डिसेंबर महिन्यातील पहिला आठवडा हा thanks giving days म्हणून साजरा होतो. ह्या आठवड्यात सगळ्या Near and Dear ones ना काही चुकले असेल तर साॅरी म्हणून, त्यांचे आभार आणि प्रेम व्यक्त करतात आणि त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करतात….
पण खरं सांगू,
मला हे केवळ परकीयांचे अंधानुकरण वाटते.
हे म्हणजे कसं झालं ना, वर्षभर केलेल्या चुका सुधारण्यासाठी एखादा सत्यनारायण किंवा होम करायचा आणि परमेश्वराकडे क्षमा मागायची आणि पुन्हा त्याच चुका करण्याचा परवानाच घ्यायचा. त्यापेक्षा नित्य नेमाने सद्वर्तन करावे आणि परमेश्वराचे मनोभावे आभार मानावेत ना.
मला आठवतं आमच्या लहानपणी आम्ही रुसून बसलो की भूक नाही असे सांगत असू. मग माझी आई तिचा हुक्मी एक्का काढायची, ” तू जेवली नाहीस तर मी पण जेवणार नाही. ” आता काय बिशाद होती आमची न जेवण्याची आणि आई वर रागावण्याची? पण हे राग रुसवे किती गोड होते.
माझी मुलंही खूप गुणी आणि समजूतदार होती. पण तरीही मुलंच ती.काहीतरी चुकणारच. अशा वेळेस माझी एकमेव शिक्षा म्हणजे” अबोला”!पण तीच त्यांना त्यांची चूक कळायला पुरेशी असायची. काही वेळातच,”आई तू मला रागव, पण अशी गप्प नको ना राहूस….” असं म्हणत त्यांनी मारलेली मिठी मला विरघळायला पुरेशी असायची.
शाळेत मैत्रिणीशी भांडण झाले की आईला काहीतरी छान, तिच्या आवडीचा डबा करायला सांगायचा आणि मधल्या सुट्टीत गाल फुगवूनच तिच्यापुढे तो डबा चक्क आपटायचा, की कट्टीची बट्टी झालीच पाहिजे.
अगदी पती- पत्नीच्या नात्यातलीही रुसव्याफुगव्याची गंमत लज्जतच आणते की.सकाळीच ऑफिसला जाताना झालेले भांडण एखाद्या गजऱ्याने किंवा तिच्या आवडत्या कचोरीने चहाच्या कपातील वादळच ठरते. त्यासाठी बायकोनेही कन्सेशन घेऊन तासभर आधी येऊन त्याच्या आवडीचा केलेला झणझणीत वडापावचा बेत घरातील वातावरणातला जिवंतपणा कायम ठेवतो.
इतकंच काय ,अगदी जवळची, जिवाभावाची सखी असो किंवा फेसबुकवरील तुमच्यासारखे कधीही न भेटलेले तरीही एक अनोखे नाते निर्माण झालेले मित्र मैत्रीणीही, काही दिवस आले नाही तर विचारतात, “काय गं,काही झालंय का ? बरी आहेस ना? ” त्यावेळी ही जी ओढ, काळजी असते तिची जाणीवही खूप सुखावणारी असते.
एकंदरीत काय तर ,असे रुसवेफुगवे..त्यानंतरचे मनवणे ( अगदी आमच्या सारख्या सिनियर सिटीझनसमध्येही, बरं का!) आहे तोपर्यंतच आयुष्यातील खुमारी आहे. सुग्रास जेवणात जसे झणझणीत लोणचे अथवा चटणी हवीच .तसेच आयुष्यातही अशी हक्काने रागावणारी आणि तितक्याच मायेने मनवणारी नाती हवीतच.
त्यांना असे एका दिवसात थॅन्क्स म्हणून किंवा माफी मागून परके करू नये, असे मला वाटते.
म्हणूनच मला इकडच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना अजिबात थॅन्क्स अथवा साॅरी न म्हणता त्यांच्या ॠणातच रहाणे आवडेल.
लेखिका: सौ. प्रतिभा कुळकर्णी.
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
तसे आमचे संस्कृत लहानपणापासून कच्चे. आता अर्थात ते सुधारण्याचा संभव कमीच ! संस्कृतमध्ये काही काही शब्द वेगळ्या अर्थाने येतात. आपल्या मराठीत आणि त्यांच्या मूळ अर्थात फरक असतो. पण आम्हाला हे सांगतो कोण ? लहानपणी रामरक्षा म्हणायचो. अर्थ कळायचा नाही. रामरक्षा म्हणताना ‘ रामम रमेशम भजे ‘ असे शब्द यायचे. लहानपणी ‘ भजे ‘ म्हणजे भजणे किंवा आळवणे हा अर्थ माहितीच नव्हता. पुढे तो केव्हा तरी कळला. तोपर्यंत देवासमोर बसून रामरक्षा म्हणताना हे शब्द आले की आम्हाला भजेच आठवायचे. कधी कधी रामरक्षा म्हणताना समोर डिशमध्ये गरमागरम भजी ठेवली आहेत, आणि ते स्तोत्र म्हणत असताना ती अधूनमधून तोंडात टाकतो आहोत अशी कल्पनाही यायची.
तसेच कधीतरी ‘ चरैवती चरैवती ‘ हे शब्द कानावर पडले होते. मूळ अर्थ माहित असण्याचे काही कारणच नव्हते. लहानपण एका अगदी छोट्याशा खेड्यात गेले. आमच्याकडे शेती असल्याने गाई, बैल वगैरे असायचेच. सकाळी गाई चरायला जायच्या. बैल रिकामे असले तर शेतात चरायला सोडले जायचे. बकऱ्या देखील चरून यायच्या. घरात सुद्धा आम्ही स्वयंपाकघरातील डबे उचकून काही खायला मिळते का हे पाहत असायचो. तेव्हा घरातल्या कोणाचे तरी बोल कानावर पडायचे, ‘ सारखा चरत असतोस ‘ त्यामुळे चरणे म्हणजे सतत खाणे हा अर्थ आमच्या मनात अगदी फिट्ट बसला होता. म्हणून जेव्हा ‘ चरैवती चरैवती ‘ शब्द कानावर पडले तेव्हा त्यांचा या चरण्याशी म्हणजेच खाण्याशी संबंध असावा असे आमच्या बालबुद्धीस वाटून गेले असल्यास नवल नाही ! त्यामुळे ऋग्वेदात सुद्धा आपल्याला आवडणारी काहीतरी गोष्ट सांगितली आहे हे लक्षात येऊन आम्हाला अतिशय आनंद झाला होता.
नंतर कधीतरी महर्षी चार्वाकांचा पुढील ‘श्लोक कानी पडला होता. त्यात म्हटलं होतं
यात ते म्हणतात जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ते सुखाने जगून घ्या. हवं तर कर्ज काढून दूध तूप खा प्या. ( कर्ज घ्यावे की नाही, ते फिटेल की नाही याची चिंता करू नका) अहो, जोपर्यंत शरीर आहे, तोपर्यंत मौजमजा करून घ्या. एकदा शरीर नष्ट झाले की संपले सगळे. खरं तर भौतिक गोष्टींचा मोह धरणे ही चांगली गोष्ट नाही. अध्यात्मात तर हे सगळं नश्वर म्हणजे नष्ट होणारं आहे. ब्रह्म सत्य, जग मिथ्या. वगैरे आमच्या कानावर पडत होतं. पण ते पटायला पाहिजे ना ! त्यामुळे त्याच्या बरोबर विरुद्ध सांगणारा चार्वाक आम्हाला जवळचा वाटू लागला. पुढे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यासारख्या काही लोकांनी बँकांकडून कर्जे घेऊन चार्वाकांचा उपदेश अमलात आणला.
पण पुढे काळाच्या ओघात अस्मादिकांचे जसजसे शिक्षण वगैरे होत गेले, तसतसे मनावर संस्कार की काय म्हणतात ते झाले असावेत आणि चार्वाक, चरैवती चरैवती वगैरे आम्ही साफ विसरलो. खायचं ते जगण्यासाठी. खाण्यासाठी जगायचं नाही वगैरे गोष्टी लक्षात आल्या. जीवनाचं ध्येय महत्वाचं वगैरे वगैरे यासारख्या मोठमोठ्या शब्दांचा पगडा मनावर बसला. आणि पुढे दोन तीन दीक्षितांनी आमच्या मनावर प्रभाव टाकला. त्यापैकी एक माधुरी दीक्षित होती. पण तिचे केवळ चित्रपट पाहण्यातच आम्ही धन्यता मानली. पुढे जे दोन दीक्षित आले त्यात एक होते स्वदेशीचा पुरस्कार करणारे राजीव दीक्षित आणि दुसरे जगन्नाथ दीक्षित. या मंडळींनी तर आरोग्यासंबंधी अशा काही गंभीर गोष्टी सांगितल्या की आम्ही आहारावर नियंत्रणच आणून टाकले. फक्त दोन वेळा खायचे. मध्ये मध्ये काही वाटले तरी खायचे ( चरायचे ) नाही. आणि त्या मार्गावरच वाटचाल सुरु होती. तसे आमच्या किरकोळ शरीरयष्टीकडे पाहून काही लोक सांगत होते की तुम्हाला हे करायची आवश्यकता नाही. पण आमच्यावर दीक्षितांचा प्रभाव पडला होता. त्यामुळे आम्ही सकाळी आणि चार वाजताच चहा फक्त घ्यायचो. तेवढ्या बाबतीत दीक्षितांनी आम्हाला आमच्याकडे पाहून माफ केलेच असते. पण तसे व्हायचे नव्हते.
झाले असे की परवा आम्ही जरा लांबचा प्रवास करून आलो. पण प्रवासात कशाने तरी तब्येत बिघडली. तुम्ही म्हणाल खाण्यापिण्यात काही तरी गडबड झाली असावी. पण नाही हो, आम्ही काळजी घेत होतो. दीक्षितांचे म्हणणे जरी कटाक्षाने पाळले नाही तरी खाताना त्यांची आठवण करून खात होतो. आणि पिण्याचे म्हणाल तर आम्ही पाण्याशिवाय आणि चहाशिवाय दुसरे काही पीत नाही. त्यामुळे प्रवासात बाटलीबंद पाणीच प्यायलो. आयुष्यात बाटलीला हात लावला असेल तर तो पाण्यासाठीच ! असो. पण व्हायचे ते झाले. सर्दी, ताप वगैरेंनी त्रस्त होऊन शेवटी डॉक्टरांना शरण गेलो. त्या डॉक्टरांनी गोळ्या औषधे तर दिलीच पण जो काही सल्ला दिला तो फार आवडला. ते म्हणाले, ‘ दिवसातून चार पाच वेळा थोडे थोडे खात जा . ( आपल्या भाषेत ‘ चरत जा ‘ ) म्हणजे पोट व्यवस्थित भरेल. आणि तब्येतीच्या तक्रारी राहणार नाहीत. ‘ बरं ज्यांनी हा सल्ला दिला ते डॉक्टर पुण्याचे आणि अनुभवी. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष थोडेच करता येणार ? तरी त्यांना मी भीत भीतच माझ्या मनातील शंका विचारली. ‘ डॉक्टर, पण ते दीक्षित तर दोनपेक्षा जास्त वेळा खाऊ नका म्हणतात. ‘ यावर डॉक्टर फक्त हसले. ( बहुधा मनातल्या मनात असं म्हणत असतील की काय मूर्ख माणूस आहे हा ! मी सांगतो यावर याचा विश्वास दिसत नाही. ) मग ते म्हणाले,’ अहो, सर्वांसाठी तसं आवश्यक नाही. तुम्ही त्याचा विचार करू नका. ‘
मग काय पुन्हा ‘ चरैवती चरैवती ‘ आठवलं. खरं तर चरैवती चरैवती म्हणजे चालत राहा. चालणं आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही ते दोन्ही अर्थानं घेतलं इतकंच. आता बघू या. डॉक्टरांचा सल्ला पाळतो आहे. त्याप्रमाणे चालत राहू.
लेखक – श्री विश्वास देशपांडे,
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डायरी माझी सखी… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
डिसेंबर संपत आला की नवीन वर्षाचे वेध लागतात .नवीन वर्ष म्हटलं की आठवते ती डायरी…..
दरवर्षी कोणीतरी मला डायरी देतं. त्या डायरीत सटर फटर असं मी काहीतरी लिहायची.
वर्ष संपत आलं की थोडीशी पानं भरलेली असायची बाकीची डायरी कोरीच असायची ….
त्या कोऱ्या पानांचा काय करायच हे कळायचं नाही. ठेऊन तरी काय करू…
असा विचार करून मी जुनी डायरी फेकून द्यायची …
नवीन वर्ष नवीन डायरी …असं माझं वर्षानुवर्ष चाललं होतं…
काही वर्षांपूर्वी आकाराने जरा मोठी अशी एक सुरेख डायरी मला मिळाली. मनात आलं या डायरीचा आपण काहीतरी वेगळा उपयोग करावा… काय करावं ते मात्र सुचत नव्हतं. जानेवारी संपत आला तरी डायरी कोरी होती.
आयुष्याच्या संध्याकाळी कुसुमाग्रजांना कायमसाठी साथ करणाऱ्या कवितांसाठी त्यांनी ‘ सखे….’
ही फार सुरेख कविता लिहिली आहे. ती माझ्या वाचनात आली.
मनात आलं ही आपल्याला परत वाचावीशी वाटली तर लिहिलेली असावी….ते म्हणतात..
सखे..
