? इंद्रधनुष्य ?

☆ 20 मुलांची आई ! … सुश्री अंजली कुलथे – लेखक : श्री धनंजय कुरणे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री अंजली कुलथे  

14 वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला….26/11/2008 च्या रात्री नराधम अतिरेकी ‘अजमल कसाब ‘ त्याच्या एका सहकाऱ्यासोबत ‘कामा हॉस्पिटल’च्या आवारात शिरला आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला..

हॉस्पिटलचे दोन्ही सेक्युरिटी गार्ड्स जागीच ठार झाले.. ते दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.. जरा पुढे एक नर्स जखमी अवस्थेत पडली होती.. कसाब व त्याचा साथीदार पोर्च ओलांडून पहिल्या मजल्याचा जिना वेगानं चढत होते…

‘अंजली कुलथे’ नावाची 50 वर्षांची नर्स, हे भयानक दृश्य पहिल्या मजल्यावरून पहात होती… 26/11 ला ती ‘नाईट शिफ्ट’ला होती.. ती ‘प्रसूती कक्षाची इन-चार्ज’ होती.. तिच्या वॉर्डमध्ये 20 गर्भवती महिला होत्या….

… हातात बंदूका घेतलेले दोन अतिरेकी जिन्यावरून आपल्याच वॉर्डच्या दिशेनं येतायत हे पाहून अंजली जिवाच्या करारानिशी पुढे सरसावली.. आणि तिनं तिच्या वॉर्डाचे दोन जाडजूड दरवाजे कसेबसे बंद केले..

सर्व 20 महिलांना आणि त्यांच्या काही नातेवाईकांना तिनं त्या मजल्याच्या टोकाला असलेल्या छोट्या ‘पॅन्ट्री’च्या खोलीत हलवलं.. वीस गर्भवती महिलांना अशा आणीबाणीच्या वेळी शिफ्ट करणं ही किती नाजूक आणि जोखमीची गोष्ट होती…

कसाब व त्याचा साथीदार हॉस्पिटलच्या टेरेसवर गेले होते व तिथून खाली जमलेल्या पोलिसांवर गोळया झाडत होते.. ग्रेनेड टाकत होते… ते पाहून अंजलीनं, बाहेर येऊन, ‘जखमी होऊन पडलेल्या नर्सला’ कॅज्युअल्टी मध्ये नेलं आणि तिच्यावर योग्य उपचार सुरु झाले..

इतक्यात वीस पैकी एका महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या.. अंजलीनं तिला हाताला धरून, भिंतीला चिकटून चालत चालत डिलिव्हरी रूम मध्ये नेलं आणि तिथल्या डॉक्टरच्या साहाय्यानं प्रसूती सुखरूप पार पाडली..

हल्ल्याचा हा थरार संपल्यावर अनेक दिवस अंजली झोपेतून घाबरून उठत असे.. एका महिन्यानी तिला पोलिसांनी पाचारण केलं.. कसाबची ओळख पटवण्यासाठी… नंतर त्याच्या खटल्यात तिला साक्षीला बोलावण्यात आलं.. तिनं कोर्टाला एक विनंती केली… “माझा ‘युनिफॉर्म’ घालून येण्याची परवानगी 

मिळावी ! ‘कारण, त्या भीषण रात्री या युनिफॉर्मवर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच मी हे धाडस करू शकले..” असं तिचं म्हणणं होतं…

अंजली कुलथे  यांनी त्या रात्री फक्त वीस महिलांचेच नव्हे तर, ‘ ही दुनिया पाहण्याआधीच मृत्युच्या जबड्यात पोहोचलेल्या ‘ वीस बालकांचेही प्राण वाचवले. आज ही मुलं चौदा वर्षांची असतील… त्यांना कदाचित ठाऊकही नसेल की त्यांच्या ‘ दोन जन्मदात्री ‘ आहेत… त्यांना नऊ महिने पोटात वाढवून  प्रत्यक्ष जन्म देणारी एक आई …. आणि  अंजली कुलथे   … जन्माआधीच जीवदान देणारी दुसरी आई ! 

अंजलीताई तुमच्या अतुलनीय धैर्याला आणि प्रसंगावधानाला सविनय प्रणाम !

लेखक : श्री धनंजय कुरणे

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments