळवून टाकलेले आहे.
रिझविण्यास कांता या ओळीतला कांता हा शब्द खूपच रसभरीत आहे. प्रणयात किंवा प्रणय भावनेत धुंद झालेली स्त्री ही कांता असतेच. पण या ठिकाणी कांता याचा अर्थ प्रियकर हा आहे आणि या प्रियकराला रमविण्यासाठी ही रजनी पहा कशी दाही दिशांचं वस्त्र लपेटून तयार झाली आहे. ही ओळ इतकी तरल आहे की ती वाचताना असे वाटते की प्रणयोत्सुक प्रियतमा जणू कुठल्याशा पारदर्शक वस्त्रातून तिचं कायिक सौंदर्यच प्रियकराला दाखवत आहे.
रजनीकांत प्रणये निशा तृप्तझाली
धुंदीस बघुनी हवा कुंद झाली
तृप्त शशांक धन्य ती रजनी
संपन्न हो प्रीतीचा हा वसा…
वा! क्या बात है कविराज? या काव्यपंक्ती वाचताना मला क्षणभर खजुराहोची कामोत्सुक, शंकर-पार्वतीच्या कामक्रीडेची शिल्पच पाहते आहे की काय असेच वाटले. किती नाजूक! किती तरल हा प्रणय! आणि प्रणय क्रीडेचा हलकेच गाठलेला तो शिखरबिंदू! एक तृप्तीचा क्षण जो रजनीकांताशी झालेल्या काम क्रीडेनंतर निशेने अनुभवलेला. आणि निसर्गातलं हे धुंद प्रणयमग्न युगुल पाहून वातावरणातल्या हवेलाही कशी नशा चढली आहे. तीही कुंद—धुंद झाली आहे.
ये राते ये मोसम ये चंचल हवा…जणू काही कुठल्यातरी अज्ञात अस्तित्वाच्या अंतरातूनच अस्फूटपणे उद्गार उमटतात,
तृप्त शशांक धन्य ती रजनी
संपन्न हो प्रीतीचा हा वसा ..
हा चंद्र ही तृप्त आणि ही रजनीही धन्य!
समागमातला आनंद,मीलनाची आकंठ तृप्ती!
खरोखरच एका दिव्य, रसमय, तरल शृंगाराचा हा सोहळाच जणू काही संपन्न झालेला आहे!
अहाहा! कविराज, खुदा की कसम लाजवाब है।
निशाशृंगार हे गीत म्हणजे चेतनागुणोक्ती अलंकाराचं एक मूर्तीमंत सुंदर उदाहरणच. चेतनागुणोक्ती हा अगदी भावयुक्त अलंकार आहे. अचेतन गोष्टीला चेतनामय मानून तिला सचेतनाचे गुणधर्म जोडणे हे या अलंकाराचे वैशिष्ट्य आहे. याकरिता परानुभूती कौशल्याची गरज असते. या अलंकारामुळे कवीच्या कल्पनेला खूप वाव मिळतो आणि कविता अंगोपांगी बहरते.
डॉ. श्रोत्री यांच्या प्रस्तुत निशाशृंगार या गीतात हे प्रकर्षाने जाणवते. निशा म्हणजे रात्र. एक काळाचा प्रहर खरंतर. पण कवीने या कृष्णकाळ्या रात्रीलाच प्रियतमेच्या रूपात पाहिले आहे. इथे निशा ही प्रणय धुंद प्रियतमा आणि रजनीनाथ हाच प्रियकर आहे आणि त्यांच्या रुपेरी प्रणायाला गुंफणारं हे अप्रतिम काव्य. इथे हवेला सुद्धा चैतन्य रूप दिलेले आहे. वास्तविक चेतनागुणोक्ती अलंकार आणि रूपक हे तसे एकमेकात गुंतलेलेच असतात असे का म्हणू नये? निशाशृंगार या गीतात चेतनागुणोक्ती अलंकार साधणारी निशा, निशानाथ, आकाशगंगा, मेखला, कृष्ण शेला, दिशा ही सारी रूपकेच आहेत आणि ती या गीतात चेतना रूपात आहेत. सचेतन आहेत.
डॉ. श्रोत्रींची ही रजनी जशी निसर्गाने बहाल केलेल्या अलंकाराने झळाळत आहे तसेच हे काव्यही साहित्यालंकाराने सजलेले आहे.
यात आकाशगंगेला निशेच्या कटीवरच्या मेखलेची उपमा दिलेली आहे.किंवा आकाशगंगा म्हणजे जणू काही निशेच्या कटीवरची मेखलाच भासे, असा उत्प्रेक्षा अलंकारही यात आहे.
लपेटूनिया भवती दाही दिशा या काव्यपंक्तीत साधलेला श्लेष अलंकार फारच बहारदार आहे.
एका अर्थी या काळ्या निशेने दाही दिशांचे हे उंची, भरजरी वस्त्र प्रियकराला रिझवण्यासाठी लपेटलेले आहे तर दुसऱ्या अर्थी दाही दिशांचे वस्त्र म्हणजे दिक् + अंबर म्हणजे दिगंबर. प्रियकराला रिझविण्यासाठी सज्ज झालेली निशा ही दिगंबरावस्थेत आहे. विवस्त्र आहे आणि या विवस्त्रतेत तिचे समर्पण आहे. दिशारुपी वस्त्रातला हा श्र्लेष अलंकार थक्क करणारा आहे. कवीच्या अफाट कल्पनाशक्तीला,दृष्यात्मक प्रतिभेला(visualisation) दाद द्यावी तितकी थोडीच आहे.
रात्र काळी— निशानाथ भाळी— किती कौतुकाने मिरवी झळाळी या काव्यपंक्तीतला अनुप्रासही अत्यंत लयकारी आहे. तसेच शोभे— लाभे, भाळी— झळाळी ही स्वरयमके गीताला गेयता देतात. गीतातल्या ध्रुवपदाशी जुळणारी नशा— दिशा— वसा ही यमकेही सुरेख आणि सहज आहेत. गीताला एक अंगभूत चाल देणारी आहेत. शिवाय या शृंगारिक रात्रीचं एक प्रकारे सुरेख वर्णनच या काव्यात केलेले आहे. स्वभावोक्तीची ही झलक फारच काव्यात्मक आणि सुंदर आहे.
हे गीत वाचताना सहजच म्हणा अथवा चोरटेपणाने म्हणा उगीचच पर्यायोक्ती अलंकाराचा अविष्कार ही जाणवतो. पर्यायोक्ती अलंकार म्हणजे आडवळणाने किंवा मिस्कीलपणे सांगितलेली गोष्ट . यात अशी कुठली दडलेली गोड गोष्ट आहे की जी कवीला सांगायची आहे? कवी राजांची माफी मागून अथवा परवानगी गृहीत धरूनच लिहिते, न जाणो या रजनी— शशांकची ही प्रणय घटिका म्हणजे कवीचा स्वतःचाच काव्यात्मक आधार घेऊन व्यक्त केलेला मधुर अनुभव असेल का? कारण काव्य हे अनुभूतीतून आणि संवेदनशील मनातूनच प्रसवतं. म्हणून या काव्यात परानुभूतीपेक्षा स्वानुभूतीही जाणवते. कारण निशा, रजनीकांत हे गीतातले शब्द थोडेसे वैयक्तिक वाटले मला. कवीच्या नावाशी साधर्म्य साधणारे. असो अतिरंजीतपणा नको आणि उगीच विनोदही नको.
या पलीकडे जाऊन एकच म्हणेन की शृंगार रसाचे सौंदर्य खुलवणारं, अलंकारिक पण बोजड नसलेलं हे काव्य आहे. उत्तान आणि सात्विक शृंगाराची ही सुरेख सरमिसळ आहे. म्हणून अश्लीलता अजिबात नाही. वाचक अगदी त्रयस्थपणे कोमल, अत्यंत हळुवार, अलवार, सुंदर प्रणय भावनेच्या प्रवाहात सहजपणे तरंगत राहतो आणि हेच या काव्याचे परमोच्च यश आहे.
☆ एक सत्यकथा… कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी.. लेखक : श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
मराठवाडय़ातील लातूर या गावात !! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!! त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले. आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच !!!
त्याकाळात त्यांनी जे मन लावून शिकवले.. ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच !!
तर एकेदिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती.
कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.
कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.
तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे. त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’
ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!! कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..
‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’
हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???
त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!
लेखक : श्री धनंजय देशपांडे
लातूर
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ll सामान्यातील असामान्य ll – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆
श्री विष्णू झेंडे
अखंड सावधान असावे! दुश्चित कदापि नसावे!
तजविजा करीत बसावे! एकांत स्थळी !!
– समर्थ रामदास.
रेल्वे स्टेशनवर ज्या सूचना पुकारल्या जातात, त्यासाठी वेगळा एक माणूस नेमलेला असतो, जो प्रसंगी रेग्युलर रेकाॅर्डिंग न वाजवता स्वतः माईकवरून सूचना देत असतो. असेच एक ‘अनाऊन्सर’ श्री. विष्णू झेंडे ड्युटीवर असताना रात्री 10 च्या आसपासची वेळ होती. मुंबईतील मोठ्या स्टेशन्सपैकी एक असणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन’वर त्यांची ड्युटी कायमप्रमाणे चालू होती. आणि अचानकपणे कुठेतरी सुतळी बाँब फुटल्यासारखा आवाज यायला लागला. ‘कुठे छोटा-मोठा स्फोट झाला की काय’, असा विचार झेंडेंच्या डोक्यात येऊन गेला. त्यांनी तात्काळ ‘आरपीएफ’ला फोनवर झालेली गोष्ट कळवली, आणि योग्य माहिती घेण्यास सांगितले.
पण असे अनेक आवाज परत परत ऐकू यायला लागले, आणि त्यांना दोन व्यक्ती मोठ्या assault rifles घेऊन प्लॅटफॉर्मवर दिसल्या. ते कसलेही साधे स्फोट वगैरे नव्हते, तर त्या रायफलीतून फायर केले जाणारे राऊंड आणि हँड ग्रेनेड होते, हे एव्हाना स्पष्ट झाले होते.
श्री. झेंडे ज्याठिकाणी बसून रेल्वेच्या सूचना द्यायचे, तिथून सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या हालचाली बऱ्यापैकी स्पष्ट दिसायच्या. त्यांना हे दोन्ही रायफलधारी स्पष्ट दिसले होते. त्यातील एक ‘अजमल आमिर कसाब’ आणि दुसरा ‘अबू डेरा इस्माईल खान’ आहे, हे त्यांना त्याक्षणी माहीत नव्हतं, किंवा माहीत असण्याचं कारणही नव्हतं. परंतु हा काही साधासुधा प्रसंग नसून आतंकवादी हल्ला आहे, हे त्यांच्या पटकन लक्षात आलेलं.
असल्या प्रसंगांना सामोरं जाण्याची सवय नसते, तेव्हा भीतीनं गाळण उडणं स्वाभाविक आहे. झेंडेंच्या बाबतीतदेखील वेगळं काय अपेक्षित होतं..? परंतु त्यावेळी त्यांनी ज्याप्रकारे अचानक उद्भवलेल्या परीस्थितीला जे तोंड दिलं, ते अद्भुत होतं.
बुडत्याला काडीचा आधार असतो. इथं तर त्यांच्याजवळ स्टेशनचा पूर्ण आराखडा मेंदूत फिट होता, आणि स्टेशनवर प्रत्येक ठिकाणी स्पीकरशी जोडलेला माईक जवळ होता. आहे त्या परिस्थितीत घाबरून न जाता जे काही करता येईल ते करायचं, असं ठरवून त्यांनी माईक हातात घेतला, आणि लोकांना सावध करायला, सूचना द्यायला सुरुवात केली. मराठी आणि हिंदीमधून ते लोकांना स्टेशनच्या दुसऱ्या मार्गाकडे जाण्यासाठी सूचना करत होते. हे दोन आतंकवादी जिथं होते, तिथून दूर जाण्यासाठी सूचना करत होते.