तू दिलेलं चांदणं
माझ्या पडशीमध्ये तुडुंब आहे…..
आपल्यालाही अमाप आनंद कुसुमाग्रजांनी दिलेला आहे…..
… आणि त्या दिवशी डायरीचा श्री गणेशा झाला.
आपल्याला जे आवडेल ते डायरीत लिहायचं असं ठरवलं..
वाटलं असं साहित्य आपल्याला कुठे मिळणार?
नंतर गंमत अशी झाली की डायरीत लिहावं असं सतत कुठे ना कुठे वाचायला मिळालं.
मासिकात ,पुस्तकात ,एवढेच काय अगदी रोजच्या वर्तमानपत्रात सुद्धा…
मग ते मी डायरीत लिहायला सुरुवात केली…
एकदा वाटलं आपण जे वाचतोय तेच डायरीत लिहितोय ..नंतर परत ते वाचण्यात काय गंमत वाटणार?
… जरा विचार केल्यानंतर लक्षात आले की कित्येक गोष्टी जुन्या होत नाहीत. काही वाचल्यावर लगेच समजत नाहीत. परत शांतपणे वाचल्यावर त्यातला गर्भित अर्थ समजतो..
काही गोष्टी चांगल्या असूनही आठवणीत राहत नाहीत ..त्यामुळे पुन: प्रत्ययात त्याचा आनंद निश्चित मिळेल.
हा नाद लागल्यावर डायरीत काही काही लिहीत गेले….. बघता बघता डायरी भरली.
माझंच मला खरं वाटेना. हातात घेऊन चाळायला लागले ..
डायरीत सलग असं काही लिहिलेलं नव्हतं .कुठेही काहीही होतं.
सहज म्हणून सुरुवात केली होती आणि आता डायरीत खूप काही जमा झालं होतं.
अनेक कविता डायरीत लिहिल्या आहेत. वाचून वाचून पाठ झाल्या आहेत .
एकदा मैत्रिणी घरी आल्या तेव्हा त्यातल्या काही कविता वाचल्या. मैत्रिणींना काही कविता आठवल्या. त्या डायरीत लिहून घेतल्या…. तो दिवस कवितांचा झाला अनपेक्षितपणे खूप आनंद देऊन गेला.
हिणाबाई एका कवितेत म्हणतात ….
माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबर टांगलं
माझं दुःख माझं दुःख
तयघरात कोंडलं …..
त्यानंतर खूप दिवसानंतरच्या एका पानावर होत ….
“ माय जॉय इस पब्लिक प्राॅपर्टी बिटवीन मॅन अँड मॅन
माय पेन इज प्रायव्हेट प्रॉपर्टी
बिटवीन गाॅड अॅन्ड मी …. “
या ओळी कोणाच्या आहेत हे मी लिहिलेलं नाही .कुठून पाहून लिहिल्या हेही मला आठवत नाही.
पण जगाच्या दोन टोकाला राहणाऱ्या लेखकांच्या विचारांमधला आशय किती मिळता जुळता आहे हे वाचून आश्चर्य वाटलं.
आपल्या साध्या सुध्या बहिणाबाई विषयी आदर दाटून आला…
“ हु मुव्हड माय चीज “ ह्या पुस्तकाचं मराठीतील थोडंसं स्वैर भाषांतर मध्यंतरी मी वाचले होते. त्यातली काही वाक्य डायरीतल्या एका पानावर आहेत.
बदल घडतात
बदलाचा अंदाज घ्या
बदलावर लक्ष ठेवा
बदलाचा आनंद घ्या
बदलाला तयार व्हा
हे वाचताना मी विचार करायला लागले… त्या पुस्तकातले अजून काही काही मला आठवायला लागले.
मनात आले रोजच्या जीवनात हे किती उपयुक्त आहे.
जे कृष्णमूर्ती, वामनराव पै, गोंदवलेकर महाराज, विनोबा भावे, निसर्ग दत्त महाराज यांची व अजूनही बऱ्याच जणांची सुंदर सुंदर वचने डायरीत मी कुठे कुठे लिहिली आहेत.
.. मनाला आधार देणारी उभारी देणारी अशी कित्येक वाक्य या डायरीमुळे आज हाताशी आहेत.
ही एकदा वाचून उपयोग नाही. ती वारंवार वाचली तरच मनात खोल शिरून तिचा परिणाम होईल .
अशी अर्थगर्भ अशी ती वाक्य आहेत… अर्थात त्याचा रोजच्या व्यवहारात उपयोग करून घेतला पाहिजे हे पण समजते आहे.
डायरीत काही अभंग ,गौळणी, गाणी आहेत …
पावनेर मायेला करू…. .
सुखी नांदते संसारी बाई
नाही मागणं आणि काही
काळी पोत ही जन्माची देई
तूच सांभाळ आई लेकरू…
या ओळी वाचताना डोळे भरून येतात… मन कातर हळवं होतं..
एके दिवशी गंमत झाली होती. मी त्या दिवशी रागवले होते ..रुसले होते… कुणाला काही सांगावं कुणाशी काही बोलावं असं वाटत नव्हतं.
… नंतर मीच माझ्याशी बोलले होते.. स्वसंवाद साधला होता .स्वतःची समजूत काढून सावरले होते. आज डायरी चाळताना ते मला आठवले… त्या दिवशी डायरीत होतं .
चालायचंच
जाऊ दे
सोडून दे ना
टेक ईट ईझी
…. आज हे वाचताना मस्त वाटलं…
सांकेतिक पण मला कळणारी अशी बरीच वाक्य डायरीत आहेत.. एका पानावर होतं
‘मी शहाणी कधी होईन..’
त्या दिवशी मी केलेला वेडेपणा
अहं..नाही हं तो नाही सांगणार…
त्या दिवशी खरंच माझ्या हातून चूक झाली होती. ती मला कळली होती त्यातून मी धडा घेणार होते. शिकणार होते . ती चूक परत होऊ नये म्हणून दक्षता घेणार होते.
पुढे लिहिलं होतं ….
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर….
या क्षणी डायरी वाचताना मीही क्षणभर थांबले…
वर्षभर जसं वागले त्याचा थोडाफार ताळेबंद या डायरीत आहे .डायरीमुळे मी माझ्या मागच्या दिवसांकडे वळून बघू शकते आहे.
डायरी वाचताना आठवली ती खूप वर्षापूर्वीची कॉलेजची रंगीबेरंगी डायरी …त्यात शेर शायरी, हिंदी मराठी गाणी, कादंबरीतले उतारे आणि बरंच काही होतं …
शेवटच्या पानावर तर काय काय होतं…
बहरण्याचे ..खुळावण्याचे… फुलण्याचे… ते दिवस होते…. ती डायरी वेगळीच होती. लग्नानंतर ती माहेरी राहिली… परत कधीतरी आणली आणि वाढणाऱ्या संसाराच्या पसाऱ्यात कधी आणि कुठे हरवली कळलच नाही ….
संसारात मी पण पार बुडून गेले. आता आयुष्याला थोडा निवांतपणा आला आहे.म्हणून डायरी लिहायला वेळ मिळत आहे.
नंतर पुढच्या डायऱ्या थोड्या प्रौढ प्रगल्भ झाल्या आहेत… माझ्यासारख्या कदाचित…
नंतरच्या एका डायरीत असं लिहिलं आहे की..
“तुम्हाला असं मनात कितीदा वाटलं की मी फक्त एवढे बोललो असतो तर…….
हो हो सगळे पटते.. पण पटतही नाही … असं कसं होऊ शकतं… चलता है…
ही वाक्य आत्मनिरीक्षण करायला लावणारी आहेत. सहज सोपी शिकवण देणारी आहेत.
तर सांगायचं तात्पर्य म्हणजे…
डायरीत खूप काही जमा झालं आहे. दोन-चार मैत्रिणींनाही हा नाद लागला आहे..
माझे काय .. तुझ्याजवळ काय याची चौकशी होत आहे..
एकमेकींना नवीन काही वाचून दाखवलं जात आहे..
तुमचं काय…
तुम्हाला हा प्रयोग करावासा वाटतोय का ?
करून बघा ना …. काय हरकत आहे…
कदाचित तुमची डायरी पुढच्या वर्षी तुम्ही मला दाखवाल …
तुम्ही माझ्यापेक्षा वेगळं लिहिलं असेल…
आपल्या दुसऱ्या मैत्रिणींनी अजून काही लिहिलं असेल..
सगळ्यांचा मिळून एक छानसा खजिना तयार होईल ..
घ्यायचा आहे का नवीन अनुभव.. करायची का सुरुवात..
आजकाल आपण हाताने फार कमीच लिहितो…. मोबाईलवरपण बोलून टाईप होत…
लिहायला विसरत चाललो आहोत का?
पण एक सांगू का .. लिहून बघा.
आपण स्वतः लिहिले की शब्द लक्षात राहतात… आणि त्याचे अर्थ पण…
हे लिहिणं निखळ आनंद देतं…. असं लिखाण आपलं आपल्याला समृद्ध करतं …शहाणं करतं..
ही डायरी आता नुसती डायरी नाही राहिली… ती माझं विसाव्याचं विरंगुळ्याचं ठिकाण झालंय…
तिच्याशी मी कधीही बोलू शकते….. जिला मी मनातलं काही सांगू शकते … अगदी कधीही ..
अशी ही डायरी माझी सखी झाली आहे… मैत्रीण झाली आहे…
बघा प्रयोग करून ….. तुम्हालाही तुमच्यातलं काहीतरी नवीन गवसेल….
रेल्वे स्टेशनवर ज्या सूचना पुकारल्या जातात, त्यासाठी वेगळा एक माणूस नेमलेला असतो, जो प्रसंगी रेग्युलर रेकाॅर्डिंग न वाजवता स्वतः माईकवरून सूचना देत असतो. असेच एक ‘अनाऊन्सर’ श्री. विष्णू झेंडे ड्युटीवर असताना रात्री दहाच्या आसपासची वेळ होती.
मुंबईतील मोठ्या स्टेशन्सपैकी एक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर त्यांची ड्युटी कायमप्रमाणे चालू होती. आणि अचानकपणे कुठेतरी सुतळी बाँब फुटल्यासारखा आवाज यायला लागला. ‘कुठे छोटा-मोठा स्फोट झाला की काय’, असा विचार झेंडेंच्या डोक्यात येऊन गेला. त्यांनी तात्काळ ‘आरपीएफ’ला फोनवर झालेली गोष्ट कळवली, आणि योग्य माहिती घेण्यास सांगितले.
पण असे अनेक आवाज परत परत ऐकू यायला लागले,
आणि त्यांना दोन व्यक्ती मोठ्या assault रायफल्स घेऊन प्लॅटफॉर्मवर दिसल्या. ते कसलेही साधे स्फोट वगैरे नव्हते, तर त्या रायफलीतून फायर केले जाणारे राऊंड आणि हँड ग्रेनेड होते, हे एव्हाना स्पष्ट झाले होते.
श्री. झेंडे ज्या ठिकाणी बसून रेल्वेच्या सूचना द्यायचे, तिथून सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या हालचाली बऱ्यापैकी स्पष्ट दिसायच्या. त्यांना हे दोन्ही रायफलधारी स्पष्ट दिसले होते. त्यातील एक ‘अजमल आमिर कसाब’ आणि दुसरा ‘अबू डेरा इस्माईल खान’ आहे, हे त्यांना त्याक्षणी माहीत नव्हतं, किंवा माहीत असण्याचं कारणही नव्हतं. परंतु हा काही साधासुधा प्रसंग नसून आतंकवादी हल्ला आहे, हे त्यांच्या पटकन लक्षात आलेलं.
असल्या प्रसंगांना सामोरं जाण्याची सवय नसते, तेव्हा भीतीनं गाळण उडणं स्वाभाविक आहे. झेंडेंच्या बाबतीतदेखील वेगळं काय अपेक्षित होतं..? परंतु त्यावेळी त्यांनी ज्याप्रकारे अचानक उद्भवलेल्या परीस्थितीला जे तोंड दिलं, ते अद्भुत होतं.
बुडत्याला काडीचा आधार असतो. इथं तर त्यांच्याजवळ स्टेशनचा पूर्ण आराखडा मेंदूत फिट होता, आणि स्टेशनवर प्रत्येक ठिकाणी स्पीकरशी जोडलेला माईक जवळ होता. आहे त्या परिस्थितीत घाबरून न जाता जे काही करता येईल ते करायचं, असं ठरवून त्यांनी माईक हातात घेतला,
आणि लोकांना सावध करायला, सूचना द्यायला सुरुवात केली. मराठी आणि हिंदीमधून ते लोकांना स्टेशनच्या दुसऱ्या मार्गाकडे जाण्यासाठी सूचना करत होते. हे दोन आतंकवादी जिथं होते, तिथून दूर जाण्यासाठी सूचना करत होते.
लोकांवर बेछूट गोळीबार आणि हँड ग्रेनेड्सचा हल्ला चालूच होता, परंतु शेकडो लोक झेंडेंच्या सूचनेनुसार विरुद्ध दिशेला पळून जात होते, संकटापासून वाचत होते.
साहजिकच, त्या दोघांच्या लक्षात आलं, की कुणीतरी लोकांना सावध करतंय, त्यांना सुटकेचा रस्ता दाखवतंय. मग ते या अनाऊन्सरला शोधू लागले.