लोकांवर बेछूट गोळीबार आणि हँड ग्रेनेड्सचा हल्ला चालूच होता, परंतु शेकडो लोक झेंडेंच्या सूचनेनुसार विरुद्ध दिशेला पळून जात होते, संकटापासून वाचत होते.
साहजिकच, त्या दोघांच्या लक्षात आलं, की कुणीतरी लोकांना सावध करतंय, त्यांना सुटकेचा रस्ता दाखवतंय. मग ते या अनाऊन्सरला शोधू लागले.
झेंडेंच्या बाबतीत एक गोष्ट चांगली होती, की त्यांचा आवाज कुठून येतोय, हे कळत नव्हतं, परंतु झेंडे पहिल्या मजल्यावर बसलेले असल्याने दोन्ही आतंकवादी मात्र त्यांच्या नजरेच्या टप्प्यात होते. त्यामुळे त्या दोघांना आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल, हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी जितका वेळ शक्य आहे तोवर खिंड लढवायची ठरवली.
नंतरचा अर्धा तास ते माईकवरून लोकांना सूचना देत राहिले. अर्ध्या तासाने जवळजवळ पूर्ण स्टेशन रिकामे झाले होते. तोवर आतंकवाद्यांना देखील ‘ह्या सूचना कुठून येतायत’ ह्याचा सुगावा लागला होता. आता त्यांनी रेल्वे स्टाफच्या लोकांकडे विशेष मोर्चा वळवला,आणि त्यांच्यावर गोळीबार करू लागले. त्यावेळी त्यांनी जिथे झेंडे बसले होते त्या केबिन रूमवरदेखील गोळीबार चालू केला.
त्या गोळीपासून झेंडे बचावले, परन्तु हळूहळू गोळ्यांचा आवाज जवळ जवळ येऊ लागला, तेव्हा त्यांनी काही क्षणांसाठी आपल्या जीवाची आशा सोडलेली. पण स्टेशनवरची गर्दी आता पूर्णपणे कमी झाल्याचं त्यांना समाधान होतं, आणि आता जे होईल त्याला सामोरं जाण्याची मानसिक तयारी केली होती. त्यांचं कर्तव्य त्यांनी दोन पाऊले पूढे जाऊन चोख बजावलं होतं, याचा त्यांना आनंद होता, समाधान होतं.
सुदैवाने ते सुरक्षित ठिकाणी लपले, आणि सुखरूप राहिले.
त्या स्टेशनवर कायम जवळपास हजारो लोक कोणत्याही क्षणी असतात. त्यादिवशी सीएसटी स्टेशनवरच्या हल्ल्यात जवळपास 52 लोकांनी प्राण गमावले. झेंडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा आकडा शेकडोंनी कमी झाला होता. एवढ्यावर त्यांचं योगदान संपलं नाही, तर नंतर खटल्यादरम्यान त्यांनी कसाब विरोधात कोर्टात साक्षदेखील दिली, आणि त्याला शिक्षा मिळवून देण्यातसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली.
अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून सीएसटी स्टेशनवरील वातावरण निवळून परत नव्याने सगळं सुरू झालं. लोकल्स भरून भरून पाहिल्यासारख्या वाहू लागल्या. परंतु श्री. झेंडे यांचं 26/11 पूर्वीचं आणि नंतरचं जीवन यात प्रचंड बदल घडला असेल. त्या दिवसाच्या आठवणींमधून इतर अनेक प्रभावित लोकांप्रमाणे ते देखील बाहेर पडले नसतील.
आर्मीतील सैनिक आणि पोलीस यांच्याविषयी सदैव अपार आदर आहेच. परंतु श्री. विष्णू झेंडे यांच्याकडे पाहिलं, तरीदेखील मला देशप्रेमाचे भरते तेवढ्याच तीव्रतेने येईल, जेवढे एका सैनिकाकडे पाहून येईल.
लेखक : अनामिक
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
छोटीशीच गोष्ट असते एखादी. सहज शक्य आहे म्हणून कोणीतरी काहीतरी करून जातं आणि त्यातून दुसऱ्या शक्यता निघत जातात आणि अंतिमतः जो परिणाम असतो तो कधी कधी आपल्या अपेक्षेपेक्षाही मोठा आणि सुखद धक्का देऊन जाणारा असतो. दिवाळीची पणती छोटीशीच असते, पण ती लावण्याची छोटीशी कृती आजूबाजूचा प्रत्येक अंधारा कोपरा उजळवून टाकणारी असते!