झेंडेंच्या बाबतीत गोष्ट चांगली होती, की त्यांचा आवाज कुठून येतोय, हे कळत नव्हतं, परंतु झेंडे पहिल्या मजल्यावर बसलेले असल्याने दोन्ही आतंकवादी मात्र त्यांच्या नजरेच्या टप्प्यात होते. त्यामुळे त्या दोघांना आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल, हे त्यांना माहीत होतं.
त्यामुळे त्यांनी जितका वेळ शक्य आहे तोवर खिंड लढवायची ठरवली.
नंतरचा अर्धा तास ते माईकवरून लोकांना सूचना देत राहिले. अर्ध्या तासाने जवळजवळ पूर्ण स्टेशन रिकामे झाले होते. तोवर आतंकवाद्यांना देखील ‘ह्या सूचना कुठून येतायत’ ह्याचा सुगावा लागला होता. आता त्यांनी रेल्वे स्टाफच्या लोकांकडे विशेष मोर्चा वळवला,आणि त्यांच्यावर गोळीबार करू लागले.
त्यावेळी त्यांनी जिथे झेंडे बसले होते त्या केबिन रूमवर देखील गोळीबार चालू केला. त्या गोळीपासून ते बचावले, परन्तु हळूहळू गोळ्यांचा आवाज जवळ जवळ येऊ लागला, तेव्हा त्यांनी काही क्षणांसाठी आपल्या जीवाची आशा सोडलेली. पण स्टेशनवरची गर्दी आता पूर्णपणे कमी झाल्याचं त्यांना समाधान होतं,
आणि आता जे होईल त्याला सामोरं जाण्याची मानसिक तयारी केली होती. त्यांचं कर्तव्य त्यांनी दोन पाऊले पूढे जाऊन चोख बजावलं होतं, याचा त्यांना आनंद होता, समाधान होतं.
सुदैवाने ते सुरक्षित ठिकाणी लपले, आणि सुखरूप राहिले.
त्या स्टेशनवर कायम जवळपास हजारो लोक कोणत्याही क्षणी असतात. त्यादिवशी सीएसटी स्टेशनवरच्या हल्ल्यात जवळपास ५२ लोकांनी प्राण गमावले. झेंडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधाना मुळे हा आकडा शेकडोंनी कमी झाला होता.
एवढ्यावर त्यांचं योगदान संपलं नाही, तर नंतर खटल्यादरम्यान त्यांनी कसाब विरोधात कोर्टात साक्षदेखील दिली, आणि त्याला शिक्षा मिळवून देण्यातसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली.
अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून सी.एस.एम.टी स्टेशनवरील वातावरण निवळून परत नव्याने सगळं सुरू झालं. लोकल्स भरून भरून पहिल्यासारख्या वाहू लागल्या. परंतु श्री. झेंडे यांचं २६-११ पूर्वीचं आणि नंतरचं जीवन यात प्रचंड बदल घडला असेल. त्या दिवसाच्या आठवणींमधून इतर अनेक प्रभावित लोकांप्रमाणे ते देखील बाहेर पडले नसतील.
आर्मीतील सैनिक आणि पोलीस यांच्याविषयी सदैव अपार आदर आहेच. परंतु श्री. विष्णू झेंडे यांच्याकडे पाहिलं, तरी देखील मला देशप्रेमाचे भरते तेवढ्याच तीव्रतेने येईल, जेवढे एका सैनिकाकडे पाहून येईल.
श्री झेंडे हे देखील सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या इतकेच महान देशप्रेमी आहेत, त्यांची समयसूचकता आणि धैर्याला नमस्कार.
प्रेषक : चारुचंद्र करमरकर, नासिक
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
थंडी सुरु होऊन तापमान २१..२२..२३ असं रूंजी घालू लागलं की बाजारात हिरव्यागार भाज्यांचे दर्शन व्हायला लागतं. ताज्या ताज्या पालेभाज्या तर दिसतातच, पण रसरशीत फळभाज्यांचे पण ढीग दिसू लागतात… या ढिगांवरून फक्त नजर जरी फिरली ना तरीही मनाला शांती मिळते.
आणि
नेहमीच्या फळभाज्या तर मिळतातच पण अनेक प्रकारच्या हंगामी भाज्या जसे की वेगवेगळ्या प्रकारचे घेवडा, वालपापडी,डबल बिन्स.
अगदी हिरव्या हिरव्या गार रूपात आपल्याला दिसतात.
आज आमच्या घरी हंगामाची पहिली डबल बिन्स आणली आणि सोलायला सुरुवात केली. सुंदर गुलाबी रंग पाहून डोळे निवले. मनाला तरतरी आली.
आणि
एका शेंगे मधून “ती” सळसळत बाहेर आली.
एक क्षण दचकायला झालं.पण “तिचा” उत्साह बघून थक्क व्हायला झालं.
“तिचं” नजाकतीने चालणं, नव्हे नव्हे, वळवळणं.एकदम लाजवाब.
मी पहातच राहिले. दोन क्षण.
भानावर येताच लक्षात आलं की “ती” टेबलाच्या टोकाला पोचली आहे.
पटकन दोन पानं आणली आणि “तिला” आसन करून दिलं.
आता “ती” छान आसनस्थ झाली.
नवीन आसनाचा अदमास घेऊ लागली.
आणि लगेचच तिथे रूळली पण !
आनंदाने पानं खाऊ लागली.
“तिचा” आनंद मी डोळे भरून पहात होते.
आणि
मनात आलं.
खरंतर “तिचा” आनंद क्षणभंगुरही ठरला असता. कारण तो आनंद माझ्या हातात होता.
तरीही आनंदाचे क्षण किती, हा विचार न करता आनंद आहे, हा विचार करून “तिने” पानं खायला सुरुवात केली होती.
आणि
मी “तिच्या”कडे पाहतच बसले.
आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला केवढा वेळ लावतो. किंबहुना बाहेर यायला उत्सुक नसतोच.
आणि
अगदी बाहेर आलो तरी नवीन ठिकाणी,नवीन परिस्थितीत रुजायला कित्येक दिवस,महिने लागतात. नाही का ?
“ती” एवढीशी “अळी” मला जीवनाचं तत्त्वज्ञान देऊन गेली.
कुठल्याही परिस्थितीत आनंदी रहा ग.न कुरकुरता.
आनंद किती मोठा आहे, याचा विचार न करता, आनंद मिळाला आहे, याचा विचार करून तो मस्त उपभोगून घे.
आणि
कुठल्याही परिस्थितीत सगळीच दुःखं नसतात. त्या दुःखाच्या पलीकडे असलेल्या चिमूटभर सुखाला शोधायचा प्रयत्न कर.
बघ कसा आनंद मिळतो ते.
लेखिका : सुश्री माधुरी संजीव कामत
संग्रहिका : सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सकाळी मेडिटेशन केल्याने त्याचे फायदे दिवसभर राहतात.परंतू इतर विचार,नकारात्मकता,अनुभव या मुळे एनर्जी हळूहळू कमी होते.या साठी आपण पुढील उपाय करु शकतो.
सकाळी जी सकारात्मक वाक्ये म्हणतो किंवा जे संकल्प करतो तिच वाक्ये रात्री झोपताना म्हणावीत.म्हणजे पुढील ६/७ तास तेच विचार मनात राहतात.व सकाळी त्याचा परिणाम दिसतो.
ती वाक्ये पुढील प्रमाणे असावीत.
मी वैश्विक शक्तीचा पवित्र अंश आहे.
निसर्ग शक्ती माझ्यात पुरेपूर आहे.
मी आमच्या घरातील माणसे सुखी व आनंदी आहेत.
सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत.
जर काही प्रॉब्लेम किंवा शरीरिक व्याधी असतील तर ते प्रॉब्लेम सकारात्मक पद्धतीने सुटलेले आहेत असे म्हणावे.व काही व्याधी,दुखणी स्वतःला किंवा दुसऱ्या कोणाला असतील तर त्याची नावे ( आजाराची व संबंधित व्यक्तींची ) घेऊन ते व्याधी मुक्त झालेले आहेत असे म्हणावे.
जसे वाहनांचा गोंधळ कमी करून सर्वांना आपल्या इच्छीत ठिकाणी वेळेवर पोहोचता यावे म्हणून ठिकठिकाणी सिग्नल्स असतात त्या प्रमाणे आपणही करु शकतो.मना साठी सिग्नलची व्यवस्था करु शकतो.
जर आपले मन स्वच्छ करायचे असेल किंवा गोंधळ कमी करायचे असतील तर एक तास एक मिनिट याचा अवलंब करावा.
दर एक तासाने एक मिनिट विश्रांती घ्यावी.तीन दीर्घ श्वास घ्यावेत.आणि डोळे बंद करुन वरील वाक्ये म्हणावीत.
या पद्धतीने भरकटणाऱ्या मनाला आवर घालू शकतो.व मनाला वारंवार त्या सूचना देऊ शकतो.मनाला त्या सूचना दिल्या की शरीर त्या प्रमाणे आपले कार्यक्रम ठरवते.
आज मलाही वाटलं नभातून खाली उतरून यावे. तुझे चरण स्पर्शाने पवित्र व्हावे.. नेहमीच तुझ्या अवतीभवती असतो लता तरूंचा घनदाट काबिला, श्वापदांच्या पदभाराने त्या भुईवरची पिकली पानांचा नाद कुरकुरला..विविध रानफुलं नि पर्णांच्या गंधाचा परिमळाचा अत्तराचा फाया कुंद हवेत दाटून बसला..पान झावळी अंधाराच्या कनातीत सुस्त पहुडलेला असतो धुक्याचा तंबू.. गगनाला भेदणारे इथे आहेत एकापेक्षा एक उंच च्या उंच बांबू.. विहंग आळवती सूर संगिताचे आपल्या मधूर कंठातून शाखा शाखा पल्लवात दडून..दवबिंदुचे थेंब थेंब ओघळती टपटप नादाची साथ साधती त्यासंगितातून… तुझे ते वरचे शेंड्याचे टोक बघायला रोजच मिळत असते मजला.. किती उंच असशील याचा अंदाज ना बाहेरून समजला… नभ स्पर्श करण्याची तुझी ती महत्त्वकांक्षा पाहून मी देखील निश्चय केला आपणही जावे तुझ्या भेटीला आणि व्हावे नतमस्तक तुझ्या पुढे… सोनसळीच्या किरणाचे तुझ्या पायतळी घालावे सडे…अबब काय ही तुझी ताडमाड उंची..त्यावर काळाकुट्ट अंधाराची डोक्यावरची कुंची..किती थंडगार काळोखाचा अजगर वेटोळे घालूनी बसलाय तुला.अवतीभवती तुझ्या हिरव्या पिवळ्या पानांफुलाचा पडलाय पालापाचोळा.. कुठला दिवस नि कुठली रात्र याचे भान असे का तुला.जागं आणण्यासाठी रोजच यावे तुझ्या भेटीला वाटे मजला.बघ चालेल का तुला? एक नवचैतन्य लाभेल मजमुळे तुजला..? प्रसन्नतेची हिरवाई हरखेल नि हसवेल तुझ्या भवतालाला.. पिटाळून लावेल तुझ्या उदासीपणाला.. मग बघ असा मी रोजच येत जाईन चालेल का तुला?.
दूर कुठे प्रवास करायचा तर जुनी गाणी ऐकत प्रवास करायला बहुतेकांना आवडते.
तसेच मी पण लांबच्या प्रवासात गाणी ऐकताना जावेद अख्तर यांचे जगजीत सिंह यांनी गायलेले
तुमको देखा तो ये खयाल आया । जिंदगी धूप तुम घना साया।
हे गाणे लागले होते. पळणारी झाडे घरे पहात हे गाणे ऐकताना विचारांनाही चाके लागली आणि त्यात मन रंगून गेले.
खरेच आयुष्य जगायचे म्हणजे त्यामधे कोणीतरी भक्कम साथ देणारे असावेच लागते. मग ती साथ जोडीदाराची , मित्र/मैत्रिणीची, आई-वडिल, मोठ्या व्यक्तींची, हितचिंतकांची असो. पण जीवनातील सुख दु:खे आपण कोणाबरोबर तरी वाटून घेतली तर जगण्याची मजा कितीतरी पटीने वाढते ना?
अशावेळी आपल्या आयुष्यातील त्या व्यक्तीचे स्थान अनन्यसाधारण होऊन जाते. ते किती अनमोल आहेत हे सांगायलाच आपल्या जोडीदाराला उद्देशून लिहिलेले जावेद अख्तरांचे हे शब्द.
जोडीदाराबद्दल जरी लिहिलेले शब्द असले तरी आपल्या आयुष्यात असलेल्या अनन्यसाधारण महत्वाच्या कोणत्याही व्यक्तीला हे शब्द अगदी लागू पडतात.
ज्याच्यामुळे आपले आयुष्य घडते, ज्याच्यामुळे आपण संकटावर मात करू शकतो, ज्याच्यामुळे मनाला एक उमेद मिळते, त्याबद्दल असे विचार येतात. जेव्हा मन पोळलेलं असत, संकटांनी घेरलेलं असतं तेव्हा त्याला शीतलता देणारं, आशा दाखवून चांगली वाट दाखवणारं असतं तेव्हा त्या व्यक्तीबद्दलचा आदर वाढलेला असतो.