तीन-चार महिन्यांपूर्वी माझ्या साड्या पिकोला द्यायला म्हणून माझ्या नेहमीच्या दुकानात गेले होते.तिथे एका दुपट्यावर एक छोटंसं बाळ होतं. खूप मोठ्याने रडत होतं. मुलगी होती. आकारावरून तीन-चार महिन्यांची वाटत होती. तिच्या हातात दुधाची बाटली होती. पण मुलीचा वरचा ओठ दुभंगलेला असल्यामुळे तिला दूध नीट पिता येत नव्हतं.
‘कोणाची मुलगी आहे?’ मी विचारलं, तर प्रतिभा म्हणाली, ‘तिचे आई-बाबा मोठ्या भावंडांना घेऊन समोर डॉक्टरकडे आलेत. मोठ्याला ताप आहे आणि ही इतकी रडत होती की आईला काहीच करता येत नव्हतं, म्हणून मीच तिला इथे ठेवायला सांगितलं. भूक लागली असेल म्हणून शेजारून बाटली आणि दूध आणलं, पण तिच्या ओठांमुळे तिला पिता येत नाहीये.’बाळ रडतच होतं, आम्ही दोघीही तिला गप्प करू पहात होतो. पण ती काही ऐकत नव्हती.
तेव्हढ्यात त्या बाळाची आई दोन जरा मोठ्या मुलांचा हात धरून रस्ता क्रॉस करून आलीच. मोठा पाचेक वर्षांचा, दुसरा अडीच-तीन वर्षांचा असावा. धाकटा आजारी असावा, कारण त्याचा चेहरा अगदी मलूल होता. दुकानात आल्या आल्या तिने मुलीला मांडीवर घेतलं आणि नीट दूध पाजायचा प्रयत्न करायला लागली. तापाने आजारी मुलगा अगदी तिला बिलगून उभा होता तर मोठा मुलगा पलीकडेच उभा होता. बाळाचं रडणं काही थांबत नव्हतं. उत्तरेतलं कुटुंब होतं. बिहारमधलं.
‘कितने महिने की है’? मी विचारलं. त्या बाईचं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. मला जे बाळ तीन-चार महिन्यांचं वाटलं होतं, ते चक्क आठ महिन्यांचं होतं! पण बाळाच्या क्लेफ्ट लिप मुळे ती नीट गिळू शकत नसल्यामुळे तिची वाढ खुंटली होती.
‘इसका ऑपरेशन हो सकता है, बच्ची बिलकुल ठीक हो जायेगी, पता है ना’? मी विचारलं. तर ती बाई म्हणाली, ‘पता है, डाक्टरने बोला है. पर खर्चा बहुत होगा ना, इसलिये पैसे जमा कर रहें हैं.’
तिचा नवरा एका सोसायटीत वॉचमन होता आणि पदरात तीन मुलं! तिच्याकडे सर्जरीच्या खर्चाला पैसे जमा होईपर्यंत अजून बराच काळ उलटून गेला असता! त्या बाईला मी अजून काही सांगणार तर ती म्हणाली ‘इनको आने दिजिये’. आता तिचे ‘इनको’ कुठे तरी कामाला गेले होते. ते परत येईपर्यंत ह्या केसमध्ये आपण काय मदत करू शकतो, ह्याचा मी विचार करत होते.
एकदम मला आठवलं, की माझ्या एका मित्राचा भाऊ आग्र्यामध्ये कॉस्मेटिक सर्जन आहे, तो अशा
प्रकारच्या सर्जरी करतो, हे मला माहिती होतं. म्हणून मी लगेच त्याला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली. तो म्हणाला की स्माईल ट्रेन नावाची संस्था अशा सर्जरी करायला मदत करते. त्याने मला त्याच्या ओळखीच्या स्माईल ट्रेन वाल्या दिल्लीच्या माणसाचा नंबर दिला. मी त्याला फोन करून त्याच्याकडून पुण्याचा नंबर मिळवला. माझ्या डॉक्टर मित्रातर्फे कॉल गेल्यामुळे त्यांनी लगोलग पेशंटची सर्व माहिती लिहून घेऊन मला पुण्याच्या लोकमान्य इस्पितळाचा नंबर दिला.