नवर्याच्या यशामागे भक्कमपणे उभी राहिलेली पत्नी, मुलांना मोठे करण्यासाठी दिवसभर राबून कौतूक करणारे आई-वडिल, होतकरू हुषार मुलाला चांगल्या शिक्षणासाठी मदत करणारे शिक्षक, संकटात सापडलेल्या मित्राला मदतीचा हात देऊन कायम त्याच्या बरोबर रहाणारा मित्र, कोणा चांगल्या मुलाला अनुभवाचे बोल सांगून त्याच्या मनाला उभारी देणार्या मोठ्या व्यक्ती, एखाद्याचे चांगले गुण ओळखून त्या गुणांना प्रोत्साहन देणारे हितचिंतक हे सगळे मग घना छाया होतात आणि ओठी शब्द येतात जिंदगी धूप तुम घना साया•••
पण याही पेक्षा मोठा अनुभवही आला. आमच्या समोरच रहाणार्या ८५ वर्षाच्या आजी. काही दिवसांपूर्वीच त्यांचे यजमान वारले. मुलगा परदेशातून येऊन काही दिवस राहिला. पण नंतर त्याला जावेच लागले. मुलगी पण सासरी गेली.
मुलगी म्हणाली चल माझ्या सोबत. मुलगा पण म्हणाला तुला तिकडे परदेशात नेतो. पण आजीचा हट्ट जो पर्यंत माझे हातपाय धड आहेत तो पर्यंत मी कुठेच येणार नाही. अगं पण तू एकटी कशी राहशील? मुलांनी काळजीपोटी ते पण विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, मी एकटी कुठे? माझ्या बरोबर तो तारणहार आहे ना . तो करेल सगळं नीट. आजपर्यंत माझे सगळे सुख दु:ख मी त्याला सांगत आले आणि कोणत्या ना कोणत्या रुपाने त्यानेच तर माझी मदत केली.
यावेळी पण तो माझ्या सोबत आहे आणि इथून पुढेही राहील.
दूर कुठे तरी तेच गाणे लागले होते तुमको देखा तो ये खयाल आया••• आणि लगेच सगळ्यात श्रेष्ठ तो परमेश्वर आहे याची खात्री पटली आणि जिंदगी धूप तुम घना साया या गाण्याची प्रार्थना झाली.
शेजारच्या सिंधूताई परवा खूप दिवसांनी भेटल्या. अमेरिकेला दोन्ही मुलांकडे गेल्या होत्या, म्हणाल्या. दोन्ही मुलांनी आणि सुनांनी अगदी व्यवस्थित आदरातिथ्य केलं. जवळपासची सगळी ठिकाणे दाखवली. अमेरिकन व इतर वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले. दर शनिवार – रविवार कुठे ना कुठे जात होत्या. कुठे काही कमी पडू दिले नाही, पण चार महिने तेथे राहिल्यावर मलाच कंटाळा आला. घरचे विचार मनात येऊ लागले. सकाळ झाली की मॅार्निंग वॅाकचा रस्ता मला बोलावू लागला. घरची साफसफाई, वाणसामान भरायचे मला डोळ्यांसमोर दिसू लागले, काही म्हणा पण आपलं घर ते आपलं!
सिंधूताईंचे बोलणे मला १००%. पटले.खरंच प्रत्येकालाआपलं घर किती प्रिय असतं! आपण ८-१० दिवस बाहेर राहिल्यावर आपल्याला लगेच कंटाळा येतो.कधी एकदा घरी जाऊ असं होतं. २-४ दिवस बाहेरचे खाल्ले की कधी एकदा वरण भात का होईना, तो घरचा खाऊ असे होऊन जातं.
घरातील प्रत्येक वस्तूवर आपलं अधिराज्य असतं .काही वस्तूंशी आपल्या आठवणी निगडीत असतात.हा इतकी वर्षं चाललेला कुकर, मला मीनामावशीने माझ्या लग्नात प्रेझेंट दिलेला.उषामामीने मंगळागौरीला पुरण यंत्र दिले होते. मला मोत्याचे दागिने आवडतात म्हणून पाडव्याची ओवाळणी म्हणून नवऱ्याने मोत्याचा तन्मणी व बांगड्या घेतलेल्या. वाचनाची आवड म्हणून साठवलेल्या पैशांतून चांगल्या कादंबऱ्या, आत्मचरित्रे आपण घेतली होती. काश्मीरहून आणलेल्या शाली,बेंगलोर सिल्क, आग्र्याहून अगदी जपून आणलेली ताजमहालाची छोटी प्रतिकृती अशा एक ना अनेक वस्तूंच्या आठवणी आपल्या मनात पिंगा घालत असतात आणि न कळत त्या वस्तू आपल्या होऊन जातात.
आपले स्टीलचे कटोरे, ताटल्या, वाट्या भांडी, पोळपाट लाटणे इतके ओळखीचे झालेले असतात व त्यांची इतकी सवय झाली असते की नवीन पोळपाटावर पोळी लाटायला त्रास होतो. बऱ्याचजणांना जागा बदलली, कॅाट बदलली की झोप लागत नाही.
आपल्या घरात आपण free bird असतो. आपल्यावर कुणाचे बंधन नसते.एखादे वेळेस बरे वाटत नसेल, तर आपण आपल्या घरात दिवसभर झोपून राहू शकतो. दुसरीकडे आपल्याला संकोच वाटेल.
प्रत्येकाला आपले घर देवाने लावून दिले आहे.पक्षीसुद्धा संध्याकाळ झाली की आपल्या घरट्याकडे परततात. गुरेढोरे, गायी वासरे आपापल्या घरी परततात. तर असं हे आपलं ते आपल्याचे महत्त्व आहे. घर कसेही असो, ते आपले असते.
लेखिका : सुश्री वीणा घाटपांडे
संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(श्रावणातला प्रत्येक दिवस हा त्या त्या देवतेची पूजा करण्याचा असतो.सणावाराला रेलचेल असणारा ऋतू !)
चौथा ऋतु शरद! स्वच्छ निरभ्र आकाश, रात्रीचं टिपूर चांदणं, ते पिण्यासाठी आतुर चकोर, काव्याच्या चांदण्याची बरसात,’ चांदणे शिंपीत जाशी’, ‘ टिपूर चांदणे धरती हसते’, ‘चांदण्यात फिरताना’ ! सण म्हणाल तर शारदीय नवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा! कोजागिरीला (शरद किंवा आश्विन पौर्णिमा असेही म्हणतात) चंद्राची पूजा करायची, त्याला ओवाळायचं , चंद्र हा मातृकारक म्हणून मातृत्वाचा पहिला पाझर अनुभवण्याचं सुख दिलेल्या ज्येष्ठ अपत्याला ही ओवाळायचं, चंद्राच्या सर्वात प्रखर अशा चांदण्याची गुण शक्ती दुधाद्वारे प्राशन करायची, आनंदा बरोबर कृतज्ञता ही व्यक्त करायची. कुठे थिल्लरपणा नाही,सारं वैचारिक, जाणिवांचं नेणतेपण जपणारे सण! आणखी कोणता सण? विचारू नका. वर्णन संपणारच नाही. मी वर्णन करणार पण नाही.फक्त डोळ्यासमोर पणत्यांची आरास, आकाशदिवे, फराळाची ताटं आणा आणि कल्पनेतल्या आनंदात बुडून जा.
अर्थात दिवाळी हा सण मराठी महिन्याप्रमाणे येत असल्यामुळे कधी शरदात तर कधी हेमंतात येतो.
पाचवा ऋतू हेमंत! गार बोचरा वारा, हुडहुडी भरणारी थंडी, गोधडीच्या उबेत शिरणारी, अगदी रविवारी तर दुपारी सुध्दा गोधडी घ्यायची, झोप लागली नाही तरी गुडूप पडण्यात मजा असते, मग उठल्यावर गरम भजी लागतेच. दारोदारी शेकोटीच्या गप्पा, गाण्यांच्या भेंड्या रंगतात.मग येतो धुंधूर मास, सूर्याचा धनू राशी प्रवेश!आरोग्य शास्त्र आणि भक्ती यांचा संगम! पहाटे विष्णू पूजन ( काकडा) मग सूर्य पूजन करून, नैवेद्य दाखवून सूर्योदयाला जेवणे महत्त्वाचे!खिचडी, बाजरीची भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा, भाज्या, गाजर हा आहार असतो. ब्राह्म मुहूर्ताला आराधना, नामस्मरण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. सूर्याचा मकर राशी प्रवेश झाला की धनुर्मास संपतो.मग संक्रांत, तिळगुळ, हळदीकुंकू, नव्या वधूचा सण, लहान बाळाचं बोरन्हाण अशा सामुदायिक सणांची रेलचेल, भाज्यांची सम्राज्ञी शाकंभरी,तिचं नवरात्र, असा हा आरोग्यदायी ऋतु!
सहावा ऋतू शिशिर! सुरवातीला हेमंतासारखा, थंडी जरा आणखी वाढवणारा! दवबिंदुंनी नटलेली सृष्टी, पण पुष्पहीन झाल्यामुळे थोडासा उदास वाटणारा! जणू हा थकलेल्या सुष्टीला निजायला सांगतो, परत नव्या उत्साहानं वसंताचं स्वागत करण्यासाठी! तरी रंगीबेरंगी पानांचा सडा, गुलमोहरा सारखं सौंदर्य मनाला मोहून टाकतंच ! पडलेल्या पानांची होळी करून परिसर स्वच्छ करायचा आणि रंगपंचमीला रंगांची उधळण करूनआनंद साजरा करायचा,कारण वसंत येणार!
ऋतूंचे वर्णन आलं म्हणजे कालिदास आठवणारच. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘ ऋतुसंहार ‘,यात सगळ्या ऋतूंचे क्रमाने वर्णन आहे. त्यांची सुरवात ग्रिष्माने तर शेवट वसंताने आहे. एकतर कालिदासाच्या सर्व रचना सुखांत आहेत म्हणून असेल किंवा अथर्ववेदाच्या सहाव्या कांडात पहिला ऋतू म्हणून ग्रीष्म आहे, त्यामुळे असेल. कालिदासाच्या या ‘ ऋतुसंहार ‘ ची अगदीच एक दोन वाक्यात ओळख करून देण्याचा हा प्रयत्न!
ग्रीष्म ऋतूत शीतल चंद्र हवासा वाटतो, पण गारवा मिळवण्यासाठी कारंजाचा उल्लेख कवीने केला आहे आणि एरवी एकमेकाच्या जीवावर उठणारे प्राणी सुध्दा आता एकदिलाने जलपान करताहेत, असे वर्णन आहे.
वर्षा ऋतू राजाप्रमाणे वाजत गाजत येतो, स्त्रिया पाण्याने भरलेले घडे त्याच्या पायावर घालत आहेत, शृंगारलेले हत्ती, चौघडे पुढे चालले आहेत, कमळे नसल्याने भुंगे भ्रमित झाले आहेत, त्यामुळे ते मोराच्या पिसाऱ्यावर भाळले आहेत.
शरद ऋतू मधे कोजागिरीच्या चांदण रात्री धरती आणि आकाश दोन्हीकडे समृद्धीची भरती आली आहे. तळ्यात राजहंस फिरू लागले आणि आकाशात चंद्रमा! कवीला निसर्गाकडे पाहून स्त्रीचा शृंगार दिसतो तर स्त्री च्या शृंगारात निसर्ग सापडतो.
हेमंत ऋतू चे वर्णन करताना कर्नाटकातील बेलूर मंदिरावर दर्पण सुंदरीचे अप्रतिम शिल्प आहे, त्याचा आधार घेऊन हेमंत ऋतूतील शृंगाराचे वर्णन केले आहे.
शिशिर ऋतू फारसा न आवडणारा असावा, कारण कवी हिमालय परिसरात राहणारा असल्यामुळे हिमवर्षाव, हिमांकित थंड रात्रीचे वर्णन आहे.शेवटच्या श्लोकात संक्रांत सणाचा उल्लेख आहे.
वसंत ऋतू खूपच आवडता!
शृंगार रसाची मनापासून आवड असल्यामुळे या ऋतूचे वर्णन फार सुंदर केले आहे. मदन जणू योद्धा बनून काम युद्ध जिंकण्यास निघाला आहे असे वर्णन केले आहे. आंब्याचे झाड, त्याचा आकार, सावली, त्याचा डौल, मोहराचा धुंद करणारा गंध, कोकिळेला फुटलेला कंठ, रस रंग व गंध यांचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असणारा आंबा यांचे रसाळ वर्णन कवीने केले आहे. वसंत म्हणजे फुलांनी नटलेली झाडे, रंगांची उधळण आहे, वसंत हा ऋतूंचा राजा त्यामुळे त्याच्या डौलाचे भरभरून वर्णन केले आहे, वसंत पौर्णिमेचा ही उल्लेख आहे.
विरोधी प्रतिमा वापरण्याची शैली, अप्रतिम कल्पना विस्तार, उपमांची खाण कवीकडे आहे, शब्द सौंदर्याच्या बाबतीत तर कालिदासांचा हात कुणीच धरू शकत नाही. कारंज्याला ते जलयंत्र संबोधतात. पक्षी, प्राणी, फुलं, झाडं यांची इतकी विविध नावं वापरली आहेत की वाचणारा संभ्रमित होतो.उदा. प्राजक्ताला शेफालिका, जाई ला मल्लिका आणि कितीतरी! आता पुष्कळ कवींनी कालिदासाच्या काव्यांचा मराठीत भावानुवाद केला आहे त्यामुळं आपणही त्या काव्यांचा रसास्वाद घेऊ शकतो.
असे हे ऋतुचक्र, त्यातले ऋतु एकामागून एक त्याच क्रमाने येणारे, कधीही न थांबणारे, म्हणून अविनाशी ठरलेले, आपल्याही आयुष्यात बदल घडवून आणणारे, त्यामुळे आपलं आयुष्य सुसह्य करणारे!