स्माईल ट्रेनतर्फे होणाऱ्या पुण्यातल्या सर्व क्लेफ्ट लीप सर्जरी तिथे होतात. मी त्यांना फोन करून त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली, तोपर्यंत त्या बाळांचे बाबाही तिथे आले होते. त्यांना मी सर्व माहिती दिली. ते म्हणाले की त्यांची आठवड्याची सुट्टी बुधवारी असते. परत लोकमान्य मध्ये फोन करून बुधवारच्या ओपीडीची वेळ, हॉस्पिटलचा पत्ता, कुणाला भेटायचं, बरोबर कुठले केसपेपर आणायचे वगैरे सगळी माहिती काढून त्या जोडप्याला दिली. त्या मुलीच्या बाबांचा नंबर घेतला आणि मी माझ्या कामाला निघून गेले.
त्यानंतर फॉलो-अप करायला म्हणून दोन-तीन आठवड्यांनी मुलीच्या बाबांना फोन केला, तर त्यांनी उचललाच नाही. मग एकदा प्रतिभाला विचारलं तर ती म्हणाली की त्यानंतर ते आलेच नाहीत. पुढे काय झालं ते कळलं नाही म्हणून मला उगाचच चुटपुट लागून राहिली. स्माईल ट्रेन वाल्या दिल्लीच्या माणसाला फोन केला तर तो म्हणाला पुण्याची माहिती त्याच्याकडे नाहीये. मला काही दिवस ती मुलगी, तिचा तो दुभंगलेला ओठ आणि तिचं केविलवाणं रडणं आठवत राहिलं. पण नंतर माझ्या कामाच्या, प्रवासाच्या व्यापात मी विसरून गेले.
परवा अचानक दिवाळीच्या दिवशी प्रतिभाचा फोन आला. कामात होते म्हणून मी तो घेतला नाही. आज परत तिच्याकडे साड्या घ्यायला गेले होते, तर ती म्हणाली, खूप आनंदून की ‘त्या दिवशी त्या बाळाचे आई-बाबा आले होते, त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून फोन केला होता. त्या बाळाचं ऑपरेशन झालं. आता ती व्यवस्थित दूध पिते, अंगाने पण भरलीये. ऑपरेशन एकदम फ्री मध्ये झालं, छान झालं म्हणून ते लोक सांगत होते’.
मलाही ऐकून खूपच आनंद झाला. न राहवून मी लगेच परत त्या मुलीच्या बाबांना फोन लावला. परत कोणी उचलला नाही. पण थोड्या वेळाने त्या मुलीच्या आईचाच फोन आला. ’कैसी है बेटी?’ विचारल्याबरोबर ती धो-धो बोलत सुटली. मुलगी आता व्यवस्थित होती, नीट दूध पीत होती, सॉलिड खाणंही आता हळू हळू सुरु केलं होतं त्यामुळे अंगा-पिंडाने सुधारली होती. दिवाळीसाठी ते पूर्ण कुटुंब आता गावी बिहारला गेलं होतं. ‘तीस तारीख को आयेंगे ना दीदी तब आपसे मिलने जरूर आयेंगे, बहुत बहुत धन्यवाद आपका’. आनंद नुसता निथळत होता तिच्या स्वरातून.
मीही तिच्या आनंदात उजळून निघाले होते. रस्त्यावर चालता चालता माझ्या चेहऱ्यावर इतकं मोठं हास्य होतं की येणारे जाणारे थबकून बघत होते. खरंतर मी खूप मोठं असं केलं काहीच नव्हतं. मी फक्त माझा थोडा वेळ आणि माझा शब्द वापरला होता.
ऑपरेशन लोकमान्यच्या डॉक्टरांनी केलं होतं, खर्च स्माईल ट्रेनने केला होता. पणती वेगळ्याच कुणाची होती, तेल कुणी दुसऱ्याने टाकलं होतं, ज्योत पेटवणारे हात तिसऱ्याचे होते, फक्त ज्योत पेटवणासाठी लागणाऱ्या काडीचं काम माझ्या हातून झालं होतं. पण त्या पणतीचा प्रकाश मात्र आमची साऱ्यांचीच मनं उजळवून गेला होता. यंदाच्या दिवाळीची ही मला मिळालेली सर्वोत्तम भेट!
लेखिका:सौ. शेफाली वैद्य
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पु.ल.देशपांडे यांच्या नाटकातला एक प्रसंग आठवला. एका केसचा साक्षिदार म्हणून एका स्त्रीला साक्षीदाराच्या पिंजर्यात उभे केलेले असते. वकील नाव विचारतात ती नाव सांगते. पुन्हा वकील तिला म्हणतात वय? तर ती बाई म्हणते, आता गरीबाला कसलं आलय वय? आन अडाण्याला कसली आलीय जन्मतारिख?
कोर्टात एकच हशा. असो यावरून प्रश्न पडला अडाणी कोणाला म्हणायचे? अडाणी लोक पण अनुभवाचे बोल बोलताना सहज म्हणतात, नुसतं शाळा कालेजात जाऊन चार पुस्तकं वाचून शानपन येत नसतं•••
मग शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काही संबंध आहे का? असेल तर वरचा डायलॉग का बोलला जातो? नसेल तर मग माणूस शिकतो का? अर्थातच शिक्षण म्हटले की पुस्तकांचा संबंध येतोच. मग एवढी शेकड्याने पुस्तके वाचून, हाताळून जर शहाणपण आले नाही म्हणत असतील तर असे कोणते पुस्तक आहे जे अशिक्षीत लोकही वाचून शहाणपणाच्या गोष्टी करतात?
मग लक्षात आले, प्रत्येक चराचराचे आयुष्य म्हणजे त्या चराचराचे पुस्तकच नाही का? अनुभवाचे गुरू प्रसंगांच्या पानातून हे पुस्तक ज्याचे त्याला शिकवत असतात. त्याच अनुभवाच्या जोरावर शिकलेले ज्ञान त्यांना शहाणपण देत असते. म्हणून शाळेत न गेलेली व्यक्ती अशिक्षित असू शकेल पण अडाणी नाही.
किती महत्वाचे असते ना हे पुस्तक? जन्माचे मुखपृष्ठ आणि मृत्यूचे मलपृष्ठ घेऊन आलेले पुस्तक ज्याचे त्यानेच लिहायचे असते.
पुस्तके जशी वेगवेगळ्या विषयाची, वेगवेगळ्या लिखाणाची वेगवेगळ्या प्रकाराची असू शकतात तशीच प्रत्येकाच्या आयुष्याची पुस्तके वेगवेगळी असू शकतात पण या एकाच पुस्तकात सगळ्या प्रकारची सगळ्या विषयाची प्रकरणे असतात.
कधी त्यात दोन ओळी, तीन ओळी, चारोळी, कविता,गझल,मुक्तछंद सारख्या असंख्य कविता मिळतील
तर कधी, पॅरॅग्राफ, लेख,निबंध, लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी असे लिखाण मिळेल.
प्रत्येक पान हे उत्सुकतेने भरलेले असते. मधे अधे लिखाणाला पुरक अशी चित्रे मिळतील. लेखनातील पात्रेही किती केव्हा कशी पुढे येतील हे खुद्द लेखकालाही माहित नाही.
प्रत्येकालाच असे पुस्तक लिहावेच लागते.
मग अशी पुस्तके काळाच्या पडद्याआड गेली की काही दिवस हळहळून ही विस्मरणात पण जातात.
पण खरे सांगू? प्रत्येकाने आपले पुस्तक लिहीताना आपल्या पुस्तकाची प्रत कोणाला काढावी वाटेल असे लिखाण केलेले असावे. या पुस्तकाचा आदर्श कोणीतरी घ्यावा असे लिखाण करून मग आपले पुस्तक बंद करावे